Monday, 9 August 2021

एका पाळीसाठी... विनीत वर्तक ©

 एका पाळीसाठी... विनीत वर्तक ©


सध्या महाराष्ट्रात स्थिती अशी आहे की सरकारमधील मंत्र्यांना, सरकारला काय काम करण्याची गरज आहे याच्या कानपिचक्या द्यावा लागतात. त्यामागील राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तर एक भयावह स्थिती समोर येते ज्याची दाहकता आपल्यासारख्या पुढारलेल्या, पुरोगामी असणाऱ्या, सहकार क्षेत्रात अव्वल असणाऱ्या मराठी मातीशी वचनबद्ध आणि त्याची अस्मिता जपणाऱ्या सुशिक्षित आणि प्रगल्भ लोकांच्या ध्यानीमनी नसते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्यांनी एका अशा स्थितीचा अहवाल समोर मांडला होता ज्याच्याकडे अजूनही तितकंसं लक्ष दिलं गेलं नाही. त्यांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राच्या एकट्या मराठवाड्यातील जवळपास ३०,००० स्त्रिया या आपलं गर्भाशय पैसे कमावण्यासाठी किंबहुना ऊस तोडणी कामगार म्हणून काम करण्यासाठी काढून टाकतात. अर्थात हा आकडा सरकारी आहे. जर याचा खरा अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या साखर कारखाने आणि ऊस लागवडीच्या पट्ट्यातील दरवर्षी जवळपास ५ लाख पेक्षा जास्ती स्त्रिया ऊस माफियांच्या भीतीने गर्भाशय काढून टाकतात.

ऊस तोडणी कामगार म्हणून जर काम करायचं असेल तर 'स्टार मार्क' करून पडद्यामागची अट असते की गर्भाशय काढून टाकण्याची. पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक त्रासापासून वाचण्यासाठी तसेच त्या काळात सुविधा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची तजवीज करण्याची तयारी नसल्याने महाराष्ट्रातील वैभवशाली सहकार क्षेत्रातल्या दिग्गजांच्या कृपेने खालच्या पातळीवर अश्या प्रकारे अमानुष खेळ खेळला जातो आहे. एखाद्या बाईला एक किंवा दोन मुलं झाली की सर्रास तिचं गर्भाशय काढून टाकण्यासाठी आणि पाळीची कटकट संपवण्यासाठी तिच्या नवऱ्याकडून आणि कुटुंबांकडून दबाव टाकला जातो. कारण प्रत्येक महिन्यात ते ४-५ दिवस कटकट सहन करण्याची तयारी ना तिच्या कुटुंबाची असते ना रोजंदारीवर काम देणाऱ्या त्या मालकाची. अर्धवट शिक्षण, पडद्यामागच्या झाकलेल्या गोष्टी यामुळे तिला तो निर्णय मान्य करण्याशिवावय पर्याय नसतो. कोणत्या तरी छोट्या मोठ्या डॉक्टरला पकडून मग अशी ऑपरेशन केली जातात. याचा खर्च ३० हजार ते ४० हजारच्या घरात जातो. अर्थात आधीच  कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या त्या कुटुंबावर हा अजून एक भार पडलेला असतो. त्या ४-५ दिवसांसाठी त्या बाईच्या आयुष्यासोबत आपण कोणता जीवघेणा खेळ खेळतो आहोत, याची फिकीर ना तिच्या नवऱ्याला असते ना तिच्या कुटुंबियांना ना त्या ऊस माफियांना.

मासिक पाळी असा विषय आहे ज्यावर अनेकवेळा अनेकांनी लिहीलं आहे. सोशल मिडीयावर तर सॅनिटरी पॅड ते कप यावर शब्द संपेपर्यंत चर्चा झाल्या आहेत. पण उपरोधिकपणाचा भाग असा आहे की सोशल मिडियावर शब्दांचे तारे तोडणारे केमिस्ट शॉप मधे जाऊन आजही व्हिस्परचा सॅनिटरी पॅक वृत्तपत्राच्या आतमध्ये गुंडाळून द्या म्हणून मागणी करतात. जिकडे सॅनिटरी पॅडच्या चळवळीवर निघालेला चित्रपट ३८ कोटी रुपयांचा धंदा करतो, तिकडे आज प्रमुख शहर आणि जिल्ह्याचे भाग सोडले तर सॅनिटरी पॅडच्या नावाखाली वापरलेले परकर, फाटलेले ब्लाउज, जुने झालेले कपडे आणि वेळप्रसंगी माती मासिक पाळीमध्ये सर्रास वापरली जाते. पॅड का कप यावर चर्चा करणारे आज या खऱ्या परिस्थितीपासून इतके अनभिज्ञ आहेत की त्याकडे मुद्दामहून डोळेझाक करतात असा प्रश्न अनेकदा मला पडतो. मध्यंतरी एका ग्रुपच्या माध्यमातून मुंबईच्या उपनगरी क्षेत्रात येणाऱ्या पण सगळ्या सुविधा आणि शिक्षणापासून लांब असणाऱ्या एका गावात सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा कर्यक्रम केला होता. त्यासाठी एकूणच सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या एका उद्योगासोबत त्यांच्या कामाची माहिती मिळाली. हा सगळा उद्योग या महिला चालवत होत्या. ब्रँडेडच्या जमान्यात त्यांनी बनवलेले वेगवेगळ्या पद्धतीचे सॅनिटरी पॅड हे जास्ती किफायतशीर वाटले. तसेच माझ्या कामासाठी त्यांनी अत्यंत कमी दरात आणि वेळेत ते उपलब्धही करून दिले. हे सगळं सांगण्यामागचं कारण इतकंच की फक्त व्हिस्पर किंवा स्टेफ्री पाळीच्या दिवसात काम करतात असं नाही तर असे अनेक लोकल ब्रँड आहेत ज्याचा प्रसार करण्याची आज गरज आहे.

काही वर्षांपूर्वी एड्स रोगाचा प्रसार शारिरीक संबंधांमधून होऊ नये यासाठी निरोधची जाहिरात केली जायची. निरोधची किंमत अवघी ५० पैसे त्याकाळी होती. अश्या पद्धतीने सॅनिटरी पॅडच्या किंमती आणि त्यांची उपलब्धता अगदी खेड्यातल्या खेड्यात करायला हवी. २०२० च्या लाल किल्यावरील भाषणात पंतप्रधानांनी सॅनिटरी पॅड संदर्भात काही घोषणा केल्या होत्या. स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल असणाऱ्या प्रश्नावरून लाल किल्ल्यावरून बोलणारे अर्थात ते पहिले पंतप्रधान होते पण अजूनही खालच्या पातळीवर त्याचे लाभ व्यवस्थितरित्या पोहोचलेले नाहीत. एकूणच मासिक पाळीबद्दल उदासीनता, त्यामागे असणारी पाप-पुण्य, लाज या सर्वांची भीती आणि समाजावर असणारा त्याचा पगडा. मासिक पाळीकडे एक अडचण म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आणि नैसर्गिक गोष्टींना काही तत्कालीन फायद्यांसाठी हरताळ फासण्याचा एकूणच खेळाला गेलेला डाव हे सगळं चित्र कुठेतरी अस्वस्थ करणारं आहे. जिकडे सुशिक्षितांच्या घरात सुद्धा मासिक पाळीत विलगीकरणाचे खेळ चालतात, तिकडे मुंबईच्या जवळ असणाऱ्या त्या भागात मला आलेला अनुभव तर त्याचं एक भयानक वास्तव समोर उभं करत होता.

आज मासिक पाळी सुरु होण्याचा काळ १२-१३ वर्षांवर आला आहे. अश्यावेळी खेड्यांमधलं आपण सोडून देऊ पण शहरात जर शाळेत एखाद्या मुलीला अचानक पाळी सुरू झाली तर सॅनिटरी पॅड उपलब्ध होण्याची काही सोय आहे का? शिक्षक-पालक मिटींगमध्ये किती पालकांनी अथवा पालक संघटनांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे? आणि ज्यावर कारवाई होऊन एखादं मशीन किंवा शाळेचा एखादा प्रतिनिधी जिच्याकडे मुली जाऊन अश्या वेळेस सॅनेटरी पॅडची मागणी करू शकतात हे नेमलं गेलं आहे. हा मुद्दा स्त्री शिक्षण, समानता, हक्क यांच्यावर लढणाऱ्या किती लोक प्रतिनिधींच्या धान्यात येतो. सॅनिटरी पॅडचं डिस्पोजल आणि एकूणच त्याला पर्यावरणाशी पूरक बनवणं ही पुढली पायरी आहे असं माझं मत आहे. मुळात १२ तास आणि २४ तास सुरक्षा देण्यासाठी ब्रँडेड सॅनिटरी पॅडच्या मधे वापरण्यात येणाऱ्या घातक केमिकलचा धोका आपल्याला आणि पर्यावरणाला सगळ्यात जास्ती आहे. सॅनेटरी पॅडची जागतिक वार्षिक उलाढाल ही तब्बल २६०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी २०२१ मध्ये असणार आहे. येत्या काळात प्रत्येकवर्षी ७% वाढ अपेक्षित आहे. हे सगळं बघता आपल्याकडे याचा प्रसार अतिशय मर्यादित आहे.

आज fibroids, cancers, endometriosis etc अश्या काही अडचणी उद्भवल्या तर गर्भाशय काढून टाकण्याचा मार्ग नाईलाजाने डॉक्टर सांगतात. पण याचा अर्थ पाळीची कटकट अथवा पैश्यासाठी किंवा सरसकट ओढाताण थांबवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय एकूणच अनेक स्त्रियांच्या अंगलट येऊ शकतो. ज्या पद्धतीने एकट्या महाराष्ट्रात ५ लाख स्त्रिया प्रत्येकवर्षी या जाळयात ओढल्या जात आहेत तर यावरून आपण देशाचा विचार केला तर तो आकडा किती प्रचंड असेल. सॅनिटरी पॅडचं शिक्षण आणि प्रसार हे कोण्या एका पॅडमॅन, सरकार किंवा योजनेचं काम नाही, त्याला एक चळवळ बनवून समाजातील सुशिक्षित आणि प्रगल्भ व्यक्तींनी आपल्या परीने योगदान देण्याची गरज आहे. हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नक्कीच नाही पण ज्या पद्धतीने एका पाळीसाठी स्त्रियांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जात आहे त्यावर आपण सर्व बाजूने काम करण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते.    

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday, 8 August 2021

एका भाल्याचा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका भाल्याचा प्रवास... विनीत वर्तक ©

७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि भारतीय नागरिक ऑलम्पिक पदकाचं एक स्वप्न बघत होते ज्याची पूर्तता काल नीरज ने आपल्या भाल्या ने केली. नक्कीच ही वेळ आनंद साजरा करायची आहे. नक्कीच ही वेळ नीरज च्या कामगिरीचं कौतुक करण्याची आहे. पण त्याच वेळी ही वेळ त्या भाल्याचा प्रवास समजून घेण्याची सुद्धा आहे. 

नीरज चोप्रा च्या भाल्याचा हा प्रवास सुरु होतो हरयाणा राज्यातील पानिपत जवळ असणाऱ्या खंडारा या गावापासून. साधारण ५०० लोकवस्ती असणाऱ्या या गावात नीरज च बालपण गेलं. अवघ्या १२ व्या वर्षी नीरज च वजन ९० किलोग्रॅम इतकं आभाळाला टेकलं होतं. त्याच्या स्थूलतेमुळे तो गावातील चेष्टेचा विषय बनत चालला होता आणि हेच कुठेतरी त्याच्या आई-वडिलांना खटकत होतं. त्यांनी छोट्या नीरज ला जिम मधे जाऊन व्यायाम करून वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण अवघी ५०० लोकवस्ती असणाऱ्या गावात कुठून आली जिम? नीरज जिम साठी ६ किलोमीटर लांब जिम मधे जायला लागला. तिकडेही आपल्या अवाढव्य वजनामुळे त्याची चेष्टा झाली आणि वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि वजने ही त्याला मिळत नव्हती. शेवटी कुटुंबाने त्याला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या पानिपत इथल्या सेंटर मधे जायला सांगितलं. इकडेच त्याची ओळख भाला फेक शिकवणाऱ्या जयवीर सिंग यांच्याशी झाली. कोणतंही प्रशिक्षण नसताना नीरज ने ४० मीटर भाला फेकून जयवीर सिंग यांच्यावर आपल्यातील प्रतिभेचा ठसा उमटवला. तिकडेच सुरु झाला एका भल्याचा प्रवास.... 

नीरज ने मग मागे वळून बघितलं नाही. आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने मेहनत घ्यायला सुरवात केली आणि भाला फेक या खेळाचे प्राथमिक धडे घ्यायला सुरवात केली. २०१६ मधे पोलंड इकडे झालेल्या अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावलं आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा तारा उदयास येत असल्याची वर्दी दिली. त्याच वर्षी साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक त्याने पटकावलं. १५ मे २०१६ रोजी त्याने भारतीय सेनेत प्रवेश केला. २०१७ साली एशियन एथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नीरज ने  जागतिक मंचावर आपल्या येण्याची वर्दी दिली. नोव्हेंबर २०१७ मधे भारत सरकारने भाला फेक स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंसाठी २०२० साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच महत्व लक्षात घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे कोच नेमण्याच ठरवलं. त्यांच नाव होतं 'उवे हान'. 

'उवे हान' हे नाव भाला फेक स्पर्धेत अतिशय मानाने घेतलं जाते. जर्मन असणाऱ्या हान नी या खेळात असा पराक्रम गाजवला आहे जो आजवर कोणालाही गाठता आलेला नाही. २० जुलै १९८४ रोजी हान यांनी तब्बल १०४.८० मीटर लांब भाला फेकून जागतिक विक्रम केलेला आहे जो कोणालाही आजवर मोडता आलेला नाही. किंबहुना जगाच्या पाठीवर १०० मीटर पेक्षा जास्त दूरवर भाला फेक करणारा अजून दुसरा कोणताही खेळाडू नाही. त्यामुळेच अश्या दिग्गज खेळाडू ची कोच म्हणून भारतीय सरकारने ३ वर्षासाठी नेमणूक केली. नीरज चोप्रा च्या यशाचा आलेख हान यांच्या हाताखाली अतिशय वेगाने वाढला. नीरज सोबत अन्नू राणी, शिवपाल सिंग, रोहित यादव या सर्व खेळाडूंच्या कामगिरीत फरक पडला. नीरज ने २०१८ च्या एशियन आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पण कदाचित जे भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत ग्रेग चॅपल हे प्रकरण घडलं अगदी तसेच हान यांच्या बाबतीत घडलं. २०२० मधे त्यांचा करार संपता संपता हान आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे वाद चव्हाट्यावर आले. मानधना वरून हान यांनी भारताच्या एकूणच सिस्टीम बद्दल नापसंती व्यक्त केली तसेच खेळाडूंना योग्य मदत मिळत नसल्याचं उघडपणे स्पष्ट केलं तर तिकडे त्यांच्या हाताखाली तयार होणाऱ्या खेळाडूंनी हान हे पैश्यासाठी कोरोना काळात विदेशी खेळाडूंना शिकवत असल्याचं तसेच आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट केलं. नीरज ने ही याबाबतीत ट्विट करत भारत सरकारची बाजू उचलून धरली. हान यांनी ऑलम्पिक स्पर्धेच्या आधी नीरज वर झालेल्या खांद्याच्या शस्त्रक्रियेवर ही तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तर तिकडे नीरज ने यामुळे आपल्या खांद्याला जीवनदान मिळाल्याचं म्हंटल होतं. या वादात कोण बरोबर कोण चुकीचं यात मला जायचं नाही. पण एकूणच या सर्व गोष्टींचा परीणाम नीरज चोप्रा सारख्या खेळाडूंच्या खेळावर होणं हे अपेक्षित होतं. 

अंत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर सुद्धा नीरज ने आपल्या ऑलम्पिक तयारीकडे लक्ष केंद्रित केलं. कोच आणि फेडरेशन च्या वादात न पडता त्याने शांतपणे जे त्याला हान यांच्याकडून शिकायला मिळालं त्यावर मेहनत घ्यायला सुरवात केली. भाला फेक स्पर्धेत सगळ्यात महत्वाचं असते ते भाला ज्या कोनातून फेकला जातो आणि त्याला जास्तीत जास्त वेग मिळण्यासाठी शरीराच्या वजनाचा भार सुद्धा आपल्या फेकीला द्यावा लागतो. इकडेच मला वाटते नीरज ने ऑलम्पिक स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. नीरज ने अंतिम फेरीत जे पहिले दोन्ही भाला फेक ८७ मीटर च्या पुढे केले. त्या वेळेस त्याने उडी मारून आपल्या संपूर्ण शरीराचा भार खांद्यातून आपल्या भाल्या पर्यंत पोहचवला. जे १-२ मीटर जास्ती त्याच्या भाल्याने गाठलं त्यामागे निर्णायक भूमिका ही त्याच्या भाला फेकीत होती. 

जर आपण नीरज चा दुसरा थ्रो पुन्हा एकदा बघितला तर नीरज ने भाला किती अंतर गाठतो आहे याचा विचार न करता आपण आपली कामगिरी फत्ते केली आहे या विश्वासाने मागे वळून दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त केला होता. हा आत्मविश्वास एखाद्या खेळाडूच्या मनात तेव्हाच असतो जेव्हा त्याला त्याच्या क्षमतेची संपूर्ण कल्पना असते. त्यामुळेच जेव्हा पडद्यावर ८७.५८ मीटर चा आकडा दिसला तेव्हा नीरज ला हे कळून चुकलं होतं की पदकावर आपलं नाव कोरलं  आहे आता फक्त त्याचा रंग निश्चित व्हायचा आहे. नीरज च्या सोबत वेटर च्या रूपात तगडा प्रतिस्पर्धी होता. ज्याने कित्येक वेळा लिलया ९० मीटर च्या पुढे भाला फेक केलेली होती. पण अंतिम सामन्यात त्याची लय चुकली आणि भारताच १२१ वर्षाच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. 

आज सुभेदार नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकल्यावर त्याच श्रेय घेण्यासाठी अनेक दावेदार पुढे येतील. पण ज्यांनी हा भाल्याचा प्रवास केला आहे तेच त्याचे खरे हकदार आहेत. अगदी त्याचे पहिले कोच जयवीर सिंग ते हान आणि त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि त्याचे इतर कोच या सोबत त्याचे  कुटुंबीय आणि भारत सरकार. कारण प्रत्येकाने थोडा थोडा वाटा त्याच्या यशात उचललेला आहे. सगळ्यात जास्ती श्रेय नक्कीच सुभेदार नीरज चोप्रा च आहे ज्याने एका शतकापेक्षा जास्ती वेळ भारतीयांनी बघितलेल्या स्वप्नांला मूर्त स्वरूप दिलं आहे. त्याचा हा भाल्याचा प्रवास अनेक भारतीय खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहन देणारा असेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्याच्या अविस्मरणीय कामगिरीला माझा कडक सॅल्यूट. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Friday, 6 August 2021

नावाचा घोळ... विनीत वर्तक ©

 नावाचा घोळ... विनीत वर्तक ©


नाव कोणाचे? ते नामांतरण हा एक यक्ष प्रश्न गरज नसताना राजकारण्यांनी देशापुढे उभा केला आहे. त्याचा उपयोग करून लोकांच्या भावना भडकवणे, स्वतःची राजकीय पोळी भाजणे तसेच आपल्या कुटूंबियांच्या नावाने देशाची अस्मिता लिहणे असे एक ना अनेक पक्षी या एका नावावरून या देशात मारले जात असतात. हा हुकमाचा एक्का विरोध करण्यासाठी काहीही नसलं की एकदम हक्काने अस्मिता, भावना आणि विरोध पेटवण्यासाठी वापरला जातो. याच नावाच्या घोळावरून कित्येक आंदोलन झाली आहेत. कित्येक लोकांना आपले प्राण गमवायला लागले आहेत. पण खरच एखाद्या नावाने आपल्या आयुष्यात इतका फरक पडतो का? आपली अस्मिता इतकी तकलादू आहे का? नाव देण्याने त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रसार, त्याची जपणूक आपण खरच करतो का?

एखाद्या वास्तूला, एखाद्या प्रोजेक्ट ला, एखाद्या पुरस्काराला देशातील सन्मानीय व्यक्तीच नाव देण्यामागे विचार असतो की नावामुळे त्या सन्मानीय व्यक्तीने घेतलेल्या प्रयत्नांची जाणीव येणाऱ्या काळात राहावी, त्यांच्या विचारांचा प्रभाव आणि त्यांनी दिलेलं योगदान अनेकांना प्रेरणा देणारं ठराव तसेच त्यांच्या कार्याची माहिती भारतातील अनेकांना व्हावी. पण प्रत्यक्षात असं घडते का? वर लिहलेल्या सगळ्या गोष्टी या कागदापुरती उरतात. नाव देण्याच्या अट्टाहासापायी सुरु होतो एक असा खेळ ज्यात भावना, अस्मिता आणि पैसा याच्या तालावर लोकांना नाचवलं जाते. एखादी गोष्ट पदरात पडल्यावर त्याचे श्रेय घेऊन सण समारंभ साजरे केले जातात. कोणीतरी राजकीय नेता अथवा भाई, दादा, अण्णा किंवा साहेब येऊन दोन शब्द बोलून आपण अस्मिता कशी जपली ते आपण लढा कसा दिला याच संपूर्ण वर्णन केले जाते. धमक्या दिल्या जातात. हा भावनांचा लढा, अस्मितेचा लढा पुढे सुरु ठेवण्याच्या घोषणा होतात. दिवस सरतो आणि दुसऱ्या दिवशी या सर्व गोष्टी एखाद्या निर्माल्या प्रमाणे स्वाहा केल्या जातात.

एखाद्या व्यक्तीच्या विचारांच आचरण, त्यांच योगदान, त्यांच कर्तृत्व, त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास या सगळ्याची जाणीव नाव दिल्याने होते का? मला तरी व्यक्तिशः असं वाटत नाही. गल्लीमधल्या रस्त्याला नाव देण्यापासून, कोपऱ्यावरच्या मंदिराला नाव देण्याची स्पर्धा आज सुरु आहे. त्यातही दिलेले नाव बदलण्याची चढाओढ ही काही वर्षांनी सक्रिय होते. त्यासाठी एकमेकांच्या आई- बापाचं श्राद्ध घालण्यापासून ते रक्त सांडेपर्यंत हाणामाऱ्या होतात. ते ही नाव कोणाचं असते तर अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या अथवा शांतीप्रिय, सज्जन कर्तृत्व असणाऱ्या एखाद्या सन्मानीय व्यक्तिमत्वासाठी. व्यक्तीच्या नावापेक्षा त्यांच्या गुणांच अंगिकरण, आचरण त्यातून आपला उत्कर्ष साधणं हे आपल्याकडून जास्ती अपेक्षित आहे. आज ४०० पेक्षा जास्त वर्षानंतर मराठी साम्राज्य निर्माण करणारे म्हणून ज्यांच नाव आदराने घेतलं जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते १० गुण आपण अंगिकारले असं याच अस्मितेचा लढा देणाऱ्यांना विचारलं तर कोणते १० गुण त्यांच्यात होते हे आठवण्यासाठी वेळ लागेल कदाचित त्यांच्या गावी ही हे गुण नसतील. त्यामुळे ते गुण अंगीकारणे ही तर दूरची गोष्ट राहिली. मग एखाद्या वास्तूला नाव देण्याने त्यांच्या विचारांची आणि मराठी अस्मिता कशी जपली जाणार आहे? हे एक उदाहरण झालं असं भारतातील प्रत्येक शहरात, खेड्यात नाव दिलेल्या प्रत्येक सन्मानीय व्यक्तीच्या बाबतीत लागू आहे.

