'सफेद हंस'... विनीत वर्तक ©
भारताला टू फ्रंट वॉर ज्याला म्हणतात त्याचा धोका भूतकाळात होता. एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन पण गेल्या काही वर्षात झालेली पाकिस्तानची दुर्दशा आणि भारताची तांत्रिक प्रगती यामुळे पाकिस्तान आता भारताची बरोबरी काय जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही याची जाणीव भारताला आणि पाकिस्तान ला ही आहे. याच गोष्टीमुळे गेल्या काही वर्षात भारत आपल्या संरक्षण क्षमतेची आखणी चीनला समोर ठेवून करू लागला आहे. डोकलाम विवाद आणि त्यानंतर भारताच्या सीमेवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला चिथवण्यासाठी काही हालचाली केल्या आहेत. त्यातली एक म्हणजे एच ६ या स्ट्रॅटर्जीक बॉम्बर ची तिबेट वर केलेली नियुक्ती. मुळात स्ट्रॅटर्जीक बॉम्बर म्हणजे काय? त्याचा भारताला असलेला धोका काय? त्याला भारत कसं उत्तर देणार या सर्व प्रश्नांच एकच उत्तर सध्या समोर येते आहे. ते म्हणजे 'सफेद हंस'.
स्ट्रॅटर्जीक बॉम्बर म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला शीत युद्धाच्या काळात जावं लागेल. अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अनेक विध्वंसक लढाऊ तंत्रज्ञानाचा अविष्कार केला. त्याचाच एक भाग म्हणजे 'स्ट्रॅटर्जीक बॉम्बर'. पहिल्या महायुद्धाच्या वेळी रशियाने पहिल्यांदा बॉम्ब टाकून शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी अश्या एका लढाऊ विमानाची निर्मिती केली की ज्याच काम शत्रूच्या गोटात खोलवर शिरून त्यांच्या महत्वाच्या ठिकाणावर बॉम्ब ने हल्ला करण, त्यांचा खात्मा करण आणि हे बॉम्ब आकाशातून कुठून पडले याचा अंदाज येण्याआगोदर आपल्या देशात परत येणं. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश आणि अमेरीकी स्ट्रॅटर्जीक बॉम्बर नी जपान च्या शहरांवर बॉम्ब हल्ले करून जपान ला युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा जपान ऐकत नाही त्यावेळेस अमेरीकेच्या बोईंग बी २९ सुपरफोर्ट्रेस या स्ट्रॅटर्जीक बॉम्बर मधून जपान च्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्यानंतर काय घडलं हा इतिहास आहे. यानंतर पण अमेरीका आणि रशिया यांच्यात शीत युद्धाच्या काळात स्ट्रॅटर्जीक बॉम्बर ने एकमेकांवर चढाओढ सुरूच राहिली. त्यामुळेच स्ट्रॅटर्जीक बॉम्बर हे कोणत्याही देशाकडे असणं हे त्या देशाच युद्धात एक पाऊल पुढे असते हे इतिहास सांगतो.
गेल्या काही महिन्यात चीन ने भारताच्या सरहद्दीजवळ तिबेट मधे त्यांची एच ६ नावाची स्ट्रॅटर्जीक बॉम्बर तैनात केली. वर सांगितलं तसं स्ट्रॅटर्जीक बॉम्बर हे आपल्यासोबत प्रचंड प्रमाणात बॉम्ब, मिसाईल, आण्विक मिसाईल घेऊन शत्रू देशात अगदी खोलवर जाऊ शकते. चीन च्या या स्ट्रॅटर्जीक बॉम्बर ची क्षमता ३५०० किलोमीटर अंतराची आहे. ज्यात संपूर्ण भारत येतो. भारताची सगळी महत्वाची शहरे, आस्थापने, सैनिकी आणि गोपनीय संस्था याच्या टप्यात येतात. त्यामुळेच भारतावर मानसिक दबाव निर्माण करण्याचा चीन ने प्रयत्न केलेला आहे. भारताची डोकेदुखी एच ६ नसून २०२५ ला येणारं एच २० हे स्ट्रॅटर्जीक बॉम्बर आहे. हे स्ट्रॅटर्जीक बॉम्बर स्टेल्थ असणार आहे. याचा अर्थ रडार ने याचा शोध घेणं जवळपास अशक्य आहे. याची क्षमता ४५ टन वजनाचे बॉम्ब आणि ८५०० किलोमीटर पर्यंत अंतर कापण्याची असणार आहे. त्यामुळेच भारताला त्याच्या तोडीस तोड उत्तर शोधण्याची गरज भासत आहे. चीन च्या या मुजोरीला टक्कर द्यायची असेल तर भारताकडे ही तितकच ताकद असलेलं स्ट्रॅटर्जीक बॉम्बर असणं ही काळाची गरज आहे. त्याच उत्तर आहे 'सफेद हंस'.
सफेद हंस म्हणजेच रशियाचे टुपोलेव टीयु १६० हे जगातील सध्या कार्यरत असलेले सगळ्यात भरवशाचे, सगळ्यात शक्तिवान आणि विध्वंसकारी स्ट्रॅटर्जीक बॉम्बर आहे. १६ डिसेंबर १९८१ साली या बॉम्बर ने सर्वप्रथम उड्डाण केलं. ५६ मीटर चे पंख, स्वतःच १,१०,००० किलोग्रॅम वजन घेऊन आणि आपल्या सोबत तब्बल ४५,००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब, मिसाईल, आण्विक मिसाईल घेऊन ४०,००० फुटापेक्षा (जास्तीत जास्त ५२,००० फुटाची उंची हे विमान गाठू शकते.) जास्त उंचीवरून मॅक २ ( २२२० किलोमीटर / तास) इतक्या प्रचंड वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. याची ४ समरा एन के ३१ टर्बोफॅन इंजिन इतकं बल निर्माण करतात जे आजवर कोणत्याच विमानाला जमलेलं नाही. याची क्षमता तब्बल १२००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर एका उड्डाणात कापण्याची आहे. ( हवेतल्या हवेत इंधन भरून. इंधन न भरता साधारण ८५०० किलोमीटर). टुपोलेव टीयु १६० हे जगातील सगळ्यात शक्तिशाली स्ट्रॅटर्जीक बॉम्बर आहे. अमेरिकेचं बी २ स्पिरिट सुद्धा यापुढे एक छोटं पिल्लू वाटते. त्यामुळेच अमेरिका सुद्धा या सफेद हंसाला घाबरून आहे. रशिया कडे सध्या फक्त १७ अशी टुपोलेव टीयु १६० स्ट्रॅटर्जीक बॉम्बर आहेत. रशिया -युक्रेन युद्धात युक्रेन च्या शहरांवर हल्ला करण्याची जबाबदारी याच विमानांनी समर्थपणे पार पाडलेली आहे. रशियाने आपलं सगळ्यात मोठं ऍसेट आजवर कोणत्याच देशाला विकलेलं नाही. पण भारतासाठी सगळे नियम बाजूला ठेवत रशियाने टुपोलेव टीयु १६० साठी संमती दिल्याचं सांगितलं जाते.
एकट्या अमेरिकेने स्ट्रॅटर्जीक बॉम्बर ची निर्मिती करण्यासाठी आजवर १०० बिलियन अमेरिकन डॉलर मोजलेले आहेत. यावरून आपण समजू शकतो की एखाद्या देशाकडे ज्याला अमेरिका पण घाबरते असं स्ट्रॅटर्जीक बॉम्बर असेल तर त्या देशाच्या संरक्षण क्षमतेत आणि मानसिक कणखरतेत किती वाढ होईल. रशियाच्या एका टुपोलेव टीयु १६० ची किंमत साधारण २७० मिलियन डॉलर आहे. चीन च्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत मागच्या दाराने वाटाघाटी करत असल्याच्या चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर सुरु आहेत. भारताने जर रशियाकडून हे स्ट्रॅटर्जीक बॉम्बर घेण्याचा करार केला तर तो चीनसाठी एक शह ठरणार आहे तर अमेरिकेसाठी एक धक्का असेल. टुपोलेव टीयु १६० स्ट्रॅटर्जीक बॉम्बर येण्याने हिंद महासागरावरील भारताचं वर्चस्व कित्येक पटीने वाढणार आहे. आंतराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन न करता पण भारत संपूर्ण मलाक्का स्ट्रीट, हिंद महासागर अश्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी या बॉम्बरमुळे शत्रूच्या आत खोलवर हल्ला करण्यास सक्षम असणार आहे.
