Monday 15 June 2020

चीन चा बहिष्कार खरचं शक्य आहे का?... विनीत वर्तक ©

चीन चा बहिष्कार खरचं शक्य आहे का?... विनीत वर्तक ©

कोरोना बद्दल संशयास्पद भुमिका, लडाख मध्ये केलेली घुसखोरी आणि एकूणच चीन ची वाढती दादागिरी ह्यामुळे भारतातील जनमानसात चीन बद्दल असंतोष वाढलेला आहे. कोरोना च्या प्रसाराचं खापर चीन च्या माथी लागलेलं आहे. त्यात चीन घेत असलेल्या भूमिकेमुळे पूर्ण जगात चीन बद्दल असंतोष आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन आणि त्याला लडाख च्या सोनम वांगचुक ह्यांनी आपल्या व्हिडीओ द्वारे चीन चा बहिष्कार करण्याचं आवाहन ह्यामुळे सगळीकडे चीन च्या मालावर बहिष्कार घालण्याच्या पोस्ट सुरु झाल्या. आत्मनिर्भर भारत बनवून चीन च्या मालाचा बहिष्कार केला की आपण त्याला चांगला इंगा दाखवू वगरे अश्या पद्धतीने भावनिक आवाहन करणाऱ्या पोस्ट आणि फॉर्वर्डस ची चालती झाली. पण कोणी थांबून विचार केला तर खरच चीन चा बहिष्कार शक्य आहे का?.....

चीन चा बहिष्कार आपल्याला शक्य आहे का? परवडणारा आहे का? भारताच्या बहिष्काराने भारत आणि चीन ह्या दोघांच्या हितसंबंधांवर होणारे संभाव्य परीणाम ? त्या पलीकडे आपलं देशहित राखून आपल्याला कोणत्या पद्धतीने चीन च्या अरेरावी ला उत्तर देता येईल ह्याचा डोळसपणे विचार व्हायला हवा. भावनांच्या आहारी जाऊन चीन चा बहिष्कार शक्य नाही ही वस्तुस्थिती आपण स्विकारायला हवी. आपण जर आकड्यांचा विचार केला तर बरचसं चित्र सुस्पष्ट होईल. भारत आणि चीन दरम्यान व्यापाराचा विचार केला तर आपण चीन कडून साधारण वर्षाला ७० बिलियन अमेरीकन डॉलर किमतीचं सामान आणतो आणि फक्त १६.५ बिलियन अमेरीकन डॉलर चं सामान चीन ला निर्यात करतो. भारत- चीन आयात-निर्यात व्यापारातली तूट जवळपास ५३ बिलियन अमेरीकन डॉलर ची आहे. आता कोणी म्हणेल हे तर चांगलच म्हणजे आपण चीन कडून सामान नाही घेतलं तर त्यांची वाट लागेल. पण चीनसाठी ७० बिलियन अमेरीकन डॉलर हे त्यांच्या जगभरातील संपूर्ण निर्यातीचा फक्त २% आहे. म्हणजे उद्या भारताने काहीही विकत घेतलं नाही तरी चीनसाठी हे नुकसान २% किंवा फारफार तर ५% जास्तीत जास्त असेल. त्याने चीन ला ओरखडा उठल्या इतपत ही फरक पडणार नाही. 

आता आपण भारताची बाजू बघू. भारत त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी चीन कडून घेतो त्यातील खूप साऱ्या अतिशय महत्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. इलेक्ट्रिक सारख्या क्षेत्रात जवळपास ६०% गोष्टी आपण चीन कडून आणतो. भारतातील सगळ्यात मोठ्या ५ मोबाईल ब्रँड्स पैकी ४ कंपन्या ह्या चीन च्या आहेत. भारतातील २ बिलियन अमेरीकन डॉलर इतक्या खेळणाच्या बाजारातला ९०% हिस्सा चीन चा आहे. तुम्ही, आम्ही वापरत असलेल्या प्रत्येक लॅपटॉप, मोबाईल, टी.व्ही. आणि कार मधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मेड इन चायना भाग आहे. भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात चिनी कंपन्या किंवा चीन मधून येणारा कच्चा माल वापरला जातो. औषधापासून ते सायकल पर्यंत भारताची सगळीच औद्योगिक दारोमदार चीनवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे. हे कटू वास्तव आपल्याला स्विकारायला हवं. त्यामुळेच चीन वर व्यापारी निर्बंध टाकून आपण आपलचं नुकसान जास्ती प्रमाणात करू निदान सद्य परिस्थितीयामध्ये. भावनिक न होता आपला रोष दाखवण्याचा काहीच मार्ग नाही का? तर मार्ग आहे पण तो झटपट परीणाम दाखवेल असा नाही. सोनम वांगचुक ह्यांचा व्हिडीओ जर निट बघितला तर त्यांनी संपूर्ण आराखडा त्यामध्ये सांगितला आहे.

भारताला जर भारत- चीन व्यापारातली आयात- निर्यात तूट जर कमी करायची असेल तर आपल्याला आपल्या औद्योगिक क्षेत्रात अंगभूत बदल करावे लागणार आहेत. आज चीन ज्या गोष्टी निर्माण करतो त्या आपल्याला भारतात त्याच किमतीत आणि त्याच गुणवत्तेच्या बनवाव्या लागतील. ती गुणवत्ता आणि ते कमी किमतीत बनवण्याचं कौशल्य आपल्याला शिकावं लागेल. त्यासाठी भारताला रीसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात खूप काम करावं लागेल. जर चीन कडून माल कोणी घेऊ नये अशी इच्छा आपली असेल तर तसा माल भारतात तयार करणारी साखळी उभारावी लागेल. भारत एक लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे कामगार प्रश्न, कामाचे तास आणि मनुष्यबळ ह्या सर्व बाबतीत आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. भारतात येणारी परदेशी गुंतवणूक ही चीन मध्ये होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीच्या फक्त २५% तर अमेरीकेत होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीच्या १०% आहे. म्हणजे अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

भारतात चीन ने २०१९ मध्ये  जवळपास ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर स्टार्ट अप कंपन्यांन मध्ये जवळपास २९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतातील ३० मोठ्या स्टार्ट अप पैकी १८ स्टार्ट अप मध्ये चीनच्या लोकांची आणि कंपन्यांची गुंतवणूक आहे. ह्या १८ कंपन्या भारतातील बलाढ्य अश्या आहेत. जर उद्या आपण बहिष्कार केला आणि चीन ने आणि चीन च्या लोकांनी ही गुंतवणूक काढली तर जवळपास काही लाख भारतीय लोकांचे रोजगार जातील. आपलं सरकार आणि आपण भारतीय म्हणून अश्या गोष्टींना तयार आहोत का? फेसबुक आणि व्हाट्स अप वर गणित करून चीन वर बहिष्कार टाकता येणार नाही. चीन च्या बहिष्कारानंतर निर्माण होणाऱ्या सर्व अडचणींना सामोरी जाणारी पर्यायी व्यवस्था बनवल्या शिवाय हे शक्य नाही. मी कोणी चीन चा चाहता नाही. पण चीन च अस्तित्व आज आपल्यासाठी नकळत का होईना आपल्या आयुष्याचा अंगभूत भाग झालं आहे. ते दूर करायचं असेल तर स्वप्नरंजन न करता डोळसपणे पावलं टाकावी लागतील.

भारत आत्मनिर्भर व्हावा अशी सगळीच भारतीयांची इच्छा आहे. चीन ची मक्तेदारी संपुष्टात यावी आणि चीन च्या अरेरावी ला लगाम बसावा असंही सगळ्यांना वाटते पण फेसबुक आणि व्हाट्सवर चीन चा बहिष्कार करून आपण ह्यापैकी काहीच करू शकणार नाही आहोत. मोबाईल फोन मधली चीन ची एप्लिकेशन डिलीट केली म्हणजे चीन च्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडलं असं होतं नाही. ह्यापेक्षा आपल्या मध्ये असणाऱ्या कमतरतांवर मात कशी करता येईल? आपल्या मालाचा दर्जा कमी किंमतीत कसा उंचावता येईल ह्यावर संशोधन आणि काम व्हायला हवं, आपलं उत्पादन जागतिक स्पर्धेत तोडीस तोड बनवता यायला हवं. आपण आत्मनिर्धार तेव्हाच बनू  जेव्हा आपण चीन च्या मालाला एक सशक्त पर्याय निर्माण करू. जोवर ते होतं नाही तोवर चीन वर बहिष्कार वगरे टाकून काहीच साध्य होणार नाही. भावनिक न बनता जर योग्य पावलं टाकली तर आपण चीन वर बहिष्कार तर नाही तर चीनला एक सशक्त पर्याय म्हणून नक्कीच पुढे येऊ.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment