Wednesday 10 June 2020

स्वरांना निरागस चेहरा देणारी मंजेश्वर भावंड... विनीत वर्तक ©

स्वरांना निरागस चेहरा देणारी मंजेश्वर भावंड... विनीत वर्तक ©

कोरोनामुळे गेले कित्येक महीने पूर्ण जगभर सगळेच आपापल्या घरात अडकून पडले आहेत. अश्या लॉकडाऊन ची सवय पूर्ण जगात कोणालाच नव्हती. घड्याळाच्या काटयावर धावणाऱ्या जगाला अचानक लागला. आधी ह्या लॉकडाऊन मुळे सगळेच आनंदी झाले पण हा आनंद क्षणभर ठरला. लॉकडाऊन ची ही वेळ प्रत्येकाने आपल्या परीने सुखद करण्याचा प्रयत्न केला. असाच एक प्रयत्न मेलबॉर्न,ऑस्ट्रेलिया इकडे राहणाऱ्या मंजेश्वर कुटुंबाने केला. अमेय आणि सपना मंजेश्वर ह्यांच्या दोन मुलांनी मराठी, हिंदी गाण्यांची सुरेली बरसात केली. अवघ्या काही दिवसात ह्या भावंडांच्या जादूने इंटरनेटवर एक वादळ आलं. त्यांच्या आवाजाने लॉकडाऊन चा काळ अनेकांसाठी सुसह्य झाला.

अर्जुन मंजेश्वर वय वर्ष ८ आणि अर्णव मंजेश्वर वय वर्ष ४ अश्या ह्या दोन भावंडांची नावं असून फारसं मराठी, हिंदी येत नसताना सुद्धा आपल्या लाडिक आवाजाने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. अर्जुन नुकतेच संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतो आहे. तर अर्णव आपल्या भावासोबत शब्द गुणगुणतो. पण ह्या भावंडांचं वेगळेपण म्हणजे त्या दोघांची निरागसता. जेव्हा पहिल्यांदा मी ह्या दोघांचं गाणं ऐकलं तेव्हा त्या गाण्यापेक्षा ह्या दोघांचे हावभाव मी जास्ती अनुभवले. सुरांच्या तालावर अर्जुन आणि अर्णव ह्या दोघांचं डोलणं आणि अर्णव च्या मुखातून वयाच्या चौथ्या वर्षी निघणारे ते लाडिक शब्द त्या सुरांपेक्षा आपल्या आत खोलवर जातात. आजवर गाणी गाणारे आणि सुरांचा वरदहस्त लाभलेले अनेक गायक आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले असतील. पण अर्जुन आणि अर्णव ची गोडी त्यांच्या निरागसतेत आहे.

मराठी असो वा हिंदी दोन्ही भाषेच्या शब्दांवर वयाच्या मानाने शब्दांवर असलेली पकड ह्या दोघांचीही खूप सुंदर आहे. गाताना डोलणाऱ्या माना आणि निरागस हास्याची चेहऱ्यावर उमटणारी लकेर आपल्या मनाचा लगेच ठाव घेते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात विरंगुळा म्हणून आपल्या मुलांच संगीत अमेय मंजेश्वर ह्यांनी रेकॉर्ड केलं. सोशल मिडियावर हे व्हिडीओ आल्यावर अल्पावधित ह्या दोन्ही भावंडांच्या आवाजाने सगळ्यांवर गरुड केलं आणि मंजेश्वर भावंड इंटरनेट च्या दुनियेत प्रसिद्ध झाली. ह्या लोकप्रियतेचा जोर इतका होता की यु ट्यूब वर ह्या दोन भावंडांचे चॅनेल सुरु करावं लागलं. अवघ्या एका महिन्याच्या काळात  ह्या चॅनेल ला ४९,५०० लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. अनेकांसाठी कठीण वाटणारी गाणी ही ह्या भावंडांनी ज्या पद्धतीने पेलली आहेत त्याला तोड नाही. अनेक मान्यवरांची सुद्धा त्यांच्या गाण्याला दाद मिळाली आहे.

मला तरी संगीत सुरांपेक्षा त्यांच्या निरागस चेहऱ्याने आणि त्यांच्या हावभावाने वेड लावलं आहे. गाणं सादर करताना ज्या रसिकतेने ते गाण्यांचा आस्वाद घेतात हे बघणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. 'ससा हो ससा कापूस जसा' 'हाल कैसा हैं जनाब का?' म्हणणारे ते जेव्हा 'आकाशी झेप घे रे पाखरा' हे गाणं गातात तेव्हा संगीत कोळून प्यायलेल्या एखाद्या कलावंताला आपण ऐकतो आहोत का असा भास ही होतो आणि त्याचवेळी त्यांची सहजता आपल्याला निशब्द करून जाते. एवढ्या कोवळ्या वयात दोन्ही भावंडांची सहजता आणि निरागसता मनाला स्पर्शून जाते. त्यामुळेच मंजेश्वर भावंड आज सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत. ह्या दोन्ही चिमुकल्यांच्या पुढल्या वाटचाली ला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळतील अशी आशा आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment