Friday, 24 May 2019

एवरेस्ट चा बाजार... विनीत वर्तक ©

एवरेस्ट चा बाजार... विनीत वर्तक ©

जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एवरेस्ट ज्याची उंची ८८४८ मीटर (२९,०२९ फुट) आहे. त्यावर चढाई करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाच स्वप्न राहिलेलं आहे. १९५३ ला सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे ह्यांनी पहिल्यांदा एवरेस्ट ला गवसणी घातली. त्यानंतर अनेकांनी ह्या उंच शिखराला सर केलं आहे. आजवर ४००० पेक्षा जास्ती गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच असं एवरेस्ट शिखर सर केलं आहे. एकेकाळी मानवाच्या उत्तुंग स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी केलेली चढाई आता एक बिझनेस म्हणून नावारूपाला येत आहे. ह्या बिझनेस मध्ये ठराविक काळात जास्तीत जास्त गिऱ्हाईक शिखरावर नेण्याच्या नादात एवरेस्ट वर सध्या माणसांची गर्दी झाली आहे. ही गर्दी इतकी जास्त आहे की ह्यात काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नुकतेच मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी ह्यांना एवरेस्टवर झालेल्या गर्दीमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

जगातील सगळ्यात उंच असणार शिखर सर करण्याची इच्छा सगळ्यांच्या मनात असते. पण नुसत्या इच्छेने शिखरे सर होतं नसतात. समुद्रसपाटी पासून तब्बल ८००० मीटरपेक्षा जास्त उंची गाठताना निसर्गात अनेक बदल घडतात. वातावरण, तपमान, हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन च प्रमाण खूप अत्यल्प होते ह्यामुळे ८००० मीटर वरील ह्या भागाला डेथ झोन असं म्हंटल जाते. समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब हा जवळपास १०१३.२५ मिलिबार ( १४.६९६ पी.एस.आय. ) असतो. पण हेच प्रमाण अति उंचीवर डेथ झोन मध्ये ३५६ मिलिबार ( ५.१६ पी.एस.आय.) इतकं खाली येते. शरीराला लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजन ची पातळी कमी असल्याने शरीराला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर शरीराच नियंत्रण बिघडून मृत्यू ओढवायला वेळ लागत नाही.

एवरेस्ट वर जाण्याचा खर्च जवळपास १ ते १.५ कोटी रुपयांच्या आसपास येतो. नेपाळ सरकार प्रत्येक गिर्यारोहका कडून ११ हजार अमेरिकन डॉलर एवरेस्ट चढाईसाठी घेते. ह्या शिवाय शेर्पा, ऑक्सिजन नळकांडी, कपडे आणि इतर खर्च बघता अश्या मोहिमेचा खर्च जवळपास ५० ते ७० हजार अमेरिकन डॉलर च्या घरात जातो. इतके पैसे खर्च करूनही मोहीम सफल होण्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण कोणत्या वेळी कोणाला काय होईल ह्याचा अंदाज बांधण तितकचं कठीण आहे. नेपाळ सरकारसाठी एवरेस्ट सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे तर तिथे राहणाऱ्या शेर्पांसाठी भाकरीचा अर्धा तुकडा. वर्षातून काही दिवस होणाऱ्या मोहिमेतून प्रत्येक शेर्पा जवळपास २ हजार ते ५ हजार डॉलर कमवत असतो. ह्या शिवाय पैसे असणाऱ्या सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या गिर्यारोहण संस्था. एक-दोन अपवाद वगळता एवरेस्ट मोहीमेच मार्केटिंग करून बक्कळ पैसे कमावणाऱ्या अनेक संस्था उघडल्या आहेत हे अनेक गिर्यारोहक ही उघडपणे मान्य करतात.

आज ज्यांची १ ते २ कोटी रुपये मोजायची तयारी आहे त्या सर्वाना एवरेस्ट शिखरावर नेण्याचं आमिष अनेक संस्थान कडून दाखवलं जाते. अनेकांना एवरेस्ट सर करण्यासाठी सह्याद्री मध्ये केलेलं दोन- चार किल्यांवरचं गिर्यारोहण पुरेस वाटते. त्यातला त्यात एखादा हिमालयाच्या शिखरावर केलेला ट्रेक म्हणजे चेरी ऑन टॉप. अजून काय हवं पैसे मोजा चला एवरेस्टवर. गिर्यारोहण आपल्याकडे साहसी खेळ म्हणून माहित असला तरी त्याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागते ह्याची माहिती थोड्यांना आहे. एक वर्षाचे कोर्सेस ह्यासाठी शिकावे लागतात. ज्यात खडतर प्रशिक्षण आणि आपल्या शारीरिक, मानसिक शक्तीचा कस लागतो. त्यातून तालावून सुखावून बाहेर पडल्यावर आपण हिमालयातील अश्या एखाद्या मोहिमांचा विचार करायला हवा. जर आपण ह्या अग्निदिव्यातून बाहेर पडू शकत नसू तर इतर अनेक शिखरे किंवा डोंगर रांगा आपण पार करूच शकतो ज्याला अगदी साधं गिर्यारोहणाच शिक्षण पुरेसं असते.

एवरेस्ट चा बाजार असा बनवला गेला आहे की तुम्ही फक्त पैसे मोजले की तुम्ही एवरेस्ट सर करू शकता हा आत्मविश्वास देण्याइतपत आज हा बाजार गेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर लावलं म्हणजे आपण किती उंचीवर चढाई करू शकतो हा फाजील आत्मविश्वास अनेकांना मृत्युच्या दाढेत नेतं आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी २०० जणांनी एवरेस्ट च्या शिखरावर एकदम चढाई केली. ज्याचा परिणाम म्हणजे ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यात ४ भारतीय आहेत. योग्य नियोजन केलं असते तर कदाचित हे प्राण वाचवता आले असते. ह्या २०० लोकांपेकी किती जणांनी गिर्यारोहणाच शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं असेल ह्याचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच गिर्यारोहक असतील. म्हणजेच कोणतही शिक्षण न घेता फक्त स्वप्न आणि पैश्याच्या जोरावर बाजारात ओढली गेलेली बाकीची मंडळी आहेत.

एवरेस्ट सर करण हे स्वप्न असण ह्यात चुकीच काहीच नाही. पण ते पूर्ण करण्यासाठी निवडलेला रस्ता मात्र निश्चित चुकीचा आहे. एवरेस्ट हे एकमेव शिखर नाही. गिर्यारोहणाचा आनंद काय सह्याद्री मधल्या शिखरांवर येत नाही? की हिमालयातील इतर शिखरांवर जे सहज सर करता येण्याजोगे आहेत त्यांच्यावर येतं नाही? एवरेस्ट सर करण्याच स्वप्न नक्कीच बघावं पण ते पूर्ण करण्यासाठी आपण योग्य प्रशिक्षण, आपली मानसिक- शारीरिक क्षमता, आपलं वय तसेच अतिउंचीवर आपलं शरीर आपल्याला साथ देऊ शकते का ह्याचा अभ्यास केल्याशिवाय जाण म्हणजे एवरेस्ट च्या बाजारातील एक गिऱ्हाईक बनणं.

एवरेस्ट वर होणारी माणसांची गर्दी पुढे कदाचित एवरेस्ट मोहिमांच अस्तित्व धोक्यात आणत आहे. एवरेस्ट वर मृत्युमुखी पडलेल्या लोकांना खाली आणणं पण शक्य नसते त्यामुळे अनेक लोकांची प्रेत अजूनही तशीच पडलेली आहेत. ग्रीन बुट्स नावच एका गिर्यारोहकाच प्रेत असचं प्रसिद्ध आहे. ह्याशिवाय ऑक्सिजन ची रिकामी नळकांडी, इतर कचरा इथलं वातावरण अजून दुषित करत आहे. एवरेस्ट शिखर नाही तर अशी अनेक शिखर आज ह्या बाजाराच्या विळख्यात सापडली आहेत.

आयुष्याच्या उत्तरार्धात पैसा, मानसन्मान कमावून झाल्यावर काहीतरी तुफानी करण्यासाठी आज अनेकजण तयार होतं आहेत. पण गिर्यारोहण म्हणजे समाजसेवा नव्हे की आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर आपण ती सुरु करू शकतो. गिर्यारोहण हे एक शास्त्र आहे ज्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करावा लागतो. तसेच अभ्यास केल्यावर पास होण्याची कोणतीही खात्री देता येतं नाही. तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणून लगेच बोर्डाच्या परीक्षेला बसण्याआधी चाचणी, सामही तसेच प्रिलीम च्या परीक्षा दिल्यावर त्यातून योग्य ते चिंतन केल्यावर बोर्डाच्या म्हणजेच एवरेस्ट च्या परीक्षेचा विचार करावा. कारण ह्यात नापास म्हणजे मृत्यूशी गाठ. एवरेस्ट च्या बाजारात अडकून न घेता आणि एवरेस्ट हेच अंतिम लक्ष्य न ठरवता गिर्यारोहण शास्त्रोक्त पद्धतीने शिकून एक चांगला / चांगली गिर्यारोहक होण्याचा प्रयत्न आपल्याला एवरेस्ट सारख्या अनेक शिखरांची सफर घडवून आणेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

Wednesday, 15 May 2019

इतिहासाला जागवणारं कोकण... विनीत वर्तक ©

इतिहासाला जागवणारं कोकण... विनीत वर्तक ©

“येवा कोकण आपलचं असो” असं म्हणत पर्यटकांना आकर्षित करणार कोकण सध्या त्याच्या प्रसिद्ध अश्या रत्नागिरी ( देवगड ) हापूससाठी ह्या उन्हाळ्यात चर्चेत नसून जगाच्या पातळीवर कोकणच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कोकण प्रांताला मिळालेल्या सह्याद्रीच्या वरदहस्तावर इतिहासात लुप्त झालेल्या भारतीय संस्कृतीचे जवळपास १०,००० ते ४०,००० हजार वर्ष जुने दाखले सापडले आहेत. हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्ती दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे. (विनीत वर्तक ©)

ह्या दगडी चित्रांन मध्ये प्रामुख्याने प्राणी जिवन, शिकार, देवांची चित्रे आहेत. प्राण्यानमध्ये हरीण, मासे, कासव, वाघ, हत्ती ह्यांचा समावेश आहे. ह्या चित्रांसोबत काही नक्षीकाम ही मिळालं आहे. जगभरात माणसाच्या पूर्व संस्कृतीचे दाखले देणारी अनेक भित्तीचित्र किंवा दगडावर कोरलेली चित्र आढळून येतात. कोकणात मिळालेली दगडी चित्र मात्र ह्याला अपवाद आहेत कारण सामान्यतः अशी चित्रे उभ्या भिंतीवर, दगडावर आढळून येतात पण कोकणातली चित्रे मात्र सपाट दगडावर कोरण्यात आली आहेत. ह्यामुळे ती खूप दुर्मिळ आहेत. काही दगडी चित्रे तर प्राणांच्या मूळ आकाराएवढी मोठी काढण्यात आलेली आहेत. तसेच त्यात त्यांचा आकार ते त्याचं लिंग हे आज जवळपास १०,००० हजार पेक्षा जास्ती वर्षांनी आपण बघू आणि ओळखू शकतो. इतके वर्ष निसर्गाच्या सगळ्या प्रवासाला पुरून उरत आजही ही दगडी चित्र स्पष्टपणे त्या काळच्या संस्कृतीचे दाखले आपल्या पर्यंत पोहचवत आहेत. (विनीत वर्तक ©)

ह्या दगडी चित्रे काहीतरी उद्देश ठेवून काढली आहेत. ह्यावरून नक्कीच स्पष्ट होते की कोकणात तब्बल १०,००० हजार ते ४०,००० हजार वर्षापूर्वी एक संस्कृती नांदत होती. ज्या कोकणाचा आपण केलिफोर्निया करायला निघालो आहोत ते कोकण त्या केलिफोर्नियाचा शोध लागायच्या आधीपासून माणसाला आपल्याकडे आकर्षून घेतं आलेलं आहे. माझ्या मते इजिप्त मधील पिऱ्यामिड ला जेवढं महत्व त्यांच्या संस्कृतीत आहे तितकीच महत्वाची ही दगडीचित्र आपल्या संस्कृतीसाठी असायला हवीत. काळाच्या ओघात आलेल्या सात बारा आणि मालकी हक्कामुळे ज्या जागेवर ही दगडी चित्र आहेत त्या जागा लोकांच्या मालकीच्या आहेत. इतकंच काय ह्याचा शोध लागल्यावर त्याची दखल घेण्याची पात्रता ही आपल्याकडे नाही. आजही ह्या चित्रांबद्दल अपुरी माहिती उपलब्ध आहे. रत्नागिरी टुरिझम च्या साईटवर ह्याची चित्र उपलब्ध असली तरी त्या ठिकाणी कसे जायचे ह्याची जास्ती माहिती उपलब्ध नाही. ह्यासाठी आजही तिथल्या स्थानिक लोकांचा आधार घ्यावा लागतो ही आपली शोकांतिका आहे. (विनीत वर्तक ©)

रत्नागिरी इकडे असलेल्या एका जागी ज्याचं नाव देवचे गोठणे असं आहे तिकडे असचं एक दगडी चित्र असून त्या चित्रावर कोणतही होकायंत्र काम करत नाही. होकायंत्र अश्या तऱ्हेने चुकीच दिशादर्शक करण्यात महत्वाची भूमिका हे तिकडे असलेलं चुंबकीय क्षेत्र अनेकदा कारणीभूत असते. पण त्याकाळी अश्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे अथवा त्याचा प्रभाव ह्या ठिकाणी पडतो ह्याची जाणीव कशी झाली असेल? कारण त्याच ठिकाणी एक दगडी चित्र कोरलेलं आहे. जर विचार केला तर चुंबकीय क्षेत्र त्याचा होणारा प्रभाव वगरे गोष्टी ज्ञात त्याकाळी असाव्यात कारण ते माहित असल्याशिवाय त्याच ठिकाणी अशी चित्रे का कोरली असावीत? अर्थात ह्या जर तर चा शोध अजून सुरु आहे. (विनीत वर्तक ©)

कोकणातल्या ह्या दगडी चित्रांवर अजून संशोधन होणं गरजेचं आहे. पण ९९%-१००% च्या शर्यतीत जुंपलेली पिढी ह्याचा अभ्यास करू शकेल का? ह्या बद्दल मन मात्र सांशक आहे. जगाचा इतिहास शिकून तो बदलवायला निघालेली पिढी आपल्याच इतिहासाबद्दल किती उदासीन आहे ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जगातील इतिहास दाखवणाऱ्या जागांबद्दल सजग असलेला भारतीय मात्र स्वतःच्या संस्कृतीने उभारलेल्या आणि मागे सोडलेल्या खुणांच्या बाबतीत तितकाच निष्क्रिय आहे. आयफेल टॉवर च्या समोर असो वा पिसा च्या कललेल्या मनोऱ्या समोर उभा राहून सेल्फी घेणारा भारतीय मात्र वेरुळच्या कैलास लेण्या समोर किंवा कंबोडिया इथल्या अंगकोर वाट च्या समोर सेल्फी घेण्यात तितकाच उदासीन असतो हे टोचणार पण सत्य आहे. त्यामुळे कोकणातल्या ह्या ठेव्याची दखल बी.बी.सी. ते न्यूयॉर्क टाईम्स ने घेतल्यावर पण भारतातल्या सजग मिडीयाला ह्यावर काही लिहावसं वाटलं नाही ह्यातच सगळ आलं. (विनीत वर्तक ©)

दोन मराठी माणसांनी आपल्या भूमीवर एकेकाळी नांदणाऱ्या संस्कृतीच्या खुणा शोधण्यात मोलाची भूमिका बजावली आहे ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. आज ह्या ठेव्याला सरकार ते स्थानिक अश्या सगळ्याच पातळीवर जपून तो समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करण्याची गरज आहे. ह्या शोधाच्या मागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम. आपलं कोकण हे इतिहास जागवणारा एक महत्वाचा दुवा आहे हे पुन्हा एकदा ह्या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झालं आहे.

माहिती स्रोत:- बी.बी.सी., न्यूयॉर्क टाईम्स

फोटो स्रोत:- गुगल, न्यूयॉर्क टाईम्स

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Wednesday, 8 May 2019

आय.एन.एस. वेला पाणबुडी... विनीत वर्तक ©

आय.एन.एस. वेला पाणबुडी... विनीत वर्तक ©

भारताला लाभलेल्या ७५१६ किलोमीटर लांबीच्या सागरी हद्दीच शत्रू राष्ट्रापासून संरक्षण तसेच सागरी मार्गातून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल नेहमीच तत्पर असते. चीन चा हिंद महासागरातला प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय नौदलला अत्याधुनिक बोटींची गरज भासत आहे. भारतीय नौदलला पाणबुडींची प्रचंड कमतरता जाणवत आहे. २४ पाणबुडींची गरज असताना भारताकडे फक्त १३ पाणबुड्या आहेत. ह्यातल्या अनेक आयुष्याच्या शेवटच्या टप्यात आहेत. त्यामुळे ही कमी भरून काढण्यासाठी भारतीय नौदलला पाणबुडींची गरज होती. त्यासाठी नौदलाने फ्रांस च्या डी.सी.एन.एस. सोबत प्रोजेक्ट ७५ हा करार केला. ह्या करारा प्रमाणे २०१५ - २०१६ पर्यंत ६ स्कॉरपियन श्रेणी मधील पाणबुड्या तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारताच्या माझगाव डॉक इकडे बनवून बह्र्तीय नौदलाला देणं अपेक्षित होतं. पण अनेक कारणांनी उशीर झालेल्या ह्या प्रोजेक्ट वर काम सुरु होऊन त्यातली चौथी पाणबुडी आय.एन.एस. वेला ६ मे २०१९ ला पाण्यात दाखल झाली.

प्रोजेक्ट ७५ च्या अंतर्गत ६ पाणबुड्या बनवण्यासाठी १८,७९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता जो प्रोजेक्ट ला उशीर झाल्याने वाढून २३,५६२ कोटी च्या घरात गेला आहे. ह्या ६ पाणबुड्या २०२१ पर्यंत देशाच्या रक्षणासाठी भारतीय नौदलात दाखल होतील असा अंदाज आहे. ह्यातली आय.एन.एस. कलावरी भारतीय नौदलात १४ डिसेंबर २०१७ ला समाविष्ट झाली तर आय.एन.एस. खांदेरी आणि करंज ह्या दोन्ही पाणबुड्यांच्या सागरी चाचण्या सुरु असून त्या २०१९ ला भारतीय नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. आय.एन.एस. वेला ही ह्या ताफ्यातील चौथी पाणबुडी असून तिचं निर्माण माझगाव डॉक लिमिटेड आणि डी.सी.एन.एस. फ्रांस ह्यांनी मिळून केलं आहे.

जगात आणि भारतात अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या निर्माण होत असताना भारत अणु उर्जेशिवाय चालणाऱ्या पाणबुड्या का बनवत आहे तर ह्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकारच्या पाणबुड्यांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या ह्या खूप काळ पाण्याखाली राहू शकत असल्या तरी त्यांच्या स्टेल्थ तंत्रज्ञानावर मर्यादा आहेत. अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यानां सतत कुलंट पंप करावे लागते. अणुभट्टी च तपमान योग्य ठेवण्यासाठी हे गरजेचं असते. त्यामुळे ह्या पाणबुड्या नाही म्हंटल तरी पाण्याखाली आवाज करतात जो ओळखला आणि पकडला जाऊ शकतो. ह्यामुळे अश्या पाणबुड्या खोल समुद्रासाठी योग्य समजल्या जातात. पण बॅटरी किंवा ए.आर.पी. म्हणजेच (Air Independent Propulsion) वर चालणाऱ्या पाणबुड्या कोणताच आवाज करत नाहीत. तसेच कमी खोलीच्या पाण्याखालून चालवण्यास आणि कार्य करण्यास अतिशय सक्षम असतात.

भारताने म्हणून फ्रांस सोबत अश्या स्कॉरपियन श्रेणीतील पाणबुड्या बनवण्याचा करार केला आहे. ह्या पाणबुड्यांमध्ये फ्रांस निर्मित MESMA (Module d'Energie Sous-Marine Autonome) हे तंत्रज्ञान असून ह्यात इथेनॉल आणि ऑक्सिजन ह्याचं ज्वलन करून वाफेची निर्मिती केली जाते. त्यातून टर्बाईन फिरवत उर्जेची निर्मिती केली जाते. निर्माण झालेला कार्बनडाय ऑक्साईड पाण्याखाली कोणत्याही खोलीवर पाणबुडीतून बाहेर सोडला जातो. ह्या प्रत्येक मेस्मा ची किंमत जवळपास ५०-६० मिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात असून एकदा पाण्याखाली गेल्यावर २१ ते ५० दिवस पाणबुडी पाण्याखाली लपून राहू शकते.

आय.एन.एस. वेला ही ह्या श्रेणीतील चौथी पाणबुडी असून ह्याची लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर असून हीच वजन जवळपास १६१५ टन आहे. ८ ऑफिसर आणि ३५ खलाशी घेऊन पाण्याखालून ७.४ किमी / तास वेगाने १००० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला पार करण्यास सक्षम आहे. ह्यावर १८ एस.यु.टी. प्रकारातील टोर्पीडो तसेच एस.एम ३९ श्रेणीतील बोटींचा बिमोड करणारी क्षेपणास्त्र असून जवळपास ३० पेक्षा जास्ती माईन्स सोबत घेऊन जाण्यास सक्षम आहे.

आय.एन.एस. वेला आपल्या समुद्री चाचण्या संपवून २०२० पर्यंत देशाच्या सेवेत रुजू होईल. आय.एन.एस. वेला च्या येण्यान भारतीय नौदलाच सामर्थ्य नक्कीच वाढलं आहे ह्या बद्दल कोणत्याही भारतीयाच्या मनात शंका नसावी.

माहिती स्रोत :- विकिपिडिया, टाईम्स ऑफ इंडिया

फोटो स्रोत :- गुगल


Saturday, 4 May 2019

चक्रीवादळ फनी... विनीत वर्तक ©

चक्रीवादळ फनी... विनीत वर्तक ©

काल भारताच्या पूर्व किनाऱ्यावर फनी चक्रीवादळाने तडाखा दिला. फनी चक्रीवादळ हे ४ थ्या श्रेणीमधील चक्रीवादळ होते. चक्रीवादळाच्या श्रेणी हे त्यात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. फनी चक्रीवादळात असलेल्या वाऱ्यांचा वेग तब्बल २५० किमी/तास इतका प्रचंड होता. फनी चक्रीवादळाने भारताच्या ओरिसा राज्यातील पुरी इकडे हाहाकार माजवला पण योग्य नियोजन आणि समन्वय ह्यांच्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. ह्या वादळामुळे आत्त्तापर्यंत ६ लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण फनी ची तीव्रता बघता ह्या चक्रीवादळात लाखो लोकांचा जीव जाण्याची शक्यता होती. सरकारी यंत्रणांनी तसेच आय.एम.डी. ने योग्य वेळात माहिती दिल्याने हा आकडा दुहेरी च्या खाली ठेवण्यात यश आलं आहे. मुळात ही चक्रीवादळ निर्माण होतात कशी? फक्त भारताची पूर्व किनारपट्टी ला ह्याचा नेहमी तडाखा का बसतो? ते ह्या वादळात कसा योग्य समन्वय साधल्याने अनेक निष्पाप जिवांचा जीव वाचला हे सगळं आपण जाणून घ्यायला हवं.

चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणचा जो भाग महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. हा वातावरणाचा भाग जमिनीपासून साधारण ७ किमी. ते २० किमी. उंचीवर असतो. ह्या भागात चक्रीवादळांची निर्मिती होते. बंगाल च्या उपसागराच्या पृष्ठभागाच तपमान हे साधारण २८ डिग्री सेल्सिअस आहे जे की अश्या वादळांच्या निर्मितीसाठी अतिशय योग्य आहे. जमीन सूर्याच्या उष्णतेने लवकर तापून लवकर थंड होते. पण पाण्याच्या बाबतीत ह्याला वेळ लागतो. तपमानातील उष्णतेच्या फरकामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचा पट्टा म्हणजे इथल्या हवेच वस्तुमान हे बाजूच्या हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे जास्त वस्तुमानाची हवा इकडे ओढली जाते. गोल फिरणाऱ्या हवेला योग्य बाष्प मिळालं की त्याचा चक्रीवादळाकडे बनण्याचा प्रवास सुरु होतो. पाण्याच्या पृष्ठभागाच तपमान हे काम करत असते. ह्या बाष्पाच घन स्वरूपात रुपांतर होऊन मग ह्याची तीव्रता वाढत जाते. हे घोंगावणार चक्रीवादळ जेव्हा कोणत्याही जमिनीवर येते तेव्हा त्याचा इंधन स्त्रोत म्हणजे बाष्प संपते. इंधन संपल्यावर तिव्रता कमी झाल्यावर जमवलेला साठा पाऊसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतो. इंधन म्हणजेच बाष्प आणि उर्जा संपल्याने वादळ शांत होते.

बंगाल चा उपसागराच स्थान आणि त्याच तपमान हे त्याच्या चक्रीवादळ निर्मितीमागे प्रमुख कारण आहे. बंगाल चा उपसागर ते प्रशांत महासागर ह्यांच्यात कमी जमीन असल्याने प्रशांत महासागर हा ह्या वादळांसाठी इंधन म्हणजेच बाष्प पुरवतो. बंगाल च्या उपसागरात येईपर्यंत जमीन नसल्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला इंधन मिळत राहते. त्याची तीव्रता वाढत रहाते. ह्या उलट भारताचा पश्चिम किनारपट्टी वरील अरबी समुद्र बंगाल च्या उपसागरापेक्षा २ डिग्री ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती होऊ देत नाही. पुढे जाऊन अरबी समुद्राच तपमान वाढल्यास भारताच्या पश्चिम किनारपट्टी ला ही अश्या महाकाय चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो.

जगातील सर्वात अधिक बळी घेणाऱ्या चक्रीवादळात पहिल्या सहा पेकी तब्बल पाच चक्रीवादळ ही बंगाल च्या उपसागरात निर्माण झालेली आहेत. १९७० साली आलेल्या वादळात तब्बल ५,५०,००० लोकांचा जीव गेला आहे. १९९२ साली ओरिसा ला दिलेल्या तडाख्यात जवळपास १०,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ह्याची पुरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने ह्यावर खूप उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वादळात काही डझन तर कालच्या फनी वादळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा अगदी एकेरीत आला आहे. चक्रीवादळाशी सामना यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाच आहे ते म्हणजे त्याची निर्मिती ओळखणं. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याचा होणारा प्रवास ठरवणं. एकदा का त्याचा प्रवास निश्चित झाला की त्या मार्गावर योग्य त्या उपाययोजना करणं ज्यामुळे कमीतकमी जीवितहानी होईल.

India Meteorological Department (IMD) ने फनी चक्रीवादळाच्या आकलनासाठी योग्य ती उपाययोजना आधीच केली होती. वेळेआधीच बाकी सर्व यंत्रणांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती ची सूचना मिळाली. ह्यासाठी भारताचे अवकाशात असलेले रिमोट सेन्सिंग उपग्रह तसेच समुद्रात ठिकठिकाणी ठेवलेल्या सेन्सर च्या माहितीचा अभ्यास आय.एम.डी. ने अतिशय अचूकतेने केला. अवघ्या ५० की.मी. च्या अचूकतेने आय.एम.डी. ने सांगितलेल्या ठिकाणी फनी वादळाने भारतात प्रवेश केला. इतकी अचूकता अंदाजात आणण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि प्रत्येक क्षणाला वातावरणात होत असलेल्या प्रत्येक बदलाचा अभ्यास प्रचंड गरजेचा होता. आय.एम.डी. ने वादळाची तिव्रता आणि त्याचा प्रवास ह्याची कल्पना सरकारला दिल्यावर सरकार च्या अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री ते शेवटच्या पातळीपर्यंत यंत्रणा कामाला लागल्या.
भारतीय सेना, नौसेना, वायू दल, एन.डी.आर.फ., ओ.डी.आर.एफ., पोलीस, अग्निशामक दल, हॉस्पिटल्स, भारतीय रेल्वे, कोस्ट गार्ड सह पंतप्रधान कार्यालय ह्या सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. एकमेकात समन्वय साधताना १३ जिल्ह्यातील तब्बल १२ लाख लोकांपेक्षा जास्ती लोकांना सुरक्षित स्थळी वेळेआधी हलवलं गेलं. एन.डी.आर.एफ. ने आपल्या ६५ टीम मदतीसाठी उतरवल्या. ( प्रत्येक टीम मद्धे जवळपास ४५ लोकं असतात). एखाद्या युद्धासारख भारतीय सेनेने आपले ३ कॉलम कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार ठेवले. भारतीय नौसेने ने ६ बोटी बंगाल च्या उपसागरात तैनात केल्या. इकडे भारतीय वायू दलाने २ गोल्बमास्टर सी-१७ आणि सी-१३० विमाने तसच चार एन-३२ विमान बचावकार्यासाठी तयार ठेवली. तब्बल एक लाखापेक्षा जास्त खाद्य पाकिटे, औषधे, चादरी तसेच सगळ्या जिवनावश्यक गोष्टींचा साठा कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी तयार ठेवला गेला. पोलीस दल, अग्निशामक दल ह्यांना पण तयार ठेवण्यात आलं. ह्या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी २४ तास चालू असणारी कंट्रोल रूम ही सुरु केली गेली.

आय.एम.डी. च्या सुचने नंतर भारताची प्रत्येक यंत्रणा पूर्ण शक्ती आणि नियोजन करून फनी चक्रीवादळाचा सामना करण्यात सज्ज झाली. त्यामुळेच इतक्या प्रचंड ताकदीच्या फनी वादळाने भारताच्या ओरिसा ला तडाखा दिल्यानंतर ही जीवित हानीचा आकडा आपण हाताच्या बोटावर मोजू इतका रोखण्यात यशस्वी झालो. ह्या सगळ्यामागे सरकारी यंत्रणांचा समन्वय, त्यांनी दाखवलेली तत्परता, तसेच आय.एम.डी. सारख्या यंत्रणांनी वेळेआधी दिलेली धोक्याची सूचना कारणीभूत आहेत. ह्या सर्व यंत्रणांच अभिनंदन. वाढत्या तपमानामुळे फनी सारखी चक्रीवादळे येणाऱ्या काळात अजून जास्ती तिव्रतेने भारताच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा देतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण ही शून्य जीवितहानी च्या दिशेने वाटचाल करत अश्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यात सक्षम होतं आहोत.

माहिती स्रोत :- विकिपिडीया, टाईम्स ऑफ इंडिया

फोटो स्रोत :- गुगल



Thursday, 2 May 2019

'काली ५००० भारताचं ब्रम्हास्त्र'... विनीत वर्तक ©

'काली ५००० भारताचं ब्रम्हास्त्र'... विनीत वर्तक ©


युद्ध तंत्रज्ञानात जगातील प्रत्येक देश काम करत असतो. आपल्या देशांच्या सीमांच्या संरक्षणासाठी तसेच शत्रूवर वचक ठेवण्यासाठी जगातील सगळी राष्ट्रे आपल्या शस्त्रात्र सज्जतेत वाढ करत असतात. आजवर जगातील युद्ध पारंपारिक पद्धतीने लढली गेली आहेत. जगाचा युद्धाचा इतिहास बघितला तर आपल्याला तेच दिसून येतं. पण येत्या काळात होणारी युद्धे ही वेगळी असतील. म्हणूनच अशा युद्धात सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रात्र निर्मितीच्या तंत्रज्ञानावर अनेक राष्ट्र काम करत आहेत. त्यात भारत ही मागे नाही. आधी तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून सुरु झालेल्या प्रोजेक्टचं महत्व राष्ट्र संरक्षणासाठी लक्षात आल्यावर भारताने त्या तंत्रज्ञानाला भारताच्या संरक्षणासाठी वापरण्याच तंत्र विकसित केलं. हे तंत्रज्ञान म्हणजेच 'काली ५०००.' 


काली म्हणजे ( Kilo Ampere Linear Injector ). सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे तंत्रज्ञान शत्रूला इजा न करता मारून टाकते. हे कसं शक्य होते तर कोणत्याही पारंपारिक क्षेपणास्त्रे किंवा बॉम्ब हल्यात स्फोट करून शत्रूच्या वाराला निष्प्रभ केलं जाते. लेझर सारख्या तंत्रज्ञानात उच्च तापमान निर्माण करून आपल्याकडे येणाऱ्या अशा क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यांचा हल्ला निष्प्रभ केला जातो. ह्याचा अर्थ आपण क्षेपणास्त्रे अथवा बॉम्ब, विमाने ह्यांनी शारिरीक हानी करत असतो. पण समजा त्यांचा मेंदूच निकामी केला तर? माणसाचा मेंदू निकामी केला तर त्याचं शरीर काहीच कामाचं उरणार नाही. तसचं आपण जर ह्या सगळ्यांचा मेंदूच निकामी केला तर ही शत्रूची क्षेपणास्त्रे, बॉम्ब अथवा विमाने काहीच कामाची उरणार नाहीत. नेमकं हेच करण्याच तंत्रज्ञान म्हणजे काली. 


काली भारतावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रे, बॉम्ब अथवा विमानांचा मेंदू असणारी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पूर्ण निकामी करतो. ज्याचा परिणाम म्हणजे जिथल्या तिथे ह्या गोष्टी निकामी होतात. काली हे काम कसं करते तर काली हे आपल्या लक्ष्यावर इलेक्ट्रॉनचा मारा करते. ज्याला Relativistic Electron Beams (REB) असं म्हणतात. ह्यात मारा करणारे इलेक्ट्रॉन १ MEV उर्जेचा दाब, 40 KA उर्जेचा प्रवाह तर 40 GW उर्जेची शक्ती निर्माण करतात. हे कण चुंबकीय रेडीएशन मध्ये नेले जाऊ शकतात. मग हे रेडीएशन 'एक्स रे' अथवा 'मायक्रोव्हेव्ह' स्वरूपात डागलं जाऊ शकते. अशा १००० मिलियन GW शक्तीचा प्रवाह जेव्हा कोणत्याही क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यावर प्रक्षेपित केला जातो. तेव्हा तो त्यात असलेल्या संपूर्ण संगणक, इलेक्ट्रोनिक प्रणाली ला निकामी करतो. आपल्या लक्ष्याच्या मेंदूचा गेम ओव्हर केल्यावर तो मेलेला मेंदूच त्या क्षेपणास्त्रे अथवा विमानाला जागच्या जागी उध्वस्त करतो. 


काली तंत्रज्ञानावर काम खूप आधी सुरु झालं. सर्वप्रथम ह्याची कल्पना १९८५ साली डॉक्टर आर. चिदंबरम जे की भाभा अणुसंशोधन केंद्राची अध्यक्ष होते त्यांनी मांडली. बी.ए.आर.सी. च्या Accelerator and Pulse Power Division ह्या युनिट ने सर्वप्रथम हे तंत्रज्ञान विकसित केलं. १९८९ ला ह्या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षणासाठी होऊ शकतो हे लक्षात आल्यावर भाभा अणुसंशोधन केंद्र आणि 'डिफेन्स रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डी.आर.डी.ओ. ह्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून रक्षात्मक प्रणाली बनवण्यावर काम सुरु केलं. काली तंत्रज्ञान हे खूप निराळं असल्याने ह्यावर सुरु असलेला अभ्यास कमालीचा गुप्त ठेवण्यात आलेला आहे. जगातील फक्त अमेरिकेकडे असं तंत्रज्ञान असल्याचं बोललं जाते. भारताचं काली तंत्रज्ञान अजूनही विकासाच्या टप्प्यात असल्याने ह्याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. 


काली ५००० भारताने विकसित करून त्याची चाचणी घेतल्या असल्याचं जागतिक पातळीवर बोललं जात असलं तरी ह्याबद्दल कोणत्याच घटनांना सरकार कडून दुजोरा मिळालेला नाही. काली तंत्रज्ञानाचा वापर भारताने आपल्या तेजस विमानाला अशा इलेक्ट्रोनिक रेडीएशन पासून वाचवण्याच्या चाचण्यात केलेला आहे. काली तंत्रज्ञानामुळे सगळ्यात जास्ती धसका आपल्या एक नंबर शत्रू पाकिस्तान ने घेतलेला आहे. भारताच्या ह्या ब्रम्हास्त्राचं उत्तर भारताच्या कोणत्याच शत्रूंकडे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. येत्या काळात काली ला अजून लहान तसेच तंत्रज्ञानात अचूक करत भारताच्या संरक्षणासाठी दाखल करण्यात येईल तेव्हा शत्रूराष्ट्राकडे हतबलतेशिवाय पर्याय असणार नाही. 


माहिती स्त्रोत :- विकिपिडिया, डिफेन्स न्यूज, सायन्स बियॉण्ड सायन्स 


फोटो स्त्रोत:- गुगल 



Tuesday, 30 April 2019

येती (हिममानव) एक न उलगडलेलं कोडं... विनीत वर्तक ©

येती (हिममानव) एक न उलगडलेलं कोडं... विनीत वर्तक ©

आज भारतीय सेनेने त्यांच्या एक टीमला येती अर्थात हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळल्याच अधिकृतरीत्या जाहीर केलं. हे ठसे जवळपास ३२ X १५ इंच इतक्या मोठ्या आकाराचे मकालू बेस जो की नेपाळ च्या हद्दीजवळ आहे तिकडे आढळले आहेत. ९ एप्रिल २०१९ ला हे ठसे आढळून आल्यावर काही दिवस ह्याचा अभ्यास केल्यावर हे ठसे पुढच्या संशोधनासाठी खुले केले आहेत. भारतीय सेनेच्या आजच्या घोषणेमुळे येती हा हिममानव अस्तित्वात आहे की नाही ह्यावर जगातील अनेक तज्ञांच्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. येती म्हणजे नेमकं काय? ह्या मागे इतकं गूढ का दडल आहे ह्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल.

येती ( हिममानव ) हा एक प्राणी जो की दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे. येती आहे किंवा नाही? ह्याच उत्तर होय आणि नाही असं आहे. कारण येतीला अजून कोणी सदृश्य बघितल्याचे किंवा त्याचे असण्याचे पुरावे मिळालेले नाहीत. अगदी एकदा फोटोत पकडण्याचा प्रयत्न पण फसलेला आहे. पण त्याचवेळी अनेकांनी त्यांना येती दिसल्याचा किंवा त्यच्या पाउलखुणा दिसल्याच वर्णन केलं असून अश्या पाउलखुणा अनेकदा हिमालयाच्या कुशीत आढळून आल्या आहेत. त्यामुळे येती नक्की आहे का? हा प्रश्न आजही जगभरातील संशोधकांपुढे न उलगडलेलं कोडं आहे.

अलेक्झांडर ने भारताच्या हिंदू संस्कृतीवर इसविसनपूर्व ३२६ वर्षी हल्ला केल्यावर त्याने येतीला बघण्याची इच्छा व्यक्त केली होती अशी नोंद आहे. पण इथल्या लोकांनी येती हिमालयात असून त्याच दर्शन दुर्लभ असल्याच त्याला सांगितलं होतं. तसेच आपल्यासाठी तो त्रासदायक असून त्यापासून लांब राहण्याची सूचना ही केली होती. ह्या नंतर अनेक पौराणिक कथेत येतीचा उल्लेख केला गेलेला आहे. १९२१ च्या सुमारास पत्रकार हेन्री न्यूमन ह्यांनी काही ब्रिटीश गिर्यारोहकांची भेट घेतली जे एवरेस्ट च्या मोहिमेवरून परतत होते. त्यांनी एवरेस्ट च्या पायथ्याशी मोठ्या पाउलखुणा आढळल्याची नोंद केली होती. १९२५ ला रॉयल जिओग्राफी सोसायटी चे एन.ए. तोम्बाझी ह्यांनी झेमू ग्लेशियर जे ४६०० मीटर उंचीवर आहे तिकडे माणसा सारखा प्राणी दिसल्याची नोंद केली आहे. हा प्राणी दोन पावलांवर चालत असल्याच ही निरीक्षण त्यांनी नोंदवल आहे. ह्यावर संशोधन करणाऱ्या मायरा शाक्ले ह्यांनी १९४२ च्या सुमारास गिर्यारोहकाना दोन अस्वस्ल सदृश्य प्राणी दिसल्याची नोंद केली आहे. १९५१ ला ब्रिटीश शोधकर्ता एरिक शिप्टोन ह्यांनी येती चा फोटो घेतल्याची नोंद आहे. १९५३ ला एवरेस्ट च्या पहिल्या मोहिमेत सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे ह्यांनी एवरेस्ट वर येती च्या पाऊलखुणा दिसल्याची नोंद केली आहे. ह्या नंतर अनेक गिर्यारोहक ते अनेक सामान्य लोकांना हिमालयात येती च्या पाऊलांचे ठसे दिसल्याची नोंद जगभर झाली आहे.

येती बद्दलच कुतूहल जगात इतकं आहे की इतिहासात येती वर संशोधन करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या गेल्या. ह्यात रशिया, ब्रिटन सारख्या देशांचा समावेश आहे. येती च्या संशोधनासाठी २०१३ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक ब्रायन स्केस ह्यांनी पूर्ण जगात येती असल्याच मानणाऱ्या लोकांकडून येती चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याच आवाहन केलं. ह्या पुराव्यात केस, हाड, दात, मांस अश्या गोष्टी समाविष्ट होत्या. त्यांना जवळपास ५७ पुरावे मिळाले ज्यातले ३६ पुरावे डी.एन.ए. चाचणीसाठी निवडण्यात आले. ह्या सर्व पुराव्यांचा ताळमेळ जगात माहित असलेल्या सगळ्या डी.एन.ए. शी मिळवला गेला. ह्यातले अनेक पुरावे हे ज्ञात असलेल्या प्राण्यांशी जुळून आले. पण ह्यातले २ पुरावे मात्र १०० टक्के पृथ्वीच्या ध्रुवावर खूप वर्षापूर्वी राहणाऱ्या अस्वलांशी मिळाले. ही ध्रुवीय अस्वस्ल पृथ्वीवर जवळपास ४०,००० ते १,२०,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती. ह्यातील एक पुरावा भारतातून तर दुसरा भूतान मधून मिळालेला होता. ह्यावर दोन संशोधकांनी अजून संशोधन करून आपला अहवाल रॉयल सोसायटी जनरल मध्ये प्रसिद्ध केला आहे.

बघायला गेलं तर येती ( हिममानव ) चा शोध गेली कित्येक शतके चालू आहे. पण अजूनही येती नक्की कसा आहे? कोण आहे? काय आहे? ह्या बद्दल पूर्ण जगातील संशोधकात संभ्रमाच वातावरण आहे. कारण येती असल्याचे पुरावे तर मिळत आले आहेत. पण तो नक्की कुठे आहे? ह्याचा शोध आजही लागलेला नाही. आज भारतीय सेनेच्या पुराव्यांनी पुन्हा एकदा येती बद्दलच्या गुढ्तेला अजून एक वलय प्राप्त झालं आहे. भारतीय सेनेने हे फोटो जगाला दाखवताना हे दाखवण्या मागचा उद्देश हा येती बद्दल अजून संशोधन करण्याचा आहे असं स्पष्ट आपल्या ट्वीट मध्ये म्हंटल आहे. येती ( हिममानव ) मिळेल तेव्हा मिळेल पण पुन्हा एकदा एका न उलगडलेल्या कोड्याची उकल करण्याचे प्रयत्न पूर्ण जगभर केले जातील. ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

माहिती स्रोत :- विकिपीडिया, लाईव्ह सायन्स

फोटो स्त्रोत :- गुगल




Sunday, 28 April 2019

'निडर युद्ध संवाददाता, मेरी कोल्विन'... विनीत वर्तक ©

'निडर युद्ध संवाददाता, मेरी कोल्विन'... विनीत वर्तक © 


जगभरात कोणती युद्ध चालू आहेत ह्याची पुसटशी कल्पना भारतासारख्या लोकशाही राष्ट्रातील लोकांना नसते. लोकशाही संविधानाने दिलेल्या हक्कांवरून नको तितकं राजकारण करणाऱ्या लोकांना बघितलं की युद्ध लढल्या गेलेल्या देशातील परिस्थीची कल्पना त्यांना करून द्यावी असं मनोमन वाटतं. युद्ध मग ते कोणीही लढो, त्यात नुकसान सामान्य निष्पाप लोकांच होतं ही सत्य परिस्थिती आपण डोळे बंद करून बघतो. जेव्हा हे युद्ध आपलं राज्य टिकवण्यासाठी, आपल्याला फायदा मिळवण्यासाठी जागतिक पातळीवर केलं जाते तेव्हा होणारा नरसंहार हा आपल्या विचारांच्या पलीकडला असतो. पूर्ण देश वेठीस धरला जातो. जिंकणारे जिंकतात आणि हरणारे हरतात;  पण ह्यात जीव जातो तो निष्पाप लोकांचा. जगात अशाच युद्ध छायेखाली जगणारे काही देश आहेत. त्यात होणारा नरसंहार आपल्या जीवावर उदार होऊन जगापुढे आणणाऱ्या पत्रकारांमध्ये एक नाव होतं ते म्हणजे 'मेरी कॅथेरीन कोल्विन'. 


'मेरी कोल्विन' जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती. मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली. लिबिया चे प्रमुख 'मुआमार गद्दाफी' ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती. ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना 'मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं. तिची ही मुलाखत खूप गाजली होती. ह्यानंतर युद्ध संवाददाता म्हणून मेरी कोल्विन चं नाव मोठं होत राहिलं. चेचन्या, कोसावो, झिम्बाब्वे, श्रीलंका, इस्ट तिमोर अशा सगळ्या युद्ध पेटलेल्या देशात जाऊन अगदी युद्धभूमीवरच्या घटना मेरी ने आपल्या शब्दातून, लेखणीतून आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून जगापुढे आणल्या. इस्ट तिमोर च्या युद्धात इंडोनेशिया च्या सैनिकांपासून जवळपास १५०० स्त्रिया आणि लहान मुलांच्या जीवाचं तिने रक्षण केलं. 'चेचन्या' आणि 'कोसावो' इकडे 'युनायटेड नेशन'च्या सैनिकांसोबत राहून तिने तिथल्या घटनांची नोंद पेपरमधून आणि बातमीपत्रात घ्यायला लावली. ह्या साहसासाठी तिला 'इंटरनेशनल वुमन मिडिया फौंडेशन' ने पत्रकारीतील साहसाचा पुरस्कार दिला. 


१६ एप्रिल २०११ ला श्रीलंकेच्या सैनिकांनी डागलेल्या ग्रेनेड च्या हल्ल्यात तिचा डावा डोळा निकामी झाला. ह्या नंतर आयुष्यभर तिला एका डोळ्यावर पट्टी बांधावी लागली. तब्बल ६ वर्ष ती श्रीलंकेतील हे युद्ध आपल्या शब्दातून मांडत होती. ह्या सगळ्याचा मानसिक परिणाम तिच्या मनावर ही झाला. युद्धातील अतिशय क्रूर अशा घटनांनी तिच्या मनावर खोल आघात केला. तिला ह्या साठी हॉस्पिटलमध्ये ही जावं लागलं. एका डोळ्याने देखील, तिने युद्धभूमीवरची आपली पत्रकारिता सुरु ठेवली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर, 

"You're never going to get to where you're going if you acknowledge fear."

२०११ साली तिला पुन्हा एकदा गद्दाफी ची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यावेळेला न घाबरता तिने गद्दाफीसमोर युद्धामुळे निष्पाप जीवांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. तिने गद्दाफी ला सांगितलं होतं, 

“My job is to bear witness. I have never been interested in knowing what make of plane had just bombed a village or whether the artillery that fired at it was 120mm or 155mm."


फेब्रुवारी २०१२ ला सिरीयन सरकारच्या धमक्यांना भिक न घालता त्यांची परवानगी न घेता सिरीया मधील युद्धातील घटना जगापुढे मांडण्यासाठी तिने मोटरसायकल वरून युद्धभागात प्रवेश केला. होम्स शहरात राहून तिने तिथली परिस्थिती उपग्रह फोन च्या मार्फत २१ फेब्रुवारी २०१२ ला बी.बी.सी., सी.एन.एन., च्यानेल ४ आणि आय.टी.एन. न्यूजसारख्या जगातील सगळ्या प्रसिद्ध बातमीपत्रातून मांडली. ते मांडताना आपल्या आयुष्यातील सगळ्यात संहारक असा नरसंहार आपण अनुभवत असल्याचं तिने सांगितलं. २२ फेब्रुवारी २०१२ ला आई.ई.डी. च्या स्फोटात 'मेरी कोल्विन' मृत्युमुखी पडली. तिच्या मृत्यूनंतर होम्स ह्या शहरातले सर्व लोकं युद्धाला न घाबरता तिच्या सन्मानासाठी घराबाहेर निघाले होते. पत्रकारितेच्या आणि संपूर्ण जगात तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. सिरीया आर्मी ने ते आय.ई.डी. अतिरेक्यांनी टाकल्याचा दावा केला पण हे खोट असल्याचं नंतर सप्रमाण सिद्ध झालं. तिच्या साहसी युद्ध पत्रकारितेला बंद करण्यासाठी आणि सिरीया मधील परिस्थितीचं आकलन जगाला होऊ नये म्हणून सिरीया च्या आर्मी ने तिला संपवलं होतं. 


२०१९ मध्ये सिरीयाच्या सरकारला 'मेरी कोल्विन'च्या हत्येसाठी जबाबदार धरण्यात आलं. सिरीयन सरकारला ३०२ मिलियन अमेरिकन डॉलर ह्या हत्येसाठी नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला. युद्धाला न घाबरता अक्षरशः युद्धभूमीवरून युद्ध संवाददाता म्हणून तिथल्या परिस्थितीची जाणीव पूर्ण जगाला करून देणारी 'मेरी कोल्विन' तीनवेळा प्रतिथयश अशा 'ब्रिटीश प्रेस' बक्षिसाची मानकरी ठरली होती. तिचा हा प्रवास “A Private WAR” ह्या चित्रपटातून समोर आला आहे. हा चित्रपट आणि एकूणच मेरी कोल्विन च्या निर्भीड पत्रकारितेचा प्रवास अनुभवणं एक वेगळा अनुभव आहे. 


तळटीप :- ह्या चित्रपटात काही दृश्य पूर्ण नग्न स्वरुपाची ( Full Nude Scene ) तसेच काही युद्धभूमीची दृश्येही विचलित करणारी असू शकतात. चित्रपट बघताना काळजी घ्यावी.