Thursday, 15 April 2021
'मायक्रो ॲग्रेशन' एक उघड गुपित... विनीत वर्तक ©
Saturday, 10 April 2021
एका इंजेक्शन ची गोष्ट... विनीत वर्तक ©
एका इंजेक्शन ची गोष्ट... विनीत वर्तक ©
२०२० वर्षाने संपूर्ण जगाचे संदर्भच बदलवून टाकले. एकीकडे लॉकडाऊन, कोरोना विषाणू चा कहर यामुळे जिकडे उद्योगधंद्यांच कंबरड मोडलं तिकडे दुसरीकडे काही उद्योगांनी कात टाकली. स्वतःच्या वैद्यकीय अवस्थेबद्दल जागरूक नसलेले देश खडबडून जागे झाले. यात सगळ्यात अग्रक्रम लागतो तो भारताचा. भारतात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक उद्योगांनी कात टाकली. या विषाणूचा फैलाव जसा जगभर झाला तसं जगातील सर्व देशांना या उद्योगांकडून भरीव योगदानाची गरज भासू लागली. आता प्रश्न पैश्याचा नव्हता तर पुरवठ्याचा होता. इतके वर्ष संपूर्ण जगाला गपचूप निरोगी करणारे भारतीय उद्योग ज्यांची कल्पना भारतीयांना नव्हती अचानक त्यांचा उदय जागतिक पटलावर झाला. यातील एक नाव म्हणजे एच.एम.डी. हिंदुस्थान सिरींज एन्ड मेडिकल डिव्हाइसेस. ( Hindustan Syringes & Medical Devices (HMD).
एच.एम.डी. ची स्थापना २ ऑगस्ट १९५७ मधे नरेंदर नाथ यांनी केली. ते एक केमिस्ट होते. या क्षेत्रात काम करताना त्यांच्या चाणाक्ष नजरेला इंजेक्शन, सुया आणि इतर वैद्यकीय सामानाच्या बाबतीत भारतात खूप मोठी पोकळी जाणवली. त्याकाळी भारतात ही सगळी उत्पादन विदेशातून आयात केली जात होती. भारताला या बाबतीत स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच एका नव्या उद्योगात भारताचा तिरंगा रोवण्यासाठी त्यांनी एच.एम.डी. ची स्थापना केली. आपल्या ६५ वर्षाच्या इतिहासात ही कंपनी एका घराण्या पुरती मर्यादित राहिलेली आहे. नरेंदर नाथ नंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच आजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव नाथ यांनी कंपनीला एका वेगळ्या स्तरावर नेलं.
२०२० साल उजाडलं आणि कोरोनाचा वणवा संपूर्ण जगात पेटला. कोरोनावर अनेक कंपन्यांनी संशोधन करून लसीची निर्मिती केली. एका अंदाजाप्रमाणे जगात १० बिलियन लस जगातील संपूर्ण लोकसंख्येला कोरोनमुक्त करण्यासाठी लागणार आहेत पण ती लस माणसाच्या शरीरात टोचण्यासाठी लागणार इंजेक्शन कुठून आणणार? भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट कडे आज संपूर्ण जगाच लक्ष लसीसाठी लागलं आहे. त्याचवेळी संपूर्ण जग इंजेक्शनसाठी पुन्हा एकदा भारताकडे आशेने बघत आहे. आशियातील सगळ्यात जास्ती इंजेक्शन बनवणारी कंपनी म्हणजेच एच.एम.डी. आज नरेंदर नाथ यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला आहे. फरिदाबाद इथल्या कंपनीच्या फॅक्टरी मधे मिनिटाला तब्बल ६२५० पेक्षा जास्ती इंजेक्शन बनवली जात आहेत. या वेगाने तब्बल ३ लाख ७५ हजार इंजेक्शन प्रत्येक तासाला तयार होत आहेत. जुलै २०२१ पर्यंत कंपनी प्रत्येक वर्षाला तब्बल ३ बिलियन इंजेक्शन बनवण्याची क्षमता निर्माण करेल.
आज एच.एम.डी. भारत सरकारला सप्टेंबर २०२१ पर्यंत ४४० मिलियन इंजेक्शन कोरोना लसी भारतीयांना देण्यासाठी पुरवत आहे. यातील १७७ मिलियन इंजेक्शन एकट्या एप्रिल महिन्यात भारत सरकारला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या प्रत्येक इंजेक्शन ची किंमत अवघी २ रुपये असणार आहे. भारतीयांसाठी अतिशय कमी किमतीत आणि जातीत जास्त पुरवढा करण्याचं कंपनीने ठरवलं आहे. या सोबत एच,एम.डी. २४० मिलियन कोजॅक इंजेक्शन कोवॅक्स मार्फत युनिसेफ ला देणार आहे. ७९ मिलियन इंजेक्शन ब्राझील या देशाला देणार आहे. १५ मिलियन इंजेक्शन जपान ला देणार आहे. याशिवाय तब्बल १२० देशांना इंजेक्शन देण्याच्या ऑर्डर एच,एम.डी.ला मिळालेल्या आहेत. हे फक्त कोरोना साठी झालं ह्याशिवाय इतर लसी आणि औषध देण्यासाठी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल आणि संस्था यांच्या ऑर्डर ही एच,एम.डी. वेळेत पूर्ण करणार आहे.
