Monday, 15 November 2021

पद्माची पावलं... विनीत वर्तक ©

 पद्माची पावलं... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात पद्म सन्मान सोहळा पार पडला. या वर्षीचा हा सोहळा अनेक अर्थाने वेगळा ठरला. गेल्या काही वर्षात पद्म सन्मान ज्या व्यक्तींना दिले गेले आहेत त्यामुळे एकूणच पद्म सन्मानाची उंची वाढली आहे. काही वर्षापूर्वी पद्म सन्मान म्हणजे ज्यांची सरकार दरबारी ओळख आहे किंवा ज्यांनी लोकांची, पक्षाची अथवा सरकारी यंत्रणेतील लोकांची हुजरेगिरी केली आहे. त्यांच्या कृतीचा सन्मान करण्या इतपत त्यांच अस्तित्व होतं. काही सन्मानीय अपवाद सोडले तर पद्म मिळणाऱ्या व्यक्तींची नाव बघितल्यावर वर उल्लेख केलेली समानता दिसून येते. पण गेल्या काही वर्षात यात बदल झाले आणि पद्माची पावलं अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली. 

या वर्षी झालेल्या पद्म सोहळ्यात या गोष्टीची प्रचिती देशातील आणि विदेशातील सर्वांनीच अनुभवली कारण यावेळी पद्म सन्मान स्वीकारणारे सामान्यांमधील असामान्य होते. त्यामुळेच राष्ट्रपती भवनातील लाल गालिच्यावर पडलेली त्यांची अनवाणी पावलं सुद्धा कौतुकाचा विषय ठरली. असामान्य लोकांचं सामान्य वर्तन, पोशाख आणि एकूणच त्यांचा वावर हा कुतूहलाचा विषय ठरला. वर्षोनुवर्षे सुटाबुटातील आणि झगमटात उच्चभ्रू संस्कृतीचा दाखला देणारा हा सोहळा या वर्षी खरं तर गेल्या काही वर्षात अश्या संस्कृतीला फाटा देणारा ठरतो आहे. त्यामागे निश्चितच निवड झालेल्या सामान्य लोकांच कर्तृत्व कारणीभूत आहे. 

भारतासारखा जवळपास १३९ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात समाजातील अतिशय दुर्लक्षित घटक सुद्धा देशाच्या नागरी सन्मानासाठी स्वतःहून आपल्या कामाचा, कार्याचा गवगवा न करता कोणत्याही सरकारी संस्थेचे उंबरठे न झिजवता आणि कोणत्याही पक्ष, नेता यांची हुजरेगिरी न करता निवडला जाऊ शकतो हा विश्वास या निमित्ताने पुन्हा एकदा जनसामान्यात बळकट झाला यात कोणाचं दुमत नसेल. त्यांची वेशभूषा, त्यांचे अनवाणी पाय ते अगदी त्यांनी भारताच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाला दिलेले आशीर्वाद असो वा काढलेली दृष्ट सगळच आतवर पोहचलं कारण ते आतून सहजतेने आलं होतं. त्यात नाटकीपणा नव्हता, त्यात ना कोण बघेल याची धास्ती होती. त्यामुळेच या प्रत्येक व्यक्तीने सन्मान स्वीकारतानाचे क्षण प्रत्येकवेळी डोळ्यांच्या कडा आपसूक ओले करून जातात. 

डोळ्यांच्या कडा ओल्या होणं असो, मनात कुठेतरी समाधान वाटणं असो किंवा या सर्व व्यक्ती आपल्याच आजूबाजूला असण्याचा भास असो हे मला वाटते पद्म सन्मानाची उंची आता या सामान्य पावलांमुळे किती वाढली आहे याची जाणीव करून देणारी आहे. कोणताही सन्मान किती लहान-मोठा हे तो ज्या व्यक्तींना दिला जातो त्यावरून ठरतो. गेल्या काही वर्षात त्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. नक्कीच अजूनही दोन, तीन अपवाद असे आहेत ज्यावर वाद अथवा मतभिन्नता होऊ शकेल. येत्या काळात नक्कीच योग्य त्या व्यक्तींना हा सन्मान दिला जाईल आणि अपवाद ही नाहीसे होतील अशी अपेक्षा आहे. 

पद्माची ती सामान्य पावलं आज राष्ट्रपती भवनात उमटली असली तरी त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिमत्व हे असामान्य आहे. सगळ्या झगमटापासून कोसो लांब आहे. त्यांच्या निरपेक्ष कार्याने त्यांना ही उंची गाठून दिली आहे. आज त्याच पावलांनी हळूच पद्म सन्मानाची उंची एव्हरेस्ट इतकी उंच केली आहे. या क्षणांचे व्हर्च्युअल का होईना साक्षीदार होता आलं हा मी माझा सन्मान समजतो. १३९ कोटी भारतीयांन मधून अश्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या लोकांना धर्म, जात, पैसा, स्टेटस किंवा राजकीय व समाजातील उंची यापलीकडे जाऊन सन्मानित करता येते हेच आमच्या संविधान आणि लोकशाहीचं यश आहे असं मला मनापासून वाटते. लोकशाहीची व्याख्याच मुळी लोकांपासून सुरु होते आणि जेव्हा अश्या लोकांना सर्वोच्च सन्मान दिला जातो तेव्हा ती मुळापासून मजबूत होते. 

पुन्हा एकदा सर्वच पद्म सन्मान मिळालेल्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या लोकांच अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment