Monday 1 August 2022

रॉकेटचा श्रीगणेशा... विनीत वर्तक ©

 रॉकेटचा श्रीगणेशा... विनीत वर्तक ©

या आठवड्यात इसरो एका नव्या कोऱ्या रॉकेट ला प्रक्षेपित करणार आहे. गेले काही वर्ष त्यावर काम केल्यानंतर प्रत्यक्षात हे रॉकेट उड्डाण भरायला सज्ज झालेलं आहे. या रॉकेट च नाव आहे Small Satellite Launch Vehicle (SSLV). २०१६ साली राजाराम नागप्पा यांच्या रिपोर्ट मधे त्यांनी भारताला छोटे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी एखादं रॉकेट तयार करण्याची कल्पना मांडली. एकीकडे स्पेस एक्स सारख्या अमेरीकन कंपन्या या क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापन करत असताना भारताने या क्षेत्रात आपलं एक स्थान तयार केलं पाहिजे असं त्यात लिहलेलं होतं. तत्कालीन  Liquid Propulsion Systems Centre चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी त्यांची कल्पना उचलून धरली. इसरो ने मग अश्या पद्धतीच्या एका छोट्या रॉकेट च्या निर्मितीवर काम सुरु केलं. आज योगायोगाने एस. सोमनाथ  इसरो चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं हे स्वप्न पूर्ण होते आहे. 

भारताकडे पी.एस.एल.व्ही. आणि जी.एस.एल.व्ही. सारखी रॉकेट असताना इसरो अश्या एखाद्या नवीन रॉकेट ची निर्मिती का करत आहे हा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो तर समजून घेऊ की नक्की हे रॉकेट कोणती एक नवीन क्रांती या क्षेत्रात आणणार आहे. एकेकाळी अत्यंत खर्चिक आणि किचकट असणारं उपग्रह तंत्रज्ञान आता शाळांपर्यंत येऊन पोहचलं आहे. तंत्रज्ञानात झालेली प्रगती यामुळे उपग्रहात लावण्यात येणारी यंत्रणा अतिशय सोप्पी झाली आहे. त्यामुळेच उपग्रह कमी वजन असणारे पण त्याचवेळी अनेक कार्य करू शकणारे बनवता येणं शक्य आहे. पण त्यांच प्रक्षेपण पृथ्वीच्या कक्षेत करणं आजही खर्चिक आहे. अश्या उपग्रहांचे वजन अगदी ५ किलोपासून ते ५०० किलोपर्यंत असते. त्यासाठी एक संपूर्ण रॉकेट भाड्यावर घेणं परवडत नाही. किंबहुना देशात सुरु असलेले मोठे अवकाश संशोधनाचे प्रोजेक्ट बाजूला ठेवून इसरो मधील वैज्ञानिकांना रॉकेट बनवण्यात गुंतवून ठेवणं इसरो ला आणि पर्यायाने भारताला परवडणारं नाही. यावर उपाय एकच की ज्यांना कोणाला ५०० किलोग्रॅम वजनापर्यंत उपग्रह पृथ्वीच्या लो ऑर्बिट म्हणजेच ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवायचे असतील तर असं एक छोटं रॉकेट बनवणं की जे सहज बनवता येईल. ज्यात जास्ती मनुष्यबळ लागणार नाही, जास्ती वेळ लागणार नाही. महत्वाचं म्हणजे इसरो ला त्यासाठी आपला वेळ खर्ची करावा लागणार नाही. एक असं रॉकेट ज्याची निर्मिती खाजगी तत्वावर ही केली जाऊ शकेल. याच उत्तर म्हणजेच इसरो च एस.एस.एल.व्ही. 

७ ऑगस्ट २०२२ ला सकाळी ९.१८ ला इसरो एस.एस.एल.व्ही. च पहिलं प्रक्षेपण करत आहे. हे प्रक्षेपण अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. या रॉकेट च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतात उपग्रह क्रांती होणार आहे. याला कारण आहे या उपग्रहाच्या निर्मितीचा वेग. अवघ्या ७ दिवसांपेक्षा कमी वेळात आणि फक्त ६ अभियंत्यांच्या मदतीने फक्त ३० कोटी रुपयात हे रॉकेट उड्डाणाला सज्ज होऊ शकणार आहे. इसरो च्या पी.एस.एल.व्ही. रॉकेट ची प्रक्षेपण किंमत १३० कोटी रुपये आहे तर ६०० अभियंते आणि वैज्ञानिक ६ महिने यासाठी काम करत असतात. आता लक्षात येईल की कश्या पद्धतीने उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च आणि एकूणच रॉकेट ची निर्मिती यात कश्या पद्धतीने बदल होणार आहे. एस.एस.एल.व्ही. या रॉकेट मधे एकूण ३ स्टेज आहेत. यात Hydroxyl-terminated polybutadiene (HTPB) हे इंधन वापरण्यात येणार आहे तर चौथा आणि शेवटच्या भागात ज्याला Velocity-Trimming Module (VTM) असं म्हणतात त्यात   50 N (न्यूटन) चे थ्रस्टर्स वापरण्यात येणार आहेत. हे रॉकेट ५००-५०० म्हणजेच ५०० किलोग्रॅम वजनाचा उपग्रह ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्यास सक्षम असणार आहे. 

येत्या आठवड्यात होणारं उड्डाण अजून एका गोष्टीसाठी लक्षवेधी असणार आहे. याच कारण म्हणजे इसरो च एस.एस.एल.व्ही. रॉकेट जो उपग्रह अवकाशात घेऊन जाणार आहे. या उपग्रहाचे नाव आहे 'AzaadiSAT' (आझादी सॅट). भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच औचित्य साधत भारतातील ७५ विविध शाळांमधील ७५० मुलींनी अवकाशात ७५ वेगवेगळे प्रयोग तयार करणारी यंत्रणा घेऊन हा उपग्रह बनवला गेला आहे. ८ किलोग्रॅम वजन असलेला हा उपग्रह पुढले ६ महिने अवकाशात वेगवेगळे प्रयोग करून त्याची माहिती या सर्व शाळांकडे प्रक्षेपित करणार आहे. हे वर्ष युनायटेड नेशन ने 'Women in Space' म्हणून घोषित केलेलं आहे. जगाच्या पाठीवर मुलींना अवकाश क्षेत्राशी इतक्या सुंदर पद्धतीने जुळवण्याचा प्रयत्न अजून कुठे झालेला नाही. 

"This is the first of its kind space mission with an all-women concept to promote women in STEM (science, technology, engineering and mathematics)"

Rifath Sharook, Chief Technology Officer, at Space Kidz India. 

स्पेस किड्स इंडिया यांनी INSPACe (Indian National Space Promotion and Authorization Center) च्या उदघाटनाच्या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत इसरो आणि भारत सरकार बरोबर अश्या पद्धतीचा उपग्रह पाठवण्याचा करार केला होता. आता या ७५० मुलींच स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ समीप येऊन पोहचलेली आहे. 

माझ्या दृष्टीने एस.एस.एल.व्ही. च उड्डाण अनेक अर्थाने वैशिष्ठपूर्ण असणार आहे. एक नवीन रॉकेट म्हणून पण आणि एका नव्या क्रांतीची सुरवात म्हणून पण. ज्या पद्धतीने भारतात मोबाईल क्रांती झाली त्याच वेगाने अवकाश क्षेत्रात येत्या काळात क्रांती होण्याच्या मार्गावर भारत उभा आहे असं मला मनापासून वाटते. अश्या पद्धतीने भारतातील नवीन पिढीला, त्यांच्या कुतुहलाला खाद्य पुरवण्याचं काम आणि त्यांची ऊर्जा सकारात्मक दृष्टीने वळवण्याच काम एक प्रकारे इसरो करते आहे. 

इसरो ला या उड्डाणासाठी खूप खूप शुभेच्छा. या ७५० मुलींसोबत  भारतातील इतर विद्यार्थिनींच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या एस.एस.एल.व्ही. च उड्डाण नक्कीच यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. या रॉकेट च्या निर्मितीमागे असणाऱ्या असंख्य संशोधक, वैज्ञानिक, अभियंते, त्यांचे कर्मचारी, इतर खाजगी उद्योग आणि त्यांचे कर्मचारी तसेच इसरो आणि भारत सरकार यांना कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




1 comment:

  1. खूप छान माहिती, अतिशय सुंदर शब्दांत..... नेहमी प्रमाणेच.

    ReplyDelete