Tuesday, 19 April 2022

एका हरवलेल्या गणित तज्ञाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका हरवलेल्या गणित तज्ञाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१९६९ वर्ष होतं जेव्हा नासाचे अपोलो मिशन अमेरीकन अवकाश यात्रींना घेऊन पहिल्यांदा चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. अमेरीका आणि एकूणच जगातील सर्व मानवांच्या इतिहासातील हा अतिशय अभिमानस्पद क्षण होता. पण जेव्हा हे मिशन चंद्राकडे जात होतं. त्याचवेळी कॉम्प्युटर मधे काही काळासाठी बिघाड झाला आणि हे मिशन नक्की कोणत्या स्थितीत आहे याचा अंदाज नासाच्या तंत्रज्ञ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज लोकांना  येत नव्हता. त्यावेळी तिकडे २३ व्या वर्षी डॉक्टरेट मिळवलेला भारताच्या त्याकाळी अतिशय मागासलेल्या बिहार राज्यातून आलेला एक तरुण नासा मधे काम करत होता. ज्यावेळेस नासाचे कॉम्प्युटर बंद झाले त्या वेळेस या २३ वर्षाच्या भारतीय तरुणाने आपल्या अचाट बुद्धिमत्तेने गणित करत अपोलो मिशन ची इत्यंभूत माहिती, त्याच स्थान नासा ला सांगितलं होतं. काही काळानंतर नासाचे कॉम्प्युटर पूर्ववत झाल्यावर कॉम्प्युटर ने अपोलो मिशन च मांडलेलं गणित आणि या भारताच्या शास्त्रज्ञानाने मांडलेलं गणित तंतोतंत जुळत होतं. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी नासाच्या कॉम्प्युटर ला मागे टाकणारा हा गणिताचा अवालियावर मात्र 'स्किझोफ्रेनिया' आजारामुळे भारताच्या रस्त्यांवर कचऱ्यातून अन्न शोधण्याची वेळ आली हा काळाचा दुर्दैवविलास म्हणावा की भारताचं नशीब फाटकं होतं असं म्हणावं. एकेकाळी जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन च्या प्रमेयाला आव्हान देणारा हा भारतीय शास्त्रज्ञ होता 'डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह'. 

२ एप्रिल १९४२ ला बिहार च्या बसंतपूर या छोटाश्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडील पोलीस खात्यात एक साधे हवालदार होते. कॉलेज ला जाई पर्यंत सामान्य वाटणारा हा मुलगा जेव्हा १९६३ साली पाटणा सायन्स कॉलेजात दाखल झाला तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की येत्या काही काळात त्याच्या नावाची दखल जागतिक पातळीवर घेतली जाईल. बी. एस. सी. गणित च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांच्या गणिताची चुणूक संपूर्ण कॉलेज ला दिसून आली. गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांनी सांगितलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गणित सोडवलं जाऊ शकते हे सप्रमाणात सिद्ध केल्यावर त्याच्या शिक्षकांना भर वर्गात त्यांचा झालेला अपमान सहन झाला नाही. त्यांनी त्यांची तक्रार कॉलेजच्या मुख्याध्यापकांकडे केली. कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडील गणिताचे प्रश्न त्यांना सोडवायला दिले. जे त्यांनी अवघ्या काही मिनिटात सोडवून दाखवले. त्यांच्या असामान्य बुद्धीची दखल कॉलेज ला घ्यावी लागली. विद्यापीठाला याबद्दल सांगून नियमात बदल करून त्यांना थेट बी. एस. सी. गणित च्या अखेरच्या वर्षाच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली. अर्थातच यात त्यांनी पहिला नंबर पटकावला. पुढल्या वर्षी थेट एम.एस.सी. च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला त्यांना बसवण्यात आलं त्यातही त्यांनी आपला पहिला क्रमांक कायम ठेवला. 

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी गणितात आपलं पदवयुत्तर शिक्षण पूर्ण करणारे वशिष्ठ नारायण सिंह गणिताच्या क्षितिजावर चर्चेचा विषय झाले. त्याच काळात युनिव्हर्सिटी ऑफ केलिफोर्निया, बर्केले चे प्रोफेसर जॉन केली पटणा इकडे गणिताच्या एका परिषदेसाठी आले होते. साहजिक वशिष्ठ सिंह यांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली. त्यांनी वशिष्ठ सिंह यांना गणितातील अतिशय कठीण ५ प्रश्न विचारले. ज्याची उत्तर वशिष्ठ सिंह यांनी दिलीच पण त्या पलीकडे त्यांनी एकच गणित वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सोडवून दाखवलं. गणितातल्या आकड्यांवरच प्रभुत्व जॉन केली सारख्या प्राध्यापकाने अचूक हेरलं. त्यांना अमेरिकेत येण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांचा अमेरिकेत जाण्याचा, तिकडे शिक्षण घेण्याचा सर्व खर्च केली यांनी उचलला कारण त्यांना माहित होतं की त्यांच्या समोर जी प्रतिभा आहे. त्या व्यक्तीकडे गणिताला एक नवीन उंची देण्याची बुद्धिमत्ता आहे. वयाच्या २३ व्या वर्षी वशिष्ठ नारायण सिंह अमेरीकेच्या बर्केले विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी तिकडे ‘Reproducing Kernels and Operators with a Cyclic Vector’ शोध प्रबंध लिहला. ज्यासाठी त्यांना डॉक्टरेट देण्यात आली. हा प्रबंध आजही गणितातील आणि या क्षेत्रातील एक मानाचा शोध प्रबंध म्हणून गणला जातो. 

डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह यांनी नासाच्या वेगवेगळ्या मिशन मधे आपला सहभाग दिला. इतकच काय तर त्यांनी भौतिक शास्त्रातील सर्वोच्च स्थान असणाऱ्या 'थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी' ला गणिताच्या साह्याने आव्हान दिलं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. त्यांना बरा न होणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने गाठलं होतं. त्याचे परीणाम त्यांच्या कामावर दिसून यायला लागले. कारण नसताना चिडचिड करणं, कामात लक्ष नसणं आणि अगदी सोप्या सोप्या गणिताचे प्रश्न सोडवता न येणं हे सगळं वास्तव त्यांना स्विकारणं दिवसेंदिवस जड जाऊ लागलं. घरच्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी लग्न केलं. घरच्यांना त्यांच्या या आजराबद्दल काहीच कल्पना त्यांनी दिली नव्हती. जेव्हा लग्न झालेल्या या दाम्पत्याने संसाराला सुरवात केली तेव्हा त्यांच्या या आजाराची कल्पना कुटुंबाला आली. १९७४ साली ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई त्या नंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कोलकत्ता इकडे काम केलं पण ते कुठेच रमले नाहीत. १९७६ साली त्यांच्या पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा आघात त्यांच्या आधीच बिघडत गेलेल्या मनस्थितीला अजून निराशेच्या गर्तेत लोटणारा ठरला. त्यांना मानसोपचार केंद्रात ठेवण्याची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली. पत्नीने घेतलेला निर्णय अयोग्य नव्हता कारण त्या काळात त्यांची खालावलेली मनस्थिती आणि अतिशय हिंस्त्र झालेलं वागणं कोणालाही सहन करण्यापलीकडे गेलेलं होतं. 

१९८५ साली त्यांना केंद्रातून त्यांच्या कुटूंबाने घरी नेलं. या काळात संपूर्ण जगापासून डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह अलिप्त झालेले होते. त्यांना कशातच स्वारस्य उरलेलं नव्हतं. १९८७ साली पुण्यातून ट्रेन ने प्रवास करत असताना ते पळून गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा खूप शोध घेतला पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. तब्बल ४ वर्ष ते कुठे होते याबद्दल कोणालाच काही माहित नव्हतं. १९९३ मधे छापरा जवळ असणाऱ्या दोराईगंज इकडे त्यांच्या गावातून आलेल्या दोन माणसांना एक माणूस अतिशय दयनीय अवस्थेत कचऱ्याच्या पेटीत अन्न शोधताना आढळला. त्याची विचारपूस आणि चेहरे पट्टीवरून त्यांनी डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह असल्याचं ओळखलं. एकेकाळी गणितातल्या अंकांना आपल्या बुद्धिमत्तेने सोडवणाऱ्या आणि नासा ते अल्बर्ट आईनस्टाईन सारख्या प्रतिभावान संस्था आणि लोकांच्या बरोबरीने बसणारा हा गणितज्ञ त्याच बुद्धिमत्तेच्या आजारामुळे एका कचऱ्यातील कोणीतरी टाकलेल्या अन्नावर आपलं पोट भरत होता. नियती राजा ला रंक कसं बनवू शकते याच याहून दुसरं उदाहरण या काळात सापडणार नाही. 

त्यांच्या या अवस्थेची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली. त्यांना बंगळुरू मधल्या National Institute of Mental Health and Neurosciences (NIMHANS) मधे दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर योग्य ते उपचार केले गेले. त्यांच्यातील गणिती बुद्धिमत्तेचा उपयोग नवीन पिढीला व्हावा म्हणून त्यांना Bhupendra Narayan Mandal University (BNMU) in Madhepura. इकडे व्हिझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केलं गेलं. पण आयुष्याची दोन टोके पाहिलेला हा गणितज्ञ १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या गणितातील योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना २०२० साली पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. 

जगाच्या गणिती इतिहासात आर्यभट्ट, श्रीनिवास रामानुजन यानंतर जर कोणत्या गणित तज्ञाने आपल्या बुद्धिमत्तेने भारताचा तिरंगा अटकेपार पोहचवला असेल तर ते नक्कीच डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह होते. पण नियतीच्या फेऱ्यात अडकलेला हा गणितज्ञ भारतीयांच्या नजरेतून मात्र नेहमीच लपलेला राहिला. अश्या या गणित तज्ञाला माझा साष्टांग नमस्कार... 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

 



1 comment:

  1. Hello Vinit.
    The photo in which a man has a pipe in his mouth is of John Kelley and not of Prof. Singh.

    ReplyDelete