परराष्ट्र धोरणांचे वजीर 'एस.जयशंकर'... विनीत वर्तक ©
२०१५ च वर्ष होतं. भारतात झालेल्या निवडणुकांनंतर भारतात एका नवीन सरकारने देशाचा कारभार स्वीकारला होता. भारताच्या परराष्ट्र धोरणाची कमान सुषमा स्वराज यांच्याकडे आली होती. त्या वेळेपर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण हे जगातील प्रगत देश काय सांगतात त्या प्रमाणे वाटचाल करत राहिलेलं होतं. किंबहुना भारताने काय निर्णय घ्यावेत यावर जगातील विशेष करून अमेरीका आणि युरोपियन देश काय म्हणतात यावर त्यांची मर्जी राखण्यासाठी निर्णय घेण्याचं होतं. भारताच्या मताला फारशी किंमत जगात दिली जात नव्हती. खरे तर आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला सुद्धा आंतरराष्ट्रीय पटलावर भारत घाबरत होता. युनायटेड नेशन, जी २० आणि इतर अनेक वेगवेगळ्या संस्था आणि ग्रुप मधे भारत काय बोलतो यावर कोणाला स्वारस्य असल्याचं दिसून आलं नव्हत. पण २०१५ साली वाऱ्यांनी दिशा बदलली होती. योग्य नेतृत्व आणि बदललेल्या आर्थिक, जागतिक गणिताचा आधार घेत भारताचं परराष्ट्र खात्यात बदल करण्याचा निर्णय तत्कालीन नेतृत्त्वाने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून परराष्ट्र खात्यातून निवृत्त होण्यासाठी अवघे २ दिवस राहिलेल्या एका अधिकाऱ्याला ताबडतोब साऊथ ब्लॉक मधे उपस्थित राहण्याचा संदेश आला. त्यांना भारताच्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे विदेश सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याचं सांगितलं. तर त्याकाळच्या भारताच्या विदेश सचिव सुजाता सिंग यांना सरळ नारळ दिला गेला. या निर्णयाने एका नवीन बदलांची सुरवात परराष्ट्र खात्यात झाली. सुषमा स्वराज यांनी निवडलेले ते अधिकारी होते भारताचे आत्ताचे परराष्ट्र मंत्री 'सुब्रह्मण्यम जयशंकर' ज्यांना एस.जयशंकर या नावाने ओळखलं जाते.
एस. जयशंकर यांची नियुक्ती अनेक सरकारी नियम बाजूला ठेवून केली गेली. कारण व्यक्तीच्या सेवा कालावधी पेक्षा त्याच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून संधी देण्याचा पायंडा एक प्रकारे या नियुक्तीने पाडला गेला. एस. जयशंकर हे नाव परराष्ट्र खात्याला नवीन नव्हतं. भारत- अमेरीका आण्विक सहकार्य करार, तसेच जागतिक पटलावर भारताची प्रतिमा मालिन करणारं खोब्रागडे नाट्य घडल्यावर ते सावरण्यात एस.जयशंकर यांची पडद्यामागची भूमिका खूप महत्वाची राहिली होती. अतिशय कमी बोलणं, प्रसिद्धीची हाव नसलेला एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि हाती घेतलेलं कोणतंही काम तडीस नेणारा अधिकारी म्हणून परराष्ट्र खात्यात एस.जयशंकर यांची ख्याती होती. त्यामुळेच सुषमा स्वराज यांनी आपल्या सर्व निर्णयांची जबाबदारी घेण्यासाठी त्यांची निवड केली. सुषमा स्वराज यांना जागतिक पटलावर एका नवीन भारताचा उदय करण्याचं श्रेय दिलं जाते. जागतिक संकटात वेगवेगळ्या भागातून भारतीयांची सुटका, त्यांच्या विदेशातील अडचणी, त्यांना भेडसावत असलेल्या समस्या या सगळ्यांना तत्परतेने सहकार्य करण्याची त्यांची हतोटी त्यांना एक वेगळं स्थान भारतीयांच्या मनात देऊन गेली. या सर्व गोष्टींच्या मागे त्यांना लाभलेला होता एक कणखर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर. २०१७ च्या भारत- चीन डोकलाम विवादात चीन ला राजनैतिक मार्गाने शहास प्रतिशह देऊन कोंडीत पकडण्याची यशस्वी खेळी एस.जयशंकर यांचीच होती. याच गोष्टीमुळे पंतप्रधानांच्या नजरेत एस. जयशंकर भरले.
भारताचे पूर्व पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सुद्धा एस. जयशंकर यांच्या कर्तृत्वाने भुरळ घातली होती. रंजन मथाई यांच्या नंतर परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करावी असं पंतप्रधानांनी म्हंटलेलं होतं पण यु.पी.ए. सरकार हायकमांड च्या इशाऱ्यावर चालत होतं. हायकमांड ला हा निर्णय योग्य वाटला नाही. सरकारी सिनियारीटी मोडून एस.जयशंकर यांना पुढे करणं हे हायकमांड च कारण भारताच्या पंतप्रधानांना नाकारण्याची हिंमत नव्हती. त्यांची रवानगी त्यामुळे अमेरीकेचे भारतीय राजदूत म्हणून केली गेली. आपल्या परराष्ट्र खात्यातील निवृत्ती नंतर एप्रिल २०१८ मधे एस. जयशंकर यांनी टाटा सन्स मधे प्रेसिडेंट म्हणून काम करायला सुरवात केली. २०१९ मधे सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या इतक्याच कर्तृत्वान व्यक्तीने या खात्याचा कारभार पुढे न्यावा अशी इच्छा पंतप्रधानांची होती. त्यामुळेच सुषमा स्वराज यांच्या इतकं कर्तृत्व आणि जागतिक राजकारणाची आणि मुत्सुद्देगिरीची जाण असलेलं एकमेव नाव समोर होतं ते म्हणजे 'एस. जयशंकर'.
परराष्ट्र सचिव ते परराष्ट्र मंत्री आणि कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणारे एस. जयशंकर पहिले आणि एकमेव अधिकारी आहेत. जवळपास ३८ वर्षाचा परराष्ट्र खात्याचा अनुभव गाठीशी असणारे मंत्री भारताला लाभले ही गोष्ट भारताच्या परराष्ट्र धोरणाला कलाटणी देणारी ठरली आहे. ज्यावेळेस जग कोरोना महामारीत लॉकडाऊन मधे अडकून पडलेलं होतं त्या २१ महिन्यात एस.जयशंकर यांनी तब्बल २७ देशांना भेटी दिल्या. भारत आणि त्या राष्ट्रांचे संबंध वृद्धिंगत करण्या सोबत व्हॅक्सिन डिप्लोमसी, भारताचं मत आणि जागा त्यांनी या काळात या राष्ट्रांना दाखवून दिली. चीन च्या विस्तारवादी भुमिकेपेक्षा भारताची वसुधैव कुटुंबकम आणि आत्मनिर्भर भारत या भुमिका जागतिक पातळीवर अगदी स्पष्टपणे मांडल्या. पाकिस्तान असो वा चीन दोघांना आंतरराष्ट्रीय पातळीवर जशास तसं उत्तर देण्यात एस. जयशंकर यांचा वाटा सिंहाचा राहिला आहे. आज भारताच्या शत्रु देशाचे म्हणजेच पाकिस्तान पंतप्रधान उघडपणे न्यूज चॅनेल किंवा सभेत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे गोडवे गातात यावरून जागतिक पटलावर भारताच्या परराष्ट्र धोरणांच नाणं किती खणखणते आहे हे आपल्याला समजून येईल. ते काही उगाच बोलत नाहीत. याला कारणीभूत आहे ती रशिया- युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी.
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र संबंधांची कसोटी लागलेली आहे. एकीकडे रशिया सारख्या सार्वकालिक मित्राला गमावणे भारताला परवडणारं नाही तर दुसरीकडे युक्रेन ची बाजू घेण्यासाठी वाढत असलेला अमेरीका, युरोप, जी २०, युनायटेड नेशन आणि क्वाड सारख्या ग्रुप आणि संस्थांमधून दबाव या सगळ्यात भारताची दोन्ही बाजूने कोंडी झालेली होती. पण एस.जयशंकर यांनी ज्या मुत्सुद्दीगिरीने, कणखरपणे भारताची बाजू जागतिक मंचावर ठेवली आहे त्याचं कौतुक आज संपूर्ण जग करत आहे. त्या कौतुक सोहळ्यात पाकिस्तान ही समाविष्ट आहे. एकीकडे युक्रेन मधल्या मानवी हक्कांची पायमल्ली आणि एकूणच युद्ध यावर भारताने रशियाची कानउघाडणी केली आहे. पण त्याचवेळी आपण आपल्या मित्राला एकटं सोडणार नाही हे जागतिक पातळीवर ठणकावून सांगितलं आहे. खरा मित्र तोच असतो जो खाजगीत आपल्या चुकांची जाणीव करून देतो पण सगळ्यांसमोर आपल्यासोबत उभा राहतो. भारताने अमेरीका, युरोप राष्ट्रांकडून होणाऱ्या दबावाला जुगारून तर लावलं आहे. पण त्यांना त्यांचीच जागा दाखवत भारत कोणाच्या बापाला घाबरत नाही असा संदेश दिला आहे. या सर्व चालींची मांडणी करणारे भारताचे वजीर आहेत 'एस. जयशंकर'.
११ एप्रिल २०२२ भारत आणि अमेरीका यांच्या मधील व्दिपक्षीय पत्रकार परिषदेत विदेशी पत्रकारांनी भारताने रशियाकडून विकत घेत असलेल्या तेलाचा विषय काढून भारताला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर एस. जयशंकर यांनी अक्षरशः त्या पत्रकाराचे आणि भारताविरुद्ध अजेंडा राबवणाऱ्या अमेरिका आणि युरोपियन देशांचे वाभाडे काढले. त्यांनी म्हंटल की भारत जेवढं तेल एका महिन्यात रशियाकडून विकत घेतो आहे तेवढं तेल तर युरोप मधील देश एका दिवसात विकत घेतात. आता तुम्हीच बघा कोण रशियाला मदत करते आहे? यावर त्या पत्रकाराची मान लाजेने खाली गेली. भारत रशिया- युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने उभा आहे. या भूमिकेचं समर्थन तुम्ही करता का? या प्रश्नावर पण त्यांनी सिक्सर मारली. भारताने काय करावं हे तुमच्यासारख्या पत्रकारांकडून भारताला शिकण्याची गरज नाही. भारत आपल्या मर्जीने आपल्या हिताप्रमाणे निर्णय घेतो ज्या प्रमाणे जगातील इतर देश घेतात. त्यामुळे भारताने काय करावं हे जगाने आम्हाला सांगू नये. या दोन उत्तरांनी संपूर्ण डिप्लोमसी च्या पटलावर खळबळ उडवली आहे. अमेरीकेने नेहमीप्रमाणे भारतात पायमल्ली होत असलेल्या मानवी हक्कांचा मुद्दा पुढे केला. त्यावर एस. जयशंकर यांनी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या मतावर आम्ही काय व्यक्त व्हावं हा आमचा अधिकार आहे. तेव्हा अमेरीकेने दुसऱ्यांच्या घरात झाकून बघण्यापेक्षा स्वतःच्या घरात मानवी हक्कांची काय पायमल्ली होते आहे याचा विचार करावा. कालच अमेरीकेत त्यामुळे एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. तेव्हा सुज्ञास जास्ती सांगणे न लागे. असं म्हणून त्यांचेच दात त्यांच्याच घशात घातले.
एस.जयशंकर यांच्या या भूमिकेचं एकट्या भारतातून नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे. याच कारण आहे आपल्या देशाचं हित सर्वप्रथम ठेवून मग बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची ही विदेशनीती चर्चेचा भाग ठरली आहे. त्यामुळेच पाकिस्तान सारखा देश भारताच्या विदेश नितीच कौतुक आज उघडपणे करत आहे. एस.जयशंकर हे तमिळ, इंग्रजी, हिंदी सोबत रशियन भाषा अस्खलित बोलू शकतात. भारताला रशियाकडून अतिशय स्वस्त दरात तेल मिळण्यामागे एस.जयशंकर यांच रशियन भाषेवरचं प्रभुत्व हे एक कारण समजलं जाते. कारण रशियन नेत्यांना त्यांनी त्यांच्या भाषेत भारताची भूमिका समर्थपणे मांडून दाखवलेली होती. त्यानंतर रशियाने जवळपास २५% स्वस्त दारात भारताला तेल देण्याचा निर्णय घेतला होता. युक्रेन मधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थाना सुखरूप भारतात परत आणण्यात एस. जयशंकर यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. सर्व देशांशी समन्वय साधत ते अगदी रशियाला युद्ध काही काळ थांबवण्यासाठी भाग पडत हे मिशन यशस्वी करण्यात याच वजिराच्या चाली महत्वपूर्ण होत्या.
काल भारताच्या दौऱ्यावर आलेल्या बो.जो. (बोरीस जॉन्सन) यांनी केलेलं वक्तव्य आज खूप काही सांगून जाते. बोजो म्हणाले,
India’s position on Russia well known and it won’t change: PM Boris Johnson
याचा अर्थ खूप मोठा आहे. उघडपणे इंग्लंड आणि युरोप ने भारताची भुमिका मान्य केली आहे. भारतावर कितीही दबाव आणला तरी भारत झुकणार नाही. त्यांना योग्य तेच आणि तसेच निर्णय घेणार याची स्पष्ट कबुली एक प्रकारे दिलेली आहे. भारताने अशी भुमिका घेतली तरी याचा फरक आमच्या संबंधांवर पडणार नाही. याचा अर्थ असा आहे की भारताची भुमिका आता भारत ठरवेल. तो कोणाच्याही बापाला घाबरत नाही. कोणी किती दबाव आणा पण त्याला योग्य तेच तो करणार. असं जेव्हा युरोपियन देशाचा नेता भारतात येऊन कबूल करतो. तेव्हा त्याचे परीणाम किती दूरगामी असतात याचा विचार आपण करू शकत नाही. आज भारताची डिप्लोमसी आणि चाणक्यनीती सर्व जगात एक संशोधनाचा विषय आहे. कारण एकाच वेळी भारत दोन्ही बाजूच्या राष्ट्रांसोबत आपले संबंध राखून आहे. रशिया- युक्रेन युद्धाने अनेक देशांचे संबंध बिघडवले आहेत. पण भारताचे मजबूत झाले आहेत. या चाणक्य नितीचे खरे शिल्पकार आहेत परराष्ट्र धोरणांचे वजीर 'एस.जयशंकर'
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment