Friday 14 July 2023

प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

 प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

आज १४ जुलै २०२३ रोजी भारताच्या चंद्रयान ३ ला घेऊन एल.व्ही.एम. ३ / एम ४ रॉकेट ने यशस्वी उड्डाण भरलं आणि पुन्हा एकदा भारताने चंद्रावर स्वारी केली आहे. भारतासाठी आणि भारतीयांसाठी ही मोहीम खूप महत्वाची आहे. साधारण ४ वर्षापूर्वी म्हणजेच २२ जुलै २०१९ ला भारताच्या चंद्रयान २ यानाला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करण्यात अपयश आलं. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २.१ किलोमीटर उंचीवर असताना इसरो चा यानाशी संपर्क तुटला आणि चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं. त्याचे तुकडे होऊन ते विखुरले गेले. हा क्षण इसरो आणि समस्त भारतीयांसाठी खूप क्लेशदायक होता. इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांच्यासह तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आलेल्या अपयशाचं दुःख दिसत होतं. भारताचे पंतप्रधान या ऐतिहासिक क्षणासाठी तिकडे उपस्थित होते. पण त्यांच्यावर या सर्वाना धीर देण्याची आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा एक नवीन सुरवात करण्याची जबाबदारी आली. 

इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांना अश्रू आवरले नाहीत आणि पंतप्रधानांच्या समोरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या सांत्वनाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. समाजात अतिशय उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीसुद्धा शेवटी माणूस असतात. त्यांना ही भावना असतात आणि त्या प्रत्येकवेळी लपवता येतात असं नाही. भारताच्या चंद्रयान २ मोहिमेचं अपयश जिव्हारी लागणारं होतं. त्यामुळेच अश्या उच्च पदावर असणाऱ्या लोकांच्या मधला एक सर्वसामान्य भारतीय माणूस अनेकांनी त्यावेळी बघितला. ते क्षण प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेले. कुठेतरी हे अपयश भावनिक पातळीवर प्रत्येक भारतीयाला टोचलं होतं. या घटनेच्या वेळी वैज्ञानिकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले होते, 

"माझ्या प्रिय मित्रांनो, अंतिम निकाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रवास आणि प्रयत्न आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की मेहनत सार्थकी लागली आणि प्रवासही तसाच होता. "आमच्या टीमने खूप मेहनत केली, खूप दूरचा प्रवास केला आणि त्या शिकवणी कायमच राहतील. जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा आपण घेतलेल्या मेहनतीचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल."

"विज्ञान कधी थांबत नाही. परीणाम काहीही येवो विज्ञान नेहमीच आपल्याला प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करत राहते." 

आज पुन्हा एकदा त्याच प्रयत्नांच्या जोरावर भारताने चंद्राकडे भरारी घेतली आहे. मागे झालेल्या चुकांतून शिकत, त्या चुका पुन्हा न करण्याच्या इराद्याने इसरो ने आज चंद्राकडे पाऊल टाकलं आहे. हे रॉकेट सायन्स आहे. इकडे अगदी लहानताली लहान चूक पण भारी पडू शकते. ज्या सगळ्या परीक्षा चंद्रयान २ ला द्याव्या  लागल्या होत्या त्याच सगळ्या चंद्रयान ३ ला द्यावा लागणार आहेत. प्रत्येक क्षणाची उजळणी एकदा नाही तर कित्येकदा केली गेली आहे. मागच्या मोहिमेत आलेल्या प्रत्येक गोष्टीला इसरो ने अनुभवात बदललेलं आहे. 

त्यामुळेच आजचं यशस्वी उड्डाण ही एक सुरवात आहे. १४० कोटी लोकांच स्वप्न घेऊन चंद्रयान ३ चंद्राकडे आज झेपावले आहे. मला विश्वास आहे की यावेळेस आपण चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करू. भारत जगातील चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा जगातील पहिला देश ठरेल. या शिवाय चंद्रावर जाण्यासाठी भारताने आणि पर्यायाने इसरो ने केलेला खर्च हा सगळ्यात कमी आहे. मंगळयाना प्रमाणे चंद्रयान ३ स्पेस क्षेत्रात भारताला कलाटणी देणारी मोहीम आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

इसरो च्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कामगार, प्रायव्हेट संस्था आणि इतर सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन आणि चंद्रयान ३ च्या पुढल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





5 comments:

  1. One should have positive way of thinking about every effort taken for achieving target which results in real success.

    ReplyDelete
  2. Wishing you all the very best from bottom of my heart

    ReplyDelete
  3. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 देतोय असेच कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत राहोत हिच आमची ईश्वर चरणी प्रार्थना
    मी अंबादास चांगदेव कानडे सचिव रेणुका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मु पळसगाव पोस्ट घोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
    पिन कोड 423702
    व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती जिल्हा समन्वयक व शासन आपल्या दारी निर्णयानुसार मिशन वात्सल्य समिती सदस्य छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य
    9325475090
    renukabsbs7@gmail.com

    ReplyDelete
  4. प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही पण प्रत्येक वेळी दगा देईल असेही नाही , कठोर परिश्रम कुठे ना कुठे मोजले जातात यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आपण सर्वसामान्य फक्त " जयहिंद" म्हणू शकतो

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिले आहे, गर्वाने उर भरुन आला.

    ReplyDelete