#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ६) 'सेहमत खान'... विनीत वर्तक ©
आय.एन. एस. विक्रांत युद्धनौका भारतासाठी अतिशय महत्वाची होती. १६,००० टन पाण्याचं विस्थापन करणारी २१० मीटर लांब आणि २२,००० किलोमीटर च अंतर कापण्यास सक्षम असलेली युद्धनौका शत्रूच्या रडारवर सगळ्यात अग्रणी होती. १९७१ च्या युद्धात आय.एन.एस. विक्रांत ने गाजवलेला पराक्रम पाकिस्तान च्या जिव्हारी लागलेला होता. त्यामुळेच आय.एन.एस. विक्रांत पाकिस्तान च्या डोळ्यात खुपत होती. भारताच्या युद्धनौकेला जर नुकसान केलं तर आपल्या जखमांवर कुठेतरी थोडी फुंकर घातली जाईल अशी आशा पाकिस्तान ला वाटत होती. त्याचसाठी आय.एन.एस. विक्रांत ला पाण्यात डुबवण्याची योजना करून भारताला जखमी करण्याची व्युव्हरचना पाकिस्तान आखत होता. पण त्याच्या गावी ही नव्हते की भारताची पडद्यामागची एक सूत्रधार त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार आहे.
१९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तान च्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी भारताच्या रॉ ने अनेक गुप्तचर पाकिस्तान मधे पेरले होते. त्यात होती एक 'सेहमत खान'( हे नाव तिच्यावर पुस्तक लिहणाऱ्या हरिंदर सिक्का यांनी ठेवलं आहे. तिचं खरं नाव अजूनही भारतीयांपासून अलिप्त ठेवलं गेलं आहे.) सेहमत खान एक काश्मिरी मुसलमान मुलगी होती. तिच्या वडिलांचा काश्मीर मधे खूप मोठा धंदा होता. तिच्या वडिलांनी तिला १९७१ च्या वेळी भारतासाठी अशी कामगिरी करण्यासाठी उद्युक्त केलं. काश्मिरी मुसलमान असूनपण तिच्या वडिलांना भारताचा प्रचंड आदर होता आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या मुलीला देशासाठी जीवाची बाजी लावताना मागेपुढे बघितलं नाही. सेहमत खान च्या अंगात देशभक्ती च बाळकडू आपल्या वडिलांप्रमाणे होतं. वडिलांच्या आदेशानंतर तिने एका पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीशी लग्न करून पाकिस्तान मधे प्रवेश केला. तिथून ती भारताच्या रॉ (Research and Analysis Wing) ला अतिशय महत्वाचे धागेदोरे १९७१ च्या युद्धात कळवत राहिली. पाकिस्तानातील परिस्थिती बद्दल जुजबी माहिती देणं इतकच काम तिचं होतं. पण सेहमत जरी आता पाकिस्तानात असली तरी भारताचा तिरंगा तिच्या मनात नेहमीच फडकत होता.
१९७१ च्या त्या काळात सेहमत खान ला पाकिस्तान चे तत्कालीन राष्ट्रपती याहा खान यांच्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी नेमलं गेलं. भारताच्या रॉ ची गुप्तहेर असणारी सेहमत खान पाकिस्तान च्या राष्ट्रपती च्या घरात जाऊन पोहचली तरीसुद्धा पाकिस्तान च्या सुरक्षा यंत्रणांना याचा काहीच सुगावा लागला नव्हता. सेहमत खान एक साधी एजंट असल्याने ती कदाचित रडार वर नव्हती. तिला पाकिस्तान भारताचा बदला घेण्यासाठी शिजवत असलेल्या प्लॅन चा सुगावा लागला. हा प्लॅन होता भारताची युद्धनौका आय.एन.एस.विक्रांत नष्ट करण्याचा. आपल्या जीवाची पर्वा न करता तिने ही माहिती भारताच्या रॉ ला कळवली. पुढे जे घडलं तो इतिहास आहे. भारताने तातडीने हालचाली करून आय.एन.एस.विक्रांत ला सुरक्षित करून पाकिस्तान च्या सगळ्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. ह्याच आय.एन.एस. विक्रांत भारताने १९९७ साली निवृत्त केलं.
