'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©
२०१४ च वर्ष होतं जेव्हा भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत आपलं यान यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. आजवरच्या इतिहासात जे कोणत्या देशाला जमलं नाही अशी कामगिरी भारताने जगाला करून दाखवली होती. एकतर भारताने अशी कामगिरी स्वबळावर पहिल्याच प्रयत्नात करणं आणि त्यातही सगळ्यात कमी खर्चात करणं यामुळे सो कॉल्ड वेस्टर्न मिडिया ला प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या. त्याचीच भडास एका व्यंगचित्राच्या रूपाने न्यूयॉर्क टाइम्स ने प्रसिद्ध केली. भारताचा अपमान करणारं हे व्यंगचित्र जगात भारताच्या प्रगतीबद्दल किती खदखद आहे ते दाखवून तर गेलंच पण यासाठी न्यूयॉर्क टाइम्स ला उघडपणे माफी मागण्याची नामुष्की आली. अँड्र्यू रोसेन्थल, न्यूयॉर्क टाइम्सचे संपादकीय पृष्ठ संपादक यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पण म्हणतात न,
जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती...
हे व्यंगचित्र काढणारे चित्रकार होते 'हेंग किम सॉंग'. जरी हे चित्रकार सिंगापूर मध्ये रहात असले तरी चीन चे नागरिक आहेत. भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाने चिनी चित्रकाराला मळमळ झाली. त्याचा द्वेष त्याच्या कुंचल्यांमधून प्रकट झाला. हे व्यंगचित्र आजही बघितल्यावर प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या व्यंगचित्रात एका बाजूला एका आलिशान रूम मधे एलाईट स्पेस क्लब मधले सदस्य बसले आहेत. ते वृत्तपत्रातील बातम्या वाचत आहेत. त्यात भारताचे यान मंगळावर पोहचल्याची बातमी आहे. त्याच रूम च्या बाहेर एका गाईला घेऊन धोतर नेसलेला एक भारतीय आत मधे येण्यासाठी दरवाजावर ठोठावत आहे. एक प्रकारे गरीबांचा आणि गाई, बैलांना घेऊन शेती करणारे भारतीय आता स्पेस क्लब चा भाग होऊ पहात आहेत अशी भारतीयांची थट्टा आणि टिंगल त्यातून दाखवली गेली होती.
हेंग किम सॉंग तर भारताचा अपमान करणाऱ्या लोकांमधील हिमनगाचे एक टोक होतं. त्यांच्या लाईनीत बी.बी.सी.,अल-जझीरा, न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स अश्या अनेक वृत्तसंस्था आणि त्यांचे प्रतिनिधी होते. पण त्यावेळी भारताने अथवा भारताच्या वैज्ञानिकांनी त्याला कोणतंही शाब्दिक उत्तर दिलं नाही. गौतम बुद्ध म्हणतात तसं,
"हजार लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय तुमचाच आहे. तो तुमच्याकडून हिरावून घेता येणार नाही."
त्यामुळेच इसरो ने आपल्या कृतीतून आपण काय आहोत हे आजवर दाखवून दिलेलं आहे. याच वेस्टर्न मिडिया ची मळमळ अजून कमी झालेली नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्यावेळेस भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून जागतिक विक्रम केला तेव्हा या वेस्टर्न मिडिया ने या उपग्रहांचं वजन फक्त १३०० किलोपेक्षा जास्त असल्याचं म्हणत असे छोटे उपग्रह कोणीही प्रक्षेपित करेल असे लेख लिहले. काही वर्षांनी जेव्हा स्पेस एक्स ने १४३ उपग्रह एकत्र सोडून इसरो चा रेकॉर्ड मोडला तेव्हा एकाही मिडिया हाऊस ने त्यांच एकत्रित वजन छापण्याची तसदी घेतली नव्हती. कारण स्पेस एक्स ने सोडलेल्या १४३ उपग्रहांचे एकत्रित वजन १००० किलोपेक्षा कमी होतं. ज्यावेळेस भारत अशी कामगिरी करेल तेव्हा वजनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि आपलं कोणी केलं कि त्याची संख्या दाखवायची. अर्थात यातून भारताबद्दल यांची असणारी मळमळ अजून जास्ती दिसून येते.
मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापन केल्यावर बी.बी.सी. च्या एका पत्रकाराने लाईव्ह मुलाखतीत भारतात इतके मिलियन लोकं गरीब असताना हे असले स्पेस चे खेळ का करायचे असं स्वतःच मत थोपवलं होतं. ज्यांच्यावर आम्ही १५० वर्ष राज्य केलं त्यांनी आपला देश सांभाळावा असं त्यातून दाखवून दिलं. ही मळमळ यासाठी की एकेकेळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य अस्ताला जात नसे त्यांचा आज स्वतःचा असा काहीच स्पेस प्रोग्रॅम नाही न त्यांनी अवकाशात जाऊन जगाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही भलं केलं आहे. आज युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर युनायटेड किंग्डम स्वतःच जी.पी.एस. उभारणार होता. पण त्यांची ही योजना अजून कागदावर राहिली आहे आणि त्यांचे वैज्ञानिक पळून गेले आहेत. तर दुसरीकडे भारताची आज स्वतःची नाविक प्रणाली आहे. जी नासा च्या जी.पी.एस. पेक्षा कैक पटीने सरस असल्याचं जागतिक पातळीवर मानलं गेलं आहे.
चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलेल्या अपयशानंतर याच वेस्टर्न मिडिया ने रकाने भरून भारताचं काय चुकलं आणि कसे पैसे वाया गेले यावर लेख लिहले पण या सगळ्यात भारताने काय मिळवलं आणि अश्या मोहिमांमध्ये अपयश अगदी नासा ला ही आलेलं आहे हे पद्धतशीरपणे लपवण्यात आलं. अर्थात त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा नव्हतीच. आजही जेव्हा भारताने अवघ्या ४ वर्षात पुन्हा चंद्रावर स्वारी केली आहे तेव्हा यांची मळमळ पुन्हा बाहेर यायला सुरवात झाली आहे. भारताच्या चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाबद्दल लिहताना सुरवात मात्र अमेरीका, रशिया, चीन ४ दिवसात पोहचले आणि भारताचं चंद्रयान ३ हे ४२ दिवसात पोहचण्यासाठी रवाना झालं अशी केली आहे. अर्थात त्यांची री ओढणारे भारतात ही काही कमी नाहीत. पण हे सगळे विसरता आहेत की नियती म्हणून एक गोष्ट असते आणि ती "मौका सबको देती हैं"...
थोडे दिवस थांबा अजून आम्ही भारतीय ते व्यंगचित्र विसरलेलो नाहीत आणि कधी विसरणार पण नाही. तुम्ही व्यंगचित्रातून तुमची मळमळ बाहेर काढत रहा. आम्ही आमच्या कर्तृत्त्वाने दाखवून देऊ की, मौका सबको मिलता हैं...
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.