Saturday, 31 October 2020

भूतकाळाला स्पर्श करताना... विनीत वर्तक ©

 भूतकाळाला स्पर्श करताना... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात मानवाने तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड अनेक अडथळ्यातून यशस्वीरीत्या पार केला आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा आधार घेऊन त्याने जवळपास आपल्या सौरमालेच्या उत्पत्तीच्या वेळेस तयार झालेल्या एका लघुग्रहाच्या मातीला स्पर्श करून त्याचे नमुने बंदीस्त केले आहेत. ह्या लघुग्रहाच नाव आहे बेनू . बेनूवर नासा ने ८ सप्टेंबर २०१६ रोजी ऑसिरीस-रेक्स (Origins, Spectral Interpretation, Resource Identification, Security-Regolith Explorer (OSIRIS-REx) नावाचं एक यान पाठवलं होतं. जवळपास ३३० मिलियन किलोमीटर च अंतर कापत ह्या यानाने डिसेंबर २०१८ ला बेनू च्या कक्षेत प्रवेश केला. तब्बल दोन वर्ष बेनू च्या पृष्ठभागाचा अभ्यास केल्यावर गेल्या आठवड्यात ह्या यानाने यशस्वीरीत्या 'टच एन्ड गो' हे आपलं मिशन पूर्ण करताना बेनू च्या दगड मातीचे नमुने आपल्या कुपीत बंदिस्त केले. आता हे यान पुन्हा एकदा पृथ्वीच्या दिशेने झेप घेण्यासाठी सज्ज झालं असुन मार्च २०२१ मध्ये आपला प्रवास सुरु करून २४ सप्टेंबर २०२३ ला पृथ्वीवर परत येईल. 

ऑसिरीस-रेक्स ने जे 'टच एन्ड गो' मिशन पूर्ण केलं तो तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड होता. हे यान पृथ्वीपासून इतकं लांब आहे की संदेश वहनाला जवळपास १८.५ मिनिटांचा कालावधी एका बाजूने लागतो. याचा अर्थ ह्या यानावरून निघालेला कोणताही संदेश पृथ्वीवर पोचायला १८ मिनिटे तर पृथ्वीवरून दिलेला संदेश यानाकडे जायला १८.५ मिनिटांचा कालावधी लागतो. ऑसिरीस-रेक्स हे ज्या बेनू लघुग्रहावर पाठवलं आहे तो पण तितकाच खास आहे. हा लघुग्रह अपोलो ग्रुप मधील असून ह्याचा व्यास ४९२ मीटर (+/- १० मीटर) इतका आहे. म्हणजेच साधारण एम्पायर स्टेट बिल्डींग च्या उंचीचा. ह्या बेनूला मानवाने ११ सप्टेंबर १९९९ ला शोधलं. बेनू खरं तर पी.एच.ओ.आहे. म्हणजे पोटेंशीयली हझार्डस ऑब्जेक्ट. ह्याचा अर्थ होतो की ज्या पासून पृथ्वीला धोका आहे. ह्या ऑब्जेक्ट ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता साधारण ( २१७५ ते २१९९ च्या दरम्यान ) आहे. ही टक्कर पृथ्वीवरील सगळ्या सजीवांचा अथवा प्राणिमात्रांचा अंशतः नाश करण्यात सक्षम असेल. ( ह्याच्या टक्करी मधून निर्माण होणारी शक्ती साधारण ७६,००० पट हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्ब पेक्षा जास्ती असेल. ) 

 बेनू २१३५ साली पृथ्वीपासून अगदी चंद्रापेक्षा कमी अंतरावर असणार आहे. ह्या शिवाय २१७५ आणि २१९५ साली अजून जास्ती पृथ्वी जवळून त्याचा प्रवास अपेक्षित आहे. त्या शिवाय हा लघुग्रह अतिशय जुना आहे. ज्याकाळी आपली सौरमाला अतित्वात आली. बेनू हा एखाद्या रेड जायंट ताऱ्याचा अथवा सुपरनोव्हा चा अंश असावा ह्यावर असलेली दगड-माती जवळपास ४.५ बिलियन वर्षापूर्वीची आहे. जे की आपल्या सौरमालेच वय आहे. बेनू च्या दगड माती च्या अभ्यासातून जर त्यात सजीवांची निर्मिती करणाऱ्या गोष्टींच अस्तित्व सापडलं तर ह्याचा अर्थ पूर्ण विश्वात अनेक ठिकाणी सजीवांची उत्पत्ती शक्य असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ह्यावरील मटेरियल हे कार्बन संयुगानी युक्त आहे. ह्यावर ऑरगॅनिक मॉलिक्यूल, प्लॅटेनियम धातू किंवा पाण्याचे अंश असण्याची पण शक्यता आहे. बेनू च्या अभ्यासामुळे त्याची कक्षा अजून अचूकतेने आपल्याला ठरवता येणार आहे. तसेच बेनू सारखा लघुग्रह आपल्या सौरमालेत कसा अडकला? ह्या प्रश्नांची उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. 

