'युआन वांग' जहाजाची गोष्ट... विनीत वर्तक ©
१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी चीन च युआन वांग ५ हे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झालं. श्रीलंकेत पोहोचण्या आधीच हे जहाज वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. भारताने अधिकृतरित्या या जहाजाला श्रीलंकेच्या बंदरात येण्यासाठी मान्यता द्यायला तीव्र नापसंती व्यक्त केली होती. भारताशिवाय अमेरिकेने ही चीन च्या या जहाजाला श्रीलंकेत थांबा देण्यासाठी नापसंती व्यक्त केली होती. श्रीलंका आर्थिक संकटात चाचपडत असताना भारत हा एकमेव देश होता ज्याने त्याची मदत केली. मग असं असताना भारताचा विरोध डावलून श्रीलंकेने या जहाजाला आपल्या देशात यायला का मान्यता दिली? नक्की या जहाजात काय आहे? चीन च यामागे राजकारण काय आहे? भारतासाठी ही धोक्याची घंटा का आहे? एकूणच भारताने या स्थितीत काय करायला हवं? किंवा काय केलं असेल? या प्रश्नांची उपापोह आपण सामान्य भारतीय म्हणून करायला हवा.
'युआन वांग' या चिनी शब्दाचा अर्थ होतो 'दुरदृष्टी'. आता नावावरून लक्षात आलं असेल की असं जहाज जे खूप दूरवर बघू शकते. चीन ने या सिरीज मधली ७ जहाज आत्तापर्यंत बांधली आहेत. त्यातील ४ अजून कार्यरत आहेत तर २ निवृत्त झाली आहेत तर १ टार्गेट बनून नष्ट झालेलं आहे. तर ही जहाज पाण्यावर चालणारी गुप्तहेर आहेत. चीन जरी ही जहाज प्रयोगशाळा आहेत असं म्हणत असला तरी चीन च्या कोणत्याच शब्दावर कोणाचाच विश्वास नसतो. तर चीन च युआन वांग ५ या जहाजावर ऑप्टिकल, लेझर, रडार आणि सर्व प्रकारच्या लहरी पकडण्याची क्षमता आहे. ही जहाज मुळातच त्याच कामासाठी बनवली गेली आहेत. ही जहाज बनवण्या मागचा उद्देश उपग्रह उड्डाण, बॅलेस्टिक मिसाईल, रॉकेट उड्डाण यांचा अभ्यास करून त्यातील तांत्रिक बाजू चीन च्या सेनेला पुरवणं आहे. याची क्षमता साधारण ७५० ते ८०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अश्या गोष्टींचा शोध लावून त्यातील तांत्रिक बाजूचं विश्लेषण करण्याची आहे. या तांत्रिक बाबी जर चीन च्या सैन्याच्या हाती लागल्या तर त्या कोणत्याही देशाचं मिसाईल, रॉकेट अथवा इतर गुप्त गोष्टीचा उलगडा करू शकण्यात सक्षम असतील.
चीन आता साऊथ चायना सी नंतर हिंद महासागरात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्याच्या या प्रयत्नांत सगळ्यात मोठा अडसर भारतीय नौदलाचा आहे. तसेच भारत ज्या वेगाने मिसाईल तंत्रज्ञानात प्रगती करतो आहे त्यामुळे चीन धास्तावलेला नसला तरी सावध आहे. चीन ची डोकेदुखी भारत नाही तर भारत साऊथ इस्ट एशिया मधील छोट्या देशांना आपलं मिसाईल तंत्रज्ञान उपलब्ध करून देतो आहे ती आहे. कारण साऊथ चायना सी मधील चीन च्या एकछत्री अंमलाला आव्हान देण्याची ताकद या देशांकडे निर्माण होते आहे. त्यासाठीच चीन ने भारताच्या मिसाईल, रॉकेट तंत्रज्ञानातील क्लिष्ट गोष्टींचा उलगडा करण्यासाठी श्रीलंकेच्या असहायतेचा फायदा घेतला आहे. २०१७ साली आर्थिक दलदलीत रुतलेल्या श्रीलंकेच्या सरकारने त्यांच हंबनटोटा हे बंदर ९९ वर्षासाठी चीन ला भाड्याने दिलं. आता याचा अर्थ होतो की तात्विक दृष्ट्या चीन या बंदरात कोणतही जहाज आणू शकतो किंवा उभं करू शकतो. एखाद्या देशाच्या सार्वभौत्मासाठी ही गोष्ट अतिशय धोकादायक असली तरी चीन युनायटेड नेशन किंवा आंतरराष्ट्रीय लवाद, आदेश यांना भीक घालत नाही. तो एखाद्या सावकारासारखा आहे. ज्याला बाकीचे काय विचार करतात याने काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी त्याचा फायदा हा सर्वोतोपरी असतो.
