Sunday 12 March 2023

चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

 चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

सोशल मिडिया आपल्या खऱ्या आयुष्याचा गेल्या काही वर्षात भाग झाला आणि आता तो जवळपास आपलं आयुष्य बनलेला आहे. आधी अनोळखी लोकांना ओळखण्यापासून सुरु झालेला प्रवास आता अनोळखी लोकांच्या चारित्र्याचा दाखला ते त्याच हनन करण्या पर्यंत येऊन पोहचलेला आहे. अनोळखी लोकांच्या आभासी ओळखीतून आजवर अनेक लोक पडद्यामागून ते पडद्यासमोर बांधले गेले आहेत. कधी हे संबंध मैत्रीचे, नात्यांचे किंवा अगदी प्रेमाचे असले तरी त्यातून मिळणारी सोबत प्रत्येकाने आजवर अनुभवलेली आहे. एकीकडे जिकडे चांगली नाती किंवा परस्परांमधील संबंध दृढ होत गेले तिकडेच वेगवेगळ्या लोकांचा अप्रत्यक्ष प्रवेश आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुरु झाला. मग त्याच अनोळखी लोकांसमोर सिद्ध करण्याची एक स्पर्धा सुरु झाली. फेसबुक ही सोशल मिडिया मधलं असं अंगवळणी पडलेलं माध्यम. तिकडे रोज याची प्रचिती आपल्यापैकी प्रत्येकाला येतेच. 

सोशल मिडिया च आभासी जग आपल्या इतक्या जवळ आलं की ते म्हणजेच आपलं खरं आयुष्य असं अनेक जण जगायला लागले आहेत. त्यामुळेच इकडे आपल्या बद्दल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडला जाऊ लागला. हे सगळं लिहण्याचं कारण इतकच की आज स्वतःला या आभासी आयुष्यात सिद्ध करण्यासाठी अनेक जण जीवाचा आटापिटा करताना दिसतात. अनेकदा हे सगळं आपल्याला नैराश्याकडे घेऊन जाते आहे याचा अंदाज ही अनेकांना कडेलोट होई पर्यंत लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप काही उशीर झालेला असतो अथवा तुम्ही खूप काही गमावलेलं असते. या सगळ्यातून खूप कमी लोक बाहेर पडू शकतात. पडद्यामागच्या निरर्थक गुजगोष्टी एखाद्याला आपलं आयुष्य संपवून टाकण्या पर्यंत घेऊन जाऊ शकतात हे आपल्याला अजून उमगलेलं नाही हे खेदाने सांगावस वाटते. 

एखाद्याचं चारित्र्य काय असावं? ते चांगलं का वाईट याची सर्टिफिकेट घेऊन आज अनेक जण या आभासी विश्वात वावरत असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या व्यक्तीची किंवा त्याच्या आयुष्याबद्दल अथवा व्यक्तिगत गोष्टींबद्दल काहीही माहिती नसताना त्या व्यक्तीच चारित्र्य हनन करण्याचा एक प्रकारे परवाना आपल्याला मिळालेला आहे अश्या आवेशात आपल्याच आजूबाजूला या व्यक्ती वावरत असतात. कारण आभासी जगात आपलं अंग काढण्याची सगळीच सोय उपलब्ध असते. एकतर तकलादू कायदे व्यवस्था त्यात सोशल मिडीयाच्या Garbage in, garbage out या उक्तीचा फायदा घेऊन मी नाही त्यातला अथवा त्यातली असं म्हणून नामनिराळं होण्याची वृत्ती आज सगळीकडे फोफावली आहे. आपण जे पुढे ढकलत आहोत त्याला कोणताही सबळ पुरावा अथवा कोणताही आधार नसताना फक्त असं ऐकलं या उक्तीवर एखाद्याच्या चारित्र्याच हनन करण्याची एक स्पर्धाच सुरु झाली आहे. 

स्क्रीन शॉट हा अजून एक प्रकार आजकाल सगळ्याच सोशल मिडिया मधून फोफावला आहे. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत बोलणं हे त्या बोलण्याचा मागचा, पुढचा संदर्भ काढून त्याच चारित्र्य हनन करण्यासाठी सगळीकडे वापरलं जात आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीशी काय बोलावं अथवा काय संबंध ठेवावेत हा त्या दोन व्यक्तींचा संबंध असताना त्यातील मथळ्याचा चुकीचा अर्थ काढून अथवा त्याला आपल्याला हवं तसं एडिट करून त्यात मज्जा घेणाऱ्या लोकांचा आजकाल सुळसुळाट आहे. अर्थात यात खेदाने पांढरपेशा समाजातले स्वतःला प्रगल्भ समजणारे अनेक लोक समाविष्ट आहेत. या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय फरक पडू शकतो याच सोयरसुतक ना ते शेअर करणाऱ्या लोकांना असतं ना त्यावर आपला मत ठोकून देणाऱ्या इतर लोकांना. 

सोशल मिडिया वर ज्या व्यक्ती अथवा ज्यांच चारित्र्य आपल्याला योग्य वाटत नाही अश्या लोकांना ब्लॉक करण्याचा ऑप्शन असताना त्यांच्या भिंतीवर किंवा त्यांच्या तोंडावर कौतुकाचे पाट वाहून दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा उद्धार करणारे चारित्र्याचे कैवारी आजकाल सगळीकडे आहेत. अनेकदा या चिखलात आपण का उतरायचं याचा विचार करून अनेक व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. पण याचाच अर्थ जे काही बोललं जात आहे त्याला मूक संमती आहे असा काढला जातो. संपूर्ण सोशल मिडियावर एखाद्याच्या चारित्र्याचा बाजार करून याच व्यक्ती पुन्हा येऊन मी नाही त्यातली / त्यातला असं समोरच्याला भासवत असतात. 

हे सगळं लिहण्याच कारण इतकच की सोशल मिडिया म्हणजे चारित्र्य ठरवण्याचं माध्यम नाही. कोणालाच कोणाचं चारित्र्य हनन करण्याचा कोणीच अधिकार दिलेला नाही. पण नकळत आपण त्याचा भाग बनत असू तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांची पण एकदा आपण कल्पना करायला हवी. कारण आज ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांबाबत बोलत आहोत किंवा पसरवत आहोत त्या आपल्या बद्दल पण होऊ शकतात. ज्या कोणी व्यक्ती याची सुरवात करतात त्यांच स्वतःच चारित्र्य बरबटलेलं असते आणि आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये याचा आटापिटा ते करत असतात. त्यामुळे पुढल भक्ष्य तुम्ही स्वतः बनू शकता. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. त्यामुळे इकडे कोणी कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. त्यामुळे इथल्या चारित्र्य सर्टिफिकेट वर तुम्ही स्वतःला जज करत असाल तर तुम्ही नैराश्याकडे खेदाने प्रवास करत आहात. लाईक, कमेंट आणि प्रसिद्ध ते स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपण आपल्या आनंदाची, सुख समाधानाची चावी सोशल मिडियाच्या हाती सुपूर्द करत आहात. ज्या वेळेस ही चावी अश्याच चारित्र्याचा कैवार घेतलेल्या लोकांच्या हाताला लागते तेव्हा तुमचा कधी बाजार उठून जातो तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्यासाठीच अश्या चारित्र्याच्या कैवार घेऊन गॉसिप करणाऱ्या लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवणं महत्वाचं आहे. कारण आज दुसरं कोणीतरी तुमच्या गॉसिप चा विषय असेल पण तुमच्या नकळत तुमचाच कधी नंबर लागेल याचा अंदाज तुम्हाला स्वतःला पण येणार नाही. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. तेव्हा या चारित्र्य हनन साखळीचा भाग होऊ नका. कोणाचंही व्यक्तिगत आयुष्य हे त्या व्यक्तीचा व्यक्तिगत भाग आहे. जोवर तुम्ही त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष जोडलेले नसाल तोवर त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर कोणतंही भाष्य करण्याचा ना कायद्याने अथवा ना सामाजिक दृष्टीने अधिकार आहे. आज आपण घेतलेली २ मिनिटांची मज्जा त्या व्यक्तीला आत्महत्या करेपर्यंत प्रवृत्त करू शकते याच भान सोशल मिडिया वापरणाऱ्या सर्वच व्यक्तींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा या चारित्र्यांच्या कैवाऱ्यांपासून सावध रहा. स्वतः ते बनू नका. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment