Monday 9 January 2023

#रहस्य भाग ९ ( सेंटिनेलेसे )... विनीत वर्तक ©

 #रहस्य भाग ९ ( सेंटिनेलेसे )... विनीत वर्तक © 

भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत असाच विचार करतो. त्यापलीकडेही भारत अस्तित्वात आहे ही वस्तुस्थिती आपण अनेकदा विसरून जातो. भारताचे अविभाज्य अंग आणि सामरिक दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी अंदमान निकोबार बेटे ही आपल्या खिजगणतीत नसतात. अंदमान हे अनेक बेटांचा समूह असून हा पूर्ण समूह जागतिक पटलावर भारताचा भाग म्हणून ओळखला जातो. सुमारे ५७२ बेटं ह्या समूहाचा भाग असून ह्या सर्व बेटांचं मिळून ६४०८ चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. आपल्या गोव्यापेक्षा दुप्पट आकाराएवढा हा भूभाग आहे. ह्या अंदमान बेट समूहाचे अनेक भाग असून त्यातलं 'नॉर्थ सेंटिनेलेसे' हे ५९.६७ चौरस किलोमीटर (१४,७०० एकर) क्षेत्रफळ असणारं बेट जगातील सगळ्यात धोकादायक आणि रहस्मयी बेट आहे. पूर्ण जगाला कुतूहल असणारं हे बेट ज्या भारताचा हिस्सा आहे त्या भारतीयांना ह्याबद्दल काहीच माहित नाही. असं काय आहे की आजही जगात ह्या बेटाबद्दल कोणाला काहीच माहिती नाही? इकडे काय लपलेलं आहे? इकडे नक्की काय अस्तित्वात आहे ह्याबद्दल आजही कोणीच काही खात्रीने सांगू शकत नाही. 

सेंटिनेलेसे मध्ये आजही अशी एक जमात राहते जी पूर्ण जगापासून अलिप्त आहे. तब्बल ६०,००० वर्षांचा इतिहास असलेल्या या जमातीचं आजही सगळ्या जगाला कुतूहल आहे. कारण आज ते ज्या बेटावर वास्तव्य करतात तिथे नेमके किती जण राहतात ह्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. साधारण ५० ते ५०० माणसे आजही माणसाच्या अतिशय पूर्वावस्थेत आहेत. शिकार, मासेमारी आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपली गुजराण करणारे माणसाच्या मुलभूत गरजांपासून कोसो लांब आहेत. त्यांची भाषा आजही एक रहस्य आहे. बाण आणि भाला वापरून शिकार करताना आजही त्याचं ज्ञान अतिशय प्राथमिक अवस्थेत आहे. त्यांच्या चालीरीती, समाज आणि एकूण 'सेंटिनेलेसे'चं पूर्ण बेट भारतासाठी आणि जगासाठी एक रहस्य आहे. 

'सेंटिनेलेसे' हे बेट तसं जगापासून लपून राहिलं ते ह्या बेटावर माणसांचं मांस खाणारी जमात राहते ह्या गैरसमजुतीमुळे. १८८० या वर्षी ब्रिटीश कर्नल मॉरीस पोर्टमॅनने इथल्या एका कुटुंबाला बंदी बनवलं ज्यात एक नवरा बायको आणि त्यांची चार मुलं होती. त्यांना पोर्ट ब्लेअरला त्यांनी आणलं पण पुढारलेल्या माणसांच्या जगाची सवय नसलेले हे लोक होते. त्यामुळे माणसाला अंगवळणी पडलेल्या आजारांची सवय त्यांना नव्हती. संपर्कामुळे होणाऱ्या आजारांनी ते दोन्ही वृद्ध जोडीदार लगेच मेले. त्या मुलांना काही गिफ्ट्स देऊन ब्रिटीशांनी त्यांना परत त्याच बेटावर सोडून दिलं. ह्यानंतर पुन्हा एकदा हे बेट आणि इथले लोक जगासाठी पूर्ण अनभिज्ञ राहिले. 

१९६७ साली मग भारत सरकारने टी.एन.पंडित ह्यांच्या नेतृत्वाखाली “संपर्क” नावाची एक मोहीम हाती घेतली. ज्यात ह्या लोकांशी संपर्क करण्याचा आणि जगाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार होता. भारतीय नौसेनेच्या मदतीने बेटाजवळ जाऊन मग छोट्या होड्यांच्या मदतीने त्यांना काही मदत आणि जीवनोपयोगी गोष्टी तीराच्या जवळ जाऊन सोडण्यात आल्या. पण तिथल्या लोकांनी आपल्या शस्त्रांच्या मदतीने ह्या टीमवर हल्ला केला. ही संपर्क मोहीम अयशस्वी झाली. १९७४ या वर्षी नॅशनल जिओग्राफिक टीमने ह्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळेस त्यांच्यासाठी ऍल्युमिनियमची काही भांडी, नारळ, काही खेळणी आणि एक डुक्कर त्यांना पाठवण्यात आलं. पण त्याचं स्वागत न करता ह्या लोकांनी टीमवर बाणांच्या साहाय्याने हल्ला केला. ज्यात ह्या टीमचा डायरेक्टरही जखमी झाला. 

पंडित आणि त्यांच्या टीमने त्या लोकांशी संपर्क साधण्याची आशा सोडली नव्हती. १९९१ च्या सुमारास पंडित आणि त्यांची टीम पुन्हा एकदा 'सेंटिनेलेसे' बेटावर संपर्कासाठी गेले. ह्या वेळेस मात्र हे लोक कोणत्याही शस्त्राविना त्यांच्याजवळ आले, त्यांना स्पर्श केला, सगळ्या गोष्टी कुतूहलाने बघत होते. त्यांच्या ह्या अनुभवाबद्दल टी.एन.पंडित सांगतात, 

But there was this feeling of sadness also—I did feel it. And there was the feeling that at a larger scale of human history, these people who were holding back, holding on, ultimately had to yield. It’s like an era in history gone. The islands have gone. Until the other day, the Sentinelese were holding the flag, unknown to themselves. They were being heroes. But they have also given up.

'सेंटिनेलेसे' बेटावरील ह्या लोकांनी जास्त वेळ नवीन माणसांना तिकडे घालवू दिला नाही. मग भारत सरकारने १९९६ साली ह्या लोकांचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी आणि इथे होणाऱ्या हल्ल्याच्या अनेक पार्श्वभूमीवर अश्या सगळ्या संपर्क मोहिमांवर बंदी आणली. २००४ च्या त्सुनामी नंतर भारताच्या नौदलाने तिसऱ्या दिवशी वैद्यकीय मदत तसेच इथली लोक सुरक्षित आहेत का पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने हवाई दौरा केला. ज्यात पुन्हा एकदा ह्या हेलिकॉप्टरवर बाणांचा वर्षाव झाला. पण निदान ह्या गोष्टीने त्सुनामीच्या तडाख्यातून ह्या लोकांनी आपलं रक्षण केलं होतं ह्याची पुष्टी भारत सरकारला झाली. २००६ मध्ये मासेमारी करणारी एक बोट चुकून ह्या बेटाच्या जवळ गेली. तेव्हा ह्या बोटीवर हल्ला करून त्यातल्या लोकांना ठार करण्यात आलं. इंडियन कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरच्या मदतीने हे मृतदेह ताब्यात घेण्याचा विफल प्रयत्न केला. ह्या हेलिकॉप्टरवर पण बाणांनी आणि भाल्यांनी हल्ला करण्यात आला. भारत सरकारने ह्या खुनासाठी कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. भारत सरकारने 'सेंटिनेलेसे' बेटाला आणि तेथील लोकांना सार्वभौमत्वाचा दर्जा दिला असून तिकडे घुसखोरी करणाऱ्या प्रत्येकाला मारण्याचा त्यांना अधिकार स्वरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी योग्य आहे. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या कोणाला मारावं लागल्यास तो गुन्हा ठरत नाही.

२१ व्या शतकात सुद्धा माणसाच्या अगदी आदिम काळाचं प्रतिनिधित्व करणारे हे लोक ६०,००० वर्षांपेक्षा जास्ती वर्षं आपलं अस्तित्व स्वबळावर टिकवून आहेत. पण आज काल सो कॉल्ड पुढारलेले लोक ह्या लोकांना प्राणीसंग्रहालयात प्राणी बघतात तसे बघण्यासाठी टुरीस्ट बनण्यासाठी ह्या भागात भेट देत आहेत. ह्यामुळे इकडे हॉटेल्स आणि टुरिझमसाठी अनेकदा पैसे देऊन लोक अश्या जगापासून लांब असलेल्या पण तितकीच रहस्यमयी असलेल्या लोकांची पिढी नष्ट करत आहेत. ह्या बेटाच्या जवळ असलेल्या जरावा बेटावरील लोकांची झालेली स्थिती हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कित्येक शतके मुख्य प्रवाहापासून लांब असलेले हे लोक अचानक ह्या सो कॉल्ड टुरीस्टमुळे नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. निसर्गात राहून आपली एक संस्कृती जपणाऱ्या लोकांचं आयुष्य, संस्कृती तिकडे जाऊन नष्ट करण्याचा अधिकार कोणाला नाही. आजपर्यंत भारताने 'सेंटिनेलेसे' बेटाला सार्वभौमत्वाचा दर्जा देऊन त्याचं रक्षण केलं आहे. पण मागच्या दाराने ह्या भागाला पैश्यासाठी टुरिस्ट डेस्टिनेशन बनवण्याचा घाट घातला जात आहे. तो बनू नये तसेच आपण ह्या नष्ट करण्याऱ्या प्रक्रियेचा भाग न होऊ देण्याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे. 'सेंटिनेलेसे' हे भारताचा अविभाज्य अंग आहे आणि तिथली संस्कृती, लोक भारताचा भाग आहेत. एक भारतीय म्हणून ह्या सर्वांचं रक्षण करण्याचं कर्तव्य आपण त्यांना त्यांच्या जगात आनंदाने जगायला देऊन पूर्ण करू शकतो. इकडे बाहेरील लोकांना आणून पैसा कमवायला लागलो तर भारताच्या अनेक संस्कृतींप्रमाणे आपण ह्या अभिजात संस्कृतीला नक्कीच नष्ट करू.    

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment