Saturday, 6 February 2021

कोरोना लसीकरण... विनीत वर्तक ©

 कोरोना लसीकरण... विनीत वर्तक ©

२१ दिवस 

५० लाखापेक्षा जास्ती आरोग्य सेवा कर्मचारी 

८२ लाख लस टीकाकरण केंद्र

५० लाख लोकांना कोरोना लस अवघ्या २१ दिवसात देणारा भारत जगातील सगळ्यात वेगवान देश ठरला आहे. काही प्रसारमाध्यम आणि राजकीय नेत्यांनी स्वतःला त्यातलं ग,म, भ, न कळत नसताना केलेल्या नकारात्मक टीकेमुळे हा वेग कमी राहिलेला आहे. नाहीतर आपण ह्या आधीच हे लक्ष्य साध्य केलं असतं. 

तब्बल १३ लाख/ दिवस ह्या वेगाने भारत सरकारने कोरोना लस देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पण त्याला हवा तसा वेग आलेला नाही. पण तरीसुद्धा आपण २१ दिवसात हि मजल मारली आहे. जिकडे अमेरिका २४ दिवस, ब्रिटन ला ४३ दिवस तर इस्राईल ला हा एकदा गाठण्यासाठी ४५ दिवस लागले आहेत. नक्कीच भारताच्या लोकसंख्येच्या मानाने हा एकदा खूप लहान आहे. पण असं शिवधनुष्य पेलणं आणि ते पूर्णत्वाला नेणं सोपं काम नाहीच आहे. 

कोरोना लस घेतल्यामुळे शरीराला धोका होईल किंवा त्याने आपल्याला त्रास होईल असा खोटा अप्रचार करणाऱ्या लोकांना लसीकरणानंतर आलेल्या आकड्यांनी चांगली चपराक लावली आहे. कोणतीही लस टोचल्यावर प्रत्येक माणसाचं शरीर हे वेगळ्या पद्धतीने त्याला स्वीकारते. त्यामुळे काही मायनर तर अगदी काही थोड्या प्रमाणात मेजर सिम्टम्स शरीरात जाणवू शकतात. डोकं दुखणे, ताप येणं ते अजून काही पद्धतीने दिसणारे हे सिम्टम्प्स अपेक्षित असतात. त्यात कोरोना लस ज्या वेगाने विकसित करण्यात आली आहे. ते बघता काही लोकांन मध्ये आढळणं हे नॉर्मल आहे. 

आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणात ५० लाखांपैकी ०.१८% म्हणजे ९००० लोकांमध्ये मायनर सिम्टम्प्स म्हणजे ताप येणं, डोके दुखी वगरे आढळून आलेलं आहे. तर ०.००२% लोकांना (साधारण १०० लोकांना) हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलेलं आहे. ज्या लोकांना ही गरज पडली त्यांना आधीपासून इतर व्याधी असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सगळे आकडे एकाच गोष्टीकडे निर्देष करत आहेत की कोव्हीड लस ही सुरक्षित आहे. कोरोना पासून आपलं रक्षण करण्यास समर्थ आहे. इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की आजही लसी वर संशोधन सुरु आहे. ती जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जर कोणी खोटा अप्रचार करत असेल तर आपण डोळसपणे ह्या सर्व गोष्टींकडे बघितलं पाहिजे. 

भारताने आत्तापर्यंत जगातील १५ देशांना आपल्या लसीचा फायदा पोहचवला आहे. तर तब्बल २५ देश भारताच्या कोव्हीड लसी साठी रांगेत उभे आहेत. ह्यातील कोणत्या देशाला लस मदत म्हणून द्यायची, मैत्री साठी द्यायची, विकत द्यायची ह्या सगळ्याचा निर्णय हा त्या, त्या देशाची आर्थिक परिस्थिती, भारताशी असलेले संबंध तसेच आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या आधारे ठरवली जाणार आहे. जिकडे चीन आपली लस घ्यावी म्हणून जागतिक पटलावर आमिष दाखवतो आहे. तिकडे भारताची लस पैसे मोजून घ्यायला तेच देश भारताच्या दरवाज्यावर उभे आहेत. 

भारताच्या कोरोना लसीकरणाचा हा कार्यक्रम जगाच्या लसीकरण आणि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी सरकारी पातळीवर कसा राबवला जाऊ शकतो ह्याच एक उत्कृष्ठ उदाहरण ठरेल ह्याची माझ्या मनात शंका नाही. फक्त एकच समस्त भारतीयांनी सगळ्या शंका, कुशंका बाजूला ठेवत आपल्या संशोधक, वैज्ञानिक आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या ह्याच्यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हाच हा कार्यक्रम एक मापदंड म्हणून ओळखला जाईल. तूर्तास ह्या मोहिमेच्या पुढल्या टप्प्यासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत:- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   




Friday, 5 February 2021

एका आशाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका आशाची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आजवर अनेक लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. काही लोकांच अस्तित्व इतिहासाच्या पानात लुप्त झालं तर काही जणांच मुद्दामून लुप्त केलं गेलं. अहिंसेच्या मार्गाने आपण ब्रिटिशांना झुकवू आणि त्यांना भारत सोडण्यास भाग पाडू असं मानणारा एक गट होता तर स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवायचं तर त्याची किंमत मोजावी लागते. वेळप्रसंगी गोळी चालवावी लागते असं मानणारा एक गट होता. 'लोहा लोहे को काटता है' त्याप्रमाणे ब्रिटिशांना अद्दल घडवायची असेल तर त्यांच्या प्रमाणे आपण आपली सेना उभी केली पाहिजे असं स्वप्न ज्यांनी बघितलं आणि Indian National Army म्हणजेच आझाद हिंद सेनेची स्थापना ज्यांनी केली ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या आझाद हिंद सेनेत असे अनेक लढवय्ये होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व दिलं. ह्यात नुसते पुरुष पुढे नव्हते तर भारतीय स्त्रियांनी पण त्यात आपलं योगदान दिलं होतं. चूल आणि मूल ह्यात रमणाऱ्या भारतीय स्री ने बंदूक हातात घेऊन ब्रिटिश साम्राज्याला तडाखे दिले होते. त्यात होती एक छोटीशी 'आशा'. 

दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होत. ५ जुलै १९४३ चा दिवस होता जेव्हा रंगून, बर्मा (आत्ताच यंगून, म्यानमार) इथल्या जुबली हॉल मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस एक ऐतिहासिक भाषण करत होते. त्यात त्यांनी उपस्थित जनसमुदायापुढे घोषणा केली. ती म्हणजे 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा'. नेताजींच्या त्या भाषणाने संपूर्ण सभागृह तर स्तब्ध झालं पण त्याचे पडसाद जगाच्या कोपऱ्यात उमटले. कोबे, जपान इकडे १५ वर्षाच्या 'आशा सहाय' च्या त्या बालमनावर ह्या शब्दांनी घर केलं ते कायमच. नेताजींची भाषण आणि स्वातंत्र्य लढ्याची साद त्या तरुण मनात सतत पिंगा घालत होती. त्यातच त्यांना भेटण्याचा योग्य १९४४ साली आला. जपान च्या इंपिरियल हॉटेल मध्ये १६ वर्षाची छोटी आशा नेताजींना भेटली. ज्यांना आपण आदर्श मानतो अश्या गुरुतुल्य व्यक्तीला भेटल्यावर सहाजिक भारतीय संस्काराप्रमाणे त्यांच्या पाया पडली. पण क्षणाचाही विलंब न करता नेताजींनी तिला सांगितलं, उभी रहा आणि बोल 'जय हिंद'. ते शब्द, तो बाणा, ते देशप्रेम बघून आशा सहाय ह्यांनी आझाद हिंद सेनेच्या ' झाशी च्या राणी' या तुकडीत समाविष्ट करण्यासाठी सांगितलं. पण नेताजींनी त्यांना १७ वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबायला संगीतलं. 

वयाची १७ वर्ष पूर्ण झाल्यावर आशा सहाय ह्यांना आझाद हिंद सेनेचा भाग होण्याचे वेध लागले. पण बँकॉक, थायलंड इकडे जपान वरून जाण्यासाठी त्यांना विमान उपलब्ध नव्हतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करायचं ठरवतो तेव्हा साक्षात देव सुद्धा अडवू शकत नाही. म्हणतात ना,      

ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले 

ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है!!!

आशा सहाय आणि त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात मध्ये वापरल्या गेलेल्या बॉम्ब वर्षाव करणाऱ्या लढाऊ विमानातून जपान ते थायलंड हा प्रवास केला. अतिशय जोखमीच्या त्या प्रवासाचं लक्ष्य एकच होतं ते म्हणजे कसही करून आझाद हिंद सेनेचा भाग व्हायचं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. वयाच्या १७ व्या वर्षी आयुष्यच एकच स्वप्न त्यांनी निवडलं ते म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करणं. 

आझाद हिंद सेनेत प्रवेश केल्यावर त्यांच ६ महिन्याचं गोरिला ट्रेनिंग झालं. कार, जीप, ट्रक चालवण्यापासून ते बंदूक, चाकू, रायफल आणि अगदी विमान विरोधी बंदूक चालवण्या पर्यंत सगळं शिकल्यावर आझाद हिंद सेनेमध्ये लेफ्टनंट आशा सहाय ह्यांनी प्रवेश घेतला. वास्तविक नर्सिंग सारखा पर्याय उपलब्ध असताना त्यांनी ब्रिटिशांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. रंगून, इंफाळ इकडे लष्करी कारवाईत त्यांनी सहभाग घेतला. ब्रिटिशांना संपूर्णपणे भारतातून उखडून टाकण्याचे आझाद हिंद सेनेचे मनसुबे पूर्णत्वाला गेले नाहीत. पराभवानंतर बँकॉक वरून सिंगापूर ला जाताना त्यांच्या विमानाला शत्रूने लक्ष्य केलं पण कसबसं त्यांना चुकवत त्या सिंगापूर इकडे उतरल्या. आझाद हिंद सेना हरली पण नेताजींनी पेटवलेली देशप्रेमाची ज्योत आजतागायत तेवत आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लेफ्टनंट आशा सहाय इतिहासाच्या पानात लुप्त झाल्या. स्वतंत्र्य भारतात त्यांनी आपलं देशसेवेच व्रत निरंतर सुरू ठेवलं. भागलपूर, बिहार मधल्या अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याचं आपलं व्रत त्यांनी सुरु केलं. गुरगाव ते बिहार हा प्रवास करत त्यांनी बिहार मधल्या खेड्यापाड्यात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. येत्या २ फेब्रुवारी त्यांनी ९२ व्या वर्षात प्रवेश केला.पण आजही नेताजींनी दिलेला मंत्र तंतोतंत पाळत आलेल्या आहेत. तो म्हणजे, 

'That is That' ( जे झालं ते झालं ते बदलणार नाही.) 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या आझाद हिंद सेनेच्या लेफ्टनंट आशा सहाय यांना माझा साष्टांग नमस्कार. निदान हा लेख वाचून तरी भारतातल्या लोकांना खरं स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं ह्याची जाणीव होईल ह्याच आशेवर इकडे थांबतो. मनात एकाच खंत की ज्यांनी देशासाठी आपलं रक्त दिलं त्या महान माणसांना स्वतंत्र्य झालेल्या भारतात कोणी ओळखत नाही. इतकच काय की त्यांची साधी माहिती पण कुठे उजेडात येत नाही. 

लेफ्टनंट आशा सहाय तुमच्या कार्याला ह्या भारतीयाचा कडक सॅल्यूट... 

जय हिंद!!!

फोटो स्रोत:- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Wednesday, 3 February 2021

लढाऊ विमानांचा बाजार... विनीत वर्तक ©

 लढाऊ विमानांचा बाजार... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या एफ १५ इ एक्स लढाऊ विमानाला अमेरिकेने भारताला विकण्यासाठी मंजुरी दिली. या बातमीमुळे भारत आणि अमेरिका जवळ येणार आणि भारत ती विमान खरेदी करणार ह्या चर्चांना उधाण आलं आहे. मुळात भारताला अश्या विमानांची गरज आहे का? असली तर अमेरिकेने विकण्याची तयारी दाखवलेली विमान ती पूर्ण करू शकतात का? त्याच सोबत अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरण करणार का? असे सर्व प्रश्न समोर आहेत. भारत आणि भारतीय वायू दल त्यांना योग्य ती लढाऊ विमान विकत घेईल पण नक्की कोणत्या निकषावर ती घेतली जातील ह्यासाठी भारताची गरज आणि भारतासमोरील पर्याय यांचा विचार सामान्य माणसाला कळायला हवा. ते समजून घेण्यासाठी आधी थोडी प्राश्वभूमी समजून घेणं महत्वाच आहे. 

भारताला वायू दलाला सध्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढाऊ विमानांची प्रकर्षाने गरज आहे. गेल्या काही वर्षात लाल फितीत अडकलेल्या लढाऊ विमान खरेदी संदर्भातील अनेक करारांमुळे तसेच तेजस विमानाच्या निर्मितीत झालेल्या उशिरामुळे भारतीय वायू दलाची भिस्त ही जुन्या कालबाह्य झालेल्या विमानांवर आहे. यातील अनेक विमान ही येत्या काही वर्षात निवृत्त होणार आहेत. भारताला असणाऱ्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या शत्रूंपासून (चीन- पाकिस्तान) रक्षण करण्यासाठी भारतीय वायू दलाला ४२ स्क्वाड्रन ची गरज आहे. ही संख्या आता ३० च्या आसपास कमी झाली आहे. एका स्क्वाड्रन मध्ये साधारण १८ लढाऊ विमान असतात. ह्याचा अर्थ भारतीय वायू सेनेला २५० च्या आसपास लढाऊ विमानांची गरज आहे. त्यातील ३६ राफेल, ८३ तेजस मार्क १ ए, १२ सुखोई ३० एम के आय आणि  २१ मिग२९  भारतीय वायू सेनेने मागवली आहेत. उरलेली गरज भागवण्यासाठी भारतीय वायू सेनेने टेंडर मागवली आहेत. 

उरलेल्या जवळपास ११४ लढाऊ विमानाचा १५ बिलियन अमेरिकन डॉलर चा हा करार असणार आहे. तर ह्या करारासाठी अनेक बडे देश उत्सुक आहेत. अमेरिका, रशिया, फ्रांस, स्वीडन, युरोपियन युनियन सारख्या देशांनी आपली मातब्बर लढाऊ विमान ह्या निमित्ताने स्पर्धेत उतरवली आहेत. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की भारताची गरज आणि तंत्रज्ञान ह्या सोबत मोजावी लागणारी किंमत ह्या सगळ्याच्या निकषावर भारतीय वायू दल ही खरेदी करणार आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतात. १) लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट २) मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ३) हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट  ह्या प्रत्येक प्रकारातील लढाऊ विमान एखाद्या देशाकडे असणं गरजेचं असते. म्हणूनच भारताकडे वेगवेगळ्या राष्ट्रांची तसेच स्वदेशी लढाऊ विमानांची फौज आहे. 

लढाऊ विमानांचे प्रकार हे त्यांच्या थ्रस्ट / वेट या प्रमाणावर अवलंबून असतात. जितकं हे प्रमाण जास्ती तितकं ते लढाऊ विमान हलकं समजलं जाते. उदाहरण द्यायचं झालं तर स्वदेशी तेजस थ्रस्ट / वेट हे प्रमाण १.०७ इतकं आहे. त्याच वेळी राफेल चं  ०.९८८ तर सुखोई एम के आय च १ आहे. त्यामुळे तेजस ला लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं म्हंटल जाते. त्याच थ्रस्ट / वेट हे प्रमाण जास्ती असल्याने ते अतिशय हलकं आहे. हलकं असल्यामुळे हवेतून अतिशय चपळाईने उड्डाण भरू शकते. (highly maneuverable). यांचा मुख्य उपयोग लढाईत दुसऱ्या फळीतील लढाऊ विमान म्हणून होतो. शत्रूच्या एखाद्या विमानाने भारताच्या हद्दीत प्रवेश केला तर त्याला निष्प्रभ करण्यासाठी तेजस आपलं मुख्य अस्त्र असणार आहे. आता बघू सध्या भारतीय वायू दलात दाखल होणारी राफेल लढाऊ विमान. राफेल हे मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. राफेल विमान घेताना ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं आहे ते म्हणजे रडार वर त्याची माहिती मिळण्याची शक्यता. राफेल च्या स्पेक्ट्रा सिस्टीममुळे ते जवळपास रडार वर अदृश्य असते. आता लक्षात आलं असेल की राफेल ची जबाबदारी ही शत्रूच्या गोटात वार करणे ही आहे. 

राफेल रडार वर अदृश्य राहून शत्रूच्या प्रदेशात असलेल्या तळांवर तसेच गरज पडल्यास हवेतल्या हवेत शत्रूच्या गोटात जाऊन त्यांच्या लढाऊ विमानांना नष्ट करण्यास सक्षम आहे. राफेल तब्बल ३००० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर एका उड्डाणात कापण्यास सक्षम आहे. ह्या काळात शत्रूच्या नजरेत न येण्यासाठी राफेल वर स्पेक्ट्रा प्रणाली आणि स्वतःच रक्षण करण्यासाठी मेटॉर, स्कॅल्प, आणि हॅमर सारखी क्षेपणास्त्र बसवली गेलेली आहेत. हे प्रत्येक क्षेपणास्त्र आपापल्या श्रेणीत सर्वोत्तम आहेत. ह्यासाठी आपण राफेल विकत घेण्यासाठी खूप जास्ती किंमत मोजली आहे. कारण शत्रूला नेस्तनाबूत करण्याची ताकद आणि तंत्रज्ञान राफेल मध्ये आहे. राफेल हे पहिल्या फळी आणि दुसऱ्या फळी मधील दुवा असणार आहे. राफेल जग्वार आणि मिग २७ ह्या जुन्या झालेल्या विमानांची जागा घेणार आहे. या नंतर येतात ती हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट. त्यासाठी आपल्याकडे सुखोई एम के आय ३० उपलब्ध आहेत. हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट शत्रूच्या एकदम खोलवर हल्ला करण्यास सक्षम असतात. सुखोई आपल्या सोबत ३८ टनापेक्षा जास्ती भार घेऊन उड्डाण भरू शकतात. ब्राह्मोस सारखं क्षेपणास्त्र घेऊन जाण्यास ती सक्षम आहेत. त्यामुळे ही विमान युद्धाच्या काळात पहिल्या फळीत असणार आहेत. 

वर उल्लेख केलेल्या विमानांसोबत भारतीय वायू दलाकडे सद्यस्थितीला इतरही लढाऊ विमान आहेत जशी जग्वार, मिराज २०००, मिग २७, मिग २९, मिग २१ पण त्यांची संख्या कमी आहे. आपण त्यांना सपोर्टींग रोल मध्ये बघू. येत्या काळात भारताची मुख्य मदार ही वर उल्लेख केलेल्या लढाऊ विमानांवर असणार आहे. भारताकडे सुखोई जवळपास २५० च्या आसपास आहेत. तर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट साठी आपण नुकतीच तेजस ची ऑर्डर दिलेली आहे. आता वाचल्यावर लक्षात येईल की आपल्याकडे सध्या कमी आहे ती मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ह्या प्रकारामधील. त्यासाठी भारत जो नवीन ११४ विमानांचा करार करणार आहे तो ह्याच प्रकारातील लढाऊ विमानांसाठी आहे. आपल्याकडे नवीन फक्त ३६ राफेल असणार आहेत. ती ही पूर्णतः तयार राहण्यासाठी २-३ वर्षाचा कालावधी जाणार आहे. यासाठीच भारताला तातडीने त्या ११४ विमानांची गरज आहे. फ्रांस आणि भारत यांच्यात अजून ३६ राफेल विमानांची बोलणी सुरु आहेत पण जर भारताने १०० पेक्षा जास्ती विमानांची ऑर्डर राफेल ला दिली तर त्याच्या इंजिन तंत्रज्ञानासह संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच सर्व विमान मेक इन इंडिया मार्फत भारतात बनवण्याची ऑफर फ्रांसने भारताला दिलेली आहे अशी चर्चा आहे. 

अमेरिका जे एफ १५ इ एक्स विमान भारताला देत आहे ते मुळातच हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. नक्कीच आजवरचा त्याचा रेकॉर्ड आणि त्यातील तंत्रज्ञान ह्यावर चर्चा आणि मतभेद होऊ शकतील. पण मुळातच भारताची गरज ती नाही. त्याचसोबत अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरण करेल का नाही? ह्या बद्दल काही ठोस समोर आलेलं नाही. एकदा चर्चेला बसल्यावर समोर काय गोष्टी टेबल वर मांडल्या जातात ह्यावर भारत कोणतं लढाऊ विमान खरेदी करेल हे नक्की होईल. भारत एकाच कंपनीला ११४ ची ऑर्डर न देता ५०-५० टक्के अश्या पद्धतीने आपली फ्रंटलाईन फोर्स तयार करू शकतो. अश्या जर तरच्या अनेक शक्यता आहेत. त्यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. एक मात्र नक्की की एफ १५ इ एक्स च्या येण्यानं स्पर्धेत चुरस वाढली आहे. जेव्हा स्पर्धा अटीतटीची असते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी खरेदी करणाऱ्याच्या फायद्याच्या होतात. त्यामुळे एकूणच भारत कोणतं विमान खरेदी करतो हे बघणं रंजक असणार आहे. 

फोटो स्रोत:- गुगल  (पहिल्या फोटोत एफ १५ इ एक्स, दुसऱ्या फोटोत राफेल )    

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Monday, 1 February 2021

चित्रकथेला सातासमुद्रापार नेणारे पद्मश्री परशुराम गंगावणे... विनीत वर्तक ©

 चित्रकथेला सातासमुद्रापार नेणारे पद्मश्री परशुराम गंगावणे... विनीत वर्तक ©

आज पब जी चा जमाना आहे. एनिमेशन च्या जगात एकेमकांवर कुरघोडी करून तेच आपलं खरं आयुष्य मानणाऱ्या तरुण पिढीच्या हातातली साधन बदलली असली तरी मनोरंजनाचा हेतू तसाच कायम आहे. पण जेव्हा गेम खेळण्यासाठी कॉम्प्युटर, संवाद साधण्यासाठी हातात असणारे आय फोन नव्हते त्याकाळी मनोरंजनाची परिभाषा वेगळी होती. मनोरंजनातून समाजाला काहीतरी चांगली शिकवण देण्याचा हेतू आपल्या संस्कृतीत नेहमीच जपला गेला आहे. त्याच उद्देशाने आपल्या संस्कृतीत अनेक लोककलांचा उदय झाला. काळाच्या ओघात ह्यातील अनेक लोककला मागे पडल्या किंवा त्यांच अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. पण लोकांनी पाठ फिरवल्यावर सुद्धा आपल्या संस्कृतीच्या इतिहासातील त्या पानांची जपणूक करणारे पण आज आहेत. दुर्दैव असं की एकतर त्यांच्या कडे मागासलेलं म्हणून बघितलं जाते किंवा त्यांना योग्य तो मानसन्मान, पैसे समाजातून दिले जात नाहीत. पण तरीही जिद्दीने एक वारसा जपत तब्बल ५०० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा लोककला जपणारे कलाकार आज आपल्या महाराष्ट्रात आहेत ह्याचा सार्थ अभिमान आहे.

चित्रकथेचा मनोरंजनाचा खेळ हा महाराष्ट्रात एकेकाळी खूप प्रसिद्ध होता. गावोगावी हिंडून चित्रकलेतून अनेक कथा सांगणाऱ्या ह्या खेळातून अनेक गोष्टी  सांगितल्या जायच्या. प्रत्येक कथेतून समाजाला ते बघायला येणाऱ्या त्या गावातील प्रत्येक माणसाला एक संदेश, जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देण्याचं काम ह्या लोक कलेतून केलं जायचं. त्या त्या वेळच्या विषयांची सांगड घालून ते विषय प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे ही लोककला होती. समाजातील विषम परिस्थिती ते स्वराज्य सारखा विषय असो चित्रकथेच्या लोककलेने जनमानसात आपला प्रभाव पाडला होता. हेच कारण होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या कलेला राजाश्रय दिला होता. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र, भारत आपला जाणता राजा तब्बल ४०० वर्षानंतर ही मानतो त्याच राजाने आश्रय दिलेली ही कला मात्र अडगळीत गेली आहे. पण तरीही न थकता, उमेद न सोडता २१ व्या शतकात, पब जी च्या जमान्यात चित्रकथेच्या लोककलेला सातासमुद्रापार नेणारे कलाकार म्हणजेच सिंधुदुर्ग, महाराष्ट्रामधील 'श्री.परशुराम गंगावणे'.

विठ्ठलाला कोणता झेंडा हाती घेऊ असा प्रश्न विचारत मराठी अस्मितेचे गोडवे गाणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला हे नाव नवीन असेल. कारण मराठी अस्मिता किंवा मराठी माणूस ह्याबद्दल आपले ठोकताळे जात, राजकारण आणि पक्ष इकडेच येऊन थांबतात. आज च्या जमान्यात शिवछत्रपतींनी जोपासलेली ही लोककला त्याच जिद्दीने जोपासत, त्याचा प्रसार नुसता महाराष्ट्र आणि भारतापुरता मर्यादित न ठेवता परशुराम गंगावणे ह्यांनी चित्रकथेला अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात नेण्याचं शिवधनुष्य ही उचललं आहे. खंत एकच जिकडे ह्या देशातून लोक गंगावणे ह्यांचा शोध घेऊन ही कला बघतात. तिकडे सो कॉल्ड मराठी अस्मिता जपणारी मराठी माणसं कोकणात गोव्याला जाताना पिंगुळी, सिंधुदुर्ग इकडे वळून २ रुपये शुल्क असलेल्या परशुराम गंगावणे ह्यांच्या चित्रकथेच्या म्युझिअम ला भेट देत नाहीत. गोवा आणि कोकणातील प्रत्येक बीच, हॉटेल आणि दारूचे आकडेसुद्धा तोंडपाठ असणारे तुम्ही,आम्ही मुळात असं काही महाराष्ट्रात, आमच्या कोकणात आहे ह्याबद्दल अनभिज्ञ असतो आणि कदाचित ती मराठी अस्मितेची शोकांतिका आहे. 

आपल्या आधीच्या पिढीकडून मिळालेला कलेचा वारसा पुढल्या पिढीकडे देण्यासाठी परशुराम गंगावणे ह्यांची धडपड सुरु आहे. आपल्या मुलांना त्याचे बाळकडू देताना ह्या लोककले बद्दल माहिती पुन्हा एकदा जनमानसात पोहचवण्यासाठी त्यांचे निरंतर प्रयत्न सुरु आहेत. २००६ साली आपल्या चित्रकथेचं  प्रदर्शन मांडण्यासाठी अक्षरशः गुरांच्या गोठ्यात त्यांनी आपल्या म्युझिअम ची मुहूर्तमेढ रोवली. अवघे २ रुपये शुल्क आकारून कळसूत्री बाहुल्या, चित्रकथेचं  सादरीकरण, त्याचा प्रवास, त्यातील वेशभूषा ह्या सगळ्याचा अविष्कार त्यांनी समाजासमोर मांडला. ५०० वर्ष जुन्या चित्रकथेच्या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी तसेच ही लोककला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २०२१ सालचा पद्मश्री सन्मान जाहीर केला आहे. चित्रकथा आज नुसती लोककला राहिलेली नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृती मधील सोन्याचं एक पान आहे. 

परशुराम गंगावणे ह्यांच कार्य इकडेच थांबलेलं नाही. आज त्यांनी जोपासलेल्या लोककलेवर एक परदेशी माणूस संशोधन करत आहे. आज कला शाखेतील अनेक विद्यार्थी इकडे येऊन त्यांच मार्गदर्शन घेत आहेत. आज महाराष्ट्रासह, भारतात त्यांच्या चित्रकथेचे खेळ आयोजित करत आहेत. पण गरज आहे ती त्या चित्रकथांना आपल्या संस्कृतीचं भाग बनवण्याची आज त्या लोककलेला आणि ते सादर करणाऱ्या लोकांना त्यांच स्थान देण्याची. कदाचित मराठी माणसाने ते केलं तर मराठी अस्मिता नक्कीच जपली गेली असं मी म्हणेन. चित्रकथांची लोककला जपून त्याला मोठं करणाऱ्या पद्मश्री परशुराम गंगावणे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

जय महाराष्ट्र!!! 

 फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.