Monday, 17 June 2013


सखी R A,
गेले २० वर्ष बघतो आहे तुला. ८ वीच्या क्लास मधली आपली ओळख इतकी वर्ष टिकून राहील अस अजिबात वाटल नव्हत. पहिला दिवस क्लास चा आणि आपण दोघेही पहिल्या रांगेत. तुझी ओळख सुद्धा नानांनी करून दिली हि माझ्याच बिल्डींग मध्ये राहते. ते दोन गोल काचेचे गोळे आणि त्या मागील तुझे बारीकसे डोळे मला अजून हि आठवतात. काळाच्या ओघात तुझी ती काच कधीच निघून गेली तो भाग वेगळा. पहिली दोन वर्षे तर अशीच गेली. तुला चिडवता चिडवता कधी तुझ्याशी मैत्री झाली हे मला सुधा कळल नाही. खर तर मंतरलेले दिवस होते. १० वी चा वर्ष कस उजाडल आणि संपून गेल कळलच नाही.

रिझल्ट लागले आणि तू ठरवल्याप्रमाणे आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेलीस. मी माझ्या क्षेत्रात गेलो जरी माझी तितकी इच्चा नव्हती. आपल्यातील अंतर कधी वाढल ते कळलच नाही. परत एकदा भेटलीस स्टेशन वर अचानक एक दिवस मला तुझी ट्रेन कळली माझ्या वेळेच्या आसपास होती. मग काय रोज किंवा निदान २-३ दिवस आपली ओझरती भेट व्हायला लागली पण मैत्री कुठे वाढत नव्हतीच कशी आणि कसा आहेस ह्या पलीकडे आपण जास्ती काही बोलतच नव्हतो आणि नंतर परत आपण वेगळे झालो.

बरीच वर्षे गेली तू कुठे आहेस काय करतेस काहीच माहित नव्हता. तू आपल्या अभ्यासात आणि मी आपल्या करियर मध्ये धडपडत होतो. एक दिवस रस्त्यात भेटलीस तेव्हा कळले कि पदवी अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठात तू पहिली आली आहेस. तुला जितका आनंद झाला नसेल तितका मला झाला. एक मैत्रीण जिला अगदी जवळून ओळखतो जरी आपण जास्ती बोललो नसलो तरी तुझ्याबद्दल खूप काही माहिती होतच. मास्टर (पद्व्युतर) मध्ये सुद्धा तू मुंबई विद्यापीठातून पहिली आलीस. मला जेव्हा कळले तेव्हा तुझा खूपच अभिमान वाटला. कोलेज च विश्व आणि खरी परिस्तिथी वेगळी होती. तुला माहित आहे काय ती. तुझ्या त्या १० किलोच्या सर्तीफिकीत च्या पिशवीला कोणी एक चांगली नोकरी देत नव्हता हे बघून मला कसच झाल.

त्या वेळी पहिल्यांदा कळल कि हुशारी आणि नोकरी ह्याचा काही एक संबंध नसतो. त्या काळात पुन्हा एकदा आपली छान मैत्री फुलली बरच काही शेअरिंग झाल. त्या नंतर पुन्हा एका नवीन वळणावर आपण दोघे लांब गेलो आणि ते हि तब्बल ७ वर्ष. ह्या काळात बरच पाणी वाहून गेल. जरी आपण बोलत नसलो तरी तू काय करतेस आणि कशी आहेस ह्याची माहिती होतीच मला. तू रेडीओ ज्योकी सारख वेगळ क्षेत्र निवडलस. मला खात्री होती कि तुझ नाण खणखणीत आहे ते नक्की वाजणार तू जिकडे जाशील तिकडे तुझी मेहनत, जिद्द, हुशारी ह्यांनी तू खूप उंचावर जाणार हे आधीच माहित होत.
गेली १०-१२ वर्ष तू रेडीओ ज्योकी आहेस. तुझा फ्यान क्लब आहे. मला वाटते माझ्यापेक्षा तुझे कार्यक्रम कसे असतात हे महाराष्ट्रातील प्रत्येक रेडीओ ऐकणारा श्रोता सांगू शकेल. मी त्यावर जास्ती काही बोलायची गरज नाही. ४ वर्षापूर्वी आपण परत बोलू लागलो त्या पेक्षा मी म्हणेन कि एका मुरलेल्या लोणच्यासारखी आपली मैत्री घट्ट झाली. तुझ कार्यक्रम, पुस्तक, वाचन , साहित्य , शिक्षण,. एकही असा विषय नव्हता ज्यावर आपण वाद घातले नाहीत. श्रोता म्हणून तुझे कार्यक्रम ऐकले नसले तरी तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाबद्दल माहित होतच. पुस्तक लिहण्याच असो किंवा कार्यक्रम करण्याच असो तू सगळीकडे नंबर १ राहिलीस..

गेले २० वर्षामध्ये तुझी सगळी जडण घडण बघितली आहे. तुझे व्याप , त्रास नी इतर काही गोष्टी तुझा संघर्ष सगळाच मला माहित आहे. लोकांना तो कधी कळणार हि नाही आणि दिसणार हि नाही. म्हणून तर तूझ यश हे माझ्यासाठी जास्ती महत्वाच आहे. कारण त्या मागील त्याग , धडपड , इच्चा , जिद्द, वेळ प्रसंगी टोमणे , कुटुंब आणि एक बायको , मुलगी , आणि आई ह्या सर्व नात्यांना बरोबर घेऊन तू आज इतक्या वरती विराजमान आहेस. आणि त्यातही तुला त्रास देणाऱ्या मित्राला तू विसरली नाहीस. आजही एक मैत्रीच सुंदर नात सगळ्याच पातळीवर जपून ठेवल आहेस. इतकी प्रसिद्ध आणि मोठी असून सुधा कुठेही तुझ्या बोलण्यात मला तो कुठे जाणवल नाही. माझ्यासाठी तू आजही ती २० वर्षापूर्वी होतीस तशी आहे आणि तुझ्यासाठी मी तो एक टवाळकी करणारा मित्र आहे..

विनीत वर्तक. 

Thursday, 13 June 2013


शाळा.....

शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तर आपला एक घर करून असते. तोच तो किलबिलाट मुलांचा. तेच ते वर्ग तेच ते बेंच त्यावर कधी आपण इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या होत्या तीच ती खिडकी त्यातून आपण गच्ची शोधायचो आपल्या घराच्या बाजूची आज शाळेजवळून जाताना हेच मनात येत. आयुष्याची १५ वर्ष आपण इकडे काढली. त्या नंतर आता १८ वर्ष झाली पण ती १५ वर्ष आयुष्यातील सगळ्यात सोनेरी होती.

त्या ३ बेल रोज शाळा भरताना होणार्या आणि सगळ्यात जास्ती लक्षात तर मधल्या सुटीच्या त्या बेल ची तर इतकी आतुरतेने वाट बघयायचो. एक दिवस असा गेला नाही कि मधली सुट्टी झाली नाही. मधल्या सुट्टीमधील एकमेकांचे डबे खाण आणि मस्ती. शाळेतल्या त्या बाकांवर करकटकाने कोरलेले ते शब्द आणि शाळेतल्या भिंतीवर लिहिलेली कोपी अजून हि तसच अगदी कोरलेल आहे. प्रत्येक बेंच खास त्या साठी खास हलवा हलव बाकांची आणि जागा पकडण्यासाठी केलेली धावपळ अगदी पिऊन चा डोळा चुकवून सगळ्यात आधी शाळेत घुसण्यासाठी केलेली धडपड १२.४० च्या शाळेसाठी ११.१५ ला रांगेत उभ राहाण आणि सगळ्यात आधी वर्गात जाण सगळच आठवते.

शिक्षकांच्या हातचा खाल्लेला मार आणि शिक्षेसाठी वर्गबाहेर काढल्यावर दुसर्या वर्गातल्या मुलांबरोबर होणारी मस्ती त्याच बरोबर मुलींचे ते तिरके कटाक्ष सगळच आहे. वर्गातल्या फ्यान वर मारलेले खडूचे तुकडे आणि सोडलेली रोकेट आणि वर्ग मोनितर ने नाव लिहून मारलेल्या २५ फुल्या आणि तरीसुद्धा त्याला न जुमानता आपले पेनाचे चाललेले खेळ. मधल्या सुट्टीत कागदाच्या बोल आणि वहिने चालेलेल क्रिकेट ज्याची तोड आजच्या २०-२० ला पण नाही. वाचायला मिळाव म्हणून वर्गात केलेलं झोपेच नाटक आणि बेंच वर फक्त तिच्यासाठी सोडलेली जागा. ते तुझ लाजून हसण आणि हळूच मग मैत्रिणीशी बोलण मग मी उगाच तुझ्याकडे बघत राहाण सगळच आहे आजही तिकडेच.

अभ्यास करणे कधी जमलेच नाही व्यवसाय तर कधीच सोडवून आणला नाही. तरीपण काही शिक्षक अगदी जीव तोडून शिकवणार आणि खरच त्यांचा तास अगदी लक्ष देऊन ऐकणार. पाठीवर बसणारे ते धपाटे आणि हातावर मिळणारा पट्टीचा मार आणि कानाला बसणारा पीळ, बाकावर उभ राहून पूर्ण वर्गाच स्मारक त्यातही कितीही लागल तरी इज्जतीचा प्रश्न म्हणून गप्प बसणारा मी अजूनही तसाच आहे. पी टी च्या तासाला लंगडी साठी भांडणारे आपण आणि त्याच वेळी हरलो म्हणून रागावणारे एकाच वर्गातले आपण शाळेच्या मासिकासाठी कधी एकत्र काम करायचो ते कळायचं सुधा नाही.

शेवटच्या लाईन मधला तो शेवटचा बेंचच्या खालची जागा म्हणजे हक्काची झोपायची जागा. ती जागा कोणतेच शिक्षक कधी शोधू शकले नाहीत. परीक्षेच्या आधी आखा बेंच उत्तरांनी भरून जायचा आणि मग परीक्षा देताना ते लपवण आणि पकडल तर मी नाही कोणी लिहिल ते माहित नाही म्हणून सांगण ती शाई ती अक्षर अजून तशीच आहेत. शेवटचा पेपर संपल्यावर भेळ खाण. उत्तर पत्रिका बांधताना त्याला १५ गाठी मारण आणि ते दोरे उगाच मागण. शाळा सुटली कि जीवाच्या आकांताने धावण, ती रांगेतील धक्काबुक्की आणि हुशार मुलींचे ते तिरके कटाक्ष बघून सांगण कि मी नाही मागून धक्का आला. खाली उतरल्यावर टवाळक्या करण. तू बस पकडे पर्यंत तिकडेच तुला बघत थांबण आणि मग बसच्या बरोबर घरी जाण.

तिळगुळ समारंभ ला एकदम छान छान कपडे घालून सगळ्या वर्गात उगाच फुशारक्या मारत फीरण आणि शिक्षक दिनाच्या दिवशी सगळ्या वात्रट मुलांना सांभाळण्याच कंत्राट घेण अजून हि लक्षात आहे. प्राथनेच्या वेळी जय हिंद म्हणताना तो हात जोरात फिरवण कि बाजुच्याला लागलच पाहिजे. टीचर्स रूम मध्ये जाताना नकळत पेपर बघण आपल्या मार्कांपेक्षा दुसर्याच्या मार्कांची चौकशी करण आणि त्यात ते लक्षात ठेवण. तो शाळेचा शेवटचा दिवस अजून हि लक्षात आहे. त्या वेळी कधी शाळा बंद होते अस झालेल तर आज ती का बंद झाली अस वाटण. ते क्षण अजून हि तसेच आहेत. शाळा हि तिकडे आहे. पण बदलले ते विद्यार्थी आणि शिक्षक. ते बेंच आजही वाट बघतात त्या भिंती अजून हि तश्याच आहेत आणि त्यावर कोरलेली उत्तर सुद्धा.

आज शाळे जवळून जाताना सगळ आठवते. सगळे मित्र मैत्रिणी शिक्षक आणि ते वर्ग सगळच पण नाही आहे तो किलबिलाट मित्रांचा, नाही आहे ते ओरडणं शिक्षकांचं, नाही आहे तो माझा शाळेचा ड्रेस आणि नाही आहे तो माझा निरागसपणा............................

विनीत वर्तक                  

Wednesday, 12 June 2013


एका अनामिकेचा दिवस ...

तो कोसळत होता असाच न सांगता माहित नाही कधी थांबणार होता तो. तरी आज दिवस त्याच होता. त्याच्या येण्याने कुठेतरी सुखावलो तरी मनातून मात्र तुझ्या आठवणीच्या कप्यात ओढलो गेलो. अंधेरी स्टेशन वर रोज सकाळी आपली नजरभेट व्ह्याचीच. तू जायची दादर ला तर मी मित्राची वाट बघत असायचो. रोजचाच तो कटाक्ष आणि ७.४३ ची तुझी दादर लोकल कधीच काही चुकल नाही. त्या दिवशी तो कोसळत होता असाच आजच्या सारखा आणि तुला यायला उशीर झाला. गाडीत चढता चढता तुझी छत्री मात्र राहिली मागे आणि तू गेली पुढे. राहिलेली छत्री मी घेतली लोकांकडून सांगून कि मी 
तुला ओळखतो. दुसर्या दिवशीची ७.४३ ची लोकल मी विसरूच शकत नाही.

त्या दिवशी पाउस जरा जास्तीच होता आज मी दोन गाड्या अगोदर आलो होतो कारण तुझी छत्री परत करायची होती न तू आलीस तोच तो कटाक्ष आणि तिच ती हळुवार नजर. सुरवात कुठून करू मी मला उमगलच नाही. शेवटी केलाच धीर आणि केली छत्री पुढे. तुझी छत्री बघून तू ७.४३ विसरून गेलीस आणि किती आनंद झाला तुला. तुझ ते हास्य आणि आनंद अजून हि आहे डोळ्यासमोर. तुझी लोकल हि गेली मग तू म्हणालीस कोफी घेऊयात ह्या कोसळत्या पावसात मला घाम निघाला कारण मी कधी विचारच केला नव्हता.

म्याक्डोनाल्ड मध्ये कोफी घेताना तुझा तो कटाक्ष मला भूल घालत होता. तो चुकून हळुवार झालेला स्पर्श , ती नजर , तो कुद्कुडणारा आवाज आजही सगळ तसच आहे. तू धन्यवाद म्हंटलस पण माझ लक्ष होतच कुठे मी तर तुझ्यात कधीच हरवून गेलो होतो. तू मला बरच काही सांगत होतीस आणि मी हो ला हो म्हणत होतो. कोणत्या धुंदीत होतो माझ मलाच ठाऊक नव्हत. अचानक तो थांबला. मी घड्याळाकडे बघितल ८.३० वाजून गेले होते. आज ऑफिस ला जाण्यात काहीच रस नव्हता.

अचानक तू विचारलस जाऊ या का जुहू ला. तुझ्या ह्या विचार्ण्यानेच मला ४४० व्होल्त  चा झटका बसला. अगदी मनातले शब्द तोंडावर यावेत अशी अवस्था माझी होती. माझा होकार तर केव्हाच तयार होता. आपण गेलो तेव्हा तो कोसळत होता आणि तू भिजण्याच्या मूड मध्ये होतीस. तो कोसळत होता आणि समुद्र उधनावर होता ह्या दोहोत माझी अवस्था मात्र फारच बिकट होती. तू भिजून पाण्यात उद्या मारत होतीस मलाही भिजवत होतीस. मी तर तिकडे नव्हतोच मी तुझ्या मध्ये कधीच भिजलो होतो.

पूर्ण दिवस आपण एकत्र घालवला तू तुझ्या कोलेज चे किस्से सांगितले तर मी माझ्या ऑफिस चे. आपण दोघेही आत्ता भेटलो आहोत ह्याचे भान दोघांना हि नव्हते. शेवटी समारोपाची वेळ आलीच. तुला मी तुझ नाव पण नव्हत विचारल. मी म्हणालो तुझ नाव काय? तू म्हणालीस अनामिका तू विचारल तुझ मी म्हणालो अनामिक. मी विचारल तुझा नंबर दे? तू म्हणाली आजचा दिवस लक्षात ठेव परत भेटू नाही भेटू. तुझ्या त्या बोलण्याने मला क्षणभर काय बोलावे कळेना. तू गेलीस निघून एक नेहमीचा हसरा कटाक्ष टाकून. दुसर्याच दिवशी मला १ महिना बाहेर जावे लागले ऑफिस च्या कामानिमित्त. एक महिन्यांनी आलो पण ७.४३ ला तू दिसलीच नाहीस. गेले वर्षभर ७.४३ ची वाट बघतो त्याच ठिकाणी त्याच वेळी. आज पण हा कोसळतो आहे. आज वाटते कि तू येशील तशीच धावत धावत आणि मी असीन छत्री घेऊन तीच ती त्या दिवशी परत करायला विसरून गेलो होतो ती..........

विनीत वर्तक

न लिहिलेली एक आठवण,,

आज खूप दिवसांनी तुझी आठवण आली. कारण काहीच नव्हते. कधीतरी भूतकाळात शिरला कि तुझा स्पर्श झाल्याशिवाय मन पुढे जातच नाही. काय न ते मंतरलेले दिवस होते. मला आठवतो आहे तो ट्रेक जिकडे तुझी आणि माझी भेट झाली. तुझे स्यान्दल तुटले आणि त्यात तुझा पहिलाच ट्रेक. ट्रेक चे एक्स्पर्ट म्हणून आम्ही आपले शेवटी सगळ्यांना घेऊन बरोबर पोहचत करणारे. सगळे निघून गेले. तुझा रडवेला चेहरा मला बघवेना. मग काय आमचे पादत्राणे आपल्या पायात आणि आम्ही अनवाणी. अख्खा ट्रेक उतरलो तसाच अनवाणी. पायात किती दगड लागले त्याची मोजदात नाही. तू मात्र थ्यांक्स म्हणून जास्ती काही बोललीस नाहीस. तुझ ते गप्प राहाण मला त्या दिवशी उमगलच नव्हत. त्या नंतरचे ते ३ दिवस कधीच विसरू शकत नाही.

रोज आपण भेटत होतो कधी फोटो देण्याच्या निमिताने तर कधी घेण्याच्या अख्खा वेळ फोन वर आणि संध्याकाळी भेटून सुद्धा मन भरतच नव्हत. ३ दिवशी तू सांगितलस जे तुला पहिल्याच दिवशी जाणवल होत आणि तू का बोलली नाहीस हे मला तेव्हा कळल. मग काय मंतरलेले दिवस असेच जात राहिले आणि आयुष्याच्या एका वेगळ्याच वाटेवर एका वेगळ्याच धुंदीत आपण उडत होतो. कधीतरी परतायचं हे ठाऊक असून सुधा आपण ती धुंदी अनुभवत होतो.

शेवटी आलाच तो दिवस जिकडे आयुष्याच्या प्रत्येक क्षणांची बेरीज वजाबाकी करू लागलो. शेवटी व्हायचं होत तेच झाल. ह्या बेरीज वजाबाकीत बाकी शून्य कधी झाली ते आपल्याला समजलच नाही. त्या देवळाच्या बाकावर तू मला शेवटची भेटलीस मी म्हणालो तू ला जा बाई तुझ्यासारख्या मला हजार मिळतील. मनात म्हंटल बघणार एकीकडे पण नाही पण तुझ्या भल्यासाठी दगड मनावर ठेवावा लागणारच होता. तू गेलीस दुसर्या दिवशी मला फोन केला ऑफिस मध्ये कि तू नाही जगू शकत माझ्याशिवाय आणि २-३ अस्पिरीन च्या गोळ्या घेतल्या. तुला समजावण्यात माझा पूर्ण दिवस गेला मी आतून पूर्ण कोलमडलो होतो पण काय सांगू आणि दाखवू तुला.

आज ज्याच्यासाठी तू मला सोडून गेलीस ते सर्व माझ्याकडे आहे पण तू नाहीस. आयुष्याच्या त्या क्षणांची स्वप्न तू मला सर्वप्रथम दाखवलीस आणि मला समजून घेतलस त्या साठी नेहमीच ऋणी आहे. आज तू तुझ्या आयुष्यात तर मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. पण आठवणीच्या गारांचा पाउस कधी तरी येतो आणि सगळ काही बदलून जाते. पुन्हा त्या गारा विरगळतात आणि पाण्याच अस्तित्व ठेवतात......................

विनीत वर्तक ...     

Sunday, 9 June 2013

सइ चा वाढदिवस – एक वेगळा अनुभव.

२०१३ साल उजाडले त्या वेळेसच ह्या वर्षी सई च्या वाढदिवसाला काय करावे हा विचार डोक्यात आला. सई आता ३ वर्षाची होणार त्यामुळे ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने तो साजरा करावा अस मनात चालू असतानाच केतन बोंद्रे शी ह्या संबंधात बोलण झाल. केतन ने विहीगाव ला एखादा कार्यक्रम घेऊन त्यात सइ ला आणावे अशी कल्पना मांडली. मला पण हि कल्पना आवडली. नंतर मानसी कुलकर्णी ने तिच्या टीम बरोबर ह्या सर्व कार्यक्रमाची आखणी केली.
मुंबई आणि नाशिक ह्या दोन्ही शहरांच्या मध्ये असलेल एक छोट खेड. दोन शहरांच्या मध्ये असूनही विकासाची गंगा कोसो दूर आहे. पाणी , वीज ह्या मुलभूत गरजांचा अभाव आहे. अश्या स्तिथीत कस जीवन असेल ह्याचा मी विचार करत होतो. घरी २ तास वीज नसेल तर जीव नकोसा होतो ज्यांनी कधी एसी तर जाऊन दे पंखा बघितला नाही ते कसे राहत असतील. पाण्यासाठी रोज ४-५ किमी चालणे ते सुधा ३-४ कळश्या डोक्यावर घेऊन आणि ते भरण्यासाठी सकाळी २.३० वाजता जाने हे सगळच आपण दोन ध्रुवांवर राहतो ह्याची जाणीव होत होती.

सई चा वाढदिवस हे तर एक निम्मित होत सतत घडल्याच्या कट्या प्रमाणे न थकता धावणारा मी कधी बाजूला होऊन आसपास काय आहे ह्याचा मागोवा घेण्याच मी ठरवल होत. २६ मे ला जेव्हा मी तिकडे गेलो अनुभवल त्याने खूप काही शिकवल. ७५-८० मुलांच्या सानिध्यात दिवस कसा गेला कळलाच नाही. मानसी आणि सर्वच टीम ने कार्यक्रमाची इतकी सुंदर आखणी केली होती कि त्या सगळ्या मुलांन सोबत सई सुधा खूप रमली. महत्वाचे म्हणजे तिची मातीत खेळायची इच्चा खूप दिवसांनी पूर्ण झाली. एक काळ असा होता कि आई बाबा मातीत जास्ती खेळू नको म्हणून ओरडायचे आज बाबांच्या भूमिकेमध्ये मला माझ्या मुलीला माती शोधून द्यावी लागते ह्यातच आपण किती वेगळे झालो आहोत हे स्पष्ट होते.

आपला मुलगा , मुलगी कुठे आहेत?? त्याचं पुढे काय होणार?? तो/ ती डॉक्टर होणार कि कम्प्युटर इंजिनियर?? एस एस सी कि सी बी एस की?? शाळेची बस कि कार?? शिक्षक आहेत कि नाही ?? कथक कि फोक डान्स? ९९% कि ९५%?? पहिला कि दुसरा?? २० लाख कि ५० लाख??  भारतात पदव्युतर शिक्षण कि अमेरिकेत ??? ह्या असल्या आणि अनेक प्रश्न असणाऱ्या आजच्या आई बाबांच्या तुलनेत येथील आई बाबा मला कुठेच दिसले नाहीत. तसा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. रोजच्या दोन घासांची सोय करताना दिवस कधी संपतो आणि रात्र होते हे समजत नाही. अश्या परीस्तीथितीत हि मुलांना शिक्षण देण्याची आणि आपल्या परिस्तिथी ची कल्पना असून शिक्षण घेणाऱ्या मुलाचं अभिनंदन कराव तितक थोडच आहे.

चित्रकलेची आणि हस्तकलेची स्पर्धा आयोजित केली होती. इतकी सुंदर चित्र त्यांनी काढली होती कि खरच त्यात एक वेगळच सौंदर्य दिसत होते. एकाने वाघाचे इतके सुंदर चित्र काढले कि खरच मनापासून दाद द्यावीशी वाटली. कुन्चाल्यांशी कधी आयुष्यात संबंध आला नसताना इतक सुंदर चित्र काढताना नक्कीच त्यांच्यातील सुप्त गुणाची एक चाहूल मला दिसली. कोणतेही शिक्षक नसताना कोणताही अनुभव नसताना त्यांची कला खूपच उच्च दर्जाची होती. प्रत्येकाने खूपच तो दिवस मजेत घालवला. मग तो स्वामी विवेकानंद मंडळाचा कार्यकर्ता असो, मी असो किंवा अगदी सई असो.
असे अनेक विहीगाव आपल्या आजू बाजूला आहेत. आपल्यापेकी प्रत्येक जण ह्याचा अनुभव घेऊ शकतो. लांब जायची गरज नाही हे सगळ हाकेच्या अंतरावर आहे. समाजकार्य करावे इतके आपण मोठे नक्कीच नाही पण आपल्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आणि पैसे देऊन खूप मोठ भरीव कार्य आपण केल ह्या जाणीवेतून बाहेर पडून निदान समाजाला समजून घेतल तरी प्रत्येकासाठी आणि समाजासाठी तो वेगळा अनुभव ठरेल. शेवटी स्वामी विवेकानंद मंडळ , केतन बोंद्रे , मानसी कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यांचे मनापासून खूप  आभार. इतका छान अनुभव दिल्याबद्दल आणि मला एक वेगळी दृष्टी दिल्याबद्दल..........

विनीत वर्तक