-५० ते ५० डिग्री सेल्सिअस मधील ३००० मीटर चा प्रवास... विनीत वर्तक ©
परिस्थिती माणसाला घडवते असं म्हणतात. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा तुम्हाला तिच्याशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतात. त्यातूनच मग आपलं कणखर व्यक्तिमत्व घडत जाते. हीच गोष्ट आहे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या 'अविनाश साबळे' याची. १९९४ पासून २८ वर्ष सलग कॉमनवेल्थ स्पर्धेच्या स्टीपलचेजर या प्रकारातील तिन्ही पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या केनिया च्या स्पर्धकांना महाराष्ट्रातील एका दुष्काळ ग्रस्त गावातील आणि भारतीय सेनेतील हवालदार पदावर असणाऱ्या एका सैनिकाने धूळ चारत त्यांच वर्चस्व मोडीत काढलं आहे. अविनाश साबळे याने कॉमनवेल्थ स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेजर स्पर्धेत जिंकलेलं रोप्य पदक हे यासाठी महत्वाचं नाही की त्याने ते जिंकलं आहे. तर ते यासाठी महत्वाचं आहे की या प्रकारात असलेलं केनिया या राष्ट्राचं वर्चस्व मोडून काढलं आहे. जे गेल्या २८ वर्षात ५६ देशातील एकाही खेळाडूला जमलेलं नाही.
अविनाश साबळे चा ३००० मीटर चा प्रवास सुरु होतो तो शाळेपासून. १३ सप्टेंबर १९९४ साली एका साधारण शेतकरी कुटुंबात अविनाश साबळे चा जन्म झाला. त्याच्या गावापासून शाळा ६ किलोमीटर लांब होती. महाराष्ट्रातील गावागावात पोहचलेली लाल परी त्याच्या गावात मात्र पोहचलेली नव्हती. त्यामुळे सहाजिक अविनाश दररोज १२ किलोमीटर अंतर धावत पार करत होता. पण तरीही मनात त्याकाळी धावण्याचा वेड वगरे काही शिवलेलं नव्हतं. परिस्थिती पुढे नाईलाज होता. त्याला आपल्या आई वडिलांचे कष्ट दिसत होते. कसही करून त्यांना आर्थिक हातभार लावता येईल हेच त्याच्या मनात होतं. १२ वी पास झाल्यावर त्याने भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी अर्ज केला. भारतीय सेनेच्या सर्व चाचण्या उत्तीर्ण करून त्याचा भारतीय सेनेच्या ५ महार रेजिमेंट मधे समावेश झाला. भारतीय सेनेत दाखल झाल्या झाल्या त्याला भारताच्या सीमांच रक्षण करण्यासाठी जगातील सगळ्यात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशिअर वर नियुक्ती करण्यात आली.
बीड सारख्या दुष्काळ ग्रस्त गावातील कधीही बर्फ न पाहिलेला एक साधा मुलगा अचानक उणे ५० डिग्री सेल्सिअस मधे निसर्गाच्या सगळ्यात प्रतिकूल असणाऱ्या भागात जाऊन पोहचला होता. तब्बल २ वर्ष सियाचीन ग्लेशिअर मधे भारताच्या सीमांच रक्षण केल्यानंतर त्याची नियुक्ती राजस्थान मधल्या वाळवंटात करण्यात आली. उणे ५० डिग्री मधे देश रक्षण करणारा हवालदार अविनाश साबळे आता ५० डिग्री सेल्सिअस तपमान असणाऱ्या वाळवंटात भारतीय सीमांचे रक्षण करत होता. निसर्गाच्या दोन्ही प्रतिकूल असणाऱ्या वातावरणात देशसेवा केल्यामुळे अविनाश साबळे शरीराने आणि मनाने कणखर झाला. इकडेच त्याला धावण्याची गोडी लागली. भारतीय सेनेतील काही स्पर्धेत भाग घेतल्यानंतर अविनाश साबळे ला दुखापत झाली. २०१६ साली त्याची नियुक्ती सिक्कीम इकडे झाली. सुटलेला धावण्याचा सराव आणि झालेली दुखापत यामुळे त्याच वजन अचानक ७६ किलोग्रॅम पलीकडे गेलं. सगळ्यांनी त्याला आळशी म्हणून हिणवायला सुरवात केली. तू आयुष्यात पुन्हा कधी धावूच शकत नाही अशी अविनाश साबळे ची अवहेलना झाली. कुठेतरी या गोष्टींनी दुखावलेल्या अविनाश ने आपल्या कृतीतून त्या सर्वांचं तोंड बंद करण्याचा चंग बांधला. तिकडून सुरु झाला एक नवीन प्रवास.
२०१७ पर्यंत त्याने आपलं वजन कमी करत ५९ किलोग्रॅम पर्यंत आणलं. आपल्या कणखर मानसोबत त्याने सरावाने पुन्हा एकदा शरीराला कणखर बनवलं. एका स्पर्धेच्या दरम्यान भारतीय सेनेतील लांब उडीचे कोच अमरीश कुमार यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला स्टीपलचेजर या प्रकारात धावण्याचा सल्ला दिला. त्याच ट्रेनिंग सुरु झालं. त्या नंतर अविनाश साबळे ने मागे बघितलं नाही. अर्थात हा प्रवास सोप्पा नव्हता. तत्कालीन राष्ट्रीय कोच निकोलाय सेंसारोव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असताना पुन्हा एकदा दुखापत झाली. निकोलाय एक अतिशय कडक प्रशिक्षक होते. सुरवातीला अविनाश ला त्यांचा खूप मानसिक ताण आला पण त्याला कळून चुकलं की निकोलाय आपल्या क्षमतांना एक पायरी वर नेत आहेत. हे उमजल्यानंतर त्याच आणि निकोलाय यांच एक घट्ट नातं तयार झालं. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. निकोलाय यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर अविनाश च्या प्रगतीला खीळ बसली. त्याने पुन्हा एकदा भारतीय कोच अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली धावायला सुरवात केली.
२०१९ साली विश्व चैंपियनशिप स्पर्धेत रोप्य पदक आणि सलग दोन वेळा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम त्याने मोडला. २०२० साली दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ६१ मिनिटापेक्षा कमी वेळ त्याने नोंदवली. ६१ मिनिटापेक्षा कमी वेळात मॅरेथॉन धावणारा अविनाश साबळे हा भारतातील एकमेव धावपटू आहे. २०२२ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला अमेरिकेला पाठवण्यात आलं. गेले ४ महिने तिकडे कसून सराव केल्यानंतर अविनाश साबळे ने कॉमनवेल्थ स्पर्धेत इतिहास घडवताना भारताचा तिरंगा उंचावर फडकवला आहे. त्याच सुवर्ण पदक अवघे ०.०५ सेकंदाने हुकलं. जर शर्यतीत अजून काही मीटर असते तर त्याने ते नक्की जिंकलं असतं . केनिया च प्रस्थापित वर्चस्व अविनाश साबळे या मराठी तरुणाने मोडलं आहे. भारताच्या राष्ट्रपती, पंतप्रधान या सोबत इतर अनेक मान्यवरांनी त्याच यासाठी कौतुक केलं आहे.
गेल्या काही वर्षात खेळाच्या क्षितिजावर तिरंग्याचा उदय झाला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. क्रिकेट खेळ सोडून भारतीयांनी इतर खेळांकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. अर्थात याच सर्व श्रेय खेळाडूंचं असलं तरी त्यासाठी भारत सरकारने बदललेल्या खेळांच्या धोरणाचा ही खारीचा वाटा आहे. गेले ४ महिने अमेरिकेत घेतलेल्या प्रशिक्षण आणि कोच यामुळे अविनाश साबळे च्या धावण्याला एक वेगळीच धार आलेली आहे. अतिशय साध्या शेतकरी कुटुंबातील अविनाश साबळे ने आज उंच गगनभरारी घेतली आहे. पण त्याच्यासाठी आजही भारतीय सेनेचा आदेश आणि भारताच्या रक्षण सगळ्यात पाहिलं कर्तव्य आहे. तो म्हणतो,
“If army asks I will go back. That is my duty. But till then I want to do this and make the army proud.”
अविनाश साबळे चा -५० ते ५० डिग्री सेल्सिअस मधील ३००० मीटर चा प्रवास हा सगळ्या भारतीयांना प्रेरणा देणारा आहे. अविनाश च्या मते ही सुरवात आहे. आता लक्ष्य २०२४ साली पॅरीस इकडे होणारी ऑलम्पिक स्पर्धा आहे. त्याच्या पुढल्या प्रवासाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक भारतीयाला आणि मराठी माणसाला तुझा अभिमान आहे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment