एवरेस्ट चा बाजार... विनीत वर्तक ©
जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एवरेस्ट ज्याची उंची ८८४८ मीटर (२९,०२९ फुट) आहे. त्यावर चढाई करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाच स्वप्न राहिलेलं आहे. १९५३ ला सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे ह्यांनी पहिल्यांदा एवरेस्ट ला गवसणी घातली. त्यानंतर अनेकांनी ह्या उंच शिखराला सर केलं आहे. आजवर ४००० पेक्षा जास्ती गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच असं एवरेस्ट शिखर सर केलं आहे. एकेकाळी मानवाच्या उत्तुंग स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी केलेली चढाई आता एक बिझनेस म्हणून नावारूपाला येत आहे. ह्या बिझनेस मध्ये ठराविक काळात जास्तीत जास्त गिऱ्हाईक शिखरावर नेण्याच्या नादात एवरेस्ट वर सध्या माणसांची गर्दी झाली आहे. ही गर्दी इतकी जास्त आहे की ह्यात काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नुकतेच मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी ह्यांना एवरेस्टवर झालेल्या गर्दीमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.
जगातील सगळ्यात उंच असणार शिखर सर करण्याची इच्छा सगळ्यांच्या मनात असते. पण नुसत्या इच्छेने शिखरे सर होतं नसतात. समुद्रसपाटी पासून तब्बल ८००० मीटरपेक्षा जास्त उंची गाठताना निसर्गात अनेक बदल घडतात. वातावरण, तपमान, हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन च प्रमाण खूप अत्यल्प होते ह्यामुळे ८००० मीटर वरील ह्या भागाला डेथ झोन असं म्हंटल जाते. समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब हा जवळपास १०१३.२५ मिलिबार ( १४.६९६ पी.एस.आय. ) असतो. पण हेच प्रमाण अति उंचीवर डेथ झोन मध्ये ३५६ मिलिबार ( ५.१६ पी.एस.आय.) इतकं खाली येते. शरीराला लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजन ची पातळी कमी असल्याने शरीराला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर शरीराच नियंत्रण बिघडून मृत्यू ओढवायला वेळ लागत नाही.
एवरेस्ट वर जाण्याचा खर्च जवळपास १ ते १.५ कोटी रुपयांच्या आसपास येतो. नेपाळ सरकार प्रत्येक गिर्यारोहका कडून ११ हजार अमेरिकन डॉलर एवरेस्ट चढाईसाठी घेते. ह्या शिवाय शेर्पा, ऑक्सिजन नळकांडी, कपडे आणि इतर खर्च बघता अश्या मोहिमेचा खर्च जवळपास ५० ते ७० हजार अमेरिकन डॉलर च्या घरात जातो. इतके पैसे खर्च करूनही मोहीम सफल होण्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण कोणत्या वेळी कोणाला काय होईल ह्याचा अंदाज बांधण तितकचं कठीण आहे. नेपाळ सरकारसाठी एवरेस्ट सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे तर तिथे राहणाऱ्या शेर्पांसाठी भाकरीचा अर्धा तुकडा. वर्षातून काही दिवस होणाऱ्या मोहिमेतून प्रत्येक शेर्पा जवळपास २ हजार ते ५ हजार डॉलर कमवत असतो. ह्या शिवाय पैसे असणाऱ्या सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या गिर्यारोहण संस्था. एक-दोन अपवाद वगळता एवरेस्ट मोहीमेच मार्केटिंग करून बक्कळ पैसे कमावणाऱ्या अनेक संस्था उघडल्या आहेत हे अनेक गिर्यारोहक ही उघडपणे मान्य करतात.
आज ज्यांची १ ते २ कोटी रुपये मोजायची तयारी आहे त्या सर्वाना एवरेस्ट शिखरावर नेण्याचं आमिष अनेक संस्थान कडून दाखवलं जाते. अनेकांना एवरेस्ट सर करण्यासाठी सह्याद्री मध्ये केलेलं दोन- चार किल्यांवरचं गिर्यारोहण पुरेस वाटते. त्यातला त्यात एखादा हिमालयाच्या शिखरावर केलेला ट्रेक म्हणजे चेरी ऑन टॉप. अजून काय हवं पैसे मोजा चला एवरेस्टवर. गिर्यारोहण आपल्याकडे साहसी खेळ म्हणून माहित असला तरी त्याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागते ह्याची माहिती थोड्यांना आहे. एक वर्षाचे कोर्सेस ह्यासाठी शिकावे लागतात. ज्यात खडतर प्रशिक्षण आणि आपल्या शारीरिक, मानसिक शक्तीचा कस लागतो. त्यातून तालावून सुखावून बाहेर पडल्यावर आपण हिमालयातील अश्या एखाद्या मोहिमांचा विचार करायला हवा. जर आपण ह्या अग्निदिव्यातून बाहेर पडू शकत नसू तर इतर अनेक शिखरे किंवा डोंगर रांगा आपण पार करूच शकतो ज्याला अगदी साधं गिर्यारोहणाच शिक्षण पुरेसं असते.
एवरेस्ट चा बाजार असा बनवला गेला आहे की तुम्ही फक्त पैसे मोजले की तुम्ही एवरेस्ट सर करू शकता हा आत्मविश्वास देण्याइतपत आज हा बाजार गेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर लावलं म्हणजे आपण किती उंचीवर चढाई करू शकतो हा फाजील आत्मविश्वास अनेकांना मृत्युच्या दाढेत नेतं आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी २०० जणांनी एवरेस्ट च्या शिखरावर एकदम चढाई केली. ज्याचा परिणाम म्हणजे ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यात ४ भारतीय आहेत. योग्य नियोजन केलं असते तर कदाचित हे प्राण वाचवता आले असते. ह्या २०० लोकांपेकी किती जणांनी गिर्यारोहणाच शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं असेल ह्याचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच गिर्यारोहक असतील. म्हणजेच कोणतही शिक्षण न घेता फक्त स्वप्न आणि पैश्याच्या जोरावर बाजारात ओढली गेलेली बाकीची मंडळी आहेत.
एवरेस्ट सर करण हे स्वप्न असण ह्यात चुकीच काहीच नाही. पण ते पूर्ण करण्यासाठी निवडलेला रस्ता मात्र निश्चित चुकीचा आहे. एवरेस्ट हे एकमेव शिखर नाही. गिर्यारोहणाचा आनंद काय सह्याद्री मधल्या शिखरांवर येत नाही? की हिमालयातील इतर शिखरांवर जे सहज सर करता येण्याजोगे आहेत त्यांच्यावर येतं नाही? एवरेस्ट सर करण्याच स्वप्न नक्कीच बघावं पण ते पूर्ण करण्यासाठी आपण योग्य प्रशिक्षण, आपली मानसिक- शारीरिक क्षमता, आपलं वय तसेच अतिउंचीवर आपलं शरीर आपल्याला साथ देऊ शकते का ह्याचा अभ्यास केल्याशिवाय जाण म्हणजे एवरेस्ट च्या बाजारातील एक गिऱ्हाईक बनणं.
एवरेस्ट वर होणारी माणसांची गर्दी पुढे कदाचित एवरेस्ट मोहिमांच अस्तित्व धोक्यात आणत आहे. एवरेस्ट वर मृत्युमुखी पडलेल्या लोकांना खाली आणणं पण शक्य नसते त्यामुळे अनेक लोकांची प्रेत अजूनही तशीच पडलेली आहेत. ग्रीन बुट्स नावच एका गिर्यारोहकाच प्रेत असचं प्रसिद्ध आहे. ह्याशिवाय ऑक्सिजन ची रिकामी नळकांडी, इतर कचरा इथलं वातावरण अजून दुषित करत आहे. एवरेस्ट शिखर नाही तर अशी अनेक शिखर आज ह्या बाजाराच्या विळख्यात सापडली आहेत.
आयुष्याच्या उत्तरार्धात पैसा, मानसन्मान कमावून झाल्यावर काहीतरी तुफानी करण्यासाठी आज अनेकजण तयार होतं आहेत. पण गिर्यारोहण म्हणजे समाजसेवा नव्हे की आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर आपण ती सुरु करू शकतो. गिर्यारोहण हे एक शास्त्र आहे ज्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करावा लागतो. तसेच अभ्यास केल्यावर पास होण्याची कोणतीही खात्री देता येतं नाही. तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणून लगेच बोर्डाच्या परीक्षेला बसण्याआधी चाचणी, सामही तसेच प्रिलीम च्या परीक्षा दिल्यावर त्यातून योग्य ते चिंतन केल्यावर बोर्डाच्या म्हणजेच एवरेस्ट च्या परीक्षेचा विचार करावा. कारण ह्यात नापास म्हणजे मृत्यूशी गाठ. एवरेस्ट च्या बाजारात अडकून न घेता आणि एवरेस्ट हेच अंतिम लक्ष्य न ठरवता गिर्यारोहण शास्त्रोक्त पद्धतीने शिकून एक चांगला / चांगली गिर्यारोहक होण्याचा प्रयत्न आपल्याला एवरेस्ट सारख्या अनेक शिखरांची सफर घडवून आणेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.
No comments:
Post a Comment