Tuesday, 12 June 2012

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ट करियर पर्याय....भाग २ .. विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ट करियर पर्याय....भाग २ .. विनीत वर्तक

मागील भागात बघितलं, की ऑईल कसं तयार होतं. ऑईल जमिनीखाली शोधणं आणि त्यानंतर ते वर काढून, त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या घटकांत ते बदलणं, ही बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोणतीही एक कंपनी सगळ्याच टप्प्यांवर स्वतः सगळी उपकरणं तयार आणि प्रक्रिया करू शकत नाही आणि मग तिथेच येतात सर्व्हिस कंपन्या. सर्वप्रथम ज्याठिकाणी ऑईल शोधायचं, त्या ठिकाणचा भूगर्भीय अभ्यास  केला जातो, यामध्ये येतं भूस्तरीय रचना, तिथल्या भूगर्भाची हालचाल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्लेटस्. साधारणतः जिकडे अश्या प्लेटस् असतात, तिकडे ऑईल मिळण्याची शक्यता जास्त असते. एकदा हा अभ्यास झाला, की मग त्याचा सेस्मिक(seismic) अभ्यास केला जातो, यात ध्वनीलहरी जमिनीत पाठवून त्यांच्या प्रतिध्वनीचा अभ्यास करून एक अंदाज  बांधला जातो, की किती खोलीवर कोणत्या स्वरूपाचा भूस्तर आहे. एकदा हे सगळं झालं, की एक संशोधनाची विहीर खणली किवा ड्रील केली जाते. ड्रील करत असताना, भूगर्भातील रचनेच्या अभ्यासासाठी त्याचा लॉगिंग केलं जातं. या अभ्यासाच्या जोरावर मग पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. समजा ऑईल असण्याचं सिद्ध झालं, तर मग अजून अश्याच स्वरूपाच्या २-३ विहिरी केल्या जातात, ज्यात आतील रचनेचा अगदी बारकाईने अभ्यास केला जातो, नंतर या भूस्ताराचे क्षेत्र ठरवले जाते, आणि त्यातून किती ऑईल आपण काढू शकतो, याचा अंदाज बांधला जातो. त्यात असणारे सगळेच्या सगळे ऑईल आपण बाहेर काढू शकत नाही. मुळात ऑईल हे पाण्याप्रमाणे वाहतं नसतं, तर ते असतं पोरस(porous) दगडांच्या फटींमध्ये. उदाहरण द्यायचं झालं, तर चूनखडक किवा वाळूचा दगड. यांत असणाऱ्या पोकळ जागेत ऑईल दडलेलं असतं, म्हणजे स्पंजप्रमाणे. स्पंजमध्ये पाणी असेल, तर ते वाहत नाही पण जर तुम्ही स्पंजला पिळलं, तर त्यातून भरपूर पाणी बाहेर पडतं, तसंच काहीसं.

एकदा का अभ्यास पूर्ण  झाला, की मग या क्षेत्रात उत्खनन सुरू होतं. उत्खनन करणाऱ्या विहीरी आता सरळ ड्रील न करता त्यांना पूर्णतः आडवं करण्यात येतं, ज्यायोगे जास्तीत जास्त ऑईल भूस्तरामधून बाहेर काढता येईल. ओईलचं क्षेत्र मुख्यतः काही मीटर जाडीमध्ये असतं, पण ते २००-१००० किलोमीटरपर्यंत पसरलेलं असू शकतं. त्यामुळेच आज काल जास्तीत जास्त विहिरी आडव्या स्वरूपाच्या ड्रील केल्या जातात. वर वाचताना ही गोष्ट अतिशय सोप्पी वाटत असेल, पण जमिनीच्याखाली जवळ पास ३०००-५००० मीटर्स खोली आणि जवळ पास १२० डिग्री सेल्सिअस तापमानात अगदी ५ ते १० मीटरच्या छोट्या भूस्तरात विहिरीला आडवं करणं, आणि तसंच ज्याप्रमाणे भूस्तरात उतार चढाव होतील त्याप्रमाणे विहिरीत वर-खाली करणं, खूप कठीण काम आहे. एकतर जमिनीचा दाब, तापमान, माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यात ड्रील करताना होणारे आवाज आणि धक्के यांतून जमिनीचा अभ्यास करणं, हे खूप मोठं जिकीरीचं काम आहे. एक सोप्पं उदाहरण, तुम्ही कधी तुमचा कॉम्प्युटर जमिनीवर आदळून अगदी ५ फुटावरून परत चालू केला आहे?? किवा घरातील कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर अशी आदळली, तर ती परत सुरू होणं अगदीच अशक्य. मग कल्पना करा, '२५ जी फोर्स'मध्ये काय होत असेल? (माणूस फक्त '९ जी फोर्स'पर्यंत स्वतःला सहन करू शकतो, ते सुद्धा अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले आणि जेट विमान चालवणारे चालक). या सर्व कठीण परिस्थितीमध्येसुद्धा कॉम्प्युटरने काम करावं, यासाठी विशिष्ट बदल करावे लागतात, आणि ते करून मगच आपल्याला भूस्तराचा अभ्यास करता येऊ शकतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे सगळं करण्यासाठी पैसा आणि संशोधन आलंच, आणि त्याचबरोबर याचा वापर करण्यासाठी पैसे मोजणंही आलंच. अशी अद्ययावत उपकरणं चालवण्यासाठी त्याचा योग्य आणि नीट वापर करणारे लोकही आलेच, आणि त्याचबरोबर मिळणारं मानधनही.

जमिनीखालून मिळणारं ऑईल हे जमिनीच्या खाली दबलेलं असतं, आणि त्यावर प्रचंड दाबही असतो. कल्पना करा, एखाद्या हवा भरलेल्या फुग्यामध्ये तुम्ही टाचणी टोचली, तर काय होतं? तर बाहेर निघणाऱ्या हवेच्या जोरामुळे अतिप्रचंड दाब निर्माण होऊन फुगा फुटतो. तसंच ऑईल असलेलं भूस्तर प्रचंड दाबाखाली असतं, आणि आपण करणारं ड्रील हे त्या टाचणीचं काम करतं. जर बाहेर येणारं ऑईल दाबलं नाही, तर वाटेत येणारं सगळं उध्वस्त करतं. 'गल्फ ऑफ मेक्सिको'मध्ये झालेला हाहाकार वाचलाच असेल, याला ब्लो-आऊट असं म्हणतात. असं होण्यापासून  रोखण्यासाठी ड्रील करताना मड वापरतात . यात काही रासायनिक द्रव्यं मिसळलेली असतात. या मड-चा दाब हा त्या ऑईलच्या दाबापेक्षा जास्त असेल, तरच आपण व्यवस्थित ड्रील करू शकू,  म्हणूनच या क्षेत्रात धोके खूप आहेत. प्रत्येक गोष्ट ही दोनदा तपासून मग केली जाते, एखादी चूक आणि त्याचा फटका एखाद्या कंपनीच्या नाशामध्ये होऊ  शकतो. 'बी पी' या कंपनीला 'गल्फ ऑफ मेक्सिको' मध्ये बसलेला झटका १५ बिलियन अमेरिकन $ चा आहे. त्याशिवाय पर्यावरणाचा नाश, जीवितहानी असं भरून न येणारं नुकसानही आहे. त्याचबरोबर ड्रील करताना उपयोगात येणारे रासायनिक द्रव्यंही आजूबाजूचं पाणी, जागा हे सगळं खराब करत असतात.
ड्रील झाल्यानंतर त्यातून ऑईल काढायला सुरूवात होते. ऑईलवर असणाऱ्या दाबामुळे ते स्वतःच वरती येते, पण जर जास्ती वेळ काढल्यावर त्यावरील दाब कमी होतो व मग सक्शन-पंप किवा आर्टिफिशिअल लिफ्ट या तत्वाचा वापर करून ऑईल बाहेर काढले जाते. ते येताना त्या बरोबर पाणी, नैसर्गिक वायू, तसेच सगळ्यात घातक H2S वायूसुद्धा बाहेर येतो. H2S वायू प्राणघातक असून त्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो. बाहेर येणारे सगळेच वायू उपयोगी नसतात, आणि त्यांना साठवणेसुद्धा घातक असते, म्हणून त्यांना जाळून टाकण्यात येते. आधी बाहेर निघणारा नैसर्गिक वायूसुद्धा जाळला जात होता, आता याचा उपयोग घरगुती वापरासाठी तसेच गाड्यांमध्ये केला जातो.

इकडे नोकरीच्या संधी खूप आहेत, कारण घरापासून लांब राहून काम करावे लागत असल्याने खूप कमी जण या क्षेत्राकडे वळतात. त्याच बरोबर धोकेही आहेतच, पण इकडे मिळणारे मानधन हे तुम्हाला साध्या ऑफिस नोकरीत मिळणाऱ्या मानधनाच्या कैकपट असते. कदाचित एखाद्या ठिकाणी ३० वर्षं नोकरी करून तुम्हाला जितकं मानधन मिळणार नाही, ते तुम्ही इकडे ५ वर्षांत कमवू शकता. त्याचबरोबर ६ आठवडे कामानंतर ३ आठवडे भरपगारी सुट्टी किवा २८ दिवस कामानंतर २८ दिवस भरपगारी सुट्टी. इतकं असूनसुद्धा घरचा विरह हा आहेच, त्याचबरोबर धोके सुद्धा. ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, ज्यांना घरून आई, बाबा, बायको , नवरा , मुलगा, मुलगी या सर्वांचा सपोर्ट आहे, त्यांनी या क्षेत्रात यावं. मुळातच स्वस्थ जीवन जगणाऱ्या माणसांचं हे कार्य क्षेत्र नक्कीच नाही, ज्यांना धडपड करायची आहे आणि खूप काही शिकायचं आहे, त्याचबरोबर चांगला पैसा कमवायचा आहे त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. इकडे विहिरीला आडवं करणाऱ्या आणि बरोबर त्या भूस्तरात नेणाऱ्या व्यक्ती दिवसाला जवळपास ३०,००० कमावतात  आणि त्याशिवाय तुमचा पगार वेगळा म्हणजे निदान ८-१० लाख रुपये एका महिन्याला तुम्ही आरामात कमवू शकाल, पण त्यासाठी हवी जिद्द, जवळपास १५-२० वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आणि घरच्यांचा सपोर्ट. या क्षेत्रात पैसा नुसता नाही तर बरंच काही शिकायलाही मिळतं आणि एक आपण केलेल्या कामाची अनुभुतीही आहेच. येणाऱ्या काळात या क्षेत्राचं महत्व वाढतच जाणार आहे, आणि हो त्यायोगे मिळणार मानधन आणि अमर्याद संधी. कारण अजून आपण पृथ्वीचा ६०% भाग शोधलाच नाही ओईल साठी, कारण तशी व्यवस्था आपल्याकडे नव्हती, उद्या कदाचित ती असेल आणि येणाऱ्या संधीसुद्धा.

Monday, 11 June 2012

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र...एक उत्कृष्ट करियर पर्याय... विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक  वायू क्षेत्र...एक उत्कृष्ट करियर पर्याय... विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र म्हटलं, की आपल्याला समोर दिसतं ते पेट्रोल आणि डिझेल आणि आपल्या घरी नळावाटे  येणारा नैसर्गिक वायू. याचे उत्पादन कसे केले जाते, याची आपल्याला फारच जुजबी माहिती असते. थोडंसं या क्षेत्राविषयी. मुळात या दोन्ही गोष्टी पृथ्वीच्या भूगर्भात तयार होतात. त्यासाठी लागतात त्या ऑरगॅनिक गोष्टी ज्या भूस्तरामध्ये दाबल्या जाऊन, त्यांचं विघटन होतं, आणि योग्य ते तापमान आणि दाब मिळाला, की याचं रुपांतर होतं 'क्रूड ओईल'मध्ये. याला हायड्रोकार्बन असेही म्हटले जाते, कारण यात जास्ती करून हायड्रोजन आणि कार्बन याची संयुगं असतात. ही संयुगं तयार होण्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. प्रथम ऑईल तयार होते आणि मग जसे खोलवर जाऊ तसा नैसर्गिक वायू. यातही बरेच प्रकार आहेत. तयार झालेलं ऑईल एखाद्या विशिष्ट भूस्तरात होते, आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा त्याला पूर्णत्वास गेलेला दगड किवा भूस्तर असं म्हणतात. 

ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि ही होण्यासाठी करोडो वर्षं जावी लागतात. म्हणजे आज आपण जे ऑईल काढतो आहोत, त्याची सुरूवात करोडो वर्षांपासून झाली आणि आजही ऑईल तयार होते आहे, फक्त आपण आज ज्या वेगाने काढतो आहे, तो वेग तयार होणाच्या वेगापेक्षा अतिप्रचंड आहे, आणि म्हणूनच हळूहळू याचे चटके आपल्याला बसत चालले आहेत. ऑईलच्या वाढणाऱ्या किंमती, हे त्याचंच द्योतक आहे. जगात ऑईलचा २०११च्या अखेर जवळपास १३२४ गुणिले १० चा ९ वा घात(१३२४ x (१०^९)) इतका साठा आहे. आजच्याप्रमाणे जर आपण ऑईल काढत राहिलो, तर जवळ पास अजून ६४ वर्षं हे ऑईल पुरू शकेल परंतु ही संख्या अतिशय ढोबळमानाने आहे. प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ बघून किती ऑइलचं उत्पादन करायचं ते ठरवत असतो आणि त्याचा सरळ सरळ परिणाम ऑईलच्या किंमतीवर होतो. जगातील सगळ्यात मोठा ऑईलचा साठा हा २०११ अखेर, सौदी अरेबियाकडे नसून व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाकडे आहे, यातून दररोज २.१ गुणिले १० चा ६ घात (२.१ x (१०^६)) इतकं बॅरल ऑईल काढले जाते, (१ बॅरल म्हणजे जवळपास 150 लीटर) तरीसुद्धा पुढची ३९१ वर्षं ऑईल पुरेल, इतका हा अतिप्रचंड साठा आहे. तर त्या खालोखाल नंबर लागतो, सौदी अरेबियाचा. हा देश रोज ८.९ गुणिले १० चा ६ वा घात (८.९ x (१०^६)) इतका बॅरल ऑईल रोज काढतो, या हिशोबाने त्यांच्याकडील ऑईल जवळपास ८१ वर्षं पुरेल. आज आपण रोज ९०००० बॅरल  इतकं ऑईल फस्त करत आहोत आणि त्यात भर पडतच आहे.  म्हणूनच येणाऱ्या काही काळात हे क्षेत्र पूर्ण जगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.

मुळात ऑईल हे जगाच्या अश्या ठिकाणी मिळते, की हे सगळे भाग हे काम करण्यासाठी अतिशय दुर्गम मानले जातात. सांगायचं झालं, तर वाळवंटी प्रदेश, समुद्र आणि पृथ्वीचे दोन ध्रुव. त्यामुळेच या क्षेत्रात काम करण्यात खूप जोखीम असते, पण या जोखमीमुळेच तुम्हाला मिळणारा मोबदला सामान्य नोकरीच्या कित्येकपट असतो. मुळात ऑईल जमिनीखालून बाहेर काढणं आणि त्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनवणं, ही खूप खर्चिक प्रक्रिया आहे. सांगायचं झालं, तर एका खोल समुद्रात उत्खनन करणाऱ्या रिगचा भाव असतो रुपये २०,००० प्रत्येक मिनिटाला. म्हणजे तुम्ही जर कामात ५ मिनिटे वाया घालवली, तर तुम्ही कंपनीचा १ लाख रुपयांचं नुकसान केलं. इतका प्रचंड पैसा या सर्व प्रक्रियेत लागतो, की मुळातच खर्चिक असणारी ही प्रक्रिया देशोदेशांच्या भांडणं आणि श्रीमंत होणाच्या वृतीने अधिक खर्चिक होते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा नफा आणि एकूण कामाचा आवाका किती प्रचंड असेल. थोडक्यात सांगायचं झालं, तर 'अएक्सोन मोबिल' या कंपनीचा २०११चा रेव्हेन्यू आहे, ४८६ बिलियन अमेरिकन $. मी ज्या कंपनीत काम करतो, तिचा रेव्हेन्यू आहे ४० बिलियन अमेरिकन $. आता हे उत्पन्न जगातील सर्वांत श्रीमंत पद्मनाभन मंदिरात मिळालेल्या खजिन्याच्या दुप्पट आहे, आणि तेही एका वर्षातील. (पद्मनाभन मंदिरातील खजिन्याची आजमितीला किंमत आहे १ ट्रिलिअन रुपये किवा २४ बिलियन अमेरिकन $) आणि 'मोबिल'चं वार्षिक उत्पन्न या खजिन्याच्या २० पट आहे. मग इतका अतिप्रचंड प्रमाणात पैसा या कंपनी कमावत असतात,  आणि त्यायोगे या क्षेत्रात काम करणारे सगळेच जण... क्रमश: 

(पुढील भागात ऑईल कसं शोधतात, काढतात त्याविषयी आणि या क्षेत्रात असणाऱ्या नोकरीच्या संधी, धोके आणि उत्पन्न यांविषयी... )

Sunday, 10 June 2012

'अमेरिका' एक स्वप्न..... पुढे चालू ( भाग २ )


'अमेरिका' एक स्वप्न..... पुढे चालू ( भाग २ ) 

व्हिसाचे सोपस्कार आटोपल्यानंतर मग खरी धावपळ सुरु झाली. ऑफिसमधून सुट्टी मिळाली, त्यामुळे ट्रेनिंग झाल्यावर एका आठवड्याची सुट्टी मिळाली होती. आता यक्ष्यप्रश्न समोर होता, की अमेरिका बघायचा आहे. पूर्व-पश्चिम असा खूप मोठा विस्तार असलेला देश इतक्या कमी वेळात बघणं तर अशक्य. मग ठरवलं, की या वेळेस कोणत्या तरी एका दिशेकडून सुरूवात करू, म्हणजे प्रवासातला वेळही वाचेल आणि जास्तीत जास्त बघता येईल. या कामी मग जयेशदादाची आणि माझा वर्गमित्र विवेकची मदत घेतली. जयेशदादा सॅनहोजेमध्ये राहत होता 'सिलिकॉन व्हॅली' म्हणतात तो हाच प्रदेश. तो म्हणाला, तू इकडे ये मी बघतो सगळं, फक्त तू कधी निघणार आणि कुठून सुरूवात करणार परतीच्या प्रवासाची ते ठरवून सांग, म्हणजे त्याप्रमाणे मी ठरवतो सगळं. येताना सॅनफ्रान्सिस्कोमधून सुरूवात करावी, असं ठरलं, त्याप्रमाणे ऑफिसमधून तिकीट बुक केलं. जयेशदादानी हुस्टन ते सॅनफ्रान्सिस्को आणि तिकडे फिरण्याच्या प्रवासाची सगळी तजवीज केली. सगळं एकदम एकमेकाला लागून होतं, कारण वेळ कमी आणि खूप काही बघायचं होतं. थोडी उलथापालथ आणि माझा कार्यक्रमच बोंबलेल अशी धाकधूक मनात होतीच. तरीसुद्धा जयेशदादा स्वतः असल्यामुळे काळजी नव्हती. हा तर झाला ६ आठवडयानंतरचा भाग, पण ह्यूस्टनमध्ये काय करायचं, हे काही सुचत नव्हतं.  कोणीच ओळखीचं नाही आणि तितक्यात वर्तककाका माझ्या घरी आले आणि त्यांच्या बोलण्यातून कळलं, की प्रज्ञा त्यांची मुलगी तिकडेच आहे. चला! मनात म्हटलं, की काहीतरी तोंडओळख आहे या शहरात. मग प्रज्ञाशी बोललो, तिने माझ्या हॉटेलचा पत्ता वगैरे विचारून घेतला व तिचेही घर फक्त ३० मिनिटाच्या अंतरावर होतं असं कळलं. चला, तर ही तयारी तर झाली, आता प्रश्न होता समान भरण्याचा...

या सगळ्या गडबडीत मनात अजून एक चिंता होती, ती म्हणजे सईची, माझी मुलगी अवघी ४ महिन्याची होती. तिला आणि मोनाला अश्यावेळी सोडून इतक्या लांब जायला मन तयार नव्हतं पण इलाजही नव्हता. कारण इतक्या लहान वयात सईला तिकडे नेणं म्हणजे थोडं कठीणच काम होतं, आणि घरातही सगळे याच्या विरोधातच होते. मोनाने अगदी मोठ्या मनाने मला पाठींबा दिला, आणि निश्चिंतपणे जायची तयारी करावयास सांगितली. मित्रांकडून आणि जयेशदादाकडून काय घ्यावं आणि काय घेऊ नये याची माहिती होतीच आणि आधीच्या ६-७ इतर देशातल्या टूरचा अनुभव होताच. त्याप्रमाणे सामानाची तयारी झाली. आता तो दिवस जसा जवळ येत होता, तशी धाकधूक वाढतच होती. गणपतीबाप्पाचं दर्शन या वेळी मुकणार याची मनात कुठेतरी खंत होती, पण पुढे काय वाढून ठेवलं होतं, त्या बाप्पालाच माहीत.. कतार एअरवेजने माझं प्रस्थान झालं, मुबईवरून दोहा ला. दोहाला ४ तासांच्या आरामानंतर विमानाने प्रस्थान केलं, ते ह्यूस्टनसाठी जवळ पास १८ तासांचा विमान प्रवास पहिल्यांदा करत होतो. विमानात खूप कंटाळा आला, पाय भरून आले, मग काय! विमानातच शतपावली सुरु केली. तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. माझ्याबरोबर अजून ४ जण होते, त्यामुळे गप्पात वेळही गेला. जसं ह्युस्टन जवळ येऊ लागलं, तसं खिडकीतून अमेरिकेचं दर्शन घेत होतो. जे इतकी वर्षं दूरदर्शन वर पाहिलं होतं आणि ऐकलं होतं ते रस्ते, घरं यांची आज डोळ्यांनी अनुभुती घेत होतो. विमान सरतेशेवटी ह्युस्टनमध्ये उतरलं. विमानाततून बाहेर येताच अजून एका कठीण परीस्थीला सामोरं जायचं होतं, ते म्हणजे अमेरिकन कस्टममधून बाहेर निघणं. बरीच मोठी रांग होती. पुढे काही पाकिस्तानी नागरिक होते, त्यांचा नुसता पासपोर्ट  बघून त्यांना चौकशीसाठी बाजूला नेण्यात आलं. ९/११चं सावट अजून अमेरिकेच्या मनावरून उतरलं नाही, याची चुणूक मला तिकडेच पाहायला मिळाली. शेवटी जवळपास १ तासाने माझा नंबर आला. पासपोर्ट समोरच्या अधिकाऱ्याकडे दिला, त्याने माझी बायोमेट्रिक टेस्ट केली, यात हाताचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळाचा स्कॅन होतं. त्यानंतर मला विचारलं, की 'पहिल्यांदा अमेरिकेत? आणि कशासाठी आला आहात?' त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर अचानक त्याने माझ्या कामाबद्दल विचारायला सुरूवात केली. जवळ पास ५ मिनिटे हे संभाषण चालू होतं, मला वाटलं, की आता काही खरं नाही! बहुतेक पूर्ण चौकशीसाठी जावं लागणार. पूर्ण चौकशीमध्ये तुमची कसून चौकशी होते, तसाच तुमच्या बॅगेमधलं एकूण एक सामान काढून चेक केलं जातं आणि त्याशिवाय तुमच्या अंगावरचे कपडे आणि तुमचं सर्व स्कॅनिंग होतं, आणि वाटल्यास तुम्हाला परतही पाठवलं जाऊ शकतं. मनात शंकेची पाल चुकचुकत होती, बहुधा त्या अधिकाराच्याही लक्षात आलं असावं. त्याने हसून मला सांगितलं, की त्याचा भाऊसुद्धा माझ्याच कंपनीमध्ये कामाला आहे, म्हणून माझ्याद्दल तो जास्ती चौकशी करत होता. हे बोलून त्याने पासपोर्टवरती शिक्का मारून माझ्या अमेरिकेतील प्रवेशातील शेवटचा अडथळा दूर केला. सामानाचा शोध करून आणि शेवटी सर्व अडथळ्यांवर मात करत, सरतेशेवटी अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवलं.

अमेरिका ही काही पुण्यभूमी नसली, तरी जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हापासून इकडे कधी ना कधी यायचं स्वप्न बघितलंच होतं. आज त्याची पूर्तता होताना खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्यांत समाधानाची गोष्ट ही होती, की कंपनीने मला पाठवलं होतं, मी स्वतःहून येण्यापेक्षा! माणूस किवा आपण सर्वच काही ना काही स्वप्न बघतो आणि ती जेव्हा प्रत्यक्षात खरी होतात, त्याचा आनंद आणि ते क्षण आयुष्यभर जपून ठेवायचे असतात. ध्यानीमनी नसताना आयुष्यात आलेल्या एका अनपेक्षित वळणाने माझं हे छोटुसं स्वप्न पूर्ण झालं. यात खूप जणांनी मला मदत केली प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे! नाव घ्यायची झालीच तर जयेशदादा, विवेक, प्रज्ञा, आणि अजून काही मित्र जे मला अमेरिकेत मिळाले. त्यांच्या विषयी पुढील लेखात, अमेरिकेतल्या अनुभवांमध्ये.. 
   
विनीत वर्तक..

अमेरिका एक स्वप्न ..

  अमेरिका एक स्वप्न....

लहानपणापासूनच अमेरिका या देशाबद्दल मनात बरंच कुतूहल होतं. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की कधी आपल्याला या देशात जायची संधी मिळेल. जेव्हा भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागलो, त्यानंतर तर या शक्यता जवळपास मिटल्याच होत्या, पण तरीसुद्धा कुठेतरी सुप्त इच्छा ही होतीच. कोणी काहीही म्हणो, पण प्रत्येकाच्या मनात निदान हा देश बघायची एकदा तरी संधी मिळो हे असतंच. जवळपास ८ वर्षं सरकारी नोकरी केल्यानंतर हा विचारच मी सोडून दिला होता. अचानक उन्हाने काहिली झालेल्या दिवशी मेघ दाटावेत, आणि पूर्ण निसर्गाचा कायापलट व्हावा, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. नवीन नोकरीची संधी काय आली, मजेत म्हणून केलेल्या प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश  मिळालं आणि समोर एक कठीण परिस्थिती उभी राहिली, की जिचा विचार मनाला कधी शिवलाही नव्हता. सरकारी नोकरी सोडायची म्हणजे, हे जरा अतिच झालं, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागायचं, मनात खूप गोंधळ आणि काय करू काहीच सुचत नव्हतं. भाभामधील नोकरी एक स्वप्नवत सगळ्यांसाठी आणि त्याला लाथ मारून अश्या एका क्षेत्रात पाऊल ठेवायचं की ज्यातलं काहीच माहीत नाही, अशी एक कंपनी की जिचं नावसुद्धा कोणी ऐकलं नाही. इंटरनेटवर वाचलं 'स्लम्बर्जर'विषयी तेव्हाच कळलं की खूप मोठी कंपनी आहे ही!  जितका विचार केला त्या पेक्षाही मोठी. जवळ पास  ८०,००० लोक कामाला आणि १९० देशात  काम करणारी असा तिचा आवाका. तरीसुद्धा सरकारी नोकरी सोडण्यासाठी मन तयार होत नव्हतं. मनातून सरकारी नोकरीला कंटाळलो होतो, आणि ज्या संधीची मी वाट बघत होतो ती समोर उभी होती. मनात म्हटलं, 'आता नाही तर कधीच नाही', जोस आणि चंद्रा  म्हणून माझे वरिष्ठ होते, त्यांनी मला जाण्याचा सल्ला दिला, आणि मी अवघ्या १८ दिवसाच्या नोटीसमध्ये भाभामधून बाहेर आलो. हे एक रेकॉर्ड होतं.  सरकारी नोकरीत अट ६ महिन्याची असताना फक्त या दोन वरिष्ठांच्या प्रयत्नामुळे मला १८ दिवसात सगळं आटोपून 'स्लम्बर्जर'मध्ये येता आलं. हे इतकं रामायण सांगण्याचं कारण इतकंच, की जेव्हा तुमच्या नशिबात लिहीलेलं असतं आणि त्याला जेव्हा कर्तृत्वाची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीसुद्धा साध्य होतात.    

