ड्रॅगनच्या वळवळणाऱ्या शेपटाला सिंहाचा तडाखा... विनीत वर्तक ©
चिनी ड्रॅगनची शेपूट पुन्हा वळवळ करायला लागली आहे. इतके वर्ष निद्रिस्त असलेलं हे शेपूट पुन्हा वळवळण्यामागे काही कारणं आहेत. १९६२ च्या युद्धात आपल्या जवळपास ४३,००० चौरस किलोमीटर चा भूभाग ड्रॅगनने आपल्या चुकांमुळे गिळंकृत केला होता, ज्याची किंमत आपण आजही मोजतो आहोत. १९६२ च्या युद्धात आपले ३२५० पराक्रमी सैनिक हुतात्मा झाले आणि स्वित्झर्लंड ह्या देशाइतका भूभाग आपण चीनला दिला. अतिशय चुकीचं राजकीय धोरण आणि नेतृत्व, युद्धात आकलन न करता घेतलेले निर्णय आणि आपल्या सीमांच्या रक्षणासाठी त्या भागात पोहचण्यासाठी रस्ते, सैनिकी आयुधे आणि दळणवळण यंत्रणा अद्ययावत करण्यात दाखवलेली निष्क्रियता ह्यामुळे भारताचा पराभव झाला होता.
परंतु आज जवळपास ५८ वर्षानंतर गोष्टी खूप वेगळ्या आहेत. चीनचा ड्रॅगन अजूनही आपल्यापेक्षा सैनिकी भाषेत मजबूत असला तरी युद्धात आकड्यांचा खेळ महत्वाचा नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या काही शे मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना हजारो सैन्यबल असणाऱ्या मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडलं होतं ते परिस्थितीचं आकलन करून! आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत भारतीय सैन्याने आपली तयारी केली आहे. त्यामुळेच ड्रॅगनचं शेपूट वळवळ करत आहे. आजच्या घडीला अतिउंचावरील म्हणजे जवळपास १४,००० फूट उंच आणि उणे तपमानात युद्ध करण्यात जगातील सर्वोत्तम सैन्य म्हणून भारतीय सैन्य आहे हे खुद्द चिनी ड्रॅगनने मान्य केलं आहे. त्यामुळे आकड्यांच्या आणि आयुधांच्या बाबतीत चीन आपल्यापेक्षा सरस असला तरी ज्या भूभागावर आपली सीमारेषा ड्रॅगन शी जोडलेली आहे तिकडे भारतीय सैन्य मजबूत तर आहेच पण तिकडे भारताने काही वर्षात केलेल्या रस्ते आणि दळणवळण यंत्रणेमुळे भारताची बाजू मजबूत आहे. १९६२ चा भारत आणि २०२० चा भारत सगळ्या बाबतीत वेगळा आहे हे चिनी ड्रॅगन ला चांगलं माहिती आहे. त्यामुळेच आज स्वतःचे ४३ सैनिक मारले गेल्यावर ड्रॅगन शांततेने हा वाद सोडवण्याची भाषा करतो आहे.
लडाखच्या गाल्वान खोऱ्यात जो वाद झाला त्यामागे खूप काही गोष्टी आहेत. एक भारतीय म्हणून आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. गाल्वान खोर हे जवळपास १७,००० फूट उंचीवर आहे. ह्या खोऱ्यात भारत आणि चीनची नियंत्रण रेषा आहे. गेल्या काही वर्षात भारताने झपाट्याने ह्या भागात रस्ते आणि दळणवळ यंत्रणा उभी केली आहे. मी काही दिवसांपूर्वी ज्यावर लेख लिहलेला होता तो चेवांग रिंचेन सेतू चीन चं खरं दुखणं आहे. भारताने ह्या भागात श्योक आणि दौलत बेग ओल्डी भागात जाणारा २२४ किलोमीटर लांबीचा फिडर रस्ता तयार केला आहे. नियंत्रण रेषेपासून अवघ्या १० किलोमीटर वर असणाऱ्या ह्या रस्त्याने भारत प्रचंड वेगाने आपलं सैन्यबळ हलवू शकतो. अगदी छोट्या मोठ्या ट्रक पासून रणगाड्या पर्यंत सगळ्या गोष्टी १७,००० फुटावर अतिशय वेगाने नियंत्रण रेषेवर घेऊन जाऊ शकतो. हे कमी तर भारताने ह्या भागात जगातील सर्वात उंचीवर असणारी धावपट्टी बांधली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी भारताने इकडे C17 Globemaster हे अतिशय शक्तिशाली सैनिकी विमान उतरवून चीनी ड्रॅगनच्या शेपटीवर अंकुश ठेवला आहे. चीनने ह्या भागात आपलं सैन्य आणून भारताला थांबवण्याचा प्रयत्न केला पण भारताने ह्याला न जुमानता आपलं काम सुरूच ठेवलं आणि चीन च्या ड्रॅगन ने फुत्कारायला सुरवात केली.
चीनच्या ड्रॅगन ची पिलावळ आपल्या देशात ही कमी नाही. आपल्या देशाच्या सैनिकांचे बळी घेणाऱ्या ड्रॅगन विरुद्ध आंदोलन करायचं सोडून ड्रॅगन ला मान द्यावा ह्यासाठी लाल बावटा घेऊन रस्त्यावर येणारे पूर्ण जगात भारतात दिसतात. कारण ह्यातलं कोणीही १७००० फुटावर उणे २०-३० डिग्री सेल्सिअस तपमानात बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करत नाही. बालाकोट इथल्या हल्ल्याचे पुरावे मागणारे असोत वा आता निशस्त्र सैनिक सीमेवर का गेले ही ओरड करणारे राजकारणी सैनिकांच्या बलिदाना मध्ये पण राजकारण शोधतात. पण तो तिथे सीमेवर उभा असणारा सैनिक मात्र आपल्या साथीदारांचं असं बलिदान आपलं दुःख, राग, आवेग आतल्या आत गिळून पुन्हा एकदा ड्रॅगनला, आपल्या सिंहाच्या डरकाळीने तिथल्या तिथे उत्तर देऊन उभा आहे. ह्याच सिंहपराक्रम आणि बलिदानामुळे आज ड्रॅगन कचरतो आहे. जगावर अधिराज्य करण्यासाठी आसुसलेला चीन आपले ४३ सैनिक मारले गेल्यावर ही संयमाची भाषा करतो ह्यात सर्व आलं.
आपल्या काही खराब निर्णयामुळे आजही ह्या भागात दोन्ही सैनिक बंदूक घेऊन गोळीने शत्रूचा वेध घेऊ शकत नाहीत म्हणून चिनी सैन्याने रॉडला उलटे खिळे लावून त्याने आपल्या पोस्ट ची काळजी घेणाऱ्या भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला केला. हे सगळं करण्यामागे चीन चं मोठं राजकारण आहे. गोळी मारली तर कराराचं उल्लंघन केलं म्हणून आपल्या पिलावळीतर्फे भारतात अशांतता माजवायची कारण भारताला चीनसोबत युद्ध सुरु करण्याच खापर फोडायचं. ते नाही झालं तर आपण चाल करून गेलेला भूभाग मिळवायचा असं आजवर चिनी ड्रॅगन करत आला आहे. पण ह्यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना जशास तसं उत्तर तर दिलं पण भारत आता एक इंच पण भूमी गमावणार नाही हा संदेश ही दिला. चीनचा हा डाव त्यांच्यावर उलटला म्हणून चीन च्या ड्रॅगन ची पिलावळ आता काही दिवस भारतात सक्रिय होईल. कारण कसं तरी लडाख भागातलं काम थांबवणं हे चीनचं अंतिम लक्ष्य आहे. पण युद्ध त्यालाही नको आहे कारण युद्ध झालं तर जवळपास सगळेच देश भारताच्या बाजूने उभे राहतील. अमेरिका तर टपलेली आहे. त्याच्या जोडीला ऑस्ट्रेलिया, जपान, इस्राईल भारताला उघडपणे पाठिंबा देतील. रशिया ह्या सगळ्यात तटस्थ राहील. त्यामुळे चीन ला लडाख नाहीतर जगाच्या सर्व भागात ह्या युद्धाचे चटके बसतील हे उघड आहे. त्यामुळेच ड्रॅगन शांततेची भाषा करतो आहे.
एक भारतीय म्हणून, आपल्या सिंहाच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. भारतीय सेना आणि सेनेतील प्रत्येक सैनिक ड्रॅगनला जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण एक सामान्य नागरिक म्हणून ड्रॅगन च्या पिलावळीला जागीच रोखायला हवं. आज सैनिकांवर प्रश्न विचारणाऱ्याना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आधी १७,००० फुटावर नुसतं जाऊन दाखवा मग आपण युद्ध कसं आणि भारतीय सैन्याने काय करावं आणि करू नये ह्यावर विचार करू. ड्रॅगनच्या वळवळणाऱ्या शेपटीला तडाखा देताना आपण २० पराक्रमी सिंहांना गमावलं आहे. त्याचा बदला योग्य त्या वेळी भारतीय सेना घेईल असा विश्वास मला आहे. भारतीय सैन्याच्या त्या पराक्रमी सैनिकांच्या बलिदानाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.