एखादा पुरस्कार व्यक्तीच्या नावाने अश्याच क्षेत्रात दिला जावा ज्याच्याशी ती संबंधित असेल. जर संबंधित नसेल तर त्याला एखाद्या सन्मानीय व्यक्तीच नाव जोडणं हे सुद्धा तितकच मला व्यक्तिशः खटकते. त्या व्यक्तीच कर्तृत्व जर त्या संबंधित क्षेत्रात नसेल तर त्याच नाव पुरस्काराशी जोडण्याने कोणती प्रेरणा पुरस्कार मिळवणाऱ्या किंवा त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना मिळणार आहे? नावाचा संबंध जर पैश्यावरून, राजकीय वजनावरून, घराणेशाही वरून अथवा कोणत्यातरी दुसऱ्या क्षेत्रात कर्तृत्व असल्यामुळे असेल तर असे संबंध जोडणाच्या प्रयत्नांमुळे खरे तर पुरस्काराचा दर्जा कमी होत असतो. ज्यांना हा पुरस्कार मिळतो किंवा जे तो मिळायच्या पात्रतेचे असतात त्यांना वास्तविक नावाशी काही देणं घेणं नसते. नावावरून गदारोळ करणारे, तसेच त्या वरून अस्मिता जागवणाऱ्यांना गल्लीतला पण पुरस्कार कधी मिळालेला नसतो हे वास्तव आहे. त्यामुळे एखाद्या पुरस्काराचा संबंध कोणत्यातरी नावाशी नकोच आणि असला तरी त्या संबंधित व्यक्तीच योगदान हे त्या कार्यक्षेत्राशी किती होत याचा विचार करून मग तो जोडण्यात यावा.

कोणत्याही शाळेला, कॉलेजला किंवा विद्यापीठाला एखाद्या व्यक्तीच नाव दिल्यानंतर किंवा ते दिल्यामुळे ज्ञानाची गंगा वाहायला लागते असं कोणाला वाटत असेल तर नक्कीच आपण पुन्हा एकदा शिकण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. एखाद्या व्यक्तीचे विचार रुजवण्यासाठी आपण काय केलं हे त्यापेक्षा जास्ती महत्वाचं आहे. ते विचार नुसते न रुजवता त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर केला किंवा कसा केला जाऊ शकतो यावर विचारमंथन होईल तेव्हाच त्या सन्मानीय व्यक्तीच्या विचारांची गंगा पुढे वहायला लागेल. हा विचार करण्याइतपत प्रगल्भता आपल्या समाजात अजून निर्माण झालेली नाही ही  माझ्यामते त्या सर्व सन्मानीय व्यक्तीच्या विचारांची शोकांतिका आहे.

नावाचा घोळ करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष, राजकारणी आणि नेते मंडळी आपापल्या परीने करत आलेली आहेत किंबहुना भविष्यात ही करत राहतील. एखादी वास्तू उभारली नसताना सुद्धा एक दोन नाही तर चार नाव त्याला देण्याची स्पर्धा आपण आत्ता सुद्धा अनुभवत आहोत. कोण चुकीचं आणि कोण बरोबर यापेक्षा अश्या घोळामध्ये आपला समावेश होऊ न देता चालू असलेल्या वैचारिक दिवाळखोरीचा भाग होणं हे आपण नक्कीच टाळू शकतो. नावाच्या घोळात ज्या वेळेस आपण आपले विचार, अस्मिता आणि संस्कृती यांचा संबंध त्यांच्याशी जोडणं थांबवू त्यावेळेस माझ्या मते त्या सन्मानीय व्यक्तीच्या विचारांशी स्वतःला जोडू. जोवर हे घडत नाही तोवर नावाचे घोळ आपल्या देशात असेच सुरु राहणार.

तळटीप :- या पोस्टचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी, नेत्याशी अथवा त्यांच्या वागणुकीशी जोडू नये. तसेच कोणत्याही राजकीय प्रतिक्रिया देऊ नयेत. पोस्टचा उद्देश नावामुळे होणाऱ्या भावनांच्या खेळाशी निगडित आहे. कृपया कोणीही या पोस्टचा वापर राजकीय चढाओढी अथवा राजकीय दृष्टिकोनातून करू नये ही नम्र विनंती.  
   
जय हिंद!!!

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

एका नव्या पर्वाची सुरवात... विनीत वर्तक ©

 एका नव्या पर्वाची सुरवात... विनीत वर्तक ©

कालच्या संपूर्ण दिवसात दोन फोटोंनी माझं लक्ष वेधलं. कालच्या एका दिवसात भारताच्या खात्यात दोन पदके जमा झाली. एक रोप्य पदक कुस्ती मधे रवी कुमार दहिया ने भारतासाठी जिंकलं तर पुरुष हॉकी संघाने जर्मनीच्या संघाला हरवत कांस्य पदकाची कमाई केली. या दोन्ही स्पर्धांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या दोन फोटोंनी एक वेगळा संदेश दिला आहे तो कसा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तसेच या घटना भारताच्या मानसिकतेला कलाटणी देणाऱ्या ठरतील अश्याच होत्या. त्या का होत्या? हे आपण त्या सोबत समजून घेतलं पाहिजे. त्या आधी थोडं इतिहासात...   

काल भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलम्पिक मधे कांस्य पदकाची कमाई केली आणि तब्बल ४१ वर्षांनी भारताच्या हॉकीच्या क्षितिजावर सूर्य पुन्हा उगवला. भारताच्या हॉकी चा सुवर्णकाळ ओसरल्यानंतर म्हणजेच १९८० पासून यशाचा आलेख सतत वर खाली जात राहिला. काही आनंदाचे क्षण आलेही पण तरीही भारतीय हॉकी संघ ऑलम्पिक पदकापासून लांब राहिला. हाच काळ होता जेव्हा क्रिकेट ने भारतीयांच्या मनात घर केलं. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट म्हणजेच सर्वस्व असं एक चित्र तयार झालं. त्याच काळात भारतात सर्वोत्तम क्रिकेटपटूंची एक फळी तयार झाली. यात अनेक नावे येतील त्यामुळेच एकाचवेळेस पैसा आणि खेळाचा दर्जा कमालीचा वाढला. या प्रवासात सगळ्यात जास्ती गळचेपी झाली ती हॉकीची. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या खेळाडूंनी ऑलम्पिक मधे भारत म्हणजे हॉकीतील बादशहा असा दबदबा निर्माण केला होता तो संपूर्णपणे नाहीसा झाला. 

हॉकी मधील आटत चाललेला पैसा, फेडरेशन मधील राजकारण आणि भ्रष्टाचार त्यात क्रिकेट सारख्या खेळाने दिलेली मात अश्या अनेक गोष्टी भारतात हॉकीसाठी प्रतिकूल ठरल्या. ऑलम्पिक म्हणजे पिकनिक इतकं समीकरण तयार होईपर्यंत हॉकी हा खेळ भारतीयांच्या मनातून उतरला होता. २०-२० क्रिकेट सुरु झाल्यावर त्याने अनेक भारतीयांना झटकन आनंद दिला पण क्रिकेट या खेळाची मजा आणि समाधान कुठेतरी हिरावून नेलं. एकेकाळी रेडिओवर कॉमेंट्री ऐकणारा भारतीय आज सगळं काही फिक्स असते या मतापर्यंत येऊन पोहचलेला होता. पुन्हा एकदा एक पोकळी खेळाच्या बाबतीत भारतात गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती. या सगळ्यात हॉकी चे खेळाडू, चाहते आणि एकूणच हॉकी च्या संबंधित सर्व लोक याच प्रतीक्षेत होते की तो दिवस कधी उजाडेल जेव्हा हॉकीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु होईल. माझ्या मते तो दिवस होता ५ ऑगस्ट २०२१. 

भारत आणि जर्मनी मधे अतिशय चुरशीचा सामना झाला. सामना संपायला अवघ्या काही सेकंदाचा अवधी बाकी होता आणि जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्या वेळेस भारत ५-४ अश्या फरकाने पुढे होता. त्यामुळे जर जर्मनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करते तर सामना बरोबरीत आणि पेनल्टी शूटआऊट मधे गेला असता. अश्या मोकाच्या क्षणी इतिहासात अनेकवेळा भारतीय हॉकी संघाने कच खाल्ली होती. कालही जर कच खाल्ली असती तर भारतीय हॉकी पुन्हा जैसे थे अश्या जागी कदाचित पुन्हा गेलं असतं. त्यामुळे ती काही सेकंद अतिशय महत्वाची होती. भारताचा ३५ वर्षीय गोलकिपर श्रीजेश एखाद्या भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहिला. ३.६६ मीटर रुंद आणि २.१४ मीटर उंच अश्या ७.८३ स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या भागाचं संरक्षण त्याला करायचं होतं. कारण एक चूक आणि चेंडू जाळ्यात. पण तो उभा राहिला आणि त्याने गोलपोस्ट मधे जाणाऱ्या चेंडूला अडवलं आणि तिकडेच भारताच्या क्षितिजावर एका नवीन दिवसाचा उदय झाला. तो क्षण किती महत्वाचा होता हे श्रीजेश चांगल ओळखून होता. त्यामुळेच सामना संपल्यावर त्याने त्या गोलपोस्ट ला साष्टांग नमस्कार केला. माझ्या मते हा क्षण भारताच्या हॉकी मधला एक निर्णायक क्षण ठरेल. या विजयाने भारतीय हॉकीला एक नवी संजीवनी दिली आहे. नक्कीच पुन्हा एकदा भारतात हॉकीचा सुवर्णकाळ सुरु झाला याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

५७ किलोग्रॅम फ्री स्टाईल उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या रवी कुमार दहिया चा सामना कझाकिस्तान च्या नूरीस्लाम सनएव्ह बरोबर रंगला होता. रवी कुमार गुणांनुसार मागे पडला होता. सामना जिंकायचा तर एकच मार्ग शिल्लक होता तो म्हणजे आपल्या समोर असलेल्या प्रतिस्पर्ध्याला पिन डाऊन करणं. भारताच्या रवी कुमार ने नेमकं प्रतिस्पर्ध्याला आपल्या डावपेचात अडकवत पिन डाऊन करण्याचा प्रयत्न केला. आपली पकड त्याने इतकी मजबूत आवळली होती की त्यातून सुटणं कझाकिस्तान च्या खेळाडूला कठीण झालं आणि अश्या वेळेस त्याने आपल्या तोंडाने करकचून चावा रवी कुमार ची पकड सुटावी म्हणून त्याच्या दंडाला घेतला. हा चावा इतका करकचून होता की रवी कुमार च्या दंडावर त्याच्या सगळ्या दातांचे वळ उमटले. अतिशय वेदना होत असताना पण रवी कुमार ने आपली पकड ढिली पडून दिली नाही आणि शेवटी त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पिन डाऊन करत सामना आणि पदक आपल्या नावावर निश्चित केलं. त्याच्या या क्षणाचा फोटो बघताना मला जाणवलं की गेले कित्येक वर्ष भारतीय खेळाडूंन मधे ज्या फायटिंग स्पिरिट चा अभाव असायचा ते स्पिरिट कुठेतरी मला रवी कुमार दहियाच्या त्या लढतीमध्ये जाणवलं. नक्कीच ही फायटिंग स्पिरिट येणाऱ्या एका नवीन भारतीय जिद्द, उत्साह आणि वृत्ती ची नांदी आहे. 

या दोन्ही फोटोंनी माझा कालचा दिवस समृद्ध केला यात शंका नाही. भारतीय हॉकीने नक्कीच कात टाकली आहे तर भारताच्या खेळाडूंनी आता हाराकिरी करायची थांबवली आहे असा एक संदेश नक्कीच येणाऱ्या खेळाडूंना मिळाला असेल. आपल्या सचोटीने, प्रयत्नांनी पुन्हा एकदा भारतीय हॉकीला संजीवनी देणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघ आणि कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांच खूप खूप अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Monday, 2 August 2021

राफेल 'एफ ४' भारताचा पुढला टप्पा ... विनीत वर्तक ©

 राफेल 'एफ ४' भारताचा पुढला टप्पा ... विनीत वर्तक ©   

भारतीय वायू सेनेला उरलेली १० राफेल लढाऊ विमान जानेवारी २०२२ च्या आधी फ्रांस कडून दिली जाणार आहेत. अश्या रीतीने भारताने २०१६ साली नोंदवलेल्या ३६ राफेल विमानांचा करार संपूर्ण होणार आहे. पण फक्त ३६ राफेल विमानांनी भारतीय वायू सेनेची गरज पूर्ण होणारी नाही. भारतीय वायू सेना १९८० च्या दशकातली मिग २१ बायसन ही लढाऊ विमान अजूनही वापरत आहे. खरे तर संग्रालयात ठेवण्याजोगी असणारी ही विमान फक्त आणि फक्त भारतीय वायू सेनेच्या पराक्रमी वैमानिकांमुळे आज कार्यरत आहेत. आजही भारतीय वायू दलात या विमानांच्या ४ स्क्वाड्रन आहेत. ७०-८० विमानं अजूनही कार्यरत आहेत जी की येत्या २-४ वर्षात टप्पा टप्याने निवृत्त केली जाणार आहेत. म्हणजे आधीच ३० असलेल्या स्क्वाड्रन ची संख्या अजून खाली जाणार आहे. तर यावर भारतीय वायू सेना काय निर्णय घेते आहे? तसेच राफेल एफ ४ कश्या रीतीने भारतीय संरक्षणाचा कणा बनणार आहे? राफेल च का? तसेच आता या सगळ्या गोष्टी कोणत्या टप्यात आहेत हे जाणून घेणं सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. 

भारताने जी ३६ राफेल विमान फ्रांस कडून खरेदी केली आहेत ती 'एफ ३ आर' व्हर्जन मधली आहेत. हे व्हर्जन काय असते तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईल फोन कडे बघू. साधारण २ वर्षापूर्वी तुम्ही एखादा फोन अद्यावत तंत्रज्ञान असलेला घेतला असेल तरी आज त्याची किंमत बाजारात काहीच नसेल. कारण तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जाते त्या वेगाने आपण घेतलेला मोबाईल फोन काळाच्या मागे पडत जातो. आता हेच लढाऊ विमानांच्या व्हर्जन च्या बाबतीत आहे. भारताला ३६ राफेल आल्यावर ही १०८ लढाऊ विमानांची गरज आहे. त्यासाठी भारताने The Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA) २ प्रोग्रॅमवर काम सुरु केलं. पण यात मेख अशी आहे की कोणत्याही लढाऊ विमानांचा सौदा हा खूप वेळकाढू असतो. साधारण निविदा निघाल्यानंतर त्यात एखाद्या विमान निवडून त्याची ऑर्डर दिल्यानंतर ते येईपर्यंत जवळपास ६-८ वर्षांचा कालावधी जातो. याचा अर्थ काय तर तुम्ही जे विमान ६-८ वर्षापूर्वी निवडलं ते तुम्हाला मिळणार. एकत्र १०८ विमान घेण्यासाठी तितका पैसा एकाचवेळी आपल्याला त्या विमान कंपनी ला द्यावा लागणार आणि इतकं सगळं करून पुन्हा खर्च आहेत. कारण या ६-८ वर्षात जे नवीन तंत्रज्ञान पुढे जाईल ते बसवण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढा, पुन्हा एकदा ते विकत घ्या आणि पुन्हा एकदा त्यासाठी विमानांचा मेन्टनन्स करा. एकाचवेळी जर आपण १०८ विमानं घेतली तर सगळ्या विमानांवर काम करायला लागेल. यात खूप वेळ आणि पैसे पण खर्च होतील. यावर उपाय काय? तर भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी एक उपाय मांडला की एकत्र १०८ लढाऊ विमान घेण्यापेक्षा का नाही आपण टप्या टप्याने ही घेऊ. याचा अर्थ आज थोडी घेतली. साधारण २-३ वर्षांनी अजून थोडी आणि त्यानंतर २-३ वर्षांनी अजून थोडी. असं केल्याने दोन फायदे आहेत. एक तर एकाच वर्षात खूप सारा खर्च यावर होणार नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं पुढे येणारी लढाऊ विमान आधीच्यापेक्षा तंत्रज्ञानात वरचढ असतील. त्यामुळे त्यांना अपग्रेड करण्याचा खर्च वाचेल. 

आधी लिहिलं तसं जर भारताने Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA) २ आजही पुढे नेलं तर २०२७-२०२८ पर्यंत एकही लढाऊ विमान भारताला मिळणार नाही. आधीच १२ स्क्वाड्रन कमी आहेत त्यात एवढ्या वर्षात निदान ४-५ स्क्वाड्रन ची भर पडेल. एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन ला लढा देण्यासाठी भारतीय वायू सेना संपूर्णपणे कमजोर होईल. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे 'राफेल एफ ४'. भारताच्या (MMRCA) २ च्या स्पर्धेत ही राफेल सगळ्यात पुढे आहे. राफेल चं तंत्रज्ञान, हाताळणी आणि त्याची क्षमता यांनी त्याला जगातील ४.५ पिढीतील सर्वोत्तम विमानाचा दर्जा दिलेला आहे. नुकतच इजिप्त ने त्यांच्याकडे असलेल्या सुखोई-३५ आणि राफेल ची युद्ध स्पर्धा केली. यामागे हेतू होता की इजिप्त ला लागणाऱ्या पुढल्या विमानांची ऑर्डर कोणाला द्यायची. त्यासाठी जो या स्पर्धेत जिंकेल त्याला ही ऑर्डर जाईल. राफेल ने सुखोई ३५ सगळ्याच आघाड्यांवर अक्षरशः पाणी पाजलं. स्पर्धा संपली तेव्हा स्कोरकार्ड होता १०० - ० म्हणजे राफेल ने एकतर्फी सुखोई ३५ ला धूळ चारली. राफेल च्या रडार ने सुखोई ३५ ला जॅम तर केलच पण सुखोई ३५ च्या अगदी बाजूला उडून पण सुखोई ३५ च्या रडारवर राफेल च अस्तित्व दिसून आलं नाही. या स्पर्धेकडे जगातील अनेक देशांच लक्ष होत विशेष करून भारताचं कारण या आधी भारत राफेल ऐवजी सुखोई ३५ घेण्याच्या निर्णयापर्यंत आलेला होता. या स्पर्धेतील निकालाने पुन्हा एकदा राफेल च्या क्षमतांवर शिक्कामोर्तब तर केलच पण भारताचा महाग का होईना राफेल घेण्याचा निर्णय किती योग्य होता हे दाखवून दिलं. 

भारताने ३६ राफेल चा करार करताना त्यात एक महत्वाचा मुद्दा मांडला होता. तो असा होता की करार संपूर्ण होईपर्यंत जर समजा भारताला गरज वाटली तर भारत अजून राफेल विमानांची ऑर्डर देऊ शकतो. ती नवीन ऑर्डर जुन्याच किमतीत असेल. याचा अर्थ असा आहे की आज २०२१ किंवा २०२२ मधे ही भारताने राफेल विमान अजून घेतली तर फ्रांस ला ती २०१६ च्या किमतीत देणं बंधनकारक आहे. कारण फ्रांस सरकारने आधीच करार करताना या मुद्याला मान्यता दिली आहे. मग भारत उशीर का करत आहे? तर यातील मेख आहे. राफेल एफ ४ व्हर्जन. २०१९ मधे फ्रांस ने एफ ४ व्हर्जन ची घोषणा केली. २०२४ पर्यंत या व्हर्जन ची विमान प्रत्यक्षात विकली जातील. भारताने याचसाठी आपला वेळ घेतलेला आहे. कारण एफ ४ व्हर्जन हे आता भारताला आता देण्यात आलेल्या एफ ३ आर या व्हर्जनपेक्षा अजून अत्याधुनिक आहे. 

F4-standard will include enhancements to the Thales RBE2 active electronic scanned array (AESA) radar, the Thales TALIOS long-range airborne targeting pod and the Reco NG reconnaissance pod; upgrades to the aircraft's communications suite; improved pilot helmet-mounted displays

या शिवाय अनेक छोट्या मोठ्या अपग्रेड यात समाविष्ट आहेत. भारताने २०२१ च्या शेवटी अथवा शेवटचं राफेल भारताला देताना जर अजून मागणी नोंदवली तर भारत एफ ४ या व्हर्जनसाठी ती नोंदवणार आहे. नक्कीच यात व्हर्जन अपग्रेड चा खर्च हा अधिक असेल. पण उरलेलं राफेल हे आपल्याला २०१६ च्या किमतीत मिळणार आहे. यातून खूप सारी बचत भारताची होणार आहे. राफेल हाताळण्याचा अनुभव भारतीय वायू दलाच्या वैमानिकांनी अतिशय सुंदर असल्याचं नोंदवलं आहे. राफेल तांत्रिक आणि हाताळणाच्या बाबतीत भारतीय वायू दलाच्या पसंतीस तर आहेच पण त्या पलीकडे फ्रांस सरकारने भारताच्या रिलायन्स सोबत सहकार्य करार केला असून भारताने जर अजून मागणी नोंदवली तर त्याची जुळवाजुळव भारतात महाराष्ट्रातील नागपूर इकडे करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे भारतीय लोकांना ही रोजगार उपलब्ध होणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच भारताचे वायू दल प्रमुखांनी पंतप्रधान कार्यालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तसेच इतर पातळ्यांवर अजून ३६ राफेल विमानांचा प्रस्ताव मांडल्याचा तसेच त्यातील करारासाठी लागणाऱ्या गोष्टींचा आढावा घेतल्याची बातमी आली आहे. त्यामुळे भारत येत्या काही महिन्यात अजून ३६ राफेल विमानांची ऑर्डर देणार हे जवळपास स्पष्ट होते आहे. ही ऑर्डर नक्कीच राफेल च्या एफ ४ व्हर्जनसाठी असणार आहे. 

भारतात असलेल्या राफेल च्या एफ ३ व्हर्जन च उत्तर आजही पाकिस्तान किंवा चीन च्या वायुसेनेकडे नाही. कारण राफेल ची क्षमता पाकिस्तान च्या एफ १६ किंवा चीन च्या जे २० पेक्षा जास्त आहे. एकट्या स्टेल्थमुळे आपण वरचढ आहोत असं मानणारा चीन राफेल च्या इजिप्त मधील क्षमतेमुळे संपूर्णपणे मागे गेला आहे. कारण कोणत्याही युद्धात परिपूर्णता ही सर्वोत्तम लढाऊ विमान ठरवते. जरी चीन च जे २० स्टेल्थ प्रकारात मोडत असलं तरी चीन च्या या विमानाच्या क्षमता इतर भागात राफेल च्या पेक्षा कमी आहेत. तसेच राफेल हे अनेक युद्धात वापरलं गेलं असल्याने त्याच्या क्षमतांवर अनेक देशांनी शिक्कामोर्तब केलं आहे. इकडेच चीन माती खातो आहे. त्यात आता भारत जर एफ ४ व्हर्जन विकत घेणार असेल तर चीन आणि पाकिस्तान दोघेही आपलं शेपूट गुंडाळून बसण्यात समाधान मानणार हे नक्की आहे. एका राफेल ला टक्कर द्यायला साधारण ३ एफ १६ तर २ जे २० ची गरज आहे. तरच ते राफेल चा मुकाबला करू शकतात. जर भारताने येत्या काळात १०८ राफेल टप्या टप्याने आणली तर दोन्ही देशांकडे याच काहीच उत्तर नसणार आहे. 

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



एका हॉकी स्टिक चा प्रवास... विनीत वर्तक ©

एका हॉकी स्टिक चा प्रवास... विनीत वर्तक ©

भारतीय हॉकी संघाची कर्णधार असलेल्या राणी रामपाल चा प्रवास अंगावर काटा उभा करणारा आहे. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतुन मार्ग काढत आज इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व ती करत आहे. तिच्या या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल चा प्रवास तिच्या शब्दात, (राणी रामपाल च्या शब्दांचा स्वैर अनुवाद) 

 “मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती; विजेच्या कमतरतेपासून, जेव्हा आम्ही झोपलो तेव्हा आमच्या कानात गुरगुरणा -या डासांपासून, जेमतेम दोन चौरस जेवण घेण्यापासून ते पाऊस पडल्यावर आपल्या घराला पूर आल्याच बघतानाच्या त्या क्षणांपासून... माझ्या आई -वडिलांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ते जास्ती काही करू शकले नाहीत. माझे वडील एक दोन चाकी गाडी खेचणारे होते आणि आई एक मोलकरीण म्हणून काम करत होती. 

माझ्या घराजवळ एक हॉकी अकॅडमी होती, त्यामुळे मी खेळाडूंचा सराव पाहण्यात तासन तास घालवत असे. मला खरोखर खेळायचे होते. वडील दिवसाला 80 रुपये कमवायचे आणि मला हॉकी स्टिक विकत घेणे परवडत नव्हते. दररोज, मी प्रशिक्षकाला मलाही शिकवायला सांगत असे पण त्याने मला नाकारले कारण   'तु सराव सत्रात भाग घेण्याइतकी मजबूत नाही.' मी कुपोषित होते असं तो म्हणत असे.  मला मैदानावर तुटलेली हॉकी स्टिक सापडली आणि त्याच्या सोबत  सराव करायला सुरुवात केली. माझ्याकडे प्रशिक्षणाचे कपडे नव्हते, म्हणून मी सलवार कमीजमध्ये मैदानावर फिरत होते. पण मी स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. मी प्रशिक्षकाकडे एक संधी मागितली आणि खूप मुश्किलीने त्यांना संधी देण्यासाठी पटवलं.  

पण जेव्हा मी माझ्या कुटुंबाला ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, ‘लडकिया घर का काम ही करती है’ और ‘हम तुम्हें स्कर्ट पेहेन कर खेलने नही देंगे.’ मी त्यांना विनंती केली की, ‘कृपया मुझें जाने दो’. जर मी अपयशी ठरली तर मी तुम्हाला पाहिजे ते करेन. ’माझ्या कुटुंबाने अनिच्छेने हार मानली. प्रशिक्षण सकाळी लवकर सुरू होत असे. आमच्याकडे घड्याळ देखील नव्हते, म्हणून आई उठून आकाशाकडे बघायची कारण त्यावरून ती ठरवायची की मला उठवण्याची ही योग्य वेळ आहे का?. अकादमीमध्ये प्रत्येक खेळाडूला ५०० मिली दूध आणणे अनिवार्य होते. माझे कुटुंब फक्त २०० मिली किमतीचे दूध घेऊ शकत होते;  मग मी कोणालाही न सांगता, त्यात पाणी मिसळून ते ५०० मिली करायचे कारण मला हॉकी खेळायचे होते. 

माझ्या प्रशिक्षकाने मला चांगल्या आणि वाईट परिस्थितीत पाठिंबा दिला;  त्याने माझ्यासाठी हॉकी किट आणि शूज खरेदी केले. मी कठोर प्रशिक्षण घेईन आणि सरावाचा एकही दिवस चुकवणार नाही या अटीवर त्याने मला त्याच्या कुटुंबासह राहण्याची परवानगी दिली आणि माझ्या आहाराच्या गरजा पूर्ण केल्या. मला माझा पहिला पगार मिळाल्याचे आठवते;  मी एक स्पर्धा जिंकल्यानंतर ५०० रुपये जिंकले आणि ते पैसे बाबांना दिले. त्यांनी यापूर्वी कधीही त्यांच्या हातात इतके पैसे बघितले नव्हते. मी माझ्या कुटुंबाला वचन दिले, 'एक दिवस, मी आपलं स्वतःचे घर घेणार आहे';  त्या दिशेने काम करण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्व काही केले. 

माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आणि अनेक स्पर्धांमध्ये खेळल्यानंतर, मला शेवटी वयाच्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय कॉल आला!  तरीही, माझे नातेवाईक मात्र नेहमीच माझ्या लग्नाचा विषय काढत. पण वडिलांनी मला सांगितलं, ‘तुझ्या मनाची तृप्ती होईपर्यंत खेळ...." माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे, मी भारतासाठी सर्वोत्तम काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि अखेरीस, मी भारतीय हॉकी संघाची कर्णधार झाले! 

या घटनेनंतर थोड्याच वेळाने, मी घरी असताना, वडिलांचे एक मित्र आम्हाला भेटायला आले ते त्यांच्या सोबत काम करायचे. त्यांनी आपल्या नातीला  सोबत आणलं होतं आणि मला सांगितले, ‘ती तुझ्यापासून प्रेरित आहे आणि तिला हॉकीपटू बनण्याची इच्छा आहे!’ मला या गोष्टीचा खूप आनंद झाला;  मी फक्त रडू लागले. नंतर २०१७ मध्ये, मी शेवटी माझ्या कुटुंबाला दिलेले वचन पूर्ण केले आणि आमचं हक्काचं घर विकत घेतलं. त्या घरात प्रवेश केल्यावर आम्ही एकत्र रडलो आणि एकमेकांना घट्ट धरलं!......... आणि मी त्यांना सांगितलं की माझं स्वप्न अजून पूर्ण केलेलं नाही;  या वर्षी, मी त्यांची आणि प्रशिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची परतफेड करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी नेहमीच स्वप्न पाहिले आहे - भारताला महिला हॉकी मधलं ऑलम्पिक स्पर्धेचं सुवर्णपदक. ”

हे वाचून मी निशब्द झालो आहे. तिचे शब्द अजूनही माझ्या मनात वादळ उठवत आहेत. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी खेळासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून भारताचा तिरंगा आज ऑलम्पिक च्या मंचावर अटकेपार रोवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला माझा पुन्हा एकदा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.. 

मला पूर्ण खात्री आहे की टोकियो ऑलम्पिक मधे भारताचा महिला हॉकी संघ सुवर्ण पदकावर नाव कोरेल. खेळात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने जेव्हा एखादा खेळाडू उतरतो तेव्हा त्याचा क्लास, अनुभव आणि इतिहास अश्या गोष्टी गौण ठरतात. म्हणून असं म्हंटल जाते, "जो जिता वही सिकंदर". 

राणी रामपाल आणि भारताच्या महिला हॉकी संघाला खूप खूप शुभेच्छा......  

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Saturday, 31 July 2021

भावनाचोरी... विनीत वर्तक ©

 भावनाचोरी... विनीत वर्तक ©


आजवर सोशल मिडीयावर 'लेखनचोरी' हा प्रकार ऐकून होतो पण आता त्यात 'भावनाचोरी' करणाऱ्यांची पण भर पडली आहे. गेली अनेक वर्षं फेसबुकवर लिहीत असताना आपलं लिखाण दुसऱ्याच्या नावाने आपल्याला फॉरवर्ड होण्याचा प्रकार मी अनेकदा अनुभवलेला आहे. लिखाण, साहित्य कॉपीराईट करूनही अनेकदा हे प्रकार सुरू असतात. याच प्रकाराला कंटाळून अनेक चांगल्या लेखकांनी फेसबुक किंवा एकूणच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून आपलं लिखाण, साहित्य प्रकाशित न करण्याचाही निर्णय घेतला आहे. अर्थात याने नुकसान जे चांगले वाचक असतात त्यांचं झालेलं आहे. 

