'पाऊले चालती चंद्राची वाट'... विनीत वर्तक ©
२४ सप्टेंबर २००९ चा दिवस होता. नासाने चंद्रासंदर्भात एक शोधप्रबंध जगापुढे मांडला. या शोध प्रबंधाने नासाच्या चंद्राबद्दलच्या आकलनाला कलाटणी दिली. जुलै १९६९ मधे अपोलो ११ मोहिमेतून पहिल्यांदा चंद्रावर मानव उतरला. त्यानंतरच्या अनेक अपोलो मिशन नंतर चंद्रावर दगड धोंड्या शिवाय काही नाही. तिकडे मानवाला भविष्यात काही उपयोगी पडेल असं काहीच नाही. या नासाच्या किंवा अनेक वैज्ञानिकांच्या समजुतीला भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने मोडीत काढलं. २४ सप्टेंबर च्या शोधप्रबंधात नासाने मान्य केलं की चंद्रावर पाण्याचा शोध लागला आहे. भारताच्या चंद्रयान १ मोहिमेत पाठवलेल्या नासाच्या एम ३ या उपकरणाने हा शोध लावला होता. नंतरच्या वर्षात अधिक संशोधन केल्यावर हे स्पष्ट झालं की चंद्राच्या १ वर्ग मीटर मातीमधे ३५४ मिलिलिटर पाणी आहे. त्यामुळेच नासाने आपली पावलं पुन्हा एकदा चंद्राकडे वळवली आहेत.
भविष्यात चंद्रावर होणाऱ्या मोहिमा लक्षात घेऊन नासाने चंद्रावर कायमस्वरूपी एक बेस तयार करण्याची योजना आखली आहे. त्याचाच श्रीगणेशा नासा सोमवारी २९ ऑगस्ट २०२२ रोजी करत आहे. ३१ ऑगस्ट २०११ ला अनेक अपघातानंतर स्पेस शटल मोहिमा संपूर्णपणे बंद केल्या. २०११ ते २०२२ या जवळपास ११ वर्षाच्या कालावधीत नासाकडे स्वतःचे रॉकेट नव्हते. त्यासाठी नासा ने आपली अनेक उड्डाण स्पेस एक्स आणि ब्लु ओरिजिन सारख्या खाजगी कंपन्यांकडे वळवली होती. 'आर्टमिस' या चंद्र मोहिमेद्वारे नासा पुन्हा एकदा आपल्या स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेट सिस्टीम, ओरायन स्पेसक्राफ्ट अश्या नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चंद्रावर जायला सज्ज झाली आहे.
आर्टमिस मोहिमेचा भाग म्हणून अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्या आगोदर नासा दोन मोहिमा या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी पाठवत आहे. आर्टमिस १ या सोमवारी होणाऱ्या मोहिमेचा मुख्य उद्देश स्पेस लॉन्च सिस्टीम, ज्यात अंतराळवीर राहणार त्या ओरायन क्रू मॉडेल ची चाचणी घेतली जाणार आहे. आर्टमिस १ या मोहिमेचा संपूर्ण प्रवास ४२ दिवस ३ तास २० मिनिटांचा असणार आहे. ओरायन हे क्रू मॉडेल मॅक ३४ ( ३९४२८ किलोमीटर / तास ) वेगाने चंद्राच्या कक्षेत जाऊन आल्यावर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. या सगळ्या प्रतिकूल वातावरणात ओरायन तग धरते का? कश्या पद्धतीने ते पाण्यात योग्य ठिकाणी उतरते? अश्या अनेक विविध गोष्टी तपासल्या जाणार आहेत. १० ऑक्टोबर २०२२ रोजी हे स्प्लॅशडाउन अपेक्षित आहे. आर्टमिस १ मोहीम यशस्वी झाल्यावर आर्टमिस २ ही मोहीम २०२४ तर आर्टमिस ३ ही मोहीम अंतराळवीरांना घेऊन २०२५ च्या आसपास चंद्रावर जाणं अपेक्षित आहे.
'आर्टमिस १' या मिशन मधे नासाचे स्पेस लॉन्च सिस्टीम हे रॉकेट तब्बल ३९ लाख किलोग्रॅम वजन घेऊन उड्डाण भरेल. पृथ्वीच्या कक्षेत पोहचल्यानंतर मुख्य रॉकेट सर्व्हिस मॉडेल पासून विलग होईल. त्यानंतर या सर्व्हिस मॉडेल चे सौर पॅनल उघडले जातील. तिकडे काही छोटे उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर हे मोड्यूल आपली क्रायोजेनिक इंजिन चालू करून ओरायन क्रू मॉडेल ला चंद्राच्या दिशेने पाठवून देईल. चंद्राच्या कक्षेत आल्यानंतर १०० किलोमीटर उंचीवरून ओरायन चंद्राचा अभ्यास करेल आणि त्याच्या तांत्रिक बाबींच विश्लेषण केलं जाईल. परतीच्या प्रवासात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करत ओरायन क्रू मॉडेल पुन्हा पृथ्वीच्या दिशेने आपला प्रवास सुरु करेल. वर लिहिलं तसं मॅक ३४ किंवा ११ किलोमीटर / सेकंद या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे झेपावेल. या काळात त्याच तपमान ५००० डिग्री सेल्सिअस इतकं वाढलेलं असेल. या तपमानात ओरायन क्रू मॉडेल चा निभाव लागणं नासा ला अपेक्षित आहे.
आर्टमिस या मोहिमेद्वारे नासाने पुन्हा एकदा चंद्राकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. या मिशन मधे पहिल्यांदा एक महिला अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर आपली पावले टाकणार आहे. हा लेख लिहेपर्यंत या मोहिमेचं फायनल काऊन्ट डाऊन सुरु झालेलं आहे. जर उद्या वातावरण योग्य असेल तर आर्टमिस १ हे चंद्राकडे उड्डाण करेल. हे उड्डाण पुढल्या २०-३० वर्षाची अवकाश मोहिमांची दिशा ठरवणारं असणार आहे. त्यामुळेच नासासाठी ही मोहीम अतिशय महत्वाची आहे. नासाच्या सर्व वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधकांना या उड्डाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
फोटो शोध सौजन्य :- नासा, गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment