Monday, 8 August 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २५)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २५)... विनीत वर्तक ©

आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या एका छुप्या युद्धाला अप्रत्यक्षपणे सुरवात झाली आहे. बुद्धिबळाच्या पटलावर सध्या एकापेक्षा एक सरस अश्या चाली खेळल्या जात आहेत. या चालीचे काय परीणाम होणार हे कळायला अजून काही वेळ जावा लागेल. पण एकूणच या चालींनी आंतरराष्ट्रीय राजकरण ढवळून निघालं आहे. या चाली काय आहेत? त्याचे होणारे संभवित परीणाम? या सगळ्याचा भारतावर काय परीणाम होणार हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. भारताचा एक शत्रू देश सध्या या चालींमुळे अक्षरशः रागाने लाल बुंद झाला आहे. भारताचा यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी भारताच्या शत्रू देशाच्या सुप्त मनसुब्यांना एक मोठा धक्का मानला जात आहे. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह च्या स्पिकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवान चा दौरा केला. जगभर हा दौरा अतिशय गाजला. नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा किती महत्वाचा होता हे यावरून समजू शकेल की अमेरिकेने तब्बल १३ फायटर जेट, फ्युल टँकर हे नॅन्सी पेलोसी च्या विमानाला एस्कॉर्ट करण्यासाठी पाठवले होते. या शिवाय पाण्यातून यु.एस.एस. अमेरिका, यु.एस.एस. त्रिपोली, यु.एस.एस. रोनाल्ड रेगन आणि यु.एस.एस.अब्राहम लिंकन या महाकाय शक्तिशाली विमानवाहू आण्विक नौका साऊथ चायना सी ते अगदी हवाई पर्यंत तैवान च्या तिन्ही बाजूने अमेरिकेने तैनात केल्या होत्या. यातील प्रत्येक युद्धनौका ९० पेक्षा जास्ती फायटर जेट आणि इतर लहान मोठ्या कित्येक विनाशिका, फ्रिगेट पाण्यात आपल्यासोबत घेऊन प्रवास करत असते. अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांना घेऊन जाणारं विमान जगभरातून तब्बल ७ लाख लोक ट्रॅक करत होते. अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची तयारी ठेवली होती. नॅन्सी पेलोसी यांच्या विमानावर कोणताही हल्ला आणि अमेरिकेच्या विमानांनी एका नवीन युद्धाचं रणशिंग फुंकले असते इतकी तयारी अमेरिकेच्या हवाई दलाने आणि नौदलाने केलेली होती.  

तैवान हा नेहमीच चीनसाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. भारतासाठी काश्मीर ही जशी दुखरी नस आहे. त्याचप्रमाणे चीन साठी तैवान ही दुखरी नस आहे. चीन च्या विस्तारवादी भूमिकेचा श्रीगणेशा इकडून झाला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. तैवान एक लोकशाही राष्ट्र असताना त्याचा राष्ट्र म्हणून केलेला उल्लेख चीन ला अजिबात पटत नाही. तैवान हा चीनचा भाग आहे असं चीन मानतो. त्यामुळे तैवान ला कोणीही राष्ट्राचा दर्जा दिला तर चीन च रक्त खवळते. अमेरिकेला चीन ची दुखरी नस बरोबर माहित आहे. रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या सोबत राहण्याची चाल चीन ने अमेरिकेला शह देण्यासाठी खेळली. त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिबंधानंतर रशियाला झालेलं आर्थिक नुकसान चीन च्या मदतीमुळे कमी झालं. त्यामुळेच अमेरिकेने याला कटशह देण्यासाठी तैवान दौऱ्याची चाल खेळली. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह च्या स्पिकर नॅन्सी पेलोसी या तैवानला भेट देणार अशी पुडी अमेरिकेने काही दिवस आधीच सोडली. या गोष्टीचा सुगावा लागतात चीन खवळला. चीन ने दादागिरीची भाषा करत ही भेट रोखण्यासाठी आपण कोणत्याही स्तरावर उतरू असं जाहीर केलं. अमेरिकेला नेमकं हेच हवं होतं. चीन आणि चीन मधील कम्युनिस्ट सरकारने नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट प्रतिष्ठेचा मुद्दा केला. चीनने आपली सर्व शक्ती पणाला लावली साम, दाम, दंड, भेद सगळं करून अमेरिका ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर चीन ने लष्करी कारवाई ची तयारी केली. 

बुद्धिबळाच्या खेळात सगळ्यात महत्वाचं असते की समोरचा आपल्याला त्याचा प्यादा का खायला देतो आहे याच आकलन करायचं असते. आपलं एखादं प्याद देऊन तो आपला हत्ती किंवा घोडा मारत नाही न याची काळजी घ्यायची असते. चीन ने इकडे चूक केली. नॅन्सी पेलोसी यांचा दौरा साहजिक जागतिक पातळीवर महत्वाचा झाला. अमेरिकेने आपलं लष्करी सामर्थ्य उतरवताच चीन ला पाली औकाद कळून आली. अमेरिकेच्या लष्करी फौजफाट्यापुढे आपण शिंकू सुद्धा शकत नाही याची जाणीव चीन ला झाली पण तोवर खूप उशीर झाला होता. नॅन्सी पेलोसी सुखरूप तैवान मधे उतरल्या. तैवान च्या जनतेने ही त्यांच खूप जोशात स्वागत केलं. चीन च्या नाकावर टिच्चून अमेरिकेने आपली चाल यशस्वी खेळून दाखवली. या घटनेने अमेरिका आणि चीन यांच्यामधील संबंध अजून खराब झाले आहेत. चीन ची कम्युनिस्ट पार्टी गेली काही दशके चीन ला प्रगती पथावर नेण्याचं आश्वासन देऊन निवडून येत होती. पण गेल्या दशकात झालेली प्रगती महत्वाकांक्षेत बदलली. चीन ला संपूर्ण जगावर अधिराज्य करण्यासाठी पुढे घेऊन जाण्याचं आश्वासन तिथल्या नेत्यांनी चीन च्या जनतेला दाखवलेलं होतं. पण या सगळ्याला अमेरिकेने एक प्रकारे सुरुंग लावला आहे. चीन च्या घरात घुसून एक प्रकारे आपण आशियातील आणि विशेष करून तैवान च राजकारण सांभाळू शकतो हा संदेश यातून दिला आहे. त्यामुळेच चीन संपूर्णपणे धुमसतो आहे. शी जिनपिंग यांच्या साम्राज्याला एक प्रकारे नॅन्सी पेलोसी यांनी तैवान ला भेट देऊन आपल्याच घरात चीन किती दुबळा आहे हे दाखवून दिलं आहे. 

एकीकडे चीन या चालीने मात खात नाही तोवर तिकडे भारताने आपल्या चालीने चीन ला बॅकफूट वर नेलं आहे. श्रीलंका मधे राजपक्षे घराणं सत्तेत असताना त्यांनी संपूर्ण श्रीलंका एकप्रकारे चीन ला गहाण ठेवली होती. आपल्या शेजारील भारताला दूर करत चीन ची साथ करण्याचा डाव त्यांच्या कसा अंगलट आला हे सगळ्यांनी आता अनुभवलेलं आहे. १९८७ साली भारतासोबत केलेला करार असताना सुद्धा श्रीलंकेने आपलं हंबनटोटा हे बंदर चीन ला भाड्यावर दिलं. भारताने आक्षेप नोंदवून सुद्धा पैश्याच्या लोभापायी राजपक्षे घराण्याने संपूर्ण देश विकायला काढला होता. पण आता जेव्हा श्रीलंका प्रचंड अश्या आर्थिक संकटातून जात आहे त्यावेळेस राजपक्षे आणि चीन दोघांनीही श्रीलंकेला वाऱ्यावर सोडून पळ काढला. त्या वेळेस भारत हा एकमेव देश होता जो श्रीलंकेच्या मदतीला धावून आला. एकट्या भारताने तब्बल ४ बिलियन अमेरिकन डॉलर ची मदत श्रीलंकेला या एका वर्षात करून तिथल्या लोकांच जीवन सावरण्याचा प्रयत्न केला. त्याची लाज म्हणा अथवा आठवण म्हणा कुठेतरी श्रीलंकेच्या नवीन सरकारला याची जाणीव झाली. भारताने आक्षेप नोंदवल्यावर श्रीलंकेने चीनच्या 'युयान वांग ५' या हेरगिरी करणाऱ्या जहाजाला श्रीलंकेच्या बंदरात उतरण्यास अनिश्चित काळासाठी बंदी टाकली आहे. 

चीन च हे हेरगिरी करणारं जहाज चीनने भारताच्या नौदल आणि अवकाश कार्यक्रमाची हेरगिरी करण्यासाठी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात ११ ऑगस्ट २०२२ रोजी येत असल्याचं कळवलं होतं. पण भारताने याचा आक्षेप श्रीलंकेकडे नोंदवला. एखाद्या तिसऱ्या देशाचं जहाज श्रीलंकेत येणं आणि त्याने भारताच्या नौदलाची तसेच हिंद महासागरातील सिल्क रूट वर लक्ष ठेवणं भारताला अजिबात रुचणारं नव्हतं. भारताने संकटात केलेल्या मदतीची जाणीव उशिराने का होईना श्रीलंकेच्या नवीन राजकारण्यांना झाली. ज्या चीनने त्यांच्यावर भिक मागायची वेळ आणली त्याच जहाज आपल्याला मदत करणाऱ्या भारताच्या विरुद्ध वापरण्यासाठी आपल्या भूमीचा वापर न करण्याचा आदेश श्रीलंकन सरकारने काढला. या चालीमुळे चीन ने पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. 

एकीकडे नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा तर दुसरीकडे श्रीलंकेने चीन ला दिलेला धक्का अश्या दुहेरी धक्याने ड्रॅगन पूर्णतः खवळलेला आहे. चीन चे नेते आता अमेरिकेशी बदला घेण्याची भाषा करत आहेत. अमेरिकेच्या या दौऱ्याची किंमत आपण अमेरिकेला मोजायला लावू असं चीन वारंवार सांगत आहे. याचे काय परीणाम होतील ते काळ सांगेल. कारण अमेरिकेने खेळललेली चाल खूप धोकादायक आहे. चीन च्या महत्वाकांक्षेला आणि त्याच्या आर्थिक क्षमतेला कमी लेखण्याची चूक अमेरिकेने नक्कीच करू नये. कारण आता अमेरिका टू फ्रंट वॉर च्या दिशेने वाटचाल करत आहे. एकीकडे रशिया तर आता दुसरीकडे चीन अश्या वेळेस जर अमेरिकेला आशियात आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर एकच देश यात मदत करू शकतो तो म्हणजे 'भारत'. अमेरिका एकटी एकाचवेळी दोन आर्थिक सत्तांशी लढू शकत नाही. भारत यामधे निर्णायक भूमिकेत असणार हे स्पष्ट आहे. रशिया आणि भारताचे संबंध त्याचवेळी अमेरिका आणि भारताचे संबंध हे दोन्ही महत्वाचे आहेत. चीन च्या महत्वाकांक्षेला रोखण्यासाठी येत्या काळात भारत हाच मध्यवर्ती भूमिकेत राहणार आहे. आर्थिक आकड्यानुसार २०२८ पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकेल तर २०४५ पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल. २१०० शतक येईपर्यंत चीन जगातील आर्थिक महासत्ता असेल तर त्या पाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल. या नंतर अमेरिका अर्ध्यापेक्षा कमी अंतरावर तिसऱ्या क्रमांकावर असेल. त्यामुळेच एक नंबर ला शह देण्याच्या चाली खेळायच्या असतील तर क्रमांक २ आणि ३ ने म्हणजेच भारत आणि अमेरिकेने एकत्र असणं काळाची गरज आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल ( पहिल्या फोटोत नॅन्सी पेलोसी आणि तैवान च्या राष्ट्रपती त्सी इंग वेन, दुसऱ्या फोटोत चीन च युयान वांग ५ हे हेरगिरी करणारं जहाज ) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





1 comment:

  1. आपले सर्वच लेख खूपच अभ्यासपूर्ण व उत्तम लेखन कौशल्य असलेले आहेत.
    धन्यवाद..!

    ReplyDelete