Tuesday 31 January 2023

पद्मश्री मिळवणारे 'खतरों के खिलाडी'... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारे 'खतरों के खिलाडी'... विनीत वर्तक ©

चित्रपटात एकाच वेळी अनेक शत्रूंशी मारामारी करणारे आणि अनेक कठीण गोष्टी सहजगत्या करणारे कलाकार सगळ्यांच्या तोंडी हिरो म्हणून ओळखले जातात. अनेक प्रेक्षकांना त्यांच्या 'खतरों के खिलाडी' या इमेज चं खूप आकर्षण असते. पण वास्तवात मात्र या कलाकारांच व्यक्तिगत आयुष्य मात्र खूप वेगळं असते. पण तरीही ते अनेकांसाठी हिरो असतात. पण प्रत्यक्षातले खतरों के खिलाडी मात्र वास्तवात अगदी रोजच्या रोज जिवावर उदार होऊन अनेक संकटांशी सामना करत असतात. अनेकदा ते आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या नजरेत कधी येतच नाहीत. या वर्षीच्या पद्म सन्मानाच्या यादीत अश्याच दोन खतरों के खिलाडी च्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या पराक्रमाचे सूप फक्त भारतात नाही तर साता समुद्रापार अमेरिकेत वाजले. त्यानंतर संपूर्ण जगात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. हे सगळं घडल्यावर भारताने त्यांचा यावर्षीच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. ते खतरों के खिलाडी आहेत तामिळनाडू चे 'वाडीवेल गोपाल' आणि 'मासी सदायन'. 

वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन हे दोघेही इरुला या आदिवासी समाजाचे घटक आहेत. या समाजाचा साप आणि उंदीर पकडण्याशी ऐतिहासिक संबंध आहे. पिढ्यान पिढ्या त्यांच्याकडे साप आणि उंदिरांना कल्पकतेने पकडण्याचे ज्ञान हस्तांतरित होत आलेलं आहे. हे ज्ञान फक्त त्यांना पकडण्याचे नाही तर सापांचा विषारी दंश झाल्यावर त्या विषाची दाहकता कमी करण्यासाठी ज्या जंगली वनऔषधीचा वापर होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो याबद्दल ही आहे. १९७८ मधे इरुला स्नेक कॅचर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेमुळे हा समुदाय भारतातील विषविरोधी प्रदान करणारी एकमेव अधिकृत संस्था बनला. त्यामुळेच सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असलेल्या भारतासारख्या देशात, इरुला समुदायाचे कौशल्य आणि ज्ञान जीव वाचवण्यासाठी अमूल्य आहे. 

वाडीवेल गोपाळ आणि मासी यांनीही लहानपणापासूनच साप पकडायला सुरुवात केली. धोकादायक आणि विषारी साप पकडण्यात त्यांचे कौशल्य वाखण्यासारखं होते. अनेक ठिकाणी विषारी साप पकडण्यासाठी त्यांना बोलावलं जाऊ लागलं. अशा परिस्थितीत ते खतरों के खिलाडी ची जोडी म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आणि त्यांना अनेक राज्यांत बोलावले गेलं. अनेक ठिकाणी विषारी साप पकडून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले. कोणतंही अधिकृत शिक्षण नसताना परंपरेने चालत आलेली साप पकडण्याची पद्धत अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती. पण त्याच पद्धतीने त्यांनी सापाच्या दंशापासून आपलं संरक्षण करत अनेक विषारी सापांना पकडलं होतं. 

साधारण २ वर्षापूर्वी अमेरीकेत फ्लोरिडा राज्यात बर्मीज अजगरांनी धुमाकूळ घातला होता. अत्यंत धोकादायक असलेल्या या अजगरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून जवळपास ८०० साप पकडणाऱ्या लोकांना फ्लोरीडा इकडे बोलावलं गेलं. त्यात वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांना ही निमंत्रण होतं. वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांनी पुढल्या १० दिवसात १४ अत्यंत धोकादायक असलेल्या अजगरांना पकडून अमेरीकेच्या अधिकाऱ्यानं समोर आपली प्रतिभा मांडली. या जोडीने त्या ८०० जणांमधून सगळ्यात जास्ती अजगर पकडले. त्यांच्या साप पकडण्याच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झालेल्या अमेरीकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अमेरीकेच्या लोकांना त्यांच तंत्रज्ञान शिकवण्याची विनंती केली. अमेरीकेत आपल्या ज्ञानाचा डंका वाजवल्यामुळे त्यांना जगातील इतर अनेक देशातून त्यांना निमंत्रण आलं. थायलंड मधून तिथल्या सर्पतज्ञांना शिकवण्यासाठी पाचारण करण्यात आलं.

अमेरीका, थायलंड इकडे आपल्या प्रतिभेने सगळ्यांना प्रभावित केल्यावर खतरों के खिलाडी च्या जोडीने अनेक देशातून साप पकडण्याच्या आपल्या परंपरागत तंत्रज्ञानाला जगभरात तर पोहचवलं पण त्या पलीकडे जगातील अनेक लोकांना अत्यंत विषारी साप पकडण्यासाठी शिकवलं. भारताच्या एका आदिवासी आणि समाजाच्या रचनेत सगळ्या तळाशी असणाऱ्या व्यवस्थेतून त्यांनी आपलं कौशल्य सर्व जगात पसरवलं आणि त्यातून स्वतः सोबत, आपल्या समाजाचं आणि त्या निमित्ताने भारताचं नाव या क्षेत्रात अतिशय वर नेलं. 

त्यांच्या याच कार्याची दखल घेताना भारत सरकारने त्यांची या वर्षीच्या पद्म सन्मानासाठी निवड केली आहे. वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांचा खतरों के खिलाडी चा प्रवास नुसता त्यांच्या कौशल्यासाठी नाही तर समाजरचनेत आणि भारतीय लोकशाहीत होणाऱ्या बदलांसाठी अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. गेल्या काही वर्षापासून पद्म सन्मानाची व्याख्या बदलत जाते आहे. समाजातील सगळ्यात तळाशी असणारा व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने पद्म सन्मानाचा मानकरी ठरतो. तेव्हा तो सर्व प्रवास भारताची एक प्रतिमा निर्माण करतो जी जगात भारताचं नाव उंचावर नेण्यासाठी एक मैलाचा दगड ठरते. तूर्तास खतरों के खिलाडी वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन  यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



2 comments: