अपयशातून यशाकडे (भाग २)... विनीत वर्तक ©
मागच्या भागात आपण बघितलं की चंद्रयान २ च्या मोहिमेत काय नक्की चुकीचं घडलं. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की काय चूक झाली हे शोधण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला. त्याच प्रमाणे अनेक शक्यतांचा विचार करून मग नक्की काय चुकलं असेल यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. इसरो ला चुका तर लक्षात आला आता त्या पुढचं पाऊल होतं ते म्हणजे आपण या चुकांतून शिकत पुढल्या मोहिमेत काय बदल करायचे?
चंद्रयान ३ मध्ये नक्की काय बदल आहेत?
चंद्रयान २ मधे आधीच्या भागात लिहिलं तसं सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे सॉफ्टवेअर प्रणाली ची. कुठेतरी सॉफ्टवेअर प्रणाली अजून सक्षम करण्याची गरज इसरो ला भासली. यात पण दोन भाग होते एकतर सॉफ्टवेअर प्रणाली च्या टॉलरन्स झोनची व्याप्ती वाढवणं आणि त्या पलीकडे जरी घटना घडल्या तरी त्या घटनांना सांभाळून पूर्ण प्रणाली हँग होणार नाही याची काळजी घेणं. त्या प्रमाणे इसरो ने चंद्रयान ३ मधील सॉफ्टवेअर प्रणाली अजून मजबूत केली आहे या प्रणाली ला देण्यात आलेला टॉलरन्स झोन ही मोठा ठेवण्यात आला आहे. पण असं करताना यानाला सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचण होणार नाही याची काळजी ही घेतली गेली आहे.
यानंतर सगळ्यात मोठा बदल केला गेला तो चंद्रयानाच्या इंजिनात. मागच्या वेळी जेव्हा चंद्रयान २ डिझाईन केलं गेलं तेव्हा त्यात ४ इंजिन होती. चंद्रावर उतरताना ती पुरेशी असतील असं आकडे सांगत होते. यासाठी इसरो चे वैज्ञानिक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थिती निर्माण करून चंद्रयान २ कसं काम करेल हे बघत होते. चंद्रावर अजून एक महत्वाची अडचण म्हणजे चंद्रावर असलेली धूळ. गेली अब्जोवधी वर्ष चंद्रावर ही धूळ आहे त्याच ठिकाणी वसलेली आहे. ज्यावेळेस चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यासाठी जवळ येईल तेव्हा उडालेल्या या प्रचंड धुळीमुळे चंद्राच्या इंजिनाला धोका निर्माण होईल आणि सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचणी येतील असं दिसून आलं. एका सिम्युलेशन मधे ही स्थिती समोर आली तेव्हा चंद्रयान २ च्या उड्डाणाची वेळ जवळ आली होती. त्यामुळे चंद्रयान २ ची क्षमता वाढवण्यासाठी अगदी शेवटच्या मिनिटाला त्यात अजून एक इंजिन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इसरो ने हा निर्णय घेताना अनेक जर आणि तर शक्यतांचा विचार केला. असा एखादा निर्णय घेण्यासाठी अनेकदा आपल्याला रिस्क घ्यावी लागते. कारण या निर्णया बद्दल अनेक मतांतरे खुद्द इसरो मधे होती. पण शेवटी इसरो ने ५ व इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे इंजिन बसवताना इसरोला अनेक इतर बाबींवर पाणी सोडावं लागलं. कोणत्याही याना मधे सगळ्यात महत्वाचं असते ते वजन. यानावर बसवणाऱ्या प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक निवडावा लागतो. कारण तो यानाच वजन वाढवत असतो. वजन जितकं जास्ती तितकं इंजिन मोठं, इंधन जास्त आणि इंधन साठवणाऱ्या टाक्या जास्त त्यामुळे इतर गोष्टींवर आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे यावं लागते. चंद्रयान २ मध्ये ५ इंजिन बसवल्यामुळे साहजिक अधिक जागा इंजिन बसवण्यासाठी लागली. तेवढंच इंधन जास्ती भरावं लागलं. पण त्यामुळे काय झालं की ५ इंजिनांमुळे प्रत्येक इंजिन्स च्या वाट्याला येणारं इंधन मर्यादित झालं. याचा परीणाम असा की उतरताना यानावर असलेल्या इंधनाच्या मर्यादेत इंजिनाचा वापर करणं गरजेचं बनलं. समजा चंद्रयान २ रस्त्यापासून भटकल किंवा थोडा वेळ त्याला हॉवर करण्यासारखी स्थिती निर्माण करायची गरज पडली तर त्यावर मर्यादा होत्या.
चंद्रयान २ च्या ब्रेकिंग च्या वेळी असं लक्षात आलं की आधीच्या सिम्युलेशन मधे दाखवल्या प्रमाणे आणि चंद्रयान २ चा वेग कमी करून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ४ इंजिनांची शक्ती पुरेशी आहे. त्यामुळे ५ व इंजिन बसवल्यावर होणाऱ्या फायद्यापेक्षा इतर होणारे तोटे हे जास्त आहेत. त्यामुळेच चंद्रयान ३ च्या वेळेस हे पाचवं इंजिन काढून टाकण्यात आलेलं आहे. इसरो च्या मते धुळीची किंवा इतर येणारी कोणतीही अडचण दूर करायला ४ इंजिन पुरेशी आहेत. आता ५ व इंजिन गेल्यामुळे झालं काय की चंद्रयान ३ च्या डिझाईन मधे इंजिन गेल्यामुळे रिकामी झालेल्या जागेत इतर उपकरणं बसवता आली. याशिवाय सगळ्यात मोठा फायदा झाला वजनाचा. एका इंजिनाच वजन काही शे किलोग्रॅम मध्ये असल्याने आता काही शे किलोग्रॅम वजन इतर ठिकाणी वाढवता येणार होतं. त्यामुळेच चंद्रयान २ चे पाय जे की २ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यात सक्षम होते. ते आता चंद्रयान ३ मधे ३ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम झालेले आहेत. आपल्यासाठी हा फरक १ मीटर / सेकंद असा छोटा वाटला तरी एखाद्या यानाच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे.
या मजबूत झालेल्या पायांमुळे अजून अधिक उंचीवरून जरी चंद्रयान ३ खाली आदळलं तरी त्याचे पाय हा धक्का सहन करण्यास सक्षम आहेत. तश्या चाचण्या गेली २ वर्ष इसरो ने घेतलेल्या आहेत. दगड धोंढ्यांवर चंद्रयान ३ आदळवून इसरो ने चंद्रयान ३ च्या पायाच्या भक्कमतेच्या चाचण्या घेतल्या आहेत. वजन कमी होण्यामुळे अजून एक झालेला फायदा म्हणजे जास्त इंधन घेऊन जाण्यासाठी जागा मिळाली. याचा अर्थ चंद्रयान ३ वर जास्त इंधन भरलेलं आहे. चंद्रयान ३ मध्ये जर का गरज लागली तर जास्त इंधन असल्यामुळे वैज्ञानिकांना योग्य तो निर्णय घेता येईल. वजन कमी झाल्याचा अजून एक फायदा म्हणजे चंद्रयान ३ मध्ये अजून कॅमेरे आणि सेन्सर बसवता आले. याशिवाय चंद्रयान ३ चे सौर पॅनेल मोठे करण्यात आले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्य प्रकाश अतिशय कमी पोहचतो. सूर्य अगदी क्षतिजावर उगवतो. त्यामुळे अगदी कमी प्रकाशात सुद्धा हे सौर पॅनल चंद्रयान ३ ला लागणारी ऊर्जा निर्माण करू शकणार आहेत.
चंद्रयान ३ ला चंद्रावर उतरण्यासाठी सॉफ्टवेवर प्रणाली ला ४ किलोमीटर X २.५ किलोमीटर चा भाग देण्यात आलेला आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात कुठेही चंद्रयान ३ सॉफ्ट लँडिंग करायची मुभा कॉम्प्युटर ला देण्यात आलेली आहे. चंद्रयान २ च्या वेळेस हा टॉलरन्स झोन फक्त ५०० मीटर X ५०० मीटर इतकाच होता . इतक्या मोठ्या टॉलरन्स झोन मुळे सॉफ्टवेअर प्रणाली हँग होण्याची कमीत कमी शक्यता आहे. चंद्रयान ३ हे इसरो अध्यक्षांच्या मते आपण कुठे अपयशी होऊ शकतो हे लक्षात घेऊन बनवलं गेलं आहे आणि त्यात बदल केले गेले आहेत. ज्याला फ्लॉ लेस म्हणतात ते करण्याचा इसरो ने प्रयत्न केलेला आहे. जिकडे जिकडे अपयश येण्याची शक्यता होती किंवा जिकडे जिकडे इसरो कडून काही चुका झाल्या होत्या त्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करून त्यानुसार चंद्रयान ३ ला बनवलं गेलं आहे.
सगळा विचार केला तरी शेवटी हे रॉकेट सायन्स आहे. आपण एका वेगळ्या ग्रहावर आपलं यान उतरवत आहोत. त्यामुळे अश्या अनेक गोष्टी घडू शकतील ज्यावर आपलं नियंत्रण असणार नाही. इसरो ने जरी सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी शेवटी काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेर आहेत. त्यासाठीच आपल्या विश्वात जी एक शाश्वत ऊर्जा आहे तिच्यावर आपण सर्व सोपवून देतो. इसरो चे वैज्ञानिक तिरुपती बालाजी च्या देवळात गेले यावर दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांनी आधी स्वतः रॉकेट सायन्स काय असते हे समजून घेण्याची गरज आहे. ते देवळात गेले म्हणून मिशन यशस्वी होत नाही आणि ते देवळात नाही गेले तर मिशन अयशस्वी होईल असं ही काही नाही. पण जिकडे मानवाची क्षमता संपते तिकडे त्या शाश्वत ऊर्जेचा प्रवास सुरु होतो. तो प्रवास ईश्वराच्या रूपाने सगळीकडेच असतो मग तो नासा च्या मिशन ला आशीर्वाद देणारा पादरी असो वा तिरुपती बालाजी असो. तुम्ही आपलं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करून त्या उर्जेवर सर्व सोपवून देता.
येत्या २३ किंवा २४ ऑगस्ट २०२३ ला जेव्हा चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करेल तेव्हा एका प्रवासाने आपला प्रवास पूर्ण केलेला असेल. इसरो ला चंद्रयान ३ च्या पुढल्या सर्व टप्यांसाठी खूप खूप शुभेच्छा!!. चंद्रयान ३ मोहीम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
जय हिंद!!!
समाप्त.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment