एका आशाची गोष्ट... विनीत वर्तक ©
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आजवर अनेक लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. काही लोकांच अस्तित्व इतिहासाच्या पानात लुप्त झालं तर काही जणांच मुद्दामून लुप्त केलं गेलं. अहिंसेच्या मार्गाने आपण ब्रिटिशांना झुकवू आणि त्यांना भारत सोडण्यास भाग पाडू असं मानणारा एक गट होता तर स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवायचं तर त्याची किंमत मोजावी लागते. वेळप्रसंगी गोळी चालवावी लागते असं मानणारा एक गट होता. 'लोहा लोहे को काटता है' त्याप्रमाणे ब्रिटिशांना अद्दल घडवायची असेल तर त्यांच्या प्रमाणे आपण आपली सेना उभी केली पाहिजे असं स्वप्न ज्यांनी बघितलं आणि Indian National Army म्हणजेच आझाद हिंद सेनेची स्थापना ज्यांनी केली ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या आझाद हिंद सेनेत असे अनेक लढवय्ये होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व दिलं. ह्यात नुसते पुरुष पुढे नव्हते तर भारतीय स्त्रियांनी पण त्यात आपलं योगदान दिलं होतं. चूल आणि मूल ह्यात रमणाऱ्या भारतीय स्री ने बंदूक हातात घेऊन ब्रिटिश साम्राज्याला तडाखे दिले होते. त्यात होती एक छोटीशी 'आशा'.
दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होत. ५ जुलै १९४३ चा दिवस होता जेव्हा रंगून, बर्मा (आत्ताच यंगून, म्यानमार) इथल्या जुबली हॉल मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस एक ऐतिहासिक भाषण करत होते. त्यात त्यांनी उपस्थित जनसमुदायापुढे घोषणा केली. ती म्हणजे 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा'. नेताजींच्या त्या भाषणाने संपूर्ण सभागृह तर स्तब्ध झालं पण त्याचे पडसाद जगाच्या कोपऱ्यात उमटले. कोबे, जपान इकडे १५ वर्षाच्या 'आशा सहाय' च्या त्या बालमनावर ह्या शब्दांनी घर केलं ते कायमच. नेताजींची भाषण आणि स्वातंत्र्य लढ्याची साद त्या तरुण मनात सतत पिंगा घालत होती. त्यातच त्यांना भेटण्याचा योग्य १९४४ साली आला. जपान च्या इंपिरियल हॉटेल मध्ये १६ वर्षाची छोटी आशा नेताजींना भेटली. ज्यांना आपण आदर्श मानतो अश्या गुरुतुल्य व्यक्तीला भेटल्यावर सहाजिक भारतीय संस्काराप्रमाणे त्यांच्या पाया पडली. पण क्षणाचाही विलंब न करता नेताजींनी तिला सांगितलं, उभी रहा आणि बोल 'जय हिंद'. ते शब्द, तो बाणा, ते देशप्रेम बघून आशा सहाय ह्यांनी आझाद हिंद सेनेच्या ' झाशी च्या राणी' या तुकडीत समाविष्ट करण्यासाठी सांगितलं. पण नेताजींनी त्यांना १७ वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबायला संगीतलं.
वयाची १७ वर्ष पूर्ण झाल्यावर आशा सहाय ह्यांना आझाद हिंद सेनेचा भाग होण्याचे वेध लागले. पण बँकॉक, थायलंड इकडे जपान वरून जाण्यासाठी त्यांना विमान उपलब्ध नव्हतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करायचं ठरवतो तेव्हा साक्षात देव सुद्धा अडवू शकत नाही. म्हणतात ना,
ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है!!!
आशा सहाय आणि त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात मध्ये वापरल्या गेलेल्या बॉम्ब वर्षाव करणाऱ्या लढाऊ विमानातून जपान ते थायलंड हा प्रवास केला. अतिशय जोखमीच्या त्या प्रवासाचं लक्ष्य एकच होतं ते म्हणजे कसही करून आझाद हिंद सेनेचा भाग व्हायचं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. वयाच्या १७ व्या वर्षी आयुष्यच एकच स्वप्न त्यांनी निवडलं ते म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करणं.
आझाद हिंद सेनेत प्रवेश केल्यावर त्यांच ६ महिन्याचं गोरिला ट्रेनिंग झालं. कार, जीप, ट्रक चालवण्यापासून ते बंदूक, चाकू, रायफल आणि अगदी विमान विरोधी बंदूक चालवण्या पर्यंत सगळं शिकल्यावर आझाद हिंद सेनेमध्ये लेफ्टनंट आशा सहाय ह्यांनी प्रवेश घेतला. वास्तविक नर्सिंग सारखा पर्याय उपलब्ध असताना त्यांनी ब्रिटिशांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. रंगून, इंफाळ इकडे लष्करी कारवाईत त्यांनी सहभाग घेतला. ब्रिटिशांना संपूर्णपणे भारतातून उखडून टाकण्याचे आझाद हिंद सेनेचे मनसुबे पूर्णत्वाला गेले नाहीत. पराभवानंतर बँकॉक वरून सिंगापूर ला जाताना त्यांच्या विमानाला शत्रूने लक्ष्य केलं पण कसबसं त्यांना चुकवत त्या सिंगापूर इकडे उतरल्या. आझाद हिंद सेना हरली पण नेताजींनी पेटवलेली देशप्रेमाची ज्योत आजतागायत तेवत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लेफ्टनंट आशा सहाय इतिहासाच्या पानात लुप्त झाल्या. स्वतंत्र्य भारतात त्यांनी आपलं देशसेवेच व्रत निरंतर सुरू ठेवलं. भागलपूर, बिहार मधल्या अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याचं आपलं व्रत त्यांनी सुरु केलं. गुरगाव ते बिहार हा प्रवास करत त्यांनी बिहार मधल्या खेड्यापाड्यात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. येत्या २ फेब्रुवारी त्यांनी ९२ व्या वर्षात प्रवेश केला.पण आजही नेताजींनी दिलेला मंत्र तंतोतंत पाळत आलेल्या आहेत. तो म्हणजे,
'That is That' ( जे झालं ते झालं ते बदलणार नाही.)
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या आझाद हिंद सेनेच्या लेफ्टनंट आशा सहाय यांना माझा साष्टांग नमस्कार. निदान हा लेख वाचून तरी भारतातल्या लोकांना खरं स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं ह्याची जाणीव होईल ह्याच आशेवर इकडे थांबतो. मनात एकाच खंत की ज्यांनी देशासाठी आपलं रक्त दिलं त्या महान माणसांना स्वतंत्र्य झालेल्या भारतात कोणी ओळखत नाही. इतकच काय की त्यांची साधी माहिती पण कुठे उजेडात येत नाही.
लेफ्टनंट आशा सहाय तुमच्या कार्याला ह्या भारतीयाचा कडक सॅल्यूट...
जय हिंद!!!
फोटो स्रोत:- गुगल
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment