Monday 25 July 2016

बीइंग स्पेशल ... विनीत वर्तक

आपण बरेचदा कोणतही कार्य किंवा क्रिया करतो तेव्हा कोणाकडून तरी त्याचा उल्लेख व्हावा. ते बघितल जाव किंवा कुठेतरी त्या व्यक्तीने आपल्याला त्याची दाद द्यावी किंवा त्याची कदर करावी अस आपल्याला नेहमीच वाटते. अगदी छोट्यात छोटी गोष्ट का असेनात. पण ज्या व्यक्तीसाठी आपण ते करत आहोत त्या व्यक्तीचा प्रतिसाद आपल्याला खूप महत्वाचा असतो. परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाल्यावर सगळ्यात जास्त छान वाटते. जेव्हा आपल्या पालकांची, शिक्षकांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते. एखाद्या कलाकाराला सगळ्यात जास्ती आनंद होतो जेव्हा प्रेक्षकांकडून त्याच्या कलेची पावती मिळते. एखाद्या खेळाडूला सगळ्यात जास्ती आनंद होतो ऑलम्पिक मध्ये पदक मिळते तेव्हा. ह्या सर्व वेळी एकच फिलिंग असते ती म्हणजे बीइंग स्पेशल.

प्रत्येक वेळी माणस, कार्य बदलू शकेल पण फिलिंग तीच रहाते. आपण केलेल्या मेहनतीच चीज म्हणा किंवा आपल्या प्रयत्नांच यश हे तेव्हाच आपल्याला समाधान देते जेव्हा त्याचा आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तींकडून त्याचा सन्मान होतो. त्याची नोंद घेतली जाते. आयुष्यात अनेक शिखरे पादाक्रांत केली अगदी एवरेस्ट सुद्धा पार केला. तर तो क्षण, ती वेळ , ते यश शेअर करणार किंवा ज्याच्याशी शेअर करावस वाटणार बरोबर असेल तर त्याच वेळी त्याच समाधान मिळते. एवरेस्ट सर करून सुद्धा त्याची दखल घेणार कोणी नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ नसतो. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळी प्रमाणे

डोळे पुसणार कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे.
कोणाचे डोळे भरणार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.


प्रेमात, नात्यात मग ते कोणताही नात असो. त्या माणसाला आपल्या छोट्या गोष्टीची जाणीव असावी हीच आपली माफक अपेक्षा असते. एक बंगला, गाडी, सोने जे करू शकणार नाही ते एका मिठीत असते. हाताने पकडलेल्या मुठीत असते, खांद्यावर ठेवलेल्या डोक्यावर असते अन पुसलेल्या अश्रूत असते. बीइंग स्पेशल हि फिलिंग इतकी सुंदर असते कि त्या साठी माणूस काही पण करू शकतो. प्रेमात अजून काय असते? ज्या प्रेमासाठी माणस कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ती ह्याच फिलिंग साठी तर. प्रेम म्हणजे तरी काय? तो एक कटाक्ष, ती एक नजर, ते दिलेली साथ. सगळच बीइंग स्पेशल.

पण नेहमीच आपण रीसिविंग एंड ला का रहाव. आपण हि होऊन शकतो कि कोणाच्या आयुष्यात ते बीइंग स्पेशल. त्याची एक वेगळीच मज्जा असते. कधी तरी अनुभवून बघा. विश्वासाने दिलेली साथ मित्र, बायको ते मैत्रीण, नवरा सगळ्या नात्यात. तुझ्यामुळे आज हे शक्य झाल. किंवा तू होतास / होतीस म्हणून मी इथवर पोहचू शकले / शकलो. ह्यात त्या व्यक्तीला तर समाधान देतेच पण आपल्याला त्याहून जास्ती वेगळी अनुभूती देते. आपण हि कोणासाठी तरी स्पेशल आहोत हि फिलिंग आपलाच उत्कर्ष करणारी आहे.


त्यासाठी काही जास्ती कराव लागत नाही. कोणताही क्लिमिष मनात न ठेवता देत राहिलो कि हळूच ते येत. ते न विकत घेता येत, ना ओरबाडून घेता येत, न कोणाला सांगून मागता येत. ते कमवाव लागते आपल्या कृतीतून. ती कशी, केव्हा, कुठे करावी हे ज्याच त्यान ठरवावं. ती व्यक्ती कोणती हे सुद्धा. सगळच आपल्या मनाप्रमाणे होईल अस नक्कीच नाही. पण समोरून जरी परत नाही मिळाल तरी आपली निष्पक्ष भावनेने केलेली कृती आपल्याच मनात स्वताला बीइंग स्पेशल करतच असते नाही का?         

No comments:

Post a Comment