हे आकडे डोळे विस्फारणारे आहेत. जगाच्या पाठीवर एका भारतीय उद्योगाने विश्वासाने, सचोटीने आणि सर्वसामान्यांना परवडेल अश्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध करून भारताची शान आज वाढवली तर आहेच पण त्याही पलीकडे एका नव्या आत्मनिर्भर भारताच्या उदयाची नांदी जगाच्या पाठीवर केली आहे. एकेकाळी जिकडे भारत या क्षेत्रात काही बनवू शकेल का अशी शंका होती तिकडे आज भारत नेतृत्व करत आहे. राजीव नाथ यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रम यामुळेच आज एच,एम.डी. या पातळीवर पोहचली आहे.
“India is our priority and comes first but we do have to honor our global commitments and play a balancing role. So, for now, we are allocating two-thirds capacity of KOJAK AD syringes to the government and one-third to our regular global UN clients. We are happy to complement Vaccines Diplomacy with Syringes Diplomacy and raise the Brand India flag in over 120 countries worldwide.”
Rajiv Nath.
मार्च २०२० मधे एच.एम.डी. ची क्षमता ८०० मिलियन कोजॅक इंजेक्शन बनवण्याची होती. भविष्यात काय होणार आहे याचा विचार करून राजीव नाथ यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी १०० कोटीची गुंतवणूक केली. ज्यात इंजेक्शन बनवणाऱ्या मशीन, लोक, तंत्रज्ञान यांचा समावेश होता. त्याच दूरदृष्टीमुळे आज एच.एम.डी. जवळपास १.२ बिलियन कोजॅक इंजेक्शन वर्षाला बनवण्याच्या वेगाने काम करून अनेकांचे प्राण वाचवत आहे.
एका छोट्या उद्योगातून भारताचा तिरंगा अटकेपार नेणारे राजीव नाथ आणि संपूर्ण एच.एम.डी. ला माझा नमस्कार. तुमच्या पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Thursday, 8 April 2021
सामाजिक जबाबदारी... विनीत वर्तक ©
सामाजिक जबाबदारी... विनीत वर्तक ©
गेल्या काही दिवसात कोरोना आजाराचा वेग प्रचंड वाढला आहे. गेल्या २४ तासात भारतात १,३१,९६८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. एकट्या महाराष्ट्रात २४ तासात ५६,२८६ नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. कोरोना फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे हातपाय पसरतो आहे. नक्कीच महाराष्ट्रात त्याचा वेग प्रचंड आहे याबद्दल दुमत नाही. पण या सगळ्याला कारणीभूत कोण? या प्रश्नावर सोशल मिडिया किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्म वर सर्वच जण आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन उभे राहतील. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यावर आरोपाची गरळ ओकली जाईल. लसी आणि त्यांच्या प्रत्येक राज्याला होणारा पुरवढा यांच्या आकड्यांच गणित मांडलं जाईल. त्यावरून एकमेकांची जात, धर्म ते शिवागीळ करण्यापर्यंत सगळ्यांची मजल जाईल. मला त्यात जायचं नाही.
मुळात यात दोष कोणाचा आहे? तर एक सशक्त समाज म्हणून आपण कमी पडलो आहोत. आज कोरोना ज्या वेगाने वाढतो आहे त्याला आपण समाजाचा भाग म्हणून कारणीभूत नाही का? गेले वर्षभर प्रत्येक माध्यमातून कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी कितीतरी सूचना केल्या गेल्या आहेत. आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याचा उपापोह गेले वर्षभर आपण करत आलेले आहोत. आज प्रत्येक माणसाला कोरोना मधे आपण कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती आहे. पण ती घेण्याची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यात एक समाज म्हणून आपण सपशेल अयशस्वी राहिलेलो आहोत.
गेल्या वर्षी हा आजार नवीन होता त्यामुळे खूप सारे संभ्रम सगळ्यांच्या मनात होते पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज डॉक्टर पासून पेशंट पर्यंत लहान मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत, श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे हे माहित आहे. पण आपण काय वागतो? आपण काळजी घेतो का? आपण योग्य रीतीने मास्क घालतो का? आपण सोशल डिस्टंसिंग च पालन करतो का? आपण आपल्या सोबत इतर लोकांना याच पालन करावयास भाग पाडतो का? कारण आपण कितीही काळजी घेतली तरी समोरचा एक जरी काळजी घेत नसेल तर तो काळजी घेणाऱ्या सगळ्यांना कोरोना आजाराचं संक्रमण करू शकतो हे आपण लक्षात कधी घेणार आहोत?
नाकाच्या खाली घातलेला मास्क, रस्त्यावर शिकणं, थुंकणे, एकमेकात योग्य ते अंतर न राखण यामुळे आजची स्थिती आलेली आहे. याला कोणतं सरकार जबाबदार नाही तर तुम्ही,आम्ही आणि आपण सर्वच जबाबदार आहोत. बेड वाढवा, व्हेंटिलेटर ची संख्या वाढवा, ऑक्सिजन वाढवा हे सगळे आजार झाल्यानंतरचे उपाय आहेत. पण आपण आजार टाळण्यासाठी काय करत आहोत? जगातील कोणतीही लस ही कोरोना होण्यापासून वाचवू शकत नाही. लस ही फक्त जीवन आणि मृत्यू यातील अंतर वाढवते. लस घेतल्यामुळे फारतर मृत्यू तुम्हाला कवटाळू शकणार नाही पण ती कोरोनाला रोखू शकत नाही. लस घेतल्यामुळे तुम्हाला जरी मृत्यूने हुलकावणी दिली तरी तुम्ही त्या काळात दुसऱ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरणार आहात त्या पापाच शल्य आपल्याला आहे का?
सामाजिक जाणीव आणि जबाबदारी फक्त आणि फक्त कोरोनाला थोपवू शकते. लग्न, मुंज, वाढदिवस, पार्टी, सिनेमा, सभा, आंदोलन हे आपल्या जिवापेक्षा महत्वाचे आहेत का? त्याने केलं म्हणून मी पण करणार याच न्यायाने आपण पुढे जाणार आहोत का? जर जाणार असू तर ही सुरवात आहे येत्या काळात २-३ लाख / प्रति दिवस रुग्णसंख्येचा आकडा गाठायला फार वेळ लागणार नाही. आपण का म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही? आज ठरवू की माझ्यासोबत मी प्रत्येकाला कोरोना संबंधीच्या काळजी घेण्याचं शिवधनुष्य उचलेन. ती व्यक्ती सांगून ऐकत नसेल तर योग्य त्या रीतीने पोलीस, नायायालयीन यंत्रणा किंवा राजकीय पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्या व्यक्तीला ती काळजी घेण्यास भाग पाडीन. कारण कोरोनाचा प्रसार मी एकटा थांबवू शकत नाही. मी एकटा अपुरा आहे. आम्ही, एक समाज म्हणून जेव्हा त्याच्या विरुद्ध उभे राहू तेव्हा आणि तेव्हाच कोरोना हा थांबेल.
बाकीच्यांच मला काय? हा आपला विचार जर आपण लवकरात लवकर बाजूला केला नाही तर आपलं आणि आपल्या लोकांचंही आयुष्य टांगणीला लागलेलं आहे. सरकारवर खापर फोडण्यात अर्थ नाही. आज तहान लागल्यावर सगळेजण लस घ्यायला धावत आहेत. इतके दिवस लस घ्या म्हणून आवाहन करावं लागत होतो तेव्हा आपण सोशल मीडिया वर राजकारणाचे आणि कोणती लस चांगली आणि वाईट याच बिगुल वाजवण्यात मग्न होतो. आता जेव्हा आपल्या दाराशी कोरोना आला तेव्हा सगळ्यांना लस घेण्याची घाई झाली आहे. एवढ्या लोकसंख्येला पुर पडण्याची क्षमता कोणत्याच देशाकडे अथवा सरकारकडे नाही. तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून कोरोनाला आपल्या वेशीवर थांबवायची गरज आहे. हे शक्य करायचं असेल तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण क्षमतेने पूर्ण केली पाहिजे.
तळटीप :- कोणतेही राजकीय मुद्दे या पोस्ट शी जोडू नयेत. कोणत्या राज्याला काय लस दिली? आणि कोणी काय केलं? या राजकीय गोष्टींचा संबंध पोस्ट शी नाही किंवा पोस्ट चा उद्देश तो नाही .
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Tuesday, 6 April 2021
चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©
चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©
कमानीचा पूल बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे. जगातील सगळ्यात जुना कमानीचा ब्रिज साधारण ३३०० वर्षांपूर्वी (Mycenaean Arkadiko Bridge) ग्रीस इकडे निर्माण केला गेला आहे, जो आजही आस्तित्वात आहे. जावळीच्या खोऱ्यात पार्वतीपूर इकडे बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूल आजही जवळपास ३५० वर्षांनंतर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्यामुळेच कमानी पद्धतीने एखादा पुलाचे निर्माण करणे, हे काळाच्या कसोटीवर उतरलेले तंत्रज्ञान आहे असे आपण म्हणू शकतो. कमानी पूल हा संकुचन (compression) पद्धतीने त्यावर पडणारा भार विस्थापित करतो. भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे जम्मू आणि काश्मीरला मुख्य भारताशी दळणळणाच्या सोयींनी संलग्न करणे. त्याचाच भाग म्हणजे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प (USBRL:- Udhampur-Srinagar-Baramulla rail link project)
या प्रकल्पाचा हिस्सा म्हणून चिनाब या नदीवर एक आर्च ब्रिज म्हणजेच कमानीचा पूल बांधण्यात येतो आहे. हिमालयाच्या कुशीत साकार होणारा हा पूल स्थापत्यशास्त्राच्या आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. हिमालयाचा हा भाग अतिशय उंच पर्वतरांगांनी वेढलेला आहे. त्यात इथली जी जमीन आहे ती अतिशय भुसभुशीत किंवा भूस्खलन होणारी आहे. इथलं हवामान, वारे आणि एकूणच सगळी भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल अशी आहे. त्यामुळेच अश्या परिस्थितीमध्ये रेल्वे मार्ग बांधणं हे खूप कठीण काम आहे. अश्या प्रतिकूल परिस्थितीमधे रेल्वे मार्ग बांधण्याचा अनुभव भारतातील कोकण रेल्वे महामंडळाला आहे. त्यामुळेच हे काम कोकण रेल्वे महामंडळाकडे सोपवण्यात आलं आहे. चिनाब नदीवर बांधण्यात आलेला चिनाब आर्च ब्रिज हा अनेक गोष्टींनी विशेष आहे. त्यातील काही विशेषता खालीलप्रमाणे,
१) चिनाब आर्च ब्रिज हा जगातील सगळ्यात उंचीवरचा रेल्वे ब्रिज आहे. चिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची तब्बल ३५९ मीटर आहे. ही उंची जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटरने जास्त उंच आहे.
२) हा ब्रिज १३१५ मीटर लांब (१.३५ किलोमीटर)असून याच्या आर्चची लांबी तब्बल ४६७ मीटर आहे. हा ब्रिज १३.५ मीटर जाड असून यावर दोन रेल्वेमार्ग बसवता येणार आहेत.
३) हा ब्रिज तब्बल २६६ किलोमीटर/तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करण्यास समर्थ आहे. (इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की चेनाब नदीचं हे खोरं हे अतिशय लांब आणि ब्रिजची असलेली उंची यामुळे वाऱ्याचा ब्रिजवर पडणारा दबाव हा सगळ्यात कठीण भाग या ब्रिजच्या डिझाईनमध्ये महत्वाचा होता.)
४) या ब्रिजचं निर्माण करताना झोन ५ (साधारण ८ रिश्टर स्केल) मधल्या भूकंपाचा सामना करेल अश्या पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच हा भाग दशहतवादी कारवायांनी धुमसत असल्याने डी.आर.डी.ओ. च्या सहकार्याने याला ब्लास्ट प्रूफ बनवण्यात आलं आहे. जेणेकरून कोणत्याही साधारण बॉम्ब स्फोटात याच्या स्ट्रक्चरला इजा होणार नाही.
५) यावरून तब्बल १०० किलोमीटर/तास या वेगाने पुढील १२० वर्षं रेल्वे धावू शकणार आहे. उणे १० डिग्री ते ४० डिग्री सेल्सिअस अश्या कोणत्याही तापमानात याच्या स्टीलच्या प्रॉपटीमध्ये फरक पडणार नाही.
६) या ब्रिजच्या निर्मितीमध्ये २८,६६० मेट्रिक टन स्टील, ६००,००० नट- बोल्ट, ६६,००० क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर केला गेला आहे. याच्या नुसत्या आर्चचं वजन तब्बल १०,६१९ मेट्रिक टन आहे. (१ टन = १००० किलोग्रॅम)
या पुलाच्या निर्मितीमधील आकडे डोळ्याचं पारणं फिटवणारे आहेत पण त्याहीपलीकडे भारतीय अभियंत्यांनी, कामगारांनी स्वबळावर याचं निर्माण केलं आहे. या पुलाचं काम खरे तर २००९ मध्ये पूर्ण व्हायला हवं होतं, पण अनेक कारणांनी ते पुढे ढकललं गेलं. ५ एप्रिल २०२१ ला त्याच्या आर्चचं काम संपलेलं आहे. एकूणच सगळ्यात खडतर टप्पा याच्या निर्मितीमधला संपलेला आहे. अजून हा ब्रिज पूर्ण व्हायला अजून काही वर्षं लागणार आहेत. याच्या निर्मितीसाठी जवळपास १४८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा ब्रिज झाल्यामुळे इतके वर्षं विकासापासून अलिप्त राहिलेल्या जम्मू आणि काश्मीर भागाचा विकास होणार आहे. याच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, वैज्ञानिक, कामगार यांचं विशेष अभिनंदन. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज उभारताना भारताने अजून एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं आहे.
जय हिंद!!!
व्हिडीओ स्त्रोत :- इंडिया टुडे न्यूज
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Sunday, 4 April 2021
ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©
ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©
आज हा फोटो बघितला आणि एकाच वेळी दोन्ही डोळ्यातून वेगळ्या कारणांसाठी अश्रू आले....
एकीकडे काल झालेल्या हमल्यात २२ जवान हुतात्मा झाले आहेत तर ३१ जवान जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिन्ही बाजूने जवळपास ४०० नक्षल आतंकवादी आपल्या जवानांना घेरून मशिनगन ने हल्ला करतात. त्यांच्यासमोर हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता लढा देतात आणि धारातिर्थी पडतात. काल झालेला हल्ला हा भारताच्या बाहेरच्या शत्रूंनी केलेला नाही तर घरातील घरभेदी लोकांनी केलेला आहे म्हणून त्याची तीव्रता जास्त आहे. या नक्षल लोकांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या नावाने टाहो फोडणारे सगळेच आज गुपचूप लपून बसले आहेत. आज त्यांना रक्ताचा पडलेला सडा दिसणार नाही. आज त्यांना त्या जवानांच्या घरच्यांचा आक्रोश दिसणार नाही, आज ते लोक त्या जवानांची जात, धर्म शोधायला जाणार नाहीत. आज ते लोक मेणबत्ती चा मोर्चा काढणार नाही. आज ते लोक या गोष्टीचा निषेध करणार नाहीत. आज ते लोक कोण्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्याला भारताची परिस्थिती सांगून ट्विट करायला सांगणार नाहीत. आज मानवाधिकार समितीचे लोक यावर काही बोलणार नाहीत. आज ना कोणी याचा निषेध करणार. ना आज कोणी आपले पुरस्कार परत करणार. कारण शांतीची कबुतरे उडवणारे आज आपले डोळे, कान आणि तोंड त्या ३ माकडांसारखे बंद करून बसले आहेत.
