Thursday, 18 November 2021

#कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग २... विनीत वर्तक ©

 #कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग २... विनीत वर्तक ©

कोपेश्वर मंदीराच्या खांबांची रचना जशी वैशिष्ठपूर्ण आहे तशीच प्रत्येक खांब हा गणिताच्या दृष्टिकोनातून वैशिष्ठपूर्ण आहे. एकाच खांबात गोलाकार, चौकोनी, षट्कोनी असे विविध आकार बसवलेले आहेत. त्या आकारांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात याच खांबांवर १६ किर्तीमुख कोरलेली आहेत. विविध पक्षी, प्राणी, फळ, फुलं, नर्तकी आणि रामायण, पंचतंत्रापासून ते गौतम बुद्धांपर्यंत आपल्याला सगळं इकडे सजीव झालेलं दिसून येते. ज्याची माहिती इथे असणारे अनेक स्थानिक गाईड सांगत असतात. मी ही अश्या एका गाईड करून मंदिराची ओळख करून घेतली आणि आश्चर्य म्हणजे तो माझ्या लिखाणाचा चाहता निघाला. माझे अनेक लेख वाचल्याचं त्याने नमूद केलं. त्याने सांगितलेल्या गोष्टीत मी गोष्टींची भर घातली तेव्हा माझं नाव घेतल्यावर त्याने चक्क माझ्याकडून कोणतंही शुल्क घेण्यास नकार दिला. त्याने सांगितलेली माहिती मात्र खूप सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी होती. श्री. शशांक रामचंद्र चोथे असं त्याच नाव असून या मंदिरावरील एक पुस्तक ही मी त्याच्याकडून विकत घेतलं. सोशल मिडियामुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहचू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. 

मंदिराच्या खांबांच जर नक्षीकामा व्यतिरिक्त बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि खांबांची रचना ही जवळपास सारखी आहे. हे खांब एकसंध नसल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजे एक खांब हा विविध भागात बनवून त्याला बॉक्स-पिन पद्धतीने जोडलेलं आहे. असं असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीने आकारांचा मेळ खांबात साधला आहे तो अचूक आहे. इतकच काय मी चक्क त्या आकारांची उंची आणि व्यास मोजून बघितला तर तो निदान काही मिलीमीटर मधे अचूक आहे. याचा सरळ अर्थ आहे की हे १०८ खांब एखाद्या असेम्ब्ली लाईन मधे तयार केले गेले आहेत. ज्या पद्धतीने आज हजारो कार बनवल्या जातात. एकच गोष्ट अनेकवेळा बनवण्यासाठी जगात प्रसिद्ध असणारी असेम्ब्ली लाईन पद्धत भारतात १००० वर्षापेक्षा आधी अस्तित्वात होती. असेम्ब्ली लाइनमुळेच अश्या खांबांच एकत्रित निर्माण शक्य आहे. 

ज्या प्रमाणे मी वर लिहिलं की यात वेगेवेगळे आकार कोरलेले आहेत. त्यातील चौकोनी,षट्कोनी आकार हे चिनी-हतोड्याने एक वेळ बनवता येतील. पण गोलाकार आकारातील कॉन्सन्ट्रिक सर्कल मात्र हाताने बनवणं शक्य नाही. त्यातही त्यावरील फिनिश जर १००० वर्षांनी तुम्ही अनुभवली तर ती लेथ मशीनवर बनवली गेली असल्याचं कोणीही सांगेल. याचा अर्थ असेम्ब्ली लाईन मधे लेथ मशीन सारखी उपकरण किंवा व्यवस्था ज्यात कित्येक टन वजन असणारी दगडाची शिळा गोलाकार फिरवून तिला एखाद्या टूल म्हणजेच डायमंड ने कापून तिच्या बाह्य भागावर अशी कॉन्सन्ट्रिक सर्कल बनवली गेली आहेत. आता प्रश्न येतो की जेव्हा जग १००० वर्षापूर्वी प्राथमिक अवस्थेत होत तेव्हा भारतात असेम्ब्ली लाईन मधे लेथ मशीन सारख्या एखाद्या व्यवस्थेतून कोपेश्वर मंदिराचे १०८ खांब बनवण्याचं उत्पादन सुरु होतं. आता त्याकाळी अश्या प्रचंड मोठ्या दगडाच्या शिळा कश्या गोलाकार फिरवल्या गेल्या असतील? कोणत्या पद्धतीचे टूल या दगडांना आकार देण्यासाठी वापरले गेले असतील? हा अभ्यासाचा विषय आहे. या शिवाय असेम्ब्ली लाईन ची ही संपूर्ण व्यवस्था मंदिराच्या आसपास निर्माण केली गेली असेल. त्यामुळे दळणवळणाचा आणि तयार झालेल्या खांबाला इजा न पोहचवता मंदिरात बसवलं गेलं असेल. 

खांबांच उत्पादन हा एक भाग झाला. पण जो दगड बसाल्ट स्वरूपाचा कातळ यात वापरला गेला आहे तो नक्कीच सह्याद्री मधून आणला गेला आहे. तस असेल तर सह्याद्री जवळपास १०० किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे या दगडांना सह्याद्री मधून फोडण्याची व्यवस्था केली गेली असेल. तसेच हे दगड सह्याद्री ते खिद्रापूर पोहचवण्याची व्यवस्था केली गेली असेल. हत्तीचा वापर किंवा कृष्णा नदीच्या पात्रातून या प्रचंड मोठ्या दगडांच्या शिळांच वहन केलं गेलं असेल. आज अश्या प्रचंड मोठ्या दगडी शिळा सह्याद्री मधून विलग करण्यासाठी स्फोटके लागतात. त्याकाळी कश्या पद्धतीने हे सर्व विलग केलं गेलं असेल? कश्या पद्धतीने अश्या मधे भेग नसणाऱ्या दगडी शिळा शोधल्या गेल्या असतील? हे खांब बनवताना चुका ही झाल्याच असतील म्हणजे असेम्ब्ली लाईनमध्ये जास्तीच उत्पादन ही केलं गेलं असेल? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतील जेव्हा आपण स्वतः हे मंदिर उभारण्याचा विचार करू. जेव्हा आपण या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार करू तेव्हा कोपेश्वर मंदिराचा अवाका आपल्याला लक्षात येईल. ज्यात आपण विचार करू त्या पेक्षा उच्च प्रतीचं विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि स्थापत्य शास्त्राचा वापर केला गेला आहे. कारण त्याशिवाय अशी निर्मिती ही शक्य नाही. 

मंदिर उभं करणं एक गोष्ट आणि त्यात आपली शिल्पकला आणि संस्कृतीचा मेळ घालणं हा दुसरा भाग आहे. कोपेश्वर इकडे या दोन्ही गोष्टींचा मेळ अतिशय सुंदरपणे घातला गेला आहे. खांबांच्या वर कल्पकतेने कोरलेली कीर्तिमुख तसेच अनेक सुंदर शिल्प, नृत्यांगना, द्वारपाल, अगदी शंकराच्या पिंडीभोवती गाभाऱ्यात असलेल्या १८ सुंदर तरुणी पूजेचं साहित्य घेऊन आपल्या देवाला प्रसन्न करताना उभं करणं हे सगळच काळाच्या पुढचं आहे. कोरलेल्या शिल्पातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांची नख सुद्धा आपण १००० वर्षानंतर स्पष्ट बघू शकतो. कमनीय बांधा, अंगावर असणारी सुंदर आभूषणे आणि चेहऱ्यावर अगदी भुवईच्या टिपलेल्या अदा त्याकाळच्या कलाकारांच आपल्या कामाप्रती निष्ठा दाखवते. कोपेश्वर मंदिराचा इतिहासात जवळपास ७ मोठी राज्यकर्ते घराणी झाली. त्या सोबत कित्येक परकीय, मुघल, मुस्लिम शासकांची आक्रमण या मंदिराने झेललली असतील. औरंगजेबाने आणि इतर मुघल शासकांनी इथल्या मुर्त्यांचे चेहरे विद्रुप करून मंदिराची शोभा घालवण्याचा प्रयत्न केला. पण भारताची हिंदू संस्कृती त्या सर्वाला आजही पुरून दिमाखात उभी आहे. काही ठिकाणी खांबावर नक्षीकाम अर्धवट ठेवल्याचे दाखले मिळतात. अनेक इतिहासकारांच्या मते मंदिराचं काम अर्धवट राहिलेलं आहे. पण असं असलं तरी जे काही आहे उभं राहिलेलं आहे ते अविश्वसनीय असं आहे. 

कृष्णा नदीला गेल्या काही वर्षात आलेल्या पुरामध्ये मंदिर अक्षरशः ५-७ फूट पाण्यात बुडालेले होते. पण असं असूनही मंदिराच्या बांधकामाला कोणताही धोका पोहचलेला नाही. पण अश्या स्वर्गीय अनुभव देणाऱ्या मंदिराची वारसा म्हणून जतन करण्यात कमी पडतो हे नक्की. कट्यार काळजात घुसली मधलं गाणं कुठे चित्रित झालं हे आपल्या लोकांना जाणून घेण्यात जास्ती स्वारस्य दिसून आलं. जे समोर उभं आहे ते समजून घेण्यासाठी मात्र वेळ आणि इच्छा दोन्हीची कमतरता जाणवली. अनेक लोकं स्वर्गमंदिरात सेल्फी घेण्यात रमलेले दिसले. पण ते सौंदर्य आपल्या आत बंदिस्त करण्यात मात्र त्यांना अजिबात रस नव्हता. इतक्या प्रचंड इतिहासाचा वारसा जपणाऱ्या मंदिरासाठी एका स्वच्छ टॉयलेट ची व्यवस्था पुरातत्व खात, राज्य अथवा केंद्र सरकार करू शकत नाही याच खूप वाईट वाटलं. अर्थात ते बनवलं तरी ते स्वच्छ ठेवण्याचा सिविक सेन्स आपल्या समाजात नाही हे पण तितकच खरं आहे. 

अजून खूप काही लिहिण्यासारखं आहे पण सगळच मी सांगितलं तर तिकडे जाण्याची इच्छा निर्माण होणार नाही. मी मला जाणवलेल्या काही गोष्टी आणि प्रश्न तुम्हा सर्वांसोबत शेअर केले. त्याची उत्तर मात्र आपण प्रत्येकाने शोधायची आहेत. मंदिराची सुंदर माहिती देणारे आणि माझे वाचक श्री. शशांक रामचंद्र चोथे यांचा मनापासून आभारी आहे. महाराष्ट्रात दैवी वरदहस्त लाभलेली जी मंदिर आहेत त्यातील वेरूळच्या कैलास मंदिरासोबत खिद्रापूर च कोपेश्वर मंदिर ही एक आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा आपल्या मनात प्रश्न घेऊन हे मंदिर बघा. मंदिराचे जे स्वर्गीय स्वरूप तुम्हाला जाणवेल ते नक्कीच अविश्वनीय असे असेल याची मला खात्री आहे. 

समाप्त... 

फोटो :- विनीत वर्तक  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




2 comments:

  1. खूप सुंदर वीनीतजी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र वर्तुळाच्या मध्यभागी येतो अशी माहिती काल फेसबुकवर आम्ही साहित्यिक या समूहावर वाचली... खरोखर आपल्या भारतीय स्थापत्य कलेला तोड नाही

    ReplyDelete