Wednesday 8 May 2019

आय.एन.एस. वेला पाणबुडी... विनीत वर्तक ©

आय.एन.एस. वेला पाणबुडी... विनीत वर्तक ©

भारताला लाभलेल्या ७५१६ किलोमीटर लांबीच्या सागरी हद्दीच शत्रू राष्ट्रापासून संरक्षण तसेच सागरी मार्गातून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल नेहमीच तत्पर असते. चीन चा हिंद महासागरातला प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय नौदलला अत्याधुनिक बोटींची गरज भासत आहे. भारतीय नौदलला पाणबुडींची प्रचंड कमतरता जाणवत आहे. २४ पाणबुडींची गरज असताना भारताकडे फक्त १३ पाणबुड्या आहेत. ह्यातल्या अनेक आयुष्याच्या शेवटच्या टप्यात आहेत. त्यामुळे ही कमी भरून काढण्यासाठी भारतीय नौदलला पाणबुडींची गरज होती. त्यासाठी नौदलाने फ्रांस च्या डी.सी.एन.एस. सोबत प्रोजेक्ट ७५ हा करार केला. ह्या करारा प्रमाणे २०१५ - २०१६ पर्यंत ६ स्कॉरपियन श्रेणी मधील पाणबुड्या तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारताच्या माझगाव डॉक इकडे बनवून बह्र्तीय नौदलाला देणं अपेक्षित होतं. पण अनेक कारणांनी उशीर झालेल्या ह्या प्रोजेक्ट वर काम सुरु होऊन त्यातली चौथी पाणबुडी आय.एन.एस. वेला ६ मे २०१९ ला पाण्यात दाखल झाली.

प्रोजेक्ट ७५ च्या अंतर्गत ६ पाणबुड्या बनवण्यासाठी १८,७९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता जो प्रोजेक्ट ला उशीर झाल्याने वाढून २३,५६२ कोटी च्या घरात गेला आहे. ह्या ६ पाणबुड्या २०२१ पर्यंत देशाच्या रक्षणासाठी भारतीय नौदलात दाखल होतील असा अंदाज आहे. ह्यातली आय.एन.एस. कलावरी भारतीय नौदलात १४ डिसेंबर २०१७ ला समाविष्ट झाली तर आय.एन.एस. खांदेरी आणि करंज ह्या दोन्ही पाणबुड्यांच्या सागरी चाचण्या सुरु असून त्या २०१९ ला भारतीय नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. आय.एन.एस. वेला ही ह्या ताफ्यातील चौथी पाणबुडी असून तिचं निर्माण माझगाव डॉक लिमिटेड आणि डी.सी.एन.एस. फ्रांस ह्यांनी मिळून केलं आहे.

जगात आणि भारतात अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या निर्माण होत असताना भारत अणु उर्जेशिवाय चालणाऱ्या पाणबुड्या का बनवत आहे तर ह्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकारच्या पाणबुड्यांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या ह्या खूप काळ पाण्याखाली राहू शकत असल्या तरी त्यांच्या स्टेल्थ तंत्रज्ञानावर मर्यादा आहेत. अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यानां सतत कुलंट पंप करावे लागते. अणुभट्टी च तपमान योग्य ठेवण्यासाठी हे गरजेचं असते. त्यामुळे ह्या पाणबुड्या नाही म्हंटल तरी पाण्याखाली आवाज करतात जो ओळखला आणि पकडला जाऊ शकतो. ह्यामुळे अश्या पाणबुड्या खोल समुद्रासाठी योग्य समजल्या जातात. पण बॅटरी किंवा ए.आर.पी. म्हणजेच (Air Independent Propulsion) वर चालणाऱ्या पाणबुड्या कोणताच आवाज करत नाहीत. तसेच कमी खोलीच्या पाण्याखालून चालवण्यास आणि कार्य करण्यास अतिशय सक्षम असतात.

भारताने म्हणून फ्रांस सोबत अश्या स्कॉरपियन श्रेणीतील पाणबुड्या बनवण्याचा करार केला आहे. ह्या पाणबुड्यांमध्ये फ्रांस निर्मित MESMA (Module d'Energie Sous-Marine Autonome) हे तंत्रज्ञान असून ह्यात इथेनॉल आणि ऑक्सिजन ह्याचं ज्वलन करून वाफेची निर्मिती केली जाते. त्यातून टर्बाईन फिरवत उर्जेची निर्मिती केली जाते. निर्माण झालेला कार्बनडाय ऑक्साईड पाण्याखाली कोणत्याही खोलीवर पाणबुडीतून बाहेर सोडला जातो. ह्या प्रत्येक मेस्मा ची किंमत जवळपास ५०-६० मिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात असून एकदा पाण्याखाली गेल्यावर २१ ते ५० दिवस पाणबुडी पाण्याखाली लपून राहू शकते.

आय.एन.एस. वेला ही ह्या श्रेणीतील चौथी पाणबुडी असून ह्याची लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर असून हीच वजन जवळपास १६१५ टन आहे. ८ ऑफिसर आणि ३५ खलाशी घेऊन पाण्याखालून ७.४ किमी / तास वेगाने १००० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला पार करण्यास सक्षम आहे. ह्यावर १८ एस.यु.टी. प्रकारातील टोर्पीडो तसेच एस.एम ३९ श्रेणीतील बोटींचा बिमोड करणारी क्षेपणास्त्र असून जवळपास ३० पेक्षा जास्ती माईन्स सोबत घेऊन जाण्यास सक्षम आहे.

आय.एन.एस. वेला आपल्या समुद्री चाचण्या संपवून २०२० पर्यंत देशाच्या सेवेत रुजू होईल. आय.एन.एस. वेला च्या येण्यान भारतीय नौदलाच सामर्थ्य नक्कीच वाढलं आहे ह्या बद्दल कोणत्याही भारतीयाच्या मनात शंका नसावी.

माहिती स्रोत :- विकिपिडिया, टाईम्स ऑफ इंडिया

फोटो स्रोत :- गुगल


No comments:

Post a Comment