Tuesday, 3 September 2024

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

"व्हॉट अ शॉट" या नावाने काल एक क्लिप व्हायरल झाली आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं. १९९८ चा काळ आणि शारजा क्रिकेट ग्राउंड. भारत आणि ऑस्ट्रेलिया च्या त्या सामन्यात मायकेल कास्प्रोवीच ला सचिन तेंडुलकर ने मारलेला तो उत्तुंग षटकार आणि टोनी ग्रेग च्या मुखातून निघालेले तेच शब्द पुन्हा ऐकल्यासारखे वाटले. पण यावेळेस ते शब्द एका भाष्यकाराच्या मुखातून बाहेर आले होते ते एका १७ वर्षाच्या मुलीसाठी जिच्या प्रतिभेने जगाला तोंडात बोटे घालायला लावली आहेत. जगातील एकमेव खांदा वापरून तिरंदाजी करणारी आणि आधुनिक कंपाऊंड धनुष्य वापरण्यात जगातील क्रमांक १ ची खेळाडू भारताची शितल देवी हिच्यासाठी.  

शितल देवी भारताच्या मुकुटात म्हणजेच जम्मू काश्मीर इथल्या एका छोट्या खेडेगावात गरीब घरात राहणारी एक सर्वसामान्य मुलगी. जन्मतः फोकोमेलिया, या एका दुर्मिळ जन्मजात विकारामुळे आपले हात गमावून बसलेली. या आजारामुळे तिच्या हाताची वाढ होऊ शकलेली नाही. दोन्ही हात नसताना आपल्या मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची चिंता तिच्या आई वडिलांना लागून राहिलेली होती. शेती करणारे वडील आणि घरची बेताची परिस्थिती त्यात जम्मू काश्मीर सारखा संवेदनशील भाग अश्या सगळ्या खडतर परिस्थितीतून पुढे उज्ज्वल भविष्याचा विचार करण्याचं धाडस सर्वसामान्य माणसं करू शकत नाहीत. पण शितल वेगळी होती. म्हणतात न,

‘The only person stopping you is yourself. Where there is a will there is a way.’”

आपल्या दोन्ही हातांच्या नसण्याला शितल ने आपली सगळ्यात मोठं प्रेरणास्थान बनवलं. जे काम हात असणारी लोक करू शकतात ते आपण हात नसताना करून दाखवण्याचा चंग तिने बांधला. त्यातूनच मग हाताची काम पायाने आणि शरीराच्या इतर अवयवांच्या मदतीने करायला ती शिकली. मग ते लिखाण असो, केस विंचरण किंवा स्वतःला आरशात बघणं असो. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत जगाच्या काय आपल्या गावाच्या खिजगणतीत नसलेल्या शितल मधल्या प्रतिभेला ओळखलं ते भारताच्या सैन्य दलाने. राष्ट्रीय रायफल या भारतीय सैन्य दलाच्या एका कार्यक्रमात हात नसताना फक्त आपल्या पायांच्या जोरावर शिताफितीने झाडावर सरसर चढणाऱ्या शितल मधील प्रतिभेला भारताच्या सैन्य दलाने अचूक हेरलं आणि तिथून सुरु झाला एक वेगळा प्रवास.

भारताच्या सैन्य दलाने तिला योग्य ती औषध, व्यायाम आणि तिच्यातील लपलेल्या तिच्या स्वतःच्या प्रतिभेची जाणीव करून दिली. तिला दिलेल्या वेगवेगळ्या पर्यायातून तिने तिरंदाजी मधे आपल्याला रस असल्याचं सांगितलं. पण तिरंदाजी करण्यासाठी हात असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी कृत्रिम अवयव (प्रोस्थेटिक्स) बसवणं हा पर्याय निवडावा लागणार होता. पण प्रोस्थेटिक्स हा पर्याय शितल च्या बाबतीत अव्यवहार्य असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा शितल ने तिरंदाजी निवडण्याचा निर्णय घेतला. पॅराऑलम्पिक साठी भारतीय स्पर्धक तयार करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याच्या या दलाने उचललेली होती त्यातून शितल च नाव पुढे आलं होतं. तिच्यातील प्रतिभेला पंखांचं बळ देण्यासाठी अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान या कोचेस नी अव्याहत प्रयत्न केले. त्यातून अवघ्या दोन वर्षात शितल ने तिरंदाजी चे संदर्भ आज बदलवून टाकले आहेत.

२०२२ च्या पॅरा एशियन खेळात शितल ने आपल्या प्रतिभेची चुणूक आणि भारतीय सैन्याने दाखवलेला विश्वास सार्थ करताना तब्बल दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या वैशिष्ठपूर्ण अश्या धनुष्य बाण वापरण्याच्या कलेला अनेकांनी तेव्हाच कुर्निसात केला होता. दोन्ही हात नसताना ती तिचे धनुष्य तिच्या पायाच्या बोटांमध्ये पकडते आणि उजव्या पायाने उचलते. तिच्या जबड्याने बाण सोडण्यापूर्वी ती तिच्या खांद्याचा वापर करून स्ट्रिंग मागे खेचते. या गोष्टी वाचायला अतिशय सोप्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात करणं म्हणजे प्रत्यक्षात एखादं शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कठीण काम आहे. जगात आजवर कोणीच असा पराक्रम महिलांच्या गटात करू शकलेलं नाही. यावरून शितल च्या प्रतिभेचा अंदाज आपण बांधू शकतो.

सध्या सुरु असलेल्या पॅरीस इथल्या पॅरा ऑलम्पिक खेळात आपल्या पहिल्या स्पर्धेत पहिला बाण सोडताना शितल ने 'बुल्स आय' म्हणजेच तंतोतंत लक्ष्याचा भेद केला. ते बघत असताना तिथल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि भाष्यकाराच्या अंगावर काटे उभे राहिले आणि नकळत त्यांच्या तोंडातून निघालं "व्हॉट अ शॉट". आजवर अनेक तिरंदाजांनी लक्ष्यच भेद केला असेल पण ज्या पद्धतीने,एकाग्रतेने आणि सर्व गोष्टी प्रतिकूल असताना शितल ने लक्ष्याचा भेद केला ते बघून आज सर्व जग म्हणते आहे. "व्हॉट अ शॉट"...

पॅरीस ऑलम्पिक मधे मेडल मिळवायला शितल कमी पडली असली तरी तिच्या प्रतिभेची जगाने नोंद घेतली आहे. नुसती नोंद नाही तर आज मेडल जिंकणाऱ्या स्पर्धकांपेक्षा शितल च्या त्या बुल्स आय ची चर्चा होते आहे. ज्यात विविध खेळातील जगातील नामवंत खेळाडू,समालोचक,प्रसिद्ध व्यक्ती समाविष्ट आहेत. असं म्हणतात,

"कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पडता है. और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं"...

आज शितल भले ऑलम्पिक च्या स्पर्धेत स्वतःच पदक मिळवायला कमी पडली असेल पण मिश्र गटात तिने आणि राकेश कुमार यांनी मिळून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या कोच अभिलाषा चौधरी यांच्या मते,

“शीतल देवी ने तिरंदाजी निवडली नाही, तर तिरंदाजीने शीतलची निवड केली आहे.”

पॅरीस ऑलम्पिक मधे खेळाच्या २२ प्रकारात तब्बल ४४०० दिव्यांग खेळाडू समाविष्ट आहेत. प्रत्येकजण काहीतरी कमी असताना आपल्या प्रतिभेने ती कमतरता भरून काढत ज्यांची प्रकृती निरोगी आहेत त्यांना दाखवून देत आहेत की आपल्या इच्छा आणि आकांक्षेपुढे आकाश पण ठेंगणं आहे. याच पॅरीस ऑलम्पिक मधे एकीकडे आपल्या १०० ग्रॅम वाढलेल्या वजनाचा बाऊ करत राजकारण करून सर्व जगाला दोष देऊन स्वतःला मोठं करणाऱ्या खुज्या प्रवृत्तीच्या खेळाडूंना बघताना मन थोडं विषण्ण झालं होतं पण त्याच पॅरीस मधे आपल्या प्रतिभेने, आपल्या मेहनतीने आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल रडत न बसता आपल्या त्याच कमतरतेला आपलं शस्त्र बनवत जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या शितल देवी ला माझा कडक सॅल्यूट. शितल देवी आता फक्त १७ वर्षाची आहे आणि माझ्या मते,

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं....

असे अनेक शॉट शितल च्या भात्यातून निघतील की जग त्याची नोंद घेईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास तिच्या त्या शॉट साठी फक्त आणि फक्त...

'व्हॉट अ शॉट'....

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



 

Friday, 30 August 2024

स्टारलायनर... विनीत वर्तक ©

 स्टारलायनर... विनीत वर्तक ©


अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधे अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स यांना पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित आणण्यासाठी स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन चा वापर केला जाईल असं नासाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट करून बोईंग स्टारलायनरच्या भविष्यापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. हि सगळी घटना काय आहे? कशामुळे असं घडलं आहे? तसेच याचे दूरगामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम काय होतील हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

आपण जर नासा च्या इतिहासात डोकावलं तर अवकाश संशोधनासाठी स्थापन झालेली ही संस्था कोल्ड वॉर च्या काळात माणसाच्या अवकाशात झेप घेण्याच्या प्रवासातील एक मूलभूत संस्था म्हणून नावारूपाला आली. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवलं ते याच संस्थेच्या अपोलो मिशन च्या माध्यमातून. पुढे नासाने आणि पर्यायाने अमेरिकेने इतर देशांसोबत इंटरनेशनल स्पेस स्टेशन अवकाशात उभारलं. तिकडे संशोधनासाठी अवकाश यात्रींची ने आण करण्यासाठी स्पेस शटल प्रोग्रॅम सुरु केला. ३१ ऑगस्ट २०११ ला नासाने स्पेस शटल प्रोग्रॅम बंद केला. पण याआधीच २०१० साली नासाने कमर्शियल लॉंचेस आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अवकाश यात्रींची नेआण करण्यासाठी बोईंग कंपनीला स्पेस क्राफ्टच संशोधन करण्यासाठी ९२.३ मिलियन अमेरिकन डॉलर दिले. यातूनच जन्माला आलं ते स्टारलायनर. पुढे २०१४ साली नासाने बोईंग ला २०३० पर्यंत जोवर आय. एस. एस. सुरु राहणार आहे तोवर अवकाश यात्रींची नेआण ६ वेळा आय.एस.एस. वर करण्यासाठी ४.२ बिलियन डॉलर च कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याच वेळेस बोईंग ची स्पर्धक कंपनी स्पेस एक्स ला मात्र २.६ बिलियन च कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. स्पर्धेच्या बाबतीत बोईंग ने जरी आघाडी घेतली तरी ती बोईंग ला टिकवता आली नाही. स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन जिकडे यशाची चव चाखत होतं दुसरीकडे बोईंग च स्टारलायनरच्या अडचणी वाढत जात होत्या.  

 २०१० नंतर प्रत्यक्षात स्टारलायनरच पहिलं उड्डाण व्हायला २० डिसेंबर २०१९ तारीख उजाडावी लागली. पण त्याही दिवशी स्टारलायनर आय.एस.एस. पर्यंत जाऊ शकलं नाही. अर्ध्या रस्त्यात पुन्हा त्याला पृथ्वीवर उतरवावं लागलं. जवळपास ८० पेक्षा जास्त त्रुटी नासा च्या इंजिनिअरिंग टीम ने स्टारलायनर मधे काढल्या. या सर्वांचं निराकारण करून मग पुन्हा उड्डाण करण्याचा विचार करण्याचा सल्ला बोईंग ला दिला. आधीच उशीर झालेल्या आणि आखून दिलेल्या बजेट पेक्षा जास्त खर्च होत चाललेल्या स्टारलायनर च्या प्रोग्रॅममुळे बोईंग च्या खिशाला कात्री बसायला सुरवात झाली होती. स्टारलायनर एक प्रकारे बोईंगसाठी पांढरा हत्ती बनत चाललं होतं आणि डोईजड व्हायला लागलं होतं. तिकडे याच काळात स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन नासाच्या सगळ्या चाचण्यांमधून यशस्वीपणे पास होऊन अवकाशयात्रींची ने आण करत होतं. जुलै २०२३ मग ६ मे २०२४ त्यानंतर १८ मे २०२४, १ जून २०२४ अश्या सगळ्या तारखांना काही न काही कारणांमुळे स्टारलायनर च उड्डाण पुढे ढकलत राहिलं. शेवटी ५ जून २०२४ रोजी स्टारलायनर ने आय.एस.एस. कडे २ अवकाशयात्रींना घेऊन यशस्वी उड्डाण केलं. उड्डाण यशस्वी झालं तरी बोईंग च्या अडचणी संपल्या नव्हत्या.

५ जून २०२४ च्या दिवशी सुद्धा स्टारलायनर मधे हेलियम गळती असल्याचं नासा आणि बोईंग ला कळलेलं होतं. ही अवकाश यात्रा फक्त ८ दिवसांसाठी असल्याने आणि गळती अगदीच अडचणीची नसल्याने नासाने उड्डाणाला हिरवा कंदील दिला. ज्यावेळेस स्टारलायनर आय.एस.एस. शी डॉकिंग करण्याचा प्रयत्न करत होतं त्याचवेळी त्याच्या २८ थ्रस्टर पैकी ५ थ्रस्टर मधे तांत्रिक अडचणी येऊन ते बंद पडले. तरीपण स्टारलायनर यशस्वी पद्धतीने आय.एस.एस. शी जोडलं गेलं. नासाच्या दृष्टीने हेलियम गळती अवकाश यात्रींसाठी अगदी जिवन मरणाचा प्रश्न नसली तरी त्या सोबत थ्रस्टर च बंद पडणे हा स्टारलायनर आणि बोईंग च्या विश्वासार्हतेला खूप मोठा धक्का होता. चॅलेंजर आणि कोलंबिया या स्पेस शटल च्या अपघातानंतर नासाने आपल्या नियमात खूप बदल केलेले आहेत.  जिकडे अवकाश यात्रींच्या जिवाला धोका निर्माण होत असेल तर ती मोहीम अगदी शेवटच्या क्षणी रद्द करण्याची तसेच अर्ध्या रस्त्यात असेल तरीसुद्धा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी स्पष्ट भूमिका नासाने घेतलेली आहे.

सामान्य माणसाच्या मनात येईल की स्टारलायनर वरील २८ पैकी ५ थ्रस्टर बंद पडली तर त्यात काय मोठं. उरलेले थ्रस्टर तर यानाला व्यवस्थित उतरवू शकतात. पण हे ५ थ्रस्टर का महत्वाचे आहेत ते समजून घेण्यासाठी आपण थोडं सोप्प उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एखाद्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तेव्हा तुमच्या गाडीचा ब्रेक थोडा हळू लागला तरी त्याने फारसा फरक पडणार नाही. पण हेच समजा तुमची गाडी एखाद्या ट्रॅफिक मधे असेल तर पुढल्या किंवा बाजूच्या गाडीची तुमची टक्कर होऊ शकते. आता विचार करा की ट्रॅफिक मधे तुमच्या गाडीच्या सर्व बाजूला फेरारी, पोर्शे, जॅग्वार किंवा मर्सिडीज सारख्या गाड्या आहेत. आता जर तुमचा ब्रेक लागला नाही तर त्या गाड्यांशी टक्कर झाल्यावर आलेला बारीकसा ओरखडापण तुमच्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त महाग पडू शकतो. आता हेच जेव्हा तुम्ही अवकाशात विचार कराल तेव्हा याची दाहकता कित्येक पट वाढलेली असेल.

स्टारलायनर वरील ५ थ्रस्टर काम करत नाही याचा अर्थ स्टारलायनर वरील चालकाचा म्हणजेच अवकाश यात्री जे स्टारलायनर चालवणार आहेत त्यांचा पूर्ण कंट्रोल त्यावर नाही. आय.एस.एस. वरून विलग होताना किंवा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना समजा योग्य तो वेग, कोन आणि कक्षा जर नियंत्रित झाली नाही तर स्टारलायनर स्वतः तर नष्ट होईल पण त्यासोबत आय.एस.एस. त्याच्या दुसऱ्या बाजूला डॉक असलेलं क्रू ड्रॅगन यांना सुद्धा त्याचा धोका आहे. नासा आणि बोईंग ने कश्यामुळे स्टारलायनर वरील थ्रस्टर बंद पडली यासाठी अनेक वेळा पृथ्वीवर चाचण्या केल्या त्या चाचण्यातून असं स्पष्ट झालं की प्रॉपेलंट पाठवणाऱ्या यंत्रणेत असणारी सिल अचानक घट्ट होत असल्याने प्रॉपेलंट चा पुरवठा बंद होऊन थ्रस्टर बंद पडलेली आहेत. सर्व २८ थ्रस्टर वर अशी यंत्रणा किंवा सिल वापरले गेले आहेत. पृथ्वीवर केलेल्या अनेक चाचण्यांमध्ये अचानक ते अश्या पद्धतीने जॅम होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. चॅलेंजर दुर्घटनेला फक्त दोन ओ रिंग जबाबदार होत्या. इकडे तर कोणत्याच सिल बद्दल खात्री सद्यस्थितीला बोईंग चे इंजिनिअर देऊ शकत नाहीत. जोवर स्टारलायनर पुन्हा पृथ्वीवर उतरत नाही तोवर यामागचं नक्की कारण कळणं अशक्य आहे.

थ्रस्टर आणि हेलियम ची सुरु असलेली गळती या दोन्ही गोष्टी अवकाश यात्री आय.एस.एस. मधे रिपेअर करू शकत नाही. या स्थितीत स्टारलायनर ला अवकाश  यात्रींसोबत पृथ्वीवर उतरवण्याची जोखीम नासा घ्यायला तयार नाही. बोईंग च्या इंजिनीअर आणि स्टारलायनर टीम ने गेले जवळपास २ महिने हेच नासाच्या टीम ला समजावण्याचा प्रयत्न केला पण स्टारलायनर चा इतिहास आणि स्पेस शटल मधील अपघातांचा इतिहास लक्षात घेता नासाने बोईंग ला पर्याय शोधल्याच स्पष्ट केलं आहे. बोईंग च्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा धक्का आहे. यानंतर स्टारलायनर च भविष्य काय असेल याबद्दल बोईंग सुद्धा सांशक आहे. कारण जर करारा प्रमाणे बोईंग नासाला स्टारलायनर वेळेत देऊ शकली नाही तर स्टारलायनर च्या निर्मिती वर झालेला खर्च बोईंग च्या खात्यातला असणार आहे. २०३० पर्यंत आय.एस.एस. ला रिटायर करण्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ बोईंग कडे फक्त ५-६ वर्षाचा कालावधी उरलेला आहे ज्यात कमीत कमी तीन वेळा तरी त्यांना अवकाश यात्रींची ने आण आय.एस.एस. वर करणं गरजेचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नासाकडून स्टारलायनर ला या कामासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण सध्याची परिस्थिती बघता स्टारलायनर आणि एकूणच बोईंग च भविष्य दोलायमान आहे.

अवकाशात अडकलेले बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स फेब्रुवारी २०२५ मधेच पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. ते स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन मधून इतर दोन अवकाश यात्रींसोबत पृथ्वीवर येतील. यासाठी आता जाणारं क्रू ड्रॅगन आपल्यासोबत ४ ऐवजी फक्त २ अवकाश यात्रींचा क्रू घेऊन जाणार आहे. स्पेस एक्स ला मात्र स्टारलायनर च्या अपयशाने लॉटरी लागल्याचं स्पष्ट आहे. नासा ज्या मोहिमा स्टारलायनर सोबत करणार होती त्या सगळ्या आता स्पेस एक्स कडे जातील हे स्पष्ट आहे. रशिया आणि अमेरिका यांचे संबंध युक्रेन युद्धामुळे ताणले गेल्याने अमेरिकेला रशियाच्या यानाचा वापर करायचा नाही. पण स्टारलायनर च्या अपयशाने त्यांच्याकडे आता फक्त स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन उपलब्ध आहे. तूर्तास हा वाढलेला काळ दोन्ही अवकाश यात्रींसाठी खूप खडतर असणार आहे. हे म्हणजे तुम्ही ८ दिवसांच्या ट्रिप ला निघालात आणि तुमचा मुक्काम ८ महिन्यांचा झाल्यासारखं आहे. पण हा मुक्काम अवकाशातील आहे त्यामुळे समोर उभ्या राहणाऱ्या अनेक अडचणी या तितक्याच मोठ्या स्वरूपाच्या असणार आहेत.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Saturday, 24 August 2024

बदला... विनीत वर्तक ©

बदला... विनीत वर्तक ©


७ ऑक्टोबर २०२३ चा दिवस इस्राईलसाठी एक काळा दिवस होता. याच दिवशी हमास या आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी इस्राईल मधे घुसून तब्बल १२०० लोकांची निर्घृण हत्या केली आणि जवळपास २५० लोकांना बंधक बनवून ओलीस ठेवलं. हा इस्राईलच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आणि इस्राईल ची जगप्रख्यात गुप्तचर संघटना मोसाद च अपयश म्हणून जगाने याची नोंद घेतली. इस्राईल च्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर इस्राईल आणि इस्राईल मधील ज्यू लोकं नेहमीच अश्या प्रकारच्या हल्ल्याच्या सावटाखाली जगत आलेली आहेत. पण इस्राईल च वेगळंपण इकडे उठून दिसते जिकडे ते स्वतःला ज्यू लोकांचं राष्ट्र म्हणण्यापासून कचरत नाहीत आणि जे लोक अश्या हल्ल्याला जबाबदार असतात त्यांचा अगदी पद्धतशीरपणे खात्मा करून आपला बदला घेण्याची वृत्ती इस्राईल आजही जगत आलेला आहे.

सप्टेंबर १९७२ च्या म्युनिच ऑलम्पिक मधे इस्राईल च्या ११ खेळाडूंचा खून करण्यात आला. याचा बदला घेण्यासाठी इस्राईल च्या तत्कालीन पंतप्रधान 'गोल्डा मेअर' आणि रक्षा मंत्री 'मोशे डायन' यांनी 'ब्लॅक सप्टेंबर' च्या हल्ल्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आणि त्यात सामील असलेल्या सर्वांना संपवण्यासाठी "Wrath of God" नावाचं एक सिक्रेट मिशन आखलं. इस्राईल च्या मोसाद ने अगदी चुनचुनके यातील प्रत्येकाला यमसदनी पाठवून आपला बदला पूर्ण केला होता. यासाठी अनेक वर्ष लागली पण प्रत्येकाचा खात्मा केल्याशिवाय मोसाद शांत बसली नव्हती. हे सगळं मिशन संपूर्ण होई पर्यंत जगाला याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळेच आजही मोसाद ही जगातली क्रमांक एक ची गुप्तचर संघटना मानली जाते. अमेरिकेची सि.आय.ए. सुद्धा अनेकवेळा मोसाद पुढे फिकी असल्याचं संरक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे.

त्यामुळेच ७ ऑक्टोबर २०२३ चा इस्राईल भूमिवरील हल्ला मोसाद च मोठं अपयश मानलं गेलं. पण शांत बसतील ती मोसाद कुठली. जेव्हा जग झालेल्या गोष्टी विसरून पुढे जायला लागलं तेव्हा मोसाद बदला कसा घ्यायचा याचे डावपेच आखत होती. शोले चित्रपटातील एक संवाद खूप प्रसिद्ध आहे, "गब्बर सिंग अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे" त्याच प्रमाणे मोसाद आपला बदला घेण्यासाठी शांतपणे आपलं काम करत होती. १२०० लोकांच्या जिवाचा बदला घ्यायचा होता. तेव्हा तो असा असायला हवा की त्याची जाणीव आपल्या शत्रुपक्षाला झोपेत सुद्धा व्हावी. राजकुमार च्या संवादासारखं मोसाद ने ठरवलं हा बदला घेताना, 

"बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा".

३१ जुलै २०२४ चा दिवस उजाडला तोच मुळी मोसाद ने केलेल्या बदल्याची घोषणा करून. इराण च्या राजधानी तेहरान मधे घुसून मोसाद ने हमासच्या अध्यक्षाची हत्या केली. 'इस्माईल हनियेह' ची शिकार म्हणजे एखाद्या राजाच्या राजवाड्यात घुसून सर्व संरक्षण यंत्रणा त्याची रक्षा करत असताना त्याची हत्या करण्यासारखं होतं आणि आपल्या अंगाला एकही ओरखडा न होता सुखरूप तिकडून बाहेर पडणं होतं. त्यामुळेच हमास या संघटनेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याचसोबत हमास च्या अध्यक्षाची हत्या इराण मधे करून इस्राईल ने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. इस्राईल वर झालेल्या हल्या नंतर इस्राईल आणि मोसाद त्याचा बदला घेणार हे सर्वश्रुत होतं याचा अर्थ हमास मधील अधिकारी, त्याचे अध्यक्ष आणि अजून त्या संबंधित लोकांची सुरक्षा किती जागरूक असेल याचा विचार आपण करू शकतो. हे सर्व असताना अगदी शांतपणे मोसाद ने इस्माईल हनियेह यांची शिकार केली. मोसाद तेवढ्यावर थांबली नाही तर त्याच दिवशी हिजबुल्लाचा एक मोठा नेता आणि अधिकारी 'फौद शुक्र' चा खात्मा करत आपल्या शत्रूची दोन्ही बाजूने कोंडी केली आहे. एकाचवेळी दोन मोठ्या नेत्यांच्या हत्येनंतर शत्रुपक्षाच्या निर्णय क्षमतेवर एक प्रकारे अंकुश बसवला आहे.

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर इराण मधे एकप्रकारे अफरातफरी माजली आहे. इस्माईल हनियेह यांना एक प्रकारे व्ही.व्ही.आय.पी. सारखी सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पलंगावर मारून मोसाद ने अक्षरशः हमास आणि इराण च्या किल्याला भगदाड पाडलं आहे. अश्या प्रकारची हत्या करण्याची यंत्रणा म्हणजेच ज्या पद्धतीची स्फोटके वापरण्यात आली ती आधीच तिकडे ठेवण्यात आली होती. ते तिकडे येणार हे मोसाद ला आधीच ठाऊक होते. याचा सरळ अर्थ हमास आणि इराण ची संरक्षण यंत्रणा मोसाद ने विकत घेतली आहे अथवा त्यांना फोडण्यात तिला यश आलं आहे. 

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर सगळ्यात मोठी अडचण आणि गोची अशी झाली आहे की आपलं नक्की कोण हे इराण आणि हमास दोघांनाही एक प्रकारे ठरवता येत नाही. कारण कोण विकलं गेलेलं आहे आणि कोण आपलं आहे याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या हत्येनंतर किंवा मोसाद च्या मिशननंतर जे कोणी फितवले गेले आहेत त्यांना आपलं काय होणार याची पूर्ण जाणीव आहे. तरीसुद्धा आपल्या संघटने विरुद्ध आणि राष्ट्राविरुद्ध जाऊन मोसाद ला माहिती देण्यासाठी मोसाद ने काय पत्ते फिरवले असतील याचा विचार करण्याची गरज आहे. 

इस्राईल आणि मोसाद जगात आपला दबदबा राखून आहेत ते याच कारणामुळे. आपलं राष्ट्र, आपली माणसं आणि आपला धर्म हा त्यांच्यासाठी जिवापलीकडे श्रेष्ठ आहे. तिकडे पैसे आणि स्वतःच्या हितासाठी राष्ट्र विकलं जात नाही. राष्ट्रधर्म सर्वप्रथम असतो. त्यामुळेच इस्राईल बदला घेऊ शकते ते ही समोरच्याच्या नाकावर टिच्चून.  

"हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण"... विनायक दामोदर सावरकर

७ ऑक्टोबर २०२३ ला मोसाद चे अध्यक्ष 'डेव्हिड बारेना' यांनी सगळ्यांसमोर सांगितलं होतं की हमास संघटना चालवणारे जे कोणी लोकं आहेत, जे कोणी अध्यक्ष आहेत. ते जगात कुठेही लपून बसून दे. आम्ही त्यांचा खात्मा केल्याशिवाय सोडणार नाही. आज एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत मोसाद ने आपला बदला घेतला आहे. हमास संघटनेच्या अध्यक्षाला संपवून आपलं बोलणं खरं करून दाखवलं आहे. यालाच म्हणतात बदला घेणं. समोरच्याला समोरून वार करणं आणि सांगून संपवणं याला जिगर लागते. ती जिगर इस्राईल आणि मोसाद कडे आहे कारण त्यांच्याकडे खरा राष्ट्रवाद आहे, राष्ट्रप्रेम आहे.

या घटनेचे पडसाद येणाऱ्या काळात निश्चित पडतील. उद्या कदाचित इराण इस्राईल विरुद्ध युद्ध पुकारले अथवा अजून हल्ले करेल पण याचा विचार इस्राईल आणि मोसाद ने आधीच केलेला असेल. आजही जागतिक घडामोडी चालू असलेल्या बघितल्या तर इराण च्या मोकाच्या ठिकाणावर इस्राईल हल्ले करून प्रतिहल्याची शक्यताच संपुष्टात आणते आहे. तिकडे मोसाद अजून शिकार करतेच आहे. एकूणच काय तर बदला अजून पूर्ण व्हायचा आहे. याचे परीणाम काहीही झाले तरी आपल्या नागरीकांच्या सांडलेल्या रक्ताची किंमत वसूल केल्याशिवाय इस्राईल आणि मोसाद शांत बसणार नाहीत हे उघड आहे. कोणाला हे अयोग्य वाटेल, कोणाला इस्राईल अमानुष वाटेल पण,

"खून का बदला खून होता है" हे उघड सत्य आहे.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  






Thursday, 24 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

चंद्राचा दक्षिण ध्रुव गेल्या काही वर्षात समोर आलेल्या निष्कर्षामुळे वैज्ञानिकांच्या रडारवर आहे. या भागात अनेक विवर आहेत. उंच सखल आणि खडकाळ असलेला हा भाग सूर्यापासून तसा लपलेला आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने काही अब्जावधी वर्षापूर्वी त्यावर असलेलं पाणी हे सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतरित होऊन अवकाशाच्या पोकळीत नष्ट झालेलं आहे. पण चंद्राचा दक्षिण ध्रुवावरील काही भाग मात्र गेल्या अब्जोवधी वर्षांपासून सूर्यापासून लपलेला आहे. इथलं तपमान जवळपास शून्याच्या खाली उणे -230 डिग्री सेल्सिअस इतकं कमी आहे. यामुळेच अब्जोवधी वर्षापूर्वी तिकडं असलेलं पाण्याचं अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात आजही असल्याचं सिद्ध झालेलं आहे. पण हे सगळं आजवर ऑर्बिटर च्या माध्यमातून सामोरं आलेलं होतं. प्रत्यक्षात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे हे आजवर कोणालाही बघता आलेलं नव्हतं. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर दुर्लक्षित आणि सुरक्षित असणारी बर्फाची गोष्ट ज्यावेळेस वैज्ञानिकांना वेध घ्यायला प्रवृत्त करायला लागली तेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करणार हे उघड होतं. पण चंद्राच्या इतर भागावर उतरणं आणि दक्षिण भागावर आपलं यान उतरवणं तितकं सोप्प नाही. कारण उणे -230 डिग्री सेल्सिअस मधे काम करताना यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स मधे गडबडी होण्याची शक्यता जास्त असते. चंद्रावर दिवसा तपमान 250 डिग्री सेल्सिअस इतकं उकळतं असते तर रात्रीच्या वेळी ते उणे -130 डिग्री सेल्सिअस इतकं कमी होते. दक्षिण ध्रुवावर तर हा फरक अजून जास्ती होतो. तापमानातील इतका मोठा फरक सहन न करता आल्यामुळे अनेकदा यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सिस्टीम मधे गडबडी होते आणि त्याच पर्यवसान मोहीम अपयशी ठरण्यात होते. त्यात भरीस भर म्हणून चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभाग हा विवरांनी भरलेला असल्याने सपाट जागा कमी आहेत जिकडे यान सुरक्षितरीत्या उतरू शकेल. या कारणामुळेच आजवर दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याची हिंमत आजवर जगातील प्रगत देश दाखवू शकलेले नव्हते. भारताने हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि आपली चंद्रयान 2 मोहीम ही दक्षिण ध्रुवाकडे रवाना केली. 

चंद्रयान 2 मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं पण हे अपयश इसरो च्या वैज्ञानिकांना खूप काही शिकवून गेलं. यातूनच चंद्रयान 3 मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नेमकं काय चुकलं आणि काय चुकू शकते याचा अभ्यास केला गेला. अभ्यासातून जे निष्कर्ष पुढे आले त्यावर काम केलं गेलं. झालेलं काम एकदा नाही दोनदा नाही तर अनेकवेळा तपासून बघितलं गेलं. एखादी गोष्ट काम करणार नाही असं गृहीत धरून पर्यायी मार्ग शोधले गेले तसं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. खरे तर चंद्रयान 2 च्या वेळेस जी चूक झाली होती त्यात बदल करायला इसरोला एक सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा होता. पण इसरो ने तब्बल 4 वर्ष घेतली ती आपला अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी. सगळ्या शक्यतांचा विचार करून मगच पुढे जायचं हे इसरो ने ठरवलं होतं. त्यामुळेच चंद्रयान 3 मोहिमेला उड्डाणासाठी 4 वर्षाचा कालावधी लागला. 

भारताने चंद्रयान 3 मोहीम अवकाशात पाठवल्या नंतर रशियाने आपलं ल्यूना 25 यान आपण चंद्राच्या कक्षेत पाठवत असल्याचं जगासमोर आणलं. तोवर ही गोष्ट रशियाने जगापासून आणि आपल्या मित्रापासून म्हणजेच भारतापासून लपवून ठेवली होती. तसं तर रशिया ल्यूना 25 या मोहिमेवर गेली 10 वर्ष काम करत होता. पण त्यांच लॅण्डर रेडी आहे अथवा मोहीम आखण्यासाठी तयारीत आहे असं कोणालाही माहित नव्हतं. खरं तर रशियाने घाईगडबडीत ही मोहीम पुढे रेटली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया मधील जनता त्रस्त झाली आहे. एकेकाळी अवकाश क्षेत्रातील दादा आणि थोरला असणारा रशिया गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात विशेष असं काही करू शकलेला नाही. त्यांचे सोयूझ रॉकेट आजही मानवी उड्डाण करण्यासाठी सुरक्षित असले तरी काळाच्या कसोटीवर ते पिछाडीवर पडले आहेत हे सत्य रशियाला सुद्धा माहित होतं. त्यामुळेच भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याचा घाट रशियाने घातला. 

13 सप्टेंबर 1959 चा दिवस होता जेव्हा मानवी इतिहासात रशियाने (आधीचा सोव्हियत युनियन) सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं यान ल्यूना 2 उतरवलं होतं. जे काम आपण जवळपास 60 वर्षापूर्वी केलं ते आता का नाही करू शकणार असा विचार रशियाने केला. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी ल्यूना 25 ला चंद्राच्या कक्षेत पाठवून दिलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत रशियाचे सोयूझ 2.1 बी रॉकेट हे सगळं कार्य करत होतं. ल्यूना 25 यानावरील इंजिन तोवर ना तपासली गेली होती ना त्यांच कार्य बघितलं गेलं होतं. कारण रशियाच रॉकेट इतकं प्रबळ होतं की  त्याने ल्यूना 25 ला चंद्राच्या दारात आणून सोडलं. त्यामुळे रशियन वैज्ञानिकांच्या गणिताचा खरा कस लागलाच नाही. भारताच्या बाबतीत मात्र गणित एकदम विरुद्ध होतं. भारताकडे प्रबळ रॉकेट नसल्याने अगदी पृथ्वीच्या कक्षेपासून भारतीय वैज्ञानिकांना सिंगल शॉट पद्धतीने चंद्रयान 3 ची कक्षा वाढवत नेत त्याला चंद्राकडे ढकलावे लागलं होतं. त्याचवेळी चंद्राच्या घराजवळ आल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा उलट्या पद्धतीने इंजिन्स प्रज्वलित करायला लागली होती. 

भारतीय वैज्ञानिकांना चंद्रयान 1 आणि 2 तसेच मंगळयान मोहिमेमुळे सिंगल शॉट पद्धतीवर खूप चांगलं नियंत्रण मिळवता आलेलं आहे. या पद्धतीत सगळ्यात महत्वाचं असते ती अचूक वेळ आणि तुमची बदललेली डेल्टा व्हेलॉसिटी. वेग आणि वेळ यांच अचूक नियंत्रण जर नसेल तर तुमचं यान गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आपली कक्षा सोडून भलतीकडे जाऊ शकते ज्याचं पर्यावसन एकतर कपाळमोक्ष किंवा अवकाशात भरकटंण हे असते. इसरो ने वेग आणि वेळेचं गणित अतिशय अचूक जमवून आणलं होतं. यासाठी तुमच्या इंजिन्स फायरिंग वर तुमच्या सिस्टीम च योग्य नियंत्रण, इंजिन्स नी निर्माण केलेला थ्रस्ट आणि तुम्ही साधलेली योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. चंद्रयान 2 आणि 3 च्या बाबतीत इसरो च्या  प्रॉपल्शन मॉड्यूल च्या इंजिन्स नी आपलं काम चोख बजावलं. जेव्हा तुम्ही कोणत्याही ग्रह अथवा आपण म्हणून अवकाशात कोणत्याही बॉडी भोवती अंडाकार म्हणजेच एलिप्टिकल ऑर्बिट मधे फिरत असतात त्यावेळी दोन टोकांवरील वेगात फरक असतो. जेव्हा तुम्ही त्या बॉडीच्या सगळ्यात जवळ असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात जास्ती असतो. जेव्हा तुम्ही सगळ्यात लांब असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात कमी असतो. 

भौतिकशास्त्र हे सांगते की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त वेगात असतात तेव्हा तुम्ही केलेला बदल म्हणजेच डेल्टा व्हेलॉसिटी ही तुमचा वेग सगळ्यात जास्त वाढवते. याचा अर्थ तुम्ही जर तुमची इंजिन्स सगळ्यात जवळ असताना प्रज्वलित केली तर तुमचा वेग कित्येक पटीने वाढतो आणि तुमची कक्षा रुंदावली जाते. कारण जास्त वेगामुळे तुम्ही जास्त दूरवर फेकले जातात. आता हाच नियम उलट पण लागू आहे. जेव्हा तुम्ही उलट दिशेने इंजिन्स प्रज्वलित करता तेव्हा तुमचा वेग जास्त कमी होतो म्हणजेच कक्षा कमी होते. यामुळे प्रत्येक सेकंद हा अतिशय महत्वाचा असतो. 1 सेकंद कमी जास्त आणि कक्षेत कित्येक किलोमीटर चा फरक पडू शकतो. हे सगळं लिहण्याच कारण इतकच ल्यूना 25 मधे जी गडबड झाली ती इकडेच झाली. सोयूझ रॉकेट ने चंद्राच्या दारात नेऊन सोडलेल्या ल्यूना 25 ला आपला वेग कमी करत चंद्रावर उतरण्याच्या आधी 18 किलोमीटर ची कक्षा गाठायची होती. याचा अर्थ 18 किलोमीटर उंचीवरून ते चंद्रावर उतरणार होतं. (विक्रम लॅण्डर च्या बाबतीत ही उंची 30 किलोमीटर होती.). ल्यूना 25 च्या इंजिन्स ला जेव्हा रशियाच्या रॉसकॉसमॉस ने चालू करण्याचा कमांड दिला तेव्हा त्याची इंजिन्स चालू तर झाली पण बंद व्हायचं नाव त्यांनी घेतलं नाही. जोवर सिस्टीम हँग होऊन बंद झाली तोवर मी वर लिहिलं तसं इंजिन्स जास्त काळ प्रज्वलित झाल्याने 18 किलोमीटर ची उंची गाठायच्या ऐवजी ल्यूना 25 चा वेग इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने त्याचा कपाळमोक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर झाला. 

भारताच्या विक्रम लॅण्डर आणि  प्रॉपल्शन मॉड्यूल वरील यंत्रणांनी मात्र आपलं काम चोख केलं होतं. जर तुमची ही यंत्रणा अगदी सेकंदाच्या वेळेप्रमाणे अचूक चालली तर तुम्हाला कमीत कमी इंधन लागते कारण तुम्ही गाठलेली कक्षा ही तितकी अचूक असते. भारताच्या चंद्रयान 3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूल वरील इंजिन्स आणि यंत्रणेने इतकं अचूक काम केलं आहे की अजून जवळपास 150 लिटर इंधन त्यावर शिल्लक आहे. ज्यामुळे प्रॉपल्शन मॉड्यूल हे कदाचित कित्येक वर्ष चंद्राच्या भोवती परिवलन करत राहू शकेल. इसरो ने त्याचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिने ठेवला होता. पण अतिशय अचूक कक्षा गाठल्यामुळे इंजिन्स कमीवेळा प्रज्वलित करावी लागली. त्यामुळे इंधन जास्त प्रमाणात खर्च झालं नाही. आपल्या कक्षेत फिरत राहण्यासाठी प्रॉपल्शन मॉड्यूल अगदी थोडं इंधन गरजेचं आहे. जोवर इंधन त्यावर आहे तोवर त्याची इंजिन्स प्रज्वलित होत राहतील आणि प्रॉपल्शन मॉड्यूल आपल्या ठरलेल्या कक्षेत (100 किलोमीटर उंचीवर) कदाचित काही वर्ष आरामात राहू शकेल. 

याच प्रॉपल्शन मॉड्यूल वर Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE) नावाचं उपकरण आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे उपकरण पृथ्वी सारख्या मानवाला राहण्यास योग्य असणाऱ्या ग्रह अथवा लघुग्रहांच्या वातावरणाचा शोध घेईल. आता आपण विचार करू की नक्की याचा काय उपयोग तर याच्या माध्यमातून आपल्याला ग्रहाच्या वातावरणाचा एक ढोबळ अंदाज येईल त्यावरून आपण आपल्या शोधांची पुढची रूपरेषा आखू शकू. एखादी मोहीम तिकडे न्यायची का? नक्की राहण्यायोग्य असेल का? हा अभ्यास असल्याशिवाय अंधारात कोणीच उडी घेणार नाही. हे जे उपकरण आहे त्याच आयुष्य आधी 6 महिने होतं पण आता कित्येक वर्ष झालं आहे. 

एकीकडे रशिया सारखा प्रबळ देश आपल्याला 60 वर्षापूर्वी अवगत असलेलं तंत्रज्ञान वापरण्यात चुकला तिकडे आजवर कधी चंद्रावर पाऊल न ठेवलेल्या भारताने अतिशय सुरळीत चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा रोवला. 1600 कोटी रुपये खर्चून चंद्रावर पाठवलेलं ल्यूना 25 अयशस्वी झालं तर 615 कोटी खर्च करून पाठवलेलं चंद्रयान 3 आज इतिहासाची पान आपल्या सुवर्ण अक्षरांनी लिहिते आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही पहिले उतरता की दुसरे. प्रश्न हा आहे की तुमची तयारी योग्य झाली आहे न? कारण तयारी नसताना जेव्हा आपण शर्यतीत पळायला जातो तेव्हा आपण अश्याच पद्धतीने तोंडावर आपटतो. रशियाने घाई करून 1600 कोटी रुपये तर उडवले पण आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्या नावाला एक असा डाग लावला आहे जो कधीच पुसला जाणार नाही. रशियाने भारताला वेळोवेळी अवकाश क्षेत्रात मदत केली आहे. त्यामुळेच रशियाचं अपयश जास्ती जिव्हारी लागणारं आहे. जेव्हा आपला मित्र हरतो किंवा मागे पडतो तेव्हा विजयाचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही हेच खरं. तूर्तास रशिया यातून शिकेल आणि पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी स्वारी करेल हीच अपेक्षा आहे.

 जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Wednesday, 23 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

आजवर आपण रात्रीचं चांदणं बघत आलो. रात्रीच्या त्या गडद अंधारात आपल्या शीतल प्रकाशाने भुरळ घालणाऱ्या त्या चंद्राच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अशी व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र त्यासाठीच वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आकर्षण राहिला आहे. ज्या वेळेस नभांपलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान मानवाने शिकलं. त्यानंतर त्याच पहिलं लक्ष्य चंद्रच होता. 21 जुलै 1969 चा तो दिवस होता जेव्हा मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर उमटलं. त्यानंतर अनेकांनी आपली पावलं चंद्राच्या मातीत उमटवली  देशांनी आपले उपग्रह त्यावर उतरवले. एकेकाळी अतिशय औत्सुक्याचा विषय असणारा चंद्र फक्त माती आणि दगड धोंड्यानी भरलेला आहे मानवाला 1970 च्या दशकात समजून चुकलं. त्यामुळेच चंद्रावर स्वारी केल्यावर मानवाचा खरे तर वैज्ञानिकांची चंद्राबद्दल असलेली उत्सुकता संपलेली होती.14 नोव्हेंबर 2008 चा दिवस होता ज्यावेळेस भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत सोबत असलेल्या मुन इम्पॅक्टर प्रोब ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हार्ड लँडिंग (कोसळताना) चंद्राच्या पृष्ठभागावर उडालेल्या धुराळयात पाण्याचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा तो नभात असलेला चंद्रमा पुन्हा एकदा वैज्ञानिकांना खुणावू लागला. 

आपल्या पहिल्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ती 2019 साली. आजवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या परग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव भारताच्या आणि इसरो च्या पाठीशी नव्हता. जे काही तंत्रज्ञान अवगत होतं त्यात इसरोने अगदी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर पर्यंत यशस्वी मजल मारली. पैश्याचा अभाव, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, रॉकेट आणि इतर गोष्टींच्या मर्यादा आणि सगळ्यात मोठं म्हणजे अश्या मोहिमेत अपयश आल्यावर झेलाव्या लागणाऱ्या टीकेचा त्रास सहन करत भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर 2019 साली केलेला प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फसला. सर्व भारतीयांना तो क्षण आजही आठवत असेल. अगदी ओंजळीत पिण्यासाठी घेतलेलं पाणी निसटून जावं आणि आपल्याला तहानलेलं राहावं लागावं अशीच ती अवस्था होती. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अश्या प्रयत्नात अगदी सामान्य असल्या तरी जिकडे रॉकेट अवकाशात पाठवायला खर्च का करायचा असे प्रश्न विचारले जातात तिकडे हे नुकसान खूप मोठं होतं. त्यामुळेच तत्कालीन इसरो चीफ के. सिवान यांच्या डोळ्यात आलेले अश्रू खूप काही सांगून गेले. 

असं म्हणतात, 

"अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है"... 

आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून त्या अश्रूंना आज आनंदाच्या अश्रूत परावर्तित केलं आहे. 1969 साली अमेरिकेत जे घडलं ते आज भारतात घडताना मला व्यक्तिशः जाणवते आहे. त्यावेळी अमेरिकेने कोल्ड वॉर च्या लढाईत निर्णायक आघाडी चंद्रावर मानव उतरवून घेतली हा इतिहास असला तरी त्यापेक्षा अमेरिकेची आणि तिथल्या लोकांची मानसिकता या घटनेने बदलवून टाकली. येणाऱ्या दशकात अमेरिका तांत्रिक बाबतीत आघाडीवर राहिली आणि जगातील सगळ्यात प्रगत राष्ट्र असलेली अमेरिकन माणसाची मानसिकता आजही कायम आहे. आज भारताच्या विक्रम लॅण्डर ने केलेला पराक्रम हा त्याच तोडीचा आहे. तांत्रिक बाबतीत भारताने मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा कैक पटीने भारताच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत झालेला बदल जास्ती महत्वाचा आहे. आपण स्वबळावर आणि स्वस्तात तंत्रज्ञान विकसित करू शकतो. त्या पलीकडे आलेल्या अपयशाने खचून न जात अजून जोमाने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. 

ज्यावेळेस जागतिक पटलावर रशिया  रॉसकॉसमॉस आणि भारताच्या इसरो च्या अध्यक्षांना सारखा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या दोघांनी दिलेलं उत्तर बदललेली मानसिकता अधोरेखित करते. रॉसकॉसमॉस च्या अध्यक्षांना ज्यावेळी विचारण्यात आलं की जवळपास पाच दशकानंतर रशिया ल्यूना 25 मोहिमेद्वारे चंद्रावर पुन्हा जातो आहे. त्यावेळेस या मोहिमेच्या यशाची खात्री म्हणजेच ल्यूना 25 सॉफ्ट लँडिंग करण्याची किती खात्री आपल्याला आहे? यावर त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 70% आम्ही यशस्वी होऊ. हाच प्रश्न जेव्हा इसरोच्या अध्यक्षांना विचारला गेला तेव्हा उत्तर होतं, आमच्या चंद्रयान 3 चे सगळे सेन्सर निकामी झाले, आमचा संपर्क काही काळासाठी तुटला अगदी त्याची दोन इंजिन जरी बंद पडली तरी आमचा विक्रम लॅण्डर हा चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करेल. या दोन्ही उत्तरात मानसिकतेत असलेला बदल तुम्ही, आम्ही सगळेच जाणवू शकतो. 

एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेआधी विचारावं की तुझा अभ्यास किती झाला आहे? त्यावर त्याने उत्तर द्यावं की काहीही येऊन दे मी यशस्वी होणार, ते पुस्तकातलं असू दे, दुसऱ्या कोणत्या पुस्तकातलं असू दे, सिलॅबस मधलं असू दे नाहीतर अजून कुठलं असू दे. मला त्याने काही फरक पडत नाही. माझा बेस पक्का आहे. प्रश्न कितीही कठीण आला तरी त्याला सोडवण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे की मी तो बरोबरचं सोडवेन. हा आत्मविश्वास येण्यासाठी त्या विद्यार्थ्याने रात्रीचा दिवस केलेला असतो हे कोणीही सांगेल कारण असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमची तयारी इतकी पक्की केलेली असते की समोर काय येते याची भिती नसते तर येणारा प्रश्न आपण किती सहजरीत्या सोडवू याचा विचार असतो. अगदी अशीच स्थिती आज इसरो मधील प्रत्येकाची होती आणि त्यांच्या मनातील तो आत्मीश्वास इसरो च्या अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरातून जाणवत होता. 

आज जेव्हा विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरु केला तेव्हा पडद्यावर दिसणारे आकडे त्याची साक्ष देत होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट ज्याला कॉपी बुक म्हणता येईल अशी घडत होती. मग ती ब्रेक डाऊन फेज असो वा एका ठिकाणी विक्रम लॅण्डर ने हॉवरिंग करणं असो. जे मापदंड आखले गेले होते त्यातल्या प्रत्येक मापदंडात आज विक्रम लॅण्डर चा प्रवास झाला. विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग केलं यापेक्षा ते ज्या पद्धतीने केलं त्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जाणार आहे. कारण जवळपास 3 लाख 84 हजार किलोमीटर लांबून वातावरण नसताना एखाद्या परग्रहावर अशी अचूकता निर्माण करण्याचं तंत्रज्ञान हे शिकणं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी चे अध्यक्ष जोसेफ अॅशबॅकर यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की, 

Landing of Chandrayaan-3 as an “incredible” event. “What a way to demonstrate new technologies and achieve India's first soft landing on another celestial body, “Well done. I am thoroughly impressed.”

ते असं का म्हणाले याच एक उदाहरण सांगतो, विक्रम लॅण्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीवर असणारं होतं तेव्हा खाली उतरण्याआधी आपल्या खाली काही धोका आहे का हे बघण्यासाठी 20 सेकंद एका ठिकाणी तंरंगणार होतं. तुम्ही पुन्हा जाऊन जर यु ट्यूब वर ते लाईव्ह बघितलं तर अगदी 149.98 मीटर वर येऊन विक्रम लॅण्डर तरंगायला लागलं. आपण 0.02 मीटर खाली आहोत हे त्याच्या कॉम्प्युटर च्या लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर च्या कॉम्प्युटर ने त्याची उंची पुन्हा 150.20 मीटर इतकी केली. हे सगळं अवघ्या 5 सेकंदात घडलं. त्या नंतर खाली कोणताही धोका नाही हे लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर ने आपला पुढला प्रवास सुरु केला. 

हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं ही अचूकता आज इसरो आणि भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर मिळवली आहे. त्यामुळेच विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग हे त्या पलीकडे आहे. हे कदाचित जोसेफ अॅशबॅकर यांना जाणवलं असेल असा माझा कयास आहे. कारण यातलं आर्टिफिशियल इंटीलिजन्स च तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने इंजिन आणि इतर सेन्सरवर मिळवलेलं प्रभुत्व आणि या सर्वांना एकत्रित आणून विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग करणारी इसरो एक लंबी रेस का घोडा तर आहेच पण हा घोडा आता शर्यतीत उतरला आहे हे त्यांना नक्की पटलं असेल. 

21 जुलै 1969 चा दिवस जसा अमेरिका, नासा आणि पर्यायाने प्रत्येक अमेरिकन माणसाच्या मानसिकतेला कलाटणी देणारा होता तसाच 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारत, इसरो आणि प्रत्येक भारतीयांच्या मानसिकतेला कलाटणी देणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी पण तोच चंद्रमा नभांत होता आणि आजही तोच चंद्रमा नभांत आहे. फरक इतकाच आहे की आज त्यावर आपला झेंडा रोवणारा देश वेगळा आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday, 30 July 2023

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

२०१४ च वर्ष होतं जेव्हा भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत आपलं यान यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. आजवरच्या इतिहासात जे कोणत्या देशाला जमलं नाही अशी कामगिरी भारताने जगाला करून दाखवली होती. एकतर भारताने अशी कामगिरी स्वबळावर पहिल्याच प्रयत्नात करणं आणि त्यातही सगळ्यात कमी खर्चात करणं यामुळे सो कॉल्ड वेस्टर्न मिडिया ला प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या. त्याचीच भडास एका व्यंगचित्राच्या रूपाने न्यूयॉर्क टाइम्स ने प्रसिद्ध केली. भारताचा अपमान करणारं हे व्यंगचित्र जगात भारताच्या प्रगतीबद्दल किती खदखद आहे ते दाखवून तर गेलंच पण यासाठी न्यूयॉर्क टाइम्स ला उघडपणे माफी मागण्याची नामुष्की आली. अँड्र्यू रोसेन्थल, न्यूयॉर्क टाइम्सचे संपादकीय पृष्ठ संपादक यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पण म्हणतात न, 

जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती... 

हे व्यंगचित्र काढणारे चित्रकार होते 'हेंग किम सॉंग'. जरी हे चित्रकार सिंगापूर मध्ये रहात असले तरी चीन चे नागरिक आहेत. भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाने चिनी चित्रकाराला मळमळ झाली. त्याचा द्वेष त्याच्या कुंचल्यांमधून प्रकट झाला. हे व्यंगचित्र आजही बघितल्यावर प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या व्यंगचित्रात एका बाजूला एका आलिशान रूम मधे एलाईट स्पेस क्लब मधले सदस्य बसले आहेत. ते वृत्तपत्रातील बातम्या वाचत आहेत. त्यात भारताचे यान मंगळावर पोहचल्याची बातमी आहे. त्याच रूम च्या बाहेर एका गाईला घेऊन धोतर नेसलेला एक भारतीय आत मधे येण्यासाठी दरवाजावर ठोठावत आहे. एक प्रकारे गरीबांचा आणि गाई, बैलांना घेऊन शेती करणारे भारतीय आता स्पेस क्लब चा भाग होऊ पहात आहेत अशी भारतीयांची थट्टा आणि टिंगल त्यातून दाखवली गेली होती. 

हेंग किम सॉंग तर भारताचा अपमान करणाऱ्या लोकांमधील हिमनगाचे एक टोक होतं. त्यांच्या लाईनीत बी.बी.सी.,अल-जझीरा, न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स अश्या अनेक वृत्तसंस्था आणि त्यांचे प्रतिनिधी होते. पण त्यावेळी भारताने अथवा भारताच्या वैज्ञानिकांनी त्याला कोणतंही शाब्दिक उत्तर दिलं नाही. गौतम बुद्ध म्हणतात तसं, 

"हजार लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय तुमचाच आहे. तो तुमच्याकडून हिरावून घेता येणार नाही."

त्यामुळेच इसरो ने आपल्या कृतीतून आपण काय आहोत हे आजवर दाखवून दिलेलं आहे. याच वेस्टर्न मिडिया ची मळमळ अजून कमी झालेली नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्यावेळेस भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून जागतिक विक्रम केला तेव्हा या वेस्टर्न मिडिया ने या उपग्रहांचं वजन फक्त १३०० किलोपेक्षा जास्त असल्याचं म्हणत असे छोटे उपग्रह कोणीही प्रक्षेपित करेल असे लेख लिहले. काही वर्षांनी जेव्हा स्पेस एक्स ने १४३ उपग्रह एकत्र सोडून इसरो चा रेकॉर्ड मोडला तेव्हा एकाही मिडिया हाऊस ने त्यांच एकत्रित वजन छापण्याची तसदी घेतली नव्हती. कारण स्पेस एक्स ने सोडलेल्या १४३ उपग्रहांचे एकत्रित वजन १००० किलोपेक्षा कमी होतं. ज्यावेळेस भारत अशी कामगिरी करेल तेव्हा वजनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि आपलं कोणी केलं कि त्याची संख्या दाखवायची. अर्थात यातून भारताबद्दल यांची असणारी मळमळ अजून जास्ती दिसून येते. 

मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापन केल्यावर बी.बी.सी. च्या एका पत्रकाराने लाईव्ह मुलाखतीत भारतात इतके मिलियन लोकं गरीब असताना हे असले स्पेस चे खेळ का करायचे असं स्वतःच मत थोपवलं होतं. ज्यांच्यावर आम्ही १५० वर्ष राज्य केलं त्यांनी आपला देश सांभाळावा असं त्यातून दाखवून दिलं. ही मळमळ यासाठी की एकेकेळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य अस्ताला जात नसे त्यांचा आज स्वतःचा असा काहीच स्पेस प्रोग्रॅम नाही न त्यांनी अवकाशात जाऊन जगाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही भलं केलं आहे. आज युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर युनायटेड किंग्डम स्वतःच जी.पी.एस. उभारणार होता. पण त्यांची ही योजना अजून कागदावर राहिली आहे आणि त्यांचे वैज्ञानिक पळून गेले आहेत. तर दुसरीकडे भारताची आज स्वतःची नाविक प्रणाली आहे. जी नासा च्या जी.पी.एस. पेक्षा कैक पटीने सरस असल्याचं जागतिक पातळीवर मानलं गेलं आहे. 

चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलेल्या अपयशानंतर याच वेस्टर्न मिडिया ने रकाने भरून भारताचं काय चुकलं आणि कसे पैसे वाया गेले यावर लेख लिहले पण या सगळ्यात भारताने काय मिळवलं आणि अश्या मोहिमांमध्ये अपयश अगदी नासा ला ही आलेलं आहे हे पद्धतशीरपणे लपवण्यात आलं. अर्थात त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा नव्हतीच. आजही जेव्हा भारताने अवघ्या ४ वर्षात पुन्हा चंद्रावर स्वारी केली आहे तेव्हा यांची मळमळ पुन्हा बाहेर यायला सुरवात झाली आहे. भारताच्या चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाबद्दल लिहताना सुरवात मात्र अमेरीका, रशिया, चीन ४ दिवसात पोहचले आणि भारताचं चंद्रयान ३ हे ४२ दिवसात पोहचण्यासाठी रवाना झालं अशी केली आहे. अर्थात त्यांची री ओढणारे भारतात ही काही कमी नाहीत. पण हे सगळे विसरता आहेत की नियती म्हणून एक गोष्ट असते आणि ती "मौका सबको देती हैं"... 

थोडे दिवस थांबा अजून आम्ही भारतीय ते व्यंगचित्र विसरलेलो नाहीत आणि कधी विसरणार पण नाही. तुम्ही व्यंगचित्रातून तुमची मळमळ बाहेर काढत रहा. आम्ही आमच्या कर्तृत्त्वाने दाखवून देऊ की, मौका सबको मिलता हैं...

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




Tuesday, 25 July 2023

चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

 चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसांपासून इसरो आणि पर्यायाने भारताची खिल्ली उडवणारा एक मेसेज फेसबुक आणि व्हाट्स अप च्या माध्यमातून फिरतो आहे. एकीकडे जिकडे अमेरिका, रशिया आणि चीन ची चंद्रयान ४ दिवसात चंद्रावर गेलेली आहेत. तिकडे भारताला मात्र ४० दिवस लागत आहेत. चंद्रयान आणि त्या मोहिमेतील तांत्रिक अडचणी याचा अभ्यास न करता फक्त राजकारणाच्या उद्देशाने जी चिखलफेक सुरु आहे ती नक्कीच कुठेतरी उद्दिग्न करणारी आहे. यासाठीच ही पोस्ट लिहावीशी वाटली. चार ते चाळीस दिवसांचा हा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. 

चंद्र जरी पृथ्वीवरून जवळ वाटत असला तरी पृथ्वी ते चंद्र हे अंतर सरासरी ३,८४,४०० किलोमीटर इतकं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वी भोवती परिवलन करतो. जेव्हा आपण हे चित्र स्वरूपात बघतो तेव्हा फक्त दोन पटलांवर बघत असतो. जर तिसऱ्या पटलाचा  विचार केला तर असं लक्षात येईल की ही दोन्ही परिवलन एका सरळ रेषेत होत नसतात. आता हा झाला एक भाग पृथ्वीवरून चंद्राकडे जाण्यासाठी आपल्याला दोन गुरुरुत्वाकर्षण शक्तींनवर मात करत प्रवास करायचा असतो. पृथ्वी च गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे की तुमच्या यानाचा वेग ४०,००० किलोमीटर/ तास वेग गाठावा लागतो तेव्हाच तुम्ही पृथ्वी पासून अवकाशात प्रवास करू शकता. त्याचवेळी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकण्यासाठी तुम्हाला यानाचा वेग ७५८० किलोमीटर / तास इतका कमी करण्याची गरज असते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा १/६ असल्याने वेगाचं हे गणित महत्वाचं आहे. 

कोणत्याही चंद्र मोहिमेत सगळ्यात कठीण काम आहे ते वेगाचं नियंत्रण. पृथ्वी वरून सुटण्यासाठी एकीकडे तुम्हाला ४०,००० किलोमीटर / तास वेग गाठावा लागतो. पण हा वेग गाठला तरी पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर या वेगाने आपण ९ तास आणि काही मिनिटात कापू शकू. त्याचवेळी आपल्याला ब्रेक लावून यानाचा वेग ७८५० किलोमीटर/ तास इतका कमी करायचा आहे. नाहीतर आपलं यान चंद्रा पलीकडे निघून जाईल किंवा चंद्रावर जाऊन आदळेल. आता आपण चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिवलनाचा वेग लक्षात घेऊ. पृथ्वी स्वतःभोवती १६७० किलोमीटर / तास या वेगाने फिरते तर चंद्र पृथ्वीभोवती ३६८३ किलोमीटर / तास या वेगाने परिवलन करतो आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण इतकं की पृथ्वी वरून निघताना कोणत्याही यानाचा वेग आणि वेळ अतिशय अचूक असणं गरजेचं आहे. जर का यातली एकही गोष्ट थोडी जरी चुकली तर पुन्हा त्यात बदल करण्यासाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी विकसित केलेली रॉकेट ही जास्त शक्तिशाली आहेत. त्यामुळे हे देश पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मोडून आपली यान थेट चंद्राकडे पाठवू शकलेले आहेत. रॉकेट जास्त शक्तिशाली करण्यासाठी आणि जास्त अंतर पार करण्यासाठी साहजिक रॉकेट बनवण्याचा खर्च जास्ती येतो. रॉकेटला जास्त इंधन वाहून न्यावं लागते. त्याची यंत्रणा तितकी सक्षम करावी लागते. या सगळ्याचा आपण पैश्याच्या स्वरूपात विचार केला तर ही रक्कम कित्येक कोटी अमेरिकन डॉलर च्या घरात जाते. या तिन्ही देशांनी हे तंत्रज्ञान आणि रॉकेट बनवण्यासाठी कित्येक कोटी डॉलर खर्च केले आणि पृथ्वीपासून चंद्राकडे अवघ्या ४ दिवसात हे देश आपलं यान पाठवू शकलेले आहेत. मग असं असताना भारताने हा मार्ग का निवडला नाही? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. तर त्यासाठी आपण भारताने वेगळा मार्ग का निवडला हे समजून घेऊ. 

भारतात आजही अवकाश क्षेत्राकडे पांढरा हत्ती असं बघणारे अनेक लोक आहेत. चंद्रावर जाण्यापेक्षा तेवढ्या पैश्यातून गरिबांचे कल्याण करता आलं असतं असा सूर आजही प्रत्येक मोहिमेनंतर आवळला जातो. कारण गरिबांना सगळं फुकट देण्याची वाईट सवय आपण लावलेली आहे. असो तर मुद्दा असा आहे की एखाद्या अवकाश मोहिमेसाठी देण्यात येणाऱ्या पैश्यावर आजही बंधन आहेत. मग कमी खर्चात चंद्रावर जायचं असेल तर थोडा लांबचा पण स्वस्त असा मार्ग निवडणं हाच पर्याय इसरो कडे होता. वर लिहिलं तसं गुरुत्वाकर्षण ही एक खूप मोठी शक्ती आहे. तिचा वापर करून आपण यान पाठवू शकतो हे इसरो  ओळखलेलं होतं. स्वस्त आणि सुरक्षित पद्धतीने यान चंद्रावर नेण्यासाठी इसरो ने स्लिंग शॉट किंवा ज्याला गोफण पद्धती म्हणतात त्याचा वापर केलेला आहे. या पद्धतीत तुमच्या यानाला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदण्याची शक्ती खुद्द पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण देते. त्यामुळे जास्त इंधन नेण्याची गरज भासत नाही. कमी शक्तिशाली रॉकेट च्या साह्याने सुद्धा आपण अपेक्षित वेग गाठून अंतराळात जाऊ शकतो. 

शेतातील पिकांवर आलेली पाखरं उडवण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो. यात गोफण अतिशय वेगात गोल फिरवली जाते. गोफणीच्या वेगामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सेंट्रिफ्युगल फोर्स (केंद्रापसारक शक्ती) मुळे त्यातील दगड अतिशय वेगात दूरवर भिरकावला जातो. अश्याच पद्धतीने इसरो ने आपलं चंद्रयान ३ हे पृथ्वीच्या लंब गोलाकार कक्षेत आपल्या रॉकेट च्या साह्याने प्रक्षेपित केलं. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्या वेगाचा फायदा उचलत जेव्हा यान पृथ्वीच्या अगदी जवळ येते तेव्हा त्याची इंजिन काही वेळासाठी प्रज्वलित केली जातात. या प्रज्वलनामुळे यानाचा वेग थोडा वाढतो पण पृथ्वी भोवती कक्षेत फिरताना तिच्या १६,००० किलोमीटर / तास वेगाचा फायदा घेत यानाचा वेग कित्येक पटीने वाढला जातो. यान अजून दूरवर फेकलं जाते. आपण असं म्हणू की त्याची लंब गोलाकार कक्षा वाढत जाते. जितके वेळा यान पृथ्वी भोवती घिरट्या घालेल तितके वेळा त्याचा वेग वाढत जातो. एक क्षण असा येतो की जेव्हा यान पृथ्वी च गुरुत्वाकर्षण भेदण्याचा वेग म्हणजेच ४०,००० किलोमीटर / तास प्राप्त करते. आता गरज असते ती गोफण सोडण्याची. इतका वेळ गोलाकार फिरवून यानाला एक शेवटचा धक्का लागतो. तो दिला की यान पृथ्वी पासून कायमसाठी अंतराळात भिरकावलं जाते. यालाच तांत्रिक भाषेत ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणतात. 

चंद्रयान ३ ला आत्तापर्यंत ५ वेळा अश्या पद्धतीने योग्य वेळी इंजिन प्रज्वलित करून अतिशय लंब गोलाकार कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. शेवटच्या मॅन्युव्हर मधून आता त्याची कक्षा १,२७,६०९ किलोमीटर X २३६ किलोमीटर अशी झालेली आहे. याचा अर्थ चंद्रयान ३ आता पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ २३६ किलोमीटर वर असते तर सगळ्यात लांब १,२७,६०९ किलोमीटर अंतरावर जाते. हे अंतर कापताना त्याचा वेग ४०,००० किलोमीटर / तास च्या जवळपास पोहचलेला आहे. आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला पृथ्वीपासून लांब जाण्यासाठी लागणारा वेग देते आहे. साधारण १ ऑगस्ट २०२३ ला इसरो ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणजेच गोफणीतून दगड दूर भिरकावून देईल. याचा अर्थ चंद्रयान ३ एक तारखेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून चंद्राकडे फेकलं जाईल. चंद्राकडे जाता जाता ते आपली दिशा उलट करेल. 

वर लिहिलं तसं चंद्राच्या गुरुरुत्वाकर्षणच्या ताकदीत बंदिस्त होण्यासाठी चंद्रयान ३ चा वेग ७८५० किलोमीटर / तास इतका कमी होणं अपेक्षित आहे. त्यासाठीच उलट झालेलं चंद्रयान ३ आता उलट दिशेने आपली इंजिन्स प्रज्वलित करेल. एका अर्थी ही इंजिन्स ब्रेक लावण्याचं काम करतील. इंजिन किती वेळ प्रज्वलित करायची याच गणित चंद्रयान ३ ला आधीच फीड केलं गेलं आहे. एकदा का वेग अपेक्षित इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते त्याच्या भोवती परिवलन करायला सुरवात करेल. पृथ्वी वर जसा वेग आणि कक्षा वाढवण्यासाठी मॅन्युव्हर केले गेले त्याच्या अगदी विरुद्ध वेग आणि कक्षा कमी करण्यासाठी चंद्राच्या कक्षेत मॅन्युव्हर केले जातील. चंद्रयान ३ मग १०० किलोमीटर X १०० किलोमीटर च्या गोलाकार कक्षेत आलं की विक्रम लॅण्डर चा पुढला प्रवास सुरु होईल. 

आता यामुळे जरी भारताला आणि पर्यायाने इसरो ला अंतराळात कसरती कराव्या लागल्या आणि चाराचे चाळीस दिवस झाले तरी मोहिमेच्या उद्दिष्ठानवर अथवा वैज्ञानिकांच्या तांत्रिक उपलब्धी वर काहीच फरक पडणार नाही. पण खूप फरक पडेल तो मोहिमेच्या खर्चावर. आज भारताची चंद्रयान मोहीम जगातील सगळ्यात स्वस्त चंद्र मोहीम आहे. ती इसरो ने केलेल्या जुगाडांमुळेच. भले आपल्याला ४० दिवस लागतील पण चंद्रावर जाऊन भारताला  स्पर्धा करायची नाही अथवा कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. उलट भारत अश्या ठिकाणी चंद्रयान ३ उतरवतो आहे ज्याठिकाणी आजवर कोणीच गेलेलं नाही न कोणी आपले झेंडे गाडलेले आहेत. इसरो ने निवडलेली जागा अनेक कारणांसाठी विशेष आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव आजवर उपेक्षित आहे. तिकडे नक्की काय आहे याच अमेरिका सह जगातील सर्व वैज्ञानिकांना कुतूहल आहे. कारण चंद्राच्या कित्येक बिलियन वर्षाच्या इतिहासात आजवर तिकडे काय आहे हे गुलदस्त्यात आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन जरी ४ दिवसात तिकडे पोहचले. अमेरिकेने आपले १२ अंतराळवीर चंद्रावर उतरवले असले तरी जे त्यांना जमलं नाही ते भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने करून दाखवलेलं आहे. चंद्रावर पाणी शोधण्याचा मान इसरो च्या या मोहिमेला मिळालेला आहे. तेव्हा चंद्रयान ३ येत्या काही दिवसात चंद्राच्या कोणत्या रहस्यांची उकल करते ते बघणं जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे ४० दिवसाचा प्रवास हा कित्येक बिलियन वर्षांची रहस्य उलगडणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तेव्हा ते ४ दिवसात गेले आणि आपण ४० दिवसात याचा उपापोह करण्यापेक्षा ४० दिवसांनी काय उलगडणार आहे याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा. इसरो ची ही मोहीम यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास व्हाट्स अप युनिव्हर्सिटी वर येणाऱ्या अश्या फॉरवर्ड न या त्यांची जागा दाखवा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday, 16 July 2023

अपयशातून यशाकडे (भाग २)... विनीत वर्तक ©

 अपयशातून यशाकडे (भाग २)... विनीत वर्तक ©

मागच्या भागात आपण बघितलं की चंद्रयान २ च्या मोहिमेत काय नक्की चुकीचं घडलं. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की काय चूक झाली हे शोधण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला. त्याच प्रमाणे अनेक शक्यतांचा विचार करून मग नक्की काय चुकलं असेल यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. इसरो ला चुका तर लक्षात आला आता त्या पुढचं पाऊल होतं ते म्हणजे आपण या चुकांतून शिकत पुढल्या मोहिमेत काय बदल करायचे?

चंद्रयान ३ मध्ये नक्की काय बदल आहेत?

चंद्रयान २ मधे आधीच्या भागात लिहिलं तसं सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे सॉफ्टवेअर प्रणाली ची. कुठेतरी सॉफ्टवेअर प्रणाली अजून सक्षम करण्याची गरज इसरो ला भासली. यात पण दोन भाग होते एकतर सॉफ्टवेअर प्रणाली च्या टॉलरन्स झोनची व्याप्ती वाढवणं आणि त्या पलीकडे जरी घटना घडल्या तरी त्या घटनांना सांभाळून पूर्ण प्रणाली हँग होणार नाही याची काळजी घेणं. त्या प्रमाणे इसरो ने चंद्रयान ३ मधील सॉफ्टवेअर प्रणाली अजून मजबूत केली आहे या प्रणाली ला देण्यात आलेला टॉलरन्स झोन ही मोठा ठेवण्यात आला आहे. पण असं करताना यानाला सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचण होणार नाही याची काळजी ही घेतली गेली आहे. 

यानंतर सगळ्यात मोठा बदल केला गेला तो चंद्रयानाच्या इंजिनात. मागच्या वेळी जेव्हा चंद्रयान २ डिझाईन केलं गेलं तेव्हा त्यात ४ इंजिन होती. चंद्रावर उतरताना ती पुरेशी असतील असं आकडे सांगत होते. यासाठी इसरो चे वैज्ञानिक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थिती निर्माण करून चंद्रयान २ कसं  काम करेल हे बघत होते. चंद्रावर अजून एक महत्वाची अडचण म्हणजे चंद्रावर असलेली धूळ. गेली अब्जोवधी वर्ष चंद्रावर ही धूळ आहे त्याच ठिकाणी वसलेली आहे. ज्यावेळेस चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यासाठी जवळ येईल तेव्हा उडालेल्या या प्रचंड धुळीमुळे चंद्राच्या इंजिनाला धोका निर्माण होईल आणि सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचणी येतील असं दिसून आलं. एका सिम्युलेशन मधे ही स्थिती समोर आली तेव्हा चंद्रयान २ च्या उड्डाणाची वेळ जवळ आली होती. त्यामुळे चंद्रयान २ ची क्षमता वाढवण्यासाठी अगदी शेवटच्या मिनिटाला त्यात अजून एक इंजिन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

इसरो ने हा निर्णय घेताना अनेक जर आणि तर शक्यतांचा विचार केला. असा एखादा निर्णय घेण्यासाठी अनेकदा आपल्याला रिस्क घ्यावी लागते. कारण या निर्णया बद्दल अनेक मतांतरे खुद्द इसरो मधे होती. पण शेवटी इसरो ने ५ व इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे इंजिन बसवताना इसरोला अनेक इतर बाबींवर पाणी सोडावं लागलं. कोणत्याही याना मधे सगळ्यात महत्वाचं असते ते वजन. यानावर बसवणाऱ्या प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक निवडावा लागतो. कारण तो यानाच वजन वाढवत असतो. वजन जितकं जास्ती तितकं इंजिन मोठं, इंधन जास्त आणि इंधन साठवणाऱ्या टाक्या जास्त त्यामुळे इतर गोष्टींवर आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे यावं लागते. चंद्रयान २ मध्ये ५ इंजिन बसवल्यामुळे साहजिक अधिक जागा इंजिन बसवण्यासाठी लागली. तेवढंच इंधन जास्ती भरावं लागलं. पण त्यामुळे काय झालं की ५ इंजिनांमुळे प्रत्येक इंजिन्स च्या वाट्याला येणारं इंधन मर्यादित झालं. याचा परीणाम असा की उतरताना यानावर असलेल्या इंधनाच्या मर्यादेत इंजिनाचा वापर करणं गरजेचं बनलं. समजा चंद्रयान २ रस्त्यापासून भटकल किंवा थोडा वेळ त्याला हॉवर करण्यासारखी स्थिती निर्माण करायची गरज पडली तर त्यावर मर्यादा होत्या. 

चंद्रयान २ च्या ब्रेकिंग च्या वेळी असं लक्षात आलं की आधीच्या सिम्युलेशन मधे दाखवल्या प्रमाणे आणि चंद्रयान २ चा वेग कमी करून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ४ इंजिनांची शक्ती पुरेशी आहे. त्यामुळे ५ व इंजिन बसवल्यावर होणाऱ्या फायद्यापेक्षा इतर होणारे तोटे हे जास्त आहेत. त्यामुळेच चंद्रयान ३ च्या वेळेस हे पाचवं इंजिन काढून टाकण्यात आलेलं आहे. इसरो च्या मते धुळीची किंवा इतर येणारी कोणतीही अडचण दूर करायला ४ इंजिन पुरेशी आहेत. आता ५ व इंजिन गेल्यामुळे झालं काय की चंद्रयान ३ च्या डिझाईन मधे इंजिन गेल्यामुळे रिकामी झालेल्या जागेत इतर उपकरणं बसवता आली. याशिवाय सगळ्यात मोठा फायदा झाला वजनाचा. एका इंजिनाच वजन काही शे किलोग्रॅम मध्ये असल्याने आता काही शे किलोग्रॅम वजन इतर ठिकाणी वाढवता येणार होतं. त्यामुळेच चंद्रयान २ चे पाय जे की २ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यात सक्षम होते. ते आता चंद्रयान ३ मधे ३ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम झालेले आहेत. आपल्यासाठी हा फरक १ मीटर / सेकंद असा छोटा वाटला तरी एखाद्या यानाच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. 

या मजबूत झालेल्या पायांमुळे अजून अधिक उंचीवरून जरी चंद्रयान ३ खाली आदळलं तरी त्याचे पाय हा धक्का सहन करण्यास सक्षम आहेत. तश्या चाचण्या गेली २ वर्ष इसरो ने घेतलेल्या आहेत. दगड धोंढ्यांवर चंद्रयान ३ आदळवून इसरो ने चंद्रयान ३ च्या पायाच्या भक्कमतेच्या चाचण्या घेतल्या आहेत. वजन कमी होण्यामुळे अजून एक झालेला फायदा म्हणजे जास्त इंधन घेऊन जाण्यासाठी जागा मिळाली. याचा अर्थ चंद्रयान ३ वर जास्त इंधन भरलेलं आहे. चंद्रयान ३ मध्ये  जर का गरज लागली तर जास्त इंधन असल्यामुळे वैज्ञानिकांना योग्य तो निर्णय घेता येईल. वजन कमी झाल्याचा अजून एक फायदा म्हणजे चंद्रयान ३ मध्ये अजून कॅमेरे आणि सेन्सर बसवता आले. याशिवाय चंद्रयान ३ चे सौर पॅनेल मोठे करण्यात आले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्य प्रकाश अतिशय कमी पोहचतो. सूर्य अगदी क्षतिजावर उगवतो. त्यामुळे अगदी कमी प्रकाशात सुद्धा हे सौर पॅनल चंद्रयान ३ ला लागणारी ऊर्जा निर्माण करू शकणार आहेत. 

चंद्रयान ३ ला चंद्रावर उतरण्यासाठी सॉफ्टवेवर प्रणाली ला ४ किलोमीटर X २.५ किलोमीटर चा भाग देण्यात आलेला आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात कुठेही चंद्रयान ३ सॉफ्ट लँडिंग करायची मुभा कॉम्प्युटर ला देण्यात आलेली आहे. चंद्रयान २ च्या वेळेस हा टॉलरन्स झोन फक्त ५०० मीटर X ५०० मीटर इतकाच होता . इतक्या मोठ्या टॉलरन्स झोन मुळे सॉफ्टवेअर प्रणाली हँग होण्याची कमीत कमी शक्यता आहे. चंद्रयान ३ हे इसरो अध्यक्षांच्या मते आपण कुठे अपयशी होऊ शकतो हे लक्षात घेऊन बनवलं गेलं आहे आणि त्यात बदल केले गेले आहेत. ज्याला फ्लॉ लेस म्हणतात ते करण्याचा इसरो ने प्रयत्न केलेला आहे. जिकडे जिकडे अपयश येण्याची शक्यता होती किंवा जिकडे जिकडे इसरो कडून काही चुका झाल्या होत्या त्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करून त्यानुसार चंद्रयान ३ ला बनवलं गेलं आहे. 

सगळा विचार केला तरी शेवटी हे रॉकेट सायन्स आहे. आपण एका वेगळ्या ग्रहावर आपलं यान उतरवत आहोत. त्यामुळे अश्या अनेक गोष्टी घडू शकतील ज्यावर आपलं नियंत्रण असणार नाही. इसरो ने जरी सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी शेवटी काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेर आहेत. त्यासाठीच आपल्या विश्वात जी एक शाश्वत ऊर्जा आहे तिच्यावर आपण सर्व सोपवून देतो. इसरो चे वैज्ञानिक तिरुपती बालाजी च्या देवळात गेले यावर दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांनी आधी स्वतः रॉकेट सायन्स काय असते हे समजून घेण्याची गरज आहे. ते देवळात गेले म्हणून मिशन यशस्वी होत नाही आणि ते देवळात नाही गेले तर मिशन अयशस्वी होईल असं ही काही नाही. पण जिकडे मानवाची क्षमता संपते तिकडे त्या शाश्वत ऊर्जेचा प्रवास सुरु होतो. तो प्रवास ईश्वराच्या रूपाने सगळीकडेच असतो मग तो नासा च्या मिशन ला आशीर्वाद देणारा पादरी असो वा तिरुपती बालाजी असो. तुम्ही आपलं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करून त्या उर्जेवर सर्व सोपवून देता. 

येत्या २३ किंवा २४ ऑगस्ट २०२३ ला जेव्हा चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करेल तेव्हा एका प्रवासाने आपला प्रवास पूर्ण केलेला असेल. इसरो ला चंद्रयान ३ च्या पुढल्या सर्व टप्यांसाठी खूप खूप शुभेच्छा!!. चंद्रयान ३ मोहीम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

समाप्त. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Saturday, 15 July 2023

अपयशातून यशाकडे... विनीत वर्तक ©

 अपयशातून यशाकडे... विनीत वर्तक ©

१४ जुलै २०२३ रोजी इसरो च्या चंद्रयान ३ ने यशस्वी उड्डाण केलं. या यशस्वी उड्डाणानंतर वेध लागले आहेत ते चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग करण्याचे. चंद्रयान २ मधे सॉफ्ट लँडिंग करताना आलेल्या अपयशामागे नक्की काय कारण होतं? चंद्रयान ३ मध्ये नक्की काय बदल केले गेले आहेत? चंद्रयान २ सॉफ्ट लँडिंग करताना सॉफ्टवेअर मधे नक्की काय गडबडी झाली? चंद्रयान २ आणि चंद्रयान ३ यामध्ये बाहेरून जास्ती बदल दिसत नसताना वैज्ञानिक मात्र यावेळेस आपण १००% सॉफ्ट लँडिंग करू असं कोणत्या भरवश्यावर सांगत आहेत? इसरो ने मागच्या ४ वर्षात काय केलं? हे सगळं समजावून घेतलं तरच इसरो चा अपयशातून यशाकडे होणारा प्रवास आपल्याला समजणार आहे. यातल्या काही प्रश्नांची उत्तर सोप्या भाषेत या पोस्ट च्या सिरीज मधून देणार आहे. 

चंद्रयान २ मध्ये नक्की काय चुकलं?

चंद्रयान २ च्या आधी इसरो आणि इसरो च्या वैज्ञानिकांना एखाद्या दुसऱ्या ग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव नव्हता. आजवर आपण एखाद्या ग्रहाच्या कक्षेत यान यशस्वी प्रक्षेपित केलेली होती. मग ती पृथ्वी असो वा चंद्र किंवा मंगळ. पण प्रत्यक्षात एखाद्या ग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव इसरो ला नव्हता. आता ६ सप्टेंबर २०१९ च्या रात्री नक्की काय घडलं ते आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ. 

एखादं यान किंवा वस्तू कोणत्याही ग्रहावर दोन पद्धतीने उतरवता येते. एक म्हणजे हार्ड लँडिंग ज्यात त्या वस्तूचा पृष्ठभागावर स्पर्श होताना वेग नियंत्रित केलेला नसतो. दुसरं म्हणजे सॉफ्ट लँडिंग ज्यात यान किंवा त्या वस्तूचा वेग मर्यादित करून त्याला एखाद्या पृष्ठभागावर उतरवणं. ( सोप्या भाषेत पॅराशूट ने जमिनीवर उतरण आणि पॅराशूट शिवाय जमिनीवर आदळण. आता तुम्हाला लगेच समजेल की या दोन्ही गोष्टीने आपल्याला कोणत्या पद्धतीने इजा होईल.) चंद्रयान २ हे सॉफ्ट लँडिंग पद्धतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर त्याची हळू हळू करत कक्षा कमी केली गेली. ६ सप्टेंबर २०१९ च्या रात्री त्याने आपल्या कक्षेतून चंद्राकडे जाण्यासाठी आपल्या इंजिनाच्या साह्याने झेप घेतली. चंद्रयान २ त्यावेळेस तब्बल ६००० किलोमीटर / तास वेगाने चंद्राची प्रदक्षिणा करत होतं. चंद्रयाना वर असलेल्या ५ इंजिनांना त्याचा वेग ७.२ किलोमीटर / तास इतका कमी करायचा होता. एक प्रकारे इंजिन विरुद्ध दिशेला चालवून ब्रेक मारायचा होता. आता हे ब्रेकिंग करताना ही एका विशिष्ठ वेगाने करायचं होतं. याचे मापदंड चंद्रयान २ च्या मेंदूत म्हणजे त्यावर असलेल्या कॉम्प्युटर वर लोड केले गेले होते. 

चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला नुसता वेग कमी करायचा नव्हता तर त्या सोबत इतर अनेक गोष्टी करायच्या होत्या. अमुक एका उंचीवर अमुक एक वेग हे समीकरण जुळवून आणायचं होतं. त्याला जी जागा सांगितली होती त्याच जागेवर ते यान उतरेल हे बघायचं होतं. हे करत असताना त्यावर असलेल्या सेन्सर आणि कॅमेरा मधून मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे होते. या सगळ्या प्रक्रिया अतिशय वेगात करायच्या होत्या. कारण एक सेकंदाची चूक आणि सगळच चुकलं असतं. चंद्र आपल्यापासून सरासरी सुमारे ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून आपण दिलेला संदेश जायला ३ सेकंदाचा कालावधी लागतो. त्या ३ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं असतं. यासाठीच सर्व जबाबदारी आणि स्वायत्तता ही चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला इसरो ने दिलेली होती. याचा अर्थ काय की काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर तो कॉप्युटर त्याच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेण्यास समर्थ असेल त्यावर इसरो च्या वैज्ञानिकांचे बंधन असणार नाही. 

चंद्रयान २ जेव्हा ६ सप्टेंबर २०१९ ला चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावले तेव्हा त्यावर असणारी ५ इंजिने प्रज्वलित होऊन त्याचा वेग कमी करायला लागली. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही इंजिन व्हेरिएबल थ्रस्ट निर्माण करणारी होती. याचा अर्थ काय तर इंजिनाच्या क्षमतेच्या ४०%, ६०%, ८०% आणि १००% प्रमाणे इंजिन्स थ्रस्ट निर्माण करत होती. ( आपल्या कार मधे ज्याप्रमाणे एक्सलेटर असते. ते जास्त दिलं की कार जोरात पळते. कमी दिलं की कार हळू होते. आता एक्सलेटर मधे कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे टप्पे नसतात. ड्रायव्हर आपल्या मर्जीप्रमाणे ते बदलू शकतो. पण आपल्या घरात असणाऱ्या पंख्याचा स्पीड मात्र अनेकदा आपण ० ते ५ अश्या स्थितीत बदलू शकतो. किंवा आपल्या मिक्सर चा स्पीड पण आपण ० ते ३ किंवा ० ते ५ अश्या टप्यात बदलू शकतो.) हे सर्व सांगण्याचं कारण इतकच की कॉम्प्युटर ला समजा ५०% क्षमतेने इंजिन चालवायचं असेल तर त्याच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता. एकतर त्याने ४०% चालवायचं किंवा ६०% टक्के. त्याप्रमाणे मग इतर इंजिनांचा वेग मर्यादित करायचा. चंद्रयान २ चा वेग कमी करत असताना त्याची उंची पण कमी होत होती. चंद्रयान २ मधील कॉम्प्युटर हा सतत उंची आणि वेग यांच गुणोत्तर समान ठेवण्याचा प्रयत्न करत होता. इंजिन चा थ्रस्ट सतत कमी जास्त करून त्याला प्रोग्रॅम केलेल्या गणितात बसवत होता. 

चंद्रावर वातावरण नाही. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर उंचीवर एक प्रकारचं आवरण असल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. हे सांगायचं कारण की पृथ्वीवर आपण कितीही वेळा इंजिन टेस्ट केली असली तरी प्रत्यक्षात ती काय परफॉर्मन्स देतात यात कमी- जास्त होऊच शकते. याला आपण इंजिनांचा टॉलरन्स झोन म्हणू. इंजिन ४०% क्षमतेने असेल म्हणजे ते प्रत्यक्षात ३५% ते ४५% अश्या कोणत्याही टॉलरन्स झोन मध्ये परफॉर्मन्स देत असेल. हा परफॉर्मन्स प्रत्येक क्षणाला बदलण्याची शक्यता गृहीत धरलेली असते. तर या ४ इंजिनांनी अतिशय योग्य तर्हेने काम करत चंद्रयान २ चा वेग आणि उंची टॉलरन्स झोन मधे ठेवत जवळपास ४ किलोमीटर ची उंची गाठली असावी. याच वेळी चंद्रयान २ चा हार्ड ब्रेकिंग फेज संपून स्मूथ ब्रेकिंग चा फेज सुरु झाला. यात कमी झालेला स्पीड अजून कमी हळुवार करून हळूहळू उंची कमी करायची होती. याचवेळेस चंद्रयान २ वरील कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो आणि आपलं स्थान लक्षात घेऊन योग्य तो बदल करणार होता. ज्यामुळे आपण ठरवलेल्या योग्य ठिकाणी ते चंद्रावर उतरेल. 

हे सगळं होत असताना चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला असं लक्षात आलं की इंजिनांनी जास्त थ्रस्ट दिल्यामुळे इंजिनाचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाला होता. हा वेग कॉम्प्युटर ला आखून दिलेल्या टॉलरन्स झोनच्या बाहेर होता. तसा होताच कॉम्प्युटर चा गोंधळ म्हणजेच सॉफ्टवेअर प्रणाली मध्ये गोंधळ निर्माण झाला. वेग वाढवण्यासाठी कॉम्प्युटर ने इंजिनाची क्षमता तात्काळ कमी केली. इंजिनाने निर्माण केलेला थ्रस्ट कमी होताच चंद्रयान २ वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाऊ लागलं. तिकडे चंद्राच्या कॅमेरा आणि सेन्सर ने आपण आपल्या निश्चित जागेपासून भटकत चाललो असल्याचं कॉम्प्युटर ला कळवलं. यामुळे कॉम्प्युटर च्या मेंदूवर म्हणजेच प्रणालीमध्ये अजून गोंधळ झाला. आता हे निस्तरू का ते निस्तरू हे न समजल्यामुळे कॉम्प्युटर ची प्रणाली हँग झाली. ज्या प्रमाणे आपला लॅपटॉप हँग होतो किंवा फोन हँग होतो. एकदा का या गोष्टी हँग झाल्या की रिस्टार्ट करणं हा एकच उपाय आपण करतो. पण चंद्रयान २ मध्ये रिस्टार्ट होण्यासाठी वेळ ही नव्हता आणि तशी व्यवस्था ही नव्हती. साधारण २.१ किलोमीटर चंद्राच्या पृष्ठभागापासून लांब असताना सॉफ्टवेअर प्रणालीत झालेल्या गोंधळामुळे चंद्रयान २ च नियंत्रण पूर्णपणे कॉम्प्युटर ने गमावलं आणि त्याचा इसरो शी असलेला संपर्क ही तुटला आणि चंद्रयान २ ने चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग किंवा ते कोसळलं.  

हे सगळं अवघ्या काही सेकंदात झालं. काही कळायच्या आत १४० कोटी भारतीयांच स्वप्न चक्काचूर झालं. चंद्रयान २ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण केल्यावर इसरो ला नक्की काय चुकलं याचा अंदाज आला. त्यातील दोन, तीन महत्वाच्या चुका आपण जाणून घेऊ. 

१) 'टॉलरन्स झोन' जो चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला दिला गेला होता तो अतिशय कमी होता. आपलं लँडिंग परफेक्ट आणि एकदम अचूक करण्यासाठी हा झोन कमी ठेवला गेला. टॉलरन्स झोन कमी असल्यामुळे जेव्हा गोष्टी याच्या बाहेर गेल्या मग तो वेग असो व उंची किंवा इतर पॅरामीटर. चंद्रयान २ वरील कॉम्प्युटर प्रणाली गोंधळून गेली आणि अश्या स्थितीत योग्य तो निर्णय घेण्यास कमी पडली. 

२) चंद्रयान २ मध्ये शेवटच्या क्षणाला ५ व इंजिन बसवलं गेलं होतं. पण प्रत्यक्षात विक्रम लॅण्डर वरील ४ इंजिन त्याला योग्य पद्धतीने उतरवण्यास सक्षम होती. ५ व्या इंजिनामुळे जास्त थ्रस्ट निर्माण झाला. त्यामुळे कॉम्प्युटर प्रणालीत गडबडी झाली तसेच इंजिनाचा थ्रस्ट योग्य राखण्यासाठी स्मूथ पद्धतीने करण्याची मुभा कॉम्प्युटर कडे हवी होती. ( याचा अर्थ ४०% ते १००% यामधील कोणत्याही ठिकाणी इंजिन क्षमता वापरण्याची मुभा) त्याने अधिक चांगल्या पद्धतीने चंद्रयान २ चा ताळमेळ राखला गेला असता. 

३) तिसरी गोष्ट म्हणजे की चंद्रयान जिकडे चंद्रावर उतरणार त्या जागेचा टॉलरन्स झोन वाढवण्याची गरज होती. याचा अर्थ कॉम्प्युटर ला मोठ्या जागेत चंद्रयान उतरवण्याची मुभा द्यायला हवी होती. ज्यामुळे अगदी शेवटच्या क्षणात पिन पॉईंट करण्याच्या नादात कॉम्प्युटर प्रणालीत गोंधळ झाला नसता . 

याशिवाय अनेक अश्या चुका आणि गोष्टी होत्या ज्या इसरो शिकली. या मोहिमेला एक अनुभव मानत इसरो ने झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काय पावलं चंद्रयान ३ मध्ये टाकली ते आपण बघू या सिरीज च्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Friday, 14 July 2023

प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

 प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

आज १४ जुलै २०२३ रोजी भारताच्या चंद्रयान ३ ला घेऊन एल.व्ही.एम. ३ / एम ४ रॉकेट ने यशस्वी उड्डाण भरलं आणि पुन्हा एकदा भारताने चंद्रावर स्वारी केली आहे. भारतासाठी आणि भारतीयांसाठी ही मोहीम खूप महत्वाची आहे. साधारण ४ वर्षापूर्वी म्हणजेच २२ जुलै २०१९ ला भारताच्या चंद्रयान २ यानाला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करण्यात अपयश आलं. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २.१ किलोमीटर उंचीवर असताना इसरो चा यानाशी संपर्क तुटला आणि चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं. त्याचे तुकडे होऊन ते विखुरले गेले. हा क्षण इसरो आणि समस्त भारतीयांसाठी खूप क्लेशदायक होता. इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांच्यासह तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आलेल्या अपयशाचं दुःख दिसत होतं. भारताचे पंतप्रधान या ऐतिहासिक क्षणासाठी तिकडे उपस्थित होते. पण त्यांच्यावर या सर्वाना धीर देण्याची आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा एक नवीन सुरवात करण्याची जबाबदारी आली. 

इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांना अश्रू आवरले नाहीत आणि पंतप्रधानांच्या समोरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या सांत्वनाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. समाजात अतिशय उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीसुद्धा शेवटी माणूस असतात. त्यांना ही भावना असतात आणि त्या प्रत्येकवेळी लपवता येतात असं नाही. भारताच्या चंद्रयान २ मोहिमेचं अपयश जिव्हारी लागणारं होतं. त्यामुळेच अश्या उच्च पदावर असणाऱ्या लोकांच्या मधला एक सर्वसामान्य भारतीय माणूस अनेकांनी त्यावेळी बघितला. ते क्षण प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेले. कुठेतरी हे अपयश भावनिक पातळीवर प्रत्येक भारतीयाला टोचलं होतं. या घटनेच्या वेळी वैज्ञानिकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले होते, 

"माझ्या प्रिय मित्रांनो, अंतिम निकाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रवास आणि प्रयत्न आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की मेहनत सार्थकी लागली आणि प्रवासही तसाच होता. "आमच्या टीमने खूप मेहनत केली, खूप दूरचा प्रवास केला आणि त्या शिकवणी कायमच राहतील. जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा आपण घेतलेल्या मेहनतीचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल."

"विज्ञान कधी थांबत नाही. परीणाम काहीही येवो विज्ञान नेहमीच आपल्याला प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करत राहते." 

आज पुन्हा एकदा त्याच प्रयत्नांच्या जोरावर भारताने चंद्राकडे भरारी घेतली आहे. मागे झालेल्या चुकांतून शिकत, त्या चुका पुन्हा न करण्याच्या इराद्याने इसरो ने आज चंद्राकडे पाऊल टाकलं आहे. हे रॉकेट सायन्स आहे. इकडे अगदी लहानताली लहान चूक पण भारी पडू शकते. ज्या सगळ्या परीक्षा चंद्रयान २ ला द्याव्या  लागल्या होत्या त्याच सगळ्या चंद्रयान ३ ला द्यावा लागणार आहेत. प्रत्येक क्षणाची उजळणी एकदा नाही तर कित्येकदा केली गेली आहे. मागच्या मोहिमेत आलेल्या प्रत्येक गोष्टीला इसरो ने अनुभवात बदललेलं आहे. 

त्यामुळेच आजचं यशस्वी उड्डाण ही एक सुरवात आहे. १४० कोटी लोकांच स्वप्न घेऊन चंद्रयान ३ चंद्राकडे आज झेपावले आहे. मला विश्वास आहे की यावेळेस आपण चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करू. भारत जगातील चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा जगातील पहिला देश ठरेल. या शिवाय चंद्रावर जाण्यासाठी भारताने आणि पर्यायाने इसरो ने केलेला खर्च हा सगळ्यात कमी आहे. मंगळयाना प्रमाणे चंद्रयान ३ स्पेस क्षेत्रात भारताला कलाटणी देणारी मोहीम आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

इसरो च्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कामगार, प्रायव्हेट संस्था आणि इतर सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन आणि चंद्रयान ३ च्या पुढल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Saturday, 8 July 2023

स्कॅरी बार्बी... विनीत वर्तक ©

 स्कॅरी बार्बी... विनीत वर्तक  ©

'स्कॅरी बार्बी' हे नावं वाचून आपल्याला कदाचित लहान मुलांच्या खेळण्यातल्या बार्बी बाहुलीची आठवण होईल. पण या नावाचा आणि बाहुलीचा तसा काही सरळ संबंध नाही. मग बार्बी हे नाव कशासाठी? त्या नावाच्या पुढे घाबरावणारं स्कॅरी कशासाठी? तर यासाठी आपल्याला अवकाशात जावं लागेल. २०२० मधे विश्वाच्या पटलावर सुपरनोव्हा चा अभ्यास करताना एका दुर्बिणीने ध्रुव ताऱ्याच्या पूर्वेला एक प्रकाशाचा ठिपका टिपला. पण त्यात काही वावगं न वाटल्याने वैज्ञानिकांनी त्याची दखल घेतली नाही. त्याला नाव दिलं "ZTF20abrbeie". या विश्वाच्या पटलावर प्रत्येक दहा सेकंदाला एखाद्या ताऱ्याच सुपरनोव्हा मधे विनाश होत असतो. त्यामुळे तशीच एखादी ही घटना आहे असं वाटून याकडे दुर्लक्ष केलं गेलं. २०२१ मधे एका आर्टिफिशियल इंटीलिजन्स सॉफ्टवेअर ने अवकाशातील सुपरनोव्हा किंवा तश्या घटनांचा अभ्यास करत असताना पुन्हा या घटनेकडे वैज्ञानिकांच लक्ष वेधलं. याचा अभ्यास केल्यावर जे पुढे आलं ते हादरवून टाकणारं होतं.

ZTF20abrbeie या घटनेच्या प्रकाशाची तीव्रता एखाद्या सुपरनोव्हा च्या घटनेपेक्षा एक हजार पटीपेक्षा जास्त होती. यातून निघणारी ऊर्जा सूर्य आपल्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे १० बिलियन वर्षात देईल त्यापेक्षा जास्त ऊर्जा या घटनेत बाहेर पडत होती. या स्फोटाची तीव्रता वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकत होती. जर हा स्फोट आपल्या सूर्यमालेत झाला असता तर या स्फोटाने जवळपास ४ प्रकाशवर्षं इतक्या अंतराचे क्षेत्रफळ व्यापलं असतं म्हणजे आपल्याला सगळ्यात जवळचा असणाऱ्या मित्र ताऱ्या इतकं हे अंतर असतं. या स्फोटातून निघालेली विकीरण इतकी शक्तिशाली आहेत की आपली पृथ्वी जर ७०० प्रकाशवर्ष अंतरावर असती तरी या विकिरणांच्या माऱ्यामुळे वितळून गेली असती. त्यामुळेच आजवर मानवाला दिसलेल्या  किंवा ज्ञात असलेल्या कोणत्याही घटनेपेक्षा ही घटना सगळ्यात जास्त तीव्रतेची अवकाशीय घटना म्हणून नोंदली गेली.

ZTF20abrbeie असं अडचणीचं नाव सोप्प करण्यासाठी म्हणून याला 'स्कॅरी बार्बी' असं नाव देण्यात आलं. पण वैज्ञानिकांना कोड सुटत नव्हतं की विश्वाच्या पटलावर इतका मोठा स्फोट आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्पन्न व्हायला नक्की काय कारणीभूत असेल? वैज्ञानिकांना आधी वाटलं की हा एखादा सुपरनोव्हा असेल पण जेव्हा इतर सुपरनोव्हा सोबत याची तुलना केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की एखाद्या सुपरनोव्हा ची तिव्रता ही काळाच्या ओघात कमी होते पण स्कॅरी बार्बी ची तीव्रता मात्र गेल्या ८०० दिवसापासून कायम आहे. तसेच अभ्यासावरून असं लक्षात आलं की येणारी कित्येक वर्ष ती तशीच राहू शकेल.  त्यामुळेच सुपरनोव्हा ची शक्यता फेटाळली गेली.

वैज्ञानिकांनी विश्वाच्या पटलावरील आत्तापर्यंत माहित असलेल्या अनेक महाकाय उर्जा निर्माण करणाऱ्या घटनांशी याच साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला जसे की जी.आर.बी. (गॅमा रे बर्स्ट), क्वेझार किंवा सुपरनोव्हा. पण अश्या कोणत्याही घटनांशी त्याच साधर्म्य आढळून आलेलं नाही. वैज्ञानिकांनी अजून अधिक शोधासाठी जेव्हा या स्रोताचा अधिक अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की की घटना तब्बल ८ बिलियन (८०० कोटी) वर्षापूर्वी घडलेली आहे. त्याचा प्रकाश आत्ता आपल्यापर्यंत पोहचत आहे. वैज्ञानिकांनी सुपर मॅसिव्ह कृष्णविवराची संकल्पना पडताळून बघितली त्यासाठी त्यांनी त्या कृष्णविवराच्या वस्तुमानाचा अभ्यास केला. जेव्हा याच्या वस्तुमानाचा अंदाज बांधला तेव्हा ते निघालं आपल्या सूर्याच्या तब्बल १०० मिलियन ( १० कोटी) पट. आपल्या सूर्याचं वस्तुमान ३,३३,००० पृथ्वीच्या वस्तुमाना इतकं आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की तिकडे काय हाहाकार घडलेला असेल. या कृष्णविवराने सूर्यापेक्षा १४ पट मोठा तारा गिळंकृत केला असेल त्यातून त्या ताऱ्याच्या ठिकऱ्या उडून इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि प्रकाश बाहेर फेकला गेलेला असेल.

पण इकडेही अडचण आली की या कृष्णविवराच्या (ब्लॅकहोल) आजूबाजूला कोणतीच दीर्घिका नव्हती. साधारणपणे अशी महाकाय कृष्णविवरे ही दीर्घिकेच्या मध्यभागी आढळतात. पण याच्या आजूबाजूला कोणतीच दीर्घिका आढळून आली नाही. याचा तर्क असा वैज्ञानिकांनी लावला की हे कृष्णविवर विश्वाच्या पटलावर प्रवास करत असताना एखादा महाकाय तारा याच्या रस्त्यात आला आणि त्याला याने गिळंकृत केलं असावं. अर्थात आजच्या क्षणाला पण यातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. त्यामुळे आजही भौतिक आणि खगोल शास्त्राच्या परिभाषेत स्कॅरी बार्बी च गूढ वैज्ञानिकांना उकलता आलेलं नाही. इतका प्रचंड आणि महाकाय विस्फोट विश्वाच्या पटलावर आजवर बघितला गेलेला नाही. काही वैज्ञानिकांच्या मते तर यानंतर अशी घटना होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. त्यामुळेच 'स्कॅरी बार्बी' आपल्या सोबत अनेक अनुत्तरित प्रश्न घेऊन विश्वाच्या पटलावर एक अदभूत नजारा मानवाला दाखवत आहे.

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday, 6 July 2023

जाळण्यामागचं राजकारण... विनीत वर्तक ©

 जाळण्यामागचं राजकारण... विनीत वर्तक ©

'अडकलेला पतंग आधी काढायला बघतात, नाहीच निघत म्हंटल्यावर फाडायला निघतात'... चंद्रशेखर गोखले. 

मानवी वृत्तीच एक सहज दर्शन या चारोळीतून होतं. एखादी गोष्ट माझी नाही तर ती कोणाचीच होऊ शकत नाही ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्याच प्रवृत्तीतून मग असूया, द्वेष आणि सुडाची भावना निर्माण होते. या भावनांना हवा मिळाली की त्याच वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. अनेकदा दुर्लक्ष केलेल्या, सहन केलेल्या किंवा लपलेल्या भावना राक्षस बनून बाहेर पडतात. त्यातून फक्त आणि फक्त विनाश होतो. त्यात आपलं किती नुकसान होते याचा अंदाज येईपर्यंत कृती झालेली असते. अगदी सोशल मिडिया वर रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांतून दिसणारी ही कृतीच जागतिक पटलावर घडणाऱ्या घटनांना कारणीभूत ठरते आहे. यात दोन देश प्रामुख्याने होरपळताना दिसत आहेत. त्यातला एक आहे फ्रांस तर दुसरा आहे भारत. नक्की कशामुळे या सूडाच्या भावना निर्माण झाल्या? त्यातून काय निष्पन्न होते आहे? भविष्यात याचे काय दूरगामी परीणाम होणार? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

सध्या युरोपातील फ्रांस हा देश देशात घडणाऱ्या जाळपोळीत पोळून निघाला आहे. हळूहळू याचे लोण आजूबाजूच्या देशात सुद्धा पसरायला लागले आहेत. जर्मनी, बेल्जीयम आणि युनायटेड किंग्डम या देशात ही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. नक्की कश्यामुळे हे घडते आहे याचा मागोवा घेतला तर त्याचे अनेक कांगोरे आपल्या हाताशी लागतील. तरीपण या सगळ्या घटनांच्या मागे एक छुपं राजकारण आणि स्वार्थ लपलेला असतो हे उघड आहे. फ्रांस मधे हिंसाचाराच्या घटनांचा उद्रेक व्हायला कारण होतं एका १७ वर्षीय अल्जेरियन मुलाच्यावर पोलिसांनी केलेला गोळीबार ज्यात तो मुलगा मृत्युमुखी पडला. 'नाहेल' नावाचा हा युवक फ्रांस मधे विस्थापित होऊन आला होता. त्याला फ्रांस ने स्वतःच नागरीकत्व दिलेलं होतं. २७ जून २०२३ ला ट्राफिक पोलिसांनी त्याला गाडी चालवताना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गाडीची लायसेन्स प्लेट पण चुकीची होती. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. पण ट्राफिक मधे तो अडकला. त्याला पोलिसांनी ट्राफिक मधे पकडताना त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी फ्रांस मधे मोर्चा निघाला. या मोर्च्याचे रूपांतर मग हिंसक आंदोलनात झालं. याच हिंसक आंदोलनात आजही फ्रांस होरपळतो आहे. याला आता धार्मिक रंग देण्यात आला. याला आता विस्थापितांच्या प्रश्नांशी जोडण्यात आलं आहे. नक्की कश्यासाठी हे आंदोलन सुरु झालं हे मागे पडून आता लोकं रस्त्यावर अक्षरशः लुटालूट करायला आणि एकमेकांचे जीव घ्यायला उतरली आहेत. मुळात या सर्व घटनेत चूक कोणाची होती याचा शोध आणि कारवाई सुरु असताना अचानक या घटनेने अनेक निद्रिस्त प्रश्नांना जागं केलं आहे. गेल्या काही वर्षात मुस्लिम राष्ट्रातील असंतोषामुळे अनेक कुटुंब युरोपातील देशात वास्तव्याला आली आहेत. दरवर्षी त्यांच्या संख्येत भर पडते आहे एकट्या फ्रांस मधे २०२१ पर्यंत ५ लाखापेक्षा जास्त विस्थापित लोक रहात आहेत. त्यातील अनेक आता फ्रांस चे नागरीक बनले आहेत. पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाचे चुकीचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. 

आपल्या मराठीत एक म्हण आहे, "भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी" ( इकडे कोणत्याही जातीचा अपमान करण्याचा उद्देश नाही. म्हणीचा वापर फक्त संदर्भासाठी केलेला आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी.) त्याप्रमाणे विस्थापित झालेल्या आणि आता नागरीक बनलेल्या लोकांनी हळूहळू मूळ लोकांच्या उरावर बसण्याची सुरवात एकप्रकारे केलेली आहे. आपल्याला दिलेलं नागरीकत्व हा फ्रांस च्या लोकशाहीचा भाग आहे त्यामुळे आपणच किंवा आपली संस्कृती याचा अविभाज्य भाग असली पाहिजे असा मतप्रवाह सुरु झालेला आहे. लोकशाही च्या सार्वभौमत्व तत्वाचा आणि समान नागरीक असण्याचा गैरफायदा घेत मूळ लोकांच्या घरावर आपला हक्क सांगितलं जातो आहे. त्यामुळे ज्यांच हे घर होतं किंवा मूळ फ्रांसच्या लोकांमध्ये आणि विस्थापित नागरिकांमध्ये आता धुसफूस सुरु झाली आहे. हे लोण इकडे थांबणारे नाही कारण या दोन नागरिकांमधील दरी आता वाढत जाणार आहे. ज्या निष्पाप लोकांना याचा त्रास झाला, ज्यांची दुकान, बिझनेस आणि इतर संपत्ती लुटली गेली किंवा जाळली गेली त्यांचा 'लोकशाही' या शब्दावरचा विश्वास डळमळीत झाला असेल यात शंका नाही. याचा त्रास नुसत्या एका धर्मापुरती मर्यादित राहणार नाही तर हळूहळू तिकडे विस्थापित होणाऱ्या अथवा कामानिमित्त जाणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरीकाला होणार आहे. 

आपल्याच घरात घुसून जर बाहेरचे आपल्याला कायदे आणि सर्वधर्मसमभाव शिकवायला लागले तर आपली जी प्रतिक्रिया असेल तीच प्रतिक्रिया किंवा ते पडसाद फ्रांस मधे येत्या काळात दिसून येणार आहेत. ते नक्की काय असतील याबद्दल आत्ताच सांगता येणं कठीण असलं तरी एकूणच लोकशाही च्या ढाच्याला यामुळे धक्का बसणार आहे हे नक्की आहे. याला दुसरी एक बाजू पण आहे. ज्या पोलिसांनी त्या मुलावर गोळी चालवली त्यांना तसं करण्याचं योग्य कारण अजून देता आलेलं नाही. तो मुलगा पळत असला हे खरं असलं तरी तो अतिरेकी नव्हता अथवा तसं अजूनतरी सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे त्या पोलिसांनी वंशवादामुळे तर हे कृत्य केलेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसून येते आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांची कृती समर्थनीय नाही. पण असं असलं तरी त्यांच्या चुकीला धर्माचा आधार घेत  त्यातून एकूणच केलेलं नुकसान कुठेतरी त्या धर्माच्या एकूणच मूळ तत्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कोणताही धर्म, पंथ, जात अथवा संप्रदाय कोणत्याच प्रकारच्या अमानुष कृत्यांना थारा देत नाही पण लोकांच्या भावनाना चुकीची दिशा दाखवत त्याच भावनांचा आसरा घेत अनेक राजकारणी, संधीसाधू आणि सुप्त हेतू बाळगणारे या तत्वांना वेगळ्या चौकटीत बसवत संपूर्ण जगात हिंसाचार करू शकतात हे सिद्ध झालेलं आहे. याला एका विशीष्ठ धर्माची लोकं बळी पडतात हे आजवर सिद्ध झालेलं आहे. 

भारतात जरी हिंसाचाराचं मूळ नसलं तरी भूतकाळात भारताच्या राजकारण्यानी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे आजही त्याची किंमत मोजावी लागत आहे. 'खलिस्तान' हा शब्द आज पुन्हा भारताच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. खलिस्तानी विचारधारेच समर्थन करणारे आज जरी भारतात हिंसाचार घडवत नसले तरी त्यांनी परदेशातील भारताच्या वाणिज्य कार्यालयांना आपलं लक्ष बनवलं आहे. मुळात खलिस्तान संकल्पना काय आहे? का अजूनही हा हिंसाचार होतो आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे. १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाला पण भारतातल्या दोन धर्माना इंग्रज विभाजित करून गेले हा इतिहास आपण वाचलेला आहे. पण हिंद, मुस्लिम या धर्मांपलीकडे भारतात शीख धर्म ही महत्वाचा होता. ज्यांना आपल्या धर्मासाठी एक वेगळा प्रांत हवा होता. भारतातल्या तत्कालीन राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी हा लहान प्रश्न खूप मोठा केला. आपला कार्यभाग उरकून घेतल्यावर त्या लोकांना वाळीत टाकलं ज्याचा परीणाम म्हणजे सुरु झालेली खलिस्तानी चळवळ. या चळवळीत त्याच घराणातल्या लोकांचा जीव गेला ज्यांनी हा प्रश्न निर्माण केला. आज भारतात हा प्रश्न किंवा ही चळवळ थंडावलेली असली किंवा अनेक शीख लोकांनी भारताला आपलं राष्ट्र, प्रांत मानून त्याच्या जडणघडणीत अमूल्य असं योगदान दिलं असलं तरी विदेशी शक्ती आणि अखंड भारताचे तुकडे करण्यासाठी सज्ज असलेल्या गॅंग ज्यात अनेक विद्रोही विचारसरणीच्या लोकांचा समावेश आहे. त्यांनी ही जखम पूर्ण भरू दिलेली नाही. 

आज कॅनडा आणि अमेरिकेत भारताच्या वाणिज्य कार्यालयांवर होणारे हल्ले हे त्याच शक्तींच्या वाईट कृत्यांच एक प्रतीक आहे. भारताची जगात होणारी भरभराट, भारताची वाढती अर्थव्यवस्था, भारताचा वाढत असलेला जागतिक दबदबा याला अंकुश लावण्यासाठी हेच देश आपल्या घरात अश्या कृत्यांना पडद्यामागून समर्थन आणि संरक्षण देत आहेत. एखादी अशी घटना घडली की निषेध करायचा पण पाठीमागून अश्या घटना घडतील याची पुरेपूर सोय करायची असं दुहेरी धोरण या देशांनी आज राबवलं आहे. पण या सगळ्यात त्यांच स्वतःच घर पण जळते आहे याची जाणीव त्यांना अजून झालेली नाही किंवा झालेली असून पण त्यांनी त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अश्या घटनांमध्ये वाढ झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. आमच्या घरात आग लावायला याल तर तुमचं घर कधी जाळून खाक होईल तुमचं तुम्हाला कळणार नाही हे भारताने दाखवून दिलेलं आहे. खलिस्तानी चळवळीचं समर्थन आणि नेतृत्व करणाऱ्या अनेक लोकांचा गेल्या काही महिन्यात अचानक झालेला मृत्यू किंवा त्यांना भारताने जे सळो की पळो करून सोडलेलं आहे त्यातून स्पष्ट होते आहे. या शक्ती पुन्हा एकदा भारतात काहीतरी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. अडकलेला पतंग फाडायचा की तो अलगद काढायचा हे आपण भारतीय नागरीक म्हणून ठरवायचं आहे. दगड मारणारे हे दगड मारणार त्यांना कोणी थांबवू शकत नाही. पण मारलेला दगड परतवायचा कसा हे आपण शिकलं पाहिजे. फ्रांस आणि भारत हे दोन्ही देश सध्या जाळपोळीच्या घटनात होरपोळुन निघत आहेत. हीच वेळ आहे संयम ठेवून आग पसरू न देण्याची आणि हीच वेळ आहे अशी आग लावणाऱ्या लोकांना योग्य तो धडा शिकवण्याची. तूर्तास बघूया पुढे काय होते. 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Wednesday, 28 June 2023

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २७)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २७)... विनीत वर्तक © 

 'To other countries I may go as a tourist, but to India I come as a pilgrim'... Martin Luther King Jr.

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर चे हे शब्द आजही तितकेच खरे आहेत. अनेक भारतीयांना मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे कोण आहेत माहित नसेल. तर मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी आपल्या मागे ठेवलेला विचारांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. आज अमेरिका जगातील सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळखली जाते. लोकशाही च्या समानतेच्या तत्वांना अंगिकारणारा पहिला देश म्हणजे अमेरिका आणि याची चळवळ अमेरिकेत फोफावण्याचं श्रेय आहे ते मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर यांचं यासाठीच ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. ज्यांच्या विचारांवर ज्या एका देशाचा प्रभाव होता तो देश म्हणजेच भारत. त्यामुळेच अमेरिकन इतिहासात भारताचं महत्व वेगळं आहे. 

भारत जगातील सगळ्यात मोठ्ठा लोकशाही देश आहे. यापलीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगातील सगळ्यात प्रगत देश आणि क्रमांक एक ची अर्थव्यवस्था असणारा असा अमेरिका आणि जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचे सर्वोच्च नेते जेव्हा राज्य भेटीसाठी एकत्र येतात तेव्हा त्याचे दूरगामी परीणाम जगाच्या एकूणच पटलावर पडत असतात. नुकताच झालेला भारतीय पंतप्रधानांचा अमेरिकन दौरा ही याला अपवाद नव्हता. या दौऱ्याने नक्की काय साधलं हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

गेल्या काही दशकांचा विचार केला तर जग दोन प्रमुख गटांमध्ये विभागलेलं होतं. एका बाजूला अमेरिका तर दुसऱ्या बाजूला रशिया. या दोन महासत्तांमधील शीत युद्धाचा काळ जसा सरला तशी जगाच्या पटलावर अनेक देश असे होते जे वेगाने महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. अमेरिका, रशिया, युरोपियन युनियन, नंतर जागतिक पटलावर चीन च आगमन झालं. चीन ज्या वेगाने पुढे येत होता ते बघता येणाऱ्या काळात तो अमेरिकेला मागे टाकणार असं धुसर चित्र दिसायला लागलं. चीन च आगमन झालं तरी जागतिक पटलावर महासत्तेच वर्चस्व हे पृथ्वीच्या उत्तर भागातील देशांकडे राहिलेल होतं. पण गेल्या एका दशकात चित्र एकदम बदलायला लागलं. चीन अमेरिकेला मागे टाकणार हे स्पष्ट झालं तर त्याच वेळी ज्या प्रमाणे चीन ने प्रगती केली त्याच पावलांवर पाऊल टाकत भारत वेगाने पुढे यायला लागला होता. २०१९ च्या कोरोना महामारी आणि गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या रशिया - युक्रेन युद्धामुळे एकीकडे रशिया आणि युरोपियन ची वाताहत होताना स्पष्ट दिसत आहे तर त्याचवेळी अमेरिका आणि चीन यांच्यामधील महासत्तेचा संघर्ष शिगेला पोहचलेला आहे. या सगळ्यात जागतिक पटलावर दक्षिण देशांचं प्रतिनिधित्व करणारा पहिला देश असं चित्र एका देशाचं रंगायला सुरवात झालेली होती. एका नवीन देशाचा उदय झालेला होता तो देश म्हणजे 'भारत'. 

चीन च्या महत्वाकांक्षी पंखांना जर कात्री लावायची असेल तर त्याला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी तयार करणं गरजेचं आहे हे अमेरिकेला चांगलं माहित आहे. त्याचवेळी ज्या लोकशाही तत्वांवर अमेरिका उदयास आली त्याच लोकशाही तत्वांचा सगळ्यात मोठा पुरस्कर्ता असलेल्या भारताशी संबंध वृद्धिंगत करण ही अमेरिकेची गरज होती. त्यामुळेच आत्ता झालेला भारतीय पंतप्रधानांचा दौरा हा विशेष महत्वाचा ठरतो. या दौऱ्यात काय गमावलं यापेक्षा काय मिळवलं हे जाणून घेतलं पाहिजे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारत यांच्यात रक्षा, सेमी कंडक्टर, स्पेस रिसर्च, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स अश्या महत्वाच्या क्षेत्रात करार झाले. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक आणि हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड यांच्यात झालेला जेट इंजिनाचा करार खूप महत्वाचा आहे. जेट इंजिन जगात फक्त चार देश बनवू शकलेले आहेत. अमेरिका, रशिया, यु.के. आणि फ्रांस. यांच्या पलीकडे जपान आणि चीन ने जरी जेट इंजिन बनवली असली तरी त्याच संपूर्ण तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही किंवा जागतिक दर्जाचं नाही. अश्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तंत्रज्ञान हस्तांतरणासह जेट इंजिन भारतात बनवण्यासाठी केलेला करार अतिशय महत्वाचा ठरतो. 

स्पेस हे असं एक क्षेत्र आहे ज्यात अमेरिकेचं वर्चस्व कोणीच नाकारू शकत नाही. भारत अजूनही ह्युमन स्पेस फ्लाईट तंत्रज्ञानात चाचपडतो आहे. गगनयान मोहिमेची घोषणा जरी भारताने केली असली तरी भारताला अजून अनेक तंत्रज्ञान हस्तगत करायचं आहे. त्यासाठी कदाचित १० वर्षाचा कालावधी ही जाऊ शकतो. चीन आणि भारत यांच्यात अवकाश तंत्रज्ञानात असणारं अंतर खूप आहे. त्यामुळेच भारताला झपाट्याने हे अंतर कमी करण्याची गरज होती. नुकत्याच झालेल्या नासा आणि इसरो यांच्यातील संयुक करारामुळे हे साध्य होणार आहे. नासा भारतीय अंतराळ यात्रींना त्यांच्या ह्युस्टन इथल्या केंद्रात संपूर्ण प्रक्षिशण देणार आहे. त्या शिवाय अंतराळाचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळयात्री २०२४ मधे अंतराळ स्थानकात नेण्याचं अमेरीकेने मान्य केलं आहे. याच्याशिवाय अनेक ह्युमन स्पेस फ्लाईटसाठी लागणाऱ्या अनेक महत्वपूर्ण तंत्रज्ञानांचं हस्तांतरण नासा कडून इसरो ला होणार आहे. यात दोन्ही देशांचा फायदा आहे. एकीकडे भारत आणि चीन यांच्यामधील स्पेस क्षेत्रातील अंतर कमी होणार तर अमेरीकेला चीन च्या अवकाश क्षेत्रातील आव्हानाला शह देता येणार आहे. 

सेमी कंडक्टर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स यांच्यासह अजून एक क्षेत्र ज्या बद्दल मिडियात जास्त बोललं नाही गेलं त्या क्षेत्रात अमेरीका आणि भारत सहकार्य करून पुढे जाणार आहेत. ते क्षेत्र आहे क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम कंप्युटींग. आपण सध्या वापरत असलेल्या कम्प्युटर चा चेहरा मोहरा बदलणारं कोणतं क्षेत्र असेल तर ते क्वांटम कम्प्युटिंग असणारं आहे. अश्या क्षेत्रात अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य दोन्ही देशांसाठी अतिशय महत्वाचं राहणार आहे. या शिवाय ३५ वेगेवेगळ्या प्रकारच्या संशोधनात सहकार्य, ५ जी आणि ६ जी सारख्या दूरसंचार क्षेत्रात सहकार्य भारत आणि अमेरिकेने करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे जगातील मिडिया ते जेवले काय किंवा त्यांनी एकमेकांना गिफ्ट काय दिलं, किंवा कोणी कोणाची सही घेतली याच्या बातम्या करण्यात व्यस्त असला तरी या भेटीने जागतिक पटलावर अनेक वेगळ्या समीकरणांना जन्म दिला आहे. 

या भेटीतून भारत आणि अमेरिका यांनी आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नक्कीच एक वेगळी उंची दिली आहे. याचे दूरगामी परिणाम काय होतील ते येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं कोणी कोणासाठी उपकार म्हणून करत नाही. काळाची गरज म्हणा अथवा स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनिच्छेने टाकलेलं पाऊल म्हणा पण यात दोन्ही देशांचा फायदा आहे. दोन्ही देश स्वतःचा फायदा बघून पुढे जात आहेत. कोणी मिठी मारली अथवा कोणी कोणाचे पाय धरले यातून व्यक्तिगत आदर व्यक्त होतो पण गोष्ट जेव्हा द्विपक्षीय सहकार्य, करार आणि जागतिक पटलावर खेळल्या जाणाऱ्या चालींची असते तेव्हा प्रत्येक देश आपला फायदा बघत असतो हे उघड सत्य आहे. पण काही असलं तरी येणाऱ्या काळात भारत - अमेरिका संबंधाचे खारे वारे आणि मतलई वारे येणाऱ्या मान्सून ची वर्दी देत आहेत हे नक्की. तूर्तास आपण त्याची वाट बघुयात. 

क्रमशः

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 16 June 2023

एका वादळाशी झुंज... विनीत वर्तक ©

 एका वादळाशी झुंज... विनीत वर्तक  ©


निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव नेहमीच खुजा ठरत आलेला आहे. आपलं विज्ञान किंवा आपला अभ्यास कितीही प्रगत झाला तरी निसर्गात घडणाऱ्या अनेक विध्वंसक गोष्टींची भविष्यवाणी अजूनही आपल्याला योग्य रीतीने करता येत नाही. त्यामुळेच अश्या नैसर्गिक आपत्ती मधे सगळ्यात महत्वाचं ठरते ते आपत्ती व्यवस्थापन आणि त्या आपत्ती चा मागोवा घेणं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील वातावरणात प्रचंड बदल गेल्या काही वर्षात झाले आहेत. तपमानात होणारे उतार-चढाव अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळेच वारे, पाऊस आणि एकूणच त्यांची निर्मिती यांच्या चक्रावर याचा खूप मोठा परीणाम होतो आहे. या सर्व बदलांचा परीणाम म्हणजे चक्रीवादळ.

भारताला ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर तर एका टोकाला हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने भारत पाण्याने वेढलेला आहे. साहजिक वातावरणातील बदलांचा प्रभाव हा भारतावर पडणार हे उघड आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीत अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यातील सगळ्यात महत्वाचं असते ते समुद्राच्या पाण्याचं तपमान. भारताच्या पूर्व किनारपट्टी वरील पाण्याचं तपमान हे पश्चिम किनारपट्टीपेक्षा जवळपास २ ते ३ डिग्री सेल्सिअस ने जास्ती असते. त्यामुळेच आजवर प्रत्येक वर्षी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होत होती. पण गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग ने अरबी समुद्राचं तपमान हे वाढत चाललं आहे. त्यामुळेच क्वचित येणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास असं दर्शवतो की अरबी समुद्रावरील वादळांच्या संख्येत ५२% टक्के तर चक्रीवादळांच्या निर्मितीत तब्बल १५०% टक्यांची वाढ दिसून आली आहे.

एखादं चक्रीवादळ निर्माण झालं तर ते किती संहारक असेल? त्याचा रस्ता कसा असेल? किंवा त्याने किती नुकसान होईल? याचा निश्चित अंदाज आजही बांधता येत नाही. कारण चक्रीवादळ मजबूत किंवा कमकुवत होण्यास मदत करणार्‍या विशिष्ट चढउतारांमुळे त्याचे मॉडेल्स त्याच्या तीव्रतेचा फारसा आधीच अंदाज लावू शकत नाहीत. जिकडे त्याची निर्मिती होते तिथली अप्पर एअर डायव्हर्जन्स, विंड शीअर आणि कोरडी हवा यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याला रोखता येणं अशक्य आहे. ते आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींची व्हिलेव्हाट लावल्याशिवाय उसंत घेत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा अशी चक्रीवादळं नागरी वस्तीच्या दिशेने येणार असतील तर त्याचा अंदाज जर आपल्याला आधी बांधता आला तर खूप मोठी मनुष्य आणि वित्त हानी टाळता येऊ शकते.

गेल्या काही दशकात याच कारणांसाठी भारताने अनेक उपग्रह अवकाशात वातावरणाच्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशात वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचा वेध घेऊन हे उपग्रह सतत याची माहिती भारतात प्रसारित करत असतात. याच माहितीच्या आधारे चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यांची दिशा तसेच त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो. भारताच्या याच तांत्रिक प्रगतीमुळे ११ जून २०२३ ला भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं स्पष्ट केलं. १२ जून २०२३ उजडतं नाही तोच भारताच्या उपग्रहांच्या मिळालेल्या माहितीतून या चक्रीवादळाचं रूपांतर (Extremely severe cyclone) अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाल्याचं स्पष्ट केलं. या तीव्र चक्रीवादळाचं नामकरण 'चक्रीवादळ बिपरजॉय' असं करण्यात आलं. बिपरजॉय हे नाव बांगलादेश ने दिलेलं होतं. याचा बांगला भाषेत अर्थ होतो 'आपत्ती' (disaster). अत्यंत तीव्र चक्रीवादळात एखाद्या वादळाचा तेव्हाच समावेश होतो जेव्हा त्यातील वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६८ ते २२१ किलोमीटर / तास इतका प्रचंड वाढलेला असतो.

चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडक देणार हे लक्षात आल्यावर तातडीने या वादळाच्या ताकदीचा अंदाज केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला. महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांना सगळ्यात जास्त धोका असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. पण नक्की कुठे ते धडक देणार याबद्दल अंदाज बांधता येणं कठीण होतं. १३ जून आणि १४ जून ला त्याने घेतलेल्या वळणामुळे हे वादळ गुजरात मधील कच्छ, सौराष्ट्र भागात धडक देणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर वेगाने सर्वच पातळीवर सरकारी आणि प्रायव्हेट यंत्रणांना सावध केलं गेलं. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता यात प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची  शक्यता होती. पण केंद्र सरकार ज्यात पंतप्रधानांपासून, रक्षा मंत्री, गृह मंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने वेळीच नागरिकांना सतर्क केलच पण त्यापलीकडे एका मोठ्या बचाव मोहिमेला सुरवात केली.

ज्या भागात चक्रीवादळ बिपरजॉय धडकणार होतं तो भाग इंडस्ट्रिअल हब होता. जामनगर मधे जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी कार्यरत आहे तर इतर अनेक इंडस्ट्रिअल कंपन्या आणि तेल, वायू क्षेत्रातील ऑइल रीग्स इकडे कार्यरत होत्या. त्या सर्वांना वेळीच सावध करून त्या सर्वांचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्रीवादळ बिपरजॉय साधारण १५ जून २०२३ च्या संध्याकाळी त्या भागात आदळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवस आधीच या सर्व कामांना बंद करण्यात आलं. ज्यातून होणारं नुकसान हे तब्बल ५०० कोटी प्रत्येक दिवसाला इतकं जास्त होतं. या शिवाय एकही मनुष्य हानी न होऊ देण्याचं लक्ष्य सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात आलं होतं. भारतीय सेना, वायूदल, नौदल, तटरक्षक दल यांच्या सह एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. च्या सर्व टीम ना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले होते. अवघ्या २ दिवसात सुमारे १ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

चक्रीवादळ बिपरजॉय च्या येण्याने कोणत्याही नैसर्गिक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व स्तरावर कार्यंवित करण्यात आली. मग तो धुवाधार पाऊस असो वा वारा, पूर असो वा भूस्खलन. ६३१ मेडिकल टीम्स, ३०० पेक्षा अजस्ती ऍम्ब्युलन्स, ३८५० हॉस्पिटल बेड्स कोणत्याही जखमी व्यक्तींना उपचारांसाठी तयार ठेवण्यात आले. तब्बल ११४८ गरोदर महिलांना हॉस्पिटल मधे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलं. त्यातील ६८० जणींची प्रसूती झाली. या शिवाय सर्व स्तरावर अभूतपूर्व अशी उपाय योजना केली गेली. त्यामुळे अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ने गुजरातच्या किनारपट्टीला काल रात्री अंदाज लावल्याप्रमाणे धडक दिल्यावर सुद्धा आज हा लेख लिहला जाई पर्यंत कोणतीही मनुष्य हानी झाल्याचं वृत्त नव्हतं. ( दोन जणांना आपल्या गुरांना वाचवताना मृत्यूला सामोरं झाल्याची घटना घडलेली आहे. पण त्याचा संदर्भ चक्रीवादळाशी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.)

भारत इसरो आणि इतर अवकाशीय यंत्रणांवर कोट्यवधी रुपये का खर्च करतो याच उत्तर द्यायला काल दिलेली वादळाशी झुंज पुरेशी आहे. इसरो च्या आधुनिक उपग्रहांमुळे वातावरणात घडणाऱ्या अश्या घटनांचा योग्य वेळी अंदाज आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अचूक अंदाज, केंद्र सरकार आणि राज्य सरकराची योग्य वेळेत टाकली गेलेली पावलं, अतिशय सुयोग्य नियोजन, भारताच्या तिन्ही दलांन सोबत एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी यामुळे भारताने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ला मात दिली आहे. या वादळाशी एकदिलाने भारतीय होऊन झुंज देणाऱ्या त्या अनामिक लोकांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.