Sunday 7 June 2020

बुद्धिबळाच्या पटलावर... विनीत वर्तक ©

बुद्धिबळाच्या पटलावर... विनीत वर्तक ©

२०२० हे साल उजाडायच्या आगोदर बुद्धिबळाच्या जागतिक पटलावर सर्वकाही सुरळीत सुरु होतं. राजा, वजीर, घोडे, उंट आणि प्यादी आपल्या परीने पुढे जात होती. पण कोरोना नावाचं एक वादळ जागतिक पटलावर आलं आणि बुद्धिबळाच्या पटलावरच्या सगळ्यांच्या चाली बदलल्या. कोरोना च्या उद्रेकात भली भली राष्ट्र बळी पडायला सुरवात झाली. ज्यांना आपल्या वैद्यकीय सेवा आणि संस्कृतीचा गर्व होता ते ज्यांच्याकडे नावाला वैद्यकीय सेवा होत्या असे सगळेच ह्या त्सुनामी मध्ये वाहून गेले. ह्या सगळ्याचं रोष जिकडून ह्याची सुरवात झाली आणि ज्या देशाने ह्याच आकलन जगाशी शेअर केलं नाही त्या चीन वर् ओढवला. अमेरीका च्या नेतृत्वाखाली आता बुद्धिबळाच्या पटला वरच्या चाली आता पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. कोरोना आधीच जग आणि त्यातील मित्र राष्ट्र, आपापसातील हेवेदावे तसेच  व्यापार रचना, सैनिकी मदत आणि कोरोना नंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये कमालीचा बदल होताना दिसत आहे. ह्या सगळ्याचा परीणाम भारतावर आणि किंबहुना प्रत्येक भारतीयांवर होणार आहे. भारताला आपली प्रत्येक चाल ही खूप विचार करून चालावी लागणार आहे.

कोरोना च्या त्सुनामी मध्ये सध्यातरी सगळ्यात जास्ती नुकसान झालेला देश अमेरीका आहे. आपल्या देशासाठी आणि देशवासियांसाठी नेहमीच सजग आणि युद्ध लढणाऱ्या अमेरीकेला आपल्या अपयशाच खापर कोणावर फोडायचं ह्याची चिंता लागली आहे. कारण अवघ्या काही महिन्यांच्या काळात अमेरीका आणि प्रत्येक अमेरीकन नागरीक ह्या झंझावातात ह्या न त्या कारणाने उध्वस्थ झाला आहे. जगातील अमेरीका नंतर युरोपिअन युनियन, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, दक्षिण अमेरीका, आफ्रिका, भारत, रशिया ह्या जवळपास सगळ्याच भलाढ्य राष्ट्रांचे कंबरडे कोरोनाने मोडले आहे. ह्या सगळ्या मागे चीन ची भुमिका ही संशयास्पद राहिली आहे. एकतर कोरोना चा उगम आणि त्याची लागण झालेल्यांची संख्या त्यानंतर जगभर कोरोना संक्रमणाचे आकडे वाढत असताना चीन चा रुग्णांचा स्थिरावलेला आकडा. ह्या दोन्ही गोष्टींमुळे कोरोना बाबत चीन च्या भूमिकेवर अनेक मत प्रवाह समोर येत आहेत. चीन च्या वाढत्या महत्वकांक्षेला थोपवण्यासाठी, जागतिक बाजारात, व्यापारात चीन च्या वर्चस्वाला शह देण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचं अमेरीका आणि इतर राष्ट्रांना वाटत आहे.

चीन च्या विरुद्ध निर्माण झालेलं जनमत, चीन च्या संदिग्ध भुमिकेवर नाराज असणारी राष्ट्र आणि आपल्या अपयशाला झाकण्यासाठी, आपलं वर्चस्वाला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अनेक नवीन आकडेमोड बुद्धिबळाच्या पटलावर होताना दिसत आहे. पारंपारीक आपले मित्र सोडून भारतासारख्या नेहमीच तटस्थ राहिलेल्या देशाला आणि चीन च्या वर्चस्वाला जशास तसं उत्तर देण्याची ताकद असणाऱ्या देशाला आपल्या बाजूला ठेवणं ही काळाची गरज आहे. चीन स्वतः आपल्या लोकांच्या उद्रेकाला थोपवत आहे. कोरोनामुळे चीन मध्ये उद्योगधंदे आणि कारखान्यांची अवस्था वाईट आहे. चीनमध्ये सरकारविरोधी जनमत निर्माण होते आहे. अश्यावेळी लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन सरहद्दीवर मुद्दामून वाद निर्माण करत आहे. पण ह्या वेळेला गोष्टी वेगळ्या आहेत. भारताच्या सरहद्दीवर आपली लष्करी ताकद दाखवून भारताला गप्प करणं तितकंसं सोप्प राहिलेलं नाही. भारताची वाढलेली लष्करी ताकद, कणखर राजकीय नेतृत्व ह्याशिवाय भारताच्या बाजूने सध्या उभे असलेले देश ही चीन ची डोकेदुखी आहे. भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरीका चीन ला लक्ष्य करायला टपली आहे. लडाख सिमारेषेवर अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षाचं वक्तव्य हे असच आलेलं नाही. दक्षिण चीन सागरात चीन चं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अमेरीकेने आपलं नौदल तयार ठेवलं आहे. जर लडाख मध्ये वातावरण तापलं तर भारताची बाजू घेत दक्षिण चीन सागरात सैनिकी कारवाई करण्यासाठी अमेरीका टपली आहे.

चीन ची अडचण अजून मोठी होते आहे की अमेरीका सोबत इस्राईल, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन ह्यांच्यासह साऊथ चायना सी मधील अनेक छोटी मोठी राष्ट्र ही चीन च्या विरुद्ध उभी आहेत. चीन एकट्या भारताला अथवा एकट्या अमेरीकेला पुरा पडू शकतो. पण एकाच वेळी पूर्ण जगाच्या विरुद्ध आघाडी उघडणं चीन ला शक्य नाही. खरतर भारत आणि अमेरीका ह्या दोन राष्ट्रांन विरुद्ध एकाचवेळी आघाडी उघडणं चीन ला परवडणार नाही हे तो पक्का जाणून आहे. इकडे भारताची अवस्था खरे तर धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी आहे. आज आपल्यासोबत असणारी अमेरीका आपला फायदा झाल्यावर कधी बदलेलं हे सांगता येतं नाही. त्याचवेळी चीन विरोधी भुमिका भारताला प्रत्यक्षात परवडणारी नाही. भारतातल्या लोकांना कितीही वाटलं तरी चीन सोबत आपला व्यवहार थांबवणं हे फेसबुक वर चीन ला शिव्या देणं इतकं सोप्प नाही. भारताला आपली भुमिका आणि आपली पावलं जपुन टाकावी लागणार आहेत. चीन ला मात द्यायला चीन विरोधी राष्ट्रांची मदत तर घ्यायची पण उघडपणे त्या ग्रुप चा सदस्य न होणं ही सगळ्यात शहाणपणाची भुमिका असेल.

Inter-Parliamentary Alliance on China नावाचा एक ग्रुप नुकताच जागतिक पटलावर तयार झाला आहे. सगळ्या आघाड्यांवर चीन ला शह देण्यासाठी जगातील ८ आर्थिक महासत्ता असणारे देश ह्या निमित्ताने एकत्र आले असून चीन विरुद्ध आघाडी उघडली आहे. पाच बाजूने चीन ला कोडींत पकडण्यासाठी जग एकत्र पावलं टाकते आहे. १) कोरोना चा उगम आणि चीन ची भुमिका. २) चीन च्या प्रश्नात जगाची उडी जसे तैवान चा प्रश्न ३) आर्थिक नाकेबंदी अमेरीका आणि जपान ने आपल्या उद्योगधंद्यांना चीन मधून हलवण्यास सुरवात केली आहे ४) मानवी हक्कावर चीन च्या विरुद्ध उडी ५) चिनी तंत्रज्ञानावर बहिष्कार.  अश्या पाचही बाजूने चीन ला कात्रीत पकडण्याचे प्रयत्न जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर सुरु झाले आहेत. ह्या सगळ्याच भूमिकेत भारताची भुमिका ही वजिराची राहणार आहे. वजीर ज्याच्या बाजूने त्याच्या बाजूने खेळाचं पारडं झुकणार हे सर्वश्रुत आहे. पण ह्या सगळ्या खेळात वजिराचा बळी जाण्याची ही शक्यता आहे.  वजीर गेला तरी चालेल पण राजा जिंकायला हवा ही भुमिका अमेरीकेची राहणार आहे. पण हाच वजीर जर व्यवस्थित हाताळला तर राजा हा बुद्धिबळाच्या पटलावर नावासाठी असतो हे कोणीही सांगेल.

भारताची भुमिका ही त्या वजिरासारखी निर्णायक असणार आहे. आता हे बघणं रंजक असणार आहे की भारत ह्या सगळ्यात कशी पावलं टाकतो. कारण भारताने योग्य वेळी शह कटशह दिला तर ह्या वजिराकडे जागतिक सत्तेच्या चाव्या आपसूक येतील अशी परीस्थिती आहे. फक्त समोरच्याच्या दोन पावलांपुढे विचार करून आपली चाल भारताला खेळावी लागणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment