Friday, 26 May 2017

अनुभवांच अनुभवण... विनीत वर्तक

माणसाची प्रगल्भता अनुभवातून समृद्ध होते अस म्हणतात. प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवून जातो आपण अस म्हणतो. पण खरच आपण अनुभवातून शिकतो का? हे शिकण म्हणजे तरी नक्की काय असते? आपल्या चुका शोधण? स्वतःला अथवा दुसऱ्यांना दोष देण कि काहीच नाही तर परिस्थितीच्या डोक्यावर त्याच खापर फोडून मोकळ होण. अगदी ते पण नसेल तर डेस्टिनी आणि देव असतातच आपल्या अनुभवांच्या शिकवणीसाठी.
अनुभवाच अनुभवण आपण कधी अनुभवतो का? आपली कोणी तरी सतत मस्करी करते किंवा सतत कोणी आपला वापर करून घेते. तर आपण त्या व्यक्तीला दोष देत रहातो. आपण आपल्या बदलान बद्दल कधी बोलत नाही. अनुभवातून आपण काय शिकतो तर त्या व्यक्तीपासून लांब रहाण किंवा ती व्यक्ती तशीच आहे असा स्वताचा समज. पण हेच नेहमी होत असेल तर आपली शिकवण तशीच रहाते. मुळात लोकांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करून देतो तिथेच आपण चुकत असतो. जर आपल्या प्रतिक्रिया बदलल्या नाहीत तर येणारे अनुभव कसे बदलतील? वेगळे अनुभव अनुभवण्यासाठी गोष्टीनकडे वेगळ्या रीतीने बघण्याची खूप गरज असते. फेसबुक वरच्या कमेंट नी लोक प्रचंड अपसेट होतात. मला कोणी अस बोलू कस शकते? किंवा माझ्या मुद्याला कोणी खोडूच कस शकते? असे अनेक मुद्दे आपण नकळत स्वतःच्या अंगाला चिकटवून घेत असतो. फेसबुक च्या कमेंट किंवा लिहण्याने खरच आपला स्वाभिमान इतका दुखावला का जातो? ह्या सर्वातून आलेल्या अनुभवांच अनुभवण आपण अनुभवत नाही. म्हणून त्याच त्याच चुका पुन्हा करत रहातो. शेवटी कशातच मन रमत नाही व फेसबुक पण नकोसे होते.
खऱ्या आयुष्यात हि अनेकदा माणसांचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. जवळपास सगळ्याच वेळी अनुभावंची शिदोरी एकतर वाट्याला जाऊ नका अथवा गेलात तर समोरच्या च्या कलेने घ्या असच सांगत असते. परिस्थिती सगळ्याच वेळी सारखी किंवा माणस सगळ्याच वेळी सारख्या प्रतिक्रिया देतील अस नसताना आपल्या प्रतिक्रियेमुळे आपल्याला सारखेच अनुभव येत रहातात. कोणताही धंदा, व्यवसाय किंवा कोणतही काम ज्यात अनुभावंची शिदोरी जास्त तो जास्ती तालावून सुखावून निघालेला असतो अस म्हणतात. पण खरेच तस असते का? कोणी एका अनुभवातून शिकते तर कोणी अनेकदा सारखे अनुभव येऊन पण शिकत नाहीत. आपल्या चांगल्या- वाईट दोन्ही काळात आपण अनुभवातून किती स्वतःला प्रगल्भ करतो त्यावर आपला पुढला टप्पा अवलंबून असतो.
अनुभव घेण म्हणजे प्रगल्भ होण नाही. तर त्यातून आपण काय शिकलो? त्या अनुभवातून पुढे काय? काय करता आल असत? ह्या सर्वांचा एक माणूस म्हणून आपल्यावर होणारा परिणाम व त्यातून आपला प्रवास हेच तर अनुभवण असते. वयाने वाढल म्हणजे अनुभव जास्ती अस नसते. १०० वेळा अनुभवून सुद्धा माणूस त्याच प्रतिक्रिया देत असेल तर झाडावरून पडलेल्या सफरचंदा मध्ये आपल्याला नवीन अस काहीच दिसणार नाही. तो सुद्धा आपल्याला एक अनुभव देईल. पण ते का? ते कस? ह्याचा नेमक अनुभवण जगाच विज्ञान बदलवणाऱ्या एका शोधाचा उगम पण असू शकते. म्हणून अनुभवातून अनुभवण जमल कि बऱ्याच गोष्टीनकडे आपण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या प्रकारे त्याची प्रतिक्रिया देऊ शकतो आणि काहीवेळा तर अनुभवण्या आधीच अनुभव कळून येतात.

छोट पाउल... विनीत वर्तक

कोणत्याही ध्येया पर्यंत पोचण्याची सुरवात अनेक वर्ष आधी होते. ऑलम्पिक मधल एक मेडल मिळवण्यासाठी ४ वर्ष अथक मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे आपण तिथवर पोहचतो. बघताना एका रात्रीतल यश वाटल तरी त्या साठी अनेक रात्रींची झोप उडालेली असते हे ज्याच त्यालाच माहित. माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे हे असेच एक स्वप्न. राकेश शर्मा नी जो “सारे जहा से अच्छा” भारत बघितला. तो आपल्याच यानाने बघण्याच भाग्य अजूनही आपल्या वाटेला आलेल नाही.
माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे तितकस सोप्प नाही. एकतर माणूस हा एक चालता बोलता सजीव आहे. अवकाशाच्या निर्वात पोकळीत ऑक्सिजन तसेच इतर अनेक गोष्टी प्रतिकूल असताना त्याला ह्या सगळ्या अवस्थेत जिवंत ठेवण व त्याच वेळी अश्या वातावरणाशी एकरूप होणारा माणूस घडवणे हे खूप खर्चिक तर आहेच पण त्या शिवाय खूप धोके त्यात आहेत. अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवून अनेक काळ झाला. पण त्याच अमेरिकेने डिस्कव्हरी, च्यालेंजर सारख्या दुखद घटना हि पचवल्या आहेत. जी कामे माणूस अंतराळात राहून करू शकतो ती जवळपास सर्वच रोबोट हि करू शकतो. म्हणूनच मानवी मोहिमान पेक्षा अश्या रोबोटिक मोहिमांवर सगळ्याच राष्ट्रांनी लक्ष केंद्रित केल आहे.
पण अस असूनही काही बाबतीत रोबोट माणसाला रिप्लेस करू शकत नाही हे वास्तव आहे. म्हणूनच पृथ्वीशिवाय मानवी वस्ती तसेच काही प्रोयोगांसाठी मानवाची अंतराळ सफर अतिशय गरजेची आहे. येत्या काळात उर्जेची गरज, पृथ्वीशिवाय एक घर असण्याची गरज मानवाला खुणावते आहे. इंटरन्याशनल स्पेस स्टेशन हि त्याचीच एक पायरी आहे. भारत अजूनही ह्या स्पेस स्टेशन चा भागीदार नाही आहे. ह्याला अनेक कारणे आहेत. अंतराळ क्षेत्र हे फक्त श्रीमंत आणि प्रगत देशांची मक्तेदारी आहे असा एक समज जगातील प्रगत देशांमध्ये आहे. भारत ज्यावेळी अवकाश क्षेत्रात धडपडत होता तेव्हा प्रगत राष्ट्रांना भारताला बरोबर घेण्याची गरज वाटली नाही. आज स्थिती वेगळी आहे. भारत ह्या क्षेत्रातील अनेक शिखरे पादाक्रांत करतो आहे. भारताचा दबदबा हळूहळू का होईना ह्या क्षेत्रात वाढतो आहे म्हणून अमेरिकेसह अनेक राष्ट्र भारताला मेंबर करून घेण्यास आग्रही आहेत. पण इथेच खरी मेख आहे. ह्या स्पेस स्टेशन चा आर्थिक डोलारा सांभाळताना सगळ्यांची दमछाक होते आहे. त्यातून भारता सारख्या आर्थिक घोडदौड करणाऱ्या राष्ट्राला बरोबर घेऊन खर्चाची माळ भारताच्या गळ्यात उतरवायची असा सगळा खेळ आहे.
म्हणूनच भारताने आपल्या परीने छोटी पावले टाकायला सुरवात केली आहे. इस्रो ला आत्ताच अश्या एका प्रोजेक्ट ची मंजुरी मिळाली आहे. ह्या प्रोजेक्ट नुसार इस्रो अस तंत्रज्ञान विकसित करेल कि ज्यामुळे दोन स्पेस वेह्कल एकमेकांना अवकाशात जोडता येतील व त्याच्यात आपापसात साधन सामुग्री आणि इतर गोष्टींची देवाणघेवाण होऊ शकेल. ह्या गोष्टी अगदी सोप्प्या वाटल्या तरी ते तितकस सोप्प नाही. अवकाशात दोन्ही गोष्टी प्रचंड वेगाने एखाद्या कक्षेत फिरत असतात. अश्या वेळी दोन्ही गोष्टींचा वेग व कक्षा एकच असणे गरजेचे आहे. त्याच वेळी जवळ आल्यावर त्यांच्यातील वेग व इतर गोष्टींचा समन्वय अतिशय अचूक असणे गरजेचे आहे. हे कोणत्याही मानवी हस्तक्षेपा शिवाय पृथ्वीवरून नियंत्रित करणे बरेच कठीण आणि जिकरीच आहे. एकदा का हे तंत्रज्ञान आपण मिळवलं कि आधीच अवकाशात असलेल्या उपग्रहाना इंधन तसेच इतर गोष्टींचा पुरवठा आपण करू शकू व त्याच वेळी अवकाशातील स्पेस डेब्रिस कमी होण्यास खूप मदत होईल.
हेच छोट पाउल उद्याच्या मानवी उड्डाणासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. जर आपण अतिशय सुरक्षिततेने ह्या गोष्टींची देवाण घेवाण करू शकलो तर ह्याच्या पुढली पायरी मानवाच्या देवाणघेवाणीची असणार आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा पल्ला अजून बाकी आहे. पण मोठी स्वप्नच तर एक दिवस छोट्या पावलातून सत्यात उतरतात. इस्रो ला त्यांच्या ह्या छोट्या पावलासाठी खूप शुभेछ्या.
“If you want to shine like a sun. First burn like a sun.” – Dr.A.P.J Abdul Kalam

साउथ एशियन उपग्रह... विनीत वर्तक

नेबर फर्स्ट हि पॉलीसी घेत जून २०१४ मध्ये पंतप्रधानांनी इस्रो ला सार्क देशांसाठी उपयोगात येईल असा उपग्रह बनवण्याची विनंती केली. आपल्या पंतप्रधानाच्या शब्दाचा मान ठेवत इस्रो ने ह्या उपग्रहासाठी कंबर कसली. इकडे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सार्क सदस्य देशातील सर्वच राष्ट्र टेक्नोलोजी च्या बाबतीत बरीच मागे आहेत. भारत हा सार्क मधील प्रथम आणि एकमेव देश आहे कि जो स्वबळावर उपग्रह बनवू शकतो. ते उपग्रह स्वताच्या बळावर प्रक्षेपित करू शकतो. अस असताना आपल्या शेजारी राष्ट्रांना पण सोबत आणण्यासाठी व एकूणच सार्क देशांना टेक्नोलोजी मध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी भारताने हि कल्पना मांडली.
भारत नेहमीच “वसुधैव कुटुंबकम” ह्या उक्तीला धरून नेहमीच त्या दृष्टीने पावल टाकत आला आहे. उपग्रहांच्या मिळणाऱ्या लाभाने भारतातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. अगदी मोबाईल पासून ते जीपीस, डी.टी.एच. पर्यंत. ह्याच लाभाचा फायदा आपल्या शेजारी देशांना हि व्हावा ह्या दृष्टीने भारताने सार्क उपग्रहाची कल्पना मांडली. १८ व्या सार्क परिषदेत याची घोषणा भारताने केली. नेपाळ, मालदीव, भूतान, ह्या छोट्या तर बांगलादेश, अफगाणीस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, ह्या मोठ्या राष्ट्रांनी मिळून बनवलेल्या सार्क राष्ट्रानां आपल्या टेक्नोलोजी ने प्रगतीपथावर नेण्याची भारताची योजना होती.
नेहमीप्रमाणे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीने आपला रंग दाखवलाच. सुपार्को हि पाकिस्तान ची ह्या क्षेत्रात काम करणारी इस्रो सारखी संस्था आहे. इस्रो च्या आधी स्थापन झालेल्या ह्या संस्थेबद्दल न बोललेच बर. इतके वर्ष ह्या क्षेत्रात असून स्वतःच रॉकेट तर सोडाच साधा उपग्रह हि बनवता आलेला नाही. त्याच वेळी इस्रो ने आपल्या कामगिरीने नासा सारख्या संस्थाना टक्कर तर दिलीच आहे. पण त्या सोबत मंगळयान, एकाच वेळेस १०४ उपग्रह प्रक्षेपित करत एक मैलाचा दगड अवकाश क्षेत्रात गाठला आहे. अस म्हणतात कि मंगळयान मोहीमेने अवकाश क्षेत्रात आखल्या जाणाऱ्या मोहिमांच पूर्ण आर्थिक गणित बदलवून टाकल आहे. अश्या अनेक यशांची पिसं आपल्या मुकुटात अभिमानाने मिरवणाऱ्या इस्रो कडून एक अजून उंची जर आपल्याच नाकावर टिच्चून गाठली गेली तर ते पाकिस्तान ला रुचेल कस.
वेगवेगळी कारण काढत पाकिस्तान ने अनेक अडथळे ह्या मोहिमेत निर्माण केले. अनेक राष्ट्रांना भारताने हि छुपी नजर ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे अस सांगत आपल्या जाळ्यात ओढण्याचा सगळ्याच लेवल वर प्रयत्न केला. त्यामुळेच ह्या मोहिमेच सार्क उपग्रह नाव भारताला साउथ एशियन उपग्रह अस ठेवावं लागल. ह्या सगळ्यांना पुरून उरत पाकिस्तान शिवाय भारताने हि मोहीम सुरु केली. तब्बल २३५ कोटी रुपयांचा जीस्याट- ९ हा उपग्रह भारताने तयार केला. येत्या ५ मे च्या आसपास तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. ह्या मोहिमेचा सर्व खर्च तसेच सगळा टेक्निकल, इंजिनिअरींग सपोर्ट भारताने फुकट आयुष्यभर म्हणजे उपग्रहाच्या १२ वर्षाच्या कालावधीसाठी सार्क राष्ट्र ( पाकिस्तान सोडून) उपलब्ध करून दिला आहे. ह्या उपग्रहामुळे डी.टी.एच, व्ही स्याट आणि डिझास्टर म्यानेजमेंट , लायब्ररी सारखे सगळे फायदे इंटरलिंक केले जाणार आहेत. प्रत्येक देश त्यांना दिलेल्या ट्रान्सपोर्टर चा वापर त्यांच्या साठी हवा तसा करू शकणार आहे. ह्यामुळे सर्व देशातील समन्वय वाढण्यास मदत होणार आहे.
आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. बदलू शकतो ते आपण त्यांच्याशी कसे वागतो. काही वाकडेच रहातात. त्यांना बंदुकीची भाषा समजते त्यांना उपग्रहाची भाषा कधी कळणार नाही. अनेक पल्ल्याची विध्वंसक क्षेपणास्त्र खूप बनवता येतात पण एक स्वयंपूर्ण रॉकेट ते बनवू शकत नाही. ह्यावरून होणाऱ्या जळफळाटा ची कल्पना आपण करू शकतो. आपण प्रगत आहोत म्हणून आपण सगळ्यांना दाबून ठेवू शकतो ह्या विचारसरणी चा भारत कधी होता न कधी इथले लोक. हजारो वर्षाची संस्कृती असून सुद्धा भारताने आजवर कोणत्या देशाला इंनव्हेड केल नाही. ह्या पुढे हि करण्याची इच्छा नाही म्हणून “सबका साथ सबका विकास” ह्या तत्वाला आजही पाळत “वसुधैव कुटुंबकम” करण्याची पावलं भारत आणि इस्रो उचलत आहे. मे च्या साउथ एशियन उपग्रहाच्या उड्डाणासाठी इस्रो ला खूप खूप शुभेछ्या.

मदर ऑफ ऑल बॉम्ब... विनीत वर्तक

काल अमेरिकेने इसिस च्या तळांवर टाकलेल्या बॉम्ब ने सगळ्यांची झोप उडवली आहे. कारण हि तसेच आहे. जो बॉम्ब अमेरिकेने टाकला त्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब अस संबोधल जाते. न्युक्लीयर बॉम्ब पेक्षा थोडी कमी पण इतर कोणत्याही बॉम्ब च्या तुलनेत ह्याची संहारक क्षमता जास्ती आहे. ह्या हल्यात किती हानी झाली ह्याचा कोणताच अंदाज अजून आलेला नाही. पण ह्या बॉम्ब मध्ये अस काय आहे? कि ज्यामुळे ह्याला एम.ओ.ए.बी किंवा मदर ऑफ ऑल बॉम्ब अस संबोधल जाते ते बघण रंजक आहे.
एम.ओ.ए.बी. किंवा जी.बी.यु ४३ अस नाव असणारा हा बॉम्ब तब्बल २१,६०० पौंड वजनी आहे. आता तुलना करायची झालीच तर ६ टोयोटा इनोव्हा ह्याचं एकत्रित वजन हे त्या एका बॉम्ब च असेल. ३० फुट लांब असलेल्या ह्या बॉम्ब मध्ये तब्बल ११ टन एकस्प्लोसीव मटेरियल असते. काल इसिस च्या गुप्त गुहांवर टाकल्या क्षणी काही मिलीसेकंदात १०० फुटावरील ऑक्सिजन त्याने शोषून घेतला असेल. त्या परिसरातील प्रत्येकाचा जीव त्याच वेळी घेत. त्या नंतर दुसऱ्या क्षणी ह्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या शॉकव्हेव मुळे २ मैल परिसरातील सगळ्यांचे कान बधीर झाले असतील. जे कोणी गुहेमध्ये लपले असतील ते १९,००० पौंड वजनाच्या एकस्प्लोसीव खाली गाडले गेले असतील. जे कोणी ह्यातून वाचले असतील त्यांनी ह्या बॉम्ब च्या फुटण्याने जे मशरूम क्लावूड बघितल असेल ते क्षण त्यांच्या आयुष्यात ते कधीच विसरू शकणार नाहीत.
अमेरिकेने अफगाणिस्तान च्या नांग्रहार रिजन मध्ये काल हा बॉम्ब टाकला. जमिनीखाली असलेल इसिस च्या अतिरेक्यांच जाळ उध्वत्स करणे हाच ह्या मागील उद्देश होता. जमिनी पासून अवघ्या ६ फुटांवर ह्या बॉम्ब च्या फुटण्याने तयार झालेलं विवर हे ३०० फुट मोठ आहे. एम.ओ.ए.बी. हा बॉम्ब थर्मोब्यारिक प्रकारातील आहे. ह्यातील थर्मो म्हणजे हिट आणि ब्यारिक म्हणजे प्रेशर. ह्या दोघांचा उद्रेक अश्या प्रकारच्या बॉम्ब मधून होतो. ह्या बॉम्ब मध्ये टू स्टेज डिटोनेशन केल जाते. आधी अल्युमिनियम ची डस्ट फुटते. त्या नंतर ब्यारिक ब्लास्ट होतो जो लिटरली आजूबाजूचा गुहेतील सगळा ऑक्सिजन सक करून घेतो. ह्या दोन प्रक्रियांमुळे निर्माण झालेली शॉक व्हेव पुढील काम फत्ते करते.
ह्या बॉम्ब च एक्स्प्लोजन हे हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्ब च्या १/१० दशांश आहे. इतका अवजड बॉम्ब योग्य ठिकाणी टाकायला सुद्धा तश्या प्रकारचे विमान लागते. काल हा बॉम्ब टाकण्यासाठी एम सी १३० ह्या विमानाचा वापर केला गेला. २००३ निर्माण करण्यात आलेल्या हा बॉम्ब प्रत्यक्ष युद्धात काल पहिल्यांदा वापरण्यात आला. अमेरिका कितीही पुढे गेली तरी तिला टक्कर देण्याच काम निदान सैन्य शक्तीत रशिया करत आहे. म्हणूनच ह्या मदर ला फादर ची निर्मिती २००७ मध्ये रशियाने केली आहे. फादर ऑफ ऑल बॉम्ब ह्या मदर बॉम्ब पेक्षा तब्बल ४ पट ताकदवर आहे.
शेवटी मदर असो वा फादर बॉम्ब हे नेहमीच विध्वंस करतात ह्याची कोणाच्या मनात शंका नसेल. शत्रूला नमोहरण करण्यासाठी नक्कीच असे बॉम्ब हवेच. पण त्याच वेळी हे टाकताना निरपराध जीव जे ह्या महाविनाशकारी बॉम्ब च्या कक्षेत येतात त्यांचा हि विचार व्हायला हवा. हिरोशिमा मधील बॉम्ब ने अमेरिकेने शत्रूला म्हणजे जापान ला नक्कीच नामोहरम केल पण ज्या निरपराध लोकांचा ह्यात जीव गेला किंवा जे लोक वाचले आणि त्यांच्या कित्येक पुढच्या पिढ्या हा बॉम्ब चे चटके आजही सोसत आहेत तिकडे अमेरिका जिंकून पण हरली. माणुसकीच्या दृष्टीकोनातून अमेरिका काल पण हरलीच आहे. कदाचित ह्या बॉम्ब ने इसिस चा कणा मोडेल पण ह्याच्या विध्वंसाने घायाळ झालेल्या निरपराधी जनतेला अमेरिका काय उत्तर देणार आहे?

झिंगाट... विनीत वर्तक

बरोबर एक वर्षापूर्वी हा शब्द नेट किंवा विडीओ रुपात यु ट्यूब वर अवतरला आणि बघता बघता ह्या शब्दांनी इतक गारुड केल कि त्याची नशा आज एक वर्षांनी पण उतरलेली नाही. १४ एप्रिल २०१६ ला झिंगाट ह्या सैराट चित्रपटातील गाण्याचा ऑफिशियल विडीओ यु ट्यूब वर रिलीज झाला. अजय- अतुल च संगीत आणि आवाज असलेल हे गाण अल्पावधीत लोकप्रिय तर झालच पण ह्या गाण्याने अगदी अबाल वृद्धांपासून सगळ्यांनाच पुन्हा एकदा ठेका धरायला लावल.
आत्तापर्यंत झिंगाट चा विडीओ तब्बल ४ कोटी पेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. मराठी संगीत हे नेहमीच दर्जेदार गीतांसाठी पहिल्यापासून प्रसिद्ध राहील आहे. पण काही गीतांची मोहिनी अशी असते कि ती भाषेपुढे असतात. म्हणजे त्यातले शब्द कळले नाही तरी ते गाण आपल्या पर्यंत पोहचते किंवा त्याच संगीत मंत्रमुग्ध करते. झिंगाट हे ह्याच पठडीतील गाण ठरल. भाषा, जात, धर्म, देश ह्या पलीकडे जाऊन झिंगाट ने लोकांना ठेका धरायला लावला ह्यात शंका नाही. यु ट्यूब च्या ह्या विडीओ वरील अनेक कमेंट वाचल्या तर अस लक्षात येत कि कितीतरी अमराठी लोकांना हे गाण काय आहे? किंवा काय चालू आहे समजत नसताना आवडलेलं आहे किंबहुना गाण ऐकून त्यांनी ठेका धरलेला आहे. मला नाही आठवत कि मराठी चित्रपटातील अजून कोणत गाण इतक प्रसिद्ध झाल असेल.
गाण अनेक विभागात विखुरलेलं असते. काहींच संगीत, काहींचे शब्द, तर काही गाण्यांचा अर्थ त्याला एक वेगळीच उंची देतात. पण ह्यात अजून एक वेगळा विभाग आहे तो म्हणजे ठेका धरायला लावणारी गाणी. मग ती उडत्या चालीची असोत वा त्याचं संगीत जशी कोळी गीत. लग्नात, मुंजीत, वाढदिवसाला किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी नाचायला ठेका धरण्यासाठी अशी गाणीच लागतात. मला वाटते झिंगाट चा नंबर त्यात खूप वरचा आहे. “माउली-माउली” सारख सुंदर गाण देणाऱ्या अजय- अतुल कडून अजून काही तरी असच अपेक्षित होत. माउली ह्या गाण्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली होती कि देवाच्या गाण्यात हि ठेका किंवा आवेश आणण्याची ह्या दोघांची हतोटी नक्कीच त्यांना एक वेगळ संगीत जोडी बनवत होती. नंतर आलेल्या झिंगाट ने जी उंची गाठली त्याला शब्द नाहीत. म्हणजे मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांना चित्रपटाच्या स्क्रीन समोर नाचताना बघितल नव्हत. चित्रपटगृहाच्या बाहेर एखाद गाण लोकाग्रहास्तव दोन वेळा दाखवलं जाईल अशी जाहिरात तिकीटबारीवर करून तिकीट विक्री झालेली बघितलेली नाही आणि तीही हाऊसफुल चे बोर्ड लावून.
सैराट च्या यशात सिंहाचा वाटा हा नक्कीच अजय- अतुल च्या संगीताचा होता. त्यातही सगळ्यात मोठ श्रेय होत ते झिंगाट च. हे गाण आल आणि चित्रपटाचा नूरच पालटून गेला. मला अजूनही आठवते कि सई आणि अर्णव दोघे हे गाण लागल कि अगदी बेभान होऊन नाचायला सुरवात करत. मराठी शब्द कळतील किंवा संगीत काय असते? ह्याची परिपक्वता नसताना अस बेधुंद होऊन नाचण्यासाठी त्या गाण्यात तशी ताकद असावी लागते. मला वाटते झिंगाट च ते यश होत. पंजाबी, दक्षिणी अश्या सगळ्याच गाण्यांनी भारतीयांच्या मनात राज्य केल होत स्पेशली उडत्या गाण्यांच्या बाबतीत. पहिल्यांदा कुठेतरी एक मराठी गाण ह्या सर्वाना पुरून उरल. सगळ्यात मोठा किस्सा तर माझ्या एका इजिप्शियन मित्राच्या बाबतीतला आहे. त्यान चक्क हे गाण मी ऐकत असताना माझ्याकडून मागून घेतल. त्याच्या मते हे गाण काहीतरी स्पेशल होत. त्याला ऐकून ह्यावर डान्स करावासा वाटला.
उद्या ह्या झिंगाट च्या ह्या यशाला एक वर्ष होईल. अनेक गाणी आपल्या आयुष्यभरात आपल्याला आवडतात पण काहीच अशी असतात कि ती आपल्याला बसल्या जागेवरून उठून ठेका धरायला लावतात. अनेक वेळा ऐकली तरी तो आवेश तसाच प्रत्येक वेळी जाणवून देतात. मला वाटते झिंगाट हे त्यातल एक आहे. एक अतिशय वेगळ अशी रचना दिल्याबद्दल अजय-अतुल ह्यांचे आभार तर आहेतच पण एका मराठी गाण्याला मिळालेला इतका प्रतिसाद पण नक्कीच कौतुकाचा भाग आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊन दे जाळ आणि धूर करत झिंगाट.

गोळावाला कम सरबतवाला... विनीत वर्तक

गोळावाला कम सरबतवाला नावातच जादू आहे नाही का? त्याच नाव ऐकल कि तोंडाला पाणी सुटते अजूनही. मला आठवते लहानपणी मे महिना म्हंटला कि मामाकडची सुट्टी, तिथला धुडगूस, धमाल आणि त्या सगळ्या मधला एक कॉमन माणूस म्हणजे तो गोळावाला कम सरबतवाला काही म्हणा त्याला. दुपारी जेवण झाली आणि सगळे दुपारच्या वामकुक्षी साठी पहुडले कि आमची स्वारी ह्याच्या गाडीसमोर हजर.
एका विहारीच्या बाजूला रस्त्याच्या कोपऱ्यात दुपारी ह्याची गाडी लागायची. तिकडे २-३ रस्ते मिळत असल्याने तसेच गाडी थांबवण्यासाठी जागा असल्याने त्याने आपल बस्तान योग्य जागी बसवलं होत. मग काय रोज दुपारी आम्ही सायकल वर तर कधी चालत शतपावली करत तिथवर जायचो. मग एक तास तिकडे कसा जायचा कळायचा नाही. १ रुपयाच सरबत साध वाल, २ रुपयाच कलर वाल, ३ रुपये स्पेशल असलेल दोन कलर मिक्स सरबत आणि २ रुपयाचा गोळा त्यात, ५ रुपयाचा स्पेशल काला कट्टा आणि सप्तरंगी गोळा. अश्या सगळ्या वेगळ्या मेनू कार्ड वर आम्ही हक्क सांगायचो.
बर रोजच गिऱ्हाईक असल्याने मग आमचा रोख “इसके साथ वो भी” असा व्हायचा मग ते कलर असो व थोडा जास्ती मोठा गोळा. बर एका सरबत किंवा गोळ्याने आमच कधीच आटपायच नाही. त्यामुळे ते चक्र सुरूच राहीच. अगदी जिभेवर आणि ओठांवर सप्तरंग दिसेपर्यंत. कधी अगदीच पैसे जास्ती असतील तर मग ५ आणि १० रुपये वाली लस्सी. त्यातला सबजा चे गोळे असे तोंडात गुदगुल्या करायचे कि त्याची सर कोणत्या फालुद्यात पण येणार नाही. वर्षोन मागे वर्ष गेली तरी हा गोळेवाला प्रत्येक मे महिन्यात माझ तरी हक्काच ठिकाण होता. मे महिन्यात घरी फक्त दोन वेळा जाण होत असे. एक म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा पैसे संपले तर. बाकीच्या वेळेत कुठे पडलेलो असायचो ते घरच्यांना पण माहित नसायचं.
सरबत किंवा गोळा खाऊन झाल्यावर खांद्याला तोंड पुसायची सवय आमच्या दुपारच्या कृत्यांची सबूत त्या कपड्यांवर सोडून जायची. पण तेव्हा कोणाला कुठल भान होत? तो भैया सरबत बनवायला बिसलरी पाणी वापरतो का विहारीच? बर्फाच पाणी कुठल असते? रंग फूड असोसिएशन ने सर्टिफाईड केलेले असतात कि नाही? हे असले प्रश्न अगदी स्वप्नात पण माझ्याच काय आमच्या आख्या २५-३० जणांना किंवा त्यांच्या पालकांना किंवा त्या भैया ला पण पडले नाहीत. घसा बसेल, ताप येईल, काळ्या मातीच्या हातांनी सरबत पितांना किंवा गोळा खाताना जंतू तोंडात, पोटात जातील किंवा उष्ट प्यायल्याने त्रास होईल असले फालतू विचार आम्हा मित्रांच्या चांडाळ चौकडी ला कधीच शिवले नाहीत. एक सरबत १० लोकात नाही पिणार तर मग त्या सरबताची मज्जा काय? असा प्रश्न मात्र आमच्या मनाला शिवून जायचा.
खिशात १० रुपयांची नोट असलेला राजा असायचा. कारण जो पैसे भरेल त्याला सरबताचा पहिला घोट तर ज्याला मीठ आवडेल त्याला शेवटचा. अश्या रीतीने तो ग्लास किती लोकांच्या तोंडाची चव घ्यायचा त्याच त्याला माहित. आज ऐकायला कसतरी वाटल तरी ते असे बिनधास्त दिवस होते. जातीची , धर्माची आणि आजारांची वेस मैत्रीच्या आड कधीच आली नाही. तेव्हा एका कामगाराचा मुलगा ते ज्याच्या घरी काम करत त्याचा मुलगा एकाच ग्लास मधून सरबत प्यायचो. तो सरबतवाला म्हणजे माझ्या तहानलेल्या जीवाला अमृत पाजून तृप्त करणारा एक भैया होता.
आज ते सरबत आणि गोळेवाले कुठे हरवून गेले. बिसलरीच्या युगात त्या सरबत आणि गोळेवाल्याला हरवून बसलो. त्या निंबूझ आणि सेवन अप, थम्स अप ला कुठली येणार त्या सरबताची टेस्ट? न्याचरल च्या आणि म्याग्नस च्या आईस्क्रीम ला कुठे आहे त्या बर्फाच्या गोळ्यांची चव. दुपारच्या त्या रणरणत्या उन्हातून तहान भागवणाऱ्या सरबताला कोणीच रिप्लेस करू शकत नाही. तो आनंद, ते क्षण वेगळेच होते. आजही तिकडून गेली कधी तर नजर तिकडेच जाते पटकन त्याच विहारीच्या बाजूला. आठवतात ते क्षण जेव्हा २०-३० मुलांचा घोळका त्या भैयाच्या गाडीला सर्व बाजूंनी लुप्त करायचा आणि त्याच मित्रांच्या मैत्रीला जे गळ्यात गळे घालून चिअर्स करायचे मैत्रीचे ते क्षण. जे आज त्या गोळेवाल्या आणि सरबताच्या गाडी प्रमाणे लुप्त झाले आहेत.
चेनानी – नशरी टनेल... विनीत वर्तक
गेल्या रविवारी पंतप्रधानांनी चेनानी – नशरी टनेल च उदघाटन केल. एखाद्या टनेल च्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधानांनी जाणच ह्या टनेल च महत्व विशद करते. जम्मू ते श्रीनगर ह्या महत्वाच्या ठीकाणानां जोडणारा हा टनेल देशासाठी खूप महत्वाचा होता. हिमालयाच्या पर्वतरांगान मधुन प्रवास करणे नेहमीच जिकरीच राहील आहे. बदलणार हवामान, गोठवणार तापमान, अचानक होणारी ढगफुटी, दरड कोसळण्याची कधीही शक्यता अश्या सगळ्या प्रतिकूल गोष्टी असताना हा मार्ग देशाच्या सुरक्षितता आणि एकूणच जनजीवनासाठी महत्वाचा होता. अश्या कठीण परिस्थितीत बोगदा किंवा टनेल बांधणे किती जिकरीच असू शकते ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. कोकण रेल्वे ज्या सह्याद्रीच्या भागातून जाते. तिथल्या पेक्षा ठिसूळ दगडांनी आणि प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात असे टनेल उभारणे अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक कठीण लक्ष आहे. म्हणूनच चेनानी – नशरी टनेल च महत्व जास्ती आहे.
चेनानी – नशरी टनेल भारतातील सगळ्यात लांब रस्त्यावरील टनेल आहे. तब्बल ९.२८ किमी. लांब हा टनेल आहे. ह्या टनेलमुळे जम्मू ते श्रीनगर मधील ४१ किमी मधील अंतर आता अवघ ९.२८ किमी कमी झाल आहे. जम्मू ते श्रीनगर हा प्रवास २९३ किमी आहे. चेनानी – नशरी सारखे तब्बल १२ टनेल बांधले जात आहेत. त्यामुळे हे अंतर अवघ्या ६२ किमी इतक कमी होणार आहे. चेनानी – नशरी टनेल बांधायला तब्बल ३७२० कोटी रुपये खर्च आला आहे. १५०० अभियंते, जीओलॉजीस्ट, कामगार ह्यांच्या अथक मेह्नीतून आकाराला आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा देशातील सर्वात सुरक्षित टनेल आहे.
६००० एल.ई.डी लाईट, ११८ सी.सी.टी.व्ही क्यामरे म्हणजे प्रत्येक ७५ मीटर ला एक ह्या प्रमाणे, ११८ एस.ओ.एस. प्रत्येक १५० मीटर ला एक ह्या प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा, स्मोक आणि हिट डिटेक्टर ह्यात ठेवले गेले आहेत. तसेच ह्या टनेल मधील रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी ऑटोम्याटिक इंटिग्रेटेड सिस्टीम बसवण्यात आली आहे. कोणत्याही गाडीच तापमान अधिक झाल्यास त्या गाडीला थांबवून तिला योग्य त्या तापमान असताना पुढे जाऊन देण्याची अशी हि यंत्रणा २४ तास X ३६५ दिवस कार्यरत असणार आहे. ह्या टनेल मधील वीज व्यवस्था हि त्रिस्तरीय ब्याक अप यंत्रणेने सपोर्ट केलेली आहे.
इतक्या लांबीच्या टनेल मध्ये हवेची योग्य ती पातळी ठेवण्यासाठी प्रत्येक १२ मीटर वर सेन्सर बसवण्यात आले आहेत. जे हवेतील कार्बन डायओक्साईड आणि कार्बन मोनोओक्साईड च प्रमाण मोजून एक्झोस्ट पंख्यांची दिशा तसेच हवेची शुद्धता मेंटेन करणार आहेत. ह्या टनेल मध्ये आपत्कालीन किंवा रहदारीच्या वेळी मार्गिका बदलण्यासाठी २९ क्रोस रोड ठेवले आहेत. तसेच एक वेगळी मार्गिका हि राखीव ठेवण्यात आली आहे.
एन.एच. ४४ ह्या महामार्गावर बनवण्यात आलेल्या ह्या टनेल मुळे तब्बल दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. ह्या टनेल मध्ये जी.एस.एम. नेटवर्क असणारे फोन चालू शकणार आहेत तर प्रत्येक गाडीला ९२.७ एफ.एम हे रेडीओ स्टेशन लावण बंधनकारक असणार आहे. आपत्कालीन स्थितीत ह्याच च्यानल वरून संदेश देण्यासाठी हि व्यवस्था केली गेली आहे. ज्याने कोणत्याही स्थितीत गोंधळ न होता. गाडयांच नियंत्रण करणे सोप्पे जाणार आहे. अश्या वेगवेगळ्या व्यवस्थांनी परिपूर्ण असलेला हा टनेल मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया ह्या प्रोग्राम च्या माध्यमातून बनवलेला आहे. स्वदेशी अभियंते पण जगातील एक सर्वोत्तम टनेल उभारू शकतात हा आत्मविश्वास ह्या निमित्ताने सगळ्यांनी दाखवून दिला आहे. १४ किमी लांब असणाऱ्या झोझिला टनेल ची मुहूर्तमेढ हि ह्या टनेल च्या मुळे यशामुळे रोवली गेली आहे. ह्या प्रोजेक्ट वर काम केलेल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन.