Wednesday 20 April 2022

गॉड ऑफ क्रूझ मिसाईल 'ब्राह्मोस'... विनीत वर्तक ©

 गॉड ऑफ क्रूझ मिसाईल 'ब्राह्मोस'... विनीत वर्तक ©

जानेवारी २०२२ पासून ते आत्ता लिहेपर्यंत भारताने 'ब्राह्मोस' मिसाईलच्या तब्बल ७ चाचण्या यशस्वी केल्या आहेत. या चाचण्या वेगवेगळ्या कारणांसाठी घेण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक मिसाईल चुकून ( ऑफिशियली ) पाकिस्तान मधे जाऊन पोहचलेलं होतं. त्याचवेळी भारताने फिलिपाइन्स सोबत केलेल्या ब्राह्मोस करारामुळे हे मिसाईल जागतिक बाजारपेठेत खूप चर्चेत आहे. काल भारताने बॅक टू बॅक ब्राह्मोस च्या दोन यशस्वी चाचण्या घेऊन पूर्ण जगाला आपल्या तयारीची आणि ब्राह्मोस काय करण्यात सक्षम आहे याची चुणूक एक प्रकारे दाखवून दिली आहे. या चाचण्यांमुळे शत्रूच्या मनात धडकी तर भरलीच आहे. पण आजच्या क्षणाला ब्राह्मोस गॉड ऑफ क्रूझ मिसाईल का आहे हे स्पष्ट केलं आहे. 

एखाद्या मिसाईल ची क्षमता कागदावर असणं वेगळं असते आणि प्रत्यक्षात ती किती खरी उतरते यात खूप तफावत आढळते. त्यामुळेच अनेकदा कागदावर खूप गाजावाजा झालेली मिसाईल किंवा लढाऊ विमान प्रत्यक्ष युद्धभूमीवर अथवा त्यांच्या चाचण्यात तितकी यशस्वी झालेली आढळत नाहीत. अनेकदा त्यांचे आकडे फुगवून सांगितले जातात. चीन या बाबतीत पुढे आहे. त्यांची ताकद अनेकदा कागदावर उतरवलेली असते. प्रत्यक्षात जगाने त्या ताकदीचा अंदाज घेतलेला नसतो. कारण बाहेर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर तिकडे बंधन आहेत. भारताचं तसं नाही. त्यामुळेच भारताने केलेल्या चाचण्या या खऱ्या असतात यावर जगाचा विश्वास आहे. काल ज्या दोन चाचण्या ब्राह्मोस मिसाईल च्या भारताने घेतल्या त्यामुळे पुन्हा एकदा ब्राह्मोस च्या क्षमतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालेलं आहे. आजवर ब्राह्मोस ने लक्ष्य गाठल्यावर त्याच काय होते याबद्दल भारताने उघडपणे खूप कमी वेळा व्हिडीओ अथवा फोटो जगापुढे ठेवले होते. त्यामागे ब्राह्मोस च्या क्षमतेचा अंदाज क्षत्रूला लागू न देणं होता. पण आजच्या जमान्यात अश्या गोष्टी जास्ती काळ लपून राहू शकत नाहीत. ब्राह्मोस एका हल्यात एखाद्या जहाजाचे दोन तुकडे करू शकते याचा अंदाज जगाला होता. पण काल ते प्रत्यक्ष भारताने जगाला दाखवून दिलं आहे. 

भारतीय नौदलाच एक निवृत्त झालेलं जहाज लक्ष्य म्हणून बंगालच्या उपसागरात एका गुप्त ठिकाणी उभं करण्यात आलं होतं. भारतीय नौदल आणि भारतीय वायू सेना या दोघांच्या ब्राह्मोस डिव्हिजनला संयुक्तपणे या जहाजाला लक्ष्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. दिल्ली वरून नव्याने विकसित केलेल्या लॉन्चर वरून अपग्रेडेड ब्राह्मोस ने लक्ष्याकडे कूच केलं. या ब्राह्मोस वर जाणूनबुजून वॉरहेड लावलेलं नव्हतं. ब्राह्मोस ने उड्डाण केल्यावर ३००० किलोमीटर / तास पेक्षा जास्त वेगाने लक्ष्याकडे कूच केलं. क्षणात ब्राह्मोस ने अचूकतेने जहाजाच्या मध्यभागी लक्ष्यभेद केला. ब्राह्मोस च्या माऱ्यामुळे वॉरहेड नसताना पण जहाजाला मधोमध मोठ्ठ भगदाड पडलं. हे होत नाही तोच तिकडे भारतीय वायू सेनेच्या सुखोई ३० एम.के.आय. विमानाने भारताच्या पूर्व तळावरून उड्डाण करून हवेतून २००० किलोमीटर/ तास वेगाने जात असताना ब्राह्मोस ला याच लक्ष्यावर डागलं. इतक्या वेगात असताना सुद्धा ब्राह्मोस ने हवेतून आपल्या लक्ष्याचा वेध घेताना अचूकतेने त्याच ठिकाणी दुसरा हल्ला केला. पाठोपाठ च्या दोन ब्राह्मोस हल्याने जहाजाचे तुकडे होउन त्याला जलसमाधी मिळाली. 

या यशस्वी चाचणी मधून भारताने खूप काही मिळवलं आहे. या दोन्ही चाचण्या भारताच्या दोन वेगळ्या डिव्हिजन नी मिळून केलेल्या होत्या. यामुळे भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांच्यात समन्वय असल्याचं एक प्रकारे स्पष्ट झालं. ब्राह्मोस च्या दोन वेगळ्या व्हर्जन ची अचूकता, परिणामकारक क्षमता, संहारक क्षमता तसेच त्याचा स्वनातीत वेग हे अगदी तंतोतंत जुळत असल्याच स्पष्ट झालं. एका ब्राह्मोस ने पाण्यावरून उड्डाण करून त्याने पाण्यातील लक्ष्याचा भेद केला तर दुसऱ्याने हवेतून उड्डाण करून पाण्यातील लक्ष्याचा भेद केला. यावरून ब्राह्मोस किती व्हर्सटाईल असल्याचं स्पष्ट होते आहे. जमीन, हवा, पाणी किंवा पाण्याखालून तुम्ही कुठूनही डागा. ब्राह्मोस आपल्या ठरलेल्या लक्ष्याचा वेध घेण्यात १००% यशस्वी होते हे एक प्रकारे स्पष्ट झालेलं आहे. वॉरहेड नसलेलं ब्राह्मोस जर एखाद्या जहाजाला आरपार भगदाड पाडू शकते. तर वॉरहेड असलेलं ब्राह्मोस काय हाहाकार माजवू शकेल याचा अंदाज शत्रू देशांना तर आलाच असेल पण ब्राह्मोस च्या खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या देशांना ही आला असेल. त्यांच्यासाठी ही चाचणी एक प्रकारे प्रोडक्ट चा एक डेमोच होता. 

सुखोई ३० एम.के.आय. हवेतून जवळपास २१२० किलोमीटर / तास वेगाने जात असते. इतक्या प्रचंड वेगात त्याचा अंदाज बांधणं रडार यंत्रणेला आधीच कठीण असतं. तर त्यातून निघणारं ब्राह्मोस हे ३४५० किलोमीटर/ तास वेगाने लक्ष्यावर झेपावत. सुखोई विमानाची क्षमता ३००० किलोमीटर अंतराची आहे. शत्रूच्या सिमारेषेच्या आत ३००० किलोमीटर अंतरावर जाऊन जर ब्राह्मोस चा हल्ला केला तर तो ब्राह्मोस च नवीन व्हर्जन ४५० ते ६०० किलोमीटर अंतरावर स्वनातीत वेगाने लक्ष्यभेद करू शकते. एकूण क्षमतेचा अंदाज केला तर सुखोई विथ ब्राह्मोस शत्रूच्या गोटात जवळपास ३५०० किलोमीटर अंतरावर लक्ष्याला निशाणा करू शकतात. त्यामुळेच शत्रूला कापरं भरलेलं आहे. कारण ब्राह्मोस ला निष्प्रभ करणं सध्यातरी कोणत्या एअर डिफेन्स प्रणाली ला शक्य नाही. त्या शिवाय ब्राह्मोस ची अचूकता आणि भेदकता त्याला गॉड ऑफ क्रूझ मिसाईल बनवते. 

कालच्या चाचण्यांमुळे ब्राह्मोस खरेदी करणाऱ्या देशांच्या रांगेत अजून भर पडणार आहे. अमेरीकन गुप्तचर संस्थेच्या मते भारताने ब्राह्मोस वर प्रभुत्व मिळवलेलं असून २०२५ पर्यंत ब्राह्मोस २ म्हणजेच ब्राह्मोस 'के' हे भारताच्या संरक्षणासाठी सिद्ध झालेलं असेल. अजून जिकडे ब्राह्मोस च्या आत्ताच्या वेगाला आवरण्याची क्षमता कोणाकडे नाही. तिकडे ब्राह्मोस के च्या ९८०० किलोमीटर / तास वेगाने १००० किलोमीटर गाठण्याच्या क्षमतेवर येणारी काही दशके कोणी अंकुश ठेवलं असं सध्यातरी दिसून येत नाही. त्यामुळेच ब्राह्मोस ने पुन्हा एकदा आपल्याला  गॉड ऑफ क्रूझ मिसाईल असं का म्हंटल जाते हे सिद्ध केलेलं आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल  (एका फोटोत ब्राह्मोस सुखोई ३० मधून उड्डाण भरताना, दुसऱ्या फोटोत आय.एन.एस. दिल्ली वरून उड्डाण करताना आणि तिसऱ्या फोटोत ब्राह्मोस च्या एका हल्ल्यानंतर झालेली जहाजाची हालत. ) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 





1 comment:

  1. Great Job Team. and Congratulation to all Team.............

    ReplyDelete