बर्फातला वाघ... विनीत वर्तक ©
आजवर पोकळ डरकाळ्या फोडणारे वाघ आपण अनेकदा बघितले असतील पण आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने शत्रूला चारी मुंड्या चीत करणारा बर्फातील एक ढाण्या वाघ मात्र अजूनही भारतीयांच्या नजरेपासून दुर्लक्षित आहे. हिमालयाच्या कुशीत ही एक वेगळा भारत वसलेला आहे जो बाकीच्या भारताच्या नजरेत कधीच भरत नाही. ही गोष्ट आहे अश्याच एका बर्फातील वाघाची ज्याने संपूर्ण कारगिल युद्धाची लय बदलवून टाकली. पाकिस्तान ने पाठीत खुपसलेल्या खंजिराला आस्मान दाखवत आपल्या वाघनखांनी पाकिस्तान च आतडं बाहेर काढलं होतं. हा बर्फातील वाघ म्हणजेच 'कर्नल सोनम वांगचुक'.
१९९९ सालच्या मे महिन्यात पाकिस्तान ने छुप्या रीतीने भारताच्या प्रदेशावर कब्जा केला होता. पाकिस्तानी सैन्य भारताच्या हद्दीत कुठवर शिरलं आहे याचा अंदाज भारताला आला नव्हता. आपल्या वार्षिक सुट्टीवर असलेल्या मेजर सोनम वांगचुक यांना २६ मे १९९९ ला देशाच्या संरक्षणासाठी तात्काळ हजर राहण्याचे आदेश मिळाले. दोन दिवसांनी हांडेन ब्रॉक या चोरबाट ला ( ला म्हणजे पास ) इथल्या बी.एस.एफ. चौकीवर ते हजर झाले. ही चौकी १६,८६६ फूट (५१४१ मीटर) उंचीवर आहे. खरे तर सामान्य माणसाला इथे जायचं असेल तर निदान २-३ दिवस इथलं वातावरण जुळवून घेण्यासाठी लागतील. पण मेजर सोनम वांगचुक हे लेह इथले असल्याने या वातावरणाची त्यांना सवय होती. पाकिस्तानी सैन्य किती तयारीनिशी भारतीय हद्दीत आलं आहे याचा काही अंदाज नसताना मेजर सोनम वांगचुक यांनी अवघे ३० सैनिक घेऊन भारतीय सरहद्दीवरील अगदी शेवटच्या चौकीवर जी तब्बल १८,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर होती तिच्याकडे कूच केलं.
हा रस्ता सोप्पा नव्हता. १८,००० फुटावर हवा इतकी विरळ आणि ऑक्सिजन इतका कमी असतो की श्वास घेणं पण कठीण असते तिकडे मेजर सोनम वांगचुक आणि त्यांचे ३० बहादूर सैनिक ८० अंशाचा सरळसोट चढण उणे -३० डिग्री सेल्सिअस तपमानात चढत होते. त्यांच्या टीमवर दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी अचानक हमला केला. मशिनगन ने गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर पाकिस्तान च्या बाजूने व्हायला लागला. या गोळीबारात एक ऑफिसर जखमी झाला. खरे तर त्यांना युद्ध करण्याचा कोणता आदेश नव्हता. त्यांना माघारी फिरून बेस कॅम्प वर परतता आलं असतं. पण तसं केलं असतं तर पाकिस्तान च्या बाजूने
वरच्या चौकीकडे जाणाऱ्या सैनिकांना फायदा मिळाला असता. कदाचित भारत ती चौकी कायमसाठी गमावून बसला असता. मेजर सोनम वांगचुक यांनी मागचा पुढचा विचार न करता जखमी झालेल्या ऑफिसर सोबत एक सैनिक संरक्षणासाठी आणि बेस कॅम्प ला माहिती देण्यासाठी ठेवून आपल्या लक्ष्याकडे कूच केलं.
मेजर सोनम वांगचुक आणि त्यांची टीम पाकिस्तान च्या बाजूने होणारा गोळीबार चुकवत आपल्या लक्ष्याकडे चढाई करू लागली. ३ तासांच्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर मेजर सोनम वांगचुक आणि त्यांची टीमने आपलं लक्ष्य पूर्ण केलं. त्यांनी खालून पाकिस्तान च्या दिशेने चढाई करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर वर दगड टाकले. पण त्यांच्या लक्षात आलं की हा तात्पुरता इलाज आहे. पाकिस्तानी सैनिकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी वाघा सारखं दबा धरून बसायला हवं. त्या प्रमाणे त्यांनी वर चढणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना आपल्या टप्यात येऊ दिल. अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यांच्या बंदुका, दारुगोळा भारतीय सैनिकांनी हस्तगत केला. १८,००० फुटावर कोणत्याही बोफोर्स गन च्या मदतीशिवाय त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी केलेले सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तान ला बटालिक सेक्टर मधे घुसखोरी करण्यासाठी चोरबाट ला पासवर ताबा मिळवणं गरजेचं होतं .पण मेजर सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीम ने त्यांच्या स्वप्नांना धुळीस मिळवलं. संपूर्ण जगाशी फक्त एका वॉकी टोकी च्या सोबत जोडलेलं असताना एक आठवडा कोणत्याही मदतीशिवाय रात्रंदिवस उणे -३० ते -४० डिग्री सेल्सिअस तपमानात १८,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर त्यांनी भारतीय तिरंगा त्या डोंगर रांगांवरवर फडकावत ठेवला.
कारगिल युद्धात भारताला मिळालेला हा पहिला विजय होता. मेजर सोनम वांगचुक यांनी लीड फ्रॉम द फ्रंट या युक्तीला जागत भारतीय सेनेच्या पराक्रमाच, बहादुरीच एक उदाहरण पाकिस्तानी सेनेला दाखवलं ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास धुळीला मिळाला. याच विजयानंतर भारताने कारगिल युद्धाचं पारडं आपल्या बाजूने झुकवलं. मेजर सोनम वांगचुक यांना त्यांच्या पराक्रमासाठी भारतीय सेनेतील दुसरा सगळ्यात मोठा सन्मान महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. २०१८ साली आपली प्रदीर्घ सेवा भारताला दिल्यानंतर कर्नल या पदावरून सोनम वांगचुक निवृत्त झाले. पण त्यांनी बर्फात गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना 'लायन ऑफ लडाख' ही उपाधी देण्यात आली.
कर्नल सोनम वांगचुक यांच्या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. तोंडाच्या वाफा घालवणारे वाघ खूप बघितले पण आपल्या सारखा बर्फात पराक्रम गाजवणारा खरा वाघ तुम्हीच. तुमच्या या पराक्रमासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.