Tuesday 16 November 2021

#कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग १... विनीत वर्तक ©

 #कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग १... विनीत वर्तक ©

खिद्रापूर इथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या आणि तब्बल १००० वर्षाचा इतिहास असणाऱ्या कोपेश्वर मंदिराला भेट देण्याचा योग आला. इतक्या प्राचीन इतिहासाला आपल्यासोबत जपलेल्या मंदिराच्या अंतरंगात अवघ्या काही तासात प्रवेश करणं अशक्य आहे. तरीपण त्या मंतरलेल्या क्षणात कोपेश्वर च एक वेगळं सौंदर्य मला अनुभवयाला मिळालं. मंदिर म्हंटल की आपले हात आपसूक जोडले जातात. श्रद्धा आणि भक्ती याचा सुंदर मिलाफ म्हणजे मंदिर. पण या पलीकडे मंदिर बघण्याचा एक दृष्टिकोन तो म्हणजे विज्ञानाचा असतो जो खेदाने आपल्या समाजात आढळून येत नाही. जेव्हा मी या मंदिराला भेट दिली तेव्हा हाच विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच जे सौंदर्य माझ्या समोर आलं ते मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलं. 

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मी स्वतःला एक प्रश्न विचारला की उद्या जर मला अश्या पद्धतीचं मंदिर उभं करायला सांगितलं तर? जेव्हा प्रश्न घेऊन मी आत शिरलो तेव्हा त्या मंदिराचं रूप मला निशब्द करून गेलं. समजा आज मला हे मंदिर उभारायचं असेल तर आधी माझ्या डोक्यातील कलाकृती समोरच्या पर्यंत योग्य रीतीने पोहचवावी लागेल. डिझायनर किंवा आर्किटेक्चर अभियंता त्याच एक मॉडेल तयार करेल. त्या मॉडेल च स्ट्रक्चरल टेस्टिंग करावं लागेल की त्यातील खांब,पाया, कळस हे काळाच्या कसोटीवर टिकून राहील. ते उभारण्यासाठी जागा शोधावी लागेल. त्या जागेच धार्मिक, सामाजिक आणि स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने मूल्यमापन करून घ्यावं लागेल. हे झाल्यावर मंदिर उभारण्यासाठी कच्चा माल, कारागीर, दळणवळणाची साधन याची व्यवस्था करावी लागेल. मंदिर असल्याने त्याची विधिवत पूजा, दिशा आणि श्रद्धा या सर्वांचा सन्मान राखत काम करावं लागेल. हे सगळं करण्यासाठी त्या प्रमाणात पैश्याची तजवीज करावी लागेल. 

कोपेश्वर मंदिरात शिरताना जर तुम्ही हे प्रश्न घेऊन आत शिरता तेव्हा त्या १००० वर्षाच्या वास्तूच महत्व आपल्याला एका क्षणात लक्षात येतं आणि अश्या अनेक गोष्टी नजरेत येतात ज्या सामान्य लोकांना दिसणार पण नाहीत. कोपेश्वर मंदिराचे प्रमुख ४ भाग पडतात. ज्यात स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा येतात. आपण मंदिरात स्वर्गमंडपातून प्रवेश करतो. याची रचना गोलाकार आहे. १३ फूट व्यासाची अखंड रंगशिळा आपल्या पायाशी जाणवते तर त्याचवेळी बरोबर आकाशाच्या दिशेने १३ फूट व्यासाचे गवाक्ष आहे.  गवाक्ष आणि रंगशिळा या मधील उंची साधारण २० फूट ते २५ फूट असेल. इतक्या उंचीवर असूनसुद्धा या दोन्ही गोष्टी एका सरळ रेषेत आहेत. मी पैजेवर सांगेन की आजच्या काळात अगदी लेझर बीम ने याची अचूकता मोजली तरी ती परिपूर्ण असेल. इतकी अचूकता त्या काळात त्या कारागिरांनी कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय कशी काय साध्य केली असेल? वर्तुळाचा आकार मग तो रंगशिळेचा असो वा गवाक्षाचा एकदम अचूक आहे. गवाक्ष हे अनेक साध्यांनी जोडलेलं आहे तर रंगशिळा अखंड आहे. पण असं असताना सुद्धा त्यामध्ये अचूकता आणण्यासाठी कामाचा दर्जा किती उच्च असेल याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. हे मी फक्त स्वर्गमंडपाच्या बांधकामा बद्दल बोलतो आहे. त्यावरील कलाकुसर, नक्षीकाम, मुर्त्या हा अजून एक वेगळाच विषय आहे. 

कोपेश्वर मंदीराला तुम्ही आतून किंवा बाहेरून बघितलं तर लक्ष वेधून घेतात ते इथले खांब. या खांबांवर एक मालिका होईल इतकं त्यांच्या बद्दल लिहिण्यासारखं आहे. सगळ्याच गोष्टी इकडे लिहिणं शक्य नाही पण काही गोष्टी मांडतो. कोपेश्वर मंदिर हे गणितावर आधारित आहे असं जर म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण या मंदिराचा प्रत्येक खांब हा एक वेगळं गणित आहे. प्रत्येक खांबाची रचना वर्तुळाकार, षटकोनी, अष्टकोनी, चौकोनी अश्या वेगवेगळ्या गणितातल्या आकारांनी सजलेला आहे. स्वर्गमंडप हा ४८ खांबांवर उभा आहे. हे सर्व खांब गोलाकार रचनेत आहेत. प्रत्येक रचनेतील खांबांची संख्या ही एक अभ्यासाचा विषय ठरू शकेल. १२-१६-१२-८  अश्या रचनेत हे ४८ खांब उभारलेले आहेत. तर सभामंडपात एकूण ६० खांब आहेत. सर्व खांबांची बेरीज केली तर ती होते १०८. 

(तर या १०८ आकड्यामागे काय महत्व आहे, ते मी या आधीच्या लेखात लिहिलं होतं, ते इकडे देतो आहे. १०८ या आकड्याचा संबंध आपल्याशी निगडित असणाऱ्या पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्याशी आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे, तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतके आहे. चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.(मी गणित करून बघितलं, तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणले तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर) ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुराणे आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहीता येतात.)

कोपेश्वर मंदिरात १०८ या अंकाच महत्व पुन्हा एकदा स्पष्ट होते. आता पुढे जाण्याआधी मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. जर का मंदिर बनवायचं असेल तर ते १०८ खांबात बसलं पाहिजे ही अट मंदिर निर्मात्यापुढे ठेवण्यात आली असेल. याचा अर्थ मंदिराचं डिझाईन करण्याआधी १०८ या अंकाला स्थान देऊनच मंदिराच डिझाईन केलं गेलं असेल. त्याच सोबत त्याची विभागणी (४८ स्वर्ग मंडप आणि ६० सभामंडप) आणि त्यांची रचना (१२-१६-१२-८) ज्यातील शेवटचे ८ हे मंदिराच्या ४ प्रवेशद्वारांपुढे असतील अशी रचना करणं हेच सिद्ध करते की मंदिराची रचना कोणी एका दिवसात नाही केली तर मंदिर उभारताना गणित, विज्ञान, स्थापत्यशास्त्र या सर्वांचा अगदी बारकाईने विचार केला गेला आहे. हे सर्व प्रत्यक्षात उतरवताना त्यात एकही चूक केली गेलेली नाही. हे शक्य होते जेव्हा तुमची संस्कृती वैज्ञानिक दृष्ट्या खूप प्रगत आहे. 

पुढील भागात कोपेश्वर मंदिराच्या अंतरंगातील जाणवलेल्या अजून काही गोष्टी 

क्रमशः 

फोटो :- विनीत वर्तक  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: