Monday 25 July 2016

बदललेली कार्यालय... विनीत वर्तक

कार्यालय किंवा ऑफिस म्हंटल कि आपल्यासमोर येतात फाईल्स चा ढीग. जळमटानां सोबत घेऊन रडत फिरणारे पंखे. नॉयलॉन च्या उसवलेल्या खुर्च्या आणि घड्याळाकडे बघत काम करणारी लोक. अस ८०-९० च्या दशकात असणार साधारण कार्यालयीन चित्र कॉम्प्यूटर च्या प्रवेशाने हळू हळू बदलून गेल. पंख्यांची जागा वातानुकुल हवेने घेतली. टेबलांची जागा क्युबिकल्स नि घेतली. फाईलींच्या जागी आता इमेल्स चे ढीग जमू लागले. षंढ चेहऱ्याने काम करणारे आता प्रेझेंटेशन साठी धावू लागले. घड्याळाचे काटे आता रात्र झाल्यावर दिसू लागले. उसवलेल्या खुर्च्यांची जागा आता रोलिंग चेअर ने घेतली.

पण हरवले ते चेहरे. लंच टाईम ला आज डब्यात काय? अस विचारत डल्ला मारणारे हात आखडले. कोबीच्या भाजी चा सुगंध आता हरवून गेला. टेबला शेजारी बसून एकमेकांनां चिमटा काढणारे ते हास्याचे बोल आता बंदिस्त झाले. सुख दुःखाचे चे शेअर आता तोंडाने नाही तर फेसबुक, व्हात्स अप च्या भिंतीमागून होऊ लागले. माणस बदलली पण व्यक्त होण्याची, काम करण्याची साधन, कार्यालय बदलली. तरी काम तीच. उलट वाढलेली टेन्शन, न संपणारे कामाचे तास, सतत कनेक्टेड राहण्याचा फार्स नकळत कुठेतरी हे सगळ माणसाच्या कार्य करणाच्या पद्धतीवर अतिशय वाईट पद्धतीने आपला ठसा उमटवायला लागल.

ह्याची सुरवात आत्ता आपल्याकडे झाली असली तरी अमेरिकेत ती आधीच झाली होती. म्हणूनच कुठेतरी ह्याला उत्तर शोधण्याची कसरत सुरु झाली. कार्यकुशलता कशी वाढवता येईल. ऑफिस हे ऑफिस न राहता कुठेतरी त्याला आपलेपणाचा, निसर्गाशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांना कार्यालय-ऑफिस मध्ये  आल्यावर घराची आठवण होऊ नये इतक. त्यांनी स्वताला इतक गढून घ्यावं कि फक्त काम आणि काम. ह्या सर्वांचा परिणाम लगेच दिसून येऊ लागला. कंटाळवाण्या ऑफिस, कार्यालयाची जागा प्रशस्त जागे ने घेतली. अगदी भिंतीच्या रंगापासून बिल्डींग च्या आकारा पर्यंत सगळ्याचा विचार केला गेला.

काम करण्याची जागा, आजूबाजूचा निसर्ग, हवेचे तापमान, रंगसंगती, काम करण्याच्या वेळा, ह्यात सगळ्यात बदल झाले. स्पेशली काही कोर्पोरेट ऑफिस तर प्रेमात पडण्याची ठिकाण झाली. कारण शहराच्या भाऊ गर्दीत निसर्गाच्या सानिध्यात काम करता करता प्रेम करता आल तर अजून काय हवे. गुगल च्या ऑफिस बद्दल ऐकून होतो कि तिथला परिसर एकूणच ऑफिस हे निसर्गाला जोडलेलं आहे. २०१० साली जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा माझ अमेरिकेतील ऑफिस बघून सर्दच झालो. प्रचंड असा एकरोवारी परिसर. पूर्ण हिरवळीने नटलेला. उंच उंच झाडांची गुंफण. जेवणाची जागा तर शब्दात मांडता येणार नाही इतकी सुंदर. एक छोटा तलाव त्याला चोहोबाजूने वेढलेली हिरवळ आणि झाडे. त्यात असणारे मासे, कासव त्याच्या अगदी बाजूला जेवण करण्याची व्यवस्था. जेवताना आपण कोणत्यातरी वनभोजनासाठी आलो आहोत असच वाटायचं.

पूर्ण अर्ध्या दिवसाचा क्षीण त्या एका तासात कुठे पळून जायचा कळायचा नाही. आसपासच्या त्या सौंदर्याने खरच कार्यकुशलतेवर परिणाम होतो ह्याचा अनुभव मी घेतला. अनेक लोकांशी बोलल्यावर सगळ्यांना ह्याचा अनुभव येत होता. जेवणापेक्षा त्या सुंदर तलावाकाठी नुसत बसून राहण हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ऑफिस- कार्यालय इतक हि सुंदर असू शकते ह्यावर तेव्हा विश्वास बसला. हळू हळू हीच प्रथा भारतात हि येत आहे. मुंबई सारख्या शहरात हे कठीण असल तरी अश्यक्य नाही. बेंगलोर, हैद्राबाद मधील आय.टी कंपन्यांची ऑफिस हि अश्या तर्हेने आहेत.

No comments:

Post a Comment