Wednesday 24 November 2021

भविष्य बदलणारी टक्कर... विनीत वर्तक ©

 भविष्य बदलणारी टक्कर... विनीत वर्तक ©

आज नासाने एका वेगळ्या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. आजवर नासाने अनेक अंतराळ मोहिमा अवकाशात पाठवल्या आहेत पण या सगळ्यांपेक्षा आजची मोहीम खूप वेगळी आणि भविष्याला कलाटणी देणारी आहे. आजवर माणसाच्या तांत्रिक क्षमतेमुळे विश्वात होणाऱ्या घटनांचे साक्षीदार होणं इतपत आपलं स्थान होतं पण आजच्या मोहिमेमुळे त्या घटना होऊ न देण्याची किंवा त्यात बदल करण्याची तांत्रिक क्षमता मानवाकडे येण्याची शक्यता आहे. तर एकूणच आजची मोहीम ही संपूर्ण मानवजातीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तर काय आहे ही भविष्य बदलणारी टक्कर? त्यातून काय हाताशी लागणार आहे? एकूणच या मोहिमेच यश- अपयश आपल्या प्रत्येकाशी कसं जोडलेलं आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

साधारण ६.५ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर एक अभूतपूर्ण घटना घडली. संपूर्ण पृथ्वीचं भविष्य त्या घटनेने बदलवून टाकलं. ती घटना होती पृथ्वीवर टक्कर दिलेल्या एका अशनीची. या टक्करीतून झालेल्या स्फोटात पृथ्वीवर अधिराज्य करणारे डायनॉसरांच अस्तित्व एका क्षणात पुसलं गेलं. विश्वाच्या या अथांग पसाऱ्यात ही खूप मोठी खरं तर एक शुल्लक घटना होती. पण या शुल्लक घटनेने पृथ्वीतलावर सजीवांचे भविष्य बदलवून टाकलं. खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांच्या मते अश्या घटना पृथ्वीच्या भूतकाळात अनेकवेळा घडलेल्या आहेत. तसेच येणाऱ्या भविष्यात ही अनेकदा घडू शकतात. अनेक वैज्ञानिकांच्या मते गेल्या काही लाखो वर्षात अशी मोठी टक्कर पृथ्वीशी झालेली नाही. अश्या घटनांच्या परत होण्याचा कालावधी बघता नजीकच्या भविष्यात अशी एखादी मोठी टक्कर अपेक्षित आहे. जर अशी एखादी टक्कर होण्याचं आधी आपल्याला लक्षात आलं तर आपण ती टक्कर तंत्रज्ञानाच्या साह्याने रोखू शकतो का? तर या का च उत्तर शोधण्यासाठी नासाने आज Double Asteroid Redirection Test spacecraft (DART) डार्ट नावाचं यान आज अवकाशात प्रक्षेपित केलं आहे. 

डार्ट हे एका फ्रिज च्या आकाराचं साधारण ५५० किलोग्रॅम वजनाचं यान आहे. ज्याला फाल्कन ९ रॉकेट ने आज प्रक्षेपित केलं आहे. डार्ट हे यान पुढल्या वर्षी डीडीमॉस या पृथ्वीच्या लघुग्रहाच्या जवळ पोहचेल. डीडीमॉस ला एक अवघा १६० मीटर व्यासाचा डिमॉर्फोस नावाचा एक उपग्रह आहे. जो साधारण ११ तास ५५ मिनिटात त्याच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. डार्ट या डिमॉर्फोस वर पुढल्या वर्षी सप्टेंबर २०२२ मधे २४,००० किलोमीटर / तास वेगाने आदळेल. या टकरीमुळे डिमॉर्फोस चा डीडीमॉस भोवती प्रदक्षिणा करण्याचा कालावधी साधारण १० मिनिटांनी बदलेल. या टकरीमधून नासा अनेक तंत्रज्ञान पहिल्यांदा वापरणार आहे. 

सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर डीडीमॉस ची सूर्याभोवतीची कक्षा १०.९ किलोमीटर इतकी प्रचंड अंडाकृती स्वरूपात आहे. त्याचवेळी त्याचा वेग ६.६ किलोमीटर / सेकंद इतका वेगवान आहे. (साधारण १५,००० मैल/ तास) आता या वेगात जाणाऱ्या आणि त्या भोवती फिरणाऱ्या अवघा १६० मीटर व्यास असणाऱ्या डिमॉर्फोस ला लक्ष करणं हे अतिशय कठीण आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या लघुग्रहाचा पृथ्वीला भविष्यात धोका नाही त्यामुळेच नासाने याची निवड केली आहे. कारण गणित केल्याप्रमाणे जर गोष्टी घडल्या नाहीत तरी त्याने पृथ्वीला कोणताही धोका निर्माण होणार नाही. डिमॉर्फोस कसा बनला आहे? त्यावर कश्या पद्धतीचा पृष्ठभाग आहे याबद्दल नासा च्या वैज्ञानिकांना जास्ती माहिती नाही. पण गणित केल्याप्रमाणे जर त्याचा पृष्ठभाग टणक असेल तर या टकरीमधून त्याची कक्षा कमी बदलेलं आणि जर तो जर मऊ असेल तर या टकरीमधून त्याची कक्षा जास्ती प्रमाणात बदलेल. 

नासाचे वैज्ञानिक यातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून असणार आहेत. या टकरीच्या १० दिवस आधी या यानामधून इटली ने बनवलेलं LICIACube नावाच यान वेगळं होईल त्यातील दोन कॅमेरे ही टक्कर साधारण ५४ किलोमीटर वरून बंदिस्त करतील. त्या शिवाय डिमॉर्फोस वर असलेला कॅमेराही टकरीच्या २० सेकंद अधीपर्यंत फोटो घेऊन ते नासा ला पाठवत राहील. या टकरीमधून नासा ला हे स्पष्ट होईल की अश्या पद्धतीच्या टकरीमधून आपण डिमॉर्फोस च्या कक्षेला किती बदलवू शकलो. भविष्यात असा एखादा लघुग्रह जर पृथ्वीवर चाल करून आला तर त्याची कक्षा बदलण्यासाठी कश्या पद्धतीची पावलं उचलावी लागतील. टक्कर करण्यासाठी गणित कश्या पद्धतीने मांडावे लागेल. कश्या पद्धतीने पृथ्वी ला वाचवता येईल. या मोहिमेसाठी नासाने तब्बल ३२४ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले आहेत. या मोहिमेच्या यश- अपयशावर मानवाचं अस्तित्व बदलण्याची ताकद आहे. त्यामुळेच नुसती नासा नाही तर संपूर्ण मानवतेच्या दृष्टीने या मोहिमेचं महत्व खूप आहे. 

भविष्यात जर अमेरिकेने इतर देशांना अश्या टकरीपासून वाचवण्यासाठी पैसे मागितले तर तो त्यांनी आज इन्व्हेस्ट केलेल्या पैश्याचा परतावा असेल. अमेरिकेचा मूळ हेतू  अमेरिकेला सुरक्षित करणं हा असला तरी अश्या मोहिमेतून संपूर्ण मानवजातीला वाचवण्याचं तंत्रज्ञान मानव बनवू शकणार आहे. विश्वाच्या या अनंत पसाऱ्यातून कोणतं संकट आपल्यापुढे पुढे ठाकेल याच भविष्य आजही आपण वर्तवू शकत नाहीत. पण जर याची कल्पना आपल्याला वेळेत म्हणजे १० वर्ष ते २० वर्ष आधी जर कल्पना आली तर कदाचित आज मानव अश्या वैश्विक संकटापासून पृथ्वीला वाचवू शकेल. तूर्तास नासाच्या या मोहिमेला आणि नासाच्या संशोधकांना खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :-  नासा / गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment