Monday 11 April 2022

आस्मानी संकट... विनीत वर्तक ©

 आस्मानी संकट... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून अशनी प्रमाणे एक धातूची रिंग आणि काही सिलेंडर प्रमाणे असणारे मेटल चे भाग पडले. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. आकाशातून उल्कापाता प्रमाणे खाली येणाऱ्या या गोष्टींचा व्हिडीओ भारताच्या अनेक भागातून अनेकांनी चित्रित केला. अगदी एलियन पासून ते उपग्रह असण्यापर्यंत अनेकांनी आपली मते मांडली. नुकतीच ज्या ठिकाणी ही रिंग पडली आणि जे सिलेंडर मिळाले त्याचा अभ्यास करण्याकरता इसरो च्या दोन वैज्ञानिकांनी या भागाला भेट दिली आणि त्या मिळालेल्या वस्तूंचा अभ्यास सुरु केला आहे. त्यांच्या अभ्यासातून काय निष्कर्ष बाहेर येतात ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण या घटनेने एका नवीन गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. त्याचा मोगावा आपण घ्यायला हवा. 

चंद्रपूर जिल्ह्यात पडलेले भाग नक्की रॉकेट चे आहेत का उपग्रहाचे यावर अजून अभ्यास सुरु आहे. पण एक मात्र नक्की की हे सर्व भाग मानवनिर्मित आहेत. आता फक्त कोणत्या देशाचं रॉकेट अथवा उपग्रह हा होता यावर शिक्कामोर्तब बाकी आहे. अवकाशातील कचऱ्याचा आणि अश्या प्रकारे पृथ्वीवर शिरणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या काही वैज्ञानिकांनी हे भाग चीन च्या चँग झेंग ३ बी या रॉकेटच्या तिसऱ्या टप्यातील बूस्टर चे असल्याचं स्पष्ट केलं आहे. फेब्रुवारीत प्रक्षेपित झालेल्या या रॉकेट चे भाग पृथ्वी लगतच्या अवकाशात फिरत असताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे म्हणजेच जमिनीकडे ओढले गेले. त्यांचा अनियंत्रित प्रवास त्या दिवशी घडलेल्या घटनेला कारणीभूत होता. यातून दोन महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत. एक म्हणजे हे भाग एखाद्या वस्तीवर, घरावर, इमारतीवर कोसळले असते तर त्याचे होणारे गंभीर परीणाम आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुतूहलातून संकटाकडे झालेला प्रवास. 

जेव्हा रॉकेट हे उपग्रह प्रक्षेपित करते तेव्हा तो प्रक्षेपित झाल्यावर त्याचे भाग हे असेच अंतराळात विहार करत राहतात. संपलेल्या इंधनाच्या टाक्या आणि इतर भाग हे पृथ्वी भोवती कचरा बनून फिरत राहतात. कधीतरी पृथ्वीकडे खचले गेल्यावर त्यांचा वातावरणात प्रवेश होतो. वातावरणातील घर्षणामुळे जमिनीवर पडण्याआधी ते नष्ट होणं अपेक्षित असते. पण असं नेहमीच होईल असं नाही. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रॉकेट मधे वापरण्यात येणाऱ्या धातूची हिट रोखण्याची क्षमता कमालीची वाढलेली आहे. तसेच हे भाग अनियंत्रित असल्यामुळे ते कोणत्या कोनात आणि कोणत्या वेगाने पृथ्वीवर येतील याच काहीच गणित मांडता येत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेला अपघात ही एक सुरवात आहे. अश्या पद्धतीचा कचरा शेकड्याने आज अंतराळात विहार करतो आहे. यातील सगळाच जमिनीवर आदळेल असं नाही. पण कोणता भाग कधी, कुठे पृथ्वीवर आदळेल हे सांगता येणं तूर्तास अशक्य आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. ज्यामुळे कोणत्याही देशाच्या कचऱ्याचा दुसऱ्या देशाला अथवा लोकांना त्रास होणार नाही. 

दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे हे भाग जमिनीवर पडल्यानंतर कुतुहूल शमवण्यासाठी आणि सेल्फी, व्हिडीओ घेण्यासाठी जी काही चढाओढ सुरु होती ती खूप गंभीर आहे. आपण पृथ्वीवर अतिशय सुरक्षित वातावरणात असतो. आपण जसे अंतराळात जातो तसे अवकाशातून आपल्यावर वेगवेगळ्या आण्विक कणांचा मारा होतो. त्यामुळेच अवकाशात आपल्याला स्पेस सूट घालून अश्या पद्धतीच्या संकटापासून स्वतःचा बचाव करणं गरजेचं असते. जसा हा मारा आपल्यावर होतो तसाच अवकाशात गेलेल्या वस्तूंवर ही होतो. तसेच या रॉकेट आणि उपग्रहाच्या अनेक आण्विक वस्तू म्हणजेच कुलंट, मटेरीअल हे वापरलं गेलं असते. अवकाशातून पुन्हा पृथ्वीवर आलेल्या गोष्टी ज्याला स्पेस डेब्रिस असेही म्हणतात ते आपल्या जिवाला धोका निर्माण करू शकते. जमिनीवर पडलेल्या या अवशेषांना उघड्या हातांनी पकडणं अथवा त्याच्या सानिध्यात जास्ती वेळ राहणं हे धोकादायक आहे. यावर अल्फा पार्टीकल असू शकतात. जे शरीरात गेले तर अत्यंत धोकादायक आहेत. तसेच गॅमा किरण यातून बाहेर येऊ शकतात. जे आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे अवकाशातून पडलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावणं अथवा योग्य काळजी न घेता जवळ जाणं जीवावर पण बेतू शकते. 

एका अभ्यासानुसार सद्यस्थितीला जवळपास ३००० उपग्रह हे पृथ्वीच्या भोवती अनियंत्रित पद्धतीने परीक्रमा घालत आहेत. तर तब्बल ३४,००० पेक्षा जास्त १० सेंटीमीटर पेक्षा जास्त भाग हे असेच अंतराळात विहार करत आहेत. यातील कोणता उपग्रह किंवा भाग कधी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून जमिनीवर येईल याच गणित आज कोणीच करू शकत नाही. कारण यांच्या वेगावर, कक्षेवर कोणतेच नियंत्रण मानवाचे नाही. हे सगळेच भाग पृथ्वीवर जमिनीपर्यंत पोहचतील असं नाही. पण यातले काही नक्कीच पोहचू शकतात. पृथ्वीवर ७१% पाणी आहे तर २९% जमीन आहे. यातील फक्त १५% जमीन ही मानवाने गिळंकृत केलेली आहे. त्यामुळे हे भाग माणसाच्या वस्तीत पडण्याची शक्यता गणिताने कमी असली तरी ते पडू शकतात ही शक्यता महत्वाची आहे. कारण त्यामुळे होणारं नुकसान हे खूप मोठं असेल. एक साधा बोल्ट ३० मीटर उंचीवरून डोक्यात पडला तर माणसाचा खात्मा करू शकतो. जेव्हा काही टन  वजनाचे  हे भाग अवकाशातून कोसळतील तेव्हा होणारं नुकसान हे किती असू शकते याचा अंदाज आपण करू शकतो. 

तूर्तास आस्मानी संकट टळलेल असलं तरी पुढल्या भविष्यात ते टळेल असं नाही. त्याहीपेक्षा आपल्या मूर्खपणाने ते स्वतःच्या जीवावर बेतू न देणं ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment