तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©
आजवर आपण रात्रीचं चांदणं बघत आलो. रात्रीच्या त्या गडद अंधारात आपल्या शीतल प्रकाशाने भुरळ घालणाऱ्या त्या चंद्राच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अशी व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र त्यासाठीच वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आकर्षण राहिला आहे. ज्या वेळेस नभांपलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान मानवाने शिकलं. त्यानंतर त्याच पहिलं लक्ष्य चंद्रच होता. 21 जुलै 1969 चा तो दिवस होता जेव्हा मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर उमटलं. त्यानंतर अनेकांनी आपली पावलं चंद्राच्या मातीत उमटवली देशांनी आपले उपग्रह त्यावर उतरवले. एकेकाळी अतिशय औत्सुक्याचा विषय असणारा चंद्र फक्त माती आणि दगड धोंड्यानी भरलेला आहे मानवाला 1970 च्या दशकात समजून चुकलं. त्यामुळेच चंद्रावर स्वारी केल्यावर मानवाचा खरे तर वैज्ञानिकांची चंद्राबद्दल असलेली उत्सुकता संपलेली होती.14 नोव्हेंबर 2008 चा दिवस होता ज्यावेळेस भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत सोबत असलेल्या मुन इम्पॅक्टर प्रोब ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हार्ड लँडिंग (कोसळताना) चंद्राच्या पृष्ठभागावर उडालेल्या धुराळयात पाण्याचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा तो नभात असलेला चंद्रमा पुन्हा एकदा वैज्ञानिकांना खुणावू लागला.
आपल्या पहिल्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ती 2019 साली. आजवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या परग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव भारताच्या आणि इसरो च्या पाठीशी नव्हता. जे काही तंत्रज्ञान अवगत होतं त्यात इसरोने अगदी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर पर्यंत यशस्वी मजल मारली. पैश्याचा अभाव, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, रॉकेट आणि इतर गोष्टींच्या मर्यादा आणि सगळ्यात मोठं म्हणजे अश्या मोहिमेत अपयश आल्यावर झेलाव्या लागणाऱ्या टीकेचा त्रास सहन करत भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर 2019 साली केलेला प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फसला. सर्व भारतीयांना तो क्षण आजही आठवत असेल. अगदी ओंजळीत पिण्यासाठी घेतलेलं पाणी निसटून जावं आणि आपल्याला तहानलेलं राहावं लागावं अशीच ती अवस्था होती. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अश्या प्रयत्नात अगदी सामान्य असल्या तरी जिकडे रॉकेट अवकाशात पाठवायला खर्च का करायचा असे प्रश्न विचारले जातात तिकडे हे नुकसान खूप मोठं होतं. त्यामुळेच तत्कालीन इसरो चीफ के. सिवान यांच्या डोळ्यात आलेले अश्रू खूप काही सांगून गेले.
असं म्हणतात,
"अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है"...
आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून त्या अश्रूंना आज आनंदाच्या अश्रूत परावर्तित केलं आहे. 1969 साली अमेरिकेत जे घडलं ते आज भारतात घडताना मला व्यक्तिशः जाणवते आहे. त्यावेळी अमेरिकेने कोल्ड वॉर च्या लढाईत निर्णायक आघाडी चंद्रावर मानव उतरवून घेतली हा इतिहास असला तरी त्यापेक्षा अमेरिकेची आणि तिथल्या लोकांची मानसिकता या घटनेने बदलवून टाकली. येणाऱ्या दशकात अमेरिका तांत्रिक बाबतीत आघाडीवर राहिली आणि जगातील सगळ्यात प्रगत राष्ट्र असलेली अमेरिकन माणसाची मानसिकता आजही कायम आहे. आज भारताच्या विक्रम लॅण्डर ने केलेला पराक्रम हा त्याच तोडीचा आहे. तांत्रिक बाबतीत भारताने मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा कैक पटीने भारताच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत झालेला बदल जास्ती महत्वाचा आहे. आपण स्वबळावर आणि स्वस्तात तंत्रज्ञान विकसित करू शकतो. त्या पलीकडे आलेल्या अपयशाने खचून न जात अजून जोमाने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे.
ज्यावेळेस जागतिक पटलावर रशिया रॉसकॉसमॉस आणि भारताच्या इसरो च्या अध्यक्षांना सारखा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या दोघांनी दिलेलं उत्तर बदललेली मानसिकता अधोरेखित करते. रॉसकॉसमॉस च्या अध्यक्षांना ज्यावेळी विचारण्यात आलं की जवळपास पाच दशकानंतर रशिया ल्यूना 25 मोहिमेद्वारे चंद्रावर पुन्हा जातो आहे. त्यावेळेस या मोहिमेच्या यशाची खात्री म्हणजेच ल्यूना 25 सॉफ्ट लँडिंग करण्याची किती खात्री आपल्याला आहे? यावर त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 70% आम्ही यशस्वी होऊ. हाच प्रश्न जेव्हा इसरोच्या अध्यक्षांना विचारला गेला तेव्हा उत्तर होतं, आमच्या चंद्रयान 3 चे सगळे सेन्सर निकामी झाले, आमचा संपर्क काही काळासाठी तुटला अगदी त्याची दोन इंजिन जरी बंद पडली तरी आमचा विक्रम लॅण्डर हा चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करेल. या दोन्ही उत्तरात मानसिकतेत असलेला बदल तुम्ही, आम्ही सगळेच जाणवू शकतो.
एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेआधी विचारावं की तुझा अभ्यास किती झाला आहे? त्यावर त्याने उत्तर द्यावं की काहीही येऊन दे मी यशस्वी होणार, ते पुस्तकातलं असू दे, दुसऱ्या कोणत्या पुस्तकातलं असू दे, सिलॅबस मधलं असू दे नाहीतर अजून कुठलं असू दे. मला त्याने काही फरक पडत नाही. माझा बेस पक्का आहे. प्रश्न कितीही कठीण आला तरी त्याला सोडवण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे की मी तो बरोबरचं सोडवेन. हा आत्मविश्वास येण्यासाठी त्या विद्यार्थ्याने रात्रीचा दिवस केलेला असतो हे कोणीही सांगेल कारण असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमची तयारी इतकी पक्की केलेली असते की समोर काय येते याची भिती नसते तर येणारा प्रश्न आपण किती सहजरीत्या सोडवू याचा विचार असतो. अगदी अशीच स्थिती आज इसरो मधील प्रत्येकाची होती आणि त्यांच्या मनातील तो आत्मीश्वास इसरो च्या अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरातून जाणवत होता.
आज जेव्हा विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरु केला तेव्हा पडद्यावर दिसणारे आकडे त्याची साक्ष देत होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट ज्याला कॉपी बुक म्हणता येईल अशी घडत होती. मग ती ब्रेक डाऊन फेज असो वा एका ठिकाणी विक्रम लॅण्डर ने हॉवरिंग करणं असो. जे मापदंड आखले गेले होते त्यातल्या प्रत्येक मापदंडात आज विक्रम लॅण्डर चा प्रवास झाला. विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग केलं यापेक्षा ते ज्या पद्धतीने केलं त्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जाणार आहे. कारण जवळपास 3 लाख 84 हजार किलोमीटर लांबून वातावरण नसताना एखाद्या परग्रहावर अशी अचूकता निर्माण करण्याचं तंत्रज्ञान हे शिकणं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी चे अध्यक्ष जोसेफ अॅशबॅकर यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की,
Landing of Chandrayaan-3 as an “incredible” event. “What a way to demonstrate new technologies and achieve India's first soft landing on another celestial body, “Well done. I am thoroughly impressed.”
ते असं का म्हणाले याच एक उदाहरण सांगतो, विक्रम लॅण्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीवर असणारं होतं तेव्हा खाली उतरण्याआधी आपल्या खाली काही धोका आहे का हे बघण्यासाठी 20 सेकंद एका ठिकाणी तंरंगणार होतं. तुम्ही पुन्हा जाऊन जर यु ट्यूब वर ते लाईव्ह बघितलं तर अगदी 149.98 मीटर वर येऊन विक्रम लॅण्डर तरंगायला लागलं. आपण 0.02 मीटर खाली आहोत हे त्याच्या कॉम्प्युटर च्या लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर च्या कॉम्प्युटर ने त्याची उंची पुन्हा 150.20 मीटर इतकी केली. हे सगळं अवघ्या 5 सेकंदात घडलं. त्या नंतर खाली कोणताही धोका नाही हे लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर ने आपला पुढला प्रवास सुरु केला.
हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं ही अचूकता आज इसरो आणि भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर मिळवली आहे. त्यामुळेच विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग हे त्या पलीकडे आहे. हे कदाचित जोसेफ अॅशबॅकर यांना जाणवलं असेल असा माझा कयास आहे. कारण यातलं आर्टिफिशियल इंटीलिजन्स च तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने इंजिन आणि इतर सेन्सरवर मिळवलेलं प्रभुत्व आणि या सर्वांना एकत्रित आणून विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग करणारी इसरो एक लंबी रेस का घोडा तर आहेच पण हा घोडा आता शर्यतीत उतरला आहे हे त्यांना नक्की पटलं असेल.
21 जुलै 1969 चा दिवस जसा अमेरिका, नासा आणि पर्यायाने प्रत्येक अमेरिकन माणसाच्या मानसिकतेला कलाटणी देणारा होता तसाच 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारत, इसरो आणि प्रत्येक भारतीयांच्या मानसिकतेला कलाटणी देणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी पण तोच चंद्रमा नभांत होता आणि आजही तोच चंद्रमा नभांत आहे. फरक इतकाच आहे की आज त्यावर आपला झेंडा रोवणारा देश वेगळा आहे.
जय हिंद!!!
ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात.
क्रमश:
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
छान माहिती. जय हिंद.👍🏼
ReplyDeleteधन्यवाद सर !!!
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच सुंदर...👌👌
ReplyDeleteFB वर पोस्ट दिसल्या नाहीत बरेच दिवसात.
Well written !!
ReplyDeleteफेसबुक वर का नाही येत
ReplyDelete