भारताच्या आय.एन.एस. विक्रांत ला कोणी वाचवलं असेल तर ती होती सेहमत खान. जिच्या अचूक माहितीमुळे भारताने युद्धाचं पारडं फिरवलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १९७१ च्या युद्धानंतर सेहमत खान वर दिलेली जबाबदारी संपली होती. तिला पुन्हा भारतात यायचं होतं पण या काळात ती गरोदर राहिली होती. रॉ ने तिला पुन्हा भारतात आणलं. भारतात आल्यावर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही सगळी घटना रॉ च्या फाईलींमध्ये आणि इतिहासाच्या पानात कित्येक वर्ष लुप्त झाली. पण तिचा तो गोंडस मुलगा पुढे आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय सैन्यात ऑफिसर झाला. आपल्या आईने गाजवलेलं कर्तृत्व त्याने ही कुठे समोर येऊ दिलं नाही. १९९९ पर्यंत पडद्यामागील या सूत्रधाराचा सुगावा कोणालाच नव्हता. कारगिल युद्धाच्या वेळी हरविंदर सिक्का हे कारगिल मधे जाऊन तिथल्या घडामोडींवर लिहत होते. त्यात त्यांनी भारताच्या गुप्तचर संघटनेवर ताशेरे ओढले. कारगिल मधे इतकी घुसखोरी होणं हे भारताच्या गुप्तचर संघटनांचे अपयश होतं. त्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या देशभक्तीवर ही प्रश्नचिन्ह उभं केलं. अश्याच एका वेळी एक तरुण अधिकारी पुढे आला आणि त्यांनी देशभक्ती किंवा रॉ च्या एका यशाची ओळख हरविंदर सिक्का यांना करून दिली.
याच भारतीय सेनेच्या ऑफिसर ने आपल्या आईच्या म्हणजेच सेहमत खान च्या पराक्रमाची गोष्ट त्यांना सांगितली. त्यांच नाव जगापुढे येणं हे त्यांच्या जिवाला धोका होता. त्यामुळेच कमालीची गुप्तता या गोष्टी समोर आणताना बाळगली गेली. तब्बल ८ वर्ष सिक्का ही गोष्ट जगापुढे योग्य पद्धतीने आणण्यासाठी काम करत होते. याच घटनेवर त्यांनी 'कॉलिंग सेहमत' हे पुस्तक छापलं. त्यानंतर याच पुस्तकावर आधारित 'राझी' नावाचा हिंदी चित्रपट आला. सेहमत खान हे नाव जरी अनेकांना कळालं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे राहीलं.
आपल्या प्राणाची बाजी देशासाठी लावणारी सेहमत खान खरी देशभक्त होती. आपल्या इतक्या मोठ्या त्यागानंतर तिची फक्त एकच इच्छा होती,
'भारताच्या तिरंग्याचं अनावरण मला माझ्या घरात रोज करायचं आहे. त्याच पूजन करायचं आहे'...
भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तत्वाप्रमाणे त्याच अनावरण घरात करता येत नाही. पण सेहमत खान रोज न चुकता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनधिकृतरित्या का होइना पण आपल्या घरात तिरंग्याच पूजन रोज करत होती. आजही सेहमत खान हे नाव अनेकांना माहित असलं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे गुप्त राहिलेलं आहे.
पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षितेत महत्वाची भूमिका बजावणारी पडद्यामागची सूत्रधार सेहमत खान च्या कार्याला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या देशभक्ती ला माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही पडद्यामागे राहून देशासाठी जे काही केलं त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल आणि त्यासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे.
सेहमत खान यांच्या आयुष्याचा प्रवास वाचून मला काही ओळी आठवल्या,
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिन्दी हैं हम, वतन है हिन्दोस्तां हमारा...
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्तां हमारा...
जय हिंद!!!...
क्रमशः
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.