चीन च हे हेरगिरी करणार जहाज भारताच्या इतक्या जवळ येणार हे ऐकल्यावर भारताने यावर आक्षेप घेतला होता. याला कारण जहाज जरी हंबनटोटा बंदरात असलं तरी त्याची क्षमता ८०० किलोमीटर लांबवर बघण्याची आहे. या क्षेत्रात भारताचे दोन महत्वाचे आण्विक प्रकल्प, इसरो च प्रक्षेपण स्थान म्हणजेच श्रीहरीकोटा आणि त्याच सोबत भारताचं कलाम बेट ज्यावरून भारत आपल्या सर्व मिसाईल च्या चाचण्या करतो ते या जहाजाच्या दृष्टीक्षेपात येते. भारतातील अश्या गुप्त आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती चीनच्या सेनेपर्यंत पोहचणे भारतासाठी धोक्याची घंटा होती. भारताने राजनैतिक दबाव टाकला तरी जहाजाला तिकडे येऊ द्यायचं का नाही हा निर्णय श्रीलंकेच्या हातात नव्हताच. श्रीलंका आधीच सगळं चीन ला विकून बसली आहे. त्यामुळे श्रीलंका प्रत्यक्षात किती विरोध करतो यावर मर्यादा येतात. तुम्ही एखादा भाडेकरू ठेवला तर तुम्ही फारफार तर जास्त पाहुणे घरत चालणार नाहीत असं सांगू शकता पण त्याने कोणाला बोलवावं किंवा कोणी त्याच्या घरात प्रवेश करावा हे तुम्ही ठरवू शकत नाहीत. हीच वस्तुस्थिती श्रीलंकेची होती. भारताच्या दबावाखाली श्रीलंकेने आधी या जहाजाला मान्यता नाकारली पण जेव्हा चीन ने करारातील अटी स्पष्ट केल्या तेव्हा श्रीलंका आणि तिथलं सरकार हे त्यांच्यापुढे सपशेल हतबल होतं. त्या जहाजाला रेड कार्पेट वेलकम करण्याशिवाय श्रीलंकेपुढे कोणताच पर्याय नव्हता.
भारताला याची आधीच कल्पना होती. जेवढा शक्य असेल तितका विरोध भारताने या जहाजाला केला आणि शक्य तेवढी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी याला जाणून बुजून दिली. हा पण भारताने खेळलेल्या चालीचा एक भाग होता. हे जहाज भारतासह इतर अनेक देशांच्या रडारवर त्यामुळे आलं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह इतर अनेक देशांच्या रडारवर आलं. यामुळे एक फायदा झाला की हे जहाज हंबनटोटा बंदरात नक्की काय करणार आहे यावर लक्ष ठेवायला अनेक देश सज्ज झालं. भारताला याचा फायदा हा झाला की एखादी माहिती भारताकडून निसटली अथवा कळली नसेल तर हे देश देखरेख करत असल्यामुळे माहितीच आदान प्रदान केलं जाऊ शकते. चीनला ही चाल गुप्तपणे खेळायची होती पण भारताने याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी देऊन चीन चा खरा चेहरा समोर आणला. अश्या मिशन मधे गुप्तता किंवा सरप्राईज हा भाग अतिशय महत्वाचा असतो. पण भारताने नेमका हाच भाग त्यातून काढून घेतला. भारताने आपल्या सर्व महत्वपूर्ण संस्थांना आधीच याची माहिती दिली. काय खबरदारी घ्यायची काय टाळायचं याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कमीत कमी किंवा चुकीची माहिती जास्तीत जास्त चीन च्या जहाजाला मिळेल अशी यंत्रणा कार्यंवित करण्यात आली. भारताचे हेरगिरी करणारे उपग्रह अवकाशातून या जहाजाकडे वळवण्यात आले. त्यामुळे चीन च युआन वांग मिशन हे जवळपास फेल झाल्यात जमा आहे.
२२ ऑगस्ट २०२२ ला आपला ७ दिवसांचा हंबनटोटा बंदरातील मुक्काम आवरता घेत हे जहाज पुन्हा चीनकडे रवाना झालं आहे. एकूणच चीन ला जे यातून मिळवायचं होतं त्यात त्याला सध्यातरी अपयश आलं आहे हे स्पष्ट आहे. पण भारतासाठी धोका टळलेला नाही. भारताला चीनच्या अश्या पावलांकडे बारीक नजर ठेवावी लागणार आहे. यापुढे ही चीन युआन वांग श्रीलंकेच्या बंदरात आणत राहणार हे स्पष्ट आहे. त्याला भारत अडवू शकत नाही. पण ती जहाज इकडे असताना आपली सुरक्षा कशी करायची यावर पावलं टाकू शकतो. चीन ने आपल्या चालीची सुरवात तब्बल २० वर्षापूर्वी केली होती. जेव्हा हंबनटोटा हे बंदर विकसित करण्याच्या नावाखाली श्रीलंकेला आपल्या जाळ्यात त्यांनी ओढलं. त्यामुळेच भारताला ही पकाळाची पावलं ओळखून पुढे जावं लागणार आहे.
भारताने श्रीलंकेने विरुद्ध पाऊल टाकलं असताना सुद्धा १५ ऑगस्ट २०२२ ला भारतीय नौसेनेचे एक डॉर्निअर विमान श्रीलंकेला दोन वर्षासाठी फुकट दिलं आहे. आता कोणी म्हणेल की आपल्या पाठीत खंजीर खुपसून चीनच्या जहाजाला मान्यता देणाऱ्या श्रीलंकेला का मदत करायची? तर ही वेळ नाही मैत्रीची परीक्षा घ्यायची. श्रीलंका सध्या पूर्णपणे असहाय आहे. भारताने मदत केली नाही केली तरी चीनला श्रीलंकेच्या बंदरावर जहाज आणण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. विचार करा आपणही श्रीलंकेला वाळीत टाकलं तर श्रीलंका अजून जास्ती चीन च्या गोटात जाईल. चीन अजून याचा जास्ती फायदा घेईल. भारताला ते अजिबात परवडणारं नाही. लक्षात घ्या आजच्या दिवसाची फळे चाखायला चीन ने २० वर्षापूर्वी पावलं टाकली होती. आपल्याला जर श्रीलंकेला भविष्यात आपल्या सोबत ठेवायचं असेल तर आत्तापासून त्यावर काम करायला लागणार आहे. भले त्याची फळ आत्ता मिळणार नाहीत किंवा भविष्यात किती मिळतील ये आज कोणी सांगू शकत नसलं तरी भारताच्या शब्दाखातर का होईना श्रीलंकेने चीन च्या जहाजाला सहजासहजी आपल्या बंदरात येऊ दिलं नाही हे पण भारतासाठी दिलासादायक आहे. गोष्टी बदलायला वेळ लागतो. चीन च हे पाऊल जे २० वर्षापूर्वी भारतीय राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं असतं तर कदाचित परिस्थिती इतकी गंभीर आज झाली नसती हे वास्तव आहे.
तर ही आहे युआन वांग जहाजाची गोष्ट. जे आता चिंचोके घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेलं आहे. पण ते पुन्हा जेव्हा कधी येईल तेव्हा आपण आजच्या पेक्षा जास्ती सजग असलं पाहिजे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment