Friday, 5 June 2020

एका मैथिली ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका मैथिली ची गोष्ट... विनीत वर्तक ©

आकाशवाणीने एका शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेला पुढल्या ९९ वर्षासाठी करारबद्ध केलं आहे. पुढल्या ९९ वर्षात जे काही गायन ती गायिका करेल ते आकाशवाणी वरून पुढल्या ९९ वर्ष प्रसारीत करण्याचे हक्क आकाशवाणीने घेतले आहेत. इतक्या वर्षाचा करार करणाऱ्या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेची प्रतिभा किती मोठी असायला हवी ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हा सन्मान कोणत्याच शास्त्रीय गायकाला अथवा गायिकेला मिळालेला नव्हता. दिल्ली च्या मैथिली ठाकूर ने मात्र आपल्या प्रतिभेने हा सन्मान मिळवला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एक, दोन नाही तर तब्बल ५०० पेक्षा जास्त लाईव्ह शो करण्याचा अनुभव ही तिच्या गाठीशी आहे. २५ जुलै २००० साली बिहार च्या मधुबनी  इकडे जन्म झालेल्या मैथिली चा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण आपल्या स्वतःवर विश्वास, मेहनत घेण्याची तयारी, तंत्रज्ञानाची ताकद ओळखून टाकलेली पावलं ह्यामुळे आयुष्य कसं बदलू शकते हे दाखवणारा आहे.

एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मैथिलीचा प्रवास स्वप्नांतून सुरु झाला. आयुष्याचे चटके खात असताना वयाच्या ४ थ्या वर्षी आपल्या आजोबांकडून तिने संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. वडील एक संगीत शिक्षक. हाताशी येणारे तुटपुंजे पैसे आणि त्यावर पोट भरणारी ५ माणसे. आपल्या तीन भावंडांसोबत एका सर्वसाधारण शाळेतून पुढे शिक्षण घेताना समाजाच्या नजरांना जश्यास तसं उत्तर देण्याचा चंग तिने लहानपणीच बांधला होता. मोठं होऊन आय.आर.एस. बनण्याचं स्वप्न घेऊन तिने अभ्यासात लक्ष दिलं. प्रत्येक वर्षी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत तिने आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला. पण तिच्या आतला आवाज मात्र तिला स्वस्थ बसून देतं नव्हता.

सुरांचा वरदहस्त लाभलेल्या मैथिलीने आपल्या सुरांसोबत नशिबाला कलाटणी देण्याचं ठरवलं. इंडियन आयडॉल, सा रे ग म सारख्या रिऍलिटी शो मध्ये आपलं नशीब आजमावल्यावर कुठेतरी निराशाच हाताशी लागत होती. पहिल्या २० स्पर्धकात जाऊन पुन्हा माघारी फिरावं लागत होतं. तरीही हार न मानता तिने रायझिंग स्टार ह्या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला. ह्यात तिचा पहिला नंबर अवघ्या दोन मतांनी गेला. ह्यात पक्षपात झाल्याचा आरोप करत सुजित सरकार ने मुलांचे रिऍलिटी शो बंद करण्यात यावेत अशी मागणीही केली होती. ह्या शो मध्ये जरी ती हरली असली तरी लोकांच्या नजरेत तिचं नाव आलं होतं. पुन्हा एकदा अपयशाला बाजूला ठेवतं स्वतःच काहीतरी सुरु करण्याचा सल्ला तिच्या वडीलांनी तिला दिला. त्यानंतर सुरु झाला मैथिलीचा सोशल मिडिया चा प्रवास.

फेसबुक वर आपल्या गाण्याचे व्हिडीओ तिने आपल्या भावंडांसोबत शेअर करायला सुरवात केली. आपल्या मोबाईल च्या सेल्फी कॅमेराने आपल्याच घरात तिने आपल्या आवाजाला इंटरनेट आणि सोशल मिडिया च्या आभासी जगाशी जोडलं. अवघ्या काही दिवसात तिच्या आवाजाने सोशल मिडियावर एक वादळ आलं. त्यानंतर तिने आपला मोर्चा यु ट्यूब वर वळवला. एका पाठोपाठ एक हिंदी, इंग्रजी गाण्यांचे तिचे व्हिडीओ कमालीचे लोकप्रिय झाले. पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी तिच्या आजोबांनी शिकवलेल्या शास्त्रीय संगीताकडे लक्ष देण्याचं तिला सांगितलं. ह्याच शास्त्रीय संगीताने तिला रातोरात यु ट्यूब आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध केलं. आजच्या घडीला यु ट्यूब वरील तिच्या चॅनेल ला  १.७८ मिलियन (१७.८ लाख ) लोक सबस्क्राईब आहेत.

मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडांचा प्रवास कोणालाही प्रेरणा देईल असाच आहे. असं म्हणतात,

'"कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं... 

आज मैथिली ठाकूर चा प्रवास बघून ह्या ओळीची मनोमन आठवण होते. कारण सगळ्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये तिने आपला संघर्ष सुरु ठेवला आणि आज परिस्थिती अशी आहे की तिच्या आवाजाला पुढल्या ९९ वर्षासाठी करारबद्ध केलं गेलं आहे. तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


3 comments:

  1. खूपच हृदय स्पर्शी नि स्फूर्तिदायक पोस्ट आहे. मनस्वी आवडणारी गोष्ट कितीही अडचणी मार्गात आल्या तरी त्यावर मात करून साध्य करता येते हे मैथिली आणि तिच्या भावंडांनी सिध्द केले आहे. त्यांना Hats Off.त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा 💐💐
    इतका सुंदर लेख पोस्ट करून ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल विनितजी खूप खूप आभार 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. 👆बी. डी.महा नूर
    अहमदनगर
    मोबाईल 9423791899

    ReplyDelete
  3. खूप छान पोस्ट..... सर सध्या आहात कुठे
    फेसबुक वर दिसत नाही आहात

    ReplyDelete