गेल्या २ वर्षात बेनू भोवती फिरताना ऑसिरीस-रेक्स ने थ्री डी मॅपिंग च्या साह्याने बेनू च्या संपूर्ण पृष्ठभागाचा नकाशा तयार केला. त्यानंतर त्याच्या साह्याने त्याने ४ जागा आपल्या मिशनसाठी नक्की केल्या नाईटअँगल, किंगफिशर, ऑस्प्रे, सॅण्डपायपर अश्या त्या ४ जागा होत्या. त्यातल्या नाईटअँगल ह्या जागेवर यानाच्या  Touch-And-Go Sample Acquisition Mechanism (TAGSAM) नावाच्या उपकरणाने म्हणजेच एका रोबोटिक आर्म ने नायट्रोजन गॅस चा वापर करून ह्या बेनू वरील दगड मातीचा धुराळा उडवला. ह्या धुराळ्यात उडालेली दगडमाती यानाच्या एका कुपीत बंद केली गेली. २८ ऑक्टोबर ला काही अडथळ्यानंतर हे मिशन यशस्वी झाल्याच नासा ने जाहीर केलं. इकडे एक लक्षात घेतलं पाहीजे की ही सगळी यंत्रणा स्वायत्त रीतीने आपलं कार्य करत होती. एखाद्या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर न उतरता त्याला नुसतं स्पर्श करून पुन्हा उड्डाण भरणं हे अतिशय किचकट तंत्रज्ञान आहे. जवळपास ३३० मिलियन किलोमीटर वर ह्या सगळ्या तांत्रिक बाबी एखाद्या यानाने पार पाडणं म्हणजे तंत्रज्ञानाचा एक सर्वोच्च अविष्कार आहे. त्यातही जवळपास ४०० ग्रॅम वजनाची दगड मातीने भरलेली कुपी बंद करणारी यंत्रणा व्यवस्थित काम न केल्याने ह्यातील काही नमुने हे अंतराळात निसटायला लागले होते. जर कुपी संपुर्ण बंद झाली नसती तर संपुर्ण मोहीम अयशस्वी होण्याचा धोका निर्माण झाला होता. पण नासा च्या वैज्ञानिकांनी दिवस रात्र एक करत अडकलेल्या दगडाचा अडसर दूर करत ही कुपी बंद करण्यात यश मिळवल्याच नासा ने ३० ऑक्टोबर २०२० ला जाहीर केलं. 

ऑसिरीस-रेक्स आता मार्च २०२१ मध्ये पृथ्वी च्या दिशेने आपला परतीचा प्रवास सुरु करेल. २०२३ ला जेव्हा उतेह वाळवंटात उतरेल तेव्हा जवळपास ४.५ बिलियन वर्षाच्या भूतकाळाचे नमुने त्याने पृथ्वीवर आणलेले असतील. गेल्या आठवड्यातील नासा च्या ऑसिरीस-रेक्स मोहिमेतील घटना ह्या मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा कस बघणाऱ्या होत्या आणि नासा त्यात १००% यशस्वी झाली आहे. हे नमुने NASA's Astromaterials Research and Exploration Science Directorate (ARES) and at Japan's Extraterrestrial Sample Curation Center. इकडे पुढील संशोधनासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांना उपलब्ध असतील. ९८३ मिलियन अमेरीकन डॉलर खर्चाची नासा ची ही मोहीम मानवाच्या उत्क्रांती सोबत एकूणच विश्वाच्या उत्पत्ती बद्दलची अनेक रहस्य य=उघडणार आहे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ह्या मोहिमेत समाविष्ट असलेल्या नासा च्या वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांना माझा कुर्निसात. 

तळटीप :-  ऑसिरीस-रेक्स चा संपूर्ण प्रवास उलगडणारा व्हिडीओ इकडे शेअर करत आहे. लॉकहीड मार्टिन ने ह्याची निर्मिती केली असुन प्रत्येकाने तो आवर्जून बघावा.  

माहिती स्रोत :- नासा, अमेरीका 

फोटो स्रोत :- नासा, अमेरीका 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 24 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©


आयुष्यात आपण आदर्श कोणाला मानतो, यावर आपण आपली आयुष्यातली वाटचाल कोणत्या दिशेने करणार हे ठरलेलं असतं. १९२०च्या काळात पुण्यात सरलादेवी खोत (त्यांना अक्कुताई चिटणीस या नावाने ओळखलं जात होतं) नावाच्या डॉक्टर होत्या. त्यांच्या आयुष्याचा डॉक्टर होण्याचा खडतर प्रवास त्यांच्या नातीच्या बालमनावर कोरला गेला होता. आपली आजी वयाच्या दुसऱ्या वर्षी अनाथ झाली, वयाच्या ८व्या वर्षी विधवा झाली पण अश्या परिस्थितीमध्येही ती डॉक्टर झाली होती, ही गोष्ट त्या छोट्या मुलीच्या मनात घर करून गेली होती. १९७८चा काळ होता, दोन लाल शेंड्या बांधलेल्या त्या मुलीने डॉक्टर बनण्याचं नक्की केलं होतं. सी.बी.एस.सी.च्या परीक्षेत देशातून प्रथम आणि नॅशनल सायन्स टॅलेन्ट स्पर्धेत सर्वोत्तम राहिलेल्या त्या मुलीला देशातल्या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता पण तिच्या मनात त्या हिरव्या गणवेशाने केव्हाच घर केलं होतं. पुण्याच्या रस्त्यावर दिसणाऱ्या त्या हिरव्या गणवेशातल्या सैनिकांनी आणि त्यांच्या शिस्तीने तिला कधीच आपलंसं केलं होतं. घरच्या विरोधाला न जुमानता त्या मुलीने पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) मध्ये डॉक्टर बनण्यासाठी प्रवेश घेतला. ती मुलगी म्हणजेच लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर.  

आपल्या एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमात त्या तिन्ही टप्प्यांवर पुणे विद्यापीठात पहिल्या नंबरमध्ये राहिल्या होत्या. त्यासाठी त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकासोबत अभ्यासाशिवाय सर्व क्षेत्रात अव्वल कामगिरी केल्यामुळे कलिंगा ट्रॉफीनेही सन्मानित केलं गेलं. १९८२ साली ज्या कॉलेजमधून आपली पदवी घेतली, त्याच कॉलेजच्या डीन बनण्याचा बहुमान त्यांनी २०१७ साली मिळवला. १९९० मध्ये त्यांनी बालरोगतज्ज्ञ या विषयात एम.डी. केलं. यानंतर त्यांनी लहान मुलांच्या किडनी विकारांवर दिल्लीच्या एम्स (All India Institute of Medical Sciences) इकडे ट्रेनिंग घेतलं. त्यांना National University Hospital; Singapore, Great Ormond Street Hospital; London आणि Foundation for Advancement of International Medical Education and Research (FAIMER) यांसारख्या मानाच्या संस्थांच्या शिष्यवृत्याही मिळाल्या होत्या. भारतीय सैन्याच्या वैद्यकीय सेवेत पहिला किडनी बालविभाग स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच त्या The Indian Society of Pediatric Nephrologyच्या अध्यक्ष होत्या.

१९८३ पासून लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर भारतीय सैन्याचा भाग असून तब्बल ३७ वर्ष देशाची सेवा करत आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतीय सेनेत अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत. त्या General Armed Forces Medical Services च्या डेप्युटी डायरेक्टर राहिलेल्या आहेत.  याशिवाय भारतीय सेनेच्या नॉर्दर्न कमांड, उधमपूरच्या मेजर जनरल मेडिकल राहिलेल्या आहेत. २०१७ मध्ये त्यांनी पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) येथे डीन आणि उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांची बढती भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल या पदावर झाली. भारतीय सेनेच्या थ्री-स्टार रँक असणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. भारतीय सेनेत त्यांनी दिलेल्या अत्युच्च सेवेबद्दल त्यांना २०१८ मध्ये अतिविशिष्ठ सेवा मेडल, २०१४ मध्ये विशिष्ठ सेवा मेडल आणि पाच वेळा  Chief of the Army Staff Commendation Cardने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या पंतप्रधानांच्या Science, Technology and Innovation Advisory Council (PM-STIAC)च्या एकमेव डॉक्टर सदस्य आहेत.

१९७८ साली त्यांचे ऋणानुबंध एन.डी.ए. (National Defence Academy) आणि आय.एम.ए. (Indian Military Academy) मधून पास झालेल्या राजीव कानिटकर यांच्याशी जुळले, ते कायमचे. लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर नुकतेच भारतीय सेनेतून निवृत्त झालेले असून भारतीय सेनेच्या इतिहासात लेफ्टनंट जनरल हे थ्री-स्टार पद मिळवणारी ही नवरा- बायकोची एकमेव जोडी आहे. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचा भारतीय सेनेतील प्रवास तसा सोप्पा नव्हता. त्यांचे जोडीदारही भारतीय सेनेत असल्याने अनेकवेळा ते भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी व्यस्त असायचे. अश्या वेळी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांना देशाच्या रक्षणासाठीही त्याच तत्परतेने सजग राहावं लागत होतं. त्यांच्या जोडीदाराची साथ त्यांना नेहमीच आपलं सर्वोत्तम सगळ्या आघाड्यांवर देण्यासाठी लाभली. या यशस्वी संसारामागचं गुपित सांगताना त्या सांगतात, 

"आम्ही ठरवलं होतं,

‘'Let’s Grow Together without Growing Apart"."

त्यांच्या संसारात कसोटीचे अनेक क्षण आले. त्यांच्या पहिल्या बाळंतपणावेळी, त्यांच्या जोडीदाराला सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी रिपोर्ट करण्याचा आदेश होता. सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या मुलीचा जन्म झाल्यावर ५ व्या मिनिटाला त्यांचे जोडीदार देश रक्षणासाठी रवाना झालेले होते. आपल्या कुटुंबासोबत विदेशात जाण्यासाठी निघालेले असताना कारगिल युद्ध सुरू झाल्यावर, तातडीने आपल्या ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश मिळाले. संपूर्ण ट्रीप अर्धवट सोडून देशरक्षणासाठी त्या आपल्या ड्युटीवर रुजू झालेल्या होत्या.

एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून डॉक्टर बनताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर देशेसेवेचं आपलं व्रत आजही निभावत आहेत. आपल्या जोडीदाराच्या सावलीखाली दबून न जाता त्याच तोडीने आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि ओळख त्यांनी निर्माण केली. भारतीय सेनेतील दुसऱ्या सर्वोच्च पदावर पोहोचताना त्याचवेळी एक पत्नी, एक आई, एक डॉक्टर, एक प्राध्यापक, एक सेना अधिकारी अश्या सर्वच पातळीवर आपली छाप त्यांनी सोडली आहे. आज त्या The Director General Armed Forces Medical Services (DGAFMS) म्हणून भारतीय सेनेत कार्यरत आहेत. एक सामान्य मराठी स्त्री आपल्या स्वबळावर देशाच्या संरक्षणात त्याच ताकदीने योगदान देऊ शकते हे त्यांनी आपल्या दुर्गाशक्तीच्या रूपातून दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.  
 
जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 23 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

१९४० साल होतं. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता. त्या काळात कोलकाता इकडे एका बंगाली कुटुंबात आरती साहा यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना पाण्याचं वेड होतं. त्या अवघ्या २ वर्षाच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आपल्या आजीकडे वाढलेल्या आरतीने आपल्या वडिलांसोबत पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवले. आरतीची पाण्याची ओढ काहीतरी वेगळी आहे हे तिच्या वडिलांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांनी कोलकाता इकडे आरतीला पोहण्याच्या सरावासाठी पाठवलं. ज्याकाळी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, त्याकाळी आरती पोहण्याचे धडे कोलकातामध्ये गिरवत होती. वयाच्या ५व्या वर्षी तिने पोहण्यातील पहिलं सुवर्णपदक जिंकलं. १९४६ ते १९५२ या काळात आरतीने पोहण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरावर २२ बक्षीसे जिंकली.

आपल्या अंगभूत गुणांकडे लक्ष देताना आरती साहा यांनी आपल्या पोहण्यावर अजून मेहनत घ्यायला सुरवात केली. आपल्या खडतर परिश्रमाने त्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान नक्की केलं. त्या १९५२च्या ऑलिम्पिकमधल्या भारतीय चमूतील वयाने सगळ्यात लहान स्पर्धक होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदकाविना त्यांना भारतात यावं लागलं पण ऑलिम्पिकमधली जगातील सर्वोत्तम स्पर्धकांसोबतची स्पर्धा त्यांना अनुभवसंपन्न करून गेली. ऑलिम्पिकमधून परत आल्यावर त्यांनी आपलं लक्ष क्षमतेकडे केंद्रित केलं. आपली क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी रोज सरावाची मर्यादा वाढवत नेली. गंगा नदीच्या पात्रात लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. १९५८ साली बांगलादेशच्या ब्रोजेन दास यांनी इंग्लिश खाडी पार करणारा आशिया खंडातील सर्वप्रथम  जलतरणपटू असा मान मिळवला. ब्रोजेन दास यांच्या पराक्रमाने आरती साहा प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी ब्रोजेन दास यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. याचवेळी ब्रोजेन दास यांनी, आपण जे मिळवलं ते तू पण मिळवू शकतेस, असा विश्वास व्यक्त केला.

ब्रोजेन दास तिकडेच थांबले नाहीत, तर त्यांनी आरती साहा यांचं नाव Butlin International Cross Channel Swimming Race या स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांना सुचवलं. आरती साहा यांचं नाव पोहणाच्या स्पर्धेत भारतात गाजलेलं होतं. या स्पर्धेसाठी त्यांना सगळ्यांचा पाठिंबाही मिळत होता, पण मुख्य अडचण होती पैश्याची. या स्पर्धेसाठी, इंग्लंडला जाण्यासाठी लागणारा पैसा उभं करणं त्यांना शक्य नव्हतं. यावेळी आरती साहाची अडचण पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी, भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कानावर घातली. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर आरती साहा यांचा या स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

१७ ऑगस्ट १९५९ रोजी फ्रांसमधील केप ग्रिस नेझ ते इंग्लंड च्या सॅण्डगेट इथलं जवळपास ६५.५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी आरती साहा यांनी सुरूवात केली. आपली पायलट बोट वेळेत न आल्याने आरती साहा यांची अमूल्य अशी ४० मिनीटे वाया गेली. सर्वांपेक्षा उशिराने सुरूवात केल्यामुळे त्यांना इंग्लंडच्या तीरावर पोहोचण्याआधी पाण्याच्या उलट प्रवाहाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या तीरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असताना पाण्याच्या उलट प्रवाहामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पण म्हणतात ना,

"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की हार नहीं होती"

इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा आरती साहा यांनी मनाशी चंग बांधला होता. पुन्हा एकदा त्यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लिश खाडीत उडी घेतली. तब्बल ६५.५ किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या १६ तास २० मिनिटात पूर्ण करताना इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशिया खंडातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला. आपली स्पर्धा संपवून पाण्यातून बाहेर निघताच भारताचा तिरंगा त्यांनी इंग्लंडच्या आसमंतात फडकावला. त्यांचा हा विजय भारतीय खेळासाठी आणि एकूणच भारतीयांसाठी अविस्मरणीय असा होता. या अभूतपूर्व पराक्रमाची नोंद घेताना भारत सरकारने त्यांचा १९६० साली पद्मश्री सन्मानाने गौरव केला. खेळासाठी पद्मश्री सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यानंतर भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ १९९६ साली ३ रूपयांचा पोस्टल स्टॅम्प वितरित केला. तर गुगलने २०२० साली त्यांच्या ८०व्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्या दिवशीचं डुडल त्यांच्या नावावर ठेवलं होतं.

ज्यावेळी भारतीय स्त्री चूल आणि मूल यात अडकलेली होती, त्या काळात पोहण्यासारख्या पारंपारिक खेळात प्राविण्य मिळवून आशियामधील इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री होण्याचा मान मिळवणाऱ्या आरती साहा या दुर्गाशक्तीचं एक प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय स्त्री आणि भारताची शान संपूर्ण जगात वाढवली होती. त्यांच्या या कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या स्मृतीस वंदन.

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday, 22 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ७ .. समुद्रशास्त्र संशोधिका डॉक्टर अदिती पंत .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ७ .. समुद्रशास्त्र संशोधिका डॉक्टर अदिती पंत .. विनीत वर्तक ©


१८२० साली अंटार्क्टिकाचा शोध लागला. पण आजही तिकडे जाणं म्हणजे हिमालयाला पार करण्याइतपत मोठं काम आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर असलेली ही भूमी वर्षभर बर्फाच्या चादरीत लपेटलेली असते. उणे एकोणनव्वद (- ८९) डिग्री सेल्सिअसपर्यंत उतरणारे तापमान, बोचरी थंडी, थंड वारे यांमुळे इकडे जाणे हेसुद्धा एक मिशन असते. भारताने १९८१ साली अंटार्क्टिका ट्रीटी स्वीकारल्यावर आपलं पहिलं मिशन या खंडावर पाठवलं होतं. इथलं वातावरण, इथे असणारी नैसर्गिक संपत्ती याचा अभ्यास करण्यासाठी भारताने इकडे १९८३ साली 'दक्षिण गंगोत्री' नावाचा एक संशोधन तळ उभारला. १९८३ साली पृथ्वीच्या अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री, या मराठी म्हणजेच महाराष्ट्राच्या विदर्भातील (नागपूरातील) डॉक्टर अदिती पंत.

लहानपणापासून ट्रेकिंग, हायकिंगची आवड जोपासणाऱ्या अदिती पंत यांचे आदर्श त्यांचे वडील होते. 'काय करते आहेस ते लक्षपूर्वक कर आणि जे करशील ते सर्वोत्तम कर' असं सांगणारी आई, आणि 'मुक्तपणे जग' असं सांगणारे वडील अश्या दोघांच्या विचारांचा पगडा अदिती पंत यांच्या विचारांवर होता. त्यामुळेच जेव्हा आपलं कार्यक्षेत्र निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं 'स्वातंत्र्य'. वडिलांच्या मित्रांनी कॉलेजला दिलेल्या एका पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली. त्या पुस्तकाचं नाव होतं 'द ओपन सी', लेखक सर ऍलिस्टर हार्डी. पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. केल्यावर पुढे काय हा प्रश्न उभा होता. मुलींनी उच्च शिक्षण घेणं त्याकाळी समाजात रुजलेलं नव्हतं. याशिवाय विदेशात जाऊन उच्च शिक्षण खूप खर्चिक होतं. हा खर्च त्यांच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता, पण उच्च शिक्षण घ्यायची इच्छा मात्र मनात होती. त्याचवेळी अमेरिकन सरकारने त्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.

सागरी विज्ञान या विषयात त्यांनी आपलं एम.एस. हवाई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यापुढच्या शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं. वेस्टफील्ड कॉलेज, लंडन विद्यापीठातुन सागरी शैवाल या विषयात डॉक्टरेट घेतली. डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर 'पुढे काय?', असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. १९७१-१९७२चा तो कालावधी होता. भारतीयांच्या अमेरिका स्वप्नांच्या सुरूवातीचा तो काळ होता. जगातील प्रतिष्ठित अश्या विद्यापीठातल्या पदव्या डॉक्टर अदिती पंत यांच्याकडे होत्या. पैसा, मान- सन्मान, प्रतिष्ठा ते अमेरिकेचं नागरिकत्व असं सगळं समोर असताना त्या भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी National Institute of Oceanography, (NIO) Goa इकडे आपल्या कार्याला सुरवात केली. 'द ओपन सी' प्रमाणे, त्यांच्यासमोर भारताला लाभलेली ७५०० किलोमीटरची किनारपट्टी अभ्यासाला होती.

National Centre for Polar and Ocean Research या भारत सरकारच्या उपक्रमाने भारताच्या अंटार्क्टिकावरील संशोधनाचा श्रीगणेशा झाला होता. याच मोहिमेचा भाग म्हणून १९८३ साली सुदिप्ता सेनगुप्ता यांच्या सोबत डॉक्टर अदिती पंत यांनी अंटार्क्टिकाकडे कूच केलं. अंटार्क्टिकावर जाऊन तिथल्या महासागरातल्या जैव विविधतेच्या अन्नसाखळीचा अभ्यास करणं, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. याआधी कोणत्याही भारतीय स्त्रीने अश्या प्रतिकूल वातावरणात पाऊल ठेवलं नव्हतं. त्यामुळे अश्या वातावरणात राहणं, अभ्यास करणं हे खूप कठीण उद्दिष्ट त्यांच्यासमोर होतं. तब्बल ४ महिने अंटार्क्टिकाच्या प्रतिकूल वातावरणात राहून तिथल्या नैसर्गिक साखळीचा अभ्यास करताना डॉक्टर अदिती पंत यांनी अनेक शोध लावले. याशिवाय दक्षिण ध्रुवापासून २५०० किलोमीटर अंतरावर भारताचा पहिला संशोधन तळ 'दक्षिण गंगोत्री' ची स्थापना केली. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा त्या १९८४ साली अंटार्क्टिकावर संशोधनासाठी गेल्या होत्या. यानंतर त्यांनी पुण्याच्या  National Chemical Laboratory. (एन.सी.एल.) इकडे आपलं पुढील संशोधन सुरु ठेवलं.

डॉक्टर अदिती पंत यांनी अंटार्क्टिकाच्या अभ्यासात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना अंटार्क्टिका सन्मान दिला. डॉक्टर अदिती पंत यांच्या नावावर जागतिक पातळीवर संशोधनातील ५ पेटंट आणि ६७ पब्लिकेशन्स आहेत. एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून उच्चशिक्षण घेताना सर्व अडीअडचणींवर त्यांनी मात केली. अंटार्क्टिकासारख्या खडतर मोहिमेमध्ये न घाबरता, एखाद्या लढवय्याप्रमाणे तिथल्या प्रतिकूल वातावरणात त्या राहिल्या होत्या. एक भारतीय स्त्री, जगण्यासाठी आव्हान असलेल्या खंडावर, पृथ्वीच्या टोकावर जाऊन, संशोधन करून तिकडे भारताचा तिरंगा फडकावते, अश्या दुर्गाशक्तीस माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्या शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत:- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.







Wednesday, 21 October 2020

दुर्गाशक्ती भाग ६ .. पद्मश्री गोदावरी दत्ता .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग ६ .. पद्मश्री गोदावरी दत्ता .. विनीत वर्तक ©

भारतात आजही अनेक ठिकाणी मुलगी वयात आली की लगेच तिचे लग्न केले जाते. वयात येण्याचे वयही अवघे १२-१३ वर्षे असते. ज्या वयात खरं तर शाळेत जाऊन  शिकायचे असते, त्या वयात संसाराची जबाबदारी स्वीकारावी लागते. स्त्रीच्या आवडीनिवडी तर बाजूलाच राहिल्या, पण साधं चांगलं आयुष्यही वाट्याला येत नाही. पण अश्या परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करत, समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे किती कठीण असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. बहादूरपूर, बिहार इथल्या एका गावात गोदावरी दत्ता यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं. काही वर्षांतच त्यांना बालविवाहाच्या बंधनात अडकवलं गेलं. काही वर्षांत एका मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ज्याच्यासोबत आयुष्यात पुढे जगायची स्वप्नं बघितली, तोच सोडून दिल्लीला निघून गेला, परत न येण्यासाठी. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, एका मुलाची जबाबदारी अश्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कामी आली ती रंगांची साथ.

वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी गोदावरी दत्ता यांना चित्रकलेची आवड लागली. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला होता. बिहार मधल्या या भागात प्रत्येक मुलीला 'मधुबनी' चित्रकला शिकणं हे गरजेचं होतं. मधुबनी चित्रकला ज्याला 'मिथिला चित्रकला' असेही म्हटले जाते, कारण चित्रकलेचा हा प्रकार बिहारमधल्या मिथिला भागात गेली तब्बल २५०० पेक्षा जास्त वर्षे पिढ्यानपिढ्या वारसा रूपाने जोपासला गेला आहे. असे म्हटले जाते की, जनक राजाने राम आणि सीतेच्या लग्नाच्या वेळी तो प्रसंग काही कलाकारांना चित्ररूपाने काढायला सांगितला होता. हीच चित्रकला एखाद्या सणाच्या दिवशी, समारंभात, चांगल्या दिवशी घराच्या भिंतीवर, जमिनीवर चितारली जाऊ लागली. आज अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरही या भागातील प्रत्येक आई आपल्या मुलीला हा परंपरेचा वारसा देत आली आहे. गोदावरी दत्ता यांनी सुद्धा आपल्या आईकडून या चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले होते.

स्वतःवरती ऐन तारुण्यात संकटांची मालिका कोसळली, तरी गोदावरी दत्ता यांची आई त्यांच्यासोबत आधारवडाप्रमाणे राहिली. गोदावरी दत्ता यांच्या आई सुभद्रादेवी या त्या भागात मधुबनी चित्रकलेसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांना अनेकदा रामायण, महाभारत यांतले प्रसंग चित्रित करण्यासाठी बोलावलं जायचं, त्याच वेळेस गोदावरी दत्ता यांनी या चित्रकलेचे धडे आत्मसात केले. आपल्या आईची कलाकारी त्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर चित्रित करायला सुरवात केली. बिहार मधल्या या भागात 'कोहबर घर' नावाची एक प्रथा आहे. नवविवाहित दाम्पत्याने या खोलीत (घरात) तीन रात्री एकत्र घालवायच्या असतात. या घराच्या भिंतीवर आणि जमिनीवर मधुबनी चित्रकला प्रेम, जुन्या कथेतील प्रसंग, फूल, प्राणी या सगळ्यांतून चित्रित केलेली असते. या चित्रांच्या सान्निध्यात ३ रात्री घालवल्यानंतर चौथ्या दिवशी लग्न हे परिपूर्ण समजले जाते. अश्या खोलीत मधुबनी चित्र रंगवण्यासाठी त्यांच्या आईला बोलावलं जात असे. एकही पैसा न घेता त्यांच्या आईने ही चित्रकला एक परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून जपली. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी दत्ता यांनी यातील बारीक कलाकुसर आत्मसात केली. चित्रकलेचा हा वारसा आपण पैश्यासाठी नाही, तर आपला सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी जपत आहोत असं त्यांचं मत होतं.

गोदावरी दत्ता यांनी मधुबनी चित्र काढताना कधीच ब्रशचा वापर केला नाही. हात, अंगठा, बांबूचे टोक, पेन, आगपेटीच्या काड्या ह्याचा वापर करत त्यांनी मधुबनी चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. All India Handicrafts Board ने त्याकाळी भारताच्या ग्रामीण भागात जपलेल्या या चित्रकलेला देश आणि जगासमोर आणलं. गोदावरी दत्ता यांनी त्याचा उपयोग करून मधुबनी चित्रकलेला जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलं. एकेकाळी भारताच्या एका भागात जपलेल्या चित्रकलेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. गोदावरी दत्ता यांनी अनेक प्रदर्शनांमधून जर्मनी, जपान सारख्या देशांमध्ये या चित्रकलेला एक मानाचं स्थान मिळवून दिलं. मिथिला म्युझिअम टाकोमची, जपान इकडे उभारलं गेलं, ज्यात जवळपास ८५० पेक्षा जास्त मधुबनी चित्र, २५०० वर्ष जुन्या भारतीय चित्रकलेचा वारसा म्हणून आज बघता येतात. या कामासाठी जवळपास ७ वर्ष लागली. यात गोदावरी दत्ता यांचं योगदान अमूल्य आहे. जपानमधील ओसाका, टोकियो, कोबे यासारख्या अनेक शहरात मधुबनी चित्रकला, भारताच्या अभिजात संस्कृती आणि परंपरेचं दर्शन लोकांना घडवण्यासाठी उपलब्ध आहे.

मधुबनी चित्रकलेत पारंपारिक रंगांचा वापर करताना गोदावरी दत्ता यांनी त्यातील प्रत्येक रेष न् रेष शिकण्यासाठी तासन् तास घालवले आहेत. आपली कला आणि वारसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थी, शिक्षक यांना ही कला शिकवण्याची सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षात त्यांच्या हाताखालून तब्बल ५०,००० पेक्षा जास्त लोकांनी मधुबनी चित्रकला आत्मसात केली आहे. एकेकाळी लुप्त होणाऱ्या भारताच्या चित्रकलेला आज जागतिक वारसा बनवण्यासाठी गोदावरी दत्ता वयाच्या ९३व्या वर्षी सुद्धा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजातील मुलींनाही चित्रकला शिकवण्यासोबत त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठींबा देत आहेत. गोदावरी दत्ता यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार तर २०१९ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे. भारताच्या भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना 'शिल्प गुरु' हा आदरयुक्त सन्मान दिला आहे.

 गरीबी, बाल विवाह, आणि  हलाखीच्या परिस्थितीमध्ये  असूनही २५०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या चित्रकलेला आणि भारताच्या सांस्कृतिक वारश्याला त्यांनी आज जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. आज पारंपरिक रंगांची जागा ऍक्रेलिक रंगानी आणि बांबूच्या देठांची जागा ब्रशने घेतली असली तरी मधुबनी चित्रकलेचा तो आत्मा आजही त्यांनी जिवंत ठेवला आहे. मधुबनी चित्रकलेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोदावरी दत्ता यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- बेटर इंडिया, गुगल

फोटो स्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






Tuesday, 20 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ५ ... वैज्ञानिक रोहिणी गोडबोले... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ५ ... वैज्ञानिक रोहिणी गोडबोले... विनीत वर्तक ©

चूल आणि मूल यांत रमणारी भारतीय स्त्री जरी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली, तरी तिच्यासाठी काही क्षेत्रांचा विचार करणं शक्यच नव्हतं. काही क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी होती. अश्या एखाद्या क्षेत्रात एखाद्या स्त्रीने प्रवेश करून, त्यात आपलं स्थान निर्माण करणं हा भाग तर दूरच पण अश्या एखाद्या क्षेत्रात काम करणं हा विचार पण क्रांतिकारी होता. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं रहावं अशी पुढारलेली विचारसरणी असलेल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रोहिणी गोडबोले यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. मुलींसाठी असणाऱ्या शाळेत शिकताना तिकडे विज्ञान हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता, त्यामुळे स्कॉलरशिपसारखी परीक्षा देऊन विज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांतून शिकून त्यात कारकीर्द होऊ शकते हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. गणितात गोडी वाढवण्यासाठी एखादी शिकवणी लाव, हा त्यांच्या शिक्षकांनी दिलेला सल्ला त्यांनी पाळला आणि गणित या विषयातली त्यांची आवड अजून वाढली. गणितज्ञ होऊन आपल्याला नोकरी मिळेल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी आपलं लक्ष भौतिकशास्त्राकडे वळवलं.

पुण्याच्या परशुरामभाऊ कॉलेज मधून बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई आय.आय.टी. मधून केलं. आपल्या विज्ञानातील अभ्यासाला पुढे नेण्यासाठी त्यांनी कण-भौतिकशास्त्राची (particle physics) निवड केली. कण-भौतिकशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्रतिष्ठित अश्या स्टोनी ब्रुक इथल्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मिळवली. अमेरिकेत पुढे संशोधन करण्याची संधी असतानासुद्धा त्या १९७९ साली भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी टी.आय.एफ.आर. (Tata Institute of Fundamental Research) इकडे प्राध्यापक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर १९८२ ते १९९५ त्या मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक होत्या. १९९८ पासून त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू इकडून प्राध्यापक म्हणून आपलं काम सुरु ठेवलं आहे. या सर्व काळात त्यांनी जवळपास १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंध लिहीले आहेत, तर अजून १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंधांमध्ये त्या सहकारी आहेत.  

कण-भौतिकशास्त्रातील महत्वाचा शोध मानल्या गेलेल्या हिग्स-बोसॉन हा कण शोधण्यासाठी गेली ३० वर्ष त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना,

 International Detector Advisory Group (IDAG) for the International Linear Collider at the European research lab, CERN 

या जगातील अतिशय आघाडीच्या भौतिक विज्ञानातील संशोधकांच्या ग्रुपचं मानद सदस्यत्व प्राप्त झालं आहे. भौतिक शास्त्रातील स्टॅंडर्ड मॉडेल ज्यात प्रोटॉन, फोटॉन, न्यूक्लिअस अश्या कणांवर त्यांनी संशोधन आणि अभ्यास केला आहे. याशिवाय भौतिकशास्त्रातील हाय एनर्जी कोलायडरमधून नवीन कणांच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.

२००२ साली जगातील भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या स्त्रियांच्या परिषदेसाठी पॅरीस इकडे जाण्याचा बहुमान मिळालेला आहे. (International Conference on Women in Physics) पॅरीस इथे गेले असताना स्त्रियांना या क्षेत्रात काम करण्यासाठी समाजाची मानसिकता जागतिक पातळीवर आणि भारतात किती संकुचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपले सहकारी रामकृष्ण रामास्वामी यांच्या सोबत "Lilavati’s Daughters: The Women Scientists of India" हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकाचं नावही त्यांनी भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या गोष्टीवरून ठेवलं आहे. भास्कराचार्य ज्याप्रमाणे आपल्या गणितातील अडचणी मुलगी लीलावतीशी बोलत असत, त्याप्रमाणे या पुस्तकात भारताच्या स्त्री संशोधकांचा प्रवास लिहलेला आहे. भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा हा प्रवास, या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारतातील स्त्रियांना प्रोत्साहन देईल.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून परदेशी संशोधन करण्याची संधी उपलब्ध असतानासुद्धा भारतातच राहून, कण-भौतिकशास्त्रात आपलं भरीव योगदान त्यांनी भारतासाठी दिलं. नुसतं संशोधनापुरतं मर्यादीत न राहता आपल्या लिखाणातून, मार्गर्शनपर भाषणांतून भारतातील अनेक स्त्रियांना संशोधन क्षेत्रात येण्यासाठी तसेच सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांचा जागतिक पातळीवर गौरव झालेला आहे. भारत सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेताना त्यांना २०१९ साली पद्मश्री सन्मानाने गौरवलं आहे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठू शकतात हे सिद्ध करताना वैज्ञानिक, प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांनी दुर्गाशक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा नमस्कार आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- रोहिणी गोडबोले पेज, गुगल

फोटो स्रोत :- गुगल  

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Monday, 19 October 2020

दुर्गाशक्ती भाग ४ .. समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग ४ .. समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे .. विनीत वर्तक ©

दोन अपूर्णांक मिळून एक पूर्णांक होतो हे कितीही खरं असलं तरी आज आपल्याला पूर्ण करणाऱ्या त्या अपूर्णांकांची निवड करण्याचे निकष बदललेले आहेत. स्वभावाआधी बँक बॅलन्स आणि माणसाआधी फ्लॅट महत्वाचा झाला आहे. पगार किती, कंपनी कोणती हे बघून प्रेमात पडणारे अनेक जण आहेत. अर्थात हे निकष चुकीचे अथवा बरोबर हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण आपलं सर्व सुखसंपन्न; आरामाचं आयुष्य सोडून अश्या एखाद्या जंगलात जिकडे जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध नाहीत, तो भाग आयुष्याच्या रंगीत स्वप्नांपासून कोसो दूर आहे, अश्या एखाद्या ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत आपल्या जीवनातल्या नवीन वळणाची सुरूवात करावी हा निर्णय घेणं, आणि तो गेली ४८ वर्षांपेक्षा जास्त काळ निभावून नेणं हे एखाद्या तपश्चर्येएवढंच कठीण आहे. हे सगळं करत असताना सर्व आघाड्यांवर आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून समाजसेवेचं अविरत व्रत आजही निभावणाऱ्या दुर्गाशक्ती म्हणजेच डॉक्टर मंदाकिनी आमटे.

विश्व हिंदू परीषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका सधन कुटुंबातून त्यांनी आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. भूलतज्ञ म्हणून आपलं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सर्जन असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी एकत्र काम करत असताना दोघांचे ऋणानुबंध जुळले ते कायमसाठी. पण खरी अडचण पुढे होती. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच बाबा आमटे यांचं कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आनंदवन म्हणजेच चिखलदरा सारखं एखादं थंड हवेचं ठिकाण असावं असा विचार करणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटेंसाठी हे सगळं अतिशय नवीन होतं. त्यातही बाबा आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाची जबाबदारी प्रकाश आमटे यांच्यावर टाकली होती. कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकलेलं होतं, अश्या लोकांसोबत काम करणाऱ्यांना आपली मुलगी देणं हे त्यांच्या घरच्या लोकांना रूचलं नव्हतं. त्यातही अश्या लोकांच्या कल्याणासाठी, त्यांनतर पर्यायाने एका जंगलात आयुष्य काढण्याचा निर्णय स्वीकारून मंदाकिनी आमटे यांनी एका वेगळ्या पाऊलवाटेवर आपला प्रवास सुरु केला.

दार नसलेलं घर, इलेक्ट्रीसिटी; पाणी अशी कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्यांनी एका नवीन जीवनाची सुरूवात केली. माडीया-गोंड जमातीतील आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब होते. भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा अश्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं शिवधनुष्य पेलणं खूप कठीण काम होतं. एकतर हे लोक दुसऱ्या लोकांच्या जवळ जायला घाबरत असत याशिवाय त्यांची भाषा वेगळी होती. भाषा शिकून त्याचवेळी कोणत्याही सुविधांपासून वंचित असलेल्या ठिकाणी घर चालवणं हे त्याहून कठीण काम होतं. जेवायला लागणारी भाजी स्वतः पिकवण्यापासून ते नाल्यामधील पाणी हंड्यात भरून आणून त्याला चुलीवर उकळवून पिण्यायोग्य बनवेपर्यंत सगळंच कोणत्याही सुविधांशिवाय करायला लागायचं. साप, विंचू, जंगली श्वापदं, पाऊस, थंडी या सगळ्या काळात वीजेशिवाय चुलीवर संसार करताना त्याचवेळी एक डॉक्टर बनून समाजसेवेचं आपलं व्रत चालू ठेवणं हे कल्पनेपलीकडलं आहे. हे सगळं करूनसुद्धा पत्नी, आई या सगळ्या भूमिका सुद्धा त्याच निष्ठेनं निभावणं याची कल्पना पण आपण करू शकत नाही.

डॉक्टर प्रकाश आमटे यांनी, आपण आपल्या पत्नीला साधी एक साडी घेऊ न शकल्याची खंत केबीसीसारख्या कार्यक्रमात बोलून दाखवली होती, यावरून कोणीही विचार करू शकेल की, आपल्या जोडीदाराबरोबर त्याच्या सगळ्या निर्णयात ठामपणे उभं राहून समाज सेवेचं अविरत व्रत स्वीकारण्यासाठी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी किती त्याग केला असेल. १९९५ साली मोनॅको या देशाने डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेताना त्यांच्यावर एक पोस्टल स्टॅम्प काढला. असा सन्मान मोनॅको या देशाकडून मिळवणारं आमटे कुटुंब हे जगातील दुसरं व्यक्तिमत्व होतं. २००८ साली त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर प्रकाश आमटे सोबत डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना मॅगसेसे कमिटीने म्हटलं होतं,

"In electing Prakash Amte and Mandakini Amte to receive the 2008 Ramon Magsaysay Award for Community Leadership, the board of trustees recognizes their enhancing the capacity of the Madia Gonds to adapt positively in today's India, through healing and teaching and other compassionate interventions."

आज हेमलकसा येथील 'लोकबिरादरी प्रकल्प' निष्काम कर्मयोग आणि समाजसेवेसाठी जागतिक पातळीवर नावाजलेला आहे. आज आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी हा समाजसेवेचा वसा पुढे नेते आहे. पण एकेकाळी जेव्हा या भागात माणूस म्हणून जगणं अशक्य होतं, अश्या काळात त्यांनी आपल्या जीवनाच्या सोनेरी वळणाची सुरूवात या जंगलातून केली. आज समाजात इतकी उंची गाठल्यावर पण गर्वाचा लवलेश किंवा अभिमान त्यांच्या चालण्याबोलण्यात कुठेच दिसत नाही. एक सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करू शकते, एकाचवेळी अविरत समाजसेवेचं व्रत करताना असंख्य अडचणींना सोडवत सगळ्याच पातळीवर एक आदर्श जीवन जगू शकते. संपूर्ण भारतापुढेच नाही, तर जगापुढे एक दुर्गाशक्तीचं असामान्य उदाहरण ठेवणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.