Wednesday, 8 November 2017

उत्तरार्धातल प्रेम...

उत्तरार्धातल प्रेम... 
ऐन तारुण्यात प्रेमाचा बहर सगळ्यांच्या आयुष्यात येतो. तारुण्याचे बदल होत असताना मनाच्या कोवळ्या पाकळ्यांवर जेव्हा प्रेमाची फुल फुलतात तेव्हा आपण सर्वात आनंदी असतो. हा बहर कधी लग्नात बांधला जातो तर कधी तसाच अव्यक्त रहातो. लग्न ह्या सामाजिक बंधनात बांधून घेतल कि पुन्हा ह्या विचारांचा विचार करायचा नाही अश्या एका नियमात आपण स्वतःला बांधून घेतो. जो आला किंवा जी आली तिच्या प्रेमात आयुष्य घालवणे हे कितीही खर असल तरी अश्या किती जोड्या मिळतात हा मोठा प्रश्न आहे.
कितीही कोन जुळले तरी त्यात फटी राहतातच. अश्या फटीत बसणार कोणी आयुष्याच्या उत्तरार्धात येत तेव्हा ते स्वीकाराव कि नाही ह्याच द्वंद मनात सुरु होत. एकच व्यक्ती सर्व पातळ्यांवर पूर्ण पडत नसताना ती जागा अनाहृतपणे व्यापणार अस कोणी असेल तर त्या मनाला पुन्हा बहर येतोच. अर्थात तारुण्यात आलेला बहर आणि आताचा बहर ह्यात खूप फरक असतो. त्या काळात अनेक गोष्टी नवीन असतात. शारीरिक पातळीवर, भावनिक पातळीवर त्यामुळे त्याच आकर्षण खूप असते. पण आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाने सगळ अनुभवलेलं असते किंबहुना त्यातून तो तालावून सुखावून बाहेर पडलेला असतो. फक्त प्रश्न निर्माण होतात ते आपण जर त्या प्रेमाला तारुण्याच्या बहराप्रमाणे घेतल तर.
वयाने विचारांची प्रगल्भता वाढतेच अस नाही. पण निदान अनुभवाने आपण समृद्ध नक्कीच होतो. त्यामुळे ह्या गोष्टींकडे कस बघायचं हे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला जमायला हव पण तस होत नाही. अस कोणी मनात आवडल, त्याच्या किंवा तिच्या विषयी अस वाटू लागल तर एकतर आपण अस काहीच नाही अस म्हणून ते सोडून देतो कारण आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला अजून एक नवीन अडचण नको असते. प्रेम होण किंवा वाटण ह्यात चुकीच काहीच नाही कारण ती एक भावना आहे. पण त्या भावनेला मूर्त स्वरूप आपण कसे देतो ह्यावर त्यातून देव निर्माण होतो कि दानव हे ठरलेल असते.
आपल्याला वाटणाऱ्या भावना ह्या नक्की कोणत्या आहेत हे शोधण म्हणजे पहिली पायरी. कारण ह्या टप्यावर जेव्हा सगळ समोर असताना नक्की आपल्याला कोणती कमी जाणवते आहे ते शोधण खूप महत्वाच. ती शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा त्या पलीकडे असेल. ती अनुभूती जाणवून मग तीच अपेक्षा आपण समोरच्याकडे व्यक्त करण हे ज्यांना जमते त्यांना हे निभावण जमते. ती अनुभूती जेव्हा दोन्ही बाजूला तितकीच खोलवर असेल तर आपण अजून एक वरच्या पातळीवर अश्या नात्यांना घेऊन जातो.
बरेचदा धावणाऱ्या जगात आपल्याला काय नक्की हव आहे? ह्याचा विचार करत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. वेळ असला तरी आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांतून अजून एक नवीन जोखड किंवा कमीटमेंट निभावण्याची आपली तयारी नसते. कारण आपल्या सोबत अजून काही लोकांची मन, जबाबदाऱ्या त्यात गुंतलेल्या असतात. तारुण्यातल प्रेम आणि उत्तरार्धातल प्रेम ह्यात हाच एक मोठा फरक असतो. तेव्हा आपण एकटे असतो. आता त्यात अनेक मन गुंतलेली असतात. त्यामुळे कशाला, कोणालाही कोणता धक्का न लावता अस नात निभावायला आपल्या विचारांची बैठक, प्रगल्भता खूप पक्की असावी लागते.
सगळा विचार एकतर्फी असून कधीच अस नात यशस्वी होऊ शकत नाही. कारण हि बैठक दोन्ही बाजूने असावी लागते. एकमेकांच्या कुटुंबांचा विचार त्यात केलेला असतो. एकमेकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य ह्यांना त्यात मान असतो किंवा निदान द्यावा लागतो. तु मला भेटली नाहीस किंवा तुला माझ्यासाठी वेळच नसतो अस कॉलेज गोइंग प्रेम असेल तर ह्या फंदात न पडलेलं बर. त्याच्याशी का बोललास किंवा तिच्याशी मैत्री का केली? किंवा तिला सोडून माझ्याकडे ये किंवा त्याला सोडून माझ्यासोबत चल अश्या अपेक्षा आपल्या न फुललेल्या अपरिपक्व प्रेमाची लक्षण दाखवतात.
ह्या वयात समाजात वावरताना काही एथिक्स पाळावेच लागतात. जर मॉल मध्ये, गर्दीच्या ठिकाणी, किंवा वर्चुअल जगात आपल्या प्रेमाच ओंगळवाण प्रदर्शन मांडत असू तर चर्चा हि होणारच. त्याचा चिखल होणारच. त्या चिखलाचे शिंतोडे आपल्या अंगावर तर आपल्या कुटुंबावर नकळत येणारच हा साधा नियम जर समजत नसेल तर आपण वयाने वाढलो अकलेने नाही. अनेकदा हे समजून घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही इकडेच आपण चुकतो. समाजाला, लोकांना बोलायला संधी आपण देतो व ते बोलल्यावर एकतर त्या नात्याचा गळा घोटतो किंवा बेजबाबदारपणे ह्यात गुंतलेल्या लोकांना, संसाराला किंवा त्यातील भावनांना पायदळी तुडवतो.
उत्तरार्धातल प्रेम हि एक सुंदर भावना आहे. कोणत्याही वयात ती कोणाबद्दल पण वाटू शकते. ती आपण कशी व्यक्त करतो, कशी निभावून नेतो किंवा त्याला कस हाताळतो ह्यातच आपली प्रगल्भता दडलेली आहे. सगळ्यांना जमतेच अस नाही. पण इतकही कठीण नाही. जर ती प्रगल्भता दोन्ही बाजूने नसेल तर अश्या नात्यात न पडणेच उत्तम. अशी नाती काही देण्यापेक्षा इतके वर्ष जपलेले, निर्माण केलेले संबंध, व्यक्तिमत्व एका क्षणात हिरावून नेतात. उत्तरार्धातल प्रेम खूप सुंदर असल तरी ते निभावून नेण खूप कठीण आहे. अर्थात प्रत्येक वेळी त्यात काटे असतात अस नाही. पण वाट मात्र बिकट असते हे नक्की. त्यासाठी दोन्ही बाजूची प्रगल्भता आणि विचारांची बैठकच ह्या रस्त्यावरून ते यशस्वी करू शकते.

एका नवीन पल्याकडे...

एका नवीन पल्याकडे... 
भारताचे कुरबुर करणारे शेजारी, सतत युद्धाच्या छायेखाली राहणारा हिमालय आणि एकाच वेळी अडीच आघाड्यांवर जर देशाच रक्षण करायचं असेल तर एक क्षितीज काबीज केल्यावर आपल्याला पुढे पुढे जावच लागते. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे असच एक क्षेत्र आहे कि जिकडे अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. भारताच्या सामारीक गरजांना पूर्ण करण्यासाठी अश्या अनेक वेगवेगळ्या टप्यांच्या क्षेपणास्त्रांची गरज भारतीय सैन्यांने बोलावून दाखवली होती. ती पूर्ण करण्यासाठी कुठेतरी अश्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारताने ह्या सोबत एका नवीन पल्याकडे वाटचाल केली आहे.
ह्या एप्रिल महिन्यात भारताने इस्राइल ह्या देशासोबत २ बिलियन अमेरिकन डॉलर चा एक करार केला. मध्यम अंतराच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र निर्मिती चा हा करार आहे. ह्या करारानुसार इस्राइल ची इस्राइल एरोस्पेस इंडस्ट्री आणि भारताची डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एकत्रितपणे हे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहेत. इस्राइल भारतात निर्माण होणाऱ्या पहिल्या विमानवाहू नौकेसाठीपण लांब पल्याच क्षेपणास्त्र तसेच मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि ह्या करारानुसार देणार आहे.
एम.आर.एस.ए.एम. हि क्षेपणास्त्र प्रणाली कमांड/कंट्रोल सिस्टीम, रडार, मिसाईल आणि मोबाईल लोंचर ने परिपूर्ण असून हि प्रणाली कोणत्याही लक्ष्याचा शोध आपल्या रडार ने शोधून लक्ष्य हे शत्रूच आहे कि आपल आहे हे ओळखून पुढील कार्यवाही करते. ह्यातील मिसाईल वर अतिशय प्रगत रडार मिसाईल च्या टोकावर असून हे कोणत्याही ऋतूत ते लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम आहे. ह्या मिसाईल वर स्वतः उध्वस्थ करणारी यंत्रणा असून ह्यामुळे ह्या मिसाईल ची मारक क्षमता अतिशय उच्च दर्जाची आहे. ह्यामुळे कोल्याट्ररल ड्यामेज कमी होते. ह्यातील मिसाईल हे ४-५ मीटर लांबीचे असून २७६ किलोग्राम वजनाचे असणार आहे.
ह्या मिसाईल मध्ये ड्यूल प्लस सॉलीड प्रपोलेशन सिस्टीम असून हि सिस्टीम डी.आर.डी.ओ. ने निर्माण केली आहे. उड्डाणाचा आदेश मिळताच हि मिसाईल २ माख ( ध्वनीच्या दुप्पट वेगाने ) आपल्या लक्षाकडे झेपावते. ७० किमी च्या कोणत्याही क्षेत्रात हि मिसाईल सिस्टीम एकाचवेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. मे २०१५ मध्ये भारतीय सेनेने आकाश हि अशीच प्रणाली भारतीय सैन्यात दाखल केली आहे. २५ किमी च्या क्षेत्रातील कोणत्याही हेलिकॉप्टर , यु.ए.व्ही. , तसेच विमानाचा वेध घेण्यात सक्षम आहे.
आता नवीन मिसाईल प्रणालीमुळे हीच क्षमता ७० किमी वाढलेली आहे. अश्या प्रगत अत्याधुनिक क्षमतेच्या मिसाईल प्रणालीमुळे भारतीय सैन्याची ताकद कमालीची वाढणार आहे. २०२० पर्यंत हि प्रणाली भारताच्या सैन्यात दाखल होईल. ह्या मे महिन्यात भारताने आपल्या पुढल्या अतिप्रगत ब्राह्मोस ह्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रची चाचणी अंदमान निकोबार मध्ये यशस्वीरित्या केली आहे. इस्राइल ने हे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरण करण्याच मान्य केल. भारतात एकदा ह्याच उत्पादन चालू झाल्यावर वर्षाला १०० मिसाईल बनविले जातील.
१७,००० कोटी रुपयांचा हा करार भारत-इस्राइल मधील संबंध तर वृद्धिंगत तर करेलच पण त्याच सोबत भारताला अडीच आघाड्यांवर सक्षम करणार आहे. येणाऱ्या काळात भारताला सक्षम राखण्यात ह्या मिसाईल चा मोठा भाग असणार आहे. नुसत्या बंदुकीने सीमा राखल्या जात नाहीत. त्यांना गोळ्या लागतात. त्यांना तंत्रज्ञान लागते. हे उच्च तंत्रज्ञान आपल्या सैन्याला येत्या काळात मिळणार आहे. ह्या निर्मितीमुळे भारत एका नवीन पल्याकडे वाटचाल करत आहे.

Every Second counts…

Every Second counts…
घड्याळाच्या काट्यावर फक्त मुंबईकरांची नजर असते अस नाही. प्रत्येक मिनिटाला एक पर्व मानून जिवाच्या आकांताने ट्रेन पकडणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला प्रत्येक मिनीटाच महत्व वेगळ काही सांगायला नकोच. पण ज्या घडाळाच्या जोरावर मुंबईकर धावतात ते चुकल तर? होणारा गोंधळ कोणताही मुंबईकर सांगूच शकेल. असाच एक गोंधळ सध्या अवकाशात चालू आहे. भारताच्या नाविक प्रणाली मधील एका उपग्रहावरील तिनही रुबिडीयम घड्याळ बंद पडली आहेत. नाविक हि जी.पी.एस. प्रणाली ७ उपग्रहांच्या एकत्रीकरण करून चालवली जाते. ह्यातील एक उपग्रह आय.आर.एन.एस.एस.- १ ए वरील तिन्ही रुबिडीयम
घड्याळ बंद पडलेली आहेत. ह्यामुळे ह्या उपग्रहाला बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या महिन्याच्या अखेरीस तातडीने इस्रो आय.आर.एन.एस.एस.- १ एच हा उपग्रह प्रक्षेपित करत आहे.
एका घड्याळामुळे एक पूर्ण उपग्रह निकामी झाला ह्यावरून घड्याळाच महत्व अधोरेखित व्हावं. उपग्रहामधील हि घड्याळ अतिशय अचूकतेने फ्रिक्वेन्सी सिग्नल दाखवतात. ३६,००० किमी. वरून काही मीटर मध्ये आपल लोकेशन दिसण्यासाठी जी.पी.एस. प्रणाली मधील उपकरण अतिशय उच्चतम अचूकता असावी लागतात. एका सेकंदाच्या काही सूक्ष्म भागापेक्षा जेव्हा तुमचे सिग्नल अचूक असतील तेव्हाच हि प्रणाली काम करू शकते. म्हणून फोन वर जी.पी.एस वापरताना खूप सोप्प वाटल तरी त्या मागे प्रचंड अशी तंत्रज्ञानातील प्रगती कारणीभूत आहे. तर अशी हि अचूक वेळ दाखवण्यासाठी रुबिडियम अणु घड्याळ वापरली जातात.
अणु घड्याळ हे मानवनिर्मित सर्वात अचूक वेळ मोजण्याच यंत्र आहे. ह्यात अणूतील इलेक्ट्रोन चा वापर करून वेळ सांगता येते. अणु च्या भोवती फिरणारे इलेक्ट्रोन आपली कक्षा जेव्हा बदलतात तेव्हा एकतर ते उर्जा बाहेर टाकतात किंवा आत्मसात करतात. ह्या उर्जेची फ्रिक्वेन्सी हि त्यांच्या दोन कक्षांच्या उर्जेतील फरकांवर अवलंबून असते. ह्यामुळे ह्या कक्षाबदलांना गणितात बसवून आपण अचूक वेळ सांगू शकतो. उदाहरण द्यायचं झाल तर एका पूर्ण दिवसातील दहा च्या १४ व्या घातातील एक भाग इतक्या प्रचंड अचूकतेने आपण वेळेला वेचू शकतो. ( १० गुणिले १० अस १४ वेळा करून जे उत्तर येईल त्यातला एक भाग). ह्यात अनेक वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु वापरण्यात येतात व त्यावरून ह्या अणु घड्याळानां त्याचं नाव मिळते. इस्रो ने वापरलेल्या घडाळ्यात रुबिडियम चे अणु वापरले जातात म्हणून ह्याला रुबिडियम घड्याळ अस म्हणतात.
जगात घड्याळात सर्वश्रेष्ठ घड्याळ कुठली अस म्हंटल तर शेंबड पोर पण सांगेल स्विसमेड. अवकाशात पण ऑरीओला स्प्रेट्राटाईम ह्या स्विस कंपनी ने बनवलेली घड्याळ उपग्रहात बसवली गेली होती. चीन, इस्राइल, युरोपातील अनेक देश ह्याच कंपनीकडून आपल्या उपग्रहात ह्या कंपनी ची घड्याळ बसवतात. पण ह्या कंपनी ने बनवलेल्या एका साच्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. कारमध्ये जसे अनेकवेळा तयार करताना बिघाड होतात तसे. जमिनीवर त्याला तयार करणारा कार परत बोलावून त्यातील दोष दूर करू शकतो पण अवकाशात सोडलेला उपग्रह कसा परत आणणार? ह्यामुळेच भारताला पर्यायी उपग्रहाची गरज भासली. इकडे हि इस्रो ची दूरदृष्टी कामाला आली. नाविक प्रणाली मधील उपग्रह जर कोणत्याही कारणाने खराब झाला तर त्याचा ब्याक अप म्हणून इस्रो ने अजून २ उपग्रह बनवून जमिनीवर तयार ठेवले आहेत. ह्याचा प्रत्यय आपल्याला लगेच आला. उपग्रह खराब होताच इस्रो ने आपला ब्याक अप उपग्रह उड्डाणासाठी लगेच सज्ज केला. जर हा उपग्रह नसता तर आपल्याला अजून एक – दोन वर्ष उपग्रह तयार होण्याची वाट बघावी लागली असती. त्या काळात नाविक च्या अचूकतेवर परिणाम झाला असता.
इस्रो ने उपग्रहाला तयार करून ह्या महिन्याखेरीस आपल्या वर्कहॉर्स रॉकेट वरून अवकाशात सोडत आहे. अणु घड्याळातील हा त्रास दूर करण्यासाठी इस्रो ने स्वतः अशी घड्याळ बनवण्याचं ठरवलं आहे. इस्राइल देशाने ह्या मध्ये हि सर्वोतोपरी आपल तंत्रज्ञान देण्याच मान्य केल असून तसा करार काही महिन्यांपूर्वी आपले पंतप्रधान इस्राइल मध्ये असताना भारत आणि इस्राइल ह्यामध्ये झाला आहे. युरोपियन देशाने बनवलेल्या रुबिडियम घड्याळावर अवलंबून रहाणे म्हणजे एका पूर्ण उपग्रहाच्या कार्यक्षमतेच्या चाव्या त्याच्या हातात देणे. म्हणूनच इस्रो ने ह्यावर काम करायला सुरवात केली आहे. अणु घड्याळ वाचताना सोप्प वाटल तरी त्याची मांडणी आणि तंत्रज्ञान खूप किचकट आहे. म्हणूनच भारत हि घड्याळ बाहेरून विकत घेत होता.
आपल्यासाठी एक वर्ष, एक महिना, एक आठवडा, एक तास, किंवा फारफार तर मुंबईकरांच्या भाषेत एका मिनीटाच महत्व असल तरी जेव्हा गोष्टी अवकाश तंत्रज्ञानाशी निगडीत असतात तेव्हा Every Second Counts असच म्हणाव लागेल.

पर्सनल मेसेजिंग.. आगीतून निघून फुफाट्यात...

पर्सनल मेसेजिंग.. आगीतून निघून फुफाट्यात... 
पर्सनल मेसेजिंग हा प्रकार खरे तर याहू ने पहिल्यांदा सुरु केला. आपल्याला अनोळखी तसेच ओळखीच्या व्यक्तीशी इंटरनेट च्या माध्यमातून संवाद साधण सोप्प झाल. फेसबुक ने त्याला अजून वेगळ्या उंचीवर नेल. फोटो, विडीओ शेअरिंग सह व्यक्तीच प्रोफाईल बघून बोलण्याची सुरवात करावी कि नाही हा एक मोठा प्लस पोइंट फेसबुक ने दिला. सराहा ने तर आता सिक्रेट मेसेजिंग चा पर्याय समोर उपलब्ध करून दिला आहे. पण ह्या सगळ्यात स्त्री आणि पुरुष दोघांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात अशीच होते आहे.
सराहा काय भानगड आहे म्हणून मी त्यात अकाऊंट काढल तशी पोस्ट हि इकडे टाकली. त्यावर अनेकांनी निनावी मेसेज केले. तुमच्या लेखनाचा फ्यान ते तुम्हाला कधी भेटू अस म्हणत अनेक मेसेज आले. पहिल्यांदा वाचताना खूप मज्जा वाटली कारण अस कोणाला तरी वाटते हे जाणून घेण खूप मस्त होत. पण एक अडचण समोर आली तिचा विचार करताना जे भयावह सत्य जाणवलं त्यामुळे सराहा ला कायमचा रामराम ठोकला. जेव्हा मला कोणीतरी निनावी मेसेज केला “मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे” तेव्हा पूर्ण दिवस हा मेसेज डोक्यात घोळत होता कि कोण हि व्यक्ती असेल? आपण ओळखतो का? आपल्या फेसबुक च्या मित्र यादीत आहे का? वगरे. ह्या सगळ्यात मला जाणवलं कि ह्या सिक्रेट मेसेजिंग मध्ये ना आपण त्याला उत्तर करू शकत ना ती व्यक्ती कोण आहे ह्याचा उलगडा होत होता. तरीपण एक पूर्ण दिवस ते कोण असेल ह्याचा विचार करण्यात मी घालवला.
समजा हाच मेसेज काही घाणेरड्या अंगाने किंवा सूडबुद्धीने आला असता तर? हा विचार करता मी तिकडेच थबकलो. कारण जर चांगल्या विचारांनी केलेल्या मेसेजसाठी मनात दिवसभर चलबिचल असेल तर वाईट मेसेजस ने काय होईल? एक साधा मेसेज कि काल मी तुला बोरिवलीत बघितल? असा विचार केला तरी त्या पूर्ण दिवसाचा आढावा आपण घेत बसू. कोण असेल? कुठे बघितल? कोण होत आपल्यासोबत? कोणी पाठलाग करते आहे का? बघण्याच प्रयोजन आणि मेसेज च प्रयोजन काय? इतके सगळे प्रश्न मनात उभे राहिले. वास्तविक लपवण्यासारख काही नसताना पण कोणीतरी अनाहूतपणे आपल्या खाजगी आयुष्यात डोकावते आहे. असच मला वाटल. चांगल – वाईट हा भाग नंतर पण माझ्या गोष्टीत कुठेतरी कोणी लक्ष देते हाच विचारमुळी प्रचंड ताण वाढवणारा वाटला. त्यामुळे ह्या प्रकारापासून लांब राहण चांगल हेच मनाशी ठरवलं.
फेसबुक वरील स्त्रियांचे मेसेज बॉक्स म्हणजे दाणे टाकण्याच्या प्रवृत्तीची जिवंत उदाहरण आहेत. हाय कशी आहेस? ते छान लिहतेस, कविता काय सुंदर, खूप छान दिसतेस ते अगदी त्या रंगाच्या कपड्यात उठून दिसतेस पासून सुरु झालेला प्रवास स्वतःचे रावडी भाषेत “यो” फोटो, रोज गॉगल लावून महागाच्या गाड्या / बाईक सोबत म्याचोम्यान फोटो पाठवून कोणी सावज हाताशी लागते का चा केलेल्या प्रयत्नांनी भरलेले असतात. रोज २०-३० जणींना वय न बघता असे मेसेज करायचे. त्यातल्या काही नाही तर ६-७ तरी हुरळून जाऊन रिप्लाय करतात. त्यातल्या २-३ जणांशी संवाद सुरु होतो आणि एखाद सावज मिळतेच. इतक्या प्री प्लान पद्धतीने फेसबुक वर खेळ खेळणारे अनेक महाभाग आहेत. ह्यातल्या कोणी जर बंड केले तर अतिशय अर्वाच्च भाषेत शिव्यान पासून स्त्री च्या इभ्रतीचे धिंडवडे काढायचे. लज्जेखातर एकतर अश्या गोष्टी पुढे येत नाहीत. शेवटी ब्लॉक करण हा एकच ऑप्शन समोर रहातो. पण ह्या सगळ्यात निर्माण झालेल्या तणावाच काय? सगळेच पुरुष तसे नसतात पण चांगला- वाईट ठरवणार कस? बर आधी चांगला वाटलेला जेव्हा नंतर तीच री ओढतो तेव्हा निर्माण होणारा ताण कित्येक पट असतो. पण जिकडे आपलच जळते तिकडे कोण कोणाला आधार देणार?
फेसबुक मेसेज नी एकमेकांना बोलण्याच स्वातंत्र दिल पण त्या सोबत एक अनामिक दडपण पण लादल ह्यातून स्त्री आणि पुरुष कोणीच सुटलेलं नाही. नक्कीच स्त्रियांच्या बाबतीत हे जास्ती असते ह्यात दुमत नाही. पण काही स्त्रीयांना हेच आवडते म्हणून पुरुष चेकाळतात हे सत्य हि लपवता येणार नाही. कोणी तरी आपल्याला छान म्हंटल कि स्वर्गात जाऊन अप्सरा बनणाऱ्या स्त्रिया हि कमी नाहीत न त्यांना तो दर्जा देणारे दाणे टाकणारे पुरुष हि. प्रत्येकाला पडद्यामागची मज्जा हवी असते. मेसेंजर तो पडदा दिला. त्या मागे कोणी कोणाला घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या गोष्टी चव्हाट्यावर आणताना आपण हि तितकेच जबाबदार असतो ह्याच भान दोन्ही बाजूने ठेवायला हवच.
सराहा ने तर ह्यापुढे जाऊन स्वातंत्र्य दिल आहे. म्हणजे आधी निदान कोणाला ब्लॉक करयाच ते कळत तरी होत. आता ती पण सोय नाही. म्हणजे कोण कोणाला वाटेल त्या भाषेत काहीही लिहू शकत. समोरच्याने फक्त ऐकून घ्यायचं आणि वाचायचं हे वन वे स्वातंत्र्य आधी मज्जा वाटत असल तरी आपल्या मनाला कधी पारतंत्र्यात घेऊन जाते कळणार पण नाही. सराहा ने मनातल्या गोष्टी सांगण्याचा एक अभिनव मार्ग दिला असला तरी तो आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखाच आहे. तो स्वीकारायचा का नाही हे ज्याच त्यानेच ठरवायचं पण दो पल कि मजा जीवनभर कि सजा होऊ शकते हा विचार करून त्यात उडी मारलेली बरी.

भावनेतील बुद्धिमत्ता...

भावनेतील बुद्धिमत्ता... 
भावना हि मनुष्य प्राण्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. ती जरी प्राण्यान मध्ये किंवा सजीवांमध्ये असली तरी तिला अनेक रुपात व्यक्त करण्याच सामर्थ्य फक्त मानवाला आहे. म्हणूनच नातेसबंधाच्या अनेक पायऱ्या आपल्या आयुष्यात प्रत्येक माणूस चढत जातो. बुद्धिमत्ता हि अजून एक देणगी मानवाला आहे कि ज्यामुळे पृथ्वीवर आज तो इतका प्रगती करू शकला आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच माणसाच्या हानीसाठी पण कारणीभूत ठरतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी बनते. पण हाच हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून रॉकेट च इंधन सुद्धा. असच काहीस ह्या दोन्ही गोष्टींच असते.
बुद्धिमता हि मेंदूत असते तर भावना हि मनात. मन आणि मेंदू एकाच वेळी काम करत असतात. पण दोघेही आलटून पालटून माणसाला कंट्रोल करतात. हे प्रमाण कमी अधिक प्रत्येक माणसाच्या बाबतीत असते. माणूस जितका बुद्धिवादी तितका कमी वेळ मनाला मिळतो म्हणून आपल्या क्षेत्रात दादा असणारी हि माणस भावनेच्या काळात मेंदू कडेच रिमोट कंट्रोल ठेवतात. उदाहरण द्यायचं झालच तर एखादा प्रथितयश अभियंता मानवनिर्मित गोष्टीकडे इंजिनीअरिंग च्या दृष्ट्रीकोनातून बघतो. त्यामुळे त्यातल सौंदर्य त्याला दिसत नाही. तो बांद्रा वरळी सी लिंक बघताना त्यातल्या इंजिनिअरिंग कडे बघेल पण समुद्रात असणाऱ्या त्याच्या सौंदर्याकडे क्वचितच लक्ष जाईल.
भावनाशील माणूस नेहमी गोष्टींकडे मनातून बघतो. त्याच मन नेहमीच त्याच्या प्रत्येक गोष्टींवर कंट्रोल करत असते. म्हणून अशी माणस आयुष्यात खूप चुका करतात. स्पेशली आयुष्यातले निर्णय जर भावनेने घेतले तर तोंडघाशी पडण आलच. प्रयोगशील होण ह्या माणसांना जमत नाही. म्हणून हि माणस नेहमीच चाचपडत, होरपळत असतात. मन आणि मेंदू हे दोघेही माणसाच्या शरीराचा ताबा आलटून पालटून घेत असताना कोणाच्या आहारी न जाता योग्य वेळी योग्य संधी म्हणा किंवा योग्य वेळी योग्य पद्धतीने विचार करतो तोच जास्त आयुष्यात यशस्वी होतो.
ह्या दोन्ही टोकावर रमणारी माणस खूप आहेत. प्रश्न आहे तो आपण हि टोक बदलायची केव्हा? आयुष्यात अनेक असे प्रसंग येतात कि जिकडे आपल्या नकळत ह्यातीन एक जण आपला ताबा घेतो. आनंद, दुखः, अपमान, संताप, चीड, किळस अश्या विविध टोकांच्या भावनिक आंदोलनाच्या वेळी मन आपसूक आपला ताबा घेत. सारासार विचार करण्याची शक्तीच आपण गमावून बसतो. म्हणूनच अश्या वेळी निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवण्यात आपली प्रगल्भता आहे. कोणताही निर्णय मग तो लहान- मोठा कसा हि का असेना ह्या काळात घेतलेला आपल्याला पश्चाताप , मनस्ताप देतोच. रागाच्या भरात निघालेले शब्द, कृती हे अस काही नुकसान करतात कि कधी कधी परत येण पण शक्य नसते. आत्महत्या हि पण अशीच एक कृती आहे कि नेहमीच भावनेच्या भरात केली जाते.
बुद्धिमत्तेने सगळेच प्रश्न सोडवता येत नाहीत. समाधान मिळवायला, जाणवायला मन लागते. एखाद्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला मन लागते तिकडे आपल मन हवच. अश्या गोष्टी मेंदूने नाही अनुभवता येत. माणसाची प्रगल्भता इथेच कि त्याने मन आणि मेंदू ह्यापेकी कोणाला कधी ताबा द्यायचा. बुद्धिमत्ता जेव्हा आपल्याला कंट्रोल करते तेव्हा “कल करे सो आज कर, आज करे सो अब कर” हे तत्व आपण नेहमीच पाळायला हव. मेंदूने घेतलेले निर्णय हे सारासार विचार करून असतात आणि त्याला अनुभव, तत्व तसेच व्यवहाराची जोड असते. म्हणून ते योग्यच ठरतात. जेव्हा आपण भावनेच्या भरात असतो तेव्हा हेच वाक्य उलट करायचं “अब करे सो बादमे कर, आज करे सो कल कर” म्हणजे कोणताही निर्णय न घेता शांत होऊन बाजूला व्हा. एखादी कॉफी, एखादा चित्रपट, एखादा वॉक, एखाद सुंदर गाण ऐका किंवा अगदीच काही नाही जमल तर शांत बसून तुमचा कंट्रोल मेंदूच्या ताब्यात येईपर्यंत काहीच करू नका. आयुष्य खूप मोठ आहे. आजचा निर्णय उद्या घेतला तर काही बिघडत नसते. सगळच सेम रहाते. अश्या वेळेस सिट ब्याक, रील्याक्स एंड एन्जोय टाईम विथ युरसेल्फ.
भावनेच्या भरात केलेल कोणतही कृत्य आणि मेंदूने घेतलेला आस्वाद हे नेहमीच रॉकेट मधील हायड्रोजन आणि ऑक्सिजन च मिश्रण असते. त्याने विध्वंस होणारच. तर भावनेतून घेतलेला आस्वाद आणि मेंदूने घेतलेले निर्णय हे पाणी बनवणार हायड्रोजन- ऑक्सिजन च मिश्रण असते. ज्यात आपली तहान भागवायची आणि आयुष्याला जिवंत ठेवण्याची ताकद असते. भावनेतील बुद्धिमत्ता समजली तर आयुष्यातील अनेक गुंते निर्माण होणार नाहीतच आणि झालेच तर ते सोडवायची मास्टर कि आपल्याकडे तयार असेल.

धार्मिक अंधश्रद्धा ...

धार्मिक अंधश्रद्धा ... 
श्रद्धेवरचा विश्वास, आस्था, त्याला जपणं, ती जोपासणं हे सगळं महत्वाचं असलं तरी त्यावरचा अंधविश्वास मात्र आपल्याला भयंकर परिणाम दाखवतो. एखाद्या देव, गुरु, संत, किंवा पंथ ह्यावरील श्रद्धा आपल्याला एका चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते. आपला उत्कर्ष घडवते. चांगल्या विचारांची साथ आपला वर्तमान, भविष्य उज्ज्वल करते. पण ह्या मार्गाच अंधानुकरण म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर मारणं. आपला गुरु, संत, पंथ किंवा देव सांगतो म्हणून कोणत्याही अमानवीय, अतिरेकी, विध्वंसक कृत्य म्हणजे श्रद्धेची अंधश्रद्धा होय.
कोणत्याही श्रद्धेत कोणाचं वाईट, कोणाला त्रास होईल असं कोणतंच कृत्य नसते. तरीपण श्रद्धेच्या नावाखाली आपण अशी कृत्य करतो. आपण विश्वास ठेवलेली गोष्ट बरोबर असेलच असं नसते. जर घरातील व्यक्ती दगा देऊ शकतात तर विश्वास ठेवलेली श्रद्धा का नाही. आपण त्याच अंधानुकरण करायचं कि नाही हे आपण ठरवायचं. आपलं शिक्षण, अनुभव, आपले प्रगल्भ व्यक्तिमत्व हेच तर आपल्याला शिकवतात. काय योग्य आणि काय अयोग्य हे विचार करण्याची सारासार बुद्धी गहाण ठेवून जर आपण पुढे जात असू तर असे अनेक गुरु, संत तसेच पंथ निर्माण होत रहाणार जे एक समाज म्हणून आपली अधोगती करत रहाणार.
स्त्री च्या आत्मसन्मान पायदळी तुडवत जर तीच शोषण, बलात्कार करणारा कोणीतरी गुरु जर आपल्या श्रद्धेचं वजन वापरत पूर्ण सिस्टीम ला वाकवू शकतो. त्याला आपण कुठेतरी नकळत साथ देत असू तर हा हि एक प्रकारचा आतंकवाद आहे. ज्या निष्पाप लोकांचे जीव गेले किंवा दिले. त्या लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या गुरूंना जर कायदा फक्त पोसणार असेल तर आपल्या कायद्याचा हि विचार व्हावा. भारतीय सेना हि आपल्या सिमांच रक्षण करण्यासाठी आहे. तिला ह्या असल्या अंधश्रद्धेच्या खेळाला आटोक्यात आणण्यासाठी बोलवावं लागते हि समाज म्हणून आपली झालेली अधोघती नक्कीच आहे. ह्या कारवाईत लोक मारले गेले तर त्यांना संवेदना म्हणून मोर्चे, पोलिसांवर कारवाई होणार असेल तर आपण २१ व्या नाही तर १८ व्या शतकाच्या अराजकतेकडे वाटचाल करत आहोत. धार्मिक आतंकवाद आज जर आपल्या पुढलं सगळ्यात मोठं आव्हान असेल तर हे प्रकार त्याचाच भाग आहेत. कारण श्रद्धेला वापरून हिंसा दाखवून त्या मागे पळणारी, लपणारी हि मंडळी त्याच आतंकीभावनेला खत पाणी घालत आहेत. मी देव आहे, गुरु आहे, संत आहे, पंथ आहे. मी जे करिन ते सर्वच त्या शक्तीने दाखवलेला मार्ग आहे. केलेल्या वाईट कृत्यांसाठी मला शिक्षा होऊ शकत नाही कारण मी तो सर्वसेवा करणारा आहे. हि भावना मुळी धार्मिक आतंकवादाला खतपाणी घालणारी आहे.
डोळे बंद करून आपल्या गुरु, संत, पंथ ह्यांनी केलेल्या प्रत्येक कृत्य, रस्त्याचं समर्थन आपण अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे दाखवून देतो. त्या समाजाचा भाग म्हणून मला कुठेतरी हे सगळं खूप अस्वस्थ करणार आहे. ज्या स्त्री च्या आत्मसन्मानासाठी मूक मोर्चे निघतात. कॅण्डल मोर्चे निघतात. त्या स्त्री वर बलात्कार करून राजरोसपणे मोकळं फिरणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ म्हणून २९ लोक जीव देतात. हे सगळंच कोड्यात टाकणार आहे. भारत ह्या देशात जन्मलो म्हणून नेहमीच अभिमान वाटत आला पण ह्या अश्या घटना कुठेतरी हा विश्वास मुळापासून हलवून टाकतात हे नक्की. अश्या गुरु, संत, पंथ सगळ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि व्हायला हवी. ज्या निष्पाप लोकांचे प्राण ह्यात गेले.
जे नुकसान झालं त्या सगळ्याला तो गुरु, संत आणि पंथ सगळेच जबाबदार आहेत. नुसतं टी.व्ही. समोर शांतीच अपील करायचं आणि मागे संघटन आणि आपल्यावरील विश्वासाचा फायदा उचलत हिंसा करायची. ह्या सगळ्याला जर कायदा रोखू शकत नसेल तर अशी धार्मिक अंधश्रद्धा ह्यापुढे हि अशीच फोफावत जाणार. धर्म, जात, पंथ कोणताही असला तरी त्याचा खरा चेहरा हा दशहतवादाचा असणार आहे. आपण सुजाण, प्रगल्भ नागरिक म्हणून अश्या लोकांपासून एकतर दूर राहण , समर्थन न करण आणि अश्या लोकांचा, शक्तींचा विरोध नक्कीच करू शकतो. आज कुठेतरी त्याची जास्ती गरज आहे असं मला मनापासून वाटते.

We Are One…

We Are One… 
सगळ्या नातेसंबंधात एकच अडचण असते ती म्हणजे समजून घेण. “मला कोणी समजून घेत नाही” आपण नेहमीच हे एक वाक्य ऐकतो. समजून घेण म्हणजे काय? हे आयुष्याच्या उत्तरार्धात पण अनेकांना समजत नाही. समजून घ्यायचं म्हणजे मनाप्रमाणे वागायचं का? सगळ्या हो ला हो करायचं का? एखाद्याच्या मनात काय चालल असेल तर ते ओळखायच कस हा यक्ष प्रश्न नेहमीच नातेसंबंधामध्ये आपल्या समोर असतो. We Are One हि जाणीव कदाचित ह्याची उत्तर आपल्याला शोधायला नक्कीच मदत करेल.
समोरचा जसा विचार करतो तसा आपण केला तर? म्हणजे थोडा वेळ आपल्या स्व आणि आपल्या विचारांना बाजूला ठेवून आपण समोरच्याशी एकरूप झालो तर. हे एकरूप होण म्हणजेच We Are One. प्रेमापासून ते भांडणापर्यंत सगळ्याच वेळी आपण एकरूप झालो तर. कदाचित समोरच्याला काय सांगायचं आहे ते न बोलता पण जाणून घेऊ शकू. हे शक्य होईल जेव्हा आपण त्याची जागा घेऊ. रोजच्या जगण्यात अनेकवेळा आपले वैचारिक वाद होतात. आपल्याला नक्की काय सांगायचं आहे एकतर ते सांगता येत नाही किंवा समोरचा काय सांगतो आहे ते आपल्याला कळत नाही. अश्यावेळेस We Are One झालो तर नक्कीच परिस्थती आणखी चांगल्या आणि प्रगल्भपणे हाताळता येईल.
शरीर सुखाच्या संकल्पने पासून पण ते प्रेमाच्या कल्पनेपर्यंत आपण सगळ्याच लेवल वर आपण जर We Are One झालो तर ऑर्गझम ची संकल्पना स्वप्न नाही रहाणार तर ती सवय बनेल. कारण काय हव आहे हे जर कळल आणि तेच आपण दिल तर ऑर्गझम ह्याहून वेगळा काय असतो? शरीर एकरूप न होता पण आपण त्या स्थितीत पोहचू शकू. ओशो न हाच सेक्स तर अभिप्रेत होता. We Are One म्हणजे एक दुसऱ्याशी अस एकरूप होण कि जिकडे काही न सांगता सुद्धा मनातल कळत. आपण अनेकदा अनुभवल हि असेल आपला जोडीदार, मित्र, मैत्रीण, वर्चुअल अनोळखी माणूस पण कधी कधी आपल्याला आपण जस आहे तस ओळखतो. कारण तो/ ती आपल्याशी We Are One लेवेल वर कनेक्ट असतो.
We Are One म्हणजे प्रेम करणे नाही तर समजून घेण्याची सुरवात आहे. समोरचा कोणत्या मनस्थितीत आहे. त्या ठिकाणी जर आपण असू तर आपण काय केल असत हा विचार त्या व्यक्तीच्या मानसिकतेतून. इकडे ती मानसिकता महत्वाची कारण आपण स्वतःला तिकडे ठेऊन जर आपल्याच विचारातून परिस्थती बघितली तर कदाचित आपली मत पुन्हा वेगळी असतील पण त्या व्यक्तीच्या मानसिकतेने जर विचार केला तर कदाचित त्या अवस्थेला पण आपण अनुभवू शकू.
वाचताना हे कठीण वाटल तरी तितकस कठीण नाही. प्रेमाच्या, शरीर सुखाच्या संकल्पना ह्या दोन व्यक्तीच्या , जोडीदारांच्या वेगळ्या असू शकतात. परुष आणि स्त्री दोन वेगळी व्यक्तिमत्व जेव्हा जवळ येतात एक होण्यासाठी तेव्हा आपण We Are One झालो तर. एक क्षणभर विचार केला कि माझ्या जोडीदाराला माझ्याकडून काय हव आहे किंवा काय दिल्याने त्याला, तिला आनंद मिळेल. हा एक क्षण तुमच्या क्रियेला मशीन आणि ऑर्गझम ह्या मध्ये वेगळ करेल. हे We Are One होण फक्त तिकडेच मर्यादित नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ते आपण अनुभवू शकतो. एखादी खटकलेली गोष्ट जर समजत नसेल तर कदाचित समोरच्या मनातून केलेला विचार पुढचे अनेक गुंते अगदी चटकन सोडवेल ह्यात शंका नाही.
We Are One म्हणजे मनाची प्रगल्भता, We Are One म्हणजे समोरच्याला समजून घेण्याची असलेली जाणीव, We Are One म्हणजे आपल्या नात्याचा विश्वास, We Are One म्हणजे परिपूर्णता, We Are One म्हणजे आपल्या स्व ला बुडवून प्रेमाला दिलेली हाक. अर्थात ह्या विचाराला समजून घ्यायला वेळ आणि समंजस मन हि हवच. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. म्हणून तर ह्यात We आहे. I नाही. सुरवात आपल्यापासून केली तर I च We व्हायला वेळ लागणार नाही.