Monday, 1 February 2021

चित्रकथेला सातासमुद्रापार नेणारे पद्मश्री परशुराम गंगावणे... विनीत वर्तक ©

 चित्रकथेला सातासमुद्रापार नेणारे पद्मश्री परशुराम गंगावणे... विनीत वर्तक ©

आज पब जी चा जमाना आहे. एनिमेशन च्या जगात एकेमकांवर कुरघोडी करून तेच आपलं खरं आयुष्य मानणाऱ्या तरुण पिढीच्या हातातली साधन बदलली असली तरी मनोरंजनाचा हेतू तसाच कायम आहे. पण जेव्हा गेम खेळण्यासाठी कॉम्प्युटर, संवाद साधण्यासाठी हातात असणारे आय फोन नव्हते त्याकाळी मनोरंजनाची परिभाषा वेगळी होती. मनोरंजनातून समाजाला काहीतरी चांगली शिकवण देण्याचा हेतू आपल्या संस्कृतीत नेहमीच जपला गेला आहे. त्याच उद्देशाने आपल्या संस्कृतीत अनेक लोककलांचा उदय झाला. काळाच्या ओघात ह्यातील अनेक लोककला मागे पडल्या किंवा त्यांच अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. पण लोकांनी पाठ फिरवल्यावर सुद्धा आपल्या संस्कृतीच्या इतिहासातील त्या पानांची जपणूक करणारे पण आज आहेत. दुर्दैव असं की एकतर त्यांच्या कडे मागासलेलं म्हणून बघितलं जाते किंवा त्यांना योग्य तो मानसन्मान, पैसे समाजातून दिले जात नाहीत. पण तरीही जिद्दीने एक वारसा जपत तब्बल ५०० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा लोककला जपणारे कलाकार आज आपल्या महाराष्ट्रात आहेत ह्याचा सार्थ अभिमान आहे.

चित्रकथेचा मनोरंजनाचा खेळ हा महाराष्ट्रात एकेकाळी खूप प्रसिद्ध होता. गावोगावी हिंडून चित्रकलेतून अनेक कथा सांगणाऱ्या ह्या खेळातून अनेक गोष्टी  सांगितल्या जायच्या. प्रत्येक कथेतून समाजाला ते बघायला येणाऱ्या त्या गावातील प्रत्येक माणसाला एक संदेश, जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देण्याचं काम ह्या लोक कलेतून केलं जायचं. त्या त्या वेळच्या विषयांची सांगड घालून ते विषय प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे ही लोककला होती. समाजातील विषम परिस्थिती ते स्वराज्य सारखा विषय असो चित्रकथेच्या लोककलेने जनमानसात आपला प्रभाव पाडला होता. हेच कारण होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या कलेला राजाश्रय दिला होता. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र, भारत आपला जाणता राजा तब्बल ४०० वर्षानंतर ही मानतो त्याच राजाने आश्रय दिलेली ही कला मात्र अडगळीत गेली आहे. पण तरीही न थकता, उमेद न सोडता २१ व्या शतकात, पब जी च्या जमान्यात चित्रकथेच्या लोककलेला सातासमुद्रापार नेणारे कलाकार म्हणजेच सिंधुदुर्ग, महाराष्ट्रामधील 'श्री.परशुराम गंगावणे'.

विठ्ठलाला कोणता झेंडा हाती घेऊ असा प्रश्न विचारत मराठी अस्मितेचे गोडवे गाणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला हे नाव नवीन असेल. कारण मराठी अस्मिता किंवा मराठी माणूस ह्याबद्दल आपले ठोकताळे जात, राजकारण आणि पक्ष इकडेच येऊन थांबतात. आज च्या जमान्यात शिवछत्रपतींनी जोपासलेली ही लोककला त्याच जिद्दीने जोपासत, त्याचा प्रसार नुसता महाराष्ट्र आणि भारतापुरता मर्यादित न ठेवता परशुराम गंगावणे ह्यांनी चित्रकथेला अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात नेण्याचं शिवधनुष्य ही उचललं आहे. खंत एकच जिकडे ह्या देशातून लोक गंगावणे ह्यांचा शोध घेऊन ही कला बघतात. तिकडे सो कॉल्ड मराठी अस्मिता जपणारी मराठी माणसं कोकणात गोव्याला जाताना पिंगुळी, सिंधुदुर्ग इकडे वळून २ रुपये शुल्क असलेल्या परशुराम गंगावणे ह्यांच्या चित्रकथेच्या म्युझिअम ला भेट देत नाहीत. गोवा आणि कोकणातील प्रत्येक बीच, हॉटेल आणि दारूचे आकडेसुद्धा तोंडपाठ असणारे तुम्ही,आम्ही मुळात असं काही महाराष्ट्रात, आमच्या कोकणात आहे ह्याबद्दल अनभिज्ञ असतो आणि कदाचित ती मराठी अस्मितेची शोकांतिका आहे. 

आपल्या आधीच्या पिढीकडून मिळालेला कलेचा वारसा पुढल्या पिढीकडे देण्यासाठी परशुराम गंगावणे ह्यांची धडपड सुरु आहे. आपल्या मुलांना त्याचे बाळकडू देताना ह्या लोककले बद्दल माहिती पुन्हा एकदा जनमानसात पोहचवण्यासाठी त्यांचे निरंतर प्रयत्न सुरु आहेत. २००६ साली आपल्या चित्रकथेचं  प्रदर्शन मांडण्यासाठी अक्षरशः गुरांच्या गोठ्यात त्यांनी आपल्या म्युझिअम ची मुहूर्तमेढ रोवली. अवघे २ रुपये शुल्क आकारून कळसूत्री बाहुल्या, चित्रकथेचं  सादरीकरण, त्याचा प्रवास, त्यातील वेशभूषा ह्या सगळ्याचा अविष्कार त्यांनी समाजासमोर मांडला. ५०० वर्ष जुन्या चित्रकथेच्या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी तसेच ही लोककला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २०२१ सालचा पद्मश्री सन्मान जाहीर केला आहे. चित्रकथा आज नुसती लोककला राहिलेली नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृती मधील सोन्याचं एक पान आहे. 

परशुराम गंगावणे ह्यांच कार्य इकडेच थांबलेलं नाही. आज त्यांनी जोपासलेल्या लोककलेवर एक परदेशी माणूस संशोधन करत आहे. आज कला शाखेतील अनेक विद्यार्थी इकडे येऊन त्यांच मार्गदर्शन घेत आहेत. आज महाराष्ट्रासह, भारतात त्यांच्या चित्रकथेचे खेळ आयोजित करत आहेत. पण गरज आहे ती त्या चित्रकथांना आपल्या संस्कृतीचं भाग बनवण्याची आज त्या लोककलेला आणि ते सादर करणाऱ्या लोकांना त्यांच स्थान देण्याची. कदाचित मराठी माणसाने ते केलं तर मराठी अस्मिता नक्कीच जपली गेली असं मी म्हणेन. चित्रकथांची लोककला जपून त्याला मोठं करणाऱ्या पद्मश्री परशुराम गंगावणे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

जय महाराष्ट्र!!! 

 फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment