आज नगद कल उधार... विनीत वर्तक ©
'आज नगद कल उधार' अशी पाटी सध्या पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय मंचावर सगळीकडे बघायला मिळत आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानला सध्या भिकेचे डोहाळे लागलेले आहेत. स्वतःच्या घरात अन्नाचा दाणा मिळण्याची अडचण पण दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे हे झाकून बघणारा पाकिस्तान सध्या आर्थिक कडेलोटावर उभा आहे. काही दिवसांपूर्वी याची स्पष्ट कबुली खुद्द त्यांच्या पंतप्रधानांनी दिली आहे. कर्ज घेऊन माज करणाऱ्या आणि कोणतंही व्हिजन नसलेल्या फक्त धार्मिक तेढ वाढवून भारताशी शत्रुत्व जपणाऱ्या राजकीय नेतृत्वामुळे पाकिस्तान ची वाटचाल झपाट्याने आर्थिक दिवाळखोरीकडे होत आहे. भिकेचा कटोरा घेऊन जिथून मिळेल तिथून आणि चढ्या भावाने गेल्या काही वर्षात कर्ज घेतं सुटला आहे. या घेतलेल्या कर्जाचा विनियोग आणि त्याचा परतावा कसा करणार याबद्दल काहीच विचार न करता हळूहळू या कर्जाच्या विळख्यात आता तो पूर्णपणे अडकला आहे.
एका घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी दुसरं कर्ज आणि त्याची परतफेड करण्यासाठी तिसरं कर्ज अश्या तर्हेने आता परिस्थिती अशी आली आहे की कर्जासाठी तारण म्हणून ठेवायला काही बाकी राहिलेलं नाही. तसेच आंतरराष्ट्रीय कर्ज देणाऱ्या संस्थांनी 'आज नगद कल उधार' ची पाटी पाकिस्तान ला दाखवली आहे. पाकिस्तान वर असलेल्या विदेशातून दिलेल्या कर्जाचा आकडा तब्बल ११६ बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात गेला आहे. ( १ बिलियन म्हणजे १०० कोटी). या प्रचंड कर्जाचा हप्ता फेडायला आणि राष्ट्र चालवायला आज पाकिस्तानकडे पैसे नाहीत. हे पैसे कुठूनतरी जमा करण्यासाठी शेवटी पाकिस्तान ने आपल्याच बँकेकडून कर्ज घेण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रत्येक देशात एक सेंट्रल बँक असते. तशी पाकिस्तानातील सेंट्रल बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ पाकिस्तान कडून पाकिस्तान ने आपल्या राष्ट्रीय सकल उत्पनाच्या २% कर्ज उचलण्याची तयारी केली.
पाकिस्तान कर्जाच्या विळख्यात इतका अडकला आहे की तिथल्या सरकारला आपल्याच बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आय.एम.एफ. म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या मंजुरीची गरज आहे. पुढल्या वित्तीय वर्षात पाकिस्तान च्या तिजोरीत एक पैसे शिल्लक नसल्याने त्यांना देश चालवण्यासाठी पैश्याची गरज आहे. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांची कर्ज घेण्याची विनंती धुडकावून लावली. पाकिस्तान ने यावर आपल्या बँकेतून कर्ज घेण्याचा आपला हक्क असल्याचं कळवलं. पण त्यांच्या या मुद्याला ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केराची टोपली दाखवली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केलं की जोवर पाकिस्तान वर असलेला कर्जाचा बोजा आणि कश्या पद्धतीने पाकिस्तान यातून बाहेर पडणार याचा रोडमॅप तयार होत नाही तोवर पाकिस्तान ची ही स्वायत्तता संपुष्टात आलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पाकिस्तान आता आर्थिक कडेलोटावर स्पष्टपणे उभा आहे.
पाकिस्तान ला त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतपेढ करण्यासाठी ते पैसे पाकिस्तानी जनतेकडून उभारावे लागणार आहेत. पाकिस्तान मधील जनतेवर अजून जास्ती कर लावून तसेच अधिक जनतेला कराच्या क्षेत्रात आणून हे पैसे उभारण्याची योजना आहे. पण आधीच पाकिस्तानी जनता आर्थिक दृष्ट्र्या आधीच दारिद्र्यात अडकलेली आहेत. त्यांच्यावर अजून अधिभार म्हणजे ते अजून गरिबीत लोटले जाणार. त्याशिवाय जीवनाशक्य वस्तूंवर कर लावल्याने महागाईचा दर गगनाला भिडणार आहे सर्वश्रुत आहे. पाकिस्तान ला २०२१-२२ वर्षात २३.६ बिलियन अमेरिकन डॉलर तर २०२२-२३ वर्षासाठी तब्बल २८ बिलियन अमेरिकन डॉलर च्या मदतीची गरज आहे. पाकिस्तान हे पैसे कसे उभे करणार हे अजूनतरी कोणाला स्पष्ट झालेलं नाही. जोवर हे स्पष्ट होत नाही तोवर पाकिस्तान ला अजून पैसे कर्जाच्या रूपात देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि इतर सर्व मार्ग हात झटकणार हे ठरलेलं आहे. त्याचीच एक सुरवात आंतरराष्ट्रीय नाणेधिनीने केली आहे. एक अशी वेळ लवकरच येईल की आपल्याच कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान संपूर्णपणे कोलमडून जाणार आणि या कडेलोटाकडे पाकिस्तान झपाट्याने वाटचाल करत आहे.
आज नगद कल उधार अश्या पाट्या पाकिस्तान च्या तोंडावर जागतिक संघटनांकडून आपटायला सुरवात झाली आहे. भारताला रोज उठून युद्धाच्या दर्पोक्त्या भरणाऱ्या कंगाल पाकिस्तानला आज दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करायची याची चिंता आहे. पाकिस्तान च असा कडेलोट होणं भारताला परवडणारं नसलं तरी यातून काही चांगल्या गोष्टी ही घडू शकतात. चीन याचा फायदा घेईल असा मतप्रवाह असला तरी ते धार्मिक आंधळे असलेल्या पाकिस्तानात तितकं सोप्प नाही. अर्थात या जर तर च्या गोष्टी आहेत. तूर्तास पाकिस्तान चे करंटा घेऊन भीक मागण्याचे ही सर्व मार्ग झपाट्याने बंद होत आहेत आणि पाकिस्तान ला आज नगद कल उधार अश्या पाट्या तोंडावर मारल्या जात आहेत. त्यांचे पंतप्रधान टेलिव्हिजन वर येऊन आपल्या या व्यथेचे वर्णन संपूर्ण जगाला सांगत आहेत. यामुळेच येत्या १-२ वर्षात पाकिस्तान चे तुकडे झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment