तो जीवघेणा क्षण... विनीत वर्तक ©
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी तो जीवघेणा क्षण येतोच. जेव्हा आजूबाजूचं सगळच निरर्थक वाटायला लागते. आजवर जे आयुष्य जगलो, आजवर जे कमावलं मग तो पैसा, पद, प्रतिष्ठा काहीही असो सगळ्याची किंमत ही शून्य वाटायला लागते. कुठून आलो, कुठे जाणार असे प्रश्न मनाचा ठाव घेतात आणि भविष्यकाळ अंधारमय किंबहुना येणारा क्षण सुद्धा नकोस होतो तो एक क्षण कधीतरी जीवघेणा ठरतो. प्रत्येकाच्या मनात कशाची टोचणी आहे ह्याचा ठाव कोणीच घेऊ शकत नाही. आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी द्यायची ताकद ठेवतात. मग ती कलाटणी आयुष्य घडवणारी असू शकते किंवा आयुष्य संपवणारी असू शकते.
मन हलकं करा, कोणाशी तरी बोला, शेअर करा हे सांगणं जितकं सोप्प असते तितकच ते करणं कठीण. जर प्रेम ठरवून होत नाही तर संवाद तरी ठरवून कसा होणार? प्रेम कधी कोणत्या वयात होऊ शकते तसं तो संवाद ही कोणत्याही वयात होऊ शकतो आणि जोवर तो होत नाही तोवर त्या टोचणाऱ्या क्षणांचे घाव आपणच परतवून लावायचे असतात. आयुष्यात पुढे गेल्यावर हे जीवघेणे क्षण खूप छोटे वाटतात. त्याकाळी आपण वेडे होतो, मूर्ख होतो किंवा कधी कधी आपलच आपल्याला हसायला येते पण खरच तसं असते का? कारण त्या क्षणांना त्याकाळी जर आपण परतवलं नसतं तर आज आपण आजचा दिवस बघू शकलो नसतो हे तितकच खरं असते.
सगळं असूनसुद्धा सगळं नसण्याची पोकळी जाणवू शकते. कधीतरी आयुष्यात अश्या घटना घडतात ज्या आपली गाडी रुळावरून खाली उतरवतात. पुढे घडत जाणाऱ्या अजून काही घटना ह्या घसरलेल्या गाडीला निराशेच्या खाईत न्यायला पुरेश्या असतात. अचानक आश्वासक वाटणारं आयुष्य एकदम भकास वाटू लागते. त्याचवेळी त्या तुटलेल्या झाडाला वाऱ्याची झुळूक सुद्धा पूर्णपणे उद्ववस्थ करू शकते. पण त्याचवेळी एखादी सर सुद्धा त्या भकास वाटणाऱ्या आयुष्यात नवचैतन्य आणू शकते. ती सर काहीही असू शकते अगदी एखादा अनपेक्षितपणे अनोळख्या व्यक्तीशी झालेला संवाद, भेट, स्पर्श, कॉल ते अगदी चित्रपट आणि संगीत सुद्धा. आयुष्यात कितीतरी वेळा असे जीवघेणे क्षण येतात. पण कडेलोट करणारा एखादाच असतो आणि त्याचवेळी गरज असते ती एका सरीची. त्यावेळी जर ती नाही जाणवली तर आयुष्य संपवणं हा पर्याय सोयीस्कर वाटतो किंबहुना तो एकच पर्याय समोर असतो. त्यावेळी जर ती सर नाही आली तर आयुष्य संपवण्याच्या त्या खोल गर्तेत आपण उडी घेतो पुन्हा कधी बाहेर न येण्यासाठी.
अशी उडी घेणारी माणसं खरच मनाने कमकुवत असतात का? मन कमकुवत का कठीण हे परिस्थिती ठरवतं असते. कठीण आणि संकटाच्या काळी पण आयुष्यात सरी असतील तर आपण कोणत्याही प्रसंगाला सामोर जाण्याच बळ मिळते पण जेव्हा त्याच नसतात तेव्हा म्हंटल तसं एक झुळूक पण सगळं उद्ववस्थ करू शकते. स्टेडियम मध्ये बसून समोरून येणार बॉल कसा खेळावा हे कोणीही सांगू शकते पण मैदानात उतरून जेव्हा समोरून बॉल येत असतो तेव्हा काय करायचं हा निर्णय हे त्या क्षण अनुभवणाऱ्या फलंदाजाने ठरवायचं असते. कारण आउट झाला किंवा सिक्सर लागली तरी दोन्ही गोष्टींची जबाबदारी त्यालाच उचलावी लागते. प्रेक्षक म्हणून आपण फक्त आपलं मत सांगून दुसऱ्या क्षणाला ते विसरून पण जातो.
तो जीवघेणा क्षण टाळता येऊ शकतो का? त्या सरी ला आपण निर्माण करू शकतो का? ह्याची उत्तर ज्याची त्याने शोधायची कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा तो जीवघेणा क्षण ही वेगळाच. आपल्या सरी आपण निर्माण करायच्या, ज्या त्या क्षणात आपल्याला साथ देतील, सोबत करतील. मग ती सर एखादी व्यक्ती असेल, गोष्ट असेल, चित्रपट अथवा संगीत असेल किंवा एखाद चित्र पण असेल. तो जीवघेणा क्षण येणाच्या अगोदर आपली वर्दी देतो ती ओळखता आली तर कदाचित त्याला सामोरं जाण्याची ताकद आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकू. त्यासाठी कोणतं जागतिक उत्तर नाही तर ते प्रत्येकाने स्वतः शोधायचं असते.
फोटो स्त्रोत:- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.