'स्लम्बर्जर'मध्ये आलो, ते पण एका वेगळ्या देशात मलेशिया मध्ये आणि पुढे जाण्याच्या अमर्याद संधी होत्याच, तशीच एक संधी आली २०१० साली. अमेरिकेमध्ये असणाऱ्या एका ट्रेनिंगसाठी जायची संधी मिळाली. जवळ पास ६ आठवड्याचे ट्रेनिंग होते, ते हुस्टन या शहरात. टेक्सास या राज्यामधले हे शहर जवळ पास जगात सर्वांना माहीत आहे, ते याठिकाणी असलेल्या 'नासा' या संस्थेमुळे. संधी तर मिळाली पण खूप काही अडचणीसुद्धा होत्या, सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे अमेरिकन व्हिसा, ही सगळ्यात कठीण आणि बेभरवशाची पायरी होती. अगदी सगळ्या गोष्टी योग्य असतानासुद्धा किती जणांना व्हिसा मिळत नाही असं ऐकून होतो आणि त्याची मुलाखत हा अजून एक वेगळाच सोपस्कार होता. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे माझ्या मागील अनुभवाची. 'भाभा'सारखी संस्था असल्याने व्हिसाची मोठी गोची होणार, हे मी जाणून होतो, तरीसुद्धा कुठेतरी छोटी आशा होती की सगळं काही विनासायास पार पडेल. या कमी सगळ्यात मोठी मदत झाली ती म्हणजे जयेशदादा आणि किरणदादाची. जयेश दादा आधीच अमेरिकेमध्ये होता, त्याच्याकडून बरीचशी कल्पना मिळाली की स्वतःला कसं तयार करायचं. सगळी कागदपत्रं आणि मनाची तयारी केल्यावर शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी ७ वाजता जाऊन अमेरिकन कॉन्सुलेटच्या बाहेर रांगेत उभा राहिलो. जाचक सुरक्षा व्यवस्था आणि कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून माझ्या नंबरची वाट बघत बसलो. आलेले सगळेच एका धर्मसंकटात की व्हिसा मिळेल की नाही. जवळपास १० वाजता माझा नंबर लागला. अमेरिकन बाईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, 'क' च्या बाराखडीतील सगळे प्रश्न तिने मला विचारले. मी सुद्धा तितक्याच आत्मविश्वासाने उत्तरं दिली. अचानक मला माझ्या बायकोचं नाव विचारलं आणि म्हणाली, तुमचा व्हिसा ३ दिवसांत मिळेल. अचानक मिळालेल्या या उत्तराने मी सर्दच झालो, अवघ्या २ मिनिटामध्ये मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला होता. हातात असलेली ती जाडजूड कागदपत्रांची फाईल बघून मनात विचार करत होतो, किती कष्ट घेतले होते यासाठी! सगळ्यांचे उंबरठे झिजवून, बँकेची कागदपत्रे, ऑफिसची कागदपत्रे यांकडे साधं ढुंकून बघितलंसुद्धा नाही. पण मनात खूप खूष होतो, असा अनपेक्षित धक्का होता मला. नंतर कळलं की, माझ्या पुढे असणाऱ्या ५ जणांना तिने परत माघारी पाठवलं होतं, त्यात एक इन्फोसिसचा कर्मचारीही होता. पण सगळ्या शक्यतांना दुरावत मी एक अवघड टप्पा पार केला होता. 

आता पासपोर्टवर अमेरिकन व्हिसाचा शिक्का बघितल्याशिवाय  कोणाला काही सांगायचं नाही, असं ठरवलं होतं. शेवटी तिने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पासपोर्ट मिळाला, अमेरिकन शिक्क्यासह तेव्हा मात्र आपलं स्वप्न खरं होणार याची चाहूल  लागली होती. 

क्रमश:  ...

ऑईल रिग्ज .... एक अनुभव...


ऑईल रिग्ज .... एक अनुभव... 

चोहीकडे पाणी आणि त्यामध्ये मी .. एक दिवस, दोन दिवस .. दिवस मोजत जातो आहे. लाटा उसळतात .. बोटी खाली वर होऊन दृष्टीतून बाजूला होतात.
मी मात्र असतो तिकडेच .. तेच बघत .. खाऱ्या हवेचा स्पर्श अंगावर घेत त्याच हेलीडेकवर फिरत .. सूर्य अस्ताला जाताना सोनेरी रंगांची उधळण करतो आहे, आणि त्याच्या साक्षीने माझा फेरफटका सुरू आहे. एकीकडे पेजिंगचे आवाज ऐकायला येत आहेत, मनात मात्र हाच विचार की आपलं नाव ऐकायला यायला नको .. जनरेटर आणि रिग फ्लोअरचा आवाज आसमंतात घोंगावतो आहे, आणि जमिनीतल्या वायूची धुरांडी आकाशात जाऊन माणसाच्या आस्तित्वाची जाणीव सभोवती पसरलेल्या समुद्रात दाखवून देत आहेत. ही आहे ऑईल रिग...

पेट्रोल, डिझेल आणि गॅस याच्या दरवाढीने त्रस्त होणारे आपण, हे येतं कुठून, याचा जरा विचारसुद्धा करत नाही, किंबहुना पाण्याच्या विहिरीसारख्या तेलाच्या विहीरी असतील व बादलीने त्यातून तेल वरती काढत असतील इथंपर्यंत आपण कल्पनानिर्मिती करून थांबलेलो असतो, किवा आपलं ऑफ-शोअरचं जीवन हे फक्त शिपिंग बोटीपर्यंत निगडीत असतं, इथंपर्यंत आपलं जनरल शिक्षण असतं.

ऑईल रिग किंवा ज्याला तेल-विहीर म्हणतो, ती कशी असते किंवा तिकडे कसे काम चालते, याचा थोडासा परिस्पर्शही आपल्याला कधी होत नाही.
24 तास, 365 दिवस चालणारं काम आणि एक-एक मिनिट जिकडे मोजला जातो, आणि कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकणारं अस्थिर असं कामाचं वातावरण, हे क्वचितच आपल्यासारखा कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ऑईल रिग्जचं काम म्हटलं, की समोर दिसणारा पैसा हा फक्त आपण बघतो, पण त्या मागचं समर्पण कोणी बघत नाही किंवा त्यात असलेले धोके कोणी ओळखत नाही. 
आज हेलीडेकवर फिरताना गेल्या 4 वर्षांचा काळ आठवतो आहे, की ऑईल रिग आणि क्रूड ऑईल याचा तुटपुंजा जाणकार असलेला मी आणि हेलीकॉप्टर किंवा ज्याला चॉपर म्हणतात, त्यात बसण्याची ओढ असणारा मी, आज कुठंपर्यंत येऊन बसलो आहे! पहिल्या वेळी हा प्रवास संपू नये असं मनोमन
वाटणारा मी, आणि आज घड्याळ बघत कधी एकदा उतरतो याची प्रतीक्षा करणारा मी.  खरंच पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे असं वाटतं.
जिकडे कामाचा संबंध वेळेशी लावला जात नाही, जिकडे दिवस आणि रात्र सारखी असते, जिकडे घड्याळ हे कमीत कमी वेळात काम करण्यासाठी बघितलं जातं, कामातून लवकर सुटण्यासाठी नाही, जिकडे एक मिनिटाचा हिशोब US $ मध्ये लावला जातो, कदाचित रुपयाचा समावेश त्याच्या आसपासही होत नाही आणि जिकडे माणूस फक्त काम, काम आणि कामच करतो, अश्या ऑईल रिगवरचं जीवन खरंच किती वेगळं आहे!
इतकं सर्व असतानासुद्धा 12 तासांनंतर मिळणारं उत्कृष्ट जेवण, त्यानंतर पूल टेबल आणि जिम करणारे आम्ही किवा हेलीडेकवर पाऊलवाटेने गोल गोल फेऱ्या मारणारे आम्ही आणि त्यानंतर टाटा स्कायने दिलेली TV ची देणगी किवा रिग फोन आणि V SAT च्या जोडीवर इंटरनेट किवा फोनद्वारे आपल्या प्रियजनांशी सवांद साधणारे आम्ही आणि नंतर 20 डिग्री च्या AC रूममध्ये मऊ गादीवर दिवसाच्या श्रमाने दमलेले आम्ही गुडूप झोपी जातो, ते उद्या करायच्या कामाच्या आठवणीने.....

आयुष्याला किती कंगोरे आणि रंग आहेत याचा विचार मी करतो आहे. माझी माणसं माझी दरवेळी आतुरतेने वाट बघत असतात, एका ओढीने की आज विनीत येणार घरी आणि त्याच ओढीने मीही चॉपरमध्ये बसतो, की कधी एकदा जमीन दिसते. नवा दिवस नवीन आशा घेऊन येतो, असं म्हणतात आणि ते खरंच आहे. अश्या क्षेत्रात काम करणारे आम्ही खरोखरीच त्याचा नेहमीच अनुभव घेत असतो. 

तुमचाच,
विनीत वर्तक.