अनेक लेखकांनी एकत्र अथवा वैयक्तिक पातळीवर पैसे भरून स्वतःचे लेखन वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा पर्यायही निवडला आहे. तो योग्य की अयोग्य या प्रश्नात मला जायचं नाही, कारण प्रत्येकाचे लिखाण करण्यामागचे उद्देश वेगळे असतात. प्रत्येक लिखाण करणारा/करणारी हे त्याप्रमाणे त्याला योग्य वाटेल तसे निर्णय घेत असतो. ज्याप्रमाणे मॅगी दोन मिनिटात बनून तयार होते, त्याप्रमाणे दोन मिनिटात प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी लेखनचोरीचा पर्याय निवडला आहे. एखादी पोस्ट अथवा साहित्य चांगल्या दर्जाचं अथवा लोकांना आवडतं आहे असं दिसलं किंवा आपल्याला सोशल मिडीयावर मिळालं, की ते आपलंच म्हणून मागचा पुढचा विचार न करता पुढे ढकलून द्यायचं. यात सुशिक्षित आणि समाजातील प्रगल्भ समजले जाणारे लोक जास्ती पुढे आहेत. कारण भारतात या बाबतीत असलेले तकलादू कायदे, तसेच कळलं तरी आपलं कोणी काही उखाडू शकत नाही, असा एक भाव निर्माण झालेला आहे. तसेच कोणी समोर आणलं तरी मला फॉरवर्ड आलेलं मी पुढे टाकलं किंवा चोरी दाखवून दिल्यावर सांगणाऱ्या व्यक्तीला उडवून लावणारे महाभाग खूप आहेत.

आता त्यात भावनाचोरी हा प्रकार सुरू झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी एक फोटो बघून व्यक्त केलेल्या माझ्या भावना पण लोकांनी शब्दच्या शब्द उचलून आपल्याच नावावर फॉरवर्ड करायला सुरू केल्या. त्यात भरीस भर म्हणून एकांनी चक्क आपला मोबाईल नंबरही त्यात लिहून दिला. जसं काही त्या भावना वाचून लोकांना त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली तर त्यांना ते सोयीचं जावं. असो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. एका बाईंनी तर चक्क सांगितल्यावर या माझ्याच भावना आहेत, असं ठामपणे सांगितलं. कोणीतरी त्यांना ह्या भावना विनीत वर्तक यांनी लिहील्याचे पुरावे दिल्यावर त्या म्हणाल्या, 'मला व्हाट्सअपवर फॉरवर्ड आल्या आहेत' असं कारण त्यांनी दिलं. दोन मिनिटांपूर्वी आपल्याच भावना म्हणून ओरड करणारी ही व्यक्ती पुरावे देताच व्हाट्सअपचं कारण देऊन काढता पाय घ्यायला लागली. अर्थात या सगळ्या प्रकारामुळे आपण आपल्याच नजरेत पडतो, याचं कोणतंच शल्य त्यांच्या बोलण्यात जाणवलं नाही. 

लेखनचोरी, साहित्यचोरी आणि आता भावनाचोरी हा सोशल मिडीयावर एक नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. या विषयावर लेखकाने अथवा ज्याचं ते लेखन आहे त्याने/तिने लिहील्यावर इग्नोर करा, कशाला इतकं लावून घेता इथं पासून ते त्याच्यावर केस करा, सायबर क्राईमकडे तक्रार करा असे अनेक सल्ले दिले जातात. पण हे सगळे उपाय हे जखम झाल्यावर उपचार करण्यासारखे आहेत. जखम होऊच नये अशी वातावरण निर्मिती करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं मला मनापासून वाटतं. जसं की एखादा फोटो, एखादा व्यक्ती, एखादी घटना जरी सर्वांसाठी सारखीच असली, तरी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याची तीव्रता, प्रभाव हा व्यक्तीप्रमाणे बदलत जातो. मग जे आपल्याला जाणवते ते मांडण्यात आपल्याला कसली अडचण. त्यात पण आपण दुसऱ्याचे शब्द चोरून आपल्या नावावर टाकायला लागलो तर निदान आपल्या भावनांशी तरी आपण प्रामाणिक राहणार आहोत का? हा विचार मनात यायला हवा! पण काय आहे की या आभासी जगातील आभासी लाईक, शेअर आणि प्रसिद्धीच्या मागे आपण इतके हपापलेले आहोत की आता आपण भावनाचोर पण व्हायला लागलो आहोत. 

मी लिहीताना नेहमीच 'शब्दांकन' कॉपीराईट करतो. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने ती गोष्ट मला जाणवली आणि शब्दातून उतरली ते माझं आहे. बाकी ती वस्तुस्थिती, व्यक्ती अथवा गोष्ट यांवर अनेकांना लिहीता येऊ शकते अथवा अनेकांनी लिहीलेलं असू शकतं. कारण माहिती ही सर्वांसाठी सारखीच उपलब्ध असते. पण त्यातून आपण निवडून कश्या पद्धतीने मांडतो, हे व्यक्तीवर अथवा त्या लेखकावर अवलंबून असते. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश इतकाच की प्रत्येक घटनेवर प्रत्येकाला आपल्या पद्धतीने दृष्टिकोन, मत मांडता येऊ शकतात. जर असं आहे तर लेखनचोरी किंवा साहित्यचोरीची वेळ येऊ नये. जर आपल्याला तसं मांडता येत नसेल पण पुढे अग्रेषित करायचं असेल तर कॉपी-पेस्ट, शेअर असे अनेक पर्याय योग्य ते क्रेडिट देऊन उपलब्ध असतात. 

अर्थात असा विचार करण्याची प्रगल्भता चोरी करणाऱ्या लोकांमध्ये नसते याची जाणीवही आहे. पण कुठेतरी हे सगळं समाजातला जो एक स्तर सवंग प्रसिद्धी आणि सगळं झटपट मिळवण्याच्या नादात ढासळत चालला आहे त्याचं एक प्रतिबिंब आहे. या सगळ्यांमुळे जरी वाईट वाटत असलं तरी एक त्याने लिखाण बंद करणं किंवा सोशल मिडीया पासून दूर जाणं हा उपाय असू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. गरुड आणि कावळ्याची एक गोष्ट अनेकांनी वाचली असेल की गरुडाच्या अंगावर बसून कावळा मस्त विहार करतो. गरुड त्यामुळे विचलित न होता आपलं उड्डाण करत राहतो. तो इतक्या उंच हवेत जातो की कावळ्याला श्वास घेणं कठीण होऊ लागतं आणि स्वतःच तो त्याच्या अंगावरून बाजूला होतो. माझ्यामते आपण आपल्या लेखनाचा दर्जा, सातत्य आणि जे मनापासून वाटते ते मांडण्याचं कसब अजून उंचावत नेलं की असे कावळे आपोआप बाजूला होतात. हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला वाटतं. चोरी करणाऱ्याला पण चोरी करताना दोन वेळा विचार करावा लागेल इतकं आपण उंच गेलो की चोरी करण्याच्या उद्देशापासून आपण एखाद्याला परावृत्त करू शकतो. अर्थात त्यातही काही अपवाद असतात, पण अपवाद सगळीकडे असतात त्याचं आपण काही करू शकत नाही. 

माझ्या व्यक्त केलेल्या भावनासुद्धा जर लोकांना चोरी कराव्याश्या वाटत असतील तर नक्कीच माझ्या लेखनाने ती उंची गाठल्याचं समाधान मला आहे. या गोष्टीने नाराज होऊन त्यावर आकांडतांडव करण्यापेक्षा माझी जबाबदारी लिखाणाच्या बाबतीत अधिक वाढल्याची जाणीव माझ्यासाठी जास्ती महत्वाची आहे. त्यामुळे आता भावनाचोरी हा प्रकार पण माझ्या लिखाणाला जोडला गेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो. अशी भावनाचोरी करून जर कोणाला प्रसिद्धी अथवा मानसिक शांती मिळाली असेल तर ते पण माझं सौभाग्य समजतो. बाकी चोरणारे भावनेतील शब्द चोरू शकतात ती भावना नाही.     

तळटीप :- ही पोस्टही कॉपीराईट करतो आहे. काय माहित थोड्यावेळाने मलाच कोणा दुसऱ्याच्या नावाने फॉरवर्ड येईल.. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.