Monday 2 January 2023

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २८)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २८)... विनीत वर्तक © 

आजपासून जवळपास ५१ वर्षापूर्वी १६ डिसेंबर १९७१ ला पूर्व पाकिस्तान मधे ९३,००० पाकिस्तानी सैन्याने भारतीय सेनेपुढे सपशेल शरणागती पत्कारली. भारताची फाळणी करून इंग्रजांनी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान ची निर्मिती तर केली. पण एखादा देश चालवण्यासाठी लागणारं नेतृत्व तयार करायला ते विसरले. पाकिस्तानची निर्मिती मुळी द्वेषातून झाली आणि तोच द्वेष त्याच्या ऱ्हासास कारणीभूत इतिहासात ठरला होता. पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश ज्यात बहुसंख्य बांगला असणाऱ्या लोकांमध्ये पश्चिमेकडच्या मुस्लिम नेत्यांनी आपल्या पद्धतीने देश चालवायला सुरवात केली. तेव्हाच या असंतोषाची ठिणगी पडली. त्या ठिणगीच रूपांतर काही वर्षात वणव्यात झालं आणि पाकिस्तान ची शकले उडाली. संपूर्ण जगाला त्यामुळे आपल्या नकाशात एका नव्या राष्ट्राला स्थान द्यावं लागलं. हा सगळा इतिहास पुन्हा एकदा सांगण्याची गरज आता पुन्हा निर्माण झाली आहे कारण आता जागतिक वाऱ्यांनी पुन्हा एकदा दिशा बदललेली आहे. मतलई वारे आता खारे बनून पाकिस्तान ला झोंबायला लागले आहेत. या वाऱ्यांनी येणाऱ्या महाभयानक वादळाची चाहूल पाकिस्तान ला दिली आहे. त्यामुळे या वादळानंतर पुन्हा एकदा पाकिस्तान ची शकले उडणार अशी शक्यता वेगाने पुढे येत आहे. त्यामुळेच आपण याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत. 

२१ ऑक्टोबर २०११ चा दिवस होता जेव्हा अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तान मधे जाऊन एक वक्तव्य केलं होतं, त्या म्हणाल्या होत्या, 

"You can't keep snakes in your backyard and expect them only to bite your neighbors,"

या वाक्यात खूप मोठा संदर्भ दडलेला होता. एका अर्थाने भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची चाहूल त्यांनी पाकिस्तानी नेतृत्वाला एक प्रकारे करून दिली होती. हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तान मधील टेररिस्ट ग्रुप हक्कानी नेटवर्क च्या नेत्यांना भेटल्यावर केलेलं होतं. पण पाकिस्तान किंवा पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे सपशेल दुर्लक्ष करून आपल्या अंगणात या सापांना दूध पाजणं सुरु ठेवलं. त्यांना संरक्षण दिलं. आज जवळपास एका दशकानंतर या सापांनी पाकिस्ताला आपलं लक्ष्य बनवलेलं आहे. पाकिस्तान च्या हातातून गोष्टी निसटत चाललेल्या आहेत. पाकिस्तान ने जपलेले, वाढवलेले हेच साप आता त्यांना चावायला सरसावले आहेत. एकत्र आले आहेत. आता त्यांची मजल इतकी मोठी झाली आहे की त्यांनी पाकिस्तानी सरकारला चॅलेंज देऊन एक पर्यायी किंवा पॅरलल सरकार बनवलं आहे. त्यात मंत्रिमंडळ तसेच विविध खात्यांचे मंत्री सुद्धा निश्चित केले आहेत. काश्मीर च्या भूभागासाठी गेली ७ दशके सगळे उंबरठे झिझवणाऱ्या पाकिस्तान च्या हातातून काश्मीर पेक्षा कित्येक पट मोठा भूभाग आज निसटला आहे. त्यात प्रत्येक दिवशी भर पडत आहे. पण द्वेषातून आणि असूयेतून जन्म झालेल्या पाकिस्तानला आपण काय गमवत आहोत याची जाणीव आज सुद्धा होत नाही ही खरोखर एक मोठी शोकांतिका आहे. 

अफगाणिस्तान मधे तिथली लोकशाही राजवट उलथवून लावण्यासाठी पाकिस्तान ने पद्धतशीरपणे तालिबानी नेतृत्वाला आणि त्यांच्या अतिरेकी कारवायांना खतपाणी घातलं. अफगाणिस्तान ला खड्यात घालण्याच्या नादात आपण चुकीच्या लोकांना मोठं करतो आहोत याच भान पाकिस्तान विसरला. २००७ ला त्यातून मग Tehreek-e-Taliban-e-Pakistan (TTP) या संघटनेची स्थापना बैतुल्ला मेहसूद यांने पाकिस्तान मधील वझिरीस्तान प्रांतात केली. आधी अफगाणिस्तान तालिबान च्या छत्रछायेखाली या संघटनेने पाकिस्तान च्या आदिवासी आणि डोंगर भागात आपली पकड मजबूत केली. पाकिस्तान मधील लोकशाही आणि सैनिकी राजवट उलटवून तिकडे तालिबानी राजवट आणणं या संघटनेचं मुख्य ध्येय बनलं. त्यांनी एक छुप युद्ध पाकिस्तान च्या या भागात सुरु केलं. अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर असणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला टी.टी.पी. विरुद्ध लषकरी कारवाई करावी लागली. इकडून टी.टी.पी.आणि पाकिस्तानी सरकार यामधला असंतोष शिगेला पोहचला. जोवर अमेरिका सोबत होती तेव्हा पाकिस्तानी सैन्याला एक आत्मविश्वास होता आणि ते नेटाने लढा देत होते. आपली अमेरिका असेपर्यंत शिजणार नाही हे टी.टी.पी. ला कळून चुकलं आणि त्यांनी पाकिस्तानी सरकार सोबत २००४ साली एक शांतीचा करार केला. 

३० ऑगस्ट २०२१ ला अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं आणि तालिबान ने पुन्हा एकदा अफगाणिस्तान मधे आपली राजवट प्रस्थापित केली. एकीकडे तालिबान च्या हातात सत्ता आली आणि पुन्हा एकदा टी.टी.पी. ला पाकिस्तान वर हमला करण्याची संधी चालून आली. अमजद फारुकी गट, लष्कर-ए-झांगवीचा एक गट, मुसा शहीद कारवान गट, टीटीपीचे मेहसूद गट, मोहमंद तालिबान, बाजौर तालिबान, जमात-उल-अहरार आणि हिज्बुल-उल-अहरार हे टीटीपीमध्ये विलीन झाले. त्यामुळे टी.टी.पी.ची ताकद कमालीची वाढली. त्यात पाकिस्तान आर्थिक गर्तेत गटांगळ्या खात होता. पाकिस्तान जिकडे आर्थिक स्थितीवर आपलं लक्ष देत होता त्याचवेळी पाकिस्तान ची लष्करी पकड ढिली पडायला सुरवात झाली. नूर वली मेहसूद च्या नेतृत्वाखाली टी.टी.पी. ने आपला मोर्चा पुन्हा एकदा पश्चिम पाकिस्तान मधल्या गावांकडे आणि इथल्या प्रदेशाकडे वळवला. याच भागात पाकिस्तानी सरकार विरुद्ध बलोच आणि पश्तुन लोकांमधे प्रचंड चीड होती. बलुचिस्तान स्वतंत्र्य व्हावा यासाठी अनेक आंदोलन होत होती. चीन च मांडलिकत्व पत्करलेल्या पाकिस्तानी विशेष करून बलोच लोकांची मुस्कटदाबी चीन चे लोक बाहेरून येऊन करत होते. ज्याचा प्रचंड राग इथल्या लोकांमध्ये होता. साहजिक शत्रूचा शत्रू म्हणून टी.टी.पी. च्या सोबत बलोच आणि पश्तुन लोकांनी येऊन पाकिस्तानी सैन्याविरुद्ध हल्ला करायला सुरवात केली. 

एकीकडे ढासळलेली आर्थिक परिस्थिती त्यात पाकिस्तानी विरुद्ध एकटवलेल्या तालिबानी शक्ती या कचाट्यात पाकिस्तान गेल्या काही महिन्यात पूर्णपणे सापडलेला आहे. नूर वली मेहसूद ने पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य न करता एकतर्फी शांततेचा करार उल्लंघून पाकिस्तानी पोलिसांना आणि सैनिकांना लक्ष्य करण्याचा आदेश दिला. गेल्या महिन्याभरात त्यामुळेच पाकिस्तानी पोलिसांवर आणि सैनिकांवर आत्मघाती हल्ले झाले आहेत. टी.टी.पी. ने अनेक भूभागावर कब्जा करत आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. आता तर त्यांनी पॅरलल सरकार उभं करून पाकिस्तानी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. टी.टी.पी.च्या हालचालीचे हादरे पाकिस्तान ला बसायला सुरवात झाली आहे. पाकिस्तान ची आर्थिक स्थिती इतकी नाजूक आहे की सरकारकडे युद्ध करण्यासाठी पैसे पण नाहीत. सैनिकांचे पगार कसे द्यायचे या विवंचनेत पाकिस्तानी सरकार आहे. त्यामुळे लढा द्यायची हिंमत आणि आत्मविश्वास पाकिस्तान आर्मी एकप्रकारे हरवून बसली आहे. आता पाकिस्तान सरकार टी.टी.पी. वर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयात आलेली आहे. अर्थात हे हल्ले कितपत यशस्वी होतील याबाबत शंका आहे. कारण टी.टी.पी. करत असलेला हल्ला एकतर गनिमी काव्या प्रमाणे आत्मघाती असतो. त्यात पाकिस्तान चा हा प्रांत ओसाड डोंगररांगांनी भरलेला आहे. ज्यात लपण्यासाठी अनेक गुहा आणि जागा आहेत. 

या सगळ्यावर भारत लक्ष ठेवून आहे. कारण ज्या वेगाने गोष्टी घडत आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठी भारतावर आतंकवादी हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. तसेच पाकिस्तानातली बदलती राजकीय आणि सैनिकी गणित भारतासाठी महत्वाची आहेत. सायप्रस इकडे बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी एक प्रकारे पाकिस्तानला सुटकेचा मार्ग दाखवला आहे. पाकिस्तान ने जर आतंकवादाचा मार्ग सोडून सलोख्याचा मार्ग पत्करला तर भारत त्यांच आर्थिक संकट नाही तर पाकिस्तानची शकले उडण्यापासून त्यांच संरक्षण करू शकतो. अर्थात पाकिस्तानी नेतृत्व या गोष्टी स्विकारणार नाहीत हे उघड आहे. भारताशिवाय पाकिस्तान ला कोणीही वाचवू शकत नाही हे पण तितकं उघड सत्य आहे. चीन च्या आर्थिक धोरणाचा या सगळ्या घटनांनी बोजवारा उडाला आहे. अमेरिका तालिबान युद्धात उतरू इच्छित नाही. तर रशिया आपल्याच लढाईत व्यस्त आहे. या क्षणी एकच पर्याय आणि देश पाकिस्तान समोर आहे तो म्हणजे भारत. पण आपल्याच अहंकारात आणि द्वेषात डुबलेलं पाकिस्तानी नेतृत्व भारताची साथ करणार नाही असं दिसते. 

त्यामुळे येत्या काळात पाकिस्तान चा प्रवास शकले होण्याच्या मार्गावर झालेला असेल यात शंका नाही. येत्या काळात पाकिस्तान, बलुचिस्तान, पंजाब, सिंध अश्या ३-४ तुकड्यात विभागाला जाऊ शकतो. पुन्हा एकदा ५१ वर्षांनी जगाला आपल्या नकाशात बदल करण्याची परिस्थिती येऊ शकते असं सद्या तरी वाहणारे खारे वारे दाखवत आहेत. या वादळातून पुढे काय होणार हे आत्ता सांगणं कठीण असलं तरी पाकिस्तान जगासाठी खोदलेल्या खड्यात स्वतः पडणार हे एक प्रकारे निश्चित झालेलं आहे. फक्त त्यात पडायला किती वेळ आणि पडल्यावर त्याचे किती तुकडे होतील हे येणारा काळच सांगेल. 

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment