Monday, 28 November 2022

विश्वाचा पसारा... विनीत वर्तक ©

 विश्वाचा पसारा... विनीत वर्तक ©

विश्व किती अनंत आहे याचा अंदाज आपण आजही लावू शकत नाही. पण विश्वाचा पसारा अजून वाढतो आहे किंवा विश्व प्रसारण पावते आहे असा शोध १९२९ साली 'एडविन हबल' यांनी लावला होता. त्यांच्या याच शोधासाठी मानवाने पहिल्यांदा अवकाशात पाठवलेल्या दुर्बीणीचं नाव त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं. ज्याला आपण आज 'हबल टेलिस्कोप' असं ओळखतो. आता विश्व प्रसारण पावते म्हणजे नक्की काय होते? ते प्रसारण पावत असल्याने नक्की काय घडतं हे समजून घेणं खूप रोमांचकारी आहे. एडविन हबल यांनी जो क्रांतिकारी शोध लावला त्याने विश्वा बद्दलच्या आपल्या ज्ञानात अभूतपूर्व अशी भर पडली. तर समजून घेऊ की विश्वाच प्रसरण झाल्याने काय गंमत होते. 

आपल्याला माहित आहे की आपण एखाद्या ताऱ्याच अंतर हे प्रकाशवर्ष मधे मोजतो. जेवढे वर्ष प्रकाश पृथ्वीवर यायला लागली तितके वर्ष तो पृथ्वीपासून दूर आहे. उदाहरण घेऊ की एखाद्या ताऱ्याचा प्रकाश १०,००० वर्षांनी आपल्या पर्यंत पोहचला. याचा अर्थ तो तारा आपल्या पासून १०,००० प्रकाशवर्ष लांब आहे. थोडक्यात जवळपास ३ लाख किलोमीटर / सेकंद या वेगाने तिकडून निघालेल्या प्रकाशाला आपल्या पर्यंत पोहचायला १०,००० वर्ष लागली असा त्याचा अर्थ होतो. आता आपण एखादा दूरवर असलेली दीर्घिका घेऊ. जशी की जी एन झेड ११ (GN-z11) या दीर्घिकेचा प्रकाश आपल्याकडे पोहचायला तब्बल १३.४ बिलियन वर्ष लागली. आता तुम्ही गणित कराल की याचा अर्थ ही दीर्घिका आपल्या पासून १३.४ बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर असायला हवी. (जसं गणित आपण वर केलं) पण प्रत्यक्षात ही दीर्घिका आपल्यापासून तब्बल ३२ बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर आहे. यापेक्षा मज्जा अशी आहे की आपण जे विश्व बघू शकतो त्याची मर्यादा ४६.५ बिलियन प्रकाशवर्ष इतकी आहे. 

आता तुमच्या मनात विचार येईल की जर वैज्ञानिक असं म्हणतात की बिग बँग किंवा विश्वाची निर्मिती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली तर आपण ४६.५  बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर कसे बघू शकतो? जी एन झेड ११ (GN-z11) सारखी दीर्घिका ३२ बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर कशी काय असू शकते? हे शक्य आहे कारण विश्व हे प्रसारण पावते आहे. तोच शोध एडविन हबल यांनी लावला. आता विश्व कसं प्रसारण पावते आहे आणि त्यामुळे अंतराची ही गफलत का होते ते मी थोडं सोप्या शब्दात इकडे सांगतो. आपण असं समजू की रबराच्या एका टोकाला पृथ्वी आहे आणि दुसऱ्या टोकाला जी एन झेड ११ (GN-z11) सारखी दीर्घिका. आता या दीर्घिकेकडून निघालेला प्रकाश पृथ्वी पर्यंत पोचायला १३.४ बिलियन प्रकाशवर्ष लागतात. म्हणजे रबराच्या दोन टोकातील अंतर हे १३.४ बिलियन प्रकाशवर्ष आहे. आता हे कधी अस्तित्वात असेल जर राबराचं प्रसरण होत नसेल. इकडे आपण मानत आहोत की रबर जसा आहे तसाच तो इतक्या मोठ्या कालावधीत राहिलेला आहे. तर आपलं गणित बरोबर येईल. 

पण एडविन हबल यांनी सिद्ध केलं की विश्व तर प्रसरण पावते आहे. याचा अर्थ काय तर पृथ्वी आणि ती दीर्घिका यांच्यामधील स्पेस (उदाहरणात आपण रबराला स्पेस असं मानू ) ती प्रसरण पावते आहे. जरी पृथ्वी आणि ती दीर्घिका एकाच जागेवर असले तरी त्यांच्यामधील दुवा म्हणजेच रबर (स्पेस) प्रसरण पावते आहे आणि हे प्रसरण काळाच्या वेगाने सुरूच आहे. याचा अर्थ काय तर रबरा सोबत निघालेला प्रकाश सुद्धा प्रसरण पावतो आहे. जरी तो ३ लाख किलोमीटर / सेकंद  वेगाने पृथ्वीकडे येत असला तरी प्रत्यक्षात त्याने कापलेलं अंतर हे वाढलं आहे. कारण त्याच प्रसरण रबरा सोबत झालं. याचा अर्थ सोप्या शब्दात जी एन झेड ११ (GN-z11) कडून निघालेला प्रकाश जरी पृथ्वीवर १३.४ बिलियन प्रकाशवर्षात पोहचला तरी ही दीर्घिका आपल्यापासून ३२ बिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. कारण मधल्या काळात रबर इतका ताणला गेला की पृथ्वी आणि जी एन झेड ११ (GN-z11) मधलं अंतर वाढलं. याचा अर्थ विश्व प्रसरण पावलं. आज ही दीर्घिका आपल्यापासून ३२ बिलियन प्रकाशवर्ष इतक्या लांब अंतरावर गेली. आता मनात प्रश्न येईल की हा फरक १०,००० प्रकाशवर्ष अंतरावर असणाऱ्या ताऱ्याच्या बाबतीत का लागू होत नाही तर त्याच उत्तर आहे की काही हजार प्रकाशवर्ष हे अंतर काही बिलियन प्रकाशवर्ष अंतराच्या मानाने खूप लहान आहे. त्यामुळे विश्वात आपल्या जवळच्या ताऱ्यांवर किंवा दीर्घिकांवर ताणलेल्या रबराचा इतका फरक जाणवत नाही. 

आता गमंत अशी आहे की या विश्वाचा प्रसरण पावण्याचा ही काही वेग आहे. तर तो वेग आहे १ मेगा पर्स किंवा ३.२६ मिलियन प्रकाशवर्ष अंतरावर विश्व ७० किलोमीटर / सेकंद वेगाने प्रसरण पावते आहे. पाण्यावर दगड टाकल्यावर निर्माण होणारे तरंग एका लयीत काठापर्यंत जातात. याचा अर्थ काय तर जसे ते पसरत जातात तसा त्यांचा वेग वाढत जातो. कारण तंरंगाची लय ठेवायला त्यांना जास्ती अंतर कापायचं असते. अशी सारखी अवस्था विश्वात होते म्हणजे काय तर जसे आपण लांब जाऊ तसा प्रसरण पावण्याचा वेग (रबर प्रसरण पावसाचा वेग उदाहरणासाठी) वाढत जातो. तर प्रत्येक ३.२६ मिलियन प्रकाशवर्ष अंतरावर तो दुप्पट होतो. याचा अर्थ २ मेगा पर्स अंतरावर हाच वेग १४० किलोमीटर / सेकंद इतका झालेला असेल. आता मजा अशी आहे की हा वेग वाढत जाऊन एका अंतरावर ३ लाख किलोमीटर / सेकंद इतका होईल. याचा अर्थ काय तर प्रकाशाच्या वेगाने त्या ठिकाणी विश्वाचं प्रसरण सुरु असेल. हा वेग आपण किती अंतरावर गाठू याच गणित केलं तर उत्तर येते १४ बिलियन प्रकाशवर्ष. सोप्या भाषेत १४ बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर प्रकाशाचा वेग आणि विश्वाच्या प्रसारणाचा वेग हा सारखा असतो. यालाच म्हणतात 'हबल स्पिअर'.

आता पुढली मज्जा इकडे आहे. तर या हबल स्पिअर च्या बाहेर जे काही असेल ते प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने आपल्या पासून लांब जाते आहे. आता आपण म्हणू ठीक आहे थोड्या फार दीर्घिका किंवा तारे त्यात असतील. पण मज्जा अशी आहे की विश्वातील ९७% दीर्घिका, तारे, ग्रह आणि इतर गोष्टी हबल स्पिअर पलीकडे आहेत. अजून सोप्या शब्दात जी एन झेड ११ (GN-z11) दीर्घिका आपल्या पासून प्रकाशाच्या तिप्पट वेगाने ( ९ लाख लकिलोमीटर / सेकंद ) वेगाने लांब जात आहे. कारण पृथ्वी आणि तिच्या मधला रबर (स्पेस) त्या वेगाने ताणला जात आहे. याचा अर्थ आपण कदाचित जी एन झेड ११ (GN-z11) आता कशी आहे हे भविष्यात बघू पण शकणार नाही. कारण तो प्रकाश आपल्या पर्यंत पोहचू शकणार नाही. जेवढ्या वेगाने तो आपल्याकडे झेपावेल त्याच्या तिप्पट वेगाने तो आपल्या पासून लांब गेला असेल. 

समजायला थोडं कठीण वाटेल पण विश्वाचं प्रसरण इतक्या प्रचंड वेगाने होते आहे की त्याचा थांगपत्ता कदाचित आपल्याला कधीच लागू शकणार नाही. पण हे एकदा समजलं की समजेल की आपल्याला अजून ९७% विश्व माहितीच नाही. कारण कदाचित तिकडून निघालेला प्रकाश अजून पर्यंत आपलीकडे कधी पोहचलेला नाही किंवा कधी पोहचेल याची शक्यता पण नाही. 

फोटो शोध सौजन्य  :- नासा 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Friday, 25 November 2022

एक से भले दो, दो से भले तीन... विनीत वर्तक ©

एक से भले दो, दो से भले तीन... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मधल्या बाली इकडे जी २० शिखर परिषद म्हणजेच संमेलन झालं. जगातील महत्वाच्या भारतासह सगळ्या १९ राष्टांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वर्षीच संमेलन भारतासाठी अनेक कारणांनी महत्वाचं होतं. खरे तर जी २० म्हणजे काय? त्याचा हेतू काय? त्यातून त्यात भारताचं असलेलं स्थान? यावर्षी ते महत्वाचं का? हे सगळं घडवून आणण्यात काय पावलं टाकली गेली आहेत हे आपण समजून घेणं महत्वाचं आहेच पण हे घडवून आणण्यात आणि भारताची एक वेगळी प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण करण्यात ज्यांनी योगदान दिलं आहे ते पडद्यामागचे सूत्रधार ओळखणं ही तितकं महत्वाचं आहे. 

जी २० किंवा ग्रुप ऑफ २० हा एक आंतरराष्ट्रीय देशांचा एक समुदाय आणि मंच आहे. १९९० च्या दशकात आलेल्या मंदीच्या सावटानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अश्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि एकत्रितपणे लढा देण्यासाठी या गटाची १९९९ साली स्थापना झाली. १९ देशांसह युरोपियन युनियन या समुहाचा भाग झाले. जी २० हा जगातील एक शक्तिशाली राष्ट्रांचा समुह आहे. जगातील ८५% जी.डी.पी. चा हिस्सा याच समूहातील राष्टांकडे आहे. जगातील ७५% व्यापाराचा हिस्सा आणि या पृथ्वीवरील ६०% जनता ही याच देशांचा हिस्सा आहे. यावरून लक्षात येईल की जी २० किती महत्वाचा समूह आहे. १९९९ पासून भारत याचा सदस्य देश असूनसुद्धा भारताला याचं सारथ्य करण्याची संधी आजवर दिली गेली नव्हती. पण येत्या वर्षात भारताला जी २० च नेतृत्व करण्याची संधी दिली गेली आहे. २०२२ ते २०२३ या काळात भारत जी २० च सारथ्य करणार आहे. कोणाला वरवर वाटेल की ही एक सामान्य घटना आहे. प्रत्येक देशाला संधी मिळाली तशी आपल्याला मिळाली. पण दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते ही युक्ती इकडे तंतोतंत लागू आहे. 

जी २० मधील प्रगत देशांची आपसात खूप भांडणे आहेत. अगदी अमेरिकेपासून ते भारतापर्यंत प्रत्येक देश वेगवेगळ्या पद्धतीने आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी झटतो आहे. कोरोना महामारी आणि आता सुरु असलेलं रशिया- युक्रेन युद्ध यामुळे जागतिक व्यापाराची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अश्या काळात जगातील प्रगत देशांच्या अर्थकरणाचे नेतृत्व भारताकडे येण्यामागे अनेक चाली खेळल्या गेल्या आहेत. जग सध्या स्थितंतरातून जात आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या एकाकडून दुसऱ्याकडे सरकत आहेत. वर्चस्वासाठी अनेक चाली रचल्या जात आहेत. एकीकडे अमेरिका आणि चीन यांच्यात एक प्रकारे सुप्त कुरघोडी सुरु आहेत तर दुसरीकडे अमेरिकेसह नाटो देश रशिया विरुद्ध उभे ठाकले आहेत. तर तिसरीकडे रशिया आणि चीन या सर्वांना उत्तर देण्यासाठी कधी नव्हते इतके जवळ आले आहेत. तिकडे जपान, पूर्व आशियायी देश आणि चीन साऊथ चायना समुद्रात युद्धजन्य स्थितीत एकमेकांसमोर उभे आहेत तर तिकडे उत्तर कोरिया एकावर एक मिसाईल सोडून आपण विनाशासाठी तयार असल्याचा संदेश जगाला देत आहे. 

जागतिक परिस्थिती इतकी हाताबाहेर जात असताना पण जागतिक मंचावर अतिशय सडेतोड आणि व्यापक अशी भूमिका गेले काही वर्ष मांडणाऱ्या भारताच्या विदेश नीती च जगभर कौतुक झालं आहे. एकीकडे आपलं मत हे कोणाच्या दबावाखाली न मांडता आणि त्याचवेळी कोणताही पक्षपात न करता स्वतःच हित साधून घेताना जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताच्या शब्दाला वजन आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता आलेलं जी २० समूहाचं नेतृत्व. सुरक्षा आणि विदेशनीती या दोन्ही मुद्यावर भारताने अतिशय दमदार मजल गाठली आहे. याला कारणीभूत आहेत पडद्यामागचे भारताचे दोन शिल्पकार जे अहोरात्र यासाठी पडद्यामागून काम करत आहेत. युक्रेन- रशिया मुद्दा असो वा भारत - अमेरिका संबंध, खनिज तेलाचा मुद्दा असो वा भारत चीन मधील तणाव असो पडद्यामागून भारताच्या प्रत्येक पावलाला जगातून समर्थन मिळवून देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या आहेत. याच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी रशियाचे प्रेसीडेंट पुतीन यांना उद्देशून म्हंटलेलं वाक्य जी २० च्या संयुक्त मसुद्यात (अहवालात) ४ थ्या क्रमांकावर लिहिलं गेलं आहे. इकडे लक्षात घेण्यासारखं म्हणजे याला जी २० च्या रशियासह सर्व देशांनी समर्थन दिलं आहे.  

या सर्व गोष्टी जरी समोर सहज वाटत असल्या तरी त्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी होत असतात. कोणत्याही दोन राष्टांचे राष्ट्राध्यक्ष असेच सहज भेटत नाहीत. त्यातली मित्रता, सहजता किंवा त्यातील अंतर किती ठेवायचं याचे सर्व आराखडे आणि बांधणी ही दोन्ही देशाच्या प्रतिनिधींकडून आधीच झालेली असते आणि त्याची माहिती मग राष्ट्रप्रमुखाला देण्यात येते. त्या नंतर आपण समोरच्या पासून किती अंतर राखायचं की गळ्यात गळे घालायचे हे ठरवलं जाते. नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेच्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांचा वावर हा किती आश्वासक आणि आत्मविश्वास दर्शवणारा होता हे त्यांची आणि त्यांना भेटलेल्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या देहबोलीवरून आपण बघू शकतो. या सर्वामागे भारताची उजळलेली प्रतिमा आणि वाढलेला दबदबा हा कारणीभूत असला तरी त्याची जाणीव योग्य प्रकारे करून देण्यात पडद्यामागे अनेक चक्र फिरवली गेली आहेत. याचे शिल्पकार आहेत भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवाल. 

जी २० च अध्यक्षपद म्हणून भारतात येत्या एका वर्षात जवळपास २०० बैठका वेगवेगळ्या समित्यांच्या होणार आहेत. ज्यात या २० देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. त्याचा भाग म्हणून भारताच्या अनेक भागात त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या बैठकांमधील काही बैठका या जम्मू आणि काश्मीर सह अरुणाचल प्रदेश मधे होतील असं भारताने स्पष्ट केलं आहे. हे दोन्ही भूभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर वादाचे भूभाग राहिलेले आहेत. एकावर पाकिस्तान आपला हक्क सांगतो तर दुसऱ्यावर चीन. पण दोघांच्या नाकावर टिच्चून जेव्हा इकडे जी २० समितीच्या बैठक होतील तेव्हा भारताने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतील. ज्या अर्थी जी २० च्या बैठका जर त्या भागात होऊ शकतात तर तो भाग भारताचा अधिकृत भाग आहे यावर शिक्कामोर्तब होते आणि त्याच सोबत जी २० देशाचे प्रतिनिधी तिकडे बैठक घेऊ शकतात तर सुरक्षिततेच्या दृष्टीने तो भाग सामान्य आहे असा मोठा संदेश जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळेच जागतिक मंचावर गेली अनेक दशके री ओढल्या जाणाऱ्या या मुद्यांवर भारताने जी २० देशांची मोहर बसवल्यात जमा आहे. 

जी २० च अध्यक्षपद मिळणं हे म्हणूनच अनेक अर्थाने भारतासाठी महत्वाचं असणार आहे. पुढील एक वर्ष अनेक बाबतीत भारताची भूमिका ठळक उठून दिसणार आहे. भारताने आपल्या या कालावधीसाठी जे ब्रिदवाक्य निवडलं आहे त्यात खूप काही स्पष्ट होते आहे,  

'वसुधैव कुटुम्बकम' 

''One Earth, One Family, One Future' 

प्रगत देश आणि प्रगतिशील देश यातला सगळ्यात मोठा दुवा म्हणून भारताकडे दोन्ही बाजूने बघितलं जात आहे. आज भारताची जी छबी तयार झाली आहे त्यामागे पडद्यामागून सुत्र हलवणाऱ्या भारताच्या दोन महत्वाच्या व्यक्तींचा खूप मोठा वाटा आहे. या दोन्ही व्यक्ती जगात देशप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा दरारा त्यांच्या कामामुळे आणि त्यातील प्रत्येक व्युव्हरचेनसाठी आहे. या दोन्ही व्यक्तींना भारताचे हुकमाचे एक्के मानलं जाते. त्यामुळेच आज भारताकडे जी २० सारख्या मोठ्या समूहाचं अध्यक्षपद आलेलं आहे. या व्यक्तींची योग्य जागी निवड करून भारताला जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच ही तितकं कौतुक आहे. 

येत्या एका वर्षात जी २० च्या निमित्ताने ज्या चाली या दोघांकडून पडद्यामागून खेळल्या जातील त्या निश्चित भारताला येत्या काळात एक महत्वाचं स्थान जागतिक मंचावर मिळवून देणार आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य  :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday, 17 November 2022

एका ताऱ्याचा जन्म... विनीत वर्तक ©

 एका ताऱ्याचा जन्म... विनीत वर्तक ©

सूर्य नसता तर अश्या आशयाचा विषय शाळेत मला अनेकदा निबंधासाठी यायचा. जेव्हा कधी या विषयावर लिहायला घ्यायचो तेव्हा तेव्हा भूत, वर्तमान आणि भविष्य सगळंच अंधकारमय व्हायचं. कारण सूर्याशिवाय आपण या सजीव सृष्टीची कल्पना करूच शकत नाही. पृथ्वी जरी आपलं घर असली तरी त्या घराचा कर्ता धर्ता हा सूर्यच आहे. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत ही सूर्याला खूप महत्वाचं स्थान आहे. सूर्यानेच आपल्या सौर मालेला आणि आपल्या पृथ्वीला जन्म दिला. त्यातून आज आपण इथवर आलेलो आहोत. पण या सूर्याला ही आयुष्य आहे. सूर्याला ही अंत आहे. हा अंत जरी खूप लांबवर असला तरी त्याच्या जन्माची कहाणी मात्र वैज्ञानिकांना नेहमीच कुतुहलात टाकत आलेली आहे. सूर्याची आणि एकूणच या विश्वात अस्तित्वात असणाऱ्या अनंत तार्यांची निर्मिती समजून घेणं हा विश्व समजून घेण्याच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा आहे. 

एखादा तारा जन्माला येतो म्हणजे नक्की काय होते? नक्की काय घडते की ज्याच्यामुळे त्यावर एक अणुभट्टी सुरु होते आणि त्यातून ऊर्जेचा अखंड स्रोत बाहेर पडत रहातो. जेव्हा हे तारे जन्माला येत असतात तेव्हा नक्की त्यांच्यात काय बदल घडून येतात. कश्या पद्धतीने त्यांच वस्तुमान इतकं प्रचंड वाढते आणि मुळात त्यांचा आकार, त्यांचा तेजस्वीपणा कसा काय प्राप्त होतो हे समजून घेणं अतिशय रोमांचकारी आहे. प्रत्यक्षात जेव्हा या घटना विश्वात घडताना टिपल्या जातात तेव्हा विश्वाच्या या स्वरूपाला आपण फक्त कुर्निसात करू शकतो. दोन दिवसांपूर्वी जेम्स वेब टेलिस्कोप ने अश्याच एका अदभूत नजाऱ्याला आपल्यात बंदिस्त केलं आहे. ज्यात एक नवीन तारा जन्माला येताना दिसतो आहे. 

L1527 नावाच्या एका धूळ आणि ढगांच्या साम्राज्यात हा तारा कवडसे धरतो आहे. अश्या ताऱ्याला 'प्रोटोस्टार' असं म्हणतात. तारा कसा जन्माला येतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं विज्ञान समजून घ्यावं लागेल. कोणालाही तारा बोलण्यासाठी त्यात आधी हायड्रोजन च रूपांतर हेलियम मधे होण्याची प्रक्रिया सुरु व्हावी लागते. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होते तेव्हाच त्याला 'तारा' असं म्हंटल जाते. त्याआधी त्याला प्रोटोस्टार असं म्हंटल जाते. धुळीच्या ढगांच्या साम्राज्यात गुरुत्वाकर्षणामुळे या गोष्टी जवळ ओढल्या जातात. एकमेकांभोवती घट्ट स्वरूपात जोडले जात असताना त्यांना गोलाकार आकार मिळत जातो. याला 'accretion' असं म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा हळूहळू वाढत जातो आणि हे गॅसेस तापू लागतात. त्यांच तापमान वाढायला सुरवात होते. यातून रेडिएशन विश्वात फेकलं जाते. पण जस जसं अधिक गॅसेस आणि धूळ यात गुंफत जाते तशी गुरुत्वाकर्षणाची शक्ती प्रचंड वाढत जाते. एकवेळ येते की यातून हे रेडिएशन ही बाहेर निघू शकत नाही. गुरुत्वाकर्षण आणि बंदिस्त झालेल रेडिएशन यामुळे त्याच तपमान प्रचंड वाढते. जेव्हा हे तापमान १० मिलियन डिग्री केल्विन (जवळपास ९९ लाख डिग्री सेल्सिअस) चा आकडा पार करते तेव्हा त्यातल्या हायड्रोजन च विखंडन होऊन हेलियम मधे रूपांतर होते. त्याच ताऱ्यात रूपांतर होते. ज्या प्रोटोस्टार मधील तपमान १० मिलियन डिग्री केल्विन (जवळपास ९९ लाख डिग्री सेल्सिअस) चा आकडा पार करत नाही त्याच रूपांतर ड्वार्फ ताऱ्यात होते. असे तारे आपल्या सूर्यापेक्षा लहान पण गुरु ग्रहापेक्षा मोठे असतात. कित्येक मिलियन वर्ष आपला प्रकाश देत राहतात.   

L1527 हा अजून ताऱ्यात रूपांतरित झालेला नाही. त्यात अजून हायड्रोजन च विखंडन सुरु झालेलं नाही. याच वय साधारण १ लाख वर्ष आहे जे की विश्वाच्या मानाने किना एखाद्या ताऱ्याच्या आयुष्याच्या मानाने अतिशय कमी आहे. अजूनही त्याचा आकार गोलाकार झालेला नाही. अजून त्याची तारा बनण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील धूळ आणि गॅस च वस्तुमान आपल्या सूर्याच्या मानाने २०%-४०% टक्के इतकं आहे. येत्या काळात सूर्यासारखा तारा बनण्याच्या दृष्टीने त्याचा प्रवास सुरु झालेला असेल. याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात ग्रहांची निर्मिती होण्याची प्रक्रिया पण सुरु झालेली आहे. ज्या प्रमाणे सूर्यासोबत आपली सौरमाला जन्माला आली त्याप्रमाणे उरलेल्या गॅसेस आणि धुळीतून ग्रह जन्माला येण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. 

खाली फोटोत जिकडे निळ्या रंगाचं अस्तित्व दिसते आहे तिकडे धुळीचं साम्राज्य कमी आहे. तर ऑरेंज आणि लाल रंग जिकडे दिसतो आहे तिकडे त्यांच साम्राज्य प्रचंड आहे. धूळ आणि गॅसेस निळ्या रंगाचा प्रकाश शोषून घेत असल्याने त्या भागात निळा रंग दिसून येत नाही. जेम्स वेब ने घेतलेला ही प्रतिमा यासाठी वेगळी आहे की ती फक्त आणि फक्त इन्फ्रारेड प्रकाशात दिसून येते. हा प्रकाश व्हिजिबल स्पेक्ट्रम मधे अजिबात दिसत नाही. त्यामुळे तारे निर्मिती किंवा जन्माची ही प्रक्रिया आत्तापर्यंत आपल्यापासून लपून राहिलेली होती. जेम्स वेब टेलिस्कोप वर असलेल्या निरी कॅम म्हणजेच Near-Infrared Camera (NIRCam) च्या मदतीने विश्वाचा हा अदभूत नजारा आपल्याला दिसू शकत आहे. एका ताऱ्याचा जन्म होताना बघणं वैज्ञानिकांसाठी एक पर्वणी आहे. कारण मुळात ज्या सूर्यामुळे आपलं अस्तित्व आहे. त्याच्या सारख्या ताऱ्यांचा जन्मसोहळा विश्वाच्या पटलावर बघणं नक्कीच माणसाच्या तांत्रिक क्षमतेचा अजून एक अविष्कार आहे. तूर्तास या अदभूत फोटोसाठी जेम्स वेब दुर्बिणीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिक, संशोधक यांना कडक सॅल्यूट. 

फोटो शोध सौजन्य :- नासा 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



गुन्हेगाराच्या मनातलं... विनीत वर्तक ©

 गुन्हेगाराच्या मनातलं... विनीत वर्तक ©

काही दिवसांपासून सोशल मिडिया, मिडिया आणि एकूणच संपूर्ण समाज घडलेल्या घटनेने सुन्न झाला आहे. या घडलेल्या घटनेचे अनेक पैलू अनेकांनी मांडले आहेत. त्याला धर्माचा, संस्करांचा, जातीचा, राजकीय प्रवृत्तीचा सगळ्याचा रंग लावून झाला आहे. नक्की काय घडलं, कसं घडलं किंवा एकूणच त्याचे संदर्भ काय लावायचे याचा अंदाज आणि मत अनेकांनी याआधीच मांडली आहेत. मला त्यात जायचं नाही. पण या घटनेच्या निमिताने एका वेगळ्या दृष्टिकोनातून मी विचार करतो आहे. अर्थात तो किती बरोबर अथवा चुकीचा किंवा किती लोकांना तो पटेल याबद्दल माझ्या मनात साशंका आहे. पण एकूणच वेगळ्या दृष्टिकोनातून प्रवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. 

वसईतल्या मुली सोबत दिल्ली मधे घडलेली घटना ही खून, अत्याचार, नातेसंबंध किंवा धर्मातील रितीरिवाज यापुरती मर्यादित नाही असं मला वाटते. कोणाचा तरी खून करणं अथवा बलात्कार कारण ही एक वाईट, पाशवी प्रवृत्ती असते. पण मला जी भिती वाटली ती त्या नंतर केलेल्या कृत्याची. ज्या थंड डोक्याने अमानुषतेची परिसीमा गाठली गेली, ते कुठेतरी विचलित करणारं आहे. किती थंड डोक्याने त्याने आपल्या प्रेयसीचे ३५ तुकडे केले. ते करत असताना त्याला काहीच वाटलं नसेल का? ते केल्यानंतर ते फ्रिज मधे ठेवणं त्या तुकड्यांची एकेक करत विल्हेवाट लावणं. हे करत असताना त्याच थंड डोक्याने वेगवेगळ्या स्त्रियांसोबत आनंदाचे क्षण अनुभवणं? हे कसं शक्य झालं असेल? हा प्रश्न मला विचलित करतो आहे. मुद्दा हा नाही को तो कोणत्या धर्माचा आहे? मुद्दा हा नाही की ती इतक्या त्रासानंतर त्याच्यासोबत का राहत होती? मुद्दा हा नाही की त्याने तिचा खून का केला? तर माझ्यामते मुद्दा हा आहे की इतकी अमानुषतेची पातळी गाठण्याची वृत्ती त्यात कशी काय निर्माण झाली? काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे अश्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या टोकाला जाताना आपण काय करत आहोत याचा विचार किंवा त्याबद्दल कोणताच पश्चाताप दिसून येत नाही. 

सर्वसामान्य माणसं याकडे धर्माच्या, संस्काराच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून बघतील पण या गोष्टी या थराचा गुन्हा करण्यास तितक्या कारणीभूत नसतात. शांत डोक्याने असे गुन्हे करण्यासाठी त्या गुन्हेगाराच्या आयुष्यात अश्या काही घटना घडाव्या लागतात ज्याचा त्याच्या आयुष्यावर विपरीत प्रभाव पडलेला असतो अथवा पडत असतो. अश्या गुन्हेगारांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचं इतक्या टोकाला जाताना पण त्याची झळ किंवा त्याबद्दल पश्चातापाची भावना गुन्हेगारात जागृत करत नाही. आपल्याला ऐकताना अंगावर शहारे येतात, डोळ्यातून टचकन पाणी बाहेर येते, रागाने आपण लालबुंद होतो. पण तो गुन्हा करणारा मात्र काही घडलं नाही अश्या अविर्भावात एक सामान्य आयुष्य जगू शकतो हीच सगळ्यात घातक प्रवृत्ती आहे असं मला वाटते. ती निर्माण होण्यासाठी अथवा रुजण्यासाठी ज्या घटना कारणीभूत आहेत त्याचा उपापोह झाला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटते. 

आपण जर त्या घटना रोखू शकलो तर असे गुन्हेगार तयार होण्यापासून रोखू शकतो. या प्रवृत्तीमागे अनेक कारण असतील. अगदी रोज टी.व्ही. वर सुरु असणाऱ्या क्राईम पेट्रोल, डेक्स्टर सारख्या मालिका ते स्त्रीकडे वस्तू म्हणून बघण्याचा भोगी दृष्टिकोन. पण त्या पलीकडे आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करताना त्याबद्दल कोणत्याच प्रकारच्या संवेदना निर्माण न होणं ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. यालाच वैज्ञानिक भाषेत 'बिहेव्हिअर सायन्स' असं म्हणतात. या विज्ञानाच्या शाखेत अनेक उपप्रकार आहेत जसे की मानसशास्त्र, मानसवंशशास्त्र , संज्ञात्मक विज्ञान ज्यात मानवाच्या वर्तणूक, विचार, प्रेरणा, सामाजिक प्रभाव, संदर्भ प्रभाव आणि सवयी यासारख्या घटकांच्या प्रभावाचे प्रायोगिकपणे परीक्षण करून विशिष्ट वर्तनात कधी आणि का गुंततात याचा अभ्यास केला जातो. मला वाटते की यातील तज्ञ लोकांनी या घटनेचा वरच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. कारण जर यातून नेमकं कारण कळलं तर अश्या पद्धतीच्या घटना पुढे टाळता येतील. 

एखाद्या घटनेला कोणी कोणता मुलामा द्यायचा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. मी याकडे धर्म, राजकारण, संस्कृती या चष्म्यातून न बघता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो आहे. याचा अर्थ बाकीचे दृष्टीकोन चुकीचे आहेत, त्यांचा संबंध नाही असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण मला यापेक्षा घटनेच्या मुळाशी नक्की काय घडलं आहे ते जाणून घेण्यात स्वारस्य आहे. कारण ही घटना अनेक अर्थाने वेगळी आहे. सध्या ज्या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिलं जात आहे त्यातून काही निष्पन्न होईल असं मला तरी दिसत  नाही. कुठेतरी काहीतरी या गुन्हेगाराच्या बाबतीत वेगळं घडलं आहे ज्यामुळे इतक्या टोकाचा विचार आणि इतक्या टोकाची प्रवृत्ती ज्यात सारासार विचार करण्याची बुद्धी पण तो हरवून बसला असं मला तरी निश्चित वाटते. अर्थात हे माझे विचार आहेत. सर्वांनी पटवून घ्यावेत असा माझा अट्टाहास नाही.  

तळटीप :- या पोस्टवर धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कमेंट करू नयेत ही नम्र विनंती. माझ्या पोस्टचा आशय वेगळा आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा अथवा कोणालाही गुन्हेगार ठरवण्याचा यात उद्देश नाही. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 14 November 2022

अमेरिकेची तुटणारी स्वप्न... विनीत वर्तक ©

अमेरिकेची तुटणारी स्वप्न... विनीत वर्तक ©

गेल्या महिनाभरात झालेल्या घटनांचा आढावा घेतला तर एकट्या अमेरिकेत आय. टी. इंडस्ट्री मधे जवळपास ६०,००० पेक्षा जास्त लोकांना पिंक स्लीप म्हणजेच नोकरीतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. यात छोट्या मोठ्या सर्व कंपन्या समाविष्ट आहेत. ट्विटर, मेटा, यांच्या रांगेत आता अमेझॉन उभी आहे. या शिवाय इतर अनेक उद्योग समूह आपल्या उद्योगाची पुनर्रचना करत आहेत. अर्थात हे एक सायकल आहे जे कोणत्याही उद्योग समूहाचा भाग असते. पण या निमित्ताने अमेरिकेची तुटणारी स्वप्न सगळीकडे वास्तवाची जाणिव करुन देत आहेत. त्याची धग आज आपल्या पर्यंत पोहचते आहे. 

उच्च शिक्षण, डॉलर मधला पगार, स्वप्नवत जीवनशैली या सर्वांचा प्रभाव आपल्या पिढीवर पडला नसेल किंवा त्याची भुरळ आपल्याला पडली नसेल असं क्वचित कोणी असेल. पण त्या मागे लपलेल्या वास्तवावर मात्र कोणी चकार शब्द बोलत नाही. एकतर अश्या गोष्टींना कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून लेबल लावण्यात येते किंवा पोळलेले आपलं झालेलं नुकसान किंवा दुःख सगळ्यांन समोर मांडायला कचरत असतात. 

आयुष्यभर एकेक पैसे जोडत एका पिढीने आयुष्याची एक वरची पातळी गाठली. आपल्याला जे कष्ट करावे लागले ते आपल्या मुलांना करावे लागू नयेत म्हणून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याच्या दृष्टीने त्या पिढीने आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यातून सुरू झाला मग अमेरिकेच्या स्वप्नांचा प्रवास. भारतात गुणवत्तेला न्याय मिळत नाही या लेबलखाली अमेरिकेत जाण्यासाठी आयत कारण समोर होतं. अनेक अंशी ते आज खरही आहे. पण प्रत्येकाची तितकी गुणवत्ता असते का? या प्रश्नाकडे मात्र कोणीच डोळसपणे बघत नाही. 

आधी स्वप्नपूर्तीसाठी सुरू झालेला अमेरिकेचा प्रवास आज चढाओढीत रूपांतरित झालेला आहे. त्याचा किंवा तिचा मुलगा / मुलगी अमेरिकेला गेली मग माझी का नाही? हीच ती चढाओढ. त्यासाठी गुणवत्ता, आर्थिक निकष आणि गरज या गोष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त विदेशात शिक्षण घेण्याचा अट्टाहास आता स्टेटस सिम्बॉल बनला आहे. पण यासाठी आपण काय पणाला लावतो आहे याचा विचार करण्याची गरज ही भासत नाही. 

अमेरिकेत शिक्षण घेणं आर्थिक दृष्ट्या खूप खर्चिक आहे. आर्थिक क्षमता येण्यासाठी मग कर्जाचा आधार. मग कसंही करून अमेरिका गाठून, वाट्टेल तसं राहून शिक्षण घ्यायचं. पण खरी सुरुवात तिकडे होते जेव्हा त्या स्वप्नांचं खर स्वरूप समोर येते. जेव्हा एच.वन. बी. व्हिसा साठी नोकरीचा शोध सुरू होतो. जेव्हा योग्य परतावा देणारी नोकरी मिळत नाही तेव्हा स्वप्नांचे इमले तुटायला लागतात. नोकरी जरी मिळाली तरी ती कितपत टिकेल हे कोणीच सांगू शकत नाही. गेल्या महिन्याभरात ज्या पद्धतीने चांगल्या कंपन्यांमध्ये कामगार कपात केली जात आहे. त्याने अमेरिकेच्या स्वप्नांना चांगलाच सुरुंग लागलेला आहे. गेल्या काही आठवड्यापासून लींकडीन सारख्या साईटवर नोकरीसाठी सर्वच वणवण करत आहेत. कारण ६ महिन्यात दुसरी नोकरी मिळाली नाही तर अमेरिकेतून हकालपट्टी होण्याच्या मार्गावर हे सगळेच आहेत. 

जिकडे नवीन नोकऱ्या नाहीत आणि जिकडे सध्या असलेल्या लोकांना संधी नाही तिकडे दरवर्षी करोडो रुपये खर्चून अमेरिकेत शिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणाऱ्या नवीन स्वप्नांना कोणती संधी मिळणार आहे? याचा विचार करण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. गुणवत्ता आणि अमेरिकन शिक्षणाचा दर्जा किंवा तिकडे उपलब्ध होणाऱ्या संधी याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. निश्चित भारतापेक्षा या गोष्टी तिकडे चांगल्या प्रमाणात आहेत. पण या सर्व गोष्टींसाठी आपण किंवा आपला मुलगा / मुलगी कितपत पात्र आहे याचा अंदाज आणि अभ्यास करण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. 

अमेरिकेचं शिक्षण हे स्टेटस सिम्बॉल म्हणून आहे की खरोखर गुणवत्तेच्या जोरावर आहे. याचा वेध घेण्याची गरज आहे. सर्व साधारणपणे दोन वर्षाच्या अमेरिकन शिक्षणाचा खर्च ५० लाखांपेक्षा जास्त जातो. जर समजा त्याच पातळीच शिक्षण भारतात घेतलं तर ते अर्ध्यापेक्षा कमी पैशात होतं. मग तेच उरलेले २५ लाख अडचणीच्या वेळी आपला आधार किंवा एका नवीन उद्योगाची पायाभरणी करण्यात गुंतवले जाऊ शकतात हे सरळ साधं गणित आपण कधी सोडविणार आहोत. कोणाला दाखवण्यासाठी, नातेवाईक आणि मित्र मंडळीत मोठेपणा करण्यासाठी आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवत असाल तर आपण केवढी मोठी रिस्क घेतो आहोत याचा विचार करा. 

या वर्षीच्या अमेरिकन व्हिसा च्या सर्व बुकिंग संपल्यात. त्यासाठी भली मोठी वेटींग लिस्ट आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात अमेरिकेत शिक्षण घेण्याचं वेड पसरते आहे. ते योग्य का अयोग्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. कारण त्याच्या दोन्ही बाजू आहेत. आपण कोणत्या बाजूला आहोत ह्याच गणित प्रत्येकाने आपल्या पद्धतीने करायचं आहे. 

अमेरिकेचं शिक्षण, नोकरी किंवा राहणीमान याची भुरळ पडणं यात काही गैर नाही. स्वप्न बघणं पण चुकीचं नाही. पण सगळं कळत असून सुद्धा आपली ऐपत नसताना, आपली गुणवत्ता नसताना डोळे बंद करून त्यात उडी मारणं हे मूर्खपणाच लक्षण आहे. तेव्हा सजग होऊन निर्णय घ्या हीच सर्वांना विनंती. आयुष्यात पैसा सगळं काही नसला तरी पैसा सर्वाकडे लागतो हे वास्तव आहे. त्यामुळे आपण या सर्वात कुठे याचा अंदाज घेऊन पाऊल पुढे टाका. अमेरिकेची तुटणारी स्वप्न प्रत्यक्षात आपल्या आयुष्याला उध्वस्त करू शकतात.

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Thursday, 3 November 2022

एका डिफेन्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका डिफेन्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की, एखादं युद्ध जगाचा नकाशा बदलू शकतं आणि ते अनेक अर्थाने खरं ही आहे. आजवरच्या इतिहासात आपण दोन महायुद्ध अनुभवलेली आहेत. भारतावर अनेकवेळा परकीय आक्रमण होत आलीच आहेत. आत्ताचा काळ ही काही वेगळा नाही. १९९९ साली भारताला कारगिल युद्धाचा चटका लागलाच. पण अनेकवेळा युद्ध तुमच्यातले कच्चे दुवे पण आपल्याला दाखवून जातात. हीच वेळ असते जेव्हा आपण आपल्यातील त्या कच्या दुव्यांवर काम करायचं असते. कारगिल युद्धातुन भारताच्या अनेक बाजू उघड्या पडल्या. त्यातील एक बाजू म्हणजे शत्रूने आपल्यावर मिसाईल ने हल्ला केला तर तो थोपवण्याची ताकद आपली आहे का? याच उत्तर ठळकपणे नाही असं होतं. तेव्हा मग अश्या कोणत्याही मिसाईल हल्यापासून वाचवण्यासाठी डिफेन्स यंत्रणा बनवण्याची योजना आखली गेली. २००० साली वाजपेयी सरकारच्या काळात या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात आलं. ज्याचं नाव होतं 'Indian Ballistic Missile Defence Program'.

पाकिस्तान आणि चीन असे दोन अणवस्त्रधारी शत्रू देश भारताच्या सरहद्दीवर दोन्ही बाजूने सज्ज असताना त्यांच्या मिसाईल हल्याला निष्प्रभ करण्यासाठी भारताला एका मिसाईल डिफेन्स प्रणाली ची गरज ओळखून भारताने द्वि स्तरीय मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यक्रम हाती घेतला. यातला पहिला स्तर म्हणजे Prithvi Air Defence (PAD) missile. ही डिफेन्स प्रणाली अतिउंचीवरून भारताच्या दिशेने येणाऱ्या मिसाईल चा मागोवा घेत त्याचा खात्मा करते. याची क्षमता ५० किलोमीटर ते ८० किलोमीटर उंचीवरील कोणत्याही मिसाईल ला रोखण्याची आहे. तर दुसरी आहे Advanced Air Defence (AAD) Missile ही डिफेन्स प्रणाली ३० किलोमीटर च्या आतील भारताकडे झेपावणाऱ्या मिसाईल चा खात्मा करू शकते. भारताने आधीच PAD ही प्रणाली कार्यांवित केली आहे. आता भारत वेगाने (AAD) वर काम करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो आहे. त्याचा भाग म्हणून भारताने बुधवारी यातील AD-1 या मिसाईल ची यशस्वी चाचणी घेतली. 

AD-1 हे एक लांब पल्ल्याचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे जे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विमानांच्या कमी एक्सो-वातावरण आणि एंडो-वातावरणाच्या इंटरसेप्शनसाठी डिझाइन केलेले आहे. हे दोन-स्टेज सॉलिड मोटरद्वारे चालविले जाते आणि मिसाईल ला लक्ष्यापर्यंत अचूकपणे मार्गदर्शन करण्यासाठी स्वदेशी विकसित प्रगत नियंत्रण प्रणाली, नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन अल्गोरिदमने सुसज्ज करण्यात आलेलं आहे. या चाचणीत सर्व मिसाईलच्या उप-प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आणि फ्लाइट डेटा कॅप्चर करण्यासाठी तैनात केलेल्या रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग स्टेशन्ससह अनेक इतर सेन्सर्सद्वारे कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे हे प्रमाणित केलं गेलं की ही चाचणी १००% यशस्वी झालेली आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेत यामुळे अजून वाढ झालेली आहे. 

भारत जगातील मोजक्या ६ देशांपैकी एक देश आहे ज्याच्याकडे स्वतःची मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यरत आहे. तसेच भारत जगातील ४ देशांपैकी (अमेरिका, रशिया, चीन हे इतर तीन देश) ज्याच्याकडे उपग्रह हल्ला निष्प्रभ करण्याचं मिसाईल डिफेन्स तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारत जगातील असा एकमेव देश आहे ज्याच्याकडे स्वतःच्या मिसाईल डिफेन्स प्रणाली सोबत जगातील सगळ्यात प्रगत पहिल्या दहा मिसाईल डिफेन्स प्रणालीतील दोन मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यरत आहेत. ज्यात भारत - इस्राईल संयुक्तरित्या विकसित केलेली बराक - ८ आणि जगातील सर्वोत्तम मिसाईल डिफेन्स प्रणाली एस ४०० यांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रणाली च स्वतःच असं कार्यक्षेत्र आहे. भारत अश्या वेगवेगळ्या मिसाईल डिफेन्स प्रणाली एकमेकात मिसळून स्वतःभोवती एक अभेद्य संरक्षण कवच निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगाने पुढे जातो आहे. 

रशियाने उपग्रहाला मारता येईल अश्या पद्धतीची मिसाईल डिफेन्स प्रणाली एस ५०० निर्माण केली आहे. ज्याच्या चाचण्या सुरु आहेत. रशियाने ही प्रणाली जगात फक्त भारतासाठी उपलब्ध केली आहे. सप्टेंबर २०२१ मधे रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह म्हणाले होते की,  "भारत एस ५०० विकत घेणारा एक संभाव्य देश असू शकतो". येत्या काही वर्षात भारत कदाचित एस ५०० मिसाईल डिफेन्स प्रणाली विकत घेण्याचा करार रशियासोबत करण्याची दाट शक्यता आहे. एस ५०० प्रणाली हायपरसॉनिक मिसाईल ला सुद्धा निष्प्रभ करण्यास सक्षम असल्याने चीन वर अंकुश ठेवण्यासाठी भारत याचा विचार करत आहे. 

ऑफेन्सिव्ह डिफेन्स हाच सुरक्षित राहण्याचा कलियुगातील मंत्र आहे. भारताने कधी कोणत्या देशावर हल्ला केला नाही पण भारतावर होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने मिसाईल डिफेन्स प्रणालीत लवकरात लवकर आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. २ नोव्हेंबर रोजी झालेली AD-1 या मिसाईल च्या यशस्वी चाचणीने भारताने एक दमदार पाऊल पुढे टाकलं आहे. या चाचणीमागे असणाऱ्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कामगार, आणि अनेक छोटे मोठे उद्योग ज्यांनी याच्या निर्मितीत आपलं योगदान दिलं आहे त्यांना कडक सॅल्यूट.     

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.