Monday, 14 November 2022

अमेरिकेची तुटणारी स्वप्न... विनीत वर्तक ©

अमेरिकेची तुटणारी स्वप्न... विनीत वर्तक ©

गेल्या महिनाभरात झालेल्या घटनांचा आढावा घेतला तर एकट्या अमेरिकेत आय. टी. इंडस्ट्री मधे जवळपास ६०,००० पेक्षा जास्त लोकांना पिंक स्लीप म्हणजेच नोकरीतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. यात छोट्या मोठ्या सर्व कंपन्या समाविष्ट आहेत. ट्विटर, मेटा, यांच्या रांगेत आता अमेझॉन उभी आहे. या शिवाय इतर अनेक उद्योग समूह आपल्या उद्योगाची पुनर्रचना करत आहेत. अर्थात हे एक सायकल आहे जे कोणत्याही उद्योग समूहाचा भाग असते. पण या निमित्ताने अमेरिकेची तुटणारी स्वप्न सगळीकडे वास्तवाची जाणिव करुन देत आहेत. त्याची धग आज आपल्या पर्यंत पोहचते आहे. 

उच्च शिक्षण, डॉलर मधला पगार, स्वप्नवत जीवनशैली या सर्वांचा प्रभाव आपल्या पिढीवर पडला नसेल किंवा त्याची भुरळ आपल्याला पडली नसेल असं क्वचित कोणी असेल. पण त्या मागे लपलेल्या वास्तवावर मात्र कोणी चकार शब्द बोलत नाही. एकतर अश्या गोष्टींना कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून लेबल लावण्यात येते किंवा पोळलेले आपलं झालेलं नुकसान किंवा दुःख सगळ्यांन समोर मांडायला कचरत असतात. 

आयुष्यभर एकेक पैसे जोडत एका पिढीने आयुष्याची एक वरची पातळी गाठली. आपल्याला जे कष्ट करावे लागले ते आपल्या मुलांना करावे लागू नयेत म्हणून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याच्या दृष्टीने त्या पिढीने आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यातून सुरू झाला मग अमेरिकेच्या स्वप्नांचा प्रवास. भारतात गुणवत्तेला न्याय मिळत नाही या लेबलखाली अमेरिकेत जाण्यासाठी आयत कारण समोर होतं. अनेक अंशी ते आज खरही आहे. पण प्रत्येकाची तितकी गुणवत्ता असते का? या प्रश्नाकडे मात्र कोणीच डोळसपणे बघत नाही. 

आधी स्वप्नपूर्तीसाठी सुरू झालेला अमेरिकेचा प्रवास आज चढाओढीत रूपांतरित झालेला आहे. त्याचा किंवा तिचा मुलगा / मुलगी अमेरिकेला गेली मग माझी का नाही? हीच ती चढाओढ. त्यासाठी गुणवत्ता, आर्थिक निकष आणि गरज या गोष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त विदेशात शिक्षण घेण्याचा अट्टाहास आता स्टेटस सिम्बॉल बनला आहे. पण यासाठी आपण काय पणाला लावतो आहे याचा विचार करण्याची गरज ही भासत नाही. 

अमेरिकेत शिक्षण घेणं आर्थिक दृष्ट्या खूप खर्चिक आहे. आर्थिक क्षमता येण्यासाठी मग कर्जाचा आधार. मग कसंही करून अमेरिका गाठून, वाट्टेल तसं राहून शिक्षण घ्यायचं. पण खरी सुरुवात तिकडे होते जेव्हा त्या स्वप्नांचं खर स्वरूप समोर येते. जेव्हा एच.वन. बी. व्हिसा साठी नोकरीचा शोध सुरू होतो. जेव्हा योग्य परतावा देणारी नोकरी मिळत नाही तेव्हा स्वप्नांचे इमले तुटायला लागतात. नोकरी जरी मिळाली तरी ती कितपत टिकेल हे कोणीच सांगू शकत नाही. गेल्या महिन्याभरात ज्या पद्धतीने चांगल्या कंपन्यांमध्ये कामगार कपात केली जात आहे. त्याने अमेरिकेच्या स्वप्नांना चांगलाच सुरुंग लागलेला आहे. गेल्या काही आठवड्यापासून लींकडीन सारख्या साईटवर नोकरीसाठी सर्वच वणवण करत आहेत. कारण ६ महिन्यात दुसरी नोकरी मिळाली नाही तर अमेरिकेतून हकालपट्टी होण्याच्या मार्गावर हे सगळेच आहेत. 

जिकडे नवीन नोकऱ्या नाहीत आणि जिकडे सध्या असलेल्या लोकांना संधी नाही तिकडे दरवर्षी करोडो रुपये खर्चून अमेरिकेत शिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणाऱ्या नवीन स्वप्नांना कोणती संधी मिळणार आहे? याचा विचार करण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. गुणवत्ता आणि अमेरिकन शिक्षणाचा दर्जा किंवा तिकडे उपलब्ध होणाऱ्या संधी याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. निश्चित भारतापेक्षा या गोष्टी तिकडे चांगल्या प्रमाणात आहेत. पण या सर्व गोष्टींसाठी आपण किंवा आपला मुलगा / मुलगी कितपत पात्र आहे याचा अंदाज आणि अभ्यास करण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. 

अमेरिकेचं शिक्षण हे स्टेटस सिम्बॉल म्हणून आहे की खरोखर गुणवत्तेच्या जोरावर आहे. याचा वेध घेण्याची गरज आहे. सर्व साधारणपणे दोन वर्षाच्या अमेरिकन शिक्षणाचा खर्च ५० लाखांपेक्षा जास्त जातो. जर समजा त्याच पातळीच शिक्षण भारतात घेतलं तर ते अर्ध्यापेक्षा कमी पैशात होतं. मग तेच उरलेले २५ लाख अडचणीच्या वेळी आपला आधार किंवा एका नवीन उद्योगाची पायाभरणी करण्यात गुंतवले जाऊ शकतात हे सरळ साधं गणित आपण कधी सोडविणार आहोत. कोणाला दाखवण्यासाठी, नातेवाईक आणि मित्र मंडळीत मोठेपणा करण्यासाठी आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवत असाल तर आपण केवढी मोठी रिस्क घेतो आहोत याचा विचार करा. 

या वर्षीच्या अमेरिकन व्हिसा च्या सर्व बुकिंग संपल्यात. त्यासाठी भली मोठी वेटींग लिस्ट आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात अमेरिकेत शिक्षण घेण्याचं वेड पसरते आहे. ते योग्य का अयोग्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. कारण त्याच्या दोन्ही बाजू आहेत. आपण कोणत्या बाजूला आहोत ह्याच गणित प्रत्येकाने आपल्या पद्धतीने करायचं आहे. 

अमेरिकेचं शिक्षण, नोकरी किंवा राहणीमान याची भुरळ पडणं यात काही गैर नाही. स्वप्न बघणं पण चुकीचं नाही. पण सगळं कळत असून सुद्धा आपली ऐपत नसताना, आपली गुणवत्ता नसताना डोळे बंद करून त्यात उडी मारणं हे मूर्खपणाच लक्षण आहे. तेव्हा सजग होऊन निर्णय घ्या हीच सर्वांना विनंती. आयुष्यात पैसा सगळं काही नसला तरी पैसा सर्वाकडे लागतो हे वास्तव आहे. त्यामुळे आपण या सर्वात कुठे याचा अंदाज घेऊन पाऊल पुढे टाका. अमेरिकेची तुटणारी स्वप्न प्रत्यक्षात आपल्या आयुष्याला उध्वस्त करू शकतात.

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





3 comments:

  1. 1. आपली लोकं अमेरिकेला जातात, एकदा गेली की तिथून परत येत नाहीत, तिकडे कुठल्याही परिस्थितीत, मरत टिकून राहण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतात याचं इतक्या वर्षांदरम्यान मला सापडलेलं एकंच कारण आणि ते म्हणजे तिकडचं रहाणीमान / जीवनशैली आणि त्यातली दैनंदिन सुलभता. विशेषतः जेव्हा भारतातल्या राहणीमानाशी त्याची तुलना करून बघितली तर अर्थातच अमेरिका किंवा कुठलाही प्रगत देश त्यात उजवा ठरतो.

    2. त्यात चूक काय? प्रत्येकाला आपलं आयुष्य सुलभ, सुकर आणि संपन्न असावं असं वाटतं. ते तो आपापल्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतो. कुणी अमेरिकेत राहून दर बाळंतपणासाठी इकडून आईवडलांना आयात करून घेतात आणि तरीही तिकडच्या आयुष्याचे पोवाडे गातात, तर कुणी तिकडून रग्गड कमाई करून इथे परत येतात, आईवडलांपासून वेगळं बिऱ्हाड थाटतात, पण तरीही त्यांच्या प्रत्येक सर्दी खोकल्याची काळजी घ्यायला हजर असतात. अशांना त्यातही सुख आणि संपन्न मिळतं.

    एखाद्याची सुखाची व्याख्या काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. लेखकाच्या व्याख्येशी ती मिळतीजुळती नसली तर काय झालं?

    3. आजकालच्या जगात गुणवत्ता, लायकी आणि ऐपत यांचा अमेरिकेत किंवा प्रगत देशात जाण्याशी काडीचाही संबंध उरलेला नाही. एकेकाळी असेल पण आता तो नाही. पूर्वी, पाश्चात्य विद्यापीठं, फक्त आणि फक्त कुशाग्र लोकांचीच निवड करत असत. कालांतराने या विद्यापीठांना देखिल कळून चुकलं की आशियाई लोकांना, काहीही करून इथे येण्याचं विकृत आकर्षण आहे. मग या विद्यापीठांचा देखील विस्तार झाला. सर्व स्तरातील गुणवत्तेला सामावून घेण्यासाठी नवीन पर्याय उभे राहिले.

    पूर्वी, शिष्यवृत्ती हा एकच उपाय होता. नंतर 'शैक्षणिक कर्ज' नावाचा उपाय आला आणि त्याचं आपल्याकडे उदात्तीकरण झालं. शिक्षणासाठी कर्ज म्हणजे मोठं पुण्याचं काम अश्या प्रकारचं ते उदात्तीकरण. यात मुख्यतः दोन हेतू. तिकडच्या शैक्षणिक बाजारपेठेत इकडून पुरेपूर माल पोचत राहील ही सोय आणि बँकांचा वित्तीय नफा हा दुसरा हेतू. Personal Loan नंतरचं दुसरं महागडं कर्ज म्हणजे Student Loan. सगळेच बडे हेतू साध्य होत असल्यामुळे, इकडच्या मध्यमवर्गीयांना त्याची जीवघेणी नशा लागेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. त्याचे परिणाम आपल्या समोर आहेत.

    दुसरीकडे, अमेरिकेत हे जे नवीन पर्याय, म्हणजेच नवी विद्यापीठं जन्माला घातली गेली, त्यात क्वचित काहीच दर्जेदार होती किंवा आहेत. पण आधीच अमेरिका प्रेमात आकंठ बुडालेल्या आपल्या आंधळ्या मध्यमवर्गाला ते दिसत नव्हतं आणि दिसत असेल तरी पटवून घ्यायचं नव्हतं.

    आता यात गम्मत अशी की या आपल्या मुलांना तिकडे गेल्यावर शिकवणारे बरेचसे प्राध्यापकही आशियाईच! म्हणजे सारांश असा की कमावणार अमेरिका, शिकणं, शिकवणं आणि दरम्यान येणारं इतर सगळं तुम्ही बघा. हे असलं तिकडचं उच्च शिक्षण. त्यासाठी इथे, खरंतर आपला एक अश्रू सुद्धा खूप महाग आहे!

    त्यामुळे, सरतेशेवटी लेखकाचा गुणवत्ता आणि लायकीचा मुद्दा गौण ठरतो.

    उलट आजकाल नीट बघाल तर असं दिसेल की आता बारावी नंतरच लगेच तिकडे शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या रविवारच्या ET मध्ये यावर लेख आला होता.

    याचा अर्थ असा की अमेरिका ज्याच्या रक्तात उतरली आहे त्याला 'गुणवत्ता', 'लायकी', 'ऐपत' अश्या क्षुद्र गोष्टी दिसत किंवा ऐकूही येत नाहीत. "तिथे जायचं म्हणजे जायचं, पुढे जे होईल ते नंतर पाहून घेऊ!"

    4. पुढील पानावर...

    ReplyDelete
  2. उरलं सुरलं...

    4. गेल्या पंच्याहत्तर वर्षांतली आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, न्यायिक, शैक्षणिक, रोजगार परिस्थिति, आपली लोकसंख्या, तिची घनता, त्या घनतेचा देशाच्या एकूण क्षेत्रफळाशी निगडित असलेला विस्तार (खरंतर नसलेला. कारण आपली 75-85% लोकसंख्या आपल्या 25-35% क्षेत्रफळात राहते) अशी अनेक कारणं देखील या विषयाशी निगडित आहेत.

    परिस्थिती आत्ता गेल्या पाच वर्षांत सुधारू लागली आहे. पण ज्यांना इथेही अमेरिकाच हवी आहे त्यांना मात्र किमान पुढची दोन दशकं तरी कळ काढावी लागेल.

    5. खरंतर सद्ध्या युरोपात जे चालू आहे, अमेरिकेत आर्थिक मंदीमुळे जे चालू आहे, तिथल्या राजकारणात काही वर्षं जे चालू आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्या वेगात विकास होतोय, प्रत्यक्ष सामान्य जनतेच्या पातळीवर जे जाणवणारे काही चांगले बदल होऊ लागले आहेत.. या सगळ्याचा सारासार विचार केला तर असं वाटतं की 2035 उजाडेस्तोवर "destination भारत" अशी काहीशी परिस्थिती निर्माण होईल की काय!

    त्यामुळे मी लेखकाच्या उलट म्हणेन थोडंसं की असेलच नशा तर तिथे जा, शिका, जोपर्यंत मिळू शकतंय तोपर्यंत भरपूर कमवा... कारण सरतेशेवटी तुम्हाला इथेच यायचं आहे.

    भारत ही नजिकच्या भविष्यातली, जगातली दुसर्‍या क्रमांकाची आर्थिक सत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गस्थ झालेला आहे. आणि दुसरीकडे पाश्चिमात्य देशाच्या अर्थव्यवस्था ह्या ज्येष्ठ वयाच्या असंख्य व्याधींनी ग्रासलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आता उंच उड्यांची अपेक्षा किंवा अपेक्षापूर्ती काहीच शक्य नाही. आजच्या परिस्थितीत जर कुणाला शक्य असेल तर ते भारताला!

    त्यामुळे आत्ता अमेरिकेच्या नावानी जल्लोष करा, तिचा उदोउदो करा, पण नंतर इथे आलात की भारताचा झेंडा आणि त्याचा जयघोष या गोष्टींचं महात्म्य तेव्हा विसरू नका म्हणजे झालं!

    ReplyDelete
  3. तळटीप : उपलब्ध आकडेवारीचा अचूक अभ्यास न करता, उस्फूर्तपणे वरील टिप्पणी केली गेली आहे, तरीही चूकभूल द्यावी घ्यावी आणि क्षमस्व!

    ReplyDelete