हे घरभेदी लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत. छुप्या पद्धतीने राजकारण करून समाजात तेढ वाढवायची आणि मग मी नाही त्यातलाच म्हणत आपलं तोंड लपवायचं हीच पद्धत आजतागायत ते वापरत आलेले आहेत. एकाने कोणीतरी आत्महत्या केली म्हणून त्याची जात शोधून त्याला भेटायला जाणारे राजकारणी लोकशाही मेली म्हणून सुतक मनवतात पण तेच लोकशाही चे रक्षणकर्ते आज साधं निषेध करू शकत नाही हाच त्यांचा खरा चेहरा आहे. काल आर.आय.पी. आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहून अनेकांनी एक पान पुढे केलं असेल. कारण ते २२ कोण हे जाणून घ्यायची जाणीव होण्याइतपत ना आम्हाला गरज आहे ना आमची तशी तयारी आहे. लढलेले तिकडेच निघून गेले आणि जखमी झालेले पुन्हा येतील पण आम्हाला त्याच काहीच नाही. संवेदना आणि दुःख हे आमच्या अंतर्मना पर्यंत कधी जात नाही. याला कारण आमचा तिकडे फायदा नाही. आज या न त्या कारणासाठी मोर्चा ते काढणार नाहीत. आज ते उपोषणाला बसणार नाहीत. आज सरकारला त्या बद्दल जाब विचारणार नाहीत. कारण जिकडे जीव टांगणीला तिकडे आम्हाला काहीच देणं घेणं नाही.
इतका मोठा हल्ला हा घरभेदी लोकांशिवाय शक्यच नाही. पण उद्या त्याचा बदला घेतला तर हेच आज लपलेले साप फुत्कारत बिळातून बाहेर येतील. संविधानाची पुंगी वाजवत आणि मानवी हक्कासाठी लढा उभारतील. जातीचं, धर्माचं जे हत्यार उपसता येईल ते म्यानातून बाहेर काढतील. कारण आमच्या संवेदना या सुद्धा आजकाल फायदा, राजकारण, आणि पैसे बघून निर्माण होतात. लाल झेंडा घेऊ की भगवा की हिरवा हे आजकाल विचारांनी नाही तर आमच्या फायद्याने ठरवतो. त्यामुळे त्या २२ जवानांन बद्दल आम्ही काही वाटून घेण्याचं कारण नाही.
पण या सगळ्यात ते मात्र वेगळे आहेत.....
डेप्युटी कमांडंट संदीप द्विवेदी सरांसारखे आमचे जवान आणि ऑफिसर वेगळे आहेत. अंगावर दोन गोळ्या झेलून सुद्धा त्याच आम्हाला कसलीच भीती नाही. आज त्यांचा फोटो बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरअसणार ते स्मित हास्य खूप काही सांगून जाते. मी जखमी आहे पण मी लढलो आहे. मी पुन्हा लढेन या आशेवर थम्प्स अप करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मविश्वास दिला आहे. काही भारतीयांच्या घाणेरड्या राजकारण आणि विचारांना बळी न पडता या घरभेदी शत्रुंना ठोकूच हा तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास बघून आज माझ्या दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आज गरज आहे ती प्रत्येक भारतीयांनी हा आत्मविश्वास दाखवण्याची आणि जे कोणी अश्या पिलावळीच समर्थन करतात त्यांच्या विचारांना जागीच ठेवण्याची. बंदुकीच्या गोळ्यांनी याचा बदला घेतला जाईलच पण शब्दांनी या कुत्सित विचारांना ठोकण्याची जबाबदारी एक भारतीय म्हणून आपण स्विकारायला हवी. त्यासाठी कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याची गरज नाही. विचारांना विचारांनी ठेचायचं असते ते समजण्याची प्रगल्भता जरी आपण आत्मसात केली तर त्या २२ जवानांना ती श्रद्धांजली असेल असं मला वाटते.
वीरगतीला प्राप्त होऊन हुतात्मा झालेल्या त्या २२ जवानांना माझा कडक सॅल्यूट.
"We didn't start this war, but we will bloody hell finish it,”
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Friday, 2 April 2021
टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©
टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©
मुख्य भारताला जवळपास ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर भारताचा भाग असलेली लक्षद्वीप, अंदमान- निकोबार बेट लक्षात घेतली तर त्यांना सुमारे ५४२२ किलोमीटर ची किनारपट्टी लाभलेली आहे. या शिवाय बंगाल चा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने वेढलेल्या पाण्यावर भारताचं अधिराज्य आहे. जगातला मुख्य व्यापार हिंद महासागरातून होतो आणि इकडे लक्ष ठेवण्यासाठी भारताला एका सक्षम नौदलाची गरज आहे. ब्लु वॉटर नेव्ही म्हणून भारताचं नौदल जगातील काही मोजक्या नौदलात समाविष्ट आहे. पण याच नौदलाकडे भारताने मधल्या काळात काही प्रमाणात दुर्लक्ष केलं हे नाकारून चालणार नाही. ज्या वेगाने चीन ने आपलं नौदल सक्षम केलं आहे आणि महासागरातील आपल्या कारवाया वाढवल्या आहेत ते बघता भारताला नौदल शक्तीत खूप वेगाने भर घालण्याची गरज निर्माण झालेली आहे.
आय.एन.एस. विराट सारखी विमानवाहू नौका निवृत्त झाल्यावर त्याची पोकळी भरून काढणारी विमानवाहू नौका नसल्याने भारताने रशिया कडून बाकू नावाची विमानवाहू नौका विकत घेतली व तिचं नामकरण आय.एन.एस. विक्रमादित्य असं केलं. सध्या भारताकडे ही एकच विमानवाहू नौका आहे. पण भारताने दुसऱ्या विमानवाहूनौकेची बांधणी पूर्ण केली असून येत्या काही काळात आय.एन.एस.विक्रांत या नावाने भारताच्या संरक्षणासाठी सिद्ध होईल. कोणत्याही विमानवाहू नौकेला संहारक बनवणारा हुकमाचा एक्का म्हणजेच त्यावर असलेली लढाऊ विमान. जमिनीवरून एखाद्या लढाऊ विमानाने उड्डाण अथवा लँडिंग करणं आणि एखाद्या विमानवाहू नौकेच्या डेक वरून तीच कसरत करणं यात जमीन आकाशाएवढं अंतर आहे. विमानवाहू नौकेच्या डेक वर उड्डाणासाठी असलेली धावपट्टी अतिशय छोटी असते. त्या तेवढ्या अंतरात लढाऊ विमानाने उड्डाणाचा वेग घेणं अपेक्षित असते. त्याच सोबत त्या छोट्या धावपट्टीवर तितक्या कमी कालावधीत विमानाचा वेग कमी होणं अपेक्षित असते. या शिवाय सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही धावपट्टी स्थिर नसते. पाण्यातून प्रवास करत असताना या सगळ्या हवाई कसरती योग्य रीतीने होणं अपेक्षित असते.
एखाद्या कुशल वैमानिकासोबत लढाऊ विमानामध्ये सुद्धा अश्या अडचणीच्या जागे मधे उड्डाण भरण्यासाठी आणि लँडिंग करण्यासाठी अनेक बदल गरजेचे असतात. एखाद्या विमानाचं इंजिन इतकं सक्षम असायला हवं की त्याने इतक्या कमी वेळात उड्डणांसाठी लागणार बल निर्माण करायला हवं. त्याचसोबत क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि इतर साहित्य त्यावर बसवण्यासाठी जागा हवी. त्याचवेळी उतरताना त्याच छोट्या धावपट्टीवर त्याचा वेग शून्य व्हायला हवा. तसेच जागा ही प्रमुख अडचण असल्याने जास्तीत जास्त विमान त्यावर राहण्यासाठी त्याचे पंख हे दुमडता यायला हवेत. असं सगळं क्लिष्ठ तंत्रज्ञान युक्त विमान असेल तेव्हाच एखादी विमानवाहू नौका शत्रूच्या गोटात अस्वस्थता निर्माण करू शकते.
भारतात येत्या काळात दोन विमानवाहू नौका कार्यरत असणार आहेत. त्यावर वर उल्लेख केलेल्या तंत्रज्ञानाने सुसज्ज अश्या लढाऊ विमानांची गरज लागणार आहे. आजवर भारत अश्या पद्धतीची विमान रशिया कडून विकत घेत आला आहे. पण आत्मनिर्भर भारताने स्वबळावर अश्या एका लढाऊ विमानाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याच नाव म्हणजेच टी.ई.डी.बी.एफ. (Twin Engine Deck Based Fighter (TEDBF). या वर्षी झालेल्या ऐरो शो मधे एच.ए.एल. ने याच मॉडेल सादर केलं आहे. हे नावाप्रमाणे दोन इंजिन असलेलं कनार्ड विंग असलेलं तेजस च पुढलं व्हर्जन असणार आहे. विमानवाहू नौकेच्या छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करण्यासाठी यात अनेक तंत्रज्ञान समाविष्ट केलं गेलं आहे. भारताचं हे पाहिलं पाचव्या पिढीतील जवळपास स्टेल्थ असणारं लढाऊ विमान असणार आहे. याचे पंख हे दुमडणारे असणार आहेत. मॅक १.६ वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम असणार असून यावर विविध क्षेपणास्त्र ठेवण्यासाठी ११ हार्ड पॉईंट असणार आहेत. (हार्ड पॉईंट म्हणजे जिकडे आपण क्षेपणास्त्र विमानात भरू शकतो. जितके जास्ती हार्ड पॉईंट तितकी जास्ती क्षेपणास्त्र लढाऊ विमान एका उड्डाणात नेऊ शकते.) यावर ASRAAM (Advanced Short Range Air-to-Air Missile) आणि Astra beyond-visual-range (BVR) त्याशिवाय भारताने निर्माण केलेली Rudram-1 आणि Rudram-2 anti-radiation missiles नेऊ शकणार आहे. यातील अनेक गोष्टी या सध्या लोकप्रिय असलेल्या राफेल-एम या लढाऊ विमानाच्या जवळ जाणाऱ्या असून त्यापेक्षा हे विमान ०. ५ पट पुढल्या पिढीतील आहे असा एच.ए.एल. चा दावा आहे.
गेल्या वर्षी जून २०२० मधे भारत सरकारने या विमानाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आहे. जवळपास २०२६ मधे याच पहिलं उड्डाण अपेक्षित असून हे विमान नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हायला २०३० उजाडेल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. प्रत्यक्षात येईल तोवर दोन विमान नौदलाच्या पसंतीस उतरली आहेत. यातील एक म्हणजे F/A-18E/F Super Hornet (-E is single seat, -F is two seat) आणि Rafale-M carrier fighter ही दोन्ही विमान ४.५ पिढीतील असून दोन्ही अतिशय अत्याधुनिक आहेत. पण राफेल-एम ला जास्ती पसंती मिळत आहे याच कारण राफेल एफ ३ व्हर्जन आधीच भारतीय वायू सेनेत दाखल झालं आहे. त्यावर उड्डाणाचा आणि देखभालीचा अंदाज भारताकडे आहे. शिवाय राफेल एम हे जवळपास त्याच्या भावांसारखं आहे. सध्या टी.ई.डी.बी.एफ. दाखल होईल तोवर ह्यातील एक विमान भारताच्या सुरक्षतेसाठी दाखल होईल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. सज्ज झालं की टप्प्याटप्प्याने या दोन्ही विमानवाहू नौकांवर सध्या असलेल्या मिग २९ विमानांना निवृत्त करण्यात येईल. टी.ई.डी.बी.एफ.ची निर्मिती भारताचा पुढला एक्का असणार आहे कारण हे विमान राफेल किंवा सुपर हॉर्नट पेक्षा एक पाऊल पुढे असणार आहेच त्याशिवाय आपण अश्या विमानांसाठी आत्मनिर्भर होणार आहोत. टी.ई.डी.बी.एफ. निर्माण करणाऱ्या टीम ला या भारतीयाकडून खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Thursday, 1 April 2021
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग ३)... विनीत वर्तक ©
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग ३)... विनीत वर्तक ©
आधीच्या भागात आपण बघितलं की अल्फा सेंटौरी सिस्टीम आपल्यासाठी का महत्वाची आहे? त्यातील प्रॉक्सिमा सेंटौरी बी हा ग्रह आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण प्रश्न असा येतो की आपण तिथवर जाणार कसं? सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर आपण खूप मागे आहोत. मानवाने सोडलेलं व्हॉयेजर १ हे यान सध्या १७ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे तर व्हॉयेजर २ हे यान सध्या १५ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे. साधारण एवढा वेग आपल्याला डीप स्पेस मिशन १ मधे यानाला देता आलेला आहे. जो जवळपास ५६,००० किलोमीटर/ तास इतका आहे. जर ह्या वेगाने आपण अल्फा सेंटौरी वर गेलो तर आपल्याला तिथवर पोहचायला जवळपास ८१,००० वर्ष लागतील म्हणजेच मानवाच्या २७०० पिढ्या झाल्यानंतर आपण तिकडे पोहचू जे आपल्या काही कामाचं नाही. याचा सरळ अर्थ आहे की उपलब्ध तंत्रज्ञानापेक्षा एखादं नवीन तंत्रज्ञान जर आपण मिळवलं तरच हा प्रवास शक्य आहे.
गेली कित्येक वर्ष संशोधक प्रकाशाच्या वेगाच्या निदान २०% वेगाने जाणार तंत्रज्ञान निर्माण करता येईल का याचा शोध घेत आहेत. आपण जर इतका वेग गाठला तर कदाचित १०० वर्षापेक्षा किंवा अगदी ५० वर्षात आपण अल्फा सेंटौरी च अंतर पार करू शकू. सध्या उपलब्ध असलेल्या रॉकेट तत्रंज्ञान किंवा इंधनाचे प्रज्वलन करून हा वेग गाठता येणं अशक्य आहे. तेव्हा प्रकाशाच्या वेगाचा आणि त्याच्या बलाचा आपण वापर करून एखादं यान अंतराळात पाठवलं तर हे शक्य आहे. प्रकाश हे सर्वकाळ मिळणार इंधन आणि त्याचा वापर करून गाठलेला वेग याच गणित आपण सोडवू शकू. अंतराळात गेलेल्या कोणत्याही यानाला सौर दाबाचा प्रभाव सहन करायला लागतो. तब्बल ३ लाख किलोमीटर / सेकंद वेगाने वाहणारे प्रकाशकण हे कोणत्याही वस्तूवर एक दाब निर्माण करतात. एखाद्या ८०० मीटर X ८०० मीटर सौर पॅनल वर पडणारा दाब ५ न्यूटन किंवा १.१ पाउंड फूट असतो. आता वाचताना हा दाब सूक्ष्म वाटेल पण एखाद्या मंगळाकडे निघालेल्या यान या दाबामुळे तब्बल १००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराने आपलं लक्ष्य चुकू शकते. त्यामुळे या दाबाचा विचार कोणत्याही अंतराळ मोहिमेत केला जातो.
आता समजा आपण या दाबाचा वापर एखाद्या यानाला हाकण्यासाठी केला तर? जसं शिडांचं जहाज वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या दाबाचा वापर करत वेग घेतं तसंच एखादं शिड यानाभोवती उभारलं तर त्या शिडाच्या पृष्ठभागावर पडणारे प्रकाशाचे किरण ऊर्जेसोबत आपली गती त्याला देतील. ही गती प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास १५%-२०% झाली (साधारण ६०,००० किलोमीटर / सेकंद ) तर आपण अल्फा सेंटौरी वर अवघ्या २० वर्षात दाखल होऊ शकू. याच तंत्रज्ञानाला सोलार सेल्स / लेझर सेल्स असं म्हणतात. वर सांगितलं तस गणिताने हे शक्य आहे पण प्रत्यक्षात उतरवणं प्रचंड कठीण काम आहे. कारण वर सांगितलं तसं सौर दाब हा खूप सूक्ष्म असतो त्यामुळे २०% प्रकाशाचा वेग गाठण्यासाठी आपल यान किंवा उपग्रह अतिशय हलकं असलं पाहिजे. अवघ्या काही ग्रॅम मधे जर आपण नॅनोटेक्नोलॉजी चा वापर करून उपग्रह बनवला तर हे शक्य आहे. याच कल्पनेला पंख देण्यासाठी २०१६ मधे युरी मिलर, स्टीफन हॉकिंग आणि फेसबुक चा सर्वसेवा मार्क झुकेरबर्ग यांनी ब्रेकथ्रू स्टारशॉट ची घोषणा केली. ब्रेकथ्रू स्टारशॉट या मोहिमेतील तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी या तिघांनी मिळून १०० मिलियन डॉलर देण्याचं कबूल केलेल आहे.
ब्रेकथ्रू स्टारशॉट मधे ४ मीटर X ४ मीटर आकाराचा सौर आरसा आणि काही सेंटीमीटर आकार असणारे तसेच अवघ्या काही ग्राम च वजन असणारे जवळपास १००० उपग्रह अंतराळात सोडण्यात येतील. अंतराळात गेल्यावर त्यांना पृथ्वीवरून लेझर ने वेग देण्यात येईल. यासाठी तब्बल १०० गिगावॅट एकत्रित शक्तीचा वापर करण्यात येईल. इतकी शक्ती निर्माण करण्यासाठी लेझर च जाळ पृथ्वीवर निर्माण करण्यात येईल. या लेझर ने प्रकाशाच्या वेगाच्या १५%-२०% वेग प्रत्येक उपग्रहाला दिल्यानंतर अल्फा सेंटौरीकडे हे १००० उपग्रह झेपावतील. जवळपास २० वर्ष याच वेगाने प्रवास करून प्रॉक्सिमा सेंटौरी बी ग्रहाच्या जवळून प्रवास करतील. त्यावेळी यावर असलेले कॅमेरे या ग्रहाचा वेध घेऊन ते संदेश पृथ्वीवर पाठवतील. हे संदेश पृथ्वीवर पोचायला जवळपास ४ वर्षाचा कालावधी लागेल.
हे वाचायला उत्कंठा वाढवणारं वाटलं तरी प्रत्यक्ष अश्या पद्धतीचे सौर आरसे, नॅनो उपग्रह आणि लेझर हे सगळं तयार करणं एक मोठं आव्हान आहे. त्या पलीकडे वेगाने जाणाऱ्या या उपग्रहांच्या रस्त्यात येणारे अंतराळातील विविध घटक, गुरुत्वीय बल तसेच विश्वाच्या पोकळीत रेडिएशन चा होणारा मारा, अतिशय थंड तपमान या सगळ्या मधे यावरील कम्प्युटर आणि तंत्रज्ञान टिकणं गरजेचं आहे. यात न्यूक्लिअर पॉवर सेल चा ही वापर केला जाणार आहे. त्यामुळे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचं असणारं हे तंत्रज्ञान प्रथम तर निर्माण करणं हेच एव्हरेस्ट इतकं मोठं आव्हान आहे. हे सगळं केल्यावर लेझर ने तेवढा वेग गाठून देणं गरजेचं आहे. यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर संशोधक काम करत आहेत. २०३६ पर्यंत हे सगळं तंत्रज्ञान मिळवून हे नॅनो उपग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी बी या ग्रहावर पाठवण्याची ही मोहीम आहे. ज्याला तब्बल ५ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर चा खर्च अपेक्षित आहे.
ब्रेकथ्रू स्टारशॉट यशस्वी होईल का? याच उत्तर आत्ता देणं शक्य नाही. पण जर ते यशस्वी झालं तर मानवाने अंतराळातील एका मोठ्या अडचणीवर मात केली असच म्हणावं लागेल. इतके पैसे खर्च करून नक्की काय मिळणार असे बाळबोध प्रश्न अनेकांना पडू शकतील. पण सगळ्याच खर्च झालेल्या पैश्यांचा हिशोब जमा खर्चात मांडता येत नाही. या सगळ्यातून जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते मानवाच्या प्रगती मधला एक मैलाचा दगड असेल हे नक्की आहे. त्यामुळेच येत्या काळात अल्फा सेंटौरीकडे ब्रेकथ्रू स्टारशॉट चा होणारा प्रवास बघणं रोमांचित करणार असणार आहे.
समाप्त.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