भारताकडे सुखोई, राफेल, तेजस सारखी लढाऊ विमान असताना एखाद्या स्ट्रॅटर्जीक बॉम्बरसाठी आपण इतके पैसे का मोजायचे. ही लढाऊ विमान कितीही सक्षम असली तरी ते किती मिसाईल घेऊन उडू शकतात यावर मर्यादा आहे. राफेल सारख्या विमानात १४ हार्ड पॉईंट आहेत. पण एखाद्या मिसाईल च वजन लक्षात घेतलं तर ब्राह्मोस सारखं एक किंवा अस्त्र सारखी १०-१२ मिसाईल घेऊन ते उड्डाण भरू शकते. लक्षात घ्या ब्राह्मोस मिसाईल च वजन हे ३ टन असते. जवळपास १५ ब्राह्मोस एकसाथ घेऊन किंवा तब्बल २९० पेक्षा जास्ती अस्त्र मिसाईल घेऊन उड्डाण भरण्याची क्षमता या स्ट्रॅटर्जीक बॉम्बर ची असणार आहे. आता फरक स्पष्ट झाला असेल की जिकडे राफेल एकावेळी फारफार तर एखाद ब्राह्मोस किंवा नुक्लिअर मिसाईल डागू शकते तिकडे टुपोलेव टीयु १६० स्ट्रॅटर्जीक बॉम्बर अक्षरशः बॉम्ब चा वर्षाव शत्रू देशावर करू शकते. एकाचवेळी १० ब्राह्मोस जेव्हा शत्रूवर हमला करतील तेव्हा त्याला उफ करायला पण वेळ मिळणार नाही. ही क्षमता जेव्हा हिंद महासागरात भारताकडे असेल तेव्हा चीन सारखा सत्तापिपासू देश त्यापासून चार हात लांब राहील हे उघड आहे.
टुपोलेव टीयु १६० स्ट्रॅटर्जीक बॉम्बर हे आकाशातील एक चालता फिरता यमदूत आहे. याचा आकार एखाद्या हवेत उडणाऱ्या हंसासारखा आहे. याचे पंख हे ब्लेंडेड विंग प्रोफाइल ने बनवले गेले आहेत. याचा अर्थ पंख आणि विमानाची बॉडी यात फरक नाही ते एकसंध आहेत. याचा रंग देखील सफेद आहे. त्यामुळेच त्याला व्हाईट स्वान किंवा सफेद हंस असं म्हंटल जाते. हे विमान अतिशय अद्यावत असून फ्लाय बाय वायर सिस्टीम ने उडते. हे विमान उडवण्यासाठी तब्बल ४ वैमानिक लागतात. आपल्यासोबत १३० टन वजनाचं इंधन घेऊन हे उड्डाण भरते. जेव्हा हे हवेत असते तेव्हा शत्रू सुद्धा आपली सगळी अस्त्र कपाटात गुंडाळून ठेवतो. कारण हे विमान कधी, केव्हा, कुठून बॉम्ब टाकेल याचा मागमूस लागत नाही. ते कळते तोपर्यंत ते दूरवर निघून गेलेलं असते. भारत ही विमान घेण्याच्या विचारात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जर हा करार भारत आणि रशिया यांच्यात झाला तर तो भारतासाठी खूप महत्वाचा असेल. एस ४०० च्या वेळी अमेरिकेने भारताला कॅटसा करारातून सूट दिल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पण टुपोलेव टीयु १६० स्ट्रॅटर्जीक बॉम्बर च्या खरेदी करारा नंतर कॅटसा लावण्यापासून अमेरिका मागे हटणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारत यापुढे सफेद हंसासाठी काय चाल खेळतो ते बघणं रोमांचकारी असेल.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment