Tuesday, 7 January 2020

झटपट श्रीमंत होताना... विनीत वर्तक ©

झटपट श्रीमंत होताना... विनीत वर्तक ©

काल फेसबुक मेसेंजर वर एका मेसेज ने लक्ष वेधुन घेतलं. उत्पादित झालेल्या मालाला थेट विक्रेत्या पर्यंत विकणाच्या व्यवसाया बद्दल माहिती आहे का? असा एक प्रश्न समोरून विचारला होता. मला लगेच लक्षात न आल्याने थोडी अजुन चौकशी केली व 'इ-कॉमर्स' पद्धतीच्या व्यवसायाशी हा प्रश्न संबंधित होता. पाश्च्यात देशात झालेल्या क्रांतीला आपल्या देशात घडवण्यासाठी भागीदार होण्यासाठी रचलेल्या एका जाळ्यात समोरची व्यक्ती जाता जाता थांबली होती. भारतातील लोकांना अमेरिका,युरोप अथवा इतर प्रगत देशांच इतकं आकर्षण आहे की त्याच्या बळावर कोणतिही योजना आपण अगदी डोळे बंद करून स्विकारतो. प्रगत देशात 'ई-कॉमर्स' ने क्रांती घडवली असुन ह्या व्यवसायाने अनेकांना करोडपती केलं. आता भारतात इतर कोणी करोडपती बनण्याआधी तुम्हाला ते बनण्याची संधी आहे. तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवा. एका महिन्यात दहा लाख कमवा. एका वर्षात जॅग्वार चे मालक व्हा. असं सांगत करोडपती बनलेले लोकं मिळालेल्या चेक चे फोटो दाखवत मोठ्या मोठ्या हॉटेल आणि कॉन्फरन्स मध्ये सरळ सांगायचं तर बकरे शोधतं असतात. त्यांच्या ह्या दिखाव्यात हरवून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारे अनेकजण बळी पडतात. आजकाल हा बिझनेस फेसबुक वर पण सुरु आहे. अश्याच एका व्यक्तीचा मेसेज आल्यावर ह्यावर थोडसं लिहावं वाटलं.

चेन मार्केटिंग, ई- कॉमर्स बिझनेस ह्या सारख्या अनेक योजना आपल्या आजुबाजुला सुरु आहेत. ह्यांची मुख्य गिऱ्हाईक ही झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारी लोकं असतात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील ह्या विवंचनेत असलेल्या लोकांना हेरून मग त्यांना आपली स्वप्न साकारण्यासाठी आमचीच योजना कशी मदत करेल ते बिंबवण्यात येते. हे इतक्या सफाईने केलं जाते की आपण कसे अडकलो हे कळे पर्यंत खुप उशीर झालेला असतो. आमची कंपनी तयार झालेला माल सरळ विक्रेत्या पर्यंत देईल आणि मधलं कमिशन जे रिटेल वाले कमावतात ते कमिशन सरळ तुमच्या खात्यात. ह्यामुळे अगदी महिन्याला तुम्ही लाखो रुपयांचे मालक. अमेरीका सारख्या देशात आजकाल सगळे व्यवहार अश्याच पद्धतीने होतात. भारतात येत्या वर्षात होतील. त्यामुळे आजच मेंबर व्हा. ३ जणांना अजुन मेंबर करा तुमच्या मेंबरशिप चे पैसे परत. तुम्ही बनवलेले मेंबर जे कमावतील त्यावर तुम्हाला पैसे म्हणजे ते काम करतील तुम्हाला बसुन पैसे. असे बसुन पैसे खाणारे लोक अनेक चेक घेऊन मी हे सगळं करतो आहे हे सांगत समोर येतात. आपल्या समोर स्वप्नांचा एक महाल उभा करतात.

खर सांगायचं तर म्हणतात तसं, 'पैसे कधी झाडाला लागत नाही. ते कमावण्यासाठी मेहनत करावी लागते. फुकटात मिळालेले पैसे ना पचत आणि ना पचवता येतात' लाखो रुपये पगार देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ते पैसे असेच देत नाहीत. त्यासाठी ज्याला ते मिळतात त्याच्याकडून कंपनी ने दहा पट कमावलेले असतात.  हा सरळ बिझनेस आहे. काहीही फुकटात आणि झटपट मिळत नाही. कोणीच कोणाला फुकट देतं नाही तर कोणती कंपनी तुम्हाला काहीही न करता लाखो रुपये देणार आहे? हा सरळ प्रश्न आपल्याला का पडत नाही? बरं अमेरीकेत हे झालं ते झालं सांगितल्यावर आपल्या फोन वर असलेल्या गुगल वरून आपण ती माहिती बघु आणि वाचु शकत असताना आपण तितके ही कष्ट का घेत नाहीत? रीटेल बिझनेस मधल्या जगातील पहिल्या पाच कंपनी मध्ये ४ अमेरीकन कंपनी आहेत. वॉलमार्ट सारखी कंपनी आज रीटेल मार्केट चा दादा आहे. खरच जर ई- कॉमर्स क्रांती झाली असेल तर आज अमेरीकन वॉलमार्ट मधुन खरेदी करत नसता.

पैसे मिळाले म्हणुन चेक दाखवणारे आपला गेल्या ३ वर्षाचे इनकम टॅक्स रिटर्न्स का दाखवत नाहीत? कारण आज कोणी कोणाला लाखाचा चा चेक देऊ शकते पैसे अकाउंट ला असो वा नसो हे साधं गणित आपल्याला कळत नाही की ती समजुन घेण्याची आपली मानसिकता नसते? १ किलो कांद्याच्या भावासाठी घासाघीस करणारे लाखो च्या चेक वर पटकन विश्वास कसे ठेवतात? खरे जरी कोणाला पैसे मिळाले असतील तर अश्या पैश्याने समाधानाची झोप लागते का? आपण अडकवलेले (मामा बनवलेले) मेंबर हे नेहमीच आपल्या जवळचे मित्र, मैत्रीण, कुटुंबीय अथवा आप्तेष्ट असतात. आपल्या संबंधांचा मान ठेऊन त्यांनी पैसे गुंतवले असले तरी त्यात फसवल्याची भावना असते. फरक इतकाच की ते ही गोष्ट बोलुन दाखवत नाहीत. झटपट श्रीमंत होणाच्या स्वप्नांच्या राज्यात आपण असे अडकलेलो असतो की आपण आपल्या नात्यांच्यी पायमल्ली करतो आहोत हे धान्यात पण येतं नाही. ते धान्यात आलं तरी आपले पैसे सोडवण्यासाठी दुसऱ्याला खड्यात घालणे गरजेचे बनते. शेवटी हे सगळं करून आपण श्रीमंत तर बनत नाहीच पण जवळ असलेली माणसं पण गमावून बसतो.

झटपट श्रीमंत होण्याच्या मायाजाला पासुन लांब राहणं सगळ्यात उत्तम. आपल्या मेहनतीने, जिद्दीने, सचोटीने केलेला कुठलाही व्यवसाय, नोकरी अथवा इतर गोष्ट नेहमीच आपल्याला पैश्याने तर श्रीमंत करतेच पण समाधानाने ही श्रीमंत करते जे कुठेही विकत मिळत नाही. एका रात्रीत यश मिळायला अनेक रात्रींचा दिवस करायला लागतो हे आपण कधी विसरता कामा नये. तेव्हा शक्यतो ह्या अश्या नवीन वेष्टनात येणाऱ्या झटपट श्रीमंत बनवणाऱ्या योजनांपासुन राहुन आपला उत्कर्ष करण्याची प्रगल्भता आपण शिकायला हवी.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday, 4 January 2020

अचानक... विनीत वर्तक ©

अचानक... विनीत वर्तक ©

आयुष्यात अचानक अशी काही वळणे येतात की त्या वळणावर आपल्या हातात काहीच नसते. आपल्या समोर फक्त त्या समोर आलेल्या वळणावर पुढे जाणं हाच पर्याय असतो. ते वळण आपल्याला अश्या ठिकाणी घेऊन जाणार असते की ज्याची कल्पना पण आपल्याला अस्वस्थ करते. तो प्रवास किती लांब असेल हे लक्षात आल्यावर त्या शेवटच्या टोकापर्यंत न जाण्यासाठी आपण सगळी धडपड करतो. पण ती धडपड यशस्वी होईल ह्याची खात्री आपल्याला नसते. उजाडणारा प्रत्येक दिवस हळूहळू आपल्याला त्या शेवटच्या क्षणाची आठवण करून देणारा असेल तर ते जगणं किती कठीण असेल ह्याचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. एक दिवस सकाळी उठल्यावर कोणीतरी आपल्याला सांगाव की तुझ्या आयुष्यात आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्या वेळी आयुष्यात आलेल्या अचानक वळणामुळे आपल्या आयुष्याचे रंगच बदलुन जातात.

एक दिवस अचानक माझ्या व्हाट्स अप ग्रुप वर माझ्या एका मित्राचा मेसेज झळकला. त्यात लिहिलं होतं की 'डॉक्टरांनी केलेल्या निदानाअंती माझ्याकडे आता १.५ ते २ वर्ष आहेत. माझ्या आजाराने हळूहळू माझ्या शरीरा भोवती विळखा घातला आहे. माझे कुटुंब, माझे सहकारी, माझा मित्र परीवार माझी निट काळजी घेतात त्यांचा आभारी आहे'. हा मेसेज वाचुन मन एकदम भुतकाळात गेलं. आज जवळपास त्याला भेटुन १० ते १२ वर्षाचा कालावधी लोटला होता. आम्ही दोघे एकाच ठिकाणी काम करत होतो. ट्रेनिंग ते काम असा जवळपास ७-८ वर्षाचा काळ एकत्र घालवला होता. अतिशय विनम्र असलेल्या मित्राच्या त्या मेसेज ने मी काही वेळ स्तब्ध झालो. कोणीतरी अचानक आपल्या पायाखालची जमीन बाजुला करावी आणि अनपेक्षितपणे आपण त्या आठवणींच्या खोल गर्तेत आपण कोसळावं त्या प्रमाणे माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं.

न राहवून दुसऱ्या मित्राला मेसेज केला. हा मित्र अजुनही त्याच्या सोबत काम करत असल्याने मला नक्की काय झालं ते जाणुन घ्यायचं होतं. पण त्याने सांगितलेलं ऐकुन मला राहवलं नाही. मी सरळ एका डॉक्टरला मेसेज केला त्याच्या आजाराची माहिती दिली. पण त्याच उत्तर ऐकुन कुठेतरी थोडीशी वाटणारी आशा खुप अंधुक झाली. त्या वेळेला मला हतबल वाटलं. माझा तसा काही संबंध नसताना सुद्धा मला इतकं हतबल वाटलं तर जो ह्या सगळ्यातून जातो आहे त्याला किती हतबल वाटत असेल. माझ्या मनात भविष्याची चिंता विचार यायला लागले तर त्याच्या मनात काय होत असेल असा विचार करून पण मला टेन्शन आलं. पण त्याच मेसेज च्या खाली त्याने अजुन दोन ओळी लिहल्या होत्या. त्या अश्या होत्या,

'२०१९ हे वर्ष संपत आलं आहे परंतु येणार वर्ष माझ्यासाठी नवं संजीवनी आणि नवं पर्व घेऊन आलं आहे. आत्तापर्यंत मी माझ्या वेळेप्रमाणे समाजसेवा करत असे पण १ जानेवारी पासुन समाजाच्या वेळेप्रमाणे मी उपलब्ध असेन. मी आजवर माझ्या संस्थेच्या अनाथ मुलांचा विचार करत असे पण ह्या पुढे पुर्ण जगातील अनाथ मुलं ही माझीच अंग असणार आहेत. त्यांच्यासाठी मी माझं उरलेलं आयुष्य झटणार'.

( माझा मित्र ही अनाथ असल्याने त्याने आपल्या नंतर अश्याच मुलांना पुढे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी स्विकारली आहे.)

त्याचे ते शब्द मला निशब्द करून गेले. मला राहवलं नाही. दुसऱ्या दिवशी मी परदेशी प्रवास करणार होतो पण कसही करून त्याची भेट घ्यायची मी ठरवली. वेळ नसताना सुद्धा बाकीच्या गोष्टी बाजुला ठेवुन त्याला भेटायला येतो असा मेसेज करून त्याच्या घरी गेलो. त्याच्या दुर्धर आजाराचा लवलेश ना त्याच्या शरीरावर जाणवला न त्याच्या बोलण्यात. कदाचित आयुष्यात आलेलं हे वळण त्याने सहजरीत्या स्विकारलं ही असेल पण त्याच्या कुटुंबाच काय? हा विचार मला क्षणभर निशब्द करून गेला.

१०-१२ वर्षानंतरची गळाभेट झाल्यावर मला काय बोलावे सुचेना. कदाचित माझी अडचण त्याने ओळखली असावी माझ्याबद्दल विचारपुस करून त्याने माझी ओळख आपल्या बायकोला आमच्या बॅच मधील हुशार मुलगा अशी करून दिली. आता मल्टीनॅशनल कंपनीमधे असुन देश-विदेशाचे दौरे करतो. आता खुप मोठा झाला आहे. पण मनात मात्र मी खुप खुजा झालो होतो. कारण पद, पैसा, प्रतिष्ठा आभासी मोठेपणा देते. खरा मोठेपणा सांगण्याची गरज नसते तो समोरच्याला भावतो. जसा माझ्या मित्राचा मोठेपणा, ह्या कठीण समयीपण त्याची आयुष्याकडे बघण्याची वृत्ती आणि समाजाप्रती असलेलं भान हे खुप मोठं होतं आणि त्या समोर माझी सगळी आभूषणे जी त्याने मला घातली होती ती खुप छोटी होती.

अवघी १५ मिनिटे त्याच्या सोबत गप्पा मारल्या. ज्या सहजतेने त्याने हे सगळं स्विकारलं होतं त्याच सहजतेने त्याच्या बायकोने, दोन मुलांनी ते स्विकारल्या सारखं नक्कीच वाटलं पण ते तितकं सहज असेल का? हा प्रश्न मात्र मला निरुत्तर करून गेला. आयुष्याची अनेक स्वप्ने आपल्यापैकी प्रत्येकजण बघत असतो. आयुष्यात येणार अचानक वळण मात्र कधी त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणते तर कधी त्या स्वप्नांचा चुराडा करते. पण ते वळण सहजरीत्या सगळ्याच पातळीवर स्विकारणं सगळ्यांना जमते असं नाही. कारण 'जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं' हे डायलॉग चित्रपटात कितीही छान वाटले तरी प्रत्यक्षात स्विकारणं तितकं सोप्पं नसते.

अचानक आपल्या आयुष्यात आलेली वळण त्याचा प्रत्यय आपल्याला आणुन देतात. अश्या अचानक आलेल्या वळणावर स्वतःला आणि त्या सोबत आपल्या कुटुंबाला सांभाळून समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची जिद्द ठेवणाऱ्या माझ्या त्या मित्राला माझा कडक सॅल्युट आणि देव तुला खुप आयुष्य देवो हिच प्रार्थना.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday, 3 January 2020

इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी... विनीत वर्तक ©

इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी... विनीत वर्तक ©

भारताचे भूतपुर्व राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी ह्या शतकाच्या सुरवातीला भारताच्या पुढल्या २० वर्षाच्या प्रवासाचा आलेख एका पुस्तकातुन मांडला होता. भारत २०२० साली कसा असावा ह्याची ब्लु प्रिंट त्यात त्यांनी लिहली होती. आज २०२० च्या सुरवातीला आपण त्या वळणावर येऊन पोहचलो आहोत. त्या पुस्तकातील किती गोष्टी आपण साध्य केल्या अथवा अपुर्ण राहिल्या हा वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकेल. आपलं व्हिजन आणि मिशन निश्चित असलं की त्या ध्येयाकडे आपली वाटचाल आपण समर्थपणे करू शकतो. अवकाश असं एक क्षेत्र आहे जिकडे भारताने गेल्या २० वर्षात दमदार वाटचाल केली आहे. गेल्या २० वर्षात भारताने अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत खुप काही मिळवलं असलं तरी अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. २०२० वर्षात प्रवेश करताना इसरो ने आपल्या समोर अनेक लक्ष्य ठेवली आहेत. त्या लक्षा पर्यंतचा इसरो चा प्रवास भारताच्या अवकाश प्रवासाची दिशा  नक्कीच ठरवणार आहे पण जागतिक पातळीवर पण अनेक देश ह्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत.

इसरो अध्यक्षांनी इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी चा प्लॅन नुकताच जाहीर केला आहे. ज्यात विविध पातळीवर इसरो मधील प्रत्येकजण हे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करत आहेत. इसरो च्या मिशन चा आढावा घेतला तर पुढली २-३ वर्ष इसरो साठी अत्यंत महत्वाची असणार आहेत. २०१९ मधे विक्रम ल्यांडर ला चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग आलेल्या अपयशाला मागे ठेवत इसरो ने चंद्रयान ३ मोहिमेसाठी तयारी सुरु केली आहे. विक्रम ल्यांडर चा वेग नियंत्रित करण्यात आलेल्या तांत्रिक अपयशामुळे विक्रम ल्यांडर चंद्राच्या पृष्ठभागावर अनियंत्रित वेगात आदळले. भारतासाठी, सामान्य माणसासाठी किंवा इतर देशांसाठी हे अपयश असलं तरी इसरो ला ह्यातुन खुप काही शिकायला नक्कीच मिळालं आहे. कोणत्याही वेगळ्या ग्रहावर आपलं यान सॉफ्ट लॅण्डिंग करणे हे तंत्रज्ञानातील एक मोठं आव्हान आहे. आजही कागदी रॉकेट बनवण्या पलीकडे मजल न मारलेल्या देशाने आपल्या देशावर आणि इसरोवर कुत्सितपणे केलेल्या टिकेला बाजुला ठेवुन इसरो पुन्हा चंद्रयान ३ वर आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे.

चंद्रयान ३ मोहिमेवर इसरो साधारण २५० कोटी रुपये खर्च करणार असुन ह्या मोहिमेत इसरो ल्यांडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार आहे. ऑर्बिटर आधीच चंद्राच्या कक्षेत स्थापन केलेलं असल्यामुळे त्याचा वापर पृथ्वीशी संवाद करण्यासाठी केला जाणार आहे. ह्याच्या पाठोपाठ इसरो जपान च्या जॅक्सा सोबत चंद्रयान मोहिमेची बोलणी करत आहे. चंद्रयान ३ ला भारत सरकारने मान्यता दिली असुन २०२१ पर्यंत चंद्रयान ३ चं उड्डाण अपेक्षित आहे. २०१८ ला भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केलेल्या सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी अश्या 'गगनयान' मोहिमेने आता वेग घेतला आहे. ह्या मोहिमेत भारत स्वबळावर ३-७ अंतराळवीरांना ३-७ दिवस पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावर अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षितरीत्या पृथ्वीवर उतरवणार आहे. असं करण्यात जर भारत यशस्वी झाला तर अशी क्षमता असणारा जगातील ४ था देश ठरणार आहे. ह्या मोहिमेसाठी खुप साऱ्या तंत्रज्ञानावर इसरो ला एकाच वेळी काम करावं लागणार आहे.  ह्याचसाठी भारताने आपल्या भरवशाच्या मित्राची म्हणजेच रशिया ची मदत घेतली असुन अंतराळात जाऊ शकणाऱ्या ४ भारतीय वायु दलातील पायलट ची निवड अंतराळयात्री म्हणुन झाली असुन जानेवारी २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात हे ४ जण रशियाला पुढील सरावासाठी रवाना होतं आहेत. 'गगनयान' मोहिमेत अंतराळयात्रींना पाठ्वण्या अगोदर रॉकेट तसेच इतर सिस्टीम ची पुर्ण तपासणी करण्यासाठी इसरो डिसेंबर २०२० आणि एप्रिल २०२१ ला दोन मोहिमा रोबोट च्या साह्याने रंगीत तालीम म्हणुन करत आहे. ह्यात अंतराळवीरांची सुरक्षितता आणि त्यांना अवकाशात लागणाऱ्या सर्व गोष्टींची चाचणी करण्यात येणार आहे.

गगनयान मिशन संपत नाही तोच इसरो भारताच्या अवकाश स्थानकावर काम करून त्याला अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. १९९० च्या दशकात आय.एस.एस. (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) चा घटक म्हणुन इसरोकडे कोणी ढुंकून बघितलं नव्हतं पण आज भारत त्याचा हिस्सा व्हावा अशी अपेक्षा ह्याच प्रगतिशील राष्ट्रांनी बोलुन दाखवली आहे. पण ह्याच देशांसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या मिशन चा भाग होऊन आपले पैसे वाया घालवण्यापेक्षा इसरो ने स्वबळावर भारताचं अवकाश स्थानक येत्या ५-७ वर्षात अंतराळात स्थापन करण्याचं उद्दिष्ठ आपल्या समोर ठेवलं आहे. 

ह्या सगळ्या गराड्यात इसरो सुर्यावर आदित्य- एल १ मिशन २०२० ला पाठवत आहे. आदित्य - एल १ हे यान पृथ्वीपासून सुमारे १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर लाग्रांगीण १ पॉईंट वर प्रक्षेपित करण्यात येणार आहे.  लाग्रांगीण १ हा असा भाग आहे जिकडे सूर्याच्या आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा सारखा असल्याने यान दोघांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली न येता सूर्याभोवती भ्रमण करू शकते. ह्या कक्षेत यान स्थापन केल्यामुळे कोणत्याही ग्रहणाचा अथवा इतर गोष्टींची अडचण न येता सुर्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. आदित्य मिशन हे आजवर वैज्ञानिकांसाठी कोडं असलेल्या सुर्याच्या कोरोना चा अभ्यास करणार आहे. आदित्य सुर्याच्या कोरोना च्या वैश्विक माहितीत महत्वाची भर घालणार असल्याने अनेक देशांचं, वैज्ञानिकांचे लक्ष ह्या मोहिमेकडे आहे.

इसरो चा वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. चा लहान भाऊ म्हणुन जागतिक पातळीवर आधीच प्रसिद्ध झालेलं, सफल प्रक्षेपणा आधीच इतर देशांनी प्रक्षेपण विकत घेतलेलं आणि छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा खर्च जवळपास अर्ध्यावर आणणारं त्या सोबत अवघ्या ४-५ दिवसात उड्डाणासाठी सज्ज होणारं असं एस.एस.एल.व्ही. रॉकेट २०२० ला प्रक्षेपित होणार आहे. ह्याच्या उड्डाणासाठी वेगळं लॉन्च पॅड इसरो तुतिकोरन इकडे बांधत आहे. ह्या शिवाय इतर उपग्रह प्रक्षेपण पकडुन २०२० ह्या एका वर्षात इसरो २५ मोहिमा पुर्णत्वाला नेते आहे. 

एकीकडे देशाच्या अवकाश क्षेत्रातल्या गरजा पुर्ण करताना त्याचवेळी महत्वाकांक्षी वैज्ञानिक आणि तांत्रिक मोहिमा पुर्ण करण्यासाठी इसरो आपल्या टीमसह कंबर कसत आहे. ह्यातील प्रत्येक मोहीम किचकट आणि तांत्रिक कौशल्याची परीक्षा घेणारी आहे. प्रत्येक मोहीम कमीत कमी खर्चात यशस्वी करण्याचं उद्दिष्ठ इसरो समोर आहे. ह्यामुळेच इसरो ची ट्वेन्टी ट्वेन्टी मधील वाटचाल प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची आणि आनंदाचे क्षण देणारी व्हावी ह्यासाठी इसरो च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Wednesday, 18 December 2019

ए. बी. सी. डी. ची भाषा... विनीत वर्तक ©

ए. बी. सी. डी. ची भाषा...  विनीत वर्तक ©

संवादाची सगळ्यात प्रभावी भाषा ही आपली मातृभाषा असते. मातृभाषा ही राष्ट्रीय भाषा अथवा प्रांतीय भाषा असायला हवी ह्याची काही गरज नसते. अगदी आपल्या बोलीभाषेतील संवाद सगळ्यात जास्ती प्रभावीपणे मांडता येतो. पण जेव्हा आपण स्थानिय किंवा देशांच्या भिंती बाहेर काम करत असतो तेव्हा आपल्याला एका समान भाषेत संवाद साधण्याची गरज पडते. वैश्विक पटलावर गेल्या काही शतकात झालेल्या घडामोडींमुळे संवाद साधण्यासाठी इंग्रजी तर व्यवहार करण्यासाठी अमेरीकन डॉलर हे सर्वसाधारणपणे संपुर्ण जगात मापदंड झाले आहेत. अर्थात जगातील काही भागात अजुनही त्यांना मान्यता नाही तरीपण जगातील ८०% वर लोक संवादासाठी इंग्रजीच्या ए. बी. सी. डी. वर अवलंबुन असतात.

भारतावर ब्रिटिशांनी जवळपास १५० वर्ष राज्य केल्याने भारतीय लोकांनी सहजरीत्या इंग्रजी भाषेला आपलसं केलं किंबहुना त्यावर प्रभुत्व मिळवलं. आधी वैश्विक पटलावर गरज म्हणुन शिकली जाणारी इंग्रजी भाषा आता स्टेटस सिम्बॉल बनली. इंग्रजी सहजरीत्या बोलणारे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोकं हुशार पठडी मधे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बनत गेला. ह्याचा परीणाम असा झाला की संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम असणारी मातृभाषा मागे पडत गेली. मातृभाषे मधे बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं म्हणजे मागासलेपणाचे किंवा इंग्रजी भाषा येत नसल्याने कमीपणाचे लक्षण ठरवण्याचा ठेका आपल्याच समाजाने आणि सो कॉल्ड बुद्धीजीवी लोकांनी घेतला. ह्या सगळ्यात सर्वाधिक नुकसान आणि हानी आपलीच झाली आहे. ह्याचा अंदाज यायला कदाचित अजुन काही कालावधी लागेल.

वेगळ्या देशात असताना जरी इंग्रजी ही सर्वसाधारण संवादाची भाषा असली तरी जेव्हा वेगळ्या देशात आपल्या प्रांतातील कोणी आपल्याला भेटते तेव्हा आपल्या राष्ट्रीय भाषेत, मातृभाषेत अथवा बोलीभाषेत खरे तर संवाद करण्याची  एक वेगळी मज्जा असते. घरापासून लांब अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत, इतर लोकांच्या गराड्यात जेव्हा कोणी आपल्या देशातील कोणी अचानक समोर येते तेव्हा त्या आपलेपणात भाषेच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या भिंती खरे तर वितळून जायला हव्यात. पण तसं खुप क्वचित वेळा होते. अमेरीकेत असताना माझ्या सोबत एक अमेरीकन भारतीय मुलगा होता. त्याचा जन्म अमेरीकेचा आई - वडील भारतीय पण कामाच्या निमित्ताने अमेरीकेत स्थायिक झालेले. त्यामुळे घरी भारतीय वातावरण. त्याला हिंदी अस्खलित बोलता येतं होतं. आम्ही दोघं एकाच ट्रेनिंग मधे असल्याने नकळत मी अनेकदा हिंदी मधे त्याच्याशी बोलायचो. एकदा मला बाजुला बोलावून तो म्हणाला, 'आप सबके सामने मुझसे हिंदी मैं बात मत करो. मेरा स्टेटस कम हो जाता हैं, मैं अभी अमेरीकन अंग्रेजी एक्सेंट का क्लास कर रहा हूं. यु स्पिक इन इंग्लिश विथ मी.... मी मान डोलावून होकार दिला. नंतर त्याच्या सोबत काम करणाऱ्या अमेरीकन मित्राने त्याचा एक किस्सा सांगितला व तो म्हणाला,

We called them ABCD. (American Born Confused Desi). They are trying to be part of us but they are neither American nor Indian.

एकदा दुबई मधल्या सगळ्यात मोठ्या मॉल म्हणजेच 'द दुबई मॉल' मधे फेरफटका मारत होतो. दुबई फेस्टिवलमुळे मॉल मधे बरीच गर्दी होती. अचानक चालत असताना काही पुसटशे शब्द माझ्या कानावर पडले. ते शब्द वसई- विरार भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचे होते. ह्या भागात प्राबल्य असलेल्या वाडवळ, सामवेदी, ख्रिश्चन लोकांमध्ये बहुतांश संवाद आजही तिथल्या बोलीभाषेत केला जातो. माझं बालपण ह्या भागात गेल्यामुळे मला जरी ह्या बोलीभाषा बोलत्या येत नसल्या तरी मला त्यांच्यातील संवाद पुर्णपणे कळतात. वसई मधील दोन ख्रिश्चन माणसं अटे-तटे बोलत असल्याचं माझ्या कानांनी लगेच हेरलं. मी त्यांचा शोध घेऊन त्यांना जाऊन भेटलो. तुम्ही वसईचे का? ह्या एका प्रश्नावर माझी ओळख झाली होती. त्या अनेक देशांच्या नागरीकांच्या गर्दीने ओथंबुन वाहणाऱ्या दुबई मॉल मधे बोलीभाषेच्या गोडव्याने आपल्या माणसांना बरोबर हेरलं होतं.

दोन वेगवेगळे प्रसंग पण भाषेची  ए. बी. सी. डी. शिकवून जाणारे. एकात आपल्याच मातृभाषेत संवाद साधण्याची लाज वाटत होती आणि दुसऱ्या भाषेतील  लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधुन जोडण्याची केविलवाणी धडपड सुरु होती. ज्यांच्यासाठी त्याची ही धडपड होती तेच लोकं त्याला आपला मानत नव्हते. न घर का ना घाट का अश्या द्वंदात तो अडकला होता तर दुसऱ्या प्रसंगात आपल्या बोलीभाषेत संवाद करण्यासाठी देशांच्या भिंती आड येतं नव्हत्या. त्यात कोणता कमीपणा नव्हता. संवादाची भाषा जरी दुसरी असली तरी आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच बाळगायला हवा आणि जिकडे शक्य होईल तिकडे मातृभाषा, बोलीभाषा ह्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्या मधुन संवादाला, लिखाणाला प्राधान्य द्यायला हवं. ए. बी. सी. डी. ची भाषा जरी आज जगमान्य संवादाची भाषा असली तरी आपल्या मातृभाषेतील गोडवा त्यात येतं नाही हे तितकचं खरं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday, 17 December 2019

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

भारतात शहराचा भाग सोडला तर अनेक भागात स्री ने इतर लोकांच्या समोर (इतर म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) डोक्यावरून पदर, दुपट्टा किंवा इतर गोष्टींच्या साह्याने डोकं आणि अनेकदा चेहरा झाकण्याची पद्धत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी आजही स्री पर पुरुषांसमोर येताना घुंघट घेऊन समोर येते. अर्थात ही पद्धत किती चुकीची / बरोबर अथवा स्री स्वातंत्र्याचा गळा घोटणारी की संस्कृती च रक्षण करणारी ह्या वादात मला जायचं नाही. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात व प्रत्येक जण आपल्या समोर जी बाजु येते त्याला योग्य मानत असतो. आपलं जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या विचारांवर ज्या गोष्टींचा पगडा आहे तिचं योग्य असं समजुन आपण पुढे जातं असतो. पण ते करताना आपण विरुद्ध अथवा दुसऱ्या बाजुच्या विचारांची पायमल्ली तर करत नाही नं ह्याचं भान ही आपण राखायला हवं. ज्या गोष्टी आपल्या धर्मात / समाजात / संस्कृतीत रुजलेल्या आहेत त्या कदाचित आपल्याला बरोबर वाटत असतील पण इतर संस्कृती / समाजाच्या मानाने ती व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली असु शकते. त्यामुळे तटस्थपणे आपण काही गोष्टींकडे बघायला हवं.

आज ह्या गोष्टींची प्रकर्षाने आठवण ह्याचसाठी की सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया ह्या मुस्लिम धर्माचं प्राबल्य असलेल्या देशात आहे. माझ्या सोबत असलेले इतर सहकारी मलेशिया चे नागरिक आहेत. मलेशिया मधे जवळपास ९०% मुस्लिम स्त्रिया ह्या हिजाब वापरतात. हिजाब म्हणजे डोकं आणि छातीचा भाग झाकण्यासाठी असलेलं वस्र. परपुरुषांच्या (परपुरुष म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) समोर हिजाब वापरला जातो. अनेकदा बुरखा, हिजाब अथवा नकाब घालणाऱ्या स्त्रियांच व्यक्ती स्वातंत्र्य हे धर्माच्या नावाखाली नाकारल्याचं एक चित्र नेहमीच दाखवलं जाते. अनेक वेळेला ते योग्य असेल ही पण ह्याचा अर्थ असा होतं नाही की सरसकट ही गोष्ट लादली गेलेली आहे. अर्थात काही राष्ट्रात तसा कायदा ही आहे जसे सौदी अरेबिया आणि इराण. पण इतर अनेक मुस्लिम राष्ट्रात हिजाब, नकाब, बुरखा घालणं एक चॉईस आहे. माझ्या टीम मधे दोन मलेशियन मुस्लिम स्री अभियंता पेट्रोनास ह्या बलाढ्य ऑईल कंपनीसाठी काम करत आहेत. ह्यातल्या एकीने पेट्रोलियम इंजिनिअरिंग मधे ऑस्ट्रेलिया मधुन पदवित्तुर शिक्षण घेतलं आहे. तर दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली पदवीधर आहे. दोन्ही टीम मेंबर सोबत काम करताना एकुणच मलेशियाच्या संस्कृती बद्दल खुप काही गोष्टी समजल्या.

हिजाब विषयी त्या दोघींशी बोलताना एक गोष्ट एकदम स्पष्ट होती ती म्हणजे ते त्या घालतात कारण हा त्यांचा चॉईस / निर्णय आहे. समाजात हिजाब न घालणं हे सहजगत्या स्विकारलं जात नसलं तरी त्यांच्यावर तो घालण्याचं कोणतच बंधन नव्हतं. आपल्याकडे ही लग्न झाल्यावर मंगळसुत्र न घालणं हे समाजात/ कुटुंबात सहजगत्या स्विकारलं जातं नाही. पण मंगळसुत्र न घालणं अथवा घालणं आज निदान शहरी भागात तरी चॉईस म्हणुन स्विकारल गेलेलं आहे. हिजाब घालणं हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आणि चॉईस असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं किंबहुना आज अनेक मुस्लिम स्त्रियांची ती एक चॉईस आहे. आपल्या कुटुंबात कोणी श्रेष्ठ व्यक्ती आल्यावर त्यांच्या पाया पडणं अथवा घुंघट डोक्यावरून घेणं जर संस्कृतीचा भाग असेल आणि त्यात आपली भावनिक आणि सांस्कृतिक गुंतवणूक असेल तर दुसऱ्या संस्कृतीत हीच गुंतवणुक वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाऊ शकते ह्याचं भान आपण नक्कीच ठेवायला हवं.

घुंघट असो वा हिजाब ह्या गोष्टी संस्कृती / प्रथा / पद्धती ह्या त्या धर्माच्या विचारसरणी चा भाग आहेत. त्या बरोबर किंवा चुक ह्यावर मतांतरे असु शकतात. ती मते बरोबर ही असतील. पण सरसकट कोणत्याही संस्कृतीला समजुन न घेता त्याला स्री स्वातंत्र्याचं लेबल चिकटवणं हे चुकीचं आहे. कोणत्या तरी मंदीरात प्रवेश केला म्हणुन जर भारतातील स्री स्वातंत्र्य होतं नसेल तर हिजाब न घालता केसं मोकळे सोडुन स्री स्वातंत्र्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही.

घुंघट की आड से........ जर आपल्या संस्कृतीचा भाग आहे जर लग्न झालेल्या स्री ने टिकली लावणं, मंगळसुत्र घालणं संस्कृतीचं लक्षण आहे तर हिजाब ही कोणासाठी तरी त्यांच्या संस्कृतीचं लक्षण आहे हे समजुन घेण्याची आपली मानसिकता झाली तर स्री स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण एक पाऊलं पुढे टाकलं असं मी म्हणेन.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल 


Thursday, 12 December 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

मराठा साम्राज्याची किर्ती त्या काळात अटकेपार पोहचली होती. मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पराक्रम आजही लोकांना  स्फूर्ती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नितीत आमुलाग्र बदल करताना गनिमी काव्यात हुशार असणाऱ्या पराक्रमी अश्या मावळ्यांची फौज उभी केली. हे मावळे कोणी लढाई शिकलेले नव्हते तर सामान्य घरातील लोकांमध्ये पराक्रम, शौर्य, निष्ठा हे गुण निर्माण करून त्यांनी मराठा साम्राज्य उभे केले. काळाच्या ओघात युद्ध बदललं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवलेली पराक्रमाची ज्योत आजही तशीच आहे. ह्याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीय सेनेतील 'मराठा पायदळ' (Maratha Light Infantry). महाराष्ट्रातील ह्याच मावळ्यांनी बनलेलं १७६८ मध्ये भारतीय सेनेचा भाग झालेलं मराठा पायदळ हे भारतीय सेनेचं सर्वात जुनं पायदळ आहे. आपल्या शौर्याने, पराक्रमाने भारतीय सेनेत सगळ्यात जास्ती ६० पेक्षा जास्ती युद्ध पदकं मराठा पायदळाला मिळालेली आहेत.

 १९४५ चा तो काळ होता. जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत होते. ब्रिटिश इंडियाचा भाग म्हणुन भारतीय सेनेतील ५ मराठा पायदळाला जर्मनी विरुद्ध लढण्याचा आदेश मिळाला. नामदेव जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज गावचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे शिक्षण ही त्यांना घेता आलं नव्हतं. पैसे कमावण्यासाठी इतर लोकांप्रमाणे त्यांनी सैन्य भरतीत भाग घेतला. शेतीत काम केल्यामुळे कसलेले शरीर आणि प्रवरेच्या पात्रात पट्टीचा पोहणारा हे गुण त्यांना ५ मराठा पायदळात शिपाई म्हणुन नियुक्त करून गेले. ५ मराठा पायदळाचा भाग म्हणुन त्यांना इटली ला जर्मनीच्या सेनेचा प्रतिकार करण्यासाठी पाठवलं गेलं. ९ एप्रिल १९४५ ला नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीला सिनोई नदीकाठच्या जर्मन तळावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. सिनोई नदीच्या दोन्ही बाजुला ४० फुट उंच काठ. पात्रात ४ ते ५ फुट खोलीच पाणी त्यात एका बाजुला जर्मन सेनेचे तिन बंकर होते तर दुसऱ्या बाजुला ५ मराठा पायदळ त्यात तिसऱ्या बाजुने जर्मन सेनेने सगळीकडे सुरुंग पेरून समोरा समोर लढाईचा एकच मार्ग खुला ठेवला होता.

समोरून हल्ला करण्या पलीकडे ब्रिटिश सेनेला दुसरा पर्याय नसताना त्यांनी नदी ओलांडण्याचा आदेश आपल्या सेनेला दिला. जर्मन सेनेच्या तिन्ही बंकर मधुन मशिनगन आग ओकायला लागल्या. शिपाई नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीतील अनेकजण मृत्युमुखी पडले. जर्मन सेनेच्या मशिनगन यमाच्या रूपात त्यांच्यावर बरसत होत्या. आपला कंपनी कमांडर आणि इतर अनेक सहकारी जखमी होऊन युद्धभूमीवर पडले असताना ही शिपाई नामदेव जाधव विचलित झाले नाहीत. जखमी अवस्थेत पडलेल्या आपल्या कमांडर आणि सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी शिपाई नामदेव जाधव ह्यांनी गोळ्यांच्या वर्षावात पाण्यात  घेतली. आपल्या कंपनी कमांडर ला त्यांनी आपल्या पाठीवर घेऊन अलीकडच्या काठावर आणलं. त्या काठावर जर्मन सैनिकांनी सुरुंग पेरले होते. त्या सुरुंगातून रांगत त्यांनी आपल्या कमांडर ला सुरक्षित स्थळी पोहचवले. त्या नंतर पुन्हा एकदा पलीकडच्या तटावर त्यांनी कुच केले. तिथुन आपल्या एका जखमी सहकाऱ्याला पाठीवर घेऊन पाण्यात उडी घेतली. ह्या वेळेस जर्मन सेनेने त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. पाण्यात त्यांच्यावर अनेक मोर्टार टाकले पण सगळ्या माऱ्यापासून आपला आणि आपल्या जखमी सहकाऱ्याला वाचवत त्यांनी सुरक्षित स्थळी नेलं. आपल्या सहकाऱ्यांची अशी क्रुरपणे केलेल्या हत्येचा बदला म्हणुन नामदेव जाधव एकटे जर्मन सेनेच्या एका बंकरवर तुटून पडले.

नामदेव जाधव ह्यांच्याकडे एक साधी टॉमी गन होती तर समोरून मशिनगन आणि मोर्टार चा वर्षाव चालू होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गनिमी काव्या प्रमाणे ह्या बंकर तुटून पडला. अतीतटीच्या लढाईत शिपाई नामदेव जाधव ह्यांनी बंकर वर कब्जा मिळवला. पण ह्यात त्यांच्या हाताला गोळ्या लागल्या. एका बंकर वर कब्जा मिळवला तरी अजुन दोन बंकर आग ओकत होते. हाताला लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांना आपल्या बंदुकी मधुन गोळ्या चालवणं अशक्य झालं होतं. पण हा मावळा डगमगला नाही. जर्मन सेनेचे दोन्ही बंकर नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधला. आपल्या जवळ असलेल्या ग्रेनेड ने त्यांनी उरलेल्या बंकरवर हल्लाबोल केला. आपल्या कडचे ग्रेनेड संपत आहे हे बघुन पुन्हा रांगत जाऊन त्यांनी आपल्या पोस्ट वरून ग्रेनेड आणले. आपल्या पराक्रमाने त्यांनी दोन्ही बंकर नेस्तनाबुत केले. तिन्ही बंकरवर कब्जा केल्यावर शिपाई नामदेव जाधव ह्यांनी पोस्टच्या एका उंचीवर उभं राहुन "बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी आरोळी ठोकली. शिवगर्जनेचा तो आवाज इटली च्या सिनोई नदीच्या आसमंतात गरजला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने पुर्ण जर्मन सेनेचा खात्मा केला होता. पलीकडच्या तिरावर मागे असलेल्या ब्रिटिश सेनेच्या कानात ती शिवगर्जना विजेसारखी कडाडली. ५ मराठा पायदळाचे ब्रिदवाक्य हे तेच असल्याने आपल्या सैनिकाने लक्ष्य पुर्ण केल्याची ती गर्जना होती. ह्या विजयाने पुर्ण युद्धाचा रोख पालटला. ब्रिटिश सेनेने जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावताना इथल्या पुर्ण परिसरावर आपला कब्जा केला.

शिपाई नामदेव जाधव ह्यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रम, शौर्यासाठी ब्रिटिश सेनेच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिपाई नामदेव जाधव ह्यांनी नुसत्या आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवला तर आपल्या एकट्याच्या पराक्रमाने पुर्ण युद्धाचं स्वरूप त्यांनी बदलवलं. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या पराक्रमाने अवाक झाले होते. १९५३ ला ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिच्या राज्यरोहण सोहळ्यात त्यांना "शाही पाहुणे" म्हणुन अगत्याचं आमंत्रण होतं. ह्या शिवाय दर दोन वर्षांनी त्यांना राणीच्या स्वागत सोहळ्यासाठी इंग्लंड वरून खास आमंत्रण येत असे. महाराष्ट्रातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन इटली मध्ये आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगात अजरामर केलं. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाचा, मावळ्याचा  २ ऑगस्ट १९८४ ला पुणे इथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण म्हणुन ९ एप्रिल २०१७ ला इटली सरकारने त्याच सिनोई नदीच्या काठी जिकडे शिपाई नामदेव जाधव ह्यांनी आपला भिमपराक्रम केला तिकडेच त्यांच्या स्मारकाच उदघाटन केलेलं आहे. खंत एकच ज्या मातीत ते जन्माला आले त्याच मातीतील किती लोकांना त्यांचं नाव आणि त्यांच्या भिमपराक्रमाची माहिती आहे हा अभ्यासाचा विषय असेल. आपल्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साता समुद्रापार पोहचवणाऱ्या ह्या मावळ्यास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.. 

(खाली लंडन गॅझेट मधील काही अंश.  कंसात लिहलेलं ब्रिद वाक्य समजण्यासाठी लिहिलं आहे. लंडन गॅझेट चा ते भाग नाही. )

The KING has been graciously pleased to approve the award of the VICTORIA CROSS to:—

No. 18706 Sepoy Namdeo JADHAO, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on the evening of the 9th April, 1945, a Company of the 5th Mahratta Light Infantry assaulted the east floodbank of the Senio river, north of S. Polito.

Having silenced all machine gun fire from the east bank, he then climbed on to the top of it and, in spite of heavy mortar fire, stood in the open shouting the "Mahratta war cry" ( बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय) and waving the remainder of the Companies across the river.

This Sepoy not only saved the lives of his comrades, but his outstanding gallantry and personal bravery enabled the two Companies to hold the river banks firmly, and eventually the Battalion to secure a deeper bridgehead, which in turn ultimately led to the collapse of all German resistance in the area.

— London Gazette, 15 June 1945.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल, लोकमत

Friday, 6 December 2019

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी गुगल चे निर्माते लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी आपल्या अल्फाबेट ह्या कंपनीची सुत्र भारतीय वंशाच्या आणि सध्या गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुंदर पिचई कडे देऊन एक प्रकारे एका दंतकथेचा शेवटचा अध्याय लिहिला असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. २०१५ ला जेव्हा गुगल ला अल्फाबेट च्या छत्रछायेखाली आणलं गेलं तेव्हाच ह्या अध्यायाची सुरवात झाली होती. गुगल च्या रोजच्या कामातुन ह्या दोघांनी हळूहळू अंग काढुन घ्यायला सुरवात केली होती. गुगल २१ वर्षाच झाल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या मुलाला त्याचे पालक त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात त्याच प्रमाणे आपलं मुलं असल्या प्रमाणे ह्या दोघांनी गुगल मधुन आपलं अंग काढुन गुगल च्या पुढच्या वाटचालीत आता पालकाची तटस्थ भुमिका स्विकारली आहे.

२१ वर्षांपूर्वी मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्या दोघांनी ४ सप्टेंबर १९९८ ला एका गॅरेज मध्ये गुगल ची स्थापना केली. हे दोघेही स्टॅनफर्ड विद्यापीठात पी.एच.डी. शिकत होते. जेव्हा गुगल च्या सर्च इंजिन ची स्थापना झाली तेव्हा इंटरनेट च्या बाजारात याहू सर्च इंजिन चं साम्राज्य होतं आणि त्या सोबत अल्टा विस्टा आणि आस्क जिवास सारखी छोटी मोठी सर्च इंजिन होती. पण ही सगळी सर्च इंजिन रिव्हेलन्स पद्धतीने काम करत असत. (जी गोष्ट तुम्ही शोधत आहात त्याच्याशी मिळती जुळती गोष्ट तुमच्या सर्च मध्ये दिसत असे.) पण गुगल सर्च इंजिन मात्र शोधकर्त्या समोर प्रसिद्ध असलेल्या वेब साईट आणत होतं. ह्या पद्धतीमुळे गुगल ने सर्च इंजिन च्या क्षेत्रात क्रांती आणली. 'गुगल' हा पुर्ण जगात इंटरनेट चा आरसा झालं. आजच्या क्षणाला सुद्धा गुगल जगातील सगळ्यात जास्ती भेट देण्यात येणारी वेब साईट आहे. गुगल सर्च इंजिन इंटरनेट वरील ७५% टक्के सर्च इंजिन चा हिस्सा आहे ह्याशिवाय मोबाईल सर्च इंजिन मध्ये हाच हिस्सा ९०% इतका प्रचंड आहे. आज गुगल ज्या अल्फाबेट कंपनीच्या छत्रछायेखाली आहे त्याच मार्केट कॅपिटल ९३० बिलियन अमेरीकन  डॉलर पेक्षा जास्ती आहे. आज अल्फाबेट मध्ये १ लाख पेक्षा लोक काम करतात. अवघ्या २१ वर्षात गुगल ने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी जरी जरी गुगल च्या रोजच्या कामातुन निवृत्ती घेतली असली तरी अल्फाबेट चे ५१% शेअर ह्या दोघांकडे आहेत ज्याची आजमितीला किंमत १०० बिलियन डॉलर पेक्षा जास्ती आहे. अल्फाबेट ही कंपनी वर्षाला २५% वेगाने वाढते आहे. लॅरी पेज कडे आज ६२ बिलियन  डॉलर ची संपत्ती तर सर्जी ब्रिन कडे ६१ बिलियन डॉलर ची संपत्ती आहे. गुगल च्या ह्या अफाट वाढीला ह्या दोघांची दुरदृष्टी कारणीभुत आहे. एका साध्या गॅरेज मधे सुरु झालेल्या गुगल ने सुरुवातीपासुन इंटरनेट ची ताकद ओळखुन पावलं टाकली. गुगल ने आपलं तंत्रज्ञान आपल्या वस्तु मधे आणण्यासाठी  छोट्या, मोठ्या स्टार्ट अप कंपनी विकत घेतल्या. २००५ मध्ये १.६५ बिलियन डॉलर ला यु ट्युब विकत घेतलं. २०१४ मध्ये सोंगझा नावाची कंपनी विकत घेऊन गुगल ने बाजारात गुगल प्ले आणलं. बाजारात चालेल्या हवेचा रोख ओळखुन गुगल ने २००८ मध्ये गुगल क्रोम ब्राऊझर बाजारात आणला. आपल्या सेवा सर्व स्तरावर आणण्यासाठी गुगल ने सगळ्या बाजुने आपल्या वस्तु बाजारात आणल्या जसं गुगल च्या मेल अकाउंट वरून तुम्ही सगळ्या सर्विसेस वापरू शकता. गुगल मॅप्स, गुगल प्ले, गुगल क्लाउड, गुगल डॉक्स, गुगल शिट ते एनरॉईड. एकाच जागेवरून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार गुगल प्रत्येक गोष्टीच केंद्रस्थान झालं त्यामुळेच गुगल आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही कुठे न कुठे गुगल शी जोडलेले असता.

गुगल च्या केंद्रस्थानी झालेल्या ह्या प्रवासाने गुगल जरी मोठं झाली तरी ह्या केंद्रस्थानामुळे माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गुगल साठी अडचणीचा ठरला आहे. गुगल ला युरोपियन युनियन ने १.३ बिलियन पाउंड चा दंड केला आहे. २०१७ ला २.४ बिलियन पाउंड चा दंड तर २०१८ ला ५ बिलियन डॉलर चा दंड गुगल ला माहितीच्या सुरक्षितता आणि इतर इ- कॉमर्स मधील चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर गुगल थांबलेली नाही. गुगल ह्या पुढच्या काळात घडणाऱ्या बदलांवर काम करत आहे. ज्यातील एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ड्राइव्हर नसणारी कार. गुगल सध्या ह्या तंत्रज्ञानावर काम करत असुन येत्या काळात स्वप्नवत वाटणारी गोष्ट जगाच्या रस्त्यांवर खरोखरचं वास्तव असणारं आहे. अश्या बदलांच्या काळात गुगल ची निर्मिती करणाऱ्या लॅरी आणि सर्जी ह्या दोघांनी एकप्रकारे निवृत्ती घेऊन गुगल च्या सुकाणु ची जबाबदारी भारतीय वंशाच्या सुंदर पिचईकडे देताना एक वेगळा पायंडा जागतिक बाजारात घातला आहे. एका स्वप्नाला प्रत्यक्षात आणुन पुर्ण जगाची दिशा बदलावताना अश्या सुंदर अनुभुती पासुन निवृत्ती घेणं हे लॅरी आणि सर्जी जाणोत.

भारतात आपल्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी कंपनीची मालकी आणि सत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना जगातील नावाजलेल्या पहिल्या १० कंपन्यांन मधे असलेली आणि जवळपास १००० बिलियन अमेरीकन डॉलर चं मार्केट कॅप असलेली गुगल एका दुसऱ्याच नेतृत्वाकडे देऊन लॅरी आणि सर्जी ने स्विकारलेली पालकांची भुमिका नक्कीच